सोल्गॅझम देणारे जॅझ – बॉश

‘बॉश’च्या अखेरच्या पर्वात एक पात्र बॉशचा उल्लेख ‘Bosch is a living legend’ असा करते. हे वाक्य, हे लहानसंच वाक्य एखाद्या सुईसारखे माझ्या कानावाटे मेंदूत शिरले आणि सात पर्वांच्या, सात चित्रकोड्यांच्या, किमान सात हजार आठवणींचे धागे त्याने उसवायला सुरुवात केली. खरं तर नायकाचं नायकत्व अधोरेखित करणारं, त्याची स्तुती करणारं हे वाक्य. पण मला ते तसे वाटलं नाही. मला वाटला तो क्रूर विनोद, आपल्या आसपासच्या जगातील वाढतच चाललेला विरोधाभास अधोरेखित करणारा. बॉश या मालिकेत जे जे काही म्हणून करतो, ते ते सारं त्याचं एक पोलिस अधिकारी म्हणून कर्तव्यच असतं. पण साला, आपण अशा जगात राहातो ना की, हिरो होण्यासाठी हिरोगिरी करण्याची आजकाल गरजच उरलेली नाही, आपलं काम प्रामाणिकपणे करणे ही बेसिक गोष्टच हल्ली एवढी दुर्मिळ झालीये की, तिची पूर्तता करणारी कुणीही व्यक्ती आपसूकच हिरो, शब्दशः लिव्हिंग लिजण्ड वाटू लागते. मायकेल कॉनेलीच्या कादंबऱ्यांवर आधारित अमेझॉनची ‘बॉश’ ही मालिकाच व्यवस्थेवर नेमके भाष्य करणाऱ्या अशा क्रूर विनोदांनी, विरोधाभासांनी भरलेली आहे.

मी आजवर जितक्या काही मालिका पाहिल्या त्यात ‘बॉश’ सगळ्यांत वेगळी आहे. हिरोनिमस तथा हॅरी बॉश हा एलएपीडीतील हॉलिवूड डिव्हिजनचा होमिसाईड डिटेक्टिव्ह. मालिकेच्या प्रत्येक पर्वात तो एक केस सोडवतो व हा मोठा स्टोरी आर्क गाठतानाच तो काही छोट्या केसेससुद्धा सोडवतो. तुम्ही म्हणाल या परिच्छेदातील पहिलं वाक्य चुकलंय का? कारण या प्रकारच्या मालिकांचा सध्या इतका सुळसुळाट झालाय की स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मच्या गर्दीत डोळे झाकून दगड भिरकावला तरी तो सहजपणे अशाच एखाद्या मालिकेला लागेल. खरंय! ‘पोलिस प्रोसिजरल ड्रामा’ या जॉन्रामध्ये नको तितक्या मालिका बनल्या आहेत. पण तरीही मी छातीठोकपणे सांगतो की, ‘बॉश’ या सगळ्यांपेक्षा वेगळी आहे. आणि त्याचं कारण आहे, या मालिकेतील अतोनात वास्तववाद! म्हणजे नेमकं काय? तर एक पोलिस डिटेक्टिव्ह असतो, त्याच्यासमोर एखाद्या गुन्ह्याचा तपास लावायचे काम येते, तो ते काम आपल्या अक्कलहुशारीने करतो व अपराध्याला त्याच्या योग्य शिक्षेपर्यंत पोहोचवतो. हा झाला साध्यासरळ पोलिस प्रोसिजरल ड्राम्याचा फॉर्म. ‘बॉश’मध्ये हे सगळे गुण असूनही ती या पैकी कोणत्याही मार्गाने क्वचितच जाते. किंबहूना जातच नाही म्हटलं तरीही चालेल. उलटपक्षी बरेचदा बॉशसमोर येणाऱ्या केसेस हळूहळू मागची सीट पकडतात. ‘बॉश’ ही त्या अर्थाने डिटेक्टिव्ह मालिका नाहीच. तिचा मूळ उद्देश आहे व्यवस्थेवर दिलखुलास भाष्य करणं!

आपल्याला वाटतं की गुन्हा घडतो आणि पोलिस त्याचा छडा लावतात. पण ही प्रक्रियेची अक्षरशः दोन टोकं आहेत. या दोन टोकांच्या मध्ये जो पेपरवर्कचा डोंगर असतो, कल्पनेपलिकडचं हीनतम अंतर्गत राजकारण असतं, अत्यंत घाणेरड्या मनोवृत्तींचा गुंता असतो आणि छडा लावल्यानंतरही शिक्षेची कसलीच शाश्वती नसते. बहुतांशी पोलिस प्रोसिजरल ड्रामाज हे प्रोसिजरच्या या भल्यामोठ्ठ्या तुकड्याला एक तर हातच लावत नाहीत. किंवा तो अक्षरशः तोंडी लावण्याइतपतच सूचकपणे येतो. का? कारण सोपं आहे! यांच्यापैकी एकही प्रकार प्रेक्षकवर्गासाठी ग्लॅमरस नाही. उलट लिहायला, मांडायला आणि दाखवायला कमालीचा अवघडच आहे. ‘बॉश’ मी सगळ्यांत वेगळी म्हणतो ते यासाठीच की तिचा सगळा खेळ हा या नॉन-ग्लॅमरस प्रक्रियेत चालतो व गुन्हा घडणे आणि गुन्ह्याचा छडा लागणे या गोष्टी नैसर्गिकरित्या दुय्यम ठरत जातात.

याच मार्गाने जाणारी एक कमाल ब्रिटिश मालिका आहे, ‘लाईन ऑफ ड्युटी’ (२०१२-). पण ती बॉशसारखी एकनायकानुवर्ती नाही व तिचा विषयदेखील गुन्ह्यांशी संबंधित कमी व भ्रष्टाचाराशी संबंधित अधिक आहे. ‘बॉश’ची तुलनाच करायची झाली तर ती फक्त दुसरी एक ब्रिटिश मालिका ‘लुथर’शीच (२०१०-) होऊ शकते. एक तर दोन्हीही मालिका या पोलिस प्रोसिजरल आहेत. दोन्हीही मालिका या प्रोटॅगनिस्टच्या नावाने आहेत. दोन्हींचेही नायक हे समाज, डिपार्टमेंट, जग, यांनी अत्यंत नाडलेले आहेत. दोघांच्याही वैयक्तिक आयुष्यात कृष्णविवराएवढं दु:ख आहे जे त्यांना तिळातिळाने शोषून घेतंय. दोघेही सत्याचा शोध घेण्यासाठी कुणालाही बिनधास्त नडतात. किंबहूना दोघेही बॅटमॅन बनण्यापासून शब्दशः एक पाऊल मागे आहेत! पण तरीही दोन्हीही मालिकांमध्ये मूलभूत फरक आहे. लुथर हा माणूस व पोलिस अधिकारी म्हणून जितका भयानक व जबरदस्त असतो, त्याच्या एक टक्क्यानेही तो प्रत्यक्षात वागत नाही. उलट तो सतत काहीसा अपोलोजेटिकच वागत असतो. बॉश तसा अजिबात नाही. तो त्याच्या लिव्हिंग लिजण्ड असण्याला साजेसा वागण्याची धमक ठेवतो. तो अक्षरशः उद्धट वाटण्याइतपत खरं बोलतो. आणि त्यासाठी गरज पडेल तेव्हा कुणालाही फाट्यावर मारायला घाबरत नाही. तो सरळसोट भाला आहे, जो एकदा सुटला की लक्ष्यभेद करतोच करतो, मग भले लक्ष्यावर आपटून मोडलो तरी बेहत्तर! ‘बॉश’ची ओपनिंग थीम म्हणजे ‘कॉट अ घोस्ट’चं गाणं ‘आय गॉट अ फिलिंग दॅट आय काण्ट लेट गो’. बास! बॉश या एकाच तत्त्वावर काम करत असतो. मालिकेचं सार आहे त्या गाण्यात. अपराध घडलाय ही फिलिंग त्याला न्याय होईपर्यंत लेट गो करूच देत नाही. रात्रीचा दिवस करून आणि जग इकडचं तिकडे करून तो काम करतच राहातो. मी व्यक्तिश: ब्रिटिश मालिकांचा किती जरी पंखा असलो, तरीही मी प्रामाणिकपणे सांगतो, ‘बॉश’ ‘लुथर’पेक्षा शेकडो पटींनी भारी आहे!

सध्याच्या पुरोगामी व्यवस्थेमध्ये सुष्टांपेक्षा दुष्टांच्या मानवाधिकारांना जास्त किंमत दिली जाते. एखाद्या पोलिस अधिकाऱ्याने एखाद्या गुन्हेगाराला कायद्याने अटक केली तरी त्यावरून देशभर दंगली उसळून सबंध देश दिवसेंदिवस जाळला जाऊ शकतो व तो निवडणुकीतील भलामोठ्ठा मुद्दादेखील ठरू शकतो. अपराधी वाट्टेल ते करू वा बोलू शकतो, पोलिस अधिकाऱ्याने मात्र विनम्रतेचा पुतळा बनूनच वागले पाहिजे. त्याने हात बांधूनच काम केले पाहिजे. त्याने का उलट वार केला, तर त्याचं करिअर संपलंच समजा. या सगळ्यामुळे पोलिसदलात काय सुधारणा झाल्या असतील त्या असोत, पण त्याने एक झालं ते म्हणजे गुन्हेगारांसाठी अत्यावश्यक असणारा पोलिसांचा धाकच संपला. वाघाचे दात पाडल्यावर, नखे कापल्यावर त्याला कोण घाबरेल हो? आज कुणीही अपराधी हा सहजपणे लिंग, रंग, धर्म वगैरेंपैकी जे साजेल ते व्हिक्टिम कार्ड खेळून सहजच कायद्याचे गज वाकवू शकतो आणि निसटूनही जाऊ शकतो. याची अगदी खोऱ्याने उदाहरणे आपल्या आसपास रोज दिसतात. बॉशच्याही पायात व्यवस्थेच्या, आसपासच्या स्वार्थी वातावरणाच्या, कल्पनातीत राजकारणाच्या बेड्या आहेत. बॉश त्या बेड्या कधीच तोडत नाही, किंवा त्या तोडणं त्याच्या मूळच्या सैनिकी व्यक्तिमत्त्वातच नाही. पण त्या साखळीला वेळोवेळी ताणून आवाक्याबाहेरच्या आणि पगारापलिकडच्या गोष्टी करायला तो एकदाही मागे हटत नाही. त्याच्याबद्दल बोलताना एकदा त्याच्यावर फारसा खुश नसलेला एक अधिकारीदेखील बोलून जातो, Bosch goes where the truth takes him. इतके असूनही मी म्हणेन की बॉश नायक नाहीये. ज्या व्यवस्थेच्या रक्षणासाठी रात्रंदिवस झटतो, प्रत्यक्षात त्याच व्यवस्थेचा बळी आहे तो बळी!

आपल्याकडेही पोलिस आणि एकूणच व्यवस्थेबद्दल शेकडो सिनेमे आणि मालिका बनल्या आहेत, पण त्या ‘बॉश’पुढे एकजात सपाट वाटतात. कारण, किती जरी नाही म्हटले तरी त्या मनोरंजनाच्या सापळ्यात अडकून पात्रांना काळ्यापांढऱ्या रंगात रंगवू पाहातात. ‘बॉश’ ती चूक एकदाही करत नाही. ‘बॉश’मधील एक एक पात्र म्हणजे एक एक वल्ली आहे अक्षरशः! जेरी एडगर (जेमी हेक्टर), ल्यु. बिलेट्स (एमी अकिनो), क्रेट (ग्रेगरी स्कॉट कमिन्स), बॅरल (ट्रॉय इव्हान्स), चीफ अर्विंग (लान्स रेडिक), एलेनॉर विश (सेराह क्लार्क), हनी चँडलर (मिमी रॉजर्स) वगैरे प्रत्येकाच्या कपाटात त्यांचे त्यांचे व्यक्तिगत राक्षस लपलेले आहेत आणि त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यामागे शेकडो मुखवटेसुद्धा आहेत. गंमत म्हणजे मालिकेतील घटना लॉस एंजेलिसमध्ये घडत असल्या तरी एलए ही मालिकेसाठी नुसती जागा नाहीये, तर मालिकेतील महत्त्वाचे पात्र आहे ते खरोखर. मालिकेतील पात्रांना लागू पडणारे सगळे नियम एलएलाही तितकेच लागू पडतात. खरं तर मालिकेत एक मॅडी बॉश (मॅडीसन लिंट्झ) सोडल्यास कोणतेही पात्र पूर्णपणे काळे नाही वा पांढरेदेखील नाही. अगदी हॅरी बॉशसुद्धा पूर्णपणे पांढरा नाही. त्याच्यातही शेकडो त्रुटी आहेत, दोष आहेत. बॉशची अशी बहुढंगी भूमिका करणाऱ्या टायटस वेलिव्हरचे काम एकदा पाहाच. ही मालिका नायकाचे दोष दाखवताना एकदाही हात आखडता घेत नाही. किंबहूना मालिका कशातच हात आखडता घेत नाही. जे राजकीय मुद्दे बोलायला तर सोडाच चारचौघांत विचार करायलाही अडचणीचे वाटतात, त्यावर ‘बॉश’ने बिनधास्त सीझनच्या सीझन काढलेयत. त्यांचा ‘ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर’वरील सीझन तर स्क्रिनवर एखादा स्फोटक राजकीय मुद्दा किती संयतपणे व त्रयस्थपणे दाखवावा याचा वस्तुपाठ आहे अक्षरशः! त्या तुलनेत आपल्याकडील तथाकथित पुरोगामी म्हणून मिरवणारे कलाकार फक्त आणि फक्त उथळ खळखळाट तेवढा करतात, वैचारिकता औषधालाही दिसत नाही त्यांच्या कामात. अर्थात ‘बॉश’मध्येही इन्क्लुझिव्हनेसचा प्रमाणापलिकडचा अट्टाहास, एकाही अगदी एकाही पात्राचं वैवाहिक आयुष्य ठिक नसणं वगैरे प्रपोगण्डा आहेच.

‘बॉश’ची मला दुसरी सगळ्यांत जास्त भावलेली गोष्ट म्हणजे त्यात अ‍ॅक्शन जवळपास नगण्य आहे. पात्रे नुसतीच बोलत राहातात, रटाळ कामं करत राहातात, अत्यंत निरर्थक गोष्टींतून मागोवा काढत राहातात. अगदी दिड-दोन मिनिटे चालणारे सीन्स आहेत मालिकेत. अनेक उपकथानकं एकाच वेळी चालू असतात. तरीही असं वाटत राहातं की काहीच घडत नाहीये मालिकेत. पण एपिसोड संपल्याक्षणी जाणवतं, च्यायला ‘झी मराठी’वाल्यांच्या हजार एपिसोड्समध्ये जेवढं कथानक पुढे जात नाही तेवढं यांनी एकाच भागात पुढे नेलंय. मला सांगा, पोलिसांचं प्रत्यक्ष आयुष्य असंच असतं ना हो! थरारक पाठलागाचे, मारधाडीचे प्रसंग कितीसे येत असतील खऱ्या पोलिसांच्या आयुष्यात? क्वचितच ना! ‘बॉश’ला मी अतोनात वास्तववादी म्हणालो ते यासाठीच. ते नॉनग्लॅमरस रिअ‍ॅलिझममध्ये बुडी मारायला क्षणभरही घाबरत नाहीत. कारण, त्या एक एक बुडीतून ते शंभर टक्के रत्नच बाहेर काढतात! नुसतीच बडबड असूनही मी पैज लावून सांगतो की, मालिका एका क्षणासाठीही कंटाळवाणी होत नाही. उलट मी तर म्हणेन की, मी आजवर ऐकलेले बेस्ट डायलॉग्स जर कुणा मालिकेत असतील, तर ते ‘बॉश’मध्येच. एक एक प्रसंग हा नुसता चित्रकोड्याच्या एका तुकड्यासारखाच नाहीये, तर एकाच घटनेच्या शेकडो कंगोऱ्यांपैकी एक एक कंगोरा उलगडून दाखवणारा आहे. नॅरेटिव्ह स्ट्रक्चर कसं लेयर्ड आणि तरीही कसं एकजिनसी असावं ते शिकावं तर या मालिकेकडूनच. संवेदनशील असाल तर या गोष्टी अक्षरशः अंगावर येतात, व्यापून टाकतात, भिती वाटायला लावतात. मालिकेचा मुख्य भर हा अंगावर काटा आणणाऱ्या अवास्तव साहसदृश्यांपेक्षा आत्म्याला शहारा आणणार्‍या माईंडगेम्सवर आहे. आणि त्यात ही मालिका पूर्ण गुण मिळवते!

या मुद्याच्या बाबतीत तुलनाच करायची झाली तर ‘बॉश’ ही काहीशी जॅझ संगीतासारखी आहे. वरवर काहीसा आळशी, क्रमहीन वाटणारा हा संगीतप्रकार जसा तयार कानाच्या माणसाला समाधीप्रत नेऊ शकतो, नेमके तेच ही मालिका करते. किंबहूना त्यामुळेच कदाचित कॉनेलीने बॉशच्या अंधाऱ्या आयुष्यात जॅझचं पातळसर चांदणं लिहिलेलं असणार. जॅझ हा माझा वीकपॉईण्ट. रहमानने या संगीतप्रकाराची ओळख करून दिल्यापासून मी खुळावल्यासारखा जॅझ ऐकत असतो. ही मालिका मला प्रमाणापलिकडे आवडण्याचे हे ही एक कारण आहे की, या मालिकेत एखाद्या म्युझिकलएवढं जॅझ आहे. या मालिकेनेच ‘आर्ट पेपर’सारख्या दैवी कलाकारासोबत माझी ओळख करून देऊन केलेले उपकार मी जन्मात कधी विसरणार नाहीये. मालिका पाहा अथवा पाहू नका, पण संगीताचे चाहते असाल तर स्पॉटीफायवर हॅरी बॉशची प्लेलिस्ट जरूर ऐका. जॅझ आवडत असेल तर अक्षरशः वेड लागेल वेड! हॅरी बॉश हा असा बेक्कार माणूस आहे, ज्याची रहमानशी ओळख करून द्यायला, त्याच्यासोबत तासनतास रहमानबद्दल बोलायला मला अतिशय आवडेल. आणि खरं सांगतो, हे असं मला फारच थोड्या लोकांबद्दल वाटतं.

प्रत्येक पर्व हे कॉनेलीच्या एकाहून अधिक कादंबऱ्यांवर आधारित आहे. पण पर्व संपल्यावर ते केस संपल्याची भावना देण्याइतकेच आपल्याला एखादी परिपूर्ण कादंबरी ‘पाहिल्याची’ भावना देऊन जाते. इतकी परिपूर्णता मी तरी साहित्यावर आधारित कोणत्याच मालिकेत अथपासून इतिपर्यंत पाहिलेला नाही. भल्याभल्या मालिका शेवटाकडे ढासळताना पाहिल्या आहेत मी. ‘बॉश’ ही त्या दिव्य यादीत येते, जिला परफेक्ट शेवट कसा करावा ते समजले आहे. काही मालिका या ब्रेन्गॅझम देतात, काही माईंड्गॅझम देतात. ‘बॉश’ ही त्या दुर्मिळ प्रकारातील मालिका आहे जी तुम्हाला क्षणोक्षणी ब्रेन्गॅझम आणि माईंड्गॅझम तर देतेच, पण त्याच्याही पलिकडे जाऊन ती तुम्हाला वेळोवेळी भयानक ताकदीचा सोल्गॅझमसुद्धा देते. आणि खरंच सागतो सोल्गॅझम होणे हा आजच्या जगात शब्दशः दुर्मिळातील दुर्मिळ प्रकार आहे, अगदी या मालिकेच्या दर्जासारखाच! मनापासून सांगतो, इतकं लिहूनही ‘बॉश’चं दहा टक्केसुद्धा रसग्रहण मला जमलंय असं वाटत नाहीये. लवकरच येणारा ‘बॉश’चा स्पिनऑफदेखील या दर्जाला साजेसाच ठरो, अशी सार्थ अपेक्षा आहे.

*५/५

— © विक्रम श्रीराम एडके
[लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]

टीप: मालिकेत एकूण ७ पर्वे आहेत. भारतात अधिकृतरित्या ६ च प्रकाशित झाले आहेत. वाट पाहायची नसल्यास शेवटचे पर्व कसे मिळवायचे, ते सूज्ञांस सांगणे न लगे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *