सोलफुल जॅझ — सोल

रहमानने मला ज्या अनेक गोष्टी दिल्या आहेत त्यांच्यापैकी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जॅझ. त्याने गेल्या तीन दशकांतील त्याच्या अनपेक्षित रचनांमधून वेळोवेळी जॅझशी ओळख करून दिली आणि माझ्यासाठी जणू एक नवंच दालन खुलं झालं. जे योगदान राजाचं मला व माझ्यासारख्या अनेकांना सिम्फनिक संगीताची गोडी लावण्यात आहे, तेच योगदान रहमानचं आम्हाला जॅझचं वेड लावण्यात आहे. पुढे या वाटेवर हर्बी हॅन्कॉक, सोनी रॉलिन्स, माईल्स डेव्हिस, डायना क्राल वगैरे गंधर्व भेटत गेले आणि सगळा प्रवासच जॅझसारखा उन्मुक्त, उत्फुल्ल होऊन गेला. रहमानला कदाचित कल्पनाही नसेल की, त्याने पेटवलेले हे स्फुल्लिंग २०२० साली अवचितपणे एका चित्रपटाशी वेगळ्याच सुरावटीवर जोडले जाण्यात मदत करेल. मी बोलतोय पिट डॉक्टर दिग्दर्शित डिज्नी-पिक्सारच्या नव्याकोऱ्या चित्रपटाबद्दल, ‘सोल’!

जो गार्डनर माध्यमिक शाळेत जॅझ शिकवतो. तो जे शिकवतो त्यात त्याच्या विद्यार्थ्यांना फारसा रस नाही. आणि खरं सांगायचं तर त्यांना शिकवण्यात जो ला देखील फारसा रस नाही. तो शिकवण्यासाठी, प्रेरित करण्यासाठी जन्माला आलेलाच नाहीये. तो जन्माला आलाय, जॅझ वाजवण्यासाठी. त्याची बोटं पियानोवरून सरसर फिरू लागली की त्याचीच नव्हे तर ऐकणाऱ्याचीही समाधी लागून जाते. त्याला फक्त एक संधी हवीये, आपलं अतिसामान्य आयुष्य शिखरावर नेऊन ठेवण्याची, आपल्या आईला आणि सबंध जगाला आपली योग्यता दाखवून देण्याची. तशी ती त्याला मिळतेदेखील. डोरोथिया विल्यम्स या जॅझच्या विश्वातील दंतकथेसम प्रसिद्ध असलेल्या वादिकेसोबत संगीतसभा सजविण्याची! जो कमालीचा खुश होतो. धावत पळत तयारीला लागतो. आज संध्याकाळी त्याच्या आयुष्याला कायमची कलाटणी मिळणार असते. फक्त एकच गडबड होते, जो मरतो! मृत्यूच्या पल्याड जायला तयार नसलेला जो गडबडीत जन्माच्या अल्याड फेकला जातो. तिथे त्याची भेट एका सहस्रकानुसहस्रके जन्मालाच न आलेल्या २२ नामक जीवाशी होते. २२ ला कधी जन्माला येण्याची इच्छाच नाहीये आणि जो ला तर होता होईल तितक्या चटकन परत जायचेय. यातून काय घडतं, याची चेहऱ्यावर निखळ हास्याची लकेर उमटवणारी आणि हळूच डोळ्यांच्या कडा ओलावणारी कहाणी म्हणजे ‘सोल’!

पिट डॉक्टर हा ऍनिमेटेड चित्रपटांच्या क्षेत्रात आता खरोखर बापमाणूस म्हणवला जायला हवा. त्याने आजवर केवळ चारच फिचर्स बनवलेयत, पण त्यांची नुसती नावे वाचली तरी मी त्याला का बापमाणूस म्हणतोय ते समजेल – मॉन्स्टर्स आयएनसी (२००१), अप (२००९), इनसाईड आऊट (२०१५) आणि आत्ताचा ‘सोल’! आधीच्या तिन्ही चित्रपटांप्रमाणेच ‘सोल’देखील अक्षरशः मास्टरपिस म्हणावा, असा जमलाय. पहिल्या प्रसंगापासून ते अखेरच्या फ्रेमपर्यंत तो आपले बोट पकडून अतिशय शिताफीने आपल्याला कथेच्या प्रासादात अगदी आतपर्यंत फिरवून आणतो. यात जितका वाटा पिटच्या उत्कृष्ट लेखन आणि दिग्दर्शनाचा आहे, तितकाच ब्रॅडफर्ड यंगच्या प्रकाशयोजनेचा देखील आहे. लाईव्ह-ऍक्शन चित्रपटाच्या चौकटी जर उत्कृष्टरित्या रचल्या गेल्या तर आपण स्तुती करतो की, अक्षरशः चित्रासारख्या सुरेख जमल्यायत. ‘सोल’मध्ये मात्र ऍनिमेटेड चौकटी इतक्या सुरेख जमल्यायत की त्या अक्षरशः खऱ्या वाटतात. त्यांच्या तपशीलांवर एवढं सूक्ष्म काम केलंय की, आश्चर्याने तोंडात बोट घालावंसं वाटतं. उदाहरणार्थ एका प्रसंगात न्हाव्याचं दुकान दाखवलंय. त्या प्रसंगावर अल्पविराम घेऊन निरीक्षण करा, त्या दुकानातल्या अगदी लहानसहान वस्तूदेखील कमालीच्या आसक्तीने चितारलेल्या आहेत. ऍनिमेटर्स कदाचित पाट्या टाकू शकले असते की, कोण एवढं पाहातंय! पण तसा आळशी विचार न करता त्यांनी कुणी पाहो न पाहो तरीही सर्वोत्कृष्ट काम केलेय, म्हणूनच चित्रपटाचा एकूण दर्जा लाखो पटींनी उंचावलाय. किंवा चित्रपटात जिथे कुठे चकचकीत पृष्ठभाग आहेत ते प्रसंग पाहा की, किती कौशल्याने प्रतिबिंबं उमटली आहेत, जणू काही लाईव्ह-ऍक्शन चित्रपटच असावा. या उलट आपल्याकडे ऍनिमेशनला अद्यापही लहान मुलांसाठीची गोष्ट मानले जाते व तसेच वागवले केले जाते. त्यामुळेच कदाचित, पण भारतीय ऍनिमेटर्सच्या नावाचा डंका अवघ्या जगात वाजत असूनही भारतात नाव घेण्याजोगा एकही ऍनिमेटेड चित्रपट अद्याप बनलेला नाही!

चित्रपटात जन्माच्या अल्याडची पात्रे, जन्माच्या पल्याडची पात्रे, पृथ्वीवरील पात्रे, २२ सारखी जन्माचा अनुभव घेऊनही अद्याप जन्मालाच न आलेली पात्रे या प्रत्येक प्रकारच्या पात्रांची स्वतंत्र ऍनिमेटेड शैली चितारली आहे. त्या मागे कित्येक वर्षांचा विचार आहे हे जाणवतं. ही पात्रे बोलताना सहजच तत्त्वज्ञान सांगून जातात आणि तरीही मागच्याच आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ‘वंडर वुमन १९८४’सारखे ते रटाळ आणि कृत्रिम वाटत नाही. या सहजसुंदर प्रसंगांना तितकीच उत्कृष्ट जोड मिळालीये ती पार्श्वसंगीताची. जॉन बॅटिस्टने केलेले जॅझी वाद्यसंयोजन नुसते सुंदरच नव्हे तर खरोखरीच संग्राह्य झाले आहे. पडद्यावर वेगवेगळी पात्रे वाद्ये वाजवतात तेव्हा नीट लक्ष देऊन पाहा, त्या त्या वाद्याचा तो स्वर किंवा ताल प्रत्यक्षात वाजवला जाईल अगदी तशीच ती ऍनिमेटेड पात्रे हालचाल करतात. केवढे सूक्ष्म काम केलेय पाहा. नाहीतर आपल्याकडे लाईव्ह-ऍक्शन चित्रपटांतही अभिनेते नुसतेच ती वाद्ये खाजवल्याचे नाटक करत असतात. इलेक्ट्रिक गिटारचे प्लग न जोडताच ती वाजलेली दाखवणे वगैरे आचरटपणा तर आपल्याकडे सर्रास चालतो. ट्रेण्ट रॅझ्नर आणि ऍटिकस रॉस यांनी केलेले इतर पार्श्वसंगीतही चांगलेच जमलेय.

पहिल्या परिच्छेदात दिलेला स्फुल्लिंगाचा दृष्टांत हा ‘सोल’मधील एक अत्यंत महत्त्वाचा प्लॉट-पॉईंट आहे. आणि तो चित्रपटात अतिशय तरलपणे, कुठेही कथेची वीण उसवू न देता मांडलाय. इतका अल्लादपणे की चित्रपटाचा शेवट काहीसा क्लिषेड् असूनही आपण त्याला सहजच स्वीकारून टाकतो. पण हा सगळा सजावटीचा भाग झाला. छानशा वस्त्रांचा भाग झाला. वस्त्रांना महत्त्व तेव्हाच येते जेव्हा ते ल्यालेली व्यक्ती श्रेष्ठ असते. गीतेत भगवंत सांगतात की, देह हा आत्म्याची केवळ वस्त्रे असतो, देह महत्त्वाचा नाही तर आतील देही महत्त्वाचा. देही ही प्रत्यक्षात सोल या पाश्चात्य संकल्पनेपेक्षा खूपच सूक्ष्म संकल्पना आहे. पण तिकडेही बॉडीपेक्षा सोल महत्त्वाचा मानतात. ‘सोल’चे वैशिष्ट्य हेच की वर उल्लेखिलेल्या सगळ्या तांत्रिक गोष्टींपेक्षा – अर्थातच वस्त्रांपेक्षा – चित्रपटाचा सोल अधिक सोलफुल आहे, जॅझच्या एखाद्या अत्युत्कृष्ट तुकड्यासारखाच!

*४.५/५

— © विक्रम श्रीराम एडके.
[लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *