स्त्रीकेंद्री प्रहेलिका – द ब्लेच्ली सर्कल

युद्धं केवळ सीमेवरच लढली जातात, ही अंधश्रद्धा आहे. सीमेवर असते ती केवळ दृश्य आघाडी. पण खरी युद्धं लढली जातात ती, राष्ट्राच्या नागरिकांच्या मनात. ज्या राष्ट्राच्या नागरिकांचं मनोबल अतूट असतं आणि राष्ट्रासाठी आपापल्या अश्रू, रुधिर, स्वेद यांची हवि देण्याची ज्या राष्ट्राच्या नागरिकांची तयारी असते, त्या राष्ट्राचं सैन्यबळ काही का असेना पण ते राष्ट्र युद्धं जिंकतंच. किंबहूना हरले तरीही ते पराभव पचवून अंतिम विजयासाठी पुन्हा उभे राहातात.

दुसरं महायुद्ध ही अशाच मनोबलाच्या जोरावर जिंकलेल्या युद्धांची गाथा आहे. त्या काळी इंग्लंडमधील स्त्रियांना सीमेवर लढण्याची अनुज्ञा नव्हती. पण म्हणून काही तत्कालीन ब्रिटिश स्त्रिया शांत नाही बसल्या. त्यांनी दुसऱ्या मार्गांनी आपलं योगदान दिलं. किंबहूना त्यांचं योगदान अनेकदा सीमेवरील लढाईचा चेहरामोहराच बदलून टाकणारं ठरलं होतं. ते योगदान म्हणजे एनिग्मासारख्या यंत्रांचा वापर करून कूटसंदेशांची पाठवणी करणे आणि त्यांची फोड करणे. आपल्या पक्षाला गुप्त संदेश अनायास पाठवत असताना प्रतिपक्षाच्या संदेशांची मात्र बिनतोड उकल करणे, हे आधुनिक गुप्तचरप्रणालींचं तत्कालीन रूपच म्हणा ना! इंग्लंडने त्यासाठी ब्लेच्ली पार्कमध्ये भलंमोठ्ठं गुप्त कार्यालयच उघडलं होतं. त्या काळी काही आजच्यासारखे संगणक नव्हते. त्यामुळे गुप्त संदेशांची उकल करणं हे निरीक्षण, आकलन, आकडेमोड, चौकटबाह्य विचार वगैरे गुणांची कसोटी लावणारं ठरायचं. आणि ब्लेच्ली पार्कमधील स्त्रिया या कसोटीवर अशा काही खऱ्या उतरायच्या की त्यांच्या उल्लेखाशिवाय मित्रराष्ट्रांच्या विजयाची गाथा पूर्णच होऊ शकत नाही.

अशीच एक कमालीची आकलनशक्ती असलेली तरुण स्त्री आहे, सूझन ग्रे (ऍना मॅक्स्वेल मार्टिन). युद्धं संपून आता जवळजवळ एक दशक उलटत आलंय. दरम्यान सूझनचा विवाह झालाय. तिला समजून घेणारा नवरा आहे. दोन गोंडस मुलं आहेत. तरीही सूझनच्या आयुष्यात एका गोष्टीची कमतरता आहे, थरार! थरार म्हणजे तिला केवळ निरर्थक रोमांचाच्या लाटा नकोयत. पण ब्लेच्ली पार्कमध्ये काम करत असताना तिच्या आयुष्याला जी उद्दिष्ट असल्याची, जगण्याला हेतू असण्याची भावना होती, ती भावनाच तिच्या आयुष्यातून निघून गेली आहे. दरम्यान शहरात तरुण मुलींचे एकामागोमाग एक खून पडू लागतात आणि अस्वस्थ सूझनमधील कूटभंजिनी उसळी मारून जागी होते. आपल्या गणितीय आकलनशक्तीच्या जोरावर ती या अपराधांचा माग काढायचा प्रयत्न करू लागते. तिला ठाऊक असतं की, हे तिच्या एकटीच्या जोरावर होणारं काम नव्हे आणि ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्टनुसार ती आपल्या नवऱ्यालाही आपल्या पूर्वायुष्याची कल्पना देऊ शकत नाहीये. अशा वेळी तिला ब्लेच्ली पार्कमधील तीन जुन्या मैत्रिणींची आठवण येते. माहितीचं जाळं विणण्यात निष्णात असलेली अनुभवी व पोक्त जीन मॅक्ब्रायन (ज्युली ग्रॅहम), मनमोकळ्या व स्वैर विचारांची कॅमिला हार्कर्ट (रेचल स्टर्लिंग), अत्यंत गोड दिसणारी पण छायाचित्रासम मेधावती ल्युसी (सोफी रंड्ल) अशा तिघींसोबत मिळून सूझन एकामागोमाग एक अपराधांचा छडा लावायचा प्रयत्न करू लागते. पुढे त्यांच्यात ऍलिस मिरेन (हॅटी मोराहन) या तैलबुद्धीच्या मैत्रिणीचाही समावेश होते. त्यांची ही कथा, ‘द ब्लेच्ली सर्कल’!

‘द ब्लेच्ली सर्कल’ मालिकेचं वैशिष्ट्य म्हणजे संख्या. मालिकेत एकूण तीन केसेस आहेत, दोन पर्वे आहेत, पण दोन्हींत मिळून भागांची संख्या आहे केवळ सात! मालिकेला संख्यात्मक श्रेष्ठता गाठण्यापेक्षा गुणात्मक श्रेष्ठता गाठण्याची इच्छा असावी कदाचित. कारण त्यात ते शंभर टक्क्यांहून अनेक पटींनी अधिक यशस्वी झाले आहेत. मालिकेतील तिन्ही केसेस म्हणजे तीन श्रेष्ठतम, थरारक रहस्यपट असावेत एवढे जबरदस्त झाले आहेत. आणि एक एक भाग हा कूटभंजन (कोडब्रेकिंग) व त्यासोबतच कणाकणाने मनोशास्त्रीय दबाव निर्माण करत रहस्याची एक एक गाठ उकलणारे लेणे असल्यासारखा झाला आहे! बिंजवॉचिंग करायची आहे आणि तरीही काहीतरी सकस व सशक्त पाहायचंय या दोन कसोट्या असतील, तर मी डोळे झाकून ‘द ब्लेच्ली सर्कल’चे नाव सुचवेन. अर्थात, तुम्ही मात्र डोळे उघडे ठेवूनच पाहा!

मालिका स्त्रीकेंद्रित आहे. स्त्रीवादी आहे. पण आजकाल वेब व इतरत्रही दिसणाऱ्या स्त्रीवादी मालिका जशा स्त्रियांच्या दुर्दशेचं खापर फोडण्यासाठी कुणा ना कुणाला शोधत असतात, तितका उथळ मार्ग ‘द ब्लेच्ली सर्कल’ पत्करत नाही, हे मालिकेचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य. ही मालिका पुरुषांना वर्चस्ववादी व स्त्रियांना शोषित दाखवत सबंध जगालाच काळ्या-पांढऱ्या रंगात रंगवणाऱ्या एकांगी दृष्टीने बघत नाही. ‘द ब्लेच्ली सर्कल’ ही पुरुष व स्त्रिया, दोघांच्याही अंतरंगांत डोकावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते. सामाजिक भाष्य करण्याच्या आडून काहीतरी द्वेषपूर्ण प्रपोगण्डा करण्यापेक्षा ही मालिका साठ वर्षांपूर्वीच्या सामाजिक संदर्भात गोष्टी दाखवायचा प्रयत्न करते. मालिकेतील चारही नायिकांच्या वैयक्तिक व कौटूंबिक पातळीवरील संघर्षांच्या चार स्वतंत्र कहाण्या आहेत. पण त्यांच्यापैकी एकही कहाणी ही अशक्यतेच्या कोटीत जात नाही. उलट त्यांचा संघर्ष अगदी आपल्या आसपास घडणारा व म्हणूनच सर्वार्थाने खरा वाटतो.

काही अपवाद वगळता, अमेरिकन आणि ब्रिटिश मालिका-चित्रपटांमध्ये एक मूलभूत फरक मला जाणवतो. अमेरिकन चकाचक नेपथ्य आणि रंगरंगोटीवर खूपच जास्त भर देतात. या उलट ब्रिटिश मंडळींचा ओढा नैसर्गिकतेकडे अधिक असतो. अमेरिकन लोक पात्रांच्या कृतींतून दृश्य स्वरुपातील नाट्य उभे करायचा प्रयत्न करतात तर ब्रिटिश हे पात्रांच्या हेतूंमधील अंत:प्रवाहांतून मनोवैज्ञानिक थरार निर्माण करतात. ‘द ब्लेच्ली सर्कल’ ही ब्रिटिश मालिका असल्यामुळे अर्थातच दुसऱ्या प्रकारांत मोडते. तिच्यात साहसदृश्ये काहीशी कमी असतीलही कदाचित परंतु तिच्यातील थरार बावनकशी आहे व तो एका क्षणासाठीही कमी होत नाही. वरवरच्या हाणामाऱ्यांपेक्षा खोलवर ठसा उमटवणारे व अंती गणित सुटल्याचा किंवा कोडे उकलल्याचा आनंद देणारे काहीतरी अर्थपूर्ण पाहू इच्छित असाल, तर ‘द ब्लेच्ली सर्कल’ ही खऱ्या अर्थाने तुमच्यासाठीच बनलेली प्रहेलिका आहे!

*५/५

— © विक्रम श्रीराम एडके.
[अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]

टीप: ‘द ब्लेच्ली सर्कल – सॅन फ्रान्सिस्को’ नावाने याच मालिकेचा एक अत्यंत वाईट अमेरिकन स्पिन-ऑफ आला होता. हा लेख त्या मालिकेबद्दल नाही तर मूळ ब्रिटिश मालिकेबद्दल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *