स्मार्ट, हिंसक ‘असा मी असामी’ – नोबडी

हच मॅन्सेल (बॉब ओडेनकर्क) हा एक सर्वसाधारण, मध्यमवयीन आणि मध्यमवर्गीय मनुष्य आहे. पुलंनी लिहून ठेवलेले बहुतांशी त्रासदायक ग्रहयोग नशिबात वाढून ठेवलेल्या कुणाही सर्वसामान्य माणसासारखा माणूस म्हणजे हच मॅन्सेल. त्या धोंडो भिकाजी कडमडेकर-जोश्याच्या आयुष्यासारखं आयुष्य त्याचं. त्याला बायको आहे, दोन गोंडस मुलं आहेत. बायको करिअरमध्ये प्रचंड यशस्वी आणि हा मात्र सासऱ्याच्या वर्कशॉपमध्ये साधं काहीतरी काम करतो. आसपासचे लोकच नव्हेत तर सख्खं पोरगंसुद्धा येता-जाता, कळत-नकळतपणे हचच्या कर्तृत्वशून्यतेवरून त्याला टोमणे मारत असतो. या अशा ‘असामी’ हचच्या घरी एके दिवशी दोन चोर शिरतात. हचचं पोरगं मोठ्या धिटाईने एका चोरावर झडप घालतं. चोरासोबत असलेली चोरणी मुलावर बंदूक रोखते. हच तिच्या पाठिमागून येतो. हचच्या हातात गोल्फस्टिक आहे. आता फक्त एकच फटका आणि काम तमाम! पण.. पण हचचा हात वार करायला धजतच नाही. चोर सहिसलामत निसटून जातात. मार खाल्लेला, जीवनातील प्रत्येक क्षेत्रासारखाच या ही बाबतीत अपयशी झालेला हच कार्यालय, शेजार-पाजार सगळ्यांच्याच विनोदाचा विषय होतो. चार-दोन दिवसांनी हचची धाकटी मुलगी त्यांच्या मांजरीचा पट्टा शोधत असते. तो सापडत नाही म्हटल्यावर निष्कर्ष निघतो की चोरांनी इतर गोष्टींसोबतच तो पट्टादेखील चोरलाय. नुकताच घरी परतलेला हच हे ऐकताच मनातील राग, आजवरचा अपमान, टोमणे, टोचून बोललेले शब्द सारं काही उरात घेऊन निघतो. ‘नोबडी’ असलेल्या हचच्या पूर्वायुष्यातील एक एक पान हळूहळू उलगडू लागते.

‘नोबडी’चं नुसतं ट्रेलर जरी पाहिलं तरी कुणीही सहजपणे त्याची तुलना ‘जॉन विक’शी (२०१४) करेल. ‘जॉन विक’चा निर्माता डेव्हिड लाईच या ही चित्रपटाचा निर्माता आहे म्हटल्यावर तर ही तुलना अजूनच साहजिक वाटू लागते. दोन्हीकडे मुख्य खलनायक रशियन माफिया आहेत. पण दोन्हींमध्ये खूप सारे फरक आहेत. ‘जॉन विक’चा अप्रोच खूपच जास्त स्टायलिश आहे. म्हणजे फाईटसीन्समध्ये जॉन विकने समजा मार जरी खाल्ला, तरी तो शैलीदारपणे मार खातो. त्याच्या जखमा आणि व्रणदेखील एखाद्या चित्रासारख्या दिसतात आणि कवितेसारख्या पाझरतात. जॉन विक शेकडो जणांना मारतो आणि त्याच्या कपाळावर आठीसुद्धा उमटत नाही. ‘नोबडी’चा अप्रोच मात्र अधिक वास्तववादी आहे. हचने पाच-सात जणांना जरी मारले तरी ते करायला जितका वेळ खरोखरच लागला पाहिजे, तितकाच वेळ त्याला लागतो. किंबहूना त्या लोकांना मारताना तो ही तितकाच जखमी होतो, जितका अशा मारामारीत सापडलेला कुणीही होईल. ‘जॉन विक’ इतकाच ‘नोबडी’ प्रेडिक्टेबल आहे. त्याचाही आरंभ, मध्य आणि अंत सहजच ओळखता येण्यासारखा आहे. पण जॉन विक हा प्रवास शिताफीने पार पाडतो. हचला मात्र या आखीव प्रवासातही पदोपदी ट्विस्ट्स आणि टर्न्सची साथ आहे. थोडक्यात, तुम्ही किती जरी प्रयत्न केले तरी प्रत्यक्षात कधीच जॉन विक बनू शकत नाही. पण तुम्ही जर योग्य प्रशिक्षण घेतले तर हच मॅन्सेल होणं अशक्य नाही. या मुद्यावर ‘नोबडी’ पूर्ण गुण मिळवतो.

वरच्या परिच्छेदात सांगितलेला प्रेडिक्टेबल असूनही ट्विस्ट्स आणि टर्न्सने भरलेल्या प्रवासाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. हच ज्या वेळी त्या दोन चोरांना शोधायला बाहेर पडतो, त्या वेळी मी विचार करू लागलो होतो की, चिडलेला नायक विरुद्ध दोन चिंधीचोर हा संघर्ष काय कप्पाळ मनोरंजक ठरणार? पण पुढील पाचच मिनिटांत चित्रपटात असा काही ट्विस्ट येतो की, संघर्षाचा पट अनेक पटींनी विस्तारून जातो. हे श्रेय दिग्दर्शकापेक्षाही नि:संशय डेरेक कोल्स्टॅड (यानेच ‘जॉन विक’सुद्धा लिहिला होता) या लेखकाचे आहे. ज्यांना स्क्रिनरायटिंग स्मार्ट कशी असावी याचा अभ्यास करायचा आहे, त्यांनी तर ‘नोबडी’ आवर्जून पाहावा. हचचं एकसुरी आयुष्य चितारायला हिंदी चित्रपटांनी काही मिनिटं आणि एक गाणं दवडलं असतं, मराठी मालिकांनी तेच दाखवायला पाचशे भाग आणि पन्नास महाएपिसोड्स खर्ची घातले असते. ते हचचं आयुष्य ‘नोबडी’ अवघ्या काही सेकंदांत दाखवतो. आणि काही मिनिटं ते पाचशे एपिसोड्स यांचा मिळून जितका प्रभाव पडला नसता त्याहून अनेकपट अधिक प्रभाव त्या काही सेकंदांचा पडतो. हे यश लेखक डेरेक कोल्स्टॅड आणि दिग्दर्शक इल्या नाईशुलर या द्वयीचेच म्हटले पाहिजे. पण मी सांगत होतो ते स्मार्ट स्क्रिनरायटिंगबद्दल. हच आणि त्याची पत्नी बेका (कॉनी निएल्सन) यांच्यातील नात्याची पडझड दाखवताना हिंदी चित्रपटांनी पाच रोमँटिक सीन्स, पाच दु:खी सीन्स आणि अरिजितच्या आवाजात नव्वदच्या दशकातील एखाद्या चांगल्या गाण्याचा खून पाडला असता. ती गोष्ट हा चित्रपट दोनच ओळींच्या संवादांतून अधोरेखित करतो. दिग्दर्शक आणि निर्मात्यांचा आपल्या प्रेक्षकांच्या बुद्धीवर विश्वास असला की, लेखकाला असे स्वातंत्र्य सहजतेने दिले जाते. चित्रपटातील एखादा निरर्थक वाटणाऱ्या प्रसंगानेही चित्रपटाच्या एकूण पटावर पुढे चालून परिणाम घडवावा, असेच प्रसंग लिहिले व निवडले आहेत, ही अतिशय शिकण्यासारखी बाब आहे. हचच्या वडलांचे, डेव्हिड मॅन्सेलचे (ख्रिस्तोफर लॉईड) पात्र तर उत्तम लेखनाचा उत्कृष्ट नमूना म्हणून पाहिले पाहिजे. हचचे पूर्वायुष्य बऱ्याच अंशी उलगडते ते तो वेळोवेळी त्याच्या बळींना जे सांगतो त्यातून. त्यातही कुठेच प्रतिमा नाहीत. शुद्ध, स्पष्ट संवाद! पण त्या नुसत्या सांगण्यातही त्यांनी दोन वेळेस जो विनोदी ट्विस्ट आणलाय, तो स्मार्ट रायटिंगचेच उदाहरण आहे.

इतके असूनही वर लिहिल्याप्रमाणे ‘नोबडी’मध्ये एक मोठा दोष आहे, तो म्हणजे त्याची प्रेडिक्टिबिलिटी. या प्रेडिक्टिबिलिटीमुळेच चित्रपट एन्जॉयेबल राहूनही ग्रेटनेसप्रत पोहोचत नाही. ते ही झालं असतं. पण चित्रपटातील पात्रांना भावनिक उंची जरी खूप असली, तरी त्यांची भावनिक खोली चितारण्यात लेखक-दिग्दर्शक कमी पडले आहेत. या आघाडीवर ‘जॉन विक’ निर्विवादपणे बाजी मारून जातो. उदाहरणच द्यायचं तर ‘जॉन विक’मध्ये व्हिगो (मायकेल नायक्विस्ट) आणि लोसेफ (आल्फी ऍलन) यांचे नाते जितक्या ताकदीने मांडलेय, तितक्या ताकदीने युलियन (ऍलेक्सी सेरेब्रियाकोव्ह) आणि टेडी (अलेक्झँडर पॅल) यांचे नाते मांडल्याचे जाणवत नाही. इथे खलनायकाची उद्दिष्ट्ये भावनिक कमी व आर्थिक जास्त आहेत. त्याचप्रमाणे हचच्या वर्तणूकीमागेही कुटूंबाप्रत असलेल्या भावनेपेक्षा पूर्वायुष्याची आस या गोष्टीचा जास्त हात वाटतो. परिणामतः चित्रपट हा ह्रदयस्पर्शी न होता हात, पाय व बंदुकांनी लढलेला बौद्धिक खेळ जास्त वाटू लागतो. पण त्यातही सिक्वेल आणि प्रिक्वेल दोन्हींचीही बीजे मस्तच पेरली आहेत. ‘ब्रेकिंग बॅड’ (२००८-२०१३) आणि ‘बेटर कॉल सोल’मुळे (२०१५-) प्रेक्षकांना परिचित झालेल्या बॉब ओडेनकर्कने हचच्या भूमिकेतील सगळे कंगोरे सारख्याच खणखणीतपणे वाजवले आहेत. तो त्याच्या अभिनयाने शब्दशः चित्रपटातील त्रुटी दुर्लक्षित करायला भाग पाडतो. सारांश, चित्रपट जरी ‘नोबडी’ असला आणि त्यात खूप साऱ्या त्रुटी जरी असल्या तरी तो अगदीच नथिंग नाही. चित्रपट माध्यमाचा अभ्यास करू इच्छिणाऱ्यांसाठी खूप काही शिकण्यासारखा, सामान्य प्रेक्षकांचं कोणत्याही प्रपोगण्डाविरहित मनोरंजन करणारा हा स्मार्ट, हिंसक ‘असा मी असामी’ एकूणातच अतिशय कमाल जमलेला चित्रपट आहे!

*३.७५/५

— © विक्रम श्रीराम एडके
[लेखकाचे अन्य लेख वाटण्यासाठी पाहा www.vikramedke.com]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *