चित्रपटांच्या उत्क्रांतीमार्गातील धातुस्तंभ : २००१ – अ स्पेस ओडिसी

उत्क्रांतीच्या पहिल्या पायरीवर, जेव्हा माणसाचा अद्याप माणूस व्हायचा होता, तेव्हा एका मानवसदृश वानरांच्या कळपापुढे अचानकपणे एक धातुस्तंभ येऊन उभा राहातो. ही वानरं टोळ्या करून राहाणारी आणि पाण्याच्या डबक्यांवरून दुसऱ्या कळपांशी भांडणारी, एकमेकांना घाबरून राहाणारी आहेत. काही वानरं त्या स्तंभाला स्पर्श करतात. स्पर्श केलेल्या वानरांचा कळप नवनवीन युक्त्या वापरून दुसऱ्या कळपांवर सहजी विजय मिळवू लागतो. लक्षावधी वर्षांनंतर चंद्रावर एका अवकाशयानाला तसाच पण आधीच्यापेक्षा मोठा स्तंभ सापडतो. त्या स्तंभाच्या खुणेवरून मानवांचे अजून एक अंतराळयान गुरूच्या दिशेने झेपावते. त्यांना तिकडे काय आढळते, याचा आध्यात्मिक, तात्त्विक, भौतिक आणि वैज्ञानिक पातळीवर घेतलेला रूपकात्मक शोध म्हणजे स्टॅन्ली कुब्रिकची १९६८ सालची श्रेष्ठतम कलाकृती, ‘२००१ – अ स्पेस ओडिसी’.

हा चित्रपट पहिल्यांदाच पाहाताना तुम्हाला कदाचित वाटेल की, ‘अरे, यात दोन तास बावीस मिनिटे दाखवण्यासारखं काय आहे, हे तर अर्ध्या तासात दाखवून संपवता आलं असतं’! तुम्हाला कदाचित कथांचे तुकडे किंवा ठिगळं एकत्र करून चिकटवल्याचीही भावना निर्माण होऊ शकते. पण जसजसा हा चित्रपट तुम्हाला आकळत जाईल तसतशा या सगळ्या शंका साधनामार्गावरील सुरुवातीच्या शंकांसारख्या विरून जातील व तुमच्यापाशी राहिल ती केवळ चित्रपटाच्या क्षेत्रातील सद्गुरूंनी, स्टॅन्ली कुब्रिकने पावणेत्रेपन्न वर्षांपूर्वी दाखवलेली अनवट वाट!

कुब्रिकला ठाऊक होतं की, आपल्या या चित्रपटाचे शेकडो अन्वयार्थ लावता येतील. किंबहूना तोच त्याचा उद्देश होता. त्यामुळेच त्याने ‘२००१’चा त्याला अभिप्रेत असलेला अर्थ सांगण्याचे कायमच नाकारले. ही खूपच कमाल युक्ती आहे. नीट वापरली तर कोणत्याही चित्रपटाची संस्मरणीयता शतपटींनी वाढवू शकते. पण त्यासाठी मुळात तो चित्रपट हा चित्रपट म्हणून उत्कृष्टरित्या बनवलेला असायला हवा, ही मूळ अट आहे. ‘२००१’बद्दलचा सर्वाधिक दृश्य, सर्वाधिक भौतिक भाग आपल्यासमोर येतो, तो म्हणजे त्याचे दिसणे. कुब्रिक हा परफेक्शनिस्ट म्हणून प्रसिद्ध होता. काळाच्या अनेक पटींनी पुढचा होता. त्याची अकल्पनीय झेप चित्रपटाच्या रूपामध्ये सहजी डोकावते. भले ही चित्रपटाची रिळं डागडुजी करून रिस्टोअर केलेली असतील, तरीही इतक्या उच्चतम दर्जाची मूळ दृश्यं पाच दशकांपूर्वी चित्रित केलेली आहेत, या गोष्टीवर विश्वासच बसत नाही. एक एक चौकट चित्रित करताना केवढी मेहनत घ्यावी लागली असेल, किती नियोजन करावे लागले असेल, कसे प्रमाणबद्ध नमुने बनवावे लागले असतील, गुरूत्वाकर्षणशून्य दृश्ये चित्रित करताना प्रतिभेचा केवढा कस लागला असेल, केवढे कष्ट पडले असतील, या विचारांनी नुसते तोंडात बोटच घालावेसे वाटत नाही तर शब्दशः अस्वस्थ व्हायला होते.

या चित्रपटासाठी कुणा विज्ञानविषयक तज्ञ लेखकाच्या शोधात असताना कुब्रिकला अवचितपणे आर्थर सी. क्लार्क सापडला होता. दोघांच्या भांडणांतून, बौद्धीक घर्षणांतून, कल्पनामालिकांच्या भराऱ्यांतून, ज्या अनेक कथा निघाल्या त्या कथांचा एकत्रित परिणाम म्हणजे हा चित्रपट आहे. त्यामुळेच सुरुवातीला अकारणच ठिगळांसारखा वाटतो तो. पण जसजसे त्या तिन्ही कथांमधील, किंबहूना काळांमधील समान सूत्र मन:पटलावर साकारू लागते, तसतसा हा चित्रपट अधिकाधिक भुरळ घालू लागतो. काही चित्रपट हे पाहिल्या पाहिल्या विसरून जावेसे वाटतात, काही चित्रपट हे पाहिल्यावर दिवसभर विचारांच्या गर्तेत ढकलून देतात, काही चित्रपट हे दिवसेंदिवस व कधीकधी महिनोंमहिने अस्वस्थतेचे आवर्त उभे करतात; पण फार थोडे चित्रपट असतात जे तुमच्या सबंध आयुष्यालाच अधिक उत्तमतेकडे, उदात्ततेकडे, उन्नततेकडे घेऊन जातात. ‘२००१’ हा त्या दुर्मिळ प्रकारचा चित्रपट आहे. आजकालच्या ‘स्कॉर्सेसीच्या भाषेतील न-चित्रपटांवर’ पोसलेल्या अनुत्क्रांत प्राण्यांसमोर भूतकाळातून प्रकट झालेला धातुस्तंभच म्हणा ना!

सुरुवातीच्या धातुस्तंभाला ती माकडं जिज्ञासेपोटी का होईना पण हात लावतात. नंतर मानवही चंद्रावरील धातुस्तंभाला त्याच भावनेने स्पर्श करतो. इथे चित्रपट एकाच वेळी उत्क्रांती, इच्छास्वातंत्र्य या सामान्य जाणीवांच्या कक्षेतील संकल्पनांना हात घालत असतानाच आपल्याहून श्रेष्ठतम, देवत्वाच्या कक्षेत जाणारे काहीतरी आहे, हा देखील विचार मांडतो. हे दोन्हीही विचार वरवर पाहिल्यास परस्परविरोधी वाटत असूनही कुब्रिक त्यांची तात्त्विक व दृश्य पातळीवरील मोट बांधण्यात कमालीचा यशस्वी ठरलाय. या बाबतीत असं यश कुब्रिकइतक्याच सातत्याने नंतरच्या काळात केवळ त्याचा सद्शिष्य ख्रिस्तोफर नोलनच्याच वाट्याला आलंय. ‘इंटरस्टेलर’मागचीच (२०१४) नव्हे तर नोलनच्या सबंध चित्रपट कारकीर्दीचीच प्रेरणा कुब्रिक आहे, हे उघडपणे जाणवते. नोलनचा ‘फॉलोईंग’ १९९८ साली प्रदर्शित झाला आणि कुब्रिक १९९९ ला वारला, त्याला जर अजून एक-दिड दशकांचं आयुष्य मिळालं असतं, तर नोलनच्या चित्रपटांवरील त्याची वेगळ्याच अंतर्दृष्टींनी भरलेली प्रतिक्रिया जाणून घेणे हा वैचारिक अत्यानंदाचा ठेवा होऊ शकला असता. बाकी दोघेही ब्रिटिश, दोघेही हॉलिवूडमध्ये राहूनदेखील डावे नसलेले, दोघांचेही सगळेच चित्रपट अभिजात म्हणून गणले जाऊनही कधीच (व अद्याप) सर्वश्रेष्ठ चित्रपटाचे आणि दिग्दर्शनाचे ऑस्कर न मिळवू शकलेले वगैरे साम्यस्थळे आहेतच.

ज्यांनी चित्रपट अद्याप पाहिलेला नाही, त्यांनी आधी तो पाहावा आणि मगच हा परिच्छेद वाचावा. धातुस्तंभाला स्पर्श केल्यामुळे उत्क्रांतीला मिळालेली चालना, वळणे हा चित्रपटाचा मोठ्ठा गाभा आहे. चित्रपटातील अखेरच्या दृश्यांत हीच संकल्पना विज्ञानाच्या कक्षा ओलांडून अध्यात्माच्या कक्षेत जाते. गुरूच्या जवळ दिसणारा धातुस्तंभ आधीच्या दोघांपेक्षाही मोठा असतो. त्याच्या योगे डेव्हिड बाऊमन (कियार डुली) हा उत्क्रांतीचे लाखो टप्पे पार करून एका घरात पोहोचतो. हे घर देखील नियोक्लासिकल शैलीचे आहे, अर्थात ते सनातन तर आहेच पण त्याचवेळी नवेदेखील आहे. तिथे तो अनेक देहावस्थांचा अनुभव घेतो आणि अंती गर्भस्थ होऊन पृथ्वीच्या समकक्ष उभा राहातो. तो गर्भात आहे, याचा अर्थ त्याच्यात सृजनाची बीजं लपलीयेत. पण त्याचवेळी त्याचे डोळे सताड उघडे आहेत, कारण तो आता अंतर्दृष्टीने परिपूर्ण आहे. त्याच्यासमोर असलेली पृथ्वी ही कोणत्या काळातील आहे, ते दाखवलेले नाही. जर ती वर्तमानकाळातील असेल, तर तो तिच्या उत्क्रांतीला नवे वळण द्यायला आलाय. पण जर त्याचे यान भोवऱ्यात खेचले गेले तेव्हा त्याने खचितच काळाच्या सीमा ओलांडल्या होत्या, त्या सीमा भूतकाळाला जोडणाऱ्या असतील तर? तर कदाचित समोर असलेली पृथ्वी लक्षावधी वर्षांपूर्वीची असू शकते. मग तोच तर पहिल्या धातुस्तंभाचा स्थापक तर नसेल ना? हिंदू तत्त्वज्ञानात असाच भगवंत प्रलयानंतर सृजनापूर्वी शिशुरूपात पिंपळपानावर पहुडलेला सांगितलाय!

आज सर्वत्र आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सुळसुळाट झालेला असताना, मानव विरुद्ध यंत्र हा एकेकाळी केवळ विज्ञानकथांच्याच वर्तुळातील विषय आपसूकच वास्तवाच्या परीघात आलाय. ‘२००१’ने पन्नास वर्षांपूर्वी संगणक एचएएल-९००० विरुद्ध मानव डॉ. डेव्हिड बाऊमनचा नियंत्रणासाठीचा संघर्ष दाखवून या बाबीचा उहापोह केलाय. ही आर्थर सी. क्लार्क आणि कुब्रिक दोघांचीही ‘भेदिले सूर्यमंडळा’ दर्जाची प्रतिभा आहे. त्या भागात डुलीने साकारलेला तणावातही शांत राहाणारा अंतराळवीर खासच जमून आलाय. पण प्रतिभेचाच विषय असेल, तर आज सर्रास वापरात असलेल्या अनेक गोष्टींचे भाकित या चित्रपटाने केलेले दिसते, उदाहरणार्थ एआय, टॅब्लेट्स वगैरे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सुमारे वर्षभराने मानव पहिल्यांदा चंद्रावर उतरला. आज आपल्याला ठाऊक असलेला चंद्र आणि चित्रपटात दाखवलेला चंद्र, दोन्हींमधील समानता अचंबित करणारी आहे! नेमके हेच नोलनने ‘इंटरस्टेलर’द्वारे साधले होते. त्यात दाखवलेले कृष्णविवर आणि नासाने नंतर मिळवलेले कृष्णविवराचे पहिलेवहिले छायाचित्र हे अनेक पातळ्यांवर सारखेच आहे. अर्थात, कुब्रिककडे क्लार्क होता तसाच नोलनकडेही कीप थॉर्न आहेच. कुब्रिकने दाखवलेली अंतराळयाने भयावहरित्या सत्याच्या जवळ जाणारी आहेत. हे सारे दृक्पातळीवर आहे, फक्त ते समजून घेण्यासाठी आपले डोळे अखेरच्या शिशुप्रमाणे उघडे ठेवावे लागतात. चित्रपटात संवाद खूपच कमी आहेत व जिथे आहेत तिथेही ते फारसे महत्त्वाचे नाहीत, ही बाब कुब्रिकचा चित्रपटावर एक दृक्माध्यम म्हणून केवढा गाढ विश्वास आहे, हेच दर्शवते. कुब्रिकने चित्रपटात वापरलेले शास्त्रीय संगीत हाच दृक्परिणाम श्राव्य पातळीवर लक्षपटींनी वाढवण्यात हातभार लावते. ‘२००१’साठी कुब्रिकला सर्वश्रेष्ठ विभासांच्या विभागात ऑस्कर मिळाले आहे, ते विभास खोटे वाटण्याऐवजी आजदेखील तितकेच श्रेष्ठ भासतात, हा प्रतिभेचा अजब चमत्कारच मानला पाहिजे.

पण इतके असूनही ‘२००१’च्या मुळाशी मानवी नाट्य आहे. ते आपल्याला आज जरासे संथ वाटेल कारण, कालौघात आपण चित्रपट हा दिड तासाचा टाईमपास मानू लागलोय. चित्रपटाकडे अनुभव म्हणून पाहाणाऱ्या प्रत्येकासाठी मात्र ‘२००१’ डोळ्यांचे, मनाचे, बुद्धीचे आणि आत्म्याचे पारणे फेडेल, यात काहीच शंका नाही. तो आपली उत्कंठा वाढवतो, भीती वाटायला लावतो, मेंदूचा भुगा करतो, आश्चर्याने आ वासायला लावतो. भावनांचे असे इंद्रधनुष्य साकारणे हीच चांगल्या चित्रपटाची ओळख नसते का! या चित्रपटाने, त्यातील धातुस्तंभांनी उत्क्रांतीला दिली तशीच पन्नास वर्षांपूर्वी विज्ञानपटांना एक नवी दिशा दिली आहे. आजही चित्रपटाला चित्रपट म्हणून बनवू इच्छिणाऱ्या, पाहू इच्छिणाऱ्या प्रत्येक ध्येसासक्ताला तो प्रेरणा देतोय, विचारांना चालना देतोय. विचार हे उत्क्रांतीचे फळ आहे की उत्क्रांती विचाराचे, हा प्रश्न उपस्थित करणारा ‘२००१’ स्वतः मात्र निश्चितपणे विचारांच्या परिसीमेचे फळ आहे, यात काहीच शंका नाही!

— © विक्रम श्रीराम एडके.
[लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]

One thought on “चित्रपटांच्या उत्क्रांतीमार्गातील धातुस्तंभ : २००१ – अ स्पेस ओडिसी

  1. स्पेस ओडिसी पाहिला!!
    खरंतर हे विधान मला वेगळ्या स्वरूपात असं मांडता येईल;
    विश्वनिर्मिती घडवून तटस्थस्वरूप झालेल्या शक्तीने आपल्या असीम प्रज्ञेचा एक अंश Stanly Kubrik हे नाव धारण करणाऱ्या एका उत्क्रांत जीवामध्ये प्रक्षेपित करून,त्याला,तो ज्या उत्क्रांत वंशाचे प्रतिनिधित्व करतोय त्याच्या निर्मिकाचा आणि त्याने घडविलेल्या अफाट पसाऱ्याचा लेशमात्र
    दृष्य-आभास कोsहं हा प्रश्न ज्यांना स्वतःला विचारावासा वाटतो,शोध घ्यावासा वाटतो,अशा सर्व उत्क्रांत मानवांसाठी डोळे उघडे ठेवून करावयाची आभ्यंतर शोधाची साधना करायचा मार्ग दाखविला आहे!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *