लोकमान्यांना शंभर वर्षांनंतर लाभलेला शिष्य!!

मोहनदास गांधी जेव्हा आफ्रिकेतून भारतात परतले होते आणि येथील विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेत होते, तेव्हा आपल्या या प्रवासात ते लोकमान्य टिळकांनाही भेटले होते. भेट संपली. गांधी निघून गेले. ते जाताच लोकमान्य आपल्या सहकाऱ्यांकडे वळून म्हणाले, “हा माणूस पक्का बनिया दिसतोय. बोट दिलं तर हातच ताब्यात घेईल. याला दूर लोटू नका, पण फार जवळदेखील करू नका. नाहीतर हा विकून खाईल सगळ्यांना”. अर्थातच टिळकयुगाच्या अस्तानंतर लोकमान्यांचा हा मुत्सद्दी सल्ला कुणीच मानला नाही. हळूहळू सारी काँग्रेसच गांधींच्या कह्यात गेली. त्यातून पुढे काय काय रामायणे घडली आणि देशाला त्याचे काय काय परिणाम भोगावे लागले, हा एक वेगळाच विषय आहे.

मात्र मला आज एक असा कुटील राजकारणी दिसला — मी मुद्दामहून ‘कुटील’ हा शब्द वापरतोय — ज्याने शंभर वर्षे उलटून गेल्यावरही लोकमान्यांचा सल्ला पक्का आत्मसात केलाय. नव्हे, तर अक्षरशः अंगी बाणवलाय! त्या कुटील राजकारण्याचं नाव आहे, मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी! मोदी कायम गांधींचे आणि त्यांच्या विचारांचे गुणगान करत असतात. पण म्हणून त्यांनी गांधींना कधी जवळ केल्याचे पाहिलेय का हो? तर अजिबात नाही! जेव्हा गुजरातची अस्मिता दाखवण्याची वेळ आली तेव्हा त्यांना गुजराती असलेले गांधी आठवले नाहीत, तर उलट त्यांनी सरदार पटेलांच्या रुपाने एक वेगळाच, प्रवाहाविरुद्धचा आदर्श उभा केला. एक काँग्रेसी महापुरुष हायजॅकच केला म्हणा ना! तर मुद्दा असा आहे की, मोदींनी गांधींना कधीच दूर लोटलं नाही, मात्र कधीच जवळही केलं नाही.

गांधींना यांत्रिक प्रगतीचं नेहमीच वावडं होतं. ‘खेड्यांकडे चला’ हा त्यांचा मंत्र तर प्रसिद्धच आहे. मात्र ‘नागपूर मेट्रो’च्या उद्घाटनावेळी मोदींनी केलेलं भाषण जर नीट ऐकलं, तर तुम्हाला जाणवेल की — मोदींनी नुसती शहरांची आवश्यकताच बोलून दाखवलेली नाहीये तर छोट्या आकारांची नवनवीन शहरे स्थापन करण्याची जोरदार वकीलीही केली आहे. मोदींनी आपले याबाबतचे विचार याआधीही अनेकवार बोलून दाखवले आहेत. आणि मोदी जर एखादी गोष्ट इतकी ठासून मांडत असतील, तर ती गोष्ट ते अंमलातही आणणार यात काहीच शंका नाही. म्हणजे पुन्हा तेच —  ‘खेड्यांकडे चला’ म्हणणाऱ्या गांधींचं गुणगान तर करायचं, पण प्रत्यक्ष कृती मात्र अगदी उलट करायची!

खरं तर गांधीवाद हा कधीच कालसुसंगत नव्हता. परंतू त्याचं नेहमीच सरकारी पातळीवरून उदात्तीकरण केलं गेलं. आणि हिंदुत्ववाद्यांनी तसेच वास्तववाद्यांनी या प्रकाराला विरोध केला की, तथाकथित विचारवंतांकडे अश्या विरोधकांवर कट्टरतेचा शिक्का मारण्याचं अस्त्र तयारच असायचं! परंतू स्वत:ला गांधीवादी दाखवत गांधीवादाच्या मूळालाच हात घालण्याच्या मोदींच्या खेळीवर कुणाकडेच तोडगा नाहीये. मी मोदींना ‘कुटील’ राजकारणी म्हणतो ते यासाठीच. आपल्याला हवा तो कार्यभाग समोरच्याला गंधवार्ताही लागू न देता साधणे, नव्हे नव्हे, समोरच्याला पूर्णवेळ ‘हा माणूस आपलेच काम करतोय’ असं वाटायला लावत काम साधणे — यासाठी व्यक्ती चाणक्य कोळून प्यायलेलीच असायला लागते!

मोदी पंतप्रधान म्हणून तर प्रिय आहेतच, पण आज मोदींमधला मुत्सद्दी राजकारणी अधिकच प्रकर्षाने आवडून गेला. आज लोकमान्यांचा आत्मा स्वर्गात अतिशय खूष झाला असेल. कुणी सांगावं, एव्हाना ‘स्वर्ग-केसरी’त अग्रलेखही लिहायला घेतला असेल त्यांनी — ‘डोके ठिकाणावर असलेले सरकार आले हो’!!

– © विक्रम श्रीराम एडके
(लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी, तसेच विविध क्रांतिकारक, महापुरुष आणि हिंदू धर्माची महती सांगणारी लेखकाची अनेकानेक व्याख्याने डाऊनलोड करण्यासाठी अथवा आपल्या भागात आयोजिण्यासाठी क्लिक करा: www.vikramedke.com)

image

2 thoughts on “लोकमान्यांना शंभर वर्षांनंतर लाभलेला शिष्य!!

  1. just asking, would like to know from where did you collect evidence about Lokmanya tilak’s comments on Gandhi. And I personally think that your views in this article express propaganda and hindutva agenda of BJP. I know that congress is not the right party to rule the country and i would never support congress, but if you were righteous and i’m sure you wouldn’t support BJP either , because there are a lot of corrupt , extremist people(which causes harm in secularism) and ofcourse you must be knowing that already about that party.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *