उजळून ये.. उजळून ये..

स्त्री म्हटलं की माझ्या डोळ्यांसमोर आगीची विविध रुपे येतात. कधी देवघरात तेवणारं निरांजन, कधी साक्षात वडवानल, समयीसारखी शांत तर कधी सूर्यासम दाहक. कधी चुलीवरची आच, कधी मायेची ऊब, कधी टळटळीत दुपारची प्रखरता तर कधी पहाटेची हलकी शीतलता.

मुण्डकोपनिषदाचा अभ्यास करताना वाचलं होतं की, अग्निच्या सात जिह्वा असतात. काळावर सत्ता चालवणारी ‘काली’, विक्राळ ‘कराली’, मनाच्या गतिची ‘मनोजवा’, इन्फ्रारेड म्हणता येईल अशी ‘सुलोहिता’, अल्ट्राव्हायलेट वर्णन करता येईल अशी ‘सुधूम्रवर्णा’, ठिणगीसारखी ‘स्फुल्लिंगिनी’ आणि समस्त विश्वालाच आवडीने गिळंकृत करणारी ‘विश्वरुची’, या सातही अग्निजिह्वा मला स्त्रीचीच विविध रूपे वाटतात. रूप कोणतेही असो, स्त्री ही ज्योत आहे. स्त्री ही मशालीचा पोत आहे. अविनाशी धग आहे. आणि प्रत्येक रूपात शुद्ध आहे.

कविता ही बुंदी पाडावी तशी पडत नसते. वरवर चौखूर उधळल्यासारख्या वाटणाऱ्या विचारांना जेव्हा शब्दांचा लगाम लावला जातो, तेव्हा कविता जन्म घेत असते. ही अशीच एक कविता, ‘उजळून ये, उजळून ये’! कशी वाटते, ते अवश्य कळवा!

**************************************

मंद निरांजन तू कधी
कल्लोळ वडवानलाचा
तेवतेस समयीपरी
कधी लोळ भास्कराचा
शुद्ध तू बहरून ये
पोत तू उसळून ये
ज्योत तू धग अविनाशी
उजळून ये उजळून ये

तू कराली, तू काली,
मनोजवा, सुलोहिता,
सुधूम्रवर्णा, स्फुल्लिंगिनी,
विश्वरुचि, तू अग्निजिह्वा
शुद्ध तू बहरून ये
पोत तू उसळून ये
ज्योत तू धग अविनाशी
उजळून ये उजळून ये

चुलीवरची आच तू
कधी तळहात ऊबेचा
मध्याह्नीचे तू तेजही
कधी स्पर्श प्रभातीचा
शुद्ध तू बहरून ये
पोत तू उसळून ये
ज्योत तू धग अविनाशी
उजळून ये उजळून ये

— © विक्रम श्रीराम एडके.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *