अर्जुनाचे काऊन्सिलिंग

पांडवांच्या शक्तीचा अत्यंत मोठा भाग असलेला अर्जुन ऐन युद्ध सुरू होण्याच्या काही तास आधी ‘सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति’ म्हणत हातपाय गाळून बसलाय. हे समोर उभे असलेले माझे भाऊ आहेत, आजोबा आहेत, काका आहेत, सासरे आहेत, नातू आहेत, गुरू आहेत, या स्वजनांशी मी कसा काय लढू असं म्हणत निवृत्तीची भाषा करतोय. श्रीकृष्णाचं देवत्व ज्या अनेक गोष्टींमध्ये सामावलंय, त्यांच्यापैकी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे परिस्थितीचं सर्वंकष आकलन करून चटकन निर्णय घेणे. कृष्णाकडे दोनच उपाय होते, एक तर या ‘अर्जुनविषादयोगा’पुढे मान तुकवायची नाहीतर त्याला त्या अवसादातून बाहेर खेचून आणायचे! पहिला मार्ग सोपा होता, उपनिषदांच्या भाषेत प्रेयस होता पण निवडणारा साक्षात भगवंत होता म्हणूनच त्याने अवघड परंतु श्रेयस मार्ग निवडला. त्याने अर्जुनाचे ऐकून घेतले, त्याला प्रश्न विचारू दिले, त्याला पूर्णपणे रिते होऊ दिले. त्याचा एक सुद्धा प्रश्न न टाळता प्रत्येक प्रश्नाची अर्जुनाचं समाधान होईपर्यंत उत्तरं दिली. आजच्या भाषेत बोलायचं झालं तर मनमोहनाने साक्षात मानसोपचारतज्ञाच्या भूमिकेत जाऊन अर्जुनाचं काऊन्सिलिंग केलं!

हे करताना श्रीकृष्णाने वापरलेल्या क्लृप्त्या विलक्षण आहेत. त्याने सुरुवात केली ती अतिशय साध्या युक्तिवादाने, दोस्तीखात्यात श्रीकृष्ण अर्जुनाला सावध करतो, ‘क्लैब्यं मा स्म गम: पार्थ’! आणि मग हळूच कटाक्षपूर्ण शब्दांत तो अर्जुनाला त्याच्या कुतर्कातील चूक दाखवू लागतो, ‘अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे’. हे करताना तो ‘जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवो जन्मं मृतस्य च’ आणि ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ ही आद्यसत्ये सांगायलाही विसरत नाही. श्रीकृष्णाची विधानं अत्यंत स्पष्ट आहेत, ठाम आहेत. त्याच्या बोलण्यात कमालीचं कन्व्हिक्शन आहे, तो थेटपणे सांगतो, ‘हतो वा प्राप्स्यसि स्वर्ग: जित्वा वा भोक्ष्यसे महिम्’. दोन्हीही परिस्थितीत युद्ध करायचंच आहे. परिस्थितीला पर्याय आहेत, युद्धाला मात्र पर्याय नाही! कन्व्हिक्शन किंवा ठामपणाच्याच बाबतीत बोलायला गेलं तर क्रोधातून संमोह, संमोहातून स्मृतिभ्रम, स्मृतिभ्रमातून बुद्धिनाश आणि बुद्धिनाशातून संपूर्ण विनाश; हा श्रीकृष्णाचा कोटिक्रम त्रिकालाबाधित आहे.

हा ‘सांख्ययोग’ सांगूनही अर्जुन ऐकत नाही म्हटल्यावर भगवान त्याला दुसरा पैलू ‘कर्मयोग’ सांगतात. अतिशय रोखठोक तत्त्वज्ञान की बाबा, ‘नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मण:’! काय बोलणार या पुढे? श्रीकृष्णाला पक्कं ठाऊक आहे की, ‘न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसङ्गिनाम्’. तो अर्जुनाला सरळ सांगतो की, ‘स्वधर्मे निधनं श्रेय: परधर्मो भयावह:’! या अध्यायाच्या सुरुवातीलाच श्रीकृष्ण अर्जुनाला उद्देशून ‘अनघ’ म्हणजे निष्पाप किंवा ‘भोळ्या’ असे संबोधन वापरतो आणि मग त्याला योग्य काय ते सांगतो.

पण तरीही अर्जुनाच्या शंका फिटत नाहीत. मग भगवान परत नवीन पैलू सांगतात, ‘ज्ञानकर्मसन्यासयोग’! साक्षात विवस्वानाला सांगितलेल्या या योगाचे गुह्य भगवंत उलगडून सांगू लागतो की, ‘बहुनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन:, तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप’! इथेच भगवान वचन देतात, ‘अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं’! कशासाठी? ‘परित्राणाय साधूनां, विनाशाय च दुष्कृतां, धर्मसंस्थापनार्थाय’!! भगवान इथे आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक सत्य सांगतात की, ‘ये यथा मां प्रपद्यन्ते, तांस्तथैव भजाम्यहम्’! पुढे भगवान चातुर्वर्ण्याच्या उत्पत्तीचे कारण सांगतात, ‘चातुर्वर्ण्यं मया सृष्टं’. कसे? तर ‘गुणकर्मविभागश:’! भगवान सांगतात की, ‘न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते’. पण हे ज्ञान कुणाला लाभते, तर फक्त ‘श्रद्धावांल्लभते ज्ञानं’. आणि ‘संशयात्मा विनश्यति’ सांगताना भगवान म्हणतात की, संशयी माणसासाठी परलोक तर नसतोच, पण पृथ्वीही नसते आणि त्याच्या नशिबी सुख तर अजिबातच नसते!

एवढ्यानेही ऐकत नाही म्हटल्यावर भगवंत मग ‘कर्मसन्यासयोग’ सांगतात की, कर्मसन्यास आणि कर्मयोग दोन्हीही कल्याणकारीच आहेत. पण दोन्हींमध्ये तुलनाच करायची झाली तर कर्मांपासून सन्यास घेण्याऐवजी कर्मयोग अधिक श्रेष्ठ आहे. हे सांगताना भगवान नेमका युक्तिवाद करतात की, ‘सन्यासस्तु महाबाहो दु:खमाप्तुमयोगत:’! हे तत्त्व ज्याला समजले तो ‘नैवं किञ्चित्करोमीति युक्तो मन्येत’.

तरीही नाहीच ऐकत म्हटल्यावर मग भगवान ‘आत्मसंयमयोग’ सांगू लागतात. यात भगवान ढोंगी आणि दांभिक मंडळींचा बुरखा टर्रकन फाडताना म्हणतात की, केवळ अग्निचा त्याग करणारा सन्यासी नसतो आणि नुसताच निष्क्रिय राहाणारा योगी नसतो, तर ‘अनाश्रित: कर्मफलं कार्यं कर्म करोति य: सन्यासी च योगी च’! इथे भ्रमाचा भोपळा फोडल्यावर मग भगवान संगतवार योग कसा करायचा हे समजावून सांगतात. एकदा योग जमला की, ज्याप्रमाणे वारा नसलेल्या ठिकाणी दिव्याची ज्योत अचल राहाते, त्याच प्रमाणे त्या व्यक्तीचे चित्तदेखील अचल राहाते! तो सगळ्यांना आणि सगळ्यालाच समभावाने पाहू लागतो. हा योग ज्याला जमला तो, ‘यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं तत:’. पण त्याचवेळी भगवान हे देखील सांगतात की, ‘असंयतात्मना योगो दुष्प्रापो इति मे मति:’.

तरीही ऐकत नाही म्हटल्यावर मग श्रीकृष्ण ‘ज्ञानविज्ञानयोग’ सांगताना आता स्वतःचं खरं रूप हळूहळू उघड करू लागतो. तो म्हणतो की सहस्रांमध्ये कुणीतरी एक मला मिळवण्यासाठी प्रयत्न करणारा असतो आणि त्यातही कुणीतरी एकच मला पूर्णपणे जाणतो. मी काय आहे? पृथ्वी, जल, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या सगळ्यांनी मिळून माझी जड प्रकृति आहे आणि या सगळ्यांना धारण करणारीही माझीच चेतन प्रकृति आहे! ‘अहं कृत्स्नस्य जगत: प्रभवः प्रलयस्तथा’! आणि मग भगवंत या संपूर्ण प्रकृतिची बारीकसारीक अंगे समजावताना मी कशात काय आहे ते सांगू लागतो. एक प्रकारचे तात्त्विक विश्वरूपदर्शनच!

तरीही अर्जुन ऐकत नाही म्हटल्यावर मग भगवान ‘अक्षरब्रह्मयोग’ सांगू लागतात. लक्षात घ्या, अर्जुन निश्चितच शंकेखोर आहे. पण त्याच्या शंकादेखील अभ्यासातून आलेल्या आहेत. त्याचा मार्ग चुकलाय म्हणून तो हरवलाय फक्त. मुळात तो हुशार नसता तर श्रीकृष्णाने त्याला मित्र मानलेच नसते. म्हणूनच त्याच्या शंकादेखील हळूहळू प्रगल्भ होत चालल्यायत, उदाहरणार्थ, ‘अधियज्ञं कथं कोऽत्र देहेऽस्मिन्मधुसूदन’. म्हणूनच भगवानही त्यांची शिकवणूक अधिकाधिक खोल करू लागलेयत की – अक्षर ब्रह्म आहे. जीवांच्या परमस्वभावालाच अध्यात्म म्हणतात. जीवांची ज्यातून उत्पत्ती होते त्याला कर्म म्हणतात. देहाच्या क्षरभावाला अधिभूत म्हणतात. देहातील पुरुष अर्थात आत्म्याला अधिदैव म्हणतात. परंतु देहातील अधियज्ञ मात्र मी आहे, मीच देह धारण करणाऱ्यांमधील सर्वश्रेष्ठ आहे! मनुष्य अखेरीस ज्याचं स्मरण करत-करत देहत्याग करतो, तो त्याच भावाने भावित राहातो. यासाठी तू सदोदित माझं स्मरण करता-करताच युद्ध कर म्हणजे तुला माझीच प्राप्ती होईल.

एवढ्यानेही अर्जुन ऐकत नाही म्हटल्यावर मग भगवान ‘राजविद्याराजगुह्ययोग’ सांगू लागतात, ‘मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थितः’! जसा वायू सर्वत्र विचरण करत असूनही आकाशातच राहातो, त्याचप्रमाणे सारी भूतमात्रे माझ्यातच वास करतात, कल्पांती माझ्यातच लीन होतात आणि कल्पारंभी मीच त्यांची रचना करतो. श्रीकृष्ण म्हणतो, ‘मयाध्यक्षेण प्रकृति: सूयते सचराचरम्’. इथे तो कदाचित ‘नासदीय सूक्ता’चा संदर्भ देत असावा. या यज्ञाचा क्रतु तर मी आहेच, पण यज्ञदेखील मीच आहे. मीच त्यातील स्वधा आहे, मीच औषध आहे, मीच मंत्र आहे, मीच घृत आहे, मीच अग्नी आहे आणि एवढेच कशाला तर हवनदेखील मीच आहे! या जगताचा धाता, माता, पिता आणि पितामहदेखील मीच आहे. मीच वेद आहे आणि वेद्यही मीच आहे. जे माझे अनन्यभावाने चिंतन करत उपासना करतात, त्यांचे ‘योगक्षेमं वहाम्यहम्’!

एवढ्यानेही ऐकत नाही म्हटल्यावर भगवान अर्जुनाला ‘विभुतियोग’ सांगू लागतात की, देव आणि महर्षीदेखील माझ्या उत्पत्तीला पूर्णपणे जाणत नाहीत कारण, ‘अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वश:’! बुद्धी, ज्ञान, असंमोह, क्षमा, सत्य, दम, शम, सुख, दु:ख, उत्पत्ती, प्रलय, भय, अभय, अहिंसा, समता, तुष्टी, तप, दान, यश, अपयश, भूतमात्रांचे विविध भाव सारे काही माझ्यामुळेच होते. सप्तर्षी, त्यांच्याही पूर्वीचे सनकादी चार ऋषी, चौदा मनू हे सगळे माझ्याच संकल्पातून उत्पन्न झाले आहेत. वाचणाऱ्याला हे कदाचित आत्मप्रौढीचे वाटेल, पण इथे हे लक्षात घेतले पाहिजे की श्रीकृष्ण इथे व्यक्तिगत अहंभावातून बोलत नसून आध्यात्मिक व यौगिक अर्थाने परमेश्वरभावातून बोलतोय. अर्जुन म्हणतो, ‘सर्वमेतदृतं मन्ये यन्मां वदसि केशव’, पण तरीही तो भगवंताच्या विभूती विस्तारपूर्वक सांगण्याची विनंती करतो. आता अर्जुन विषादापासून दूर गेलाय हे ओळखून श्रीकृष्णही त्याच्या कलाने घेत ‘अहमात्मा गुडाकेश:’ पासून सुरुवात करतो व एकवीस श्लोकांमध्ये स्वतःच्या विभूती अत्यंत संक्षेपाने सांगतो.

तरीही अर्जुनाच्या सगळ्या शंका फिटत नाहीच. मग मात्र ‘विश्वरूपदर्शनयोगा’च्या निमित्ताने आपल्या समग्र रूपाचे दर्शन देतो. ते पाहाताच अर्जून दीपून जातो. त्या रूपात भगवंत सांगतात की, ज्यांना मारायला तू नकार देतोयस त्यांना मी केव्हाच मारलंय, तू फक्त आता निमित्त बन! अर्जुन आता मात्र थरथर कापू लागतो. ज्याला आपण मित्र म्हणून वागणूक दिली तो प्रत्यक्षात काय आहे हे समजल्यावर त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. भगवंताच्या विश्वरूपाची स्तुती करत तो म्हणतो, ‘नमो नमस्तेऽस्तु सहस्रकृत्वः पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते’! भिती वाटू लागल्यामुळे तो श्रीकृष्णाला पुन्हा एकवार सौम्यरूपात येण्यासाठी विनवतो आणि श्रीकृष्णही परत एकदा नेहमीसारखाच होऊन जातो.

पण म्हणून अर्जुनाच्या शंका संपतात थोडीच! त्यामुळेच आता मग भगवंत त्याला ‘भक्तियोग’ सांगू लागतात की, तू तुझी बुद्धी आणि मन दोन्हीही माझ्यातच निवेश कर, जे कुणी असे करतात ‘तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात्’! जर तुला असा निवेश नाही जमला, तर तू माझा अभ्यास कर. जर तुला हा अभ्यासयोगदेखील नाही जमला, तर केवळ मत्परायणच होऊन कर्म कर. जर ते ही नाही जमले, तर मी सांगितलेल्या योगाचा आश्रय घे. पण लक्षात ठेव की अभ्यास श्रेष्ठ आहे, पण त्याहून श्रेष्ठ ज्ञान आहे, त्याहून श्रेष्ठ ध्यान आहे, पण त्याहून श्रेष्ठ कर्मफलत्याग आहे!

एवढ्यानेही समाधान होत नाही म्हटल्यावर भगवंत आता ‘क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग’ सांगू लागतात की, हे शरीर म्हणजे क्षेत्र अर्थात शेत आहे व याला जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात तो ‘क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत’! पुढे श्रीकृष्ण क्षेत्राचे स्वरूप आणि विकार, दोन्ही खुलासेवार सांगतो. आणि मग पुन्हा एकवार ‘नासदीय सूक्ता’चा संदर्भ देत श्रीकृष्ण ब्रह्माचे स्वरूप समजावून सांगतो की, ‘अनादिमत्परं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते’.

पण तरीही अर्जुन काही ऐकत नाही. तेव्हा भगवंत ‘गुणत्रयविभागयोग’ सांगताना म्हणतात की, देहीला देहामध्ये सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण बांधून ठेवतात. यातील सत्त्वगुण अनामय आहे. तो ‘सुखसङ्गेन बध्नाति ज्ञानसङ्गेन चानघ’. दुसरा रजोगुण रागात्मक आहे. तो ‘तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसङ्गेन देहिनम्’. आणि तिसरा आहे तो अज्ञानातून उत्पन्न होणारा तमोगुण. तो प्रमाद, आळस आणि निद्रेच्या रूपाने देहीला बांधून ठेवतो. सत्त्वगुण सुखाशी जोडतो, रजोगुण कर्माशी जोडतो आणि तमोगुण ज्ञानाला झाकून प्रमादाशी जोडतो. हे तिन्ही गुण एकमेकांवर कुरघोडी करत असतात. विवेक उत्पन्न झाल्यास सत्त्वगुण वाढतो. रजोगुण वाढल्यास लोभ, प्रवृत्ती, सकाम कर्मारंभ, अशांती आणि स्पृहा निर्माण होतात. तमोगुण वाढल्यास अप्रकाश, अप्रवृत्ती, प्रमाद आणि मोह निर्माण होतात. या तिन्ही गुणांची आपापली फळे आहेत. पण जर परमानंदाची प्राप्ती करायची तर या तिघांनाही ओलांडणे गरजेचे असते.

तरीही अर्जुनाच्या शंका शेष राहातात तेव्हा भगवंत त्याला ‘पुरुषोत्तमयोग’ सांगतात. यात भगवंत अश्वत्थवृक्षाचा दृष्टांत देतात की, ‘ऊर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम्’. अशा या उलट्या पिंपळाच्या झाडाचे भगवंत सांगोपांग वर्णन करतात. पण हा वृक्ष म्हणजे अंतिम सत्य नव्हे. असंगाच्या शस्त्राने त्या वृक्षाला कापून ‘यस्मिन्गता न निवर्तन्ति भूयः’ अशा परमपदाचा शोध घेण्याबाबत श्रीकृष्ण सुचवतो आणि खात्री देतो की, ‘तद्धाम परमं मम’!

एवढ्यानेही समाधान होत नाही म्हटल्यावर मग श्रीकृष्ण पुढे ‘दैवासुरसम्पद्विभागयोग’ सांगू लागतो. अभय, सत्त्वसंशुद्धी, ज्ञानयोगामध्ये दृढस्थिती, दान, दम, यज्ञ, स्वाध्याय, तप, आर्जव, अहिंसा, सत्य, अक्रोध, त्याग, शांती, अपैशुनता, दया, अलोलुपता, मार्दव, लज्जा, अचंचलता, तेज, क्षमा, धैर्य, शौच, अद्रोह, अतिमानितेचा अभाव ही सारी दैवी संपदेने युक्त पुरुषाची लक्षणे आहेत. दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, कठोर वाणी व अज्ञान ही आसुरी संपत्तीने युक्त पुरुषाची लक्षणे आहेत. हे सगळं सांगून झाल्यावर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो की, ‘मा शुचः सम्पदं दैवीमभिजातोऽसि पाण्डव’! काम, क्रोध आणि लोभ हे नरकाचे तीन दरवाजे आहेत, या तिन्हींचाही त्याग केला पाहिजे. जो या तिन्हींचा त्याग करतो, त्यालाच परमगति लाभते.

अर्जुन विचारतो की, जे शास्त्रविधींचा त्याग करून केवळ श्रद्धापूर्वक यजन करतात, त्यांची निष्ठा सात्त्विक असते, की राजस, की तामस? भगवंत यावर उत्तर म्हणून ‘श्रद्धात्रयविभागयोग’ सांगतात की श्रद्धादेखील गुणांनुसार तीन प्रकारची असते. आणि श्रद्धाच कशाला, भगवंत सांगतात की भोजन, यज्ञ, तप आणि दान सुद्धा गुणांनुसार तीन-तीन प्रकारचे असते. भगवंत या सगळ्याचं ससंदर्भ आणि सविस्तर स्पष्टिकरण करतात.

पुढे भगवंत ‘मोक्षसन्यासयोगा’चे निरुपण करतात. श्रीकृष्ण सांगतो की, ज्ञान, ज्ञेय आणि परिज्ञाता या तीन कर्माच्या प्रेरणा आहेत; तर करण, कर्म आणि कर्ता हे कर्माचे तीन प्रकारचे संग्रह आहेत. ज्ञान, कर्म आणि कर्ता या प्रत्येकाचेदेखील सात्त्विक, राजस आणि तामसी असे तीन-तीन प्रकार पडतात. त्याचप्रमाणे बुद्धी आणि धृती यांचेही तीन-तीन प्रकार पडतात. सुखांचेही तीन प्रकार पडतात. थोडक्यात पृथ्वीवर, अथवा स्वर्गातील देवतांमध्येही असे काहीच नाही जे या त्रिगुणांपासून मुक्त असेल. आगीतून जसा धूर येतो त्याप्रमाणेच कर्म म्हटले की दोष आलेच. पण म्हणून काही कर्म करणे सोडून द्यायचे नसते, तर केवळ आसक्ती आणि स्पृहा यांचा त्याग करायचा असतो. मी युद्ध नाही करणार, असं जे तुला वाटतं, तो तुझा अहंकार आहे. तुझा तो निश्चय मिथ्याच आहे कारण, तो तुझा स्वभाव आणि प्रकृती दोन्हींच्याही विपरित आहे.

श्रीकृष्ण अशाप्रकारे अर्जुनाची समग्र काऊन्सिलिंग करून झाल्यावर पुढे म्हणतो की, मी तुला गोपनीयतेहूनही गोपनीय असे हे ज्ञान सांगितले, आता या उप्पर जे तुला वाटते ते तू कर – ‘यथेच्छसि तथा कुरु’! पण तू मला प्रिय असल्याने मी तुला खात्रीपूर्वक सांगतो की, ‘सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः’! आता एवढी सगळी गीता सांगून वर ठाम खात्री दिल्यावर अर्जुनाच्या मनात काय शंका राहिल? तो सुद्धा स्पष्टपणे सांगतो की, ‘नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत, स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव’! हा अद्भुत संवाद ऐकणाऱ्या संजयाच्याही अंगावर रोमांच उभे राहातात व तो सहजच बोलून जातो की, ‘यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः, तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम’! अर्थातच धृतराष्ट्राला काही ते पटणारे नसतेच. हिज लॉस! कुरुक्षेत्रावर हा एक छोटासा तरीही अत्यावश्यक असा स्पीडब्रेकर जरी आलेला असला, तरीही आता युद्धाचा गाडा सुसाट सुटणार असतो. महाभयंकर महातांडवकारी असे महाभारत होणार असते. परंतु अर्जुन आता पूर्णपणे झोकून देऊन युद्धाला उभा राहातो. त्याला कशाचीच पर्वा नसते कारण, त्याचे काऊन्सिलिंग साक्षात भगवंताने केलेले असते!!

— © विक्रम श्रीराम एडके
[अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]
टीप: कुणीही लेखक हा लिहिताना आपले तन, मन, वेळ, अभ्यास सारे काही अर्पून लिहित असतो, तेव्हा कृपया लेखकाचे नाव काढून निनावी अथवा स्वतःच्या नावाने शेअर/पोस्ट करून आपल्या मातापित्यांनी केलेले कुसंस्कार दाखवू नयेत!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *