शारदेच्या अंशा..

आपल्याला नाही का, लहानपणी छायागीत, चित्रहार, रंगोली वगैरे पाहाताना किंवा बिनाका गीतमाला अथवा तत्सम कार्यक्रम ऐकताना, त्या सुमधूर आणि जनप्रिय गीतांच्या सोबत गुणगुणायची सवय लागते. मग हीच गाणी कधी भेंड्या खेळताना कामी येतात, कधीतरी कुणाला तरी मोहविण्यासाठी चपखल बसतात. मग कुणातरी मित्रमैत्रीणीकडून त्या गाण्याचं कधीतरी कौतुक केलं जातं. आणि ‘आपल्याला गाता येतं’ असा साक्षात्कार सहजच होऊन जातो! गाण्याचं शिक्षण तर झालेलं नसतं. असतो तो फक्त देवाने दिलेला कंठप्रसाद! काही जण तेवढ्यावरच खुश राहातात. जसजसं वय वाढतं आणि कालानुरुप विविध जबाबदाऱ्या खुणावू लागतात, तसतसं गाणं दुरावत जातं. ते उरतं फक्त चार नातेवाईक-मित्रांच्या फर्माईशीपुरतंच! पण काही जण मात्र असतात जे या कंठाला हिरा मानून पैलू पाडू लागतात. गायन त्यांना अक्षरश: झपाटून टाकतं. असाच एक मुलगा होता. गाण्याने झपाटलेला. इंजिनियरींग करत होता तो. पण म्हणतात ना, तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या पाठी धावायचं असेल, तर आधी इंजिनियर बना आणि मग इंजिनियरींग सोडून तुमच्या स्वप्नांची वाट चालू लागा. याच्याही आयुष्यात इंजिनियरींग तेवढ्याच पुरतं होतं! पुढे विषमज्वर झाला तेव्हा तर इंजिनियरींग सुटलं ते सुटलंच. पण गाणं नाही सुटलं. श्वास घेणं कुणी सोडू शकेल का? गाणं श्वास होता त्याचा. गायचा. कॉलेजच्या कार्यक्रमांत गायचा. ऑर्केस्ट्रामध्ये गायचा. स्पर्धांमध्ये गायचा. अशाच एका स्पर्धेत त्याचा दुसरा क्रमांक आला. पुरस्कार कुणाच्या हस्ते तर साक्षात एस. जानकींच्या! त्यांनी संयोजकांना सांगितलं की, “पहिल्या क्रमांकाचा मुलगा खूपच चांगला गायला, पण त्याने घंटाशालांची नक्कल केली. दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा मात्र त्याच्या स्वत:च्या आवाजात गायला”. त्यांनी त्याला पुढे बोलावून विचारलं, “तू चित्रपटांसाठी पार्श्वगायन करायचा प्रयत्न का नाही करत”? हा बावरला, “अहो मी कॉलेज सुटल्यावर मधल्या काळात काय करायचं म्हणून सहज आलो होतो हो स्पर्धेत. मी काही संगीत शिकलेलो नाही”. जानकी हसल्या, म्हणाल्या, “मी तरी कुठे शिकलेय”! त्याचा विश्वासच बसेना. एवढ्या मोठ्या गायिका ज्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर एकछत्री अधिराज्य गाजवतायत त्या आपल्याला म्हणतात की, मी कुठे संगीत शिकलेय आणि वर सांगतात की तू चित्रपटांसाठी प्रयत्न कर म्हणून! त्याला वाटलं की, आपला दुसरा क्रमांक आला म्हणून सांत्वन करण्यासाठी तर म्हणाल्या नसतील या असं? पण मनात स्वप्नाचं बीज पेरलं गेलं ते गेलंच!

मग सुरू झाला अजून जोमाने सराव, स्पर्धा, बक्षिसं! चेन्नईत अशीच एक स्पर्धा होती. नामवंत परीक्षक होते. याने सुद्धा भाग घेतला होता. तिथे गेल्यावर समजलं की, स्पर्धेत चित्रपटगीत गाण्याची परवानगी नाही. आता आली का पंचाईत! याला तर दुसरं काही गाताच येत नव्हतं. काय करावं? याचा क्रमांक यायला वेळ होता. हा तसाच उठून चेन्नईच्या सुप्रसिद्ध मरीना बीचवर गेला. तिथे बराच वेळ वाळूत बसून त्याने एक गाणं लिहिलं. त्याला स्वत:च चाल लावली. आणि ते गाणं तो स्पर्धेत गायला! जसा तो जागेवर जाऊन बसला, तसा त्याच्यापाशी एक जण येऊन उभे राहीले. त्या सद्गृहस्थांनी तमिळमध्ये विचारलं, “सिनेमा ला पाऽडरीया?”, अर्थात, “चित्रपटात गाशील”? याला वाटलं हा बाबा आपली टिंगलच करतोय! याने पण तोऱ्यात उत्तर दिलं, “पाऽडमाट्टेन”. नाही गाणार!
“का”?
“का म्हणजे काय, नाही गायचं मला”.
तो माणूस क्षणभर थांबला, मग समजूतीच्या स्वरात बोलू लागला, “अरे बाबा तू इतका छान गातोस, म्हणून मी विचारलं. मी म्युझिक डिरेक्टर आहे. माझं नाव कोदंडपाणी”!
नाव ऐकताच हा ताडकन उभा राहीला. बाप रे! काय बोलून बसलो आपण. ते ही एवढ्या मोठ्या माणसाला. पण कोदंडपाणींनी ते मनावर घेतलं नाही. त्यांनी त्याला ऑडिशनसाठी यायला सांगितलं. कोदंडपाणी, दिग्दर्शक, निर्माते वगैरे अनेक जण बसले होते. काहीतरी गा, म्हणाल्यावर याने क्षणभर विचार केला आणि ज्या गानेश्वराच्या स्वर्गंगेचे चार तुषार अंगावर पडल्यामुळे आपल्याला ही गायनी कळा करावीशी वाटली, त्याच मखमली स्वरांच्या सम्राटाचं, मुहम्मद रफ़ीचं गीत त्याने गायलं. गाताना त्याने एका ठिकाणी, ज्याला हल्ली रिअॅलिटीशोछाप मराठीतसुद्धा इंप्रोव्हायझेशनच म्हटलं जातं त्यासाठी एक अतिशय गोड तेलुगू शब्द आहे, अधिकप्रसंगम् केला. ती जागा ऐकून कोदंडपाणी कमालीचे खुश झाले! पण म्हणून त्याला गाणं मिळालं का? तर अजिबात नाही!

त्याला पहिलं गाणं मिळण्यासाठी तब्बल दोन वर्षे वाट पाहावी लागली. ते गीत होतं, तेलुगू चित्रपट “श्रीश्रीश्री मर्यादारामण्णा”मधील (१९६७) “येमिये विण्टा मोहम्”! एकल गीत नव्हतं ते. त्याच्याखेरीज पी. सुशीला, के. रघुरामय्या आणि पी. बी. श्रीनिवाससुद्धा होते त्यात. गाण्याचं मुद्रण झालं १५ डिसेंबर १९६६ ला. त्यानंतर आठवडाभरातच त्याने कन्नड चित्रपट “नक्करे अदे स्वर्गा”साठी (१९६७) द्वंद्वगीत गायले, “कनसिदो मनसिदो”! आणि त्याबरोब्बरच संगीतप्रेमींच्या मनात एका अढळ ध्रुवताऱ्याचा जन्म झाला, श्रीपती पंडिताराध्युला तथा एस. पी. बालसुब्रह्मण्यम!

हे मी लिहितोय, ते एसपी अकाली गेले त्या संध्याकाळी. मी अकाली असा शब्द का वापरतोय? त्यांच्या वयाची पंचाहत्तरी आलेली. शरीर वृद्धत्वाच्या पाशी जखडलेलं. पण गळा? गळा तितकाच ताजातवाना, टवटवीत जितका तो त्रेपन्न वर्षांपूर्वी होता. जो स्फटिकासारखा स्वच्छ स्वर तुम्ही त्यांच्या साठच्या दशकातील “येमिये विण्टा मोहम्” गीतात ऐकाल तोच, तसाच, आणि तितकाच निखळ स्वर तुम्हाला काही महिन्यांपूर्वी संगीताधिपती इलयराजासाठी मुद्रित केलेल्या “भारतभूमी”मध्ये सुद्धा ऐकू येईल. आणि या दोन्हीही गाण्यांच्या मध्ये तेलुगू, तमिळ, कन्नड, मलयाळम, हिंदी, मराठी इ. १६ विविध भाषांमध्ये एसपींनी गायलेली तब्बल ४०,००० हून अधिक गाणी येतात! हा म्हटलं तर चमत्कार आहे आणि म्हटलं तर एस. पी. बालसुब्रह्मण्यम नावाच्या गंधर्वाची अतुट साधना आहे!

गायकाची कारकीर्द नेमकी केवढी असते हो? हल्लीची चित्रपटगीते ऐका. कुणातरी रेकणाऱ्या गायकाचे एखादेच गाणे चालून जाते. तो गायक मग ऑटोट्यूनच्या बळावर दोन-पाच वर्षे चालतो न चालतो तोच त्याच्याच सारखं गाणाऱ्या दुसऱ्या गायकाचा प्रादुर्भाव होतो. गाणे गायकीपेक्षा युट्यूब व्ह्यूजवर चालण्याच्या सध्याच्या काळात खरे वाटणार नाही की, एसपींनी एम. एस. विश्वनाथन, इलयराजा, रहमान आणि आता अनिरुद्ध अशा संगीतकारांच्या चार वेगवेगळ्या पिढ्या तब्बल अर्धशतकभर गाजवल्या आहेत. आजही जेव्हा सुपरस्टार रजनीकांतच्या एखाद्या चित्रपटाचं इंट्रो साँग समोर येतं, तेव्हा फक्त आणि फक्त एसपींचाच आवाज त्या जागी सुचतो. पण हेच एसपी जेव्हा कमल हासनसाठीही करून दाखवतात, नागार्जुनसाठी करून दाखवतात, चिरंजीवीसाठी करून दाखवतात, तेव्हा कळतं की हे खायचं काम नव्हे! हिंदीतसुद्धा नव्वदच्या दशकातल्या सलमानच्या चित्रपटाची एसपींशिवाय कल्पना करणंच अवघड आहे. पण म्हणून हिंदीने एसपींना त्यांच्या अधिकाराचं स्थान दिलं का?

सुपरस्टार एम. जी. रामचंद्रन एकदा एव्हिएम स्टुडियोत शुटिंग करत होते. दोन शॉट्सच्या मधल्या वेळेत त्यांचा एका कडुनिंबाच्या झाडाखाली बसण्याचा शिरस्ता. तसे ते बसलेले असताना त्यांच्या कानावर एका मुद्रणाचे स्वर पडले. त्यांनी गाणं ताबडतोब ओळखलं. त्यांच्याच एका तमिळ चित्रपटगीताचं तेलुगू अनुवादित गाणं होतं ते. त्यांना गायकाचा स्वर मात्र वेगळाच वाटला. एमजीआरनी एका मदतनिसाला चौकशीकरता पाठवलं. काही क्षणांत माहिती मिळाली की, हा कुणीतरी बालसुब्रह्मण्यम नावाचा पोरगा आहे आणि त्याने याआधीसुद्धा थोडीफार गाणी गायली आहेत. झालं! दुसऱ्याच दिवशी एसपींच्या दरीद्री खोलीबाहेर एक लांबलचक गाडी येऊन उभी राहिली. एसपी तर सोडाच त्या भागात तशी गाडी कधीच कुणीच पाहिली नव्हती. गाडीतून पद्मनाभन नावाचे गृहस्थ उतरले. त्यांनी एसपींना अदबीने विचारलं, “तुम्हाला वेळ कधी असेल सांगता का, एमजीआर भेटू इच्छितात”! एवढा मोठा सुपरस्टार भेटायचं म्हणतोय तर नाही कोण म्हणणार. एसपी म्हणाले, “कुठे यायचं तेवढं सांगा. माझ्याकडे सायकल आहे, मी येतो”. त्यावर पद्मनाभन म्हणाले, “तुम्ही तसदी घेऊ नका, मीच गाडी घेऊन तुम्हाला न्यायला येईन”. कट टू. पोरसवदा एसपी भल्यामोठ्ठ्या स्टुडियोत एमजीआर, संगीतकार, निर्माते वगैरेंच्या समोर उभे. एमजीआर म्हणाले की, “मला तुझं गाणं ऐकायचंय”. एसपींना वाटलं की, काहीतरी ऑडिशनसारखा प्रकार आहे. म्हणून ते काहीतरी गाणार तेवढ्यात संगीतकाराने त्यांना गाण्याचा कागद दिला. त्यांच्याकडून गाणं घटवून घ्यायला सुरुवात केली. तेव्हा कुठे एसपींना कळालं की, आपल्याला साक्षात एमजीआरसाठी गायचंय! चित्रपटाचं नाव होतं “अडिमयी पेन” (१९६९). एमजीआर आणि जयललिता अशी ऑलटाईम ब्लॉकबस्टर स्टारकास्ट! बिगबजेट! एमजीआरनी सांगितलं की, लवकरच या गाण्याचं चित्रण राजस्थानात होणार आहे. थोडक्यात, एसपींच्या कारकीर्दीला वळण देणारं गाणं असणार होतं ते. तीन दिवस गाण्याचा सराव चालला. आता चौथ्या दिवशी मुद्रण करायचं. ठरल्याप्रमाणे ती मोठ्ठी गाडी एसपींच्या खोलीबाहेर आली. पद्मनाभन आत जाऊन पाहातात तर काय, एसपी अंथरुणाला खिळलेले. विषमज्वर! एसपींना कळालं की हातातोंडाशी आलेला घास दैवगतीने हिरावून नेलाय. मध्ये दोन-तीन आठवडे गेले आणि परत एकदा एसपींच्या खोलीबाहेर तिच गाडी येऊन उभी राहीली. काय होतंय हे कळण्याच्या आत एसपी पुन्हा एकदा एमजीआरसमोर उभे! त्यांनी मनात देवाचे लाखवेळा आभार मानले की, ते गाणं तर हातून गेलं पण आपल्याला दुसरं एखादं गाणं तरी मिळतंय. पण झालं भलतंच! संगीतकार के. व्ही. महादेवनांनी त्या आधीच्याच गाण्याचा कागद दिला. एसपी ते गायले. थोड्यावेळाने जरा बुजतच त्यांनी एमजीआरना विचारले की, “तुमचं राजस्थानचं वेळापत्रक ठरलं होतं, मग अजूनही हे गाणं कसं काय ठेवलंत”? त्यावर एमजीआरनी जे उत्तर दिलं, ते एसपींच्या जडणघडणीचा कायमस्वरूपी अविभाज्य भाग बनून गेलं. एमजीआर म्हणाले की, “त्या दिवशी मी तुला हे गाणं देईन म्हणालो. तू नाही तर दुसऱ्या कुणाकडून सहजपणे गाऊन घेतलं असतं मी. पण मग मी विचार केला, या मुलाने घरी जाऊन कॉलेजच्या सगळ्या मित्रांना सांगितलं असेल की, मी एमजीआरसाठी गातोय. उद्या चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्यांनी पाहिलं असतं की, हे गाणं तर दुसऱ्याच कुणीतरी गायलंय. तेव्हा त्यांना काय वाटलं असतं? आपल्या मित्राने थाप मारली! किंवा आपल्या मित्राचा आवाज सुपरस्टार एमजीआरला आवडला नाही. दोन्हीही परिस्थितीत माझं काहीच नसतं गेलं, पण तुझ्या कारकीर्दीवर मात्र कायमचा वाईट परिणाम झाला असता. एकच शेड्युल वाया गेलंय ना, काही हरकत नाही. मी दुसरे प्रसंग चित्रित केले दरम्यान. पण हे गाणं तुझंच होतं, आहे आणि राहाणार”! एसपींना त्या क्षणी केवढं भरून आलं असेल, कल्पना करा. पुढे एमजीआरनी पत्रकार परिषदेत घोषितपणे सांगितलं की, या गुणी मुलाला माझ्या सगळ्या निर्मात्यांनी एक तर गाणं प्रत्येक चित्रपटात द्यावं. सुपरस्टारचा शब्द कोण मोडणार? या घटनेनंतर गायक पी. बी. श्रीनिवास एकदा एसपींना रस्त्यात भेटल्यावर म्हणाले होते, “तू एस. पी. बालसुब्रह्मण्यम नाहीस, एल. जी बालसुब्रह्मण्यम आहेस. लकी गाय बालसुब्रह्मण्यम”!

मला सांगा ही दानत हिंदीत कितीशा तथाकथित सुपरस्टार्समध्ये आहे? मला आठवतं सात-आठ वर्षांपूर्वी एसपींचं एका स्टारच्या चित्रपटातून हिंदीत पुनरागमन होणार होतं. गाणं मुद्रित झालं. प्रकाशितही झालं. पण चित्रपटात मात्र त्या गाण्याच्या ऐवजी त्या काळी चलती असलेल्या एका असुराचंच गाणं वापरण्यात आलं! आज एसपी गेल्यावर शेकडो हिंदी ताऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली, पण या गंधर्वाने पुन्हा हिंदीत गावं म्हणून प्रयत्न त्यांच्या पैकी किती जणांनी केले?

१९८१ सालची गोष्ट आहे. सुविख्यात दिग्दर्शक के. बालचंदर त्यांच्याच “मरो चरित्र” (१९७८) या तेलुगू चित्रपटाची हिंदीत “एक दुजे के लिए” (१९८१) नावाने पुनर्निर्मिती करत होते. तेलुगूप्रमाणेच हिंदीतदेखील कमल हासनला एसपींनीच आवाज द्यावा असा त्यांचा आग्रह होता. लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी ठाम नकार दिला. हिंदीचा गंधदेखील नसलेल्या दाक्षिणात्य गायकाचे उच्चार स्वच्छ कसे असतील, हा त्यांचा प्रश्न. त्यावर के. बालचंदरांनी बिनतोड युक्तिवाद केला की, “माझ्या कथेचा नायक हिंदी न येणारा तमिळ दाखवायचाय ना? मग गातानाच तो शुद्ध हिंदीत कसा गाईल”? या युक्तिवादाने एलपींचे समाधान झाले आणि एसपींचा हिंदीत दणक्यात प्रवेश झाला. पदार्पणातच त्यांना त्यांचे हिंदीतील पहिले राष्ट्रपती पारितोषिक मिळाले, हे सांगणे न लगे! अर्थात तत्पूर्वीच त्यांना “शंकराभरणम्”साठी (१९८०) पहिलेवहिले राष्ट्रपती पारितोषिक मिळून झाले होते. सबंध कारकीर्दीत एसपींना एकूण ६ राष्ट्रपती पारितोषिके, ७ फिल्मफेअर पारितोषिके आणि नागरी पुरस्कार व मानद डॉक्टरेटसह अगणित इतर पारितोषिके मिळाली आहेत. विशेष म्हणजे ही राष्ट्रपती पारितोषिके हिंदी, तेलुगू, तमिळ आणि कन्नड अशा वेगवेगळ्या भाषांमधील गाण्यांसाठी मिळाली आहेत. प्रत्येक भाषेत स्वरांची तितकीच उत्कट शिंपण केल्यामुळे कुणी त्यांना गानयोगी म्हणतं, कुणी गानगंधर्व, कुणी काय तर कुणी काय. एमजीआर यांनी मात्र एसपींना एक सुरेख उपाधी दिली होती जी आज सुद्धा चपखल लागू पडते, “पाडुम निला बालू”, अर्थात “गानचंद्र बालू”!

खूप थोड्या लोकांना ठाऊक असेल की, एसपींनी गायनाव्यतिरिक्त संगीतदिग्दर्शनदेखील तितक्याच ताकदीने करायचे. त्याहून थोड्या लोकांना ठाऊक असेल की, एसपी उत्कृष्ट अभिनय करायचे. सोपं उदाहरण देऊ? “हम से है मुक़ाबला” (१९९४)! सुप्रसिद्ध “प्रेमिका ने प्यार से जो भी दे दिया” गाण्यात तर एसपी मस्तपैकी नाचतानासुद्धा दिसतात!! सबंध कारकीर्दीत अभिनेता म्हणून पन्नास-एक तरी चित्रपट आणि मालिका केल्या असतील त्यांनी. कमल हासन, रजनीकांत, मोहनलाल वगैरे अनेकानेक अभिनेत्यांसाठी पंचवीस-एक चित्रपटांतून डबिंगसुद्धा केलीये त्यांनी. रिचर्ड अटेनबरोच्या “गांधी”साठी बेन किंग्सलेला तेलुगूमध्ये एसपींनीच आवाज दिलाय. “इटिव्ही तेलुगू”वर एक रिअॅलिटी शो लागायचा, “पाडुदा तिय्यगा” नावाने. एसपी त्याचे परीक्षक होते. त्याचे एपिसोड्स मिळवून नक्की पाहा, अगदी तेलुगू समजत नसली तरीही चिकाटीने पाहा. एकेका गाण्यानंतर एसपी ज्या सुरेल आणि सुरेख पद्धतीने त्या गीताचे आणि गाण्याचे विश्लेषण करायचे ते आपल्याकडील टिआरपीच्या हव्यासापोटी सिम्पथीवर चालणाऱ्या स्क्रिप्टेड रिअॅलिटी शोजना बापजन्मी साधणारे नाही. या कार्यक्रमात एसपी अखेरीस एक नेहमीचाच आपल्या माहितीतला श्लोक किंचित बदलून म्हणायचे, “सर्वे जना: सुजनो भवन्तु, सर्वे सुजना: सुखिनो भवन्तु”, तेव्हा खरंच सांगतो शहारा यायचा.

सामान्यतः गायकाची शैली ठरलेली असते, रेंज ठरलेली असते. बहुतांशी गायक त्याच चौकटीत गातात. पण एसपींनी गायलेला नाही असा चित्रपटगीतांत एकसुद्धा जॉनर नाही. शृंगार, हास्य, रौद्र, कारुण्य, बीभत्स, भयानक, वीर, अद्भुत, शांत यांच्यापैकी कोणताच रस असा नाही, ज्यात एसपींनी लीलया संचार नाही केलेला. पण एसपींना कधीतरी बोलताना ऐका. त्यांचे तेलुगू, तमिळ, कन्नड शब्दोच्चार हे सुस्पष्टतेचा नमुना आहेत अक्षरशः. एसपी इंग्रजी बोलायचे तेव्हा त्या बोलण्याचा लहेजा, शब्दांची निवड, भावना अक्षरशः शोषून घ्यावंसं वाटतं.

खरं सांगू का, खूप लिहिलंय. तरीही एसपींना एक टक्कासुद्धा शब्दांत पकडता नाही आलेलं मला. खरं तर हा लेख एसपींच्या सच्छील आयुष्याचं माझ्यासारख्या सामान्य रसिकाने केलेलं सेलिब्रेशन आहे केवळ. ही आदरांजली आहे, मृत्यूलेख खचितच नाही. कारण, संस्कृतात श्लोक आहे,
“जयन्ति ते सुकृतिनो रससिद्धा: कवीश्वरा:।
नास्ति येषां यश:काये जरामरणजं भयम् ।।”
हा श्लोक जणू काही एसपींसाठीच लिहिलेला असावा, इतका त्यांना चपखल लागू पडतो तो. पण एवढं लिहूनही एक गोष्ट मात्र लिहायची राहिलीच! लेखाच्या सुरुवातीला लिहिलंय की, एसपींनी कोदंडपाणींच्या समोर अधिकप्रसंगासहीत रफ़ींचं एक गीत सादर केलं होतं. ते गीत कोणतं होतं? ते होतं, “दोस्ती” (१९६४) चित्रपटातील सुमधुर गीत, “जानेवालों ज़रा”! काल एसपी गेल्यानंतर या गीताला एक नवाच आयाम लाभलाय. विशेषतः
“इस अनोखे जगत् की मैं तक़दीर हूँ
मैं विधाता के हाथों की तसवीर हूँ
इस जहाँ के लिए
धरती माँ के लिए
शिव का वरदान हूँ, मैं तुम्हारी तरह”
या ओळी आता मला तरी आयुष्यभर एसपींशिवाय अन्य कुणाची सय नाही देऊ शकणार! अनेक कलाकार असतात, जे सरस्वतीचे वरदान घेऊन येतात. एसपी साक्षात वाग्देवीचा अंश होते. तो अंश काल वागेश्वरीकडे परत गेला, आपला आवाज तुम्हां-आम्हां रसिकांच्या अंत:करणात जिवंत ठेवून. शारदेच्या अंशा, तुला सद्गती लाभो!!

— © विक्रम श्रीराम एडके

लिंक: https://bit.ly/3cz9LjN

(एसपींना आदरांजली वाहाण्याच्या निमित्ताने ‘विवेक साप्ताहिका’च्या ई-आवृत्तीत प्रकाशित झालेला लेख.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *