तुम्हाला पुरोगामी व्हायचंय का? सोप्पं आहे!!

हल्लीच्या जगात ‘श्वास घेण्या’पेक्षाही सोपी गोष्ट कोणती झालीये माहितीये? ‘पुरोगामी होणे’!! त्यासाठी काय करायचं? काहीच नाही, जाणून-बुजून सातत्याने हिंदूंना अपमानास्पद वाटेल असं वागत राहायचं, की ठरलातच तुम्ही पुरोगामी! मग यात सरळसरळ तुमचा ढोंगीपणा दिसला तरीही चालेल. कारण तुम्हाला काहीच करावं लागत नाही. हे मूर्ख हिंदूच ‘तुमचा ढोंगीपणा हा कसा तुमचा ढोंगीपणा नसून प्रामाणिकपणा आहे’ हे जीवाच्या आकांताने सांगायला पुढे येतात. अहो उलट तुम्ही जितका जास्त ढोंगीपणा कराल तितकी वरची पुरोगामी श्रेणी मिळेल तुम्हाला. म्हणजे थोडासा ढोंगीपणा केला की – ‘विवेकवादी’, त्याहून अधिक केला की – ‘पुरोगामी’आणि आणि ढोंगीपणाची कमाल मर्यादा गाठली की – ‘भारतीय सेक्युलर’!! आणि हे सारं अगदी सोप्पं असतं बरं का. काय करायचं – समजा कुणा गुंडांच्या जमावाने एखादा अहिंदू तरुण मारला (मग कारण काही का असेना!), तर या कृत्याचा आपल्या घरातील कुणी माणूस गेल्यागत निषेध करायचा. आणि म्हणायचं — “हिंदू दहशतवाद्यांच्या जमावाने अमुक धर्माच्या अहिंदूचा निर्घृण खून केला”. परंतू याच्या नेमकं उलट घडलं तर मात्र म्हणायचं – “समाजकंटकांच्या एका जमावानं तरुणाची हत्या केली”. लक्षात ठेवा, पुरोगामी ठरण्याचा सगळ्यात पहिला आणि महत्वाचा नियम आहे, तो म्हणजे ‘अपराधी हिंदू नसेल तर त्याच्या धर्माचं कदापिही नाव घ्यायचं नाही. अगदीच जघन्य अपराध असला तर मात्र हळूच अल्पसंख्याक म्हणून विषय संपवायचा’!! समजलं?

तुम्हाला सर्वधर्मसमभाववादी व्हायचंय का? सोप्पं आहे! समजा एखाद्या हिंदू मुलीवर, तुम्ही कल्पनेतही कल्पना करू शकणार नाही इतका बीभत्स बलात्कार झाला, तिच्या शरीराची शक्य ती सारी विटंबना केली गेली, इतकेच नव्हे तर बळजबरी तिचे कुणा ‘शांतिप्रिय’ धर्मात धर्मपरिवर्तन केले गेले तर..? तर ‘अजिबात लक्ष द्यायचे नाही’!! सेक्युलॅरिझमचे भारतीय अवतार असल्या फालतू गोष्टीकडे लक्ष देत नसतात. तुम्हाला त्यासाठी फारसे प्रयत्नही करावे लागणार नाहीत बरं! कारण हिंदूंची मनं इतकी बधीर झालेली आहेत की, मुळात तेच या गोष्टीकडे लक्ष देणार नाहीत. अहो, जिथं बलात्कार आणि खून असे दुहेरी अपराध केलेला अपराधी केवळ अल्पवयीन (आणि अल्पसंख्य!) आहे एवढ्याच कारणापोटी किरकोळ शिक्षेवर सुटतो आणि लोकांना त्याचे काहीही वाटत नाही, तिथे बलात्कार आणि धर्मपरिवर्तनाच्या प्रकरणातली पीडीता जिवंत वाचलीये म्हटल्यावर कोण कश्याला मरायला या बातमीला महत्व देईल? त्यातूनही जर कुणी हा विषय काढायला गेलंच तर आपण आधी भरपूर आरडाओरडा करायचा आणि त्यानंतर ‘कुणा स्वयंपाक्याला त्यानेच बनवलेली पोळी नुसती दाखवणं (इथे रेटून ‘खाऊ घातली’ असं म्हणायचं बिनधास्त!) हा त्याच्या धर्मस्वातंत्र्यावर कसा घाला आहे आणि हाच एक कसा राष्ट्रीय महत्वाचा विषय आहे’ हे तारस्वरात ओरडून सांगायचं! की झालातच तुम्ही सर्वधर्मसमभाववादी!! अभिनंदन!

तुम्हाला ‘सामाजिक बांधिलकीचा पुरोगामी सर्वधर्मसमभाववादी’ व्हायचंय का? नाव थोडं मोठं आहे, पण होणं फार सोप्पं आहे. काहीही खास करायचं नाही. फक्त ‘दैनिक भास्कर’चा आदर्श डोळ्यापुढं ठेवून वागायचं. अहो खरंच! ‘दैनिक भास्कर’ काय करतंय — सध्या रक्षाबंधन आलाय ना, म्हणून ते मुलींसाठी मोहीम चालवतायत – “मी राखी बांधणार नाही”. का? अहो मुलींवर बलात्कार नाही का होत? मग जगातल्या सगळ्याच पुरुषांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायला मुलींना प्रोत्साहन द्यायचं आणि राखी बांधणार नाही असं सांगायचं. मग भलेही तुमचा भाऊ साक्षात रामाचा अवतार का असेना. नाही म्हणजे नाही म्हणजे नाहीच. याचे दोन फायदे होतात. एकतर तुम्ही ‘साबांपुस’ होता आणि दुसरे म्हणजे आपोआपच तुम्ही ‘स्त्रीवादी’ही ठरता! आहे की नाही एका तिकीटात दोन खेळ!! हो मात्र एक काळजी घ्यायची बरं का. की हा असा खेळ फक्त हिंदूंच्याच सणांच्या बाबतीत करायचा. अन्यधर्मीयांच्या बाबतीत चुकूनही नाही. अन्यथा जीवावर बेतू शकतं तुमच्या!! जरा जपून! हे हिंदू मात्र मूर्ख असतात. ते नुसतं हे धार्मिक अतिक्रमण सहनच करत नाहीत, तर उलट आधूनिकतेच्या नावाखाली तुम्हाला पाठिंबा पण देतात. द्या टाळी! आणि त्यातूनही कुणी समजा विचारलंच की, “का हो, रक्षाबंधनच का? स्त्रीजातीवर बलात्कार होतात तर ‘मी आजपासून व्हॅलेंटाईन-डे साजरा करणार नाही’, असं का म्हणू नये”? तर त्याच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. तोंडात पुरोगामित्वाच्या शेणाची गुळणी धरून गप्प राहायचं. तुमचं काम हिंदूच करतील. नाही त्या प्रश्नकर्त्यास प्रतिगामी-प्रतिगामी म्हणून त्याचं जगणं दुष्कर करून टाकलं त्यांनी, तर नाव लावणार नाही! आणि हे ‘दैनिक भास्कर’ केवळ उदाहरण झालं हो. तुम्ही या गोष्टीची आपल्याला हवी ती आवृत्ती काढू शकता. फक्त एक सूत्र लक्षात ठेवायचं — “हिंदूंचा कोणताही सण आला रे आला, की काही ना काही कारण काढून पुरोगामित्वाच्या नावाखाली त्याला विरोध करत राहायचं”. बास! अन्यधर्मीयांच्या सणांमध्ये डोकावायला जायचं नाही. त्यांना धार्मिक स्वातंत्र्य असतं ना! मग? एवढं पाळायचं फक्त. की झालातच तुम्ही ‘साबांपुस’!!

तुम्हाला कलाप्रेमी पुरोगामी व्हायचंय का? मग त्यासाठी तुम्हाला ‘आमिर खानचा फॅन’ व्हावं लागेल. म्हणजे काय करायचं? एकतर त्याच्या चित्रपटांना कम्पल्सरी चांगलंच म्हणायचं. दुसरं म्हणजे त्या चित्रपटांमध्ये तो जे करतो त्याला अभिनय आणि सदरच्या चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी तो जे काही चाळे करेल (ते किती का सवंग आणि प्रसंगी उचलेगिरी का असेना!) त्याला ‘हट के मार्केटिंग’ म्हणायचं. मग भलेही तो अभिनयाच्या बाबतीत कमल हासन, चियान विक्रम, नाना पाटेकर, धनुष, सूर्या शिवकुमार, प्रकाश राज, प्रसेनजित चटर्जी या सगळ्यांपुढे ‘बच्चा’ का असेना! भलेही उपरोक्त यादीपैकी जवळजवळ सगळेच राष्ट्रपती पारितोषिकासारख्या सर्वोच्च सन्मानाने अनेकवार गौरविलेले का असेनात. अश्यावेळी बिनधास्त म्हणायचं – “हे पुरस्कार सगळे विकत घेतलेले असतात हो. आमिरवर कायमच अन्याय होतो. शिवाय पुरस्कार काही अभिनयाचा मापदंड असतो का” वगैरे वगैरे..! थोडक्यात तो पडद्यावर जो अभिनयाचा अभिनय करतो, त्याला अभिनय म्हणायचं! याबाबतीत प्रत्येकाच्या वैयक्तिक आवडीनिवडीमुळे जरासा मतभेद होऊ शकतो म्हणा. त्यामुळे इथपर्यंत तुम्हाला कुणीही काही म्हणणार नाही. मात्र याखेरीज तो पडद्याबाहेर जे जे म्हणून काही करेल, त्याला ‘सामाजिक बांधिलकी’च म्हणायचं. याहून कमी काही म्हणायचंच नाही. चांगलं’च’ म्हणायचं. मग तो ‘सत्यमेव जयते’च्या नावाखाली केलेला निम्न दर्जाचा खोटारडेपणा असो वा अण्णा हजारे आणि त्यांचे सहकारी उपाशीपोटी उपोषणाला बसले असताना त्याच ठिकाणी याचा रोजा सोडण्याचा अट्टाहास असो वा आपला चित्रपट प्रदर्शित होत असतानाच बरोब्बर वेळ साधून ‘नर्मदा बचाव’वाल्यांना दिलेला पाठिंबा असो वा चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या नावाखाली त्याने केलेला नंगानाच असो! चांगलं’च’ म्हणायचं! आणि हो, त्याचा आगामी चित्रपट ‘साधूसंतांच्या तथाकथित ढोंगीपणावर’ आधारित आहे. मग तर काय सगळ्या सेक्युलर पुरोगाम्यांना मेजवानीच! तेव्हा ही संधी साधायची आणि कलाप्रेमी पुरोगामी व्हायचं. अर्थात अगदी आमिर खान नको असेल तर मात्र तुम्ही आपापल्या वकूबाप्रमाणे शाहरुख खान, महेश भट, शबाना आझमी इ. नाही पाठिंबा देऊ शकता. तो तुमचा निर्णय!

उपरोक्त उपायांखेरीजही पुरोगामी होण्याचे इतर हजारो उपाय आहेत बरं का. पण ते नंतर कधीतरी. तूर्त सुरुवात करण्यासाठी हे सोप्पे सोप्पे उपाय बहुमूल्य आहेत! तर म्हणून मी म्हणत होतो की, हल्लीच्या जगात ‘श्वास घेण्या’पेक्षाही ‘पुरोगामी होणं’ जास्त सोप्पं झालंय. तेव्हा अशी शतकानुशतकांतून एकदाच येणारी सुवर्णसंधी का म्हणून दवडायची? संधीसाधू होऊन संधी साधूयात आणि तुम्ही-आम्ही-आपण सारे पुरोगामी होऊयात. देव-देश-धर्म जाऊ द्या खड्ड्यात! बोला, पुरोगामित्वाचा..?

– © विक्रम श्रीराम एडके
(लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी आणि लेखकाने विविध विषयांवर दिलेली व्याख्याने ऐकण्या/आयोजिण्यासाठी भेट द्या: www.vikramedke.com)

image

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *