दुभंगाचा अभंग – शॅडो अँड बोन

राष्ट्रं कशामुळे दुभंगतात? युद्धामुळे! पंथवेडामुळे! राजकारणामुळे! राष्ट्रं अनेक कारणांनी दुभंगतात. पण या सगळ्या कारणांच्या मुळाशी असते ती एकच भावना, हाव! राष्ट्रं दुभंगतात ती कुणा एकाच्या हावरटपणापायी. भले वर्तमान त्या हावरट व्यक्तीला नायक म्हणो, पण इतिहास त्या व्यक्तीच्या कर्मांची बरोब्बर नोंद ठेवत असतो. अशीच हाव ‘राव्का’मधील एकाला सुटली. आणि तिचा परिणाम अखंड राव्का दुभंगण्यात झाला. पण हा दुभंग नुसता राजकीय व सामाजिक नाहीये. हा दुभंग आहे जादूचा, ज्याचा ती व्यक्ती ‘स्मॉल सायन्स’ असा उल्लेख करते. या उपविज्ञानातून निर्माण झाले ‘द फोल्ड’. राव्काला दुभंगणारी ही तमोमय भिंत अतिशय हिंस्र अशा व्होल्क्रांनी ग्रासलेली आहे. शतकानुशतके राव्का आपल्या उद्धारकर्त्या अवताराची, ‘द सन समनर’ची वाट पाहाते आहे. ती सूर्यावाहक व्यक्ती येते खरी, पण तिचे स्वरूप राव्काच्या अपेक्षेपेक्षा खूपच भिन्न आहे. ती सूर्यावाहक खरोखर फोल्डला नष्ट करते का, की त्यातून अजूनच वेगळे काहीतरी घडते याची अतिशय रोमहर्षक, पदोपदी राजकारणाचे पाश घट्ट विणणारी, जादूच्या विश्वात मानवता शोधणारी, वर्णद्वेषापासून ते लिंगभेदापर्यंत सगळ्यांवर भाष्य करणारी मालिका म्हणजे नेटफ्लिक्सची ‘शॅडो अँड बोन’!

मालिका नेटफ्लिक्सची असल्यामुळे, संबंध असो वा नसो, उपरोक्त यादीतील शेवटचा मुद्दा त्यांना ओढूनताणून आणणे भागच आहे, हे चाणाक्ष वाचकांनी एव्हाना ओळखले असेलच. पण तेवढा एक मुद्दा वगळता मालिका आपल्या विषयापासून एका क्षणासाठीही हटत नाही, ही जमेची बाजू. नुकतेच मालिकेचे ८ भागांचे पहिलेच पर्व प्रकाशित झाले आहे, परंतु त्यांच्या कुणाही एका भागात जेवढ्या घटना घडतात, तेवढ्या सध्याच्या कोणत्याही मराठी मालिकेच्या १००० भागांत मिळूनही घडणार नाहीत. योग्य तिथे घटनाक्रम प्रचंड वेग धारण करतो व योग्य तिथे तोच वेग मंदावतो. या लेखक, दिग्दर्शक आणि संपादकांच्या अथक परिश्रमांतून व गगनगामी प्रतिभेतून साधलेल्या अतिशय नियंत्रित कथाप्रवाहामुळे मालिकेची रसनिष्पत्ती अनेक पटींनी वाढते. पात्रपरिपोषावर त्यांनी अतिशय सुरेख काम तर केले आहेच. परंतु लेखनातून जागोजागी अनेक लहानसहान प्रसंग अशा काही कौशल्याने पेरले आहेत की त्यांचा एकूण कथापटलावर मोठ्ठा परिणाम व्हावा.

‘शॅडो अँड बोन’ ही मालिका लाय बार्डुगो नामक लेखिकेच्या ग्रिशा-व्हर्समधील कादंबऱ्यांवर आधारित आहे. मालिकेचे पहिले पर्व हे ग्रिशाव्हर्समधील ‘शॅडो अँड बोन’ त्रयीतील त्याच नावाच्या पहिल्या कादंबरीवर व ‘सिक्स ऑफ क्रोज’ द्वयीमधील त्याच नावाच्या पहिल्या कादंबरीवर, अशा एकूण दोन कादंबऱ्यांवर आधारलेले आहे. मी यांपैकी एकही कादंबरी वाचलेली नाही. त्यामुळे अनुकूलन कितपत जमले यावर मी भाष्य करणार नाही. पण मालिका मात्र परिपूर्ण पक्वान्नासारखी चपखल जमून आलीये, एवढे खरे. विशेष म्हणजे ग्रिशाव्हर्समधील कादंबऱ्या व त्यांचे कथानक केव्हाच पूर्ण होऊन सिद्धीस गेले आहे. त्यामुळे ‘शॅडो अँड बोन’ मालिका जेव्हा केव्हा संपेल तेव्हा ती पूर्ण झालेली असेल. हे सुख मार्टिनव्हर्सच्या चाहत्यांच्या नशिबी अनेक दशकांनंतरही नाही. ही विधीची विडंबना म्हणायची की खूनी म्हातारा हा कासवापासून प्रेरणा घेतोय, हे ज्याचे त्याने ठरवावे.

मालिका नेटफ्लिक्सची आणि त्यातही पाश्चात्य जगतातून आलेली असल्यामुळे, पॉलिटिकली करेक्ट राहाण्यासाठी बहुसांस्कृतिकतेच्या नावाखाली काहीतरी दाखवण्याचे त्यांच्यावर प्रचंड दडपण आहे. या मुद्याचा आपल्याशी संबंध असा की, मुख्य पात्रांपैकी झोया (सुजया दासगुप्ता) ही अभिनेत्री भारतीय व इनेज (अमिता सुमन) ही अभिनेत्री मूळची भोजपुरी भाषा बोलणारी नेपाळी आहे. बाकी मालिकेतील मुख्य पात्र अलिना साकारणारी अभिनेत्री जेसी मे-ली ही चीनी वंशाची आहे, माल साकारणारा आर्ची रेनॉ हा अँग्लो-इंडियन वंशातून आलेला आहे. ‘अ साँग ऑफ आईस अँड फायर’ मालिका जशी इंग्लंडचा काल्पनिक इतिहास सांगते, तशीच ही ग्रिशाव्हर्स मालिका व ‘शॅडो अँड बोन’ कथानकाच्या ओघात रशिया, मंगोलिया वगैरे देशांना स्पर्श करत असल्यामुळे मालिकेत दाखवलेली बहुसांस्कृतिकता अनाठायी वाटत नाही. अर्थात, काही अपवाद वगळता मालिकेतील बहुतांशी मंडळी ब्रिटिश इंग्लिश उच्चारांत का बोलतात, हा प्रश्न तरीही उरतोच. पण मला व्यक्तिश: ब्रिटिश उच्चार मनापासून आवडत असल्यामुळे, मी या त्रुटीकडे दुर्लक्ष करतो. संगीतात जसा अमुक गायक ‘रहमानचा माणूस’ म्हटलं की त्याच्या प्रतिभेबद्दल आपसूकच खात्री पटते, तसेच चित्रपट व मालिकांच्या माध्यमात अमुक माणूस ‘नोलनचा माणूस’ म्हटलं की त्याच्या अभिनयक्षमतेवर आपोआपच शिक्कामोर्तब होते. जोनाथन नोलनच्या ‘वेस्टवर्ल्ड’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या बेन बार्न्सने (जनरल किरिगन) या ही मालिकेत त्या लौकिकाला साजेसेच काम केले आहे. मला मात्र त्याच्या सोबतच फ्रेडी कार्टर (कॅझ), किट यंग (जेस्पर), डॅनिएले गॅलिगन (निना), डेझी हेड (जेन्या), कॅलाहन स्कोगमन (मॅथियस) अशा एकाहून एक सरस अभिनेत्यांचा इथे उल्लेख केल्यावाचून राहावतच नाहीये.

हल्ली बहुतेक मालिकांची पहिली पर्वे ही कथा सांगण्यासाठी कमी आणि दुसऱ्या पर्वाची तयारी करण्यातच अधिक खर्ची पडतात. त्यामुळे त्यांचं सगळंच अर्धवट वाटत राहातं. ‘शॅडो अँड बोन’ पहिल्या पर्वाच्या अखेरच्या भागात दुसऱ्या पर्वाची बीजे तर पेरतेच, पण तत्पूर्वी अतिशय तृप्त करून सोडणारा, समाधानकारक असा फिनाले-सुद्धा देते. हीच एक नव्हे तर मालिकेतील इतरही अनेक बाबी या साचा भेदणाऱ्या आहेत. खऱ्या अर्थाने ‘शॅडो अँड बोन’ हा दुभंगाचा अभंग आहे! प्रचंड पैसा गाठिशी असूनही ‘द विचर’सारखा एखाद-दुसरा अपवाद वगळता नेटफ्लिक्स गेल्या अनेक वर्षांपासून निष्कलंक यशासाठी चाचपडते आहे. ही मालिका खात्रीने ती कोंडी फोडू शकते. नीट प्रमोट केल्यास ही मालिका म्हणजे नेटफ्लिक्सची अग्रणी, त्यांचा फ्लॅगशिप-शो होऊ शकते. तितकी ताकद या कथेत आणि त्याच्या मांडणीत पहिल्या पर्वामध्ये तरी निश्चितपणे आहेच आहे!!

*४.७५/५

— © विक्रम श्रीराम एडके
(लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *