वास्तवाशी नाळ घट्ट जोडलेली परीकथा – स्टारडस्ट
“मी तुझ्या प्रेमासाठी वाट्टेल ते करेन. मी आकाशात टांगलेला चंद्र उतरवून तुझ्या पायांशी ठेवेन. तारे तोडून तुझ्या भालावर त्यांची चमकदार नक्षी काढेन. रात्रीच्या अंधाराने तुझे केस सजवेन. फुलांच्या लालीम्याने तुझे ओठ रंगवेन..” या आणि अशाच अनेक अशक्य कोटींतल्या आणाभाका प्रेमात वेडे झालेले जवळपास सगळेच जण घेतात. घेणाऱ्याला आणि ऐकणाऱ्यालाही त्या शब्दांचे वास्तविक फोलपण ठाऊक असते, मात्र त्या नुसत्या शब्दांनीच मनावरून फिरणारे मोरपिसदेखील हवेहवेसे वाटत असते! त्यातूनच प्रेमकथा घडत असते. परंतु कुणी जर खरोखरच या आणाभाका खऱ्या करण्यासाठी धडपडला तर ती प्रेमकथा नुसतीच प्रेमकथा राहात नाही, तर तिची परीकथा होऊन बसते. वास्तवाच्या जगापासून शतयोजने दूर आणि स्वप्नांच्या जगाच्या सहस्रयोजने जवळ, अशी परीकथा!
असेच एक छोटेसे खेडेगाव आहे. ‘वॉल’ नाव त्याचे. नावाप्रमाणेच गावाभोवती एक बंदिस्त भिंत बांधलेली आहे. ती पार करण्याची कुणालाच परवानगी नाही. का? कारण, त्या भिंतीपल्याडचं जग हे सामान्य माणसासाठी नाहीच मुळी! ते जग आहे जादूचं. पऱ्यांचं. गॉब्लिन्सचं. ट्रोल्सचं. युनिकॉर्न्सचं. आणि इतरही शकडो अज्ञात जीवांचं! ही भिंत ओलांडण्याची परवानगी गावकऱ्यांना ९ वर्षांतून एकदाच मिळते. ती सुद्धा तात्पुरती आणि थोड्याच अंतरापर्यंत. कारण भिंतीपल्याडची मंडळी त्यावेळी तिथे चित्रविचित्र, तऱ्हेतऱ्हेच्या जादुई वस्तूंचा बाजार भरवतात. इतरवेळी मात्र भिंतीच्या पल्याड जाणारा दरवाजा प्राणपणाने रक्षणारे पहारेकरी दिवस न् रात्र डोळ्यांत तेल घालून पहारा देतच असतात. ही भिंत ट्रायस्ट्रन थॉर्न ओलांडतो. कशासाठी?
व्हिक्टोरिया फॉरेस्टरवरील अल्लड प्रेमासाठी. गावातील रूपगर्विता व्हिक्टोरिया किराणा दुकानात काम करणाऱ्या ट्रायस्ट्रनला कशाला भाव देईल? तिच्या प्रेमाचा एखादाच क्षण मिळावा म्हणून ट्रायस्ट्रन मात्र खुळ्यागत तिच्या मागेमागे फिरत राहातो. आजकालच्या भाषेत सिम्पिंग करत राहातो म्हणा ना! शेवटी कंटाळून त्याला व्हिक्टोरिया एके दिवशी एक तुटणारा तारा दाखवते. ट्रायस्ट्रन म्हणतो, ‘तो तारा जर मी तुला आणून दिला तर तू माझी कोणतीही एक इच्छा पूर्ण करशील’? व्हिक्टोरियाला ठाऊक आहे की हे काम अवघडच नाही तर अशक्य आहे. कारण, तो तारा पडलाय वॉलच्या पल्याड! त्यामुळे ट्रायस्ट्रनचा पिच्छा सोडवण्यासाठी ती होकार देते. तिला पक्की खात्री असते की, ट्रायस्ट्रन नाद सोडून देईल. हो, कोण कशाला उगाच ती भिंत पलांडेल? पण आपली कथा ही परीकथा आहे. त्यामुळे आपला नायक साहजिकच भिंत पार करून पलिकडे जातो. पलिकडे गेल्यावर त्याचे काय होते? तो तारा नेमका काय असतो? तारा कसा काय तुटू शकतो? ट्रायस्ट्रन तो तारा आणू शकतो का? या सगळ्याची अत्यंत रोमहर्षक, नर्मविनोदी, क्षणोक्षणी चकित करणारी, राजकारणाच्या डाव-प्रतिडावांतून मार्ग काढायला लावणारी अप्रतिम गाथा म्हणजे नील गायमनची १९९९ सालची कादंबरी, “स्टारडस्ट”!
मुद्दा हा नाहीच आहे की, ट्रायस्ट्रन तो तारा आणू शकतो की नाही. परीकथाच म्हटल्यावर तो तारा आणणारच हे शेंबडं पोरदेखील सांगेल. मुद्दा हा आहे की, तारा काय असतो आणि ट्रायस्ट्रन तो कसा आणतो. परीकथांचं हेच तर वैशिष्ट्य असतं. त्यांचा शेवट सगळ्यांनाच ठाऊक असतो. पण त्या शेवटापर्यंत पोहोचायचा जो प्रवास आहे, तो जो लेखक उत्कंठावर्धक घडवू शकतो तो लेखक चांगला आणि त्याची परीकथा चांगली. दुसरे म्हणजे शेवट किती जरी ठरलेला असला तरीही त्या आखीव साच्यालाही ट्विस्ट करू शकणारे प्रतिभावंत असतातच. गायमन या दोन्हीही आघाड्यांवर पैकीच्या पैकी गुण मिळवतो. त्याच्या अनुपम लेखणीमुळेच “स्टारडस्ट” प्रेडिक्टेबल असूनही कुठेच प्रेडिक्टेबल राहात नाही. किंबहूना, त्यात परीकथा या प्रकारात कुठेच न बसणारे धक्के, महत्त्वाच्या वाटणाऱ्या अवचित मृत्यू, खुनशी राजकारण, शोकात्म भाव वगैरे वास्तववादी गोष्टींची रेलचेल आहे. या गोष्टीच “स्टारडस्ट” कादंबरीला ‘चांगली’ या वर्गातून काढून ‘अत्युत्तम’ या अजूनच वरच्या वर्गात बसवतात!
बरं ही कथा नुसती ट्रायस्ट्रनची आहे का? तर नाही! “स्टारडस्ट”मध्ये वेगवेगळ्या चेटकिणी येतात, सात राजकुमार येतात, एक दासी येते, एक केसाळ प्राणी येतो, आकाशगामी जहाजातून वीजा पकडणारं एक जहाज येतं आणि यांपैकी बहुतेकांचे ‘त्या’ ताऱ्यात हितसंबंध गुंतलेले असतात. परीकथा म्हटलं की, आपल्याला सहजपणे “एक होता राजा, एक होती राणी, दोघे मेले संपली कहाणी” असे फुसके विनोद आठवतात. पण उपकथानके आणि पात्रांचे वेगवेगळे कंगोरे मात्र “स्टारडस्ट”ला फुसकी, एकसुरी परीकथा न बनवता बहुआयामी साहित्याच्या दर्जाप्रत नेतात. या मंडळींच्या एकमेकांवरील कुरघोडी आणि त्यांचा पात्रपरिपोष या गोष्टी अत्यंत वाचनीय अशा झाल्या आहेत. या गोष्टीच “स्टारडस्ट”ला बालसाहित्य अथवा कुमारसाहित्य यांच्यापेक्षा थेट साहित्य या प्रकारात नेतात. विशेषतः हल्ली इंग्रजी साहित्याच्या नावाखाली जे निकृष्ट फास्टफूड विकले जाते, त्या समोर “स्टारडस्ट” हे निव्वळ पंचपक्वान्न आहे!
पण म्हणून काय “स्टारडस्ट”मध्ये त्रुटी नाहीतच का? आहेत की! अनेक आहेत. काही प्रसंग जे अतिशय नाट्यमय होऊ शकले असते, ते भर्रकन घडून जातात. काही प्रसंग जे कथेवर विशेष प्रभाव पाडत नाहीत, ते घोळवून घोळवून चघळले जातात. पण छप्पन्न भोग असलेल्या थाळीत एखाद-दोन पदार्थ बिघडल्याने सबंध थाळीच वाईट नसते ठरत. काही ठिकाणी तुम्हाला जर इंग्रजीतील त्या-त्या बडबडगीताचा, इतिहासातील घटनेचा संदर्भ ठाऊक नसेल, तर त्या त्या प्रसंगाची मजा पूर्णपणे घेता येणार नाही. अर्थात हा दोष काही लेखकाचा नाही, ना त्या कादंबरीचा. त्यामुळे मी आवर्जून सांगेन की, काही काळ भयाण वास्तवापासून दूर जात पण तरीही त्याच्याशी नाळ पूर्णपणे न तुटू देता तुमची मानसिक बॅटरी चार्ज करू इच्छित असाल, तर “स्टारडस्ट”सारखा पर्याय नाही. या कादंबरीवर याच नावाचा चित्रपट २००७ साली आला होता. पण सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली त्यांनी मूळ कथेचा आत्माच जखमी केल्याचे पाहून मी तो पाचच मिनिटांत बंद करून टाकला. कादंबरी मात्र, पुन्हा एकवार सांगतो, अक्षरशः छप्पन्न भोग आहे. ऍमेझॉनवर सहजपणे उपलब्ध आहे. किंडलवर घेतल्यास अजूनच स्वस्त मिळेल. अवश्यमेव अनुभवा!
*४.७५/५
— © विक्रम श्रीराम एडके
[लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]