परिपूर्ण दर्जाचे लेणे – लाईन ऑफ ड्युटी

आपल्याकडे म्हण आहे की, एक सडका आंबा अवघी पेटी नासवून टाकतो. पण सध्याचं वास्तव त्याच्या अगदी उलट झालंय. सगळ्या पेट्याच नासक्या आंब्यांनी भरलेल्या आहेत. त्यात एखादाच आंबा चांगला असेल आणि दैवयोगाने त्याच्यावरच जर सडके आंबे वेचून फेकायची जबाबदारी आली तर? वरवर पाहाता हे काम अतिशय धाडसी, साहसी, शूर वगैरे गुणांनी संपन्न अशा रुबाबदार नायकाचं अथवा नायकांचं वाटतं. पण लक्षात घ्या, आपण बोलतोय ते वास्तवाबद्दल. वास्तवात जर सडक्या आंब्यांचीच बहुसंख्या असेल तर त्या चांगल्या आंब्याला त्यांना वेचून काढणे तर दूरच, पण निव्वळ जगणेदेखील अवघड होऊन बसणार हे सांगायला काही कुणा ज्योतिष्याची आवश्यकता नाही. पाण्यात राहून मगरीशी वैर करणाऱ्या माश्याला प्रत्यक्षात केवळ मगरीपासूनच नव्हे तर स्वजातीय माशांपासूनही तितकाच धोका असतो की, न जाणो मगर याच्या नादाने आपल्यावरच उलटली तर काय? व्हिसलब्लोअर्स हे नाटक, सिनेमे आणि कथा, कादंबऱ्यांमध्येच नायक असतात. प्रत्यक्ष जगात त्यांच्यापैकी कित्येकांना लपत-छपतच जगावं लागतं. तुम्ही म्हणाल मासे काय, आंबे काय, मी काय खाण्यापिण्याच्या गोष्टींवर बोलतोय की काय! नाही, मी बोलतोय ते ब्रिटनच्या ‘बीबीसी’ची जगप्रसिद्ध मालिका, ‘लाईन ऑफ ड्युटी’बद्दल!

पोलिसांचं काम असतं, अपराध्यांवर वचक ठेवणं. पण पोलिसच गुन्हेगार झाले तर त्यांच्यावर वचक कोण ठेवणार? इथे येते ब्रिटिश पोलिस खात्यातील भ्रष्टाचारविरोधी शाखा, अर्थातच काल्पनिक ‘एसी १२’. या शाखेचा महाधिक्षक असलेल्या टेड हेस्टिंग्सचं (एड्रियन डनबार) एकच सूत्र आहे जे त्याच्या एका संवादातून वारंवार येतं, ‘I’m interested in bent Coppers and bent Coppers only’ . बेण्ट कॉपर्स अर्थात भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्यांच्या पलिकडे तो कसलाच विचार करत नाही. आणि एकदा का त्याला तसा वास आला तर तो कुणाच्या बापाच्यानेही थांबत नाही. या कामात त्याला मदत करतात त्याचे दोन निष्ठावंत सैनिक, स्टीव्ह अर्नॉट (मार्टिन कॉम्प्स्टन) आणि केट फ्लेमिंग (विकी मॅक्क्ल्यूर). एकेका पर्वात एकेका भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्याचा पर्दाफाश करतानाच ते व पर्यायाने मालिका ही कुठेच भाषणबाज न होता देखील सबंध व्यवस्थेवर बोचरं भाष्य करून जाते.

या शेवटच्या मुद्यावर ‘लाईन ऑफ ड्युटी’ची तुलना ही ॲमेझॉनच्या ‘बॉश’शी (२०१४-२१) करता येईल. त्यातदेखील व्यवस्थेवर याच दर्जाचं भाष्य केलंय. यातदेखील ‘बॉश’सारखेच कसलाही धरबंद नसलेले अपराधी आणि नियमांच्या बेड्यांनी बांधलेले पोलिस आहेत. पण एका महत्त्वाच्या बाबतीत मात्र ‘लाईन ऑफ ड्युटी’ ‘बॉश’पेक्षा वेगळा मार्ग निवडते. हा या मालिकेचाच नव्हे तर ‘स्पूक्स’सारख्या (२००२-११) काही ओव्हर-द-टॉप मालिका वगळता बहुतांशी ब्रिटिश मालिकांचा स्थायीभाव आहे, तो म्हणजे नाट्यमयतेतील संयतपणा! प्रत्यक्षात दाखवताना ते एखादंच साहसदृश्य दाखवतील अथवा दाखवणारही नाहीत, पण आतमध्ये मात्र नाट्यमयतेचा कल्लोळ सुरू असतो व तो सूचकपणे त्यांच्या संहितांमधून बरसत असतो. कंटेंटच्या तात्पुरत्या मुसळधार पावसापेक्षा अशी दमदार रिमझिम मला भारी आवडते, अंतरात्म्यापर्यंत चिंब करून सोडते पार! ‘लाईन ऑफ ड्युटी’मध्येदेखील पहिल्या पर्वाच्या शेवटी जसा कथेत एक गूढ धक्का बसतो, तसा मालिकेच्या पटाचा अंदाज येऊ लागतो. तो पट इतका भव्य आहे की, आपले नायक त्याच्यापुढे खुजे वाटू लागतात. सामना अवचितच मानवी राम आणि महाकाय रावणाच्या सामन्यासारखा असंतुलित वाटू लागतो. त्रेतायुगात या युद्धाचा निकाल काय लागला होता, आपल्याला ठाऊकच आहे, पण कलियुगात कशाची खात्री देता येते का?

आपल्याकडे अशा विषयावर मालिका बनवताना एक तर व्यवस्थेची खूपच वरवर चाचपणी तरी केली जाते किंवा मग वोक कलाकारांचा अराजकवादी प्रपोगण्डा राबवून समस्त व्यवस्थेलाच खलनायक ठरवलं जातं. ‘लाईन ऑफ ड्युटी’ दोन्हीही प्रकारचा वेडगळपणा करत नाही. ते राजकारण, हितसंबंध वगैरे कशा कशाचीच पर्वा न करता थेट एखाद्या तीक्ष्ण दाभणीसारखे आतपर्यंत घुसत जातात, त्यातून निघणाऱ्या रक्त, पू यांच्याकडे लक्ष न देता मालिकेतील पात्रांचं शल्यकर्म सुरूच असतं. आणि अर्थातच ते नायक आहेत म्हणून त्यांना प्लॉट-आर्मर असण्यापेक्षा ते सगळेच आपापल्या कृतींचे परिणामही अतिशय कठोरपणे भोगतात. दुसरे म्हणजे ही मालिका कुठेच व्यवस्थेला खलनायक ठरवत नाही. उलट त्यातील सुष्ट पात्रांचा ते ज्या व्यवस्थेला सुधारू पाहातायत त्या व्यवस्थेच्या मूळ शिवस्वरूपावर अतोनात विश्वासच आहे. किंबहूना त्यांचा तसा विश्वास आहे, म्हणूनच ते सातत्याने हा द्राविडी प्राणायाम सहस्रावधी संकटांनंतरही करतच राहातात. या बाबतीत ही मालिका ‘बॉश’पेक्षा वरचढ आहे. कारण, हॅरी बॉशला निदान एका मर्यादेपलिकडे ढकलल्यावर थेट बॅटमॅन बनायचं सुख तरी आहे. पण ‘लाईन ऑफ ड्युटी’मधील एकही सुष्ट पात्र तसं करणं तर सोडाच, पण व्यवस्थेच्या विरोधात जाऊन व्हिजिलंट जस्टिस लादण्याचं मनातही आणत नाहीत. ते त्या व्यवस्थेच्या जाचक बंधनांत राहूनच आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत राहातात कारण, जर व्यवस्था सुधारण्यासाठी ती तोडण्याची गरज पडत असेल तर त्याच व्यवस्थेने त्यांच्यासारखे चांगले अधिकारीदेखील घडवले आहेत या सत्याशी आपोआपच प्रतारणा ठरेल. या दाहक परंतु सत्य अशा विरोधाभासामुळेच त्यांची हतबलता जास्त बोचत राहाते पाहाणाऱ्याला.

‘लाईन ऑफ ड्युटी’चं सगळ्यांत उत्कृष्ट वैशिष्ट्य म्हणजे तिच्यात संशयाची सुई कुणाकडेही, अगदी कुणाकडेही फिरू शकते. हा तसा म्हटलं तर घासून-घासून गुळगुळीत झालेला प्रकार आहे. पण ही मालिका त्याच क्लिषेला वास्तववादी पुराव्यांचा असा काही भरभक्कम पाया देते की, प्रत्येक संशयित हा खरोखरच अपराधी वाटू लागतो. वर मी एका ठिकाणी लिहिले आहे की, केट आणि स्टिव्ह हे टेडचे निष्ठावंत आहेत, पण मालिकेच्या एकूण प्रवासात या तिघांच्याही निष्ठांचा अतिशय अनपेक्षित ठिकाणी अनेकदा कस लागतो व त्यातून कल्पनातीत कलाटण्या मिळत जातात. लेखनाच्या या सूक्ष्म कंगोऱ्यांसाठी या मालिकेची स्तुती करावी तेवढी थोडीच आहे!

दुसरं खरोखर अनुभवण्यासारखं वैशिष्ट्य म्हणजे मालिकेत दाखवलेल्या अत्यंत वास्तववादी उलटतपासण्या अर्थातच इंटरॉगेशन्स. मालिकेच्या नाट्यमयतेतील निम्मं नाट्य हे या उलटतपासण्यांमध्ये आहे. आणि तरीही मी शपथेवर सांगू शकतो की एकदाही, अगदी एकदाही नाट्यमयता आणण्यासाठी म्हणून त्यांनी या चौकश्यांमध्ये आपण बॉलिवूडच्या सिनेमांत पाहातो तशा छपरी युक्त्या वापरलेल्या नाहीत. सगळं काही कायद्याने आणि कमीत कमी कल्पनाविलास करून! त्यामुळे त्यांचा उमटणारा ठसा हा अमिट आहे. अत्युत्कृष्ट ‘लाईफ ऑन मार्स’चा (२००६-०७) अत्यंत फालतू सिक्वल ‘ॲशेस टू ॲशेस’ (२००८-१०) पाहून माझे कीली हॉजच्या अभिनयाबद्दल अतिशय वाईट मत झाले होते. पण तिला या मालिकेत पाहून मी तिच्या अभिनयाच्या अक्षरशः प्रेमात पडलोय. आणि केवळ तिच नव्हे तर लेनी जेम्स, डॅनियल मेज, थँडीवे न्यूटन, स्टिव्हन ग्रॅहम, केली मॅक्डोनाल्ड अशा वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या, वेगवेगळा बाज असणाऱ्या अभिनयसंपन्न कलाकारांनी मालिकेची मजा अनेकपटींनी वाढवली आहे. त्यातही टेड हेस्टिंग्सचे काम करणाऱ्या एड्रियन डनबारच्या वाट्याला आलेले संवाद इतके काही अप्रतिम आहेत की बासच! मालिकेत इन्क्लुझिव्हनेसच्या बळजबरीपायी जागोजागी व बरेचदा मुख्य भूमिकांमध्येही अनेक भारतीय वंशाचे कलाकारदेखील दिसतात. मी इथे जाणीवपूर्वक बळजबरीपायी असा शब्द वापरतोय, नाहीतर पटेल अशा गुजराती आडनावाच्या माणसाचं नाव गुरजित असं पंजाबी कोण ठेवतं बरं!

मालिकेत सूचकता आहे, नग्नता नाही. शिव्या आहेत पण त्यांचा मुक्तहस्ते वापर नाही. आपल्याकडच्या ज्या तथाकथित ओटिटी प्लॅटफॉर्म्सना वाटतं की या दोन गोष्टींशिवाय मालिका बनूच शकत नाही, त्यांनी ही मालिका पाहू नये, अन्यथा जन्माचा धक्का बसण्याची शक्यता आहे. पण या दोन गोष्टींव्यतिरिक्तही हल्ली जी इन्क्लुझिव्हनेसची जबरदस्ती केली जाते, तिला न्याय देण्यासाठी मालिकेने केलेली कसरत वाखाणण्याजोगी आहे. स्त्रिया सगळ्या चांगल्याच दाखवल्या पाहिजेत, विशिष्ट रंगाचे लोक गुन्हेगार नाही दाखवले पाहिजेत, विशिष्ट पंथाचे लोक आतंकवादी नाही दाखवले पाहिजेत वगैरे तथाकथित पोस्ट-ट्रूथ पॉलिटिकल करेक्टनेसच्या अट्टाहासाचा या मालिकेत दुसरी बाजूसुद्धा दाखवून शिताफीने समाचार घेतलाय. एका सीझनमध्ये तर एका लहान मुलाला जाणीवपूर्वक अकल्पनीय घाणेरड्या गोष्टी करताना दाखवलंय. आणि ही गोष्ट उगाचच घुसडलेली नाही, तर तिला मालिकेच्या विश्वात अतिशय पक्का आधारसुद्धा दिलाय.

ही ब्रिटिश मालिका असल्यामुळे आपल्याकडील मालिकांसारखे तिचे भरमसाठ एपिसोड्स नाहीत. सहा सीझन्स मिळून एकूण छत्तीसच एपिसोड्स आहेत. पण एक एक एपिसोड खराखुरा हिरा आहे हिरा! मालिकेची आत्तापर्यंत नऊ वर्षांत फक्त सहाच पर्वे झाली. सातवे पर्व यायला कथेत जागा आहे, पण ते येईलच असे नाही. आले तरी ते २०२३ च्या आधी खचितच येणार नाही. पण हाती असलेली सहा पर्वे देखील परिपूर्ण आहेत. एका वाक्यात सांगतो, काहीतरी परिपूर्ण आणि तरीही दर्जात्मकदृष्ट्या सर्वश्रेष्ठ पाहू इच्छित असाल तर, डोळे झाकून ‘बॉडीगार्ड’वाल्या (२०१८) जेड मर्क्युरिओच्याच तैलबुद्धीतून साकारलेली ‘लाईन ऑफ ड्युटी’ निवडा व अर्थातच डोळे उघडे ठेवून पाहा!

*५/५

— © विक्रम श्रीराम एडके
[लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *