नरकचतुर्दशीच्या निमित्ताने

व्याख्यानांच्या निमित्ताने प्रवास करताना मनुष्यस्वभावाचे अनेक नमुने पाहावयास मिळतात. वाईट कुणीच नसतं. केवळ व्यक्ती तितक्या प्रकृती एवढंच! असाच एके ठिकाणी गेलो असता, एक बाई भेटल्या. प्रचंड स्त्रीवादी! पितृसत्ताक पद्धती झुगारून समानता मागता मागता हल्लीच्या बहुतांश स्त्रीवादी बायका जश्या नकळत ‘स्त्रीवर्चस्वाचा’ टोकाचा आग्रह धरतात ना, अगदी तश्या! बोलताना त्यांच्या तोंडी एका दमात तस्लिमा नसरीनपासून ते शोभा देपर्यंत एकाहून एक नावे येत होती. स्त्रीवर किती अत्याचार होतात आणि तिने त्यापासून कशी सुटका करून घेतली पाहिजे, हाच एक धोशा. बाईंचा नवरा अजून या जगात तग धरून आहे का आणि असल्यास अश्या प्रतिकूल परिस्थितीत जगण्याची जिद्द त्या महानुभावाने कशी कमावली, हे विचारण्याचा मला वारंवार मोह होत होता. पण तो मी टाळला. म्हटलं, बाई रागाने अंगावर धावून आल्या तर मी एवढास्सा जीव कधी कसा चेंदामेंदा होऊन जाईन समजणारही नाही! वर मीच स्त्रीयांवर अत्याचार वगैरे करणारा ठरेन ते वेगळंच! काहीही न बोलणारा श्रोता मिळाल्यामुळे बाईंना बहुतेक अजूनच चेव आला असावा. त्या त्वेषाने माझ्या दिशेने बोट करत म्हणाल्या, “तुम्ही इतिहासकारही स्त्रियांचा केवढा अपमान करता. तुम्ही म्हणता ‘हिस्टरी’ म्हणजे ‘हिज् स्टोरी’! का असं? इतिहास काय फक्त तुम्हां पुरुषांचाच असतो का? बायकांचा नसतो? ‘हिज् स्टोरी’च का? ‘हर स्टोरी’ का नाही? सांगा ना. सांगा. आता सांगा..!!”

खरं तर इतिहासाचा ‘गमभन’ही धड माहिती नसणाऱ्या मला बाईंनी थेट ‘इतिहासकार’च ठरवून टाकल्यामुळे मी मनापासून सुखावलो होतो. पण म्हणून काय हा असा आपल्याला समस्त पुरुषजातीचे प्रतिनिधित्व (तेही न मागताच!) देत केलेला हा असा हल्ला सहन करायचा? मी हात उंचावत त्यांना थांबवलं. म्हणालो, “मी भारतीय संस्कृतीला मानणारा माणूस आहे. आपली संस्कृती ना स्त्रीवादी आहे ना तुम्हाला वाटते तशी पुरषसत्ताक. ती सत्यवादी आहे! आता राहिला प्रश्न ‘हिज् स्टोरी’ की ‘हर स्टोरी’चा, तर ते केवळ इंग्रजाळलेल्यांचे चोचले आहेत. आपल्याकडे ‘इतिहासा’ला ‘इतिहास’ असंच म्हणतात. इति + ह + आस = इतिहास. शब्दशः  अर्थ होतो, ‘पूर्वी असे घडले’!! यात कसला आलाय स्त्री आणि पुरुषाचा संबंध”?

या बोलण्याने बाई जराश्या वरमल्या. मूक श्रोत्याकडून अश्या ‘वेगळ्याच’ प्रत्युत्तराची त्यांना अपेक्षा नसावी. मी पुढे म्हणालो,
“तुम्ही ‘न स्त्रीस्वातंत्र्यमर्हति’ सांगणाऱ्या मनू ऋषींना स्त्रियांचा शत्रू ठरवता. पण कधी समजून घेण्याचा प्रयत्न केलाय का की, मनू नेमकं काय म्हणाले आहेत? अध्याय ९ वा, श्लोक ३ –
‘पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने।
रक्षंति स्थविरे पुत्रा: न स्त्रीस्वातंत्र्यमर्हति।।’
अर्थात स्त्रीचे कुमारवयात पिता रक्षण करतो, तरुणपणी पति आणि उतारवयात मुलगा. स्त्रीला स्वातंत्र्य नसते! इथे ‘स्वातंत्र्य’ हा शब्द आधीच्या तीन ओळीत आलेल्या ‘रक्षण’ या शब्दाच्या संदर्भात वापरलाय. आणि सर्वत्र वर्तमानकालीन रुपे वापरली आहेत, त्याअर्थी मनू काही ‘स्त्रीला स्वातंत्र्य देऊ नयेत’ असं आज्ञार्थी बोलत नाहीयेत, तर उलट त्याकाळचं समाजजीवन समजावून सांगताहेत की, ‘आपल्या समाजात वयाच्या प्रत्येक टप्प्यावर स्त्रीच्या रक्षणाची इतकी काही काळजी घेतली जाते की, तिला स्वसंरक्षणासाठी करण्याची वेळ यावी इथपर्यंत गोष्टी पोहोचूच दिल्या जात नाहीत! थोडक्यात स्त्रीच्या सुखासाठी पुरुषांना कामाला लावलंय. यात काडीचा तरी स्त्रीद्वेष आहे का”?

ही ‘बातमी’ बाईंना नवीच असावी! परंतु त्यांच्या स्त्रीवादी (की स्त्रीनियंत्रणवादी!) विचारांना असा पराभव झेपणारा नसावा. त्या काही न बोलता उठून गेल्या. हे सारं आजच आठवण्याचं कारण असं की, आज आहे नरकचतुर्दशी! आजच्याच दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध करून त्याने जबरदस्तीने बंदीवान करून ठेवलेल्या स्त्रीयांची सुटका केली होती. परंतु बराच काळ नरकासुराच्या ताब्यात राहिलेल्या त्या स्त्रियांच्या चारित्र्यावर मूर्ख समाजाने संशय घेणे साहजिकच होते. अहो, जिथे समाजाने साक्षात सीतामाईंच्या चारित्र्यावर संशय घेतला होता, तिथे या सामान्य स्त्रियांची काय कथा? किंबहूना शतपैलू मतिच्या श्रीकृष्णांसमोर या ऐतिहासिक घटनेचे उदाहरण असणारच! प्रभू श्रीरामचंद्रांचे त्यासंदर्भातले वर्तन अतिशय सरळमार्गी होते. श्रीकृष्ण अतिशय कुटील नीतीज्ञ! विवाहित सीतेवर संशय घेणे वेगळे आणि या कुमारिकांवर संशय घेणे वेगळे! श्रीकृष्ण एका शब्दाचेही स्पष्टीकरण देण्याच्या फंदात पडले नाहीत. त्यांनी सरळ त्या सगळ्या १६१०० युवतींशी एकाच मंडपात विवाहच करून टाकला. आणि एवढ्या एकाच कृतीने स्वत: राजा असलेले श्रीकृष्ण त्या स्त्रियांच्या चारित्र्याबाबत काय विचार करतात, याचा संदेश लोकांपर्यंत न बोलताच पोहोचवला! आता काय बिशाद होती कुणाची त्या तरुणींच्या चारित्र्यावर संशय घेण्याची! शिवाय या एकाच कृतीने त्या स्त्रियांचे पुनर्वसन तर झालेच, शिवाय त्यांना समाजात आवश्यक तो दर्जाही मिळाला! एकाच फटक्यात सोळा सहस्र आयुष्ये बरबाद होण्यापासून वाचली! श्रीमद्भागवतपुराणाच्या १० व्या स्कंधाच्या ५९ व्या अध्यायात या सर्व युवतींना श्रीकृष्णांनी स्वतंत्र महाल, दास-दासी इ. पुरवल्याचेही उल्लेख आहेत. त्याअर्थी स्त्रीमुक्तीवाल्यांनी आजचा दिवस ‘खराखुरा स्त्रीमुक्तीदिन’ म्हणून साजरा करायला हरकत नाही!!

माझा स्त्रीमुक्तीवादाला काडीचाही विरोध नाही. कुणी काय विचार करावा हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. इस्लाम वा ख्रिश्चॅनिटीचा इतिहास स्त्रियांवरील अनन्वित अत्याचारांनी गच्च भरलेला आहे. त्याच्या खुणा जर पाहायच्या असतील तर आजही ISIS आणि तालिबानमध्ये काय चालतं ते तुम्ही पाहू शकता. किंबहूना त्यांच्या धर्मग्रंथांमध्येच अश्याप्रकारच्या अनेकानेक अन्यायांना नुसती परवानगीच दिलेली नाहीये, तर त्याचे धर्माच्या नावाखाली समर्थनही केले आहे. परंतु जर कुणी त्याच तागडीत हिंदू धर्मालाही तोलणार असतील, तर मात्र माझा आक्षेप आहे. धर्माचे तथाकथित ठेकेदार काय म्हणतात याच्याशी मला काहीही देणेघेणे नाही, परंतु हिंदूंचा कोणताही धर्मग्रंथ स्त्रियांवर अत्याचार सुचवत नाही, एवढे मी एक अभ्यासक या नात्याने निश्चितपणे सांगू शकतो! आणि अतिरेकी-स्त्रीवाद्यांना आवडणार नाही, परंतु भारतीय संस्कृती कोणत्याही बाबतीत स्त्रियांची बाजू घेत नाही, एवढेही मी तितक्याच निश्चयाने सांगू शकतो. आणि न रागावता विचार करणार असाल, तर भारतीय संस्कृती कोणत्याही बाबतीत पुरुषांची बाजू घेत नाही हेही मी तितक्याच ठामपणे सांगू इच्छितो! भारतीय संस्कृती बाजू घेते ती केवळ सत्याची. त्याअर्थी हिंदू संस्कृती कायम नैसर्गिक न्यायाच्या बाजूने असते. स्त्रीवादी मान्य करणार नाहीत कदाचित, परंतु स्त्री आणि पुरुषाची रचना भिन्न असते. स्त्रीमध्ये निसर्गतःच नाजूकपणा, सौम्यता असते. हिंदू संस्कृती हे ओळखून त्या-त्या बाबींमध्ये पुरुषाला तिची काळजी घ्यायला लावते. स्त्रीला वरचा दर्जा देते. म्हणून तर ‘न स्त्रीस्वातंत्र्यमर्हति’ असा काळजीचा संदेश देणारे मनू त्याच मनूस्मृतीत ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते..’ सांगून स्त्रीला थेट देवतेचा दर्जा देतात. तद्वतच पुरुषातही निसर्गतः काही रचनात्मक वैगुण्ये असतात, तिथे हिंदू संस्कृती स्त्रियांना पुढाकार घ्यायला लावते! उदाहरणार्थ – संसाररथ हाकणे!! हे पुरुषाच्या एकट्याच्या हातचे काम नोहे!! तिथे स्त्रियांमधली विचारक्षमता, समंजसपणा, सहनशीलताच कामी येते. इतके साधे सोपे आहे हे सारे! खरं तर, आपण जेव्हा केव्हा एखाद्या गोष्टीसाठी हिंदू संस्कृतीला दोष देऊ पाहातो, तेव्हा शंभरातील नव्व्याण्णव वेळा तरी तो आपल्याच गैरसमजाचा वा अनाभ्यासाचा दोष आहे, असे खुशाल समजावे! माझे अनुभवाचे बोल आहेत हे. आपण गैरसमज करतो ते आपला हिंदू धर्म आणि संस्कृतीचा सखोल अभ्यास नसतो म्हणून. म्हणजे दोष आपल्याच दृष्टीकोनाचा असतो, पण बोल मात्र हिंदू धर्म आणि संस्कृतीला लावला जातो. आणि नेमक्या अश्याचवेळी ‘सत्यमेव जयते’सारख्या उथळ मालिका बनवणाऱ्यांचं फावतं. मी तर त्याहीपुढे जाऊन असे म्हणेन की, आज जी स्त्रियांवरील अत्याचारांत वाढ झालेली दिसतेय ते आपली हिंदू संस्कृतीशी असलेली नाळ तुटण्यामुळे आणि आपल्या दिवसेंदिवस सेक्युलर होण्याच्या फालतू अट्टाहासामुळेच. नाहीतर जर समाजात स्त्रियांच्या चारित्र्याचे रक्षण करण्यासाठी झटणाऱ्या भगवान श्रीकृष्णांचा आदर्श ठेवला गेला असता, नारीला देवतेचे स्थान देणाऱ्या मनूंचा आदर्श ठेवला गेला असता, तर समाजाचा स्त्रीकडे पाहाण्याचा दृष्टीकोनही सुधारला नसता का? चुकीच्या आधुनिकीकरणाचे तोटे आहेत ते हे असे! असो. जे झाले ते झाले. इथून पुढे तरी आपण स्त्रीमुक्ती, त्यासंदर्भात भारतीय संस्कृती यांचा पुनर्विचार करायला शिकूयात. आपल्या मुलांना खरोखरचे हिंदू संस्कार देऊयात. त्यांना उद्याचे युगपुरुष श्रीकृष्ण वा स्मृतीकार मनू होण्याची प्रेरणा देऊयात. आजच्या नरकचतुर्दशीच्या निमित्ताने याच प्रेमादरपूर्वक शुभेच्छा!!

— © विक्रम श्रीराम एडके
(लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी तसेच व्याख्याने डाऊनलोड करण्यासाठी अथवा आपल्या परिसरात/शाळा-महाविद्यालयांत लेखकाची व्याख्याने आयोजित करण्यासाठी क्लिक करा: www.vikramedke.com)

image

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *