लोणच्यासारखी मुरत जाणारी – चक

‘बाय मोअर’ सुपरमार्केटच्या ‘नर्ड हर्ड’ या अत्यंत रटाळ आणि गचाळ अशा संगणक दुरुस्ती विभागात काम करणाऱ्या चार्ल्स तथा चक बार्टोव्स्कीचं (झकॅरी लेव्ही) आयुष्य एका रात्रीत पार बदलून जातं. त्याचं कारण म्हणजे चकचा एकेकाळचा स्टॅनफर्डसारख्या प्रथितयश विद्यापीठातील परममित्र आणि कालौघात परमशत्रू बनलेला ब्राईस लार्किन (मॅथ्यू बोमर). ब्राईसच्या कारस्थानामुळे चकला विद्यापीठाने काढून टाकलं होतं. त्या घटनेलाही आता चार वर्षं उलटून गेली. किंबहूना त्या घटनेमुळेच चकसारखा जग बदलू शकणारा अत्यंत हुशार विद्यार्थी आज ‘बाय मोअर’सारख्या फडतूस ठिकाणी काम करतोय. ब्राईस मात्र अजूनही त्याचा पिच्छा सोडत नाहीये. जगाच्या दृष्टीने साधा अकाऊंटंट असलेला लार्किन प्रत्यक्षात सीआयएचा अत्यंत खतरनाक गुप्तहेर आहे. पण तो आपल्याच देशावर उलटतो आणि ‘इंटरसेक्ट’ नावाचं सीआयएचं सगळ्यांत गुप्त संशोधन चोरतो. त्यावेळी झालेल्या मारामारीत ब्राईस तर मरतो, पण मरताना तो इंटरनेटचा सबंध प्रोग्राम चकला पाठवतो. आणि हा येडा चकदेखील तो बिनधास्त डाऊनलोड करतो. तो प्रोग्राम संगणकावर उघडताक्षणी पडद्यावर सहस्रावधी निरर्थक प्रतिमा दिसू लागतात. प्रतिमांचा तो स्फोट पाहाताच चकची तंद्री लागते आणि चक भोवळ येऊन कोसळतो. त्याला शुद्ध येते तेव्हा सकाळ झालेली असते व प्रोग्राम पूर्ण रन होऊन नष्टदेखील झालेला असतो.

त्या एका रात्रीत चकचं सारं आयुष्यच बदलून जातं. झालं असं असतं की, तो प्रोग्राम म्हणजे एक महासंगणक असतो. कूटप्रतिमांच्या स्वरूपात महाप्रचंड विदा तो चकच्या डोक्यात भरतो. आणि ती विदा म्हणजे प्रत्यक्षात सीआयएचा संपूर्ण विदानिधी (डेटाबेस) असतो. ब्राईस लार्किन, चकचा एकेकाळचा घनिष्ठ मित्र व जन्माचा वैरी, मरता-मरता चकच्या हाती सबंध अमेरिकेच्या सुरक्षेच्या किल्ल्या देऊन गेलेला असतो. या एका योगायोगामुळे साधाभोळा, काहीसा मूर्ख आणि अत्यंत अननुभवी चक अचानकपणे सीआयए आणि एनएसए या दोन्ही गुप्तदलांसाठी सर्वाधिक महत्त्वपूर्ण मालमत्ता (ऍसेट) होऊन बसतो! चकची सुरक्षितता ही अमेरिकन शासनाच्या प्राधान्यक्रमात सर्वांत वरच्या स्थानी येते. व त्यासाठी सीआयए आपली बेस्ट गुप्तहेर सेराह वॉकर (य्वेन स्ट्राहोव्स्की) तर एनएसए आपला सर्वश्रेष्ठ असॅसिन जॉन केसी (ऍडम बाल्डविन) अशा दोघांना पाठवतात. आणि मग सुरू होतो ‘चक’ नावाचा पाच पर्वे (२००७-१२) चाललेला अत्यंत विनोदी, अतिशय तंत्रशुद्ध रितीने मांडलेला, उत्तम अभिनयाने नटलेला, श्रेष्ठ लेखनाने सजलेला आणि पराकोटीचा रोमांचक असलेला खेळ!

‘चक’ची सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मालिका नुसती एस्पियोनाज-थ्रिलर नाही तर एस्पियोनाज-सिटकॉम-थ्रिलर आहे. या बाबतीत तुलनाच करायची झाली तर तिची तुलना जेम्स कॅमेरॉनच्या ‘ट्रू लाईज’सोबत (१९९४) करता येऊ शकते. अच्छा तुम्ही जर नीट विचार केला तर तुम्हाला दिसेल की ऍमेझॉन प्राईमवरील तथाकथित हिट मालिका ‘द फॅमिली मॅन’ने (२०१९-) ‘ट्रू लाईज’च्या संकल्पनेची शब्दश: चोरी केलीये. ते एक असो. पण ‘चक’ असं काही करायला जात नाही. उलट ‘ट्रू लाईज’च नव्हे तर पॉप कल्चरशी संबंधित अक्षरशः हजारो गोष्टींना ते आपल्या प्रत्येक एपिसोडमधून मानवंदना देतात. तुम्हाला जर ते सारे संदर्भ माहिती नसतील तरीही ‘चक’ अत्यंत मनोरंजक राहातेच, पण जर ते संदर्भ माहिती असतील तर तिच्या मनोरंजनमूल्याला काही मर्यादाच राहात नाहीत. ‘चक’मधील विनोद हे त्या संदर्भांमधून तर येतातच पण त्याहून जास्त ते परिस्थितीकडे पाहाण्याच्या तिरकस दृष्टीकोनातून येतात. शिवाय ‘चक’ची कथा ही अनेक पातळ्यांवर चालते. म्हणजे गुप्त मिशन्स ही एक पातळी. ‘बाय मोअर’चा स्टाफ, त्यांचे उपद्व्याप, त्यांच्या अडीअडचणी ही दुसरी पातळी. चकचं वैयक्तिक आयुष्य, त्याची बहिण एली (सेराह लँकेस्टर), तिचा बॉयफ्रेण्ड डेव्हन तथा कॅप्टन ऑसम (रायन मॅक्पार्ट्लीन) ही तिसरी पातळी. या तिन्ही पातळ्या कथानकांच्या दृष्टीने सशक्त तर आहेतच पण तिन्ही ठिकाणी विनोदाला अतिशय वाव आहे व त्याचा या मालिकेने अतोनात फायदा करून घेतलाय. गंमत म्हणजे जवळपास प्रत्येक एपिसोडमध्ये हे तिन्ही स्तर एकमेकांना छेदतात व एकमेकांवर प्रभाव टाकत असतात. ही बाब ज्या सुरेख पद्धतीने संहितेत लिहिली व दिग्दर्शनातून मांडलीये की मन अक्षरशः तृप्त होऊन जाते! खूप थोड्या मालिका असतात ज्या असं बौद्धिक, वैचारिक आणि समाधान देऊ शकतात.

त्याच धर्तीवर अजून एक विधान करतो की, खूप थोड्या मालिका अशा असतात ज्यातील प्रत्येक पात्र हे ती भूमिका साकारलेल्या अभिनेत्यासाठीच लिहिलंय असं वाटतं. ‘चक’ ही पात्रयोजनेच्या बाबतीत अत्यंत परिपूर्ण आहे. मुख्य कलाकारच नव्हे तर मॉर्गन ग्राईम्स (जोशुआ गोम्स), बिग माईक (मार्क ख्रिस्तोफर लॉरेन्स), लेस्टर पटेल (विक्रम सहाय), जेफ्री बार्न्स (स्कॉट क्रिन्स्की), जनरल बेकमन (बोनिता फ्राईडरिकी) अशा दुय्यम पात्रांच्या बाबतीतदेखील त्या त्या अभिनेत्याखेरीज इतर कुणाचाच विचारदेखील करवत नाही. मॉर्गनचे पात्र तर एखाद्या पात्राचा परिपोष कसा करावा याचा निव्वळ वस्तुपाठ आहे. किंबहूना मॉर्गन ‘द बिग बँग थियरी’मधील (२००७-१९) हॉवर्ड वॉलोविट्झचे (सायमन हेल्बर्ग) पात्र यांच्या आलेखात कमालीचे साम्य आहे. गंमत म्हणजे दोन्हीही मालिका वेगवेगळ्या नेटवर्क्सवर पण तरीही एकाच दिवशी (२४ सप्टेंबर २००७) सुरू झाल्या होत्या!

आपल्याकडे अशा विषयावर मालिका बनली तर इतकी सशक्त कथावस्तू नसेल एकवेळ, पण कमालीची नग्नता असणार म्हणजे असणारच! किंबहूना आपल्याकडील मेंढरीकरण झालेल्या मालिका त्याच मार्गाने जाव्यात याची ‘गरीबांच्या तारान्तिनो’ने पुरेपूर काळजी घेऊन ठेवलीये. ‘चक’ मात्र या ही आघाडीवर बाजी मारून जाते. तिच्यात उत्तानपणा आहे, पण नग्नता नाही. त्वेषाने केलेली वक्तव्ये आहेत, पण शिव्या नाहीत. किंबहूना त्या गोष्टी टाळल्यामुळेच ‘चक’चे रंजनमूल्य व स्मरणमूल्य कित्येक पटींनी वाढले आहे. दुसरी एक गोष्ट म्हणजे आपल्याकडे पर्वांमध्ये मांडल्या जाणाऱ्या आधुनिक मालिका म्हटल्या की त्या बहुसंख्यकांचा द्वेष करणाऱ्या व डाव्या विचारसरणीची काहीही करून भलामण करणाऱ्याच असणार, हे सांगायला कुणा ज्योतिषाची आवश्यकता नाही. क्वचित एखाद्या अपवादाने सिद्ध होणारा अलिखित नियमच आहे म्हणा ना हा! ‘चक’चे वेगळेपण मात्र असे की, ती डाव्या विचारसरणीची भलामण करीत नाही, वर्णभेद मिटवण्याच्या बुरख्याआड गोऱ्यांचा द्वेष करीत नाही, अशांतीच्या दूतांचे गोडवे गात नाही.

किंबहूना ‘चक’मध्ये जो प्रपोगण्डा आहे तो प्रवाहाच्या नेमका उलट आहे. स्पॉयलर न देता सांगायचं तर एकवार तिच्यातील मुख्य खलनायकाच्या इंडस्ट्रीचा लोगो पाहा! असे हजारो, होय शब्दशः हजारो छुपे संदर्भ ही मालिका प्रत्येक एपिसोडगणिक देते. किंबहूना या मालिकेतील बहुतांशी नावे, पात्रे, स्थळे, घटना यांच्यात अनेक छुपे अर्थ आहेत. ते शोधणे व त्यांचा अन्वयार्थ लावणे हा एक वेगळाच मजेदार खेळ आहे. जॉन केसीचे पात्र तर उघडपणे कन्झर्व्हेटिव्ह आहे. तो रोनाल्ड रेगनचा चाहता नव्हे तर अक्षरशः भक्त आहे. तो क्लिंटन दांपत्याचा द्वेष करतो. तो सातत्याने अमेरिकेतील बंदुका बाळगू देण्याच्या स्वातंत्र्याची अभिमानाने भलामण करतो. तो कम्युनिस्टांना प्रकटपणे नावं ठेवतो. तोच कशाला, मालिकेतील नायक व नायकाच्या बाजूचे सगळेच कमालीचे राष्ट्रभक्त आहेत. ते सगळेच बलिदान, कुटूंबव्यवस्था, लग्नसंस्था इ. मूल्यांवर अतोनात विश्वास ठेवतात. बहुसंख्य भारतीयांच्या दृष्टीने ही मूल्ये अगदीच साहजिक असली तरीही सांप्रत जगाच्या हिशोबात त्यांना उजव्या विचारसरणीचीच मूल्ये मानतात. केसीचं काम करणारा ऍडम बाल्डविन प्रत्यक्ष आयुष्यात अगदी तसाच आहे. मुख्य नायक ‘चक’ची भूमिका करणारा झकॅरी लेव्ही अतिशय धार्मिक ख्रिश्चन आहे. आणि हे दोन्हीही योगायोग खचितच नाहीत! पण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, मालिका उजव्या विचारसरणीची आहे म्हणून ती चांगली आहे, असं नाहीये, तर ती एक चांगली मालिका आहे जी उजव्या विचारसरणीची आहे. हा लहानसा फरक समजून घेण्याची नितांत आवश्यकता आहे, विशेषतः आपल्याकडील उजव्यांनी! अपवाद वगळता आपल्याकडच्या बहुतांशी उजव्यांचं असं दिवास्वप्न असतं की, एखादी मालिका अथवा चित्रपट केवळ उजव्या विचारसरणीचा आहे म्हणून तो लोकांनी डोक्यावर घ्यावा, बाकी तो मनोरंजनाच्या आणि तांत्रिक आघाडीवर थोडा कमी पडला तरी चालेल. प्रत्यक्ष जगात असं नाही चालत. तंत्रशुद्ध पद्धतीने उजव्या विचारसरणीचा सार्थ व मनोरंजक ‘उरी’ (२०१९) किंवा ‘बाहूबली’सारखा (२०१५-१७) चित्रपट बनवा, तो धो-धो चालेल. पण केवळ उजव्या विचारसरणीच्या जोरावर लोक कधीच ‘द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ (२०१९) अथवा ‘पीएम नरेंद्र मोदी’ (२०१९) स्वीकारणार नाहीत, त्यांना रटाळ आणि फ्लॉपच म्हटलं जाणार. ही साधी गोष्टच लक्षात न आलेले लोक मग सबंध चित्रपटसृष्टीवरच बहिष्कार घालण्याची भाषा बोलू लागतात व लोकांची मते आपल्याला हवी तशी बनवू शकणारे एक फार मोठे अवजार आपल्या कर्माने दूर लोटतात! डावे कधीच अशा चुका करत नाहीत.

चुकांच्या विषयावरून आठवलं, ‘चक’मध्ये खूप साऱ्या त्रुटी आहेत बरं का! उदाहरणार्थ- मालिका काही ठिकाणी खूपच अतिशयोक्ती करते, तिच्यात वापरलेले विज्ञानही बरेचदा छद्मतेच्या सीमेत जाते. एवढंच कशाला, मालिकेचे अखेरचे पर्व तर काहीसे दिशाहीनच वाटते. ‘चक’ ही ‘पर्सन ऑफ इंटरेस्ट’चा (२०११-१६) दर्जा अधूनमधून गाठूनही तो राखण्यात कमी पडते, ते या लहानसहान चुकांमुळेच! मला व्यक्तिश: मालिकेचा शेवट अतिशय वेगळा, अकल्पनीय व खऱ्या अर्थाने बिटरस्वीट वाटला. पण तो सगळ्यांना आवडेलच असे नाही. अरे हो, बिटरस्वीटवरून आठवलं, ‘गेम ऑफ थ्रोन्स’चा (२०११-१९) शेवट बिटरस्वीट असेल, असं म्हणाला होता ना खुनी म्हातारा? त्यावरून आणखी एक आठवलं, ‘एचबीओ’वर ‘जीओटी’ सुरू होण्याच्या बरोब्बर सहा दिवस आधी आधी ‘चक’च्या एका एपिसोडमध्ये (११ एप्रिल) ‘जीओटी’चा एक अत्यंत अर्थपूर्ण असा संदर्भ आहे! ‘चक’चा शेवट ‘जीओटी’पेक्षा दहा कोटी पटींनी चांगला आहे. पण मग ‘चक’ ही वाईट मालिका आहे का? काही मालिका असतात ज्या पाहून (किंवा न पाहाताच) तुम्ही इतरांसमोर भाव खाऊ शकता. या मालिका असतात ज्या तुम्ही केवळ सगळं जग बघतं म्हणून केवळ बघता आणि एकदा बघून झाल्यावर त्या परत पाहाण्याची तुमची अजिबातच इच्छा नसते. काही मालिका असतात ज्या तुम्ही आयुष्यात करायला काहीच नाहीये या गैरसमजातून केवळ बघायच्या म्हणून बघता. पण या सगळ्याच्या पलिकडे, काही मालिका असतात ज्या पाहाताना तुम्हाला त्या कधी संपूच नये असं वाटत असतं. या मालिका नुसत्या संपत नाहीत, तर सोबत तुम्हाला पार रितं करून सोडतात. ‘चक’ ही या तिसऱ्या प्रकारची मालिका आहे. ती खदखदून हसवते, त्यातील अनेकानेक धक्कादायक गोष्टींनी रोमांच उभे करते, संपू नये असं वाटायला लावते आणि संपल्यावर एखाद्या फर्मास लोणच्यासारखी मुरत जाते, आयुष्यभर!

*४.७५/५

— © विक्रम श्रीराम एडके
[लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *