शुद्धतम, श्रेष्ठतम रत्न – लाईफ ऑन मार्स

वर्ष २००६. ग्रेटर मँचेस्टर पोलिस विभागातील चीफ इन्स्पेक्टर सॅम टायलर (जॉन सिम) हा एका अपराधाचा माग काढतोय. त्यासाठी तो घाईघाईने एके ठिकाणी निघालाय. तेवढ्यात मागून एक कार येते.. धाड..! सॅम रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त पडतो. हळूहळू त्याला शुद्ध येते. तो डोळे उघडतो. उभा राहातो. पण पाहातो तर काय, सॅम थेट १९७३ सालात जाऊन पोहोचलाय! सॅम वेडा झालाय का? की सॅम कोमात आहे? की सॅम खरोखरच काळात मागे गेलाय? या तिन्ही शक्यतांच्या लाटांवर अखेरच्या भागातील अखेरच्या प्रसंगापर्यंत एखाद्या नौकेसारखी हिंदकळणारी व सोबतच आपल्यालाही त्या नौकानयनाचा एकमेवाद्वितीय, अभूतपूर्व अनुभव देणारी ब्रिटिश मालिका म्हणजे “लाईफ ऑन मार्स”.

‘लाईफ ऑन मार्स’चं सगळ्यांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे, तिचा पिंड जरी तपासनाट्याचा असला, तरी तेवढ्या एकाच शैलीत तिची संभावना करणं योग्य होणार नाही. उलटपक्षी मालिकेवर ते काहीसं अन्यायकारकच ठरेल. कारण, ‘लाईफ ऑन मार्स’चा प्रत्येक भाग हा विज्ञानकथा, तपासनाट्य, मानसशास्त्रीय थरारपट, प्रासंगिक विनोद, सामाजिक भाष्य, कल्पनाविलास या आणि अशा अनेकानेक शैलींचं परिपूर्ण मिश्रण आहे. आणि त्या उप्पर जाऊन सांगतो, त्यांचा प्रत्येक भाग हा कल्पनातीत मनोरंजक आहे. आणि तो प्रत्येक भाग म्हणजे एक एक लेणे आहे. भागागणिक नवीन प्रकरण हाताळणारे तपासनाट्य असूनही प्रत्येक भागाचा सॅमच्या भूतकाळाशी, त्याच्या परतीशी समांतर पातळीवर मनोशास्त्रीय संबंध आहे. प्रत्येक भागात सॅम परतीच्या वाटेवर काही इंच पुढे सरकतो आणि काही इंच मागेसुद्धा जातो. जेव्हा सॅम त्या वाटेवर पुढे जातो तेव्हा तेच सत्य आणि भूतकाळ मिथ्या वाटू लागतो तर जेव्हा तो मागे सरकतो तेव्हा तेच सत्य व सॅमचे पूर्वायुष्य भास वाटू लागतो. आणि हा संभ्रम अखेरच्या भागाच्या अखेरच्या प्रसंगापर्यंत राखण्यात मालिकेने सर्वोच्च यश तर प्राप्त केलेले आहेच, पण त्यानंतर बसणारा अखेरचा धक्का तर अजूनच चक्रावून टाकणारा आहे. त्या अखेरच्या धक्क्यात समजतं की एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला तर मानवी मन काय काय आणि कोणकोणत्या सीमारेषा भेदून जाऊ शकतं! मला मान्य आहे या परिच्छेदात मी जे लिहिलंय ते खूपश्या प्रमाणात अमूर्त आहे, संदिग्ध आहे, अनेकार्थीदेखील आहे. पण या पेक्षा अधिक उघड करून सांगणे, रसभंग करणारे ठरेल. उलट हा लेख वाचल्यावर मालिका पाहून मग पुन्हा हा लेख वाचल्यास, चित्रकोड्याचे तुकडे जागच्या जागी बसून या परिच्छेदाचा अधिकच आस्वाद घेता येईल, याची मला खात्री वाटते.

सॅमच्या या प्रवासात अनेक लोक भेटतात. जरासा बावळट तरीही सहज आवडून जाणारा डिसी जॉन स्केल्टन (मार्शल लँकेस्टर) भेटतो. चांगल्या मनाचा टिमप्लेयर तरीही सहज नावडून जाणारा डिएस रेमण्ड कार्लिंग (डीन अँड्र्यूज) भेटतो. निष्पाप आणि तितक्याच गोड स्वभावाची डब्ल्यूडिसी ऍनी कार्टराईट (लिझ व्हाईट) भेटते. कणखर डब्ल्यूपीसी फिलिस डॉब्स (नोरीन कर्शॉ) भेटते. संवेदनशील बारमालक नेल्सन (टोनी मार्शल) भेटतो. पण सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे चीफ इन्स्पेक्टर जीन हण्ट (फिलिप ग्लेनिस्टर) भेटतो! हण्ट हा शुद्ध वल्ली आहे. तो एकाचवेळी वर्णभेदी, सगळ्यांना सांभाळून घेणारा, गंभीर, विनोदी, उद्धट, मृदूभाषी, लिंगभेदी, रक्षणासाठी सदा तत्पर असलेला, समलैंगिकांचा द्वेष्टा, माणूसकीला जागणारा, पौरुषाचा माज दाखवणारा, अत्यंत हळवा, फाटक्या तोंडाचा, समोरच्याला योग्य वेळी बरोब्बर समजून घेणारा, अतिशय हिंस्र, अत्यंत मायाळू अशा एकापेक्षा एक विरोधाभासांचं परिपूर्ण कडबोळं म्हणजे जीन हण्ट. रूढार्थाने चौकटबद्ध असूनही वेगळं असलेलं हे पात्र निर्मिण्यासाठी लेखकांनी आपली सारी प्रतिभा पणाला लावल्याचे सहजच जाणवते. जीन हा सत्तरच्या दशकातील रांगडा पोलिस आहे, तर सॅम एकविसाव्या शतकातील तंत्रशुद्ध पोलिस आहे. दोघांमध्ये एक नव्हे तर किमान दोन पिढ्यांचा तरी फरक आहे. तपास कसा करावा या बाबतीत दोघांचीही मते अक्षरशः दोन टोकांची आहेत. ‘लाईफ ऑन मार्स’ ही जशी सॅमच्या संभ्रमाची कथा आहे, तितकीच ती सॅम आणि जीनमधील चढाओढीची, संघर्षाचीही कथा आहे. अंती काय घडतं हे पाहाणं त्यामुळेच अतोनात उत्कंठावर्धक ठरतं. तसं बघायला गेलं तर सॅम नायक आहे आणि जीन उपनायक. पण आपल्याही नकळत आपण सहजपणे या मालिकेला जीन हण्टची मालिका म्हणून ओळखू लागतो, ही निश्चितपणे त्या पात्राच्या इतकीच त्याला समर्थपणे साकारणाऱ्या फिलिप ग्लेनिस्टरचीच ताकद आहे. आणि याची निर्मात्यांनाही पुरेपूर जाणीव आहे कारण, ‘लाईफ ऑन मार्स’चा अत्यंत वाईट स्पिन-ऑफ ‘ऍशेस टू ऍशेस’मध्ये सॅम नाही, पण जीन आहे!

‘अ केस अ वीक’ प्रकारच्या मालिकांसाठी सगळ्यांत मोठा धोका असतो तो म्हणजे एकाच भागापुरते येणाऱ्या पात्रांचा पुरेसा परिपोष न करणे. बरेचदा अशी पात्रे ही पोकळ असतात. त्यामुळे आपल्याला तो भाग आवडत नाही किंवा कमी आवडतो. अशा भागांची संख्या वाढली की आपसूकच आपल्याला ती मालिका आवडत नाही किंवा कमी आवडते. या सापळ्यावर मात करणे ज्या मालिकेला जमते, ती मालिका या ठरलेल्या साच्यातील असूनही आपली वेगळी छाप पाडते. ‘लाईफ ऑन मार्स’ ही अशाच सशक्त पात्रांची रेलचेल असलेली मालिका आहे. तिचा एक एक भाग म्हणजे प्राथमिकच नव्हे तर अगदी दुय्यम-तिय्यम दर्जाच्या पात्रांच्या मानसिकतेवरही कटाक्षपूर्ण, तिरकस, कधी खळखळून हसवणारं तर कधी सहानुभूती वाटायला लावणारं भाष्य करून जातो.

पुढचं सगळ्यांत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मालिकेचं संगीत. ‘लाईफ ऑन मार्स’ हे डेव्हिड बॉवीचं जगप्रसिद्घ गीत. ते तर अनेक संदर्भांनी मालिकेत प्रसंगोपात ऐकू येतंच. पण त्या व्यतिरिक्तही मालिकेत सत्तरच्या दशकातील शैलीदार, खुमासदार अशी खूप सारी गाणी वापरली आहेत. गाणं चपखल जागी, कधी आणि कसं वापरावं याचा वस्तुपाठ म्हणता येतील अशा एकापेक्षा एक जागा मालिकेत आहेत. या मालिकेने मला आजकालच्या कर्णकटू गोंगाटापासून दूर नेत सत्तरच्या दशकातील संगीताच्या सुवर्णयुगाची नव्याने ओळख करून दिली. एडमंड बटने केलेली ओपनिंग थीमसुद्धा मालिकेच्या विषयानुरुप सत्तरचे दशक अधिक आजचा काळ असा मस्त मेळ साधणारी आहे. एवढेच नव्हे तर त्या थीममध्ये हलकेसे भारतीयत्वही जाणवते, आता ते का, हे मालिका पाहून तुम्हीच समजून घ्या!

मालिकेला मिळालेल्या अतोनात यशामुळे तिची अमेरिका, स्पेन, रशिया, झेकोस्लोव्हाकिया, साऊथ कोरिया इ. अनेक देशांमध्ये पुनर्निर्मिती झाली. अर्थात त्यांचा अमेरिकन रिमेक साफ गंडला होता म्हणतात. आपली तर काही तो पाहायची हिंमत नाही झाली. पण अमेरिकन रिमेकच कशाला, याच मालिकेची एक स्पिन-ऑफ मालिका केली होती, डेव्हिड बॉवीच्याच ‘ऍशेस टू ऍशेस’ गाण्याच्या नावे. पण त्यात ना ‘लाईफ ऑन मार्स’चा साधेपणा होता ना गोडवा; अगदी औषधालाही नाही. कथा घासून घासून गुळगुळीत झालेली. आणि त्यात वाईट गोष्ट म्हणजे ज्या कीली हॉजला मुख्य भूमिका दिली, तिला अभिनयाचा ‘अ’देखील ठाऊक नाही. इतक्या उणीवा असताना वाढीव गोष्ट म्हणजे ‘ऍशेस टू ऍशेस’ मनोरंजनाला दुय्यम स्थान देते आणि वोक-चिऊताईपणावरच मुख्य भर देते. फक्त फिलिप ग्लेनिस्टरसाठी म्हणून मी ती मालिका सहन केली. वाघासारखा जीन हंट अगदीच केविलवाणा वाटतो पण त्यात. पुढच्यावेळी कुणाला भूतकाळात पाठवण्यापेक्षा अभिजात जीन हंटलाच भविष्यकाळात पाठवलं, तर जास्त मजा येईल!

आपल्याकडे मालिकांचे शंभर एपिसोड्स होणं म्हणजे किस झाड की पत्ती मानतात आणि हजारो एपिसोड्स चालणाऱ्या मालिका कथानक संपल्यामुळे नव्हे तर रिकामी जागा भरायला नवी मालिका आल्यामुळे संपतात. दर्जापेक्षा भागांच्या संख्येलाच यश मानणाऱ्या आपल्याकडील डेलिसोप्सवर पोसलेल्यांना कदाचित खरं वाटणार नाही, पण दोन सीझन्स चालणारी ‘लाईफ ऑन मार्स’ ही सबंध मालिका, फक्त आणि फक्त १६ च भागांची आहे! पण ते १६ भाग म्हणजे खऱ्या अर्थाने दूरचित्रवाणी माध्यमाला १६ पावले पुढे नेणारी शुद्धतम, श्रेष्ठतम अशी एक एक रत्ने आहेत. ‘लाईफ ऑन मार्स’ आपल्याकडे कुठेच अधिकृतरित्या उपलब्ध नाही, त्यामुळे पाहायची असेल तर थोडीशी शोधाशोध करावी लागेल. पण एकदा पाहिली की, शोधण्याचाच नव्हे तर पाहाण्याचाही सबंध वेळ सार्थकी लागेल. नुसता वेळ सार्थकीच कशाला, कदाचित प्रपोगण्डा, सॉफ्टपॉर्न, अनावश्यक मसाला वगैरे तथाकथित हिट फॉर्म्युला टाळूनही उत्कृष्ट मालिका बनवली जाऊ शकते ही आजच्या जगात दुर्मिळ होत चाललेली नवीच दृष्टीदेखील देऊन जाईल!

*४.८५/५

— © विक्रम श्रीराम एडके
[अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *