Author: Vikram Edke

  • पानिपत: पराभवाचा नव्हे, विजयाचा इतिहास

    पानिपत: पराभवाचा नव्हे, विजयाचा इतिहास

    डोक्यात पराभव पक्का बसलेला असेल, तर सगळ्या गोष्टींत पराभवच दिसतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पानिपतचे युद्ध! अर्थातच या युद्धात मराठ्यांचे प्रचंड नुकसान झाले. मात्र सगळेच म्हणतात त्याप्रमाणे हा मराठी साम्राज्याचा पराभव होता असे काही मला वाटत नाही.

    पानिपताने मराठ्यांची दिल्ली आणि उत्तर भारतावरील सत्ता धुवून टाकली हे खरे. अहमदशहा अब्दाली हा विजेता ठरला हेही खरे. मात्र या युद्धात अफगाणांचे एवढे काही प्रचंड नुकसान झाले की, त्यांना भविष्यात ‘कधीच’ हिंदुस्थानकडे नजर वाकडी करून पाहाण्याची दुर्बुद्धी झाली नाही. याउलट १७६१ साली सुटलेली उत्तर हिंदुस्थानवरील पकड मराठ्यांनी १७७१ पर्यंत परत एकवार प्रस्थापित केली, तीही दुप्पट जोमाने! थोडक्यात, अहमदशहाचा विजय तात्कालिक होता आणि मराठ्यांचा पराभवही. मात्र अहमदशहाचे नुकसान हे सार्वकालिक होते तर मराठ्यांचे नुकसान केवळ तात्कालिक! तुलनाच करायची झाली तर अहमदशहाच्या विजयाची तुलना अलेक्झँडरच्या विजयाशी करता येईल. त्या तात्पुरत्या विजयाची जेवढी किंमत, तेवढीच या विजयाची आणि तेवढीच मराठ्यांच्या पराभवाचीही. मग याला पराभव कसे म्हणता येईल?

    मराठ्यांची मोत्ये गळाली, खुर्दा उडाला; सगळे खरे. परंतू युद्धाची किंमत ही चुकवावीच लागते, मग विजय मिळो वा पराभव! पराभवी मानसिकता बदलून पाहा, मग जाणवेल की पानिपत हा तात्पुरता पराभव तर दीर्घकालीन विजयच होता.

    खरं तर, आपला यात फारसा दोषही नाही. कारण शाळांमध्ये आपल्याला “पानिपतावर मराठ्यांचा पराभव झाला” हेच शिकवले जाते. मुळातच इतिहासाकडे सकारात्मकतेने पाहायची सवय लागणे गरजेचे आहे. ती नसेल तर सारेच विजय पराभव वाटू लागतील. बाकी पराभवी मानसिकतेचा इतिहास शिकून विजयी वीर कसे निर्माण होणार, हा एक यक्षप्रश्नच आहे!

    – © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी आणि व्याख्याने ऐकण्यासाठी भेट द्या – www.vikramedke.com)

    image

  • रहमानला सारं काही कळतं!!

    रहमानला सारं काही कळतं!!

    नष्ट होती आशा अन् जळू लागती दिशा
    नैराश्याच्या गर्तेत केवळ अश्रूंचीच भाषा
    एक लकेर उमटते अन् डोळ्यांतलं पाणी खळतं
    मनात तेव्हा विश्वास वाटतो –
    “रहमानला सारं काही कळतं”!

    तुझा एक-एक सूर आणि एक-एक ताल
    आपसूकच बनतात ते सारे माझी ढाल
    अंधाऱ्या अंतरी तेज स्पर्शते अन् गानब्रह्म आकळतं
    मनात तेव्हा विश्वास वाटतो –
    “रहमानला सारं काही कळतं”!

    मी अज्ञाताचा प्रवासी तू दीप घेऊन उभा तिथे
    तू घेता कवटाळूनी अंतर्मन माझे रिते
    सारे अहं अर्पिता तुला मन “स्व”कडे वळतं
    मनात तेव्हा विश्वास वाटतो –
    “रहमानला सारं काही कळतं”!

    – © विक्रम.
    (www.vikramedke.com )

    image

  • ..तर मज बालबुद्धीला जाणवणारा खेळ हा असा आहे!

    ..तर मज बालबुद्धीला जाणवणारा खेळ हा असा आहे!

    तर मज बालबुद्धीला जाणवणारा खेळ असा आहे की.. मायला.. त्या धर्मांध मोदींनी सगळीकडेच दणका उडवून दिलाय. सोशल मिडिया तर सोशल मिडिया, पण वास्तवातही ते लक्षावधीच्या सभा खेचताहेत. बरं तर बरं.. ज्या कोणत्या निवडणुकीत हात घालतात तिथे विजयश्रीच खेचून आणतात (नुसतंच जिंकणं सोप्पं असतं हो, पण हारके जीतने वाले को ही बाजीगर कहते हैं – जय राऊलबाबा!!). आणि यावर कडी म्हणून ती दुष्ट दुष्ट दुष्टातिदुष्ट न्यायालये.. खटाखट एकेका केसमधून मोदींना क्लिनचिट देत सुटलीयेत. वर त्या साध्वी आणि असीमानंदांनाही सोडणारेत अशी चर्चा चालूये! अरेरे.. अश्याने देशात धर्मनिरपेक्षता कशी उरेल? काल सन्माननीय आणि स्वत:ची मते गेली १० वर्षे निडरपणे मांडणारे (!) बोलके बाहुले शेवटी म्हणालेच ना की बाबा, मोदी पंतप्रधान झाले तर ते देशाला घातक ठरेल (त्यांना बहुधा ‘देशाला’च्या आधी ‘पाकिस्तान’ हा शब्द टाकायचा असावा. पण काय करणार बोलण्याची संधी कधी नव्हे ती मिळाली की गडबडायला व्हायचंच!)!!

    तर.. हे असेच चालू राहिले तर देशात धर्मनिरपेक्षता कशी उरेल? अरेरे.. मग काय करायचं? नेहमीचे यशस्वी कलाकार तर हा नरेंद्रासुर बघता बघता खाऊन टाकतोय. मतिमंद युवराजाला तर कच्चं खाल्लंय त्याने अक्षरश:! याला रोखायचं कसं?

    मग असं करुयात. या मोदीची मुख्य ताकद कोणतीये सध्या – तर काँग्रेसविरोध (आठवा घोषणा – काँग्रेसमुक्त भारत!)! मग काय करुयात – तर या भोळ्याभाबड्या (आणि आम्हाला २ टर्म मते देण्याचा इनोसंऽऽटपणा करणाऱ्या) जनतेसमोर एक नवा काँग्रेसविरोधी नायक आणू! Here comes the sizzling Kejriwal!! या बाबामागे पुरेसा भक्तपरिवार जमला की, त्याला ‘काँग्रेस नको – भाजप नको’ करत दिल्लीच्या निवडणुकीत उतरवायचे. मुळात तर तो ‘आप’लाच!! द्या त्याला पाठिंबा. करा दिल्लीवर अंत:स्थ राज्य! (अंत:स्थ म्हणजे छुपेपणाने बरं का – संस्कृत शब्द! मृतभाषेतला! You know English is so cool! Say – “Atleast he is doing something man!!” पण आपल्याला भ्रष्ट म्हणून सत्तेवर आल्यावर तो आपली चौकशी नाही का करणार? छे छे.. शांतं पापम्! अहो ‘आप’ला माणूस असं कसं करेल? उलट तो निवडणुकीतला सगळा काँग्रेसविरोधी प्रचार विसरून शहाजोगपणे विपक्षालाच म्हणणार – द्या पुरावे तरच करतो चौकशी!

    मग? मग मस्तपैकी फ्राय करके खानेका!! म्हणजे त्याचा ‘नायक’मधला अनिल कपूर करायचा – इमेज बनवायची इमेज. नाहीतरी ‘रॉकस्टार’मध्ये धिंग्रासाहेबांनी (पक्षी:  पियुष मिश्रा) म्हणून ठेवलेच आहे – Everything is image, image is everything!! कोण करणार हे? अहो कोण काय विचारता? इतकी वर्षे हाडकं टाकून पेड-मिडिया कश्याला पोसलीये? होऊ द्या खर्च!!
    आणि मग हळूच पिल्लू सोडायचे – केजरीवाल रोखणार का मोदींचा विजयरथ? चर्चा तर होणारच!! होऊ द्या चर्चा! ब्रेनवॉश करून टाकायचा सगळ्यांचा पार! विशेषतः सगळ्या Cool-Dudes चा!!

    मग हळूहळू उतरवायचे त्याला लोकसभेच्या रिंगणात! आणि भक्तजनांना एका गुरुमंत्राची दीक्षा द्यायची – Atleast he is doing something man!! हा मंत्र जपायचा एक खास विधी आहे बरं! यात फक्त पोकळ शब्दांकडेच लक्ष द्यायचं असतं. काश्मीरप्रश्नापासून ते लोकतंत्राचे नियम पाळण्यापर्यंत सगळ्याच गोष्टी दुर्लक्षित कराव्यात. तरच मंत्र फळतो. नाहीतर लाभत नाही आज्याबाऽत!

    मग एकदा या ‘नायक’बाबाला लोकसभेत उतरवले, यंत्रणा कामाला लावून व्यवस्थित प्रोजेक्ट केले – निवडूनही आणले की, दाखवायचे एक गाजर – ‘स्वच्छ प्रतिमेचा धर्मनिरपेक्ष पंतप्रधान’. की भुललीच ‘मेणबत्तीमोर्चा’छाप मंडळी! (That Modi is horrible.. A mass-murderer you know..)! आणि असा पंतप्रधान स्वबळावर तर होऊच शकत नाही. मग काय! राबवा ‘दिल्ली पॅटर्न’. द्या पाठिंबा. मग अखेरिस २०१४ साली सत्ता कुणाची? तर पुन्हा आमचीच! मग पुन्हा पाच वर्षं जनतेला ठेंगा दाखवत म्हणायचं – हम AAP के हैं CON!! द्या टाळी!!

    आता हे सगळं असंच असेल असं काही नाही! कदाचित असं नसेलही. नसावंच. पण..! पण, तूर्तास तरी मज बालबुद्धीला जाणवणारा खेळ हा असा आहे!!

    – © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी आणि व्याख्याने ऐकण्यासाठी क्लिक करा – www.vikramedke.com)
    image

  • ..सत्यधर्माय दृष्टये!!

    ..सत्यधर्माय दृष्टये!!

    मोहनदास गांधी अत्यंत साधेपणाने राहायचे. उदा. – रेल्वेच्या तिसऱ्या वर्गातून प्रवास करणे, शेळीचे दूध पिणे, साध्या आसनावर बसणे वगैरे.. मात्र असे म्हटले जाते की – गांधींना देशात कुठेही रेल्वेप्रवास मोफत असायचा. ज्या रेल्वेतून त्यांना प्रवास करायचा असेल, त्या रेल्वेचा तिसऱ्या वर्गाचा एक डबा आसने काढून रिकामा केला जाई, तिथे साधी आसने टाकली जात. जरी तिसऱ्या वर्गाचा डबा असला, तरीही कार्यकर्ते सबंध डबा ताब्यात घेत – त्याअर्थी डबा ‘खाजगी’ होऊन जाई! तिथेच एका कोपऱ्यात गांधींची शेळी ठेवत. तिचीही चारा-पाण्याची व्यवस्था केली जाई. यात खरं-खोटं देवच जाणे. पण असं म्हणतात की, या सगळ्या संदर्भात सरोजिनी नायडू एकदा म्हणाल्या होत्या – “बापूंना गरीब आणि साधे ठेवणे हेच एक अतिशय ‘खर्चिक’ काम आहे”!

    आज रामलीला मैदानाकडे जाताना अरविंद केजरीवालही सार्वजनिक वाहतुकीच्या बसने गेले. मात्र ज्यांनी टिव्हीवर त्यावेळची मुलाखत पाहिली असेल त्यांना एक गोष्ट नक्कीच लक्षात आली असणार की, ती सबंध बस “आआप”च्या कार्यकर्त्यांनी भरून गेली होती! थोडक्यात जरी सार्वजनिक वाहतूकीचे साधन असले तरीही त्याचा वापर “आआप”च्या खाजगी मालकीच्या वाहनासारखाच झाला. शपथग्रहणानंतर तर सचिवालयाकडे गाड्यांच्या ताफ्यातूनच गेले ना? सुरक्षाव्यवस्थाही होतीच की त्यावेळी! मग हे साधेपणाचे ढोंग कश्यासाठी? ‘मला सुरक्षा नको’ म्हणण्याची दांभिकता कश्यासाठी? मनात जे आहे तेच कृतीत दिसले तरच त्याला प्रामाणिकपणा म्हणतात ना? इथे तर गेले काही दिवस अरविंद केजरीवाल नुसते साधेपणाने राहाताहेत एवढेच नव्हे तर त्या साधेपणाची छायाचित्रे कशी प्रसिद्ध होतील याचीही (स्वत: केजरीवालकडून म्हणा वा ‘आआप’च्या कार्यकर्त्यांकडून म्हणा वा माध्यमांकडून) काळजी घेतली जात आहे.

    तुम्ही शाहरुख खानला अभिनय करताना पाहिलंय कधी? त्याची देहबोली नीट निरखून पाहा. तो विनाकारण एखादा अवयव तरी हलवेल वा विनाकारणच बोलण्यात कंप तरी आणेल; जेणेकरून लोकांचं लक्ष सतत वेधलं जाईल. हे असुरक्षिततेचं लक्षण आहे. ‘उद्या प्रसिद्धीचा झोत माझ्यापासून लांब सरकला तर काय?’ – ही ती असुरक्षितता! केजरीवालना का प्रत्येकवेळी वेगवेगळी घोषवाक्ये लिहिलेल्या टोप्या सातत्याने घालाव्या लागतात? गेले काही दिवस सतत खोकला का बरं येतोय? एकतर हा स्वत:कडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न आहे; किंवा जर त्यांना खरोखर इतका काळ टिकणारा खोकला झाला असेल, तर त्यांनी एकदा एखाद्या चांगल्या डॉक्टरला तरी दाखवून घ्यावे (भले डॉ. कुमार विश्वासना दाखवा, पण दाखवा!)! २१ दिवसांपेक्षा जास्त काळ खोकला टिकला तर ‘टिबी’ असू शकतो म्हणे! तेव्हा उगाच सार्वजनिक ठिकाणी खोकून..! असो! शिवाय सतत आजारी, एरंडेल प्यायल्यासारखा चेहरा ठेवणे हे मुख्यमंत्र्याला तर शोभणारे नाहीच, परंतू ते ‘आम आदमी’चेही लक्षण नव्हे! ‘आम आदमी’ असा असतो का? ‘आम आदमी’ तर तो असेल, ज्याला आज त्या बसची खूप गरज होती, पण ती ‘आम’ मुख्यमंत्र्यांनी नेल्यामुळे त्याला नाहक टॅक्सीचा भुर्दंड पडला..! आणि देहबोलीचाच संदर्भ घेऊन बोलायला गेलं तर खरं सामर्थ्य आणि खरा साधेपणा माणसाला आतून शांत करणारा असतो. कधी पाहिलंय मनोहर पर्रिकरांना लक्ष वेधून घेण्याचे प्रयत्न करताना? साधेपणाचं भांडवल करताना? माणिक सरकारांना असे कोणते प्रकार करताना? नाहीच! आणि कधी पाहाणारही नाही तुम्ही! कारण एकदा भांडवल झालं की, तो साधेपणा, साधेपणा न राहाता ‘दांभिकता’ होऊन बसते!

    बाकी रामलीला मैदानातला सोहळा आणि त्यावेळचं भाषण याबद्दल मी काहीच टिप्पणी करणार नाही. रामलीला मैदान प्राचीन काळापासूनच नाटकं करण्यासाठी प्रसिद्ध आहे. मैदानात उतरलं म्हटल्यावर मैदानाचा गुण तर लागणारच, नाही का!!

    – © विक्रम श्रीराम एडके.
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी क्लिक करा — www.vikramedke.com)

    image

  • सागरा प्राण तळमळला..!

    सागरा प्राण तळमळला..!

    image

    ब्रायटन गावातली ती सायंकाळ तशी नेहमीसारखीच तर होती. तेच वातावरण, तीच पक्ष्यांची किलबिल, तीच फिरायला आलेली कुटूंबे.. क्वचित काही प्रेमी जोडपी.. आणि नित्यनेमाने फिरायला येणारे तेच दोघे. दोन काळे तरुण. त्या वर्तमान खेडेगावाच्या दृष्टीने काहीसे दुर्लक्षित, परंतू इतिहासाच्या आणि भविष्याच्या दृष्टीने मात्र अत्यंत महत्वाचे.

    त्यांच्यापैकी एकाचे नाव होते निरंजन पाल. आणि कुणाला सांगून खरे वाटले नसते की, जो दुसरा मुळचा अतिशय रुपवान परंतू सध्या आजाराने खंगून गेल्यासारखा वाटणारा पंचविशीतला तरुण होता त्याने आत्ता काही दिवसांपूर्वीच ज्या साम्राज्यावरून म्हणे कधी सूर्य मावळत नाही ते – जगद्व्यापी ब्रिटीश साम्राज्य – पार मुळापासून हादरवून सोडले होते. तो जरी सध्या अतिशय कृश, अक्षरश: मरणप्राय वाटत असला तरीही त्याचे नाव ऐकताच त्या किनाऱ्यावरील एकूणएक ब्रिटीशांमध्ये धावपळ माजली असती! त्याचे नाव? त्याचे नाव होते – विनायक दामोदर सावरकर!

    हो तेच ते सावरकर, जे इंग्रजांच्या राजधानीत राहून त्याच इंग्रजांचे जुलमी साम्राज्य उखडण्यासाठी बॉम्ब बनवून भारतात पाठवत होते! हो तेच ते सावरकर, ज्यांनी नुकताच कर्झन वायलीचा वध करणाऱ्या मदनलाल धिंग्राविरुद्धची निषेधसभा हाणून पाडली होती! हो तेच ते सावरकर, ज्यांनी ती सभा उधळल्यानंतर वृत्तपत्रांना पत्रे पाठवून सगळ्यांचीच तोंडे कायदेशीररित्या बंद करून टाकली होती! हो तेच ते सावरकर, ज्यांनी अटकेत असलेल्या धिंग्राचे ब्रिटिशांनी दाबून टाकलेले निवेदन प्रसिद्धवून इंग्रजांची त्यांच्याच देशात पार नाचक्की करून टाकली होती! हो तेच ते सावरकर, जे शत्रूच्या शिबिरात राहून त्याच शत्रूच्या शत्रूंशी संधान बांधून होते! हो तेच ते सावरकर, ज्यांना ‘ग्रेज इन’ने ‘बॅरिस्टर’ पदवी देऊ केली होती, परंतू ‘ब्रिटिश साम्राज्याशी एकनिष्ठ राहाण्याची शपथ घ्यावी लागणार असेल तर मला तुमच्या पदव्या नकोत’ असे ज्यांनी त्या संस्थेच्या चालकाला सुनावले होते! हो तेच ते सावरकर जे..! असो!!

    पण तेच सावरकर आज फिरताना शांत वाटत होते. नेहमी तर किती काय काय बोलत असतात. नवनवीन गोष्टी सांगत असतात. निरंजनला कळेचना! काहीतरी बोलायचं म्हणून त्यांनी बोलायचा प्रयत्न केला,

    “आज हवा छान आहे नाही”?

    उत्तरादाखल सावरकरांनी त्यांच्याकडे नुसतंच पाहिलं. मग हळूहळू एक-एक शब्द उच्चारत म्हणाले,

    “निरंजन, मला कळत नाही, असा अजून किती काळ तुझ्यावर ओझं बनून राहायचं मी..”

    “ओझं? अहो काय बोलता सावरकर? तुमचं ओझं का होणार आहे मला? अहो, तुम्ही लंडनमध्ये जो पराक्रम करून दाखवला आहे तो शतकानुशतकांतून कुणीतरी एखादाच करून दाखवतो. अहो, नायक आहात तुम्ही आम्हां भारतीयांचे. बॅरिस्टर झाला असता, तर ऐश्वर्यात लोळला असता अक्षरश:, परंतू केवळ देशजननीपायी क्रांतिचा खडतर मार्ग स्वीकारणारे तुम्ही.. अहो सारे इंग्रज तुम्हाला आतंकवादी समजत होते, इंग्लंडच्या त्या तसल्या भयानक हवामानात तुम्हाला कुणी छप्परही द्यायला तयार नव्हते, तेव्हा तुम्ही काय अपेष्टा काढल्यायत त्याच्या कथा बाबांनी (बिपिनचंद्र पाल) सांगितल्यावर तर मी तुमचा पार भक्तच झालो आहे. म्हणूनच तर आपण समवयीन असूनही आणि तुम्ही इतक्या वेळा बजावलेलं असूनही तुम्हाला ‘अरे-तुरे’ करावंसं वाटलं नाही कधी मला. अहो, इंग्रजांच्या ससेमिऱ्याममुळे तुमची तब्येत ढासळलीये आणि डॉक्टरांनी तुम्हाला हवेत बदल सुचवलाय हे बाबांकडून कळल्याबरोब्बर तुम्हाला इकडे माझ्याकडे पाठवून द्यावं असा हट्टच धरला मी त्यांच्यापाशी! तुमची तब्येत सुधारावी या परमार्थासोबतच, तुमच्यासारख्या महापुरुषाकडून चार गोष्टी शिकता आल्या तर सोने होईल माझ्या आयुष्याचे, हा स्वार्थही होताच त्यापाठी! आणि तुम्ही म्हणताय की तुम्ही माझ्यावर ओझे आहात..?”

    सावरकर काही न बोलता नुसतेच खाली पाहात चाललेले. काही क्षण तसेच शांततेत गेले. धीर करून निरंजनच परत म्हणाले,

    “आज तुम्ही एवढे गप्प का..?”

    काहीही न बोलता सावरकरांनी एवढा वेळ हातात घट्ट दाबून धरलेला, चुरगळलेला कागदाचा तुकडा पुढे केला. निरंजनने हातात घेऊन पाहिला, तर ती तार होती – सावरकरांचा लहानगा मुलगा प्रभाकर वारल्याची!
    निरंजनच्या डोळ्यांत पाणी तरळले. सावरकरबंधू क्रांतिकार्यात सक्रिय झाल्यापासून त्यांच्या कुटूंबाला काय काय जाच सहन करावा लागतोय हे इंग्लंडमध्ये साऱ्यांना ठाऊक होते. इंग्रजांनी घरा-दारावर जप्ती आणली होती. बंधू नारायण लहान. त्याला कित्येकदा पोलिस चौकीच्या फेऱ्या माराव्या लागल्या होत्या. क्वचित मारहाणही झालेली. कुणीच आसरा द्यायला तयार नाही. दोन स्त्रिया – माई आणि येसूवहिनी – त्यांच्या पदरी मुलं – मात्र इंग्रजांच्या भीतीपायी त्यांना साधा आसरा द्यायलाही कुणी तयार होईना. माहेरी गेल्या तरी राहायची सोय नाही. स्वत:च्या माहेरी, त्या हक्काच्या घरीदेखील अक्षरश: गायींच्या गोठ्यात राहून दिवस काढत होत्या त्या. त्यांच्या आईवडलांचं काळीज रोज तिळ-तिळ तुटायचं, पण इंग्रजांपुढे त्यांचाही नाईलाज होता – न जाणो, पोरीच्या डोक्यावरचं आहे-नाही ते छप्परही जायचं! त्यात ही प्रभाकर गेल्याची तार..

    निरंजनचे मन आतल्याआत आक्रंदू लागले, “परमेश्वरा, तू या जगात नाहीसच का रे? का या देवमाणसांवर असे जुलूम करतोयस? अरे, स्वत:साठी का काही मागताहेत ते? सारं तर देऊन टाकलं त्यांनी मातृभूमीला? का असे भोग त्यांच्या नशिबात?”

    निरंजनने नजर वर करून पाहिलं. ज्या सावरकरांवर हा दु:खाचा हिमालय कोसळलेला ते स्वत: मात्र किनाऱ्यावर मौज करणाऱ्या एका कुटुंबाकडे टक लावून पाहात होते. आई-बाबा-मुलगा-मुलगी.. लहानसंच चौकोनी कुटूंब! काय विचार करत असतील सावरकर? आपलंही कुटूंब असंच असू शकलं असतं – हे वाटत असेल का त्यांना? ऐन तारुण्यात ज्या पत्नीला एकटं सोडून आलो, त्या पत्नीची आठवण येत असेल का त्यांना? की नुकताच ज्याचा मृत्यू झालाय त्या आपल्या लहानग्याच्या बाललीला आठवत असतील त्यांना? निरंजन सावरकरांच्या डोळ्यांचं निरीक्षण करत होते. चालता चालता आपण समुद्राच्या अगदी जवळ पोहोचलो आहोत, याचेही भान राहिले नव्हते त्यांना. बघता-बघताच, रमणीच्या गळ्यातील मोतीमाळ तुटावी आणि सारे मौल्यवान मोती इतस्ततः विखुरावेत तसे, अगदी तस्सेच दोन चुकार अश्रू पापण्यांची तटबंदी ओलांडून सावरकरांच्या गालावर ओघळले. सावरकरांचा चेहरा वेदनेने अक्षरशः पिळवटून निघाला. वाटले.. वाटले आता ते हुंदका देणार..

    हुंदका आला, पण वेगळ्याच रुपाने. धीरोदात्त वीराला शोभेलसा. सावरकर कापऱ्या, अस्फुट आवाजात गाऊ लागले होते..

    “ने मजसी ने परत मातृभूमीला.. सागरा प्राण तळमळला..”

    त्या ऐतिहासिक गीताच्या जन्माचे एकमेव मानवी साक्षीदार – निरंजन – अवाक् होऊन गेला होते. ते दैवी काव्य ऐकावे की त्या महापुरुषाच्या चेहऱ्यावरचे तेज न्याहाळावे, काही कळतच नव्हते!

    एक निरंजन होते, जो नुसताच पाहात होते!

    एक सावरकर होते, जे देहभान हरपून समुद्राला साद घालित होते!!

    एक परदास्यमदाने उन्मत्त समुद्र होता.. निर्दयपणे फेसाळत हसणारा!

    आणि होते सावरकरांचे अश्रू.. ज्यांनी गाणे पूर्णच होऊ दिले नाही.. काळ तेवढा बिचारा थांबून राहिला होता!!

    – © विक्रम श्रीराम एडके.
    (लेखकाचे अन्य लेख/सावरकर-कथा वाचण्यासाठी, लेखकाने दिलेली व्याख्याने ऐकण्यासाठी/आयोजित करण्यासाठी भेट द्या – www.vikramedke.com)

  • विस्मृतीत गेलेली त्रिमूर्ती

    आज १९ डिसेंबर. १९२७ साली याच दिवशी पं. रामप्रसाद “बिस्मिल”, अशफाकउल्लाह खान “हसरत” आणि ठाकूर रोशनसिंह यांना फाशी देण्यात आली होती. तीन जीव हुतात्मा झाले होते. दुर्दैवाने क्रमिक पुस्तकांतून राजकीय हेतूंनी प्रेरित इतिहास शिकलेल्या आम्हाला, चार-दोन अहिंसक राजकारणी सोडल्यास, मातृभूमीसाठी प्राणांचीही बाजी लावणारे अन्य हुतात्मे माहितीदेखील नसतात. त्यामुळे उपरोक्त तिघांबद्दल थोडक्यात सांगतो, जेणेकरून वाचकांना त्यांची माहिती व्हावी व या देशभक्तांचा अधिक अभ्यास करण्याची प्रेरणा मिळावी..

    १) आर्यसमाजी असलेले पं. रामप्रसाद बिस्मिल हे कट्टर हिंदुत्ववादी. शुद्धीकार्यात अग्रेसर. बाणेदारपणा तर असा की, फाशीपूर्व खटला चालू असताना एकदा त्यांचा उल्लेख “मुलजिम” (आरोपी) ऐवजी चुकून “मुलाजिम” (नोकर) असा झाला तर या पठ्ठ्याने थेट न्यायाधिशाला सुनावले –
    “मुलाजिम हमको मत कहिये, बड़ा अफ़सोस होता है; अदालत के अदब से हम यहाँ तशरीफ लाए हैं। पलट देते हैं हम मौजे-हवादिस अपनी जुर्रत से; कि हमने आँधियों में भी चिराग अक्सर जलाये हैं।”
    ही शायरी ऐकून न्यायाधीश चाटच पडला, हे सांगणे न लगे!
    त्यांची तर्कनिष्ठ शैली पाहून एकदा न्यायाधीशांनी त्यांना विचारले होते की, “बिस्मिल, कोणत्या विद्यापीठातून मिळवलीत कायद्याची पदवी?” हे महाशय खाडकन् उत्तरले होते, “किंगमेकर डज् नॉट नीड एनी डिग्री”!
    २) रामप्रसाद किती जरी हिंदुत्ववादी असले तरी त्यांचे जीवश्चकंठश्च मित्र होते – अशफाकउल्लाह खान! किंबहुना भारतीय स्वातंत्र्यासाठी फाशी जाणारे पहिले मुसलमान होते अशफाकउल्लाह खान! फाशी जाण्यापूर्वी लिहिलेल्या “अशफाक की आखरी रात” या काव्यात हा वीर काय म्हणतो पाहा तरी एकदा –
    “जाऊँगा खाली हाथ मगर,यह दर्द साथ ही जायेगा;जाने किस दिन हिन्दोस्तान,आजाद वतन कहलायेगा।
    बिस्मिल हिन्दू हैं कहते हैं, फिर आऊँगा-फिर आऊँगा; ले नया जन्म ऐ भारत माँ! तुझको आजाद कराऊँगा।।
    जी करता है मैं भी कह दूँ, पर मजहब से बँध जाता हूँ; मैं मुसलमान हूँ पुनर्जन्म की बात नहीं कह पाता हूँ।
    हाँ, खुदा अगर मिल गया कहीं, अपनी झोली फैला दूँगा; औ’ जन्नत के बदले उससे, यक नया जन्म ही माँगूँगा।।”
    त्यांच्या मजारवर त्यांचे किती चपखल काव्य आहे पाहा—
    “जिन्दगी वादे-फना तुझको मिलेगी ‘हसरत’,
    तेरा जीना तेरे मरने की बदौलत होगा।”
    ३) या त्रयीतले तिसरे वीर होते ठाकूर रोशनसिंह! या महाधीराने फाशीच्या अवघ्या तीनच दिवस आधी आपल्या मित्राला एक पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी जे लिहिलंय, त्यावरून त्यांच्या देशभक्तीचा आणि स्थितप्रज्ञतेचा अंदाज बांधता येतो –
    “इस सप्ताह के भीतर ही फाँसी होगी। ईश्वर से प्रार्थना है कि वह आपको मोहब्बत का बदला दे। आप मेरे लिये रंज हरगिज न करें। मेरी मौत खुशी का बाइस (कारण) होगी। दुनिया में पैदा होकर मरना जरूर है। दुनिया में बदफैली करके अपने को बदनाम न करे और मरते वक्त ईश्वर की याद रहे;यही दो बातें होनी चाहिये और ईश्वर की कृपा से मेरे साथ ये दोनों बातें हैं। इसलिये मेरी मौत किसी प्रकार अफसोस के लायक नहीं है। दो साल से बाल-बच्चों से अलग रहा हूँ। इस बीच ईश्वर भजन का खूब मौका मिला। इससे मेरा मोह छूट गया और कोई वासना बाकी न रही। मेरा पूरा विश्वास है कि दुनिया की कष्ट भरी यात्रा समाप्त करके मैं अब आराम की जिन्दगी जीने के लिये जा रहा हूँ। हमारे शास्त्रों में लिखा है कि जो आदमी धर्म युद्ध में प्राण देता है उसकी वही गति होती है जो जंगल में रहकर तपस्या करने वाले ऋषि मुनियों की।”

    भारतमाता ही खरोखर वीरप्रसवा आहे. परंतू या वीरांना विसरून जाणे हा इथल्या धर्मनिरपेक्षतेचा रिवाज आहे! आज या तिन्ही हुतात्म्यांना नमन करताना भीती वाटते की, आम्ही जर आमच्या वीरांना आणि त्यांच्या कार्याला विसरलो, तर येणारी पिढी प्रेरणा कुणापासून घेणार? ज्यांच्यावर पुढच्या पिढीने डोकी ठेवावीत, असे पाय कुठून येणार? तुम्हालाही वाटतेय का हो ही भीती? जर वाटत असेल, तर उठा – जागे व्हा आणि मिळवून द्या या हुतात्म्यांना त्यांचे उचित स्थान! नाहीतर
    “शहिदोंकी मजारोंपर लगेंगे हर बरस मेले
    वतनपर मिटनेवालोंका बाकी निशाँ होगा”
    या ओळी वल्गनाच ठरतील, व्यर्थ ठरतील. आणि असे झाले, तर आपल्यासारख्या करंटे केवळ आपणच असू..!

    – © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी तसेच लेखकाने व्याख्यानांतून मांडलेली विविध क्रांतिकारकांची चरित्रे ऐकण्यासाठी आणि या विषयांवर लेखकाचे व्याख्यान आयोजित करण्यासाठी संपर्क करा – www.vikramedke.com)

    image

  • काफिर हैं वो..

    आपल्यापैकी बहुतेकांना पंडित द्वारकानाथ कौल हे नाव ऐकूनही माहिती नसेल. “नसिम” या फारसी टोपणनावाने लिहिणारे १९व्या शतकातील अतिशय महान शायर पंडित दयाशंकर कौल यांचा हा मुलगा. पंडित द्वारकानाथांना अतिशय कमी – अवघ्या २८ वर्षांचंच आयुष्य लाभलं, परंतू आपल्या अमर कृतींच्या रुपाने ते आजही जिवंत आहेत.

    कौल घराणं काश्मिरी पंडितांचं. द्वारकानाथजीही फारसीतून लिहित असले तरीही हिंदू धर्माचे अतिशय अभिमानी. त्यांचा हाच अभिमान तत्कालीन काही मुसलमान शायरांना खटकत असे.

    image

    एकदा एका नवाबाने आपल्या संस्थानात मुशायरा (कविसंमेलन) आयोजित केला होता. द्वारकानाथजींनाही निमंत्रण होतं. द्वारकानाथजींचा द्वेष करणारे काही शायर नवाबाच्या कानाशी लागले आणि नवाबासकट सगळ्यांनी मिळून पंडितजींचा पाणउतारा करण्याची एक योजना आखली. आधीच ठरल्याप्रमाणे नवाबाने ऐन कार्यक्रमात जाहीर केलं की, आता मी ऊर्दूतील एक ओळ देईन आणि सगळ्या कवींनी त्याओळीआधीची ओळ रचून शेर पूर्ण करायचा! यांनी आधीच ठरवलेल्या योजनेनुसार नवाबाने ओळ दिली –

    “काफिर हैं वो जो बन्दे नहीं इस्लामके”
    [इस्लामला न मानणारे काफिर असतात]

    काफिर म्हणजे “ईश्वराला न मानणारे”. मुस्लिम तत्त्वज्ञानाचे अभ्यासक सरसकटपणे या शब्दाचा अर्थ “इस्लामप्रणीत ईश्वराला न मानणारे” असा करतात. अश्या या काफिरांचं काय करावं याबद्दल कुरआनात मनोरंजक आज्ञा दिल्या आहेत, त्या प्रत्येकाने -.विशेषत: सर्वधर्मसमभाववाल्या मित्रांनी अवश्य वाचाव्यात!

    असो! तर नवाबाने उपरोक्त ओळ दिल्या दिल्या सगळे शायर एका मागोमाग एक इस्लामची स्तुती करणारे शेर रचू लागले. या ओळीवर दुसरं काहीच लिहिलं जाऊ शकत नव्हतं, त्यामुळे पंडितजींनाही आज त्यांचा सारा अभिमान बाजूला सारून स्तुतीपर शेर रचावाच लागेल, हे माहिती असल्याने सार्यांच्याच मनात जणू लाडू फुटत होते. पंडितजींना हिणवण्यासाठी एकेक रचना सादर केल्या जात होत्या.
    होता होता पंडितजींची पाळी आली! त्यांनी एकवार डोळे मिटून घेतले. डोळे उघडून आत्मविश्वासपूर्ण नजरेने रचना सादर केली,

    “लाम के मानिन्द गेसू हैं मेरे घनश्यामके ।
    काफिर हैं वो जो बन्दे नहीं इस-लामके ।।”
    [“ल” अक्षरासारखे मनमोहक कुरळे केस आहेत माझ्या घन:श्याम मुरारीचे (फारसीत
    “ल”ला “लाम असे म्हणतात). काफिरच म्हटलं पाहिजे त्यांना जे भक्त नाहीत
    या “लाम”चे! (“इस्लामके” नव्हे तर पंडितजींनी फोड केलीय “इस लामके”)]

    पार नवाबासुद्धा सारी सभा अवाक झाली! पंडितजींनी त्यांच्याच ओळीचा आधार घेऊन, भगवान श्रीकृष्णाला न मानणार्यांना “काफिर” ठरवलं होतं. काव्यप्रतिभेत स्पर्धा केली असती तर गोष्ट वेगळी, परंतू धार्मिक आधारावर पंडितजींचा अपमान करायचा प्रयत्न करणार्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊन पंडितजींनी अक्षरशः सगळ्यांचे दातच घशात घातले होते! पंडितजींची वाहवाही करण्याखेरीज कुणाकडे काही पर्यायच उरला नव्हता!

    असे हे पंडित द्वारकानाथ कौल! आजकालच्या धर्मनिरपेक्ष युगात हा “सांप्रदायिक” कवी धर्मांध ठरून विस्मृतीच्या गर्तेत जाणे स्वाभाविकच आहे! स्वयंघोषित धर्मनिरपेक्षांनी आखून दिलेल्या मार्गावरच चालणार्या शिक्षणपद्धतीत तयार झालेल्यांना तर पंडितजींचे नावही माहिती असण्याची सुतराम शक्यता नाही! परंतू
    सत्य हे कुणा विचारधारेला बांधील नसून शाश्वत असते. कोंबडा झाकल्याने काही सूर्य उगवायचा राहात नाही! त्यामुळे ज्यांना अजूनही सत्यघटनांची अजूनही चाड उरली आहे, अश्यांसाठी ही घटना उजेडात आणणे मला आवश्यक वाटले. यानिमित्ताने तरी या महान कवीच्या स्मृती जाग्या राहातील, त्यांना उजाळा मिळेल, त्यांच्यापासून कुणीतरी पुन्हा प्रेरणा घेईल, किमान पंडितजींच्या लेखनाचा तरी अभ्यास करेल; ही अपेक्षा!

    – © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी वा लेखकाने विविध विषयांवर दिलेली व्याख्याने डाऊनलोड करून ऐकण्यासाठी भेट द्या – www.vikramedke.com)

  • भेट: इतिहासकाराची इतिहासाशी!!

    सावरकरांना देशाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर ढकलण्यासाठी इंग्रजांनी त्यांना रत्नागिरीत स्थानबद्ध केले खरे. परंतू सावरकरांच्या व्यक्तिमत्वाची मोहिनीच इतकी काही जबरदस्त होती की, लवकरच आडगावी असलेले रत्नागिरी शहर हिंदुस्थानच्या गुप्त राजकारणाचे महत्वपूर्ण केंद्र बनले. सावरकरांना भेटायला येणाऱ्यांचा, चर्चा-मसलती करणाऱ्यांचा ओघच रत्नागिरीत सुरू झाला. मोहनदास गांधींपासून ते थेट अलीबंधूंपर्यंत सगळ्यांनाच रत्नागिरीत यावे लागले.

    त्याकाळी सावरकर रत्नागिरीच्या पटवर्धनांकडे मुक्कामी होते. असेच दुपारच्या वेळी दार वाजले म्हणून पाहातात तर काय, दारात एक वयोवृद्ध व्यक्ती उभी. वयोवृद्ध असली तरी चेहऱ्यावरील बुद्धिमत्तेची आभा मात्र चिरतरुण होती.

    image

    “कोण?”, सावरकरांनी हलकेच विचारले.
    “मी  बडोद्याचा सरदेसाई. इतिहास लिहितो म्हणून तुम्हाला कदाचित माहिती असेल”.
    सावरकर चमकलेच, “म्हणजे… तुम्ही.. रियासतकार…”?

    सावरकरांच्या नजरेसमोरून आठवणींचा पट झरझर सरकू लागला. रियासतकार सरदेसाई! त्यांनी लिहिलेल्या सुसंशोधनाधारित इतिहासावरच तर सावरकरांचा पिंड पोसलेला! विद्यार्थीदशेतच त्यांची बहुतेक पुस्तके सावरकरांनी वाचून काढलेली. “१८५७ चे स्वातंत्र्यसमर” लिहिताना अंगी बाणवलेली इतिहासलेखनाची दुर्लभ शिस्त, रियासतकारांच्याच तर पदचिन्हांवर चालताना मिळवलेली! कित्येकदा वाटलं, सरदेसायांना भेटावं. नपेक्षा किमान पत्रातून तरी संवाद साधावा. पण सावरकर पडले क्रांतिकारक. त्यांच्याशी संबंधित सगळ्यांवरच सरकारचा रोष. प्रसंगी नुसत्या ओळखीच्यांवरही राजद्रोहाचा ठपका येण्याची भिती. त्यातून रियासतकार बडोद्याच्या संस्थानात जरी नोकरी करत असले तरी बोलून-चालून सरकारी नोकरीच ती! कशी भेट व्हावी? पत्र लिहावं म्हटलं तर सावरकरांचे अक्षर म्हणजे अंगार! सावरकरांची बोटभर चिठ्ठी जरी कुणाकडे सापडली तरी त्याच्या घरादारावर जप्ती येणार हे ठरलेलेच! कित्येकदा हस्तेपरहस्ते निरोप पाठवून दोघांचे बोलणे झालेले. पण तेवढ्यापुरतेच. इच्छा असूनही भेटीची, संपर्काची अभिलाषा मनातच दाबून ठेवावी लागलेली. तेच सरदेसाई आज स्वत:च समोर उभे राहून विचारत होते की,
    “मी बडोद्याचा सरदेसाई. इतिहास लिहितो म्हणून तुम्हाला कदाचित माहिती असेल”.

    सावरकरांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यांनी प्रेमाने रियासतकारांना घरात बोलावले. खूप गप्पा झाल्या दोघांच्या. मराठ्यांचा इतिहास किती जरी तेजस्वी असला तरी महाराष्ट्राबाहेर फारसा कुणाला ठाऊक नाही — तो जर रियासतकारांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीतून लिहिला तर साऱ्या जगाला महाराष्ट्राच्या पराक्रमाची किर्ती समजेल, ही आपल्या आपल्या मनीची इच्छा सावरकरांनी रियासतकारांना बोलून दाखवली. वृद्धापकाळ आणि प्रकृतीअस्वास्थ्य या कारणांमुळे हे शिवधनुष्य आपल्याला पेलणार नाही असे रियासतकारांनी प्रांजळपणे सावरकरांना सांगितले. विशेष म्हणजे, त्यानंतर लवकरच रियासतकारांनी सावरकरांच्या विनंतीचा मान राखत मराठा साम्राज्याचा इतिहास लिहिला. आणि तोही इंग्रजीतूनच लिहिला!

    निरोपाची वेळ झाली, तसे सावरकर नम्रपणे म्हणाले, “आपल्यासारख्या थोर इतिहासलेखकाचे दर्शन झाले. खरोखर भाग्यच म्हटले पाहिजे हे माझे!”
    रियासतकार हसले. म्हणाले, “भाग्य तुमचे नव्हे. भाग्य कुणाचे असेल, तर ते माझेच. कारण आम्ही नुसतेच इतिहास लिहून ठेवणारे. एकप्रकारे कारकूनच म्हणा ना! परंतू तुम्ही.. तुम्ही तर साक्षात स्वातंत्र्यवीर! कर्तृत्वाच्या बळावर इतिहास निर्माण करणारे! खऱ्या अर्थाने ‘इतिहासकर्ते’! आजवर पूर्वजांचा इतिहास अनेकदा लिहिलाय मी. मात्र आज पहिल्यांदाच जिवंत इतिहास कसा असतो, ते पाहाण्याचे भाग्य लाभलेय मला! आज मी खऱ्या अर्थाने धन्य झालो”!

    सावरकरांना काय बोलावे तेच कळेना. त्यांनी विनम्रतेने मान तुकवली. मान वर केली, तो ते इतिहासमहर्षी झपझप पावले टाकीत जात होते. इतिहासकर्ता आणि इतिहासकाराच्या भेटीचा तो अपूर्व क्षण इतिहास आपल्या आठवणींच्या कुपीत अलगद साठवून घेत होता, येणाऱ्या पिढीला त्याचा सुगंध देण्यासाठी..!

    – © विक्रम श्रीराम एडके
    (सर्वाधिकार लेखकाधीन. लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चरित्रावर लेखकाने दिलेली व्याख्याने ऐकण्यासाठी, तसेच सावरकरांच्या अलौकिक चरित्रावर लेखकाचे व्याख्यान आयोजित करण्यासाठी संपर्क करा — www.vikramedke.com)

  • अभिव्यक्तीस्वातंत्र्य असेही..!

    गिरीश कर्नाड ही व्यक्ती तर आपणा सर्वांना माहितीच असेल. ते लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत. अभिनेतेही आहेत. परंतू एवढीच एक ओळख नाहीये त्यांची. या सगळ्यासोबतच श्री. कर्नाड हे सेक्युलॅरिझमच्या भारतीय आवृत्तीचे मूर्तीमंत प्रतीकही आहेत! मग त्यासाठी ते विविध मंचांवरून हिंदूत्वविरोधी वक्तव्ये (बऱ्याचदा प्रसंग सोडून!! आठवा काही महिन्यांपूर्वी व्हि. एस. नायपॉल यांच्यावर त्यांनी केलेली टिका!) करीत असतात. मराठा साम्राज्याच्या शूर पेशव्यांना कित्येकदा पाठ दाखवून पळालेल्या जिहादी टिपूचे समर्थन करत असतात. त्यांना तुघलकही आवडतो म्हणे! मागील वर्षी तर या महानुभावांनी कमालच केली. जयपूरच्या साहित्य महोत्सवात त्यांनी भारतरत्न रवींद्रनाथ ठाकूरांचा उल्लेख “एक थर्डक्लास नाटककार” असा केला. त्यावरून बरेच वादळही उठले होते. कर्नाडांनी त्यावेळी स्वत:च्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे जोरदार समर्थनही केले होते!

    नुकताच या प्रकरणाचा उत्तरार्ध पार पडला. मात्र सुदैवाने म्हणा वा दुर्दैवाने, परंतू तो कर्नाडांसाठी फारसा आनंददायी नाहीये!

    बेंगरुळूच्या “रंगशंकरा”ने श्री. कर्नाड यांच्या नाट्यरचनांवर आधारित एका महोत्सवाचे आयोजन केले होते. दोन दिवसांच्या या कार्यक्रमात काही चर्चासत्रे होणार होती, कर्नांडांच्या नाटकांचे प्रयोग होणार होते, इतकेच नव्हे तर कर्नाडांनी दिग्दर्शित केलेला चित्रपटही दाखवला जाणार होता. असा सगळा ‘कर्नाडमय’ प्रकारचा मोठ्ठा घाट घातलेला होता! या कार्यक्रमात २३ ऑक्टोबर रोजी पुदुच्चेरीच्या एका नाट्यसंस्थेने बसवलेले आणि कर्नाडांनी लिहिलेले “ड्रिम्स ऑफ टिपू सुलतान” नाटक सादर होणार होते. नाटक व्यवस्थित चालू असताना अखेरच्या १५ मिनिटांत मात्र गंमत घडली! मंचावर अचानक एका अतिरेक्याने प्रवेश केला आणि तो जोरजोराने भारतविरोधी घोषणा द्यायला लागला. पुदुच्चेरीच्या त्या दिग्दर्शकाने नाटकाचा अखेरचा प्रसंग बदललाय हे प्रेक्षकांच्या लक्षात येईपर्यंत, पात्रांपैकी एकाने त्या अतिरेक्याला मारल्याचा अभिनय केला. मग दुसऱ्याने त्याच्या चेहऱ्यावरील बुरखा बाजूला केला. मग त्यांच्यापैकी एकजण म्हणाला ‘अरे हे तर गिरीश कर्नाड’! आणखी एकजण म्हणाला, ‘कर्नाड मेले’! एकाने त्या अतिरेक्याच्या (की कर्नाडांच्या!) पात्राचे खिसे तपासले, तर त्यात काही कागद सापडले. मग एकाने ‘हे फालतू आहे’ असं म्हणून ते सारे कागद फेकून दिले!
    तोपर्यंत प्रेक्षकांमध्ये कुजबूज आणि चुळबूळ सुरू झालेली! काहींनी विरोध करत थेट रंगमंचावर धाव घेतली. कडाक्याचे भांडण होईल असे वाटत असतानाच ‘रंगशंकरा’च्या संचालिका आणि अभिनेत्री अरुंधती नाग मध्ये पडल्या आणि ‘कुणाला जर या खोडसाळपणाबद्दल दिग्दर्शकाला जाब विचारायचा असेल तर त्यांनी संध्याकाळी ७.३० च्या प्रयोगात थेट दिग्दर्शकालाच विचारावं’ असं सांगितलं.

    संध्याकाळच्या प्रयोगातही हाच प्रकार! परत गोंधळ सुरू झाला तेव्हा दिग्दर्शक कुमार वल्लवन स्वत:च मंचावर आले आणि त्यांनी सांगितले की, “एवढा गोंधळ घालायला काय झालं? मंचावर उभे राहून दुसऱ्या नाटककाराचा अपमान करणे तर आम्ही श्री. कर्नाडांकडूनच शिकलो आहोत! त्यांनीही नाही का रवींद्रनाथांचा अगदी असाच अपमान केला? त्या घटनेचा जर आम्ही असा प्रतिकात्मक निषेध करतोय तर काय चुकलं? रवींद्रनाथांना थर्डक्लास नाटककार म्हणणे हे जर कर्नाडांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य असेल, तर त्याचा असा निषेध करणे हे आमचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य नव्हे काय”!!

    यानंतर काय झाले हे समजू शकलेले नाही, परंतू कर्नाडांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य त्यांच्याच महोत्सवात त्यांच्यावरच उलटले हे नक्की. बाकी त्यांचे दात घश्यात गेले किंवा काय हे कर्नाडच जाणे!!
    (‘इंडियाफॅक्ट्स’मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीच्या आधारे.
    मूळ बातमीची लिंक – http://www.indiafacts.co.in/girish-karnad-medicine/)

    – © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी भेट द्या – www.vikramedke.com)

    image

  • सौंदर्यदृष्टीची सद्गुणविकृती: राम-लीला

    स्वा. सावरकरांनी मानवी स्वभाव स्पष्ट करणारी एक जबरदस्त संकल्पना मांडलीय – सद्गुणविकृती! अर्थात सद्गुणांचाही जर एका मर्यादेपलिकडे अतिरेक झाला तर ते वाईटच. त्यातून विकृतताच उभी राहाते. सिनेमा क्षेत्रात या संकल्पनेचे चपखल उदाहरण आहे – संजय लीला भन्साळी! कमालीच्या सौंदर्यदृष्टीने चित्रीकरण करणारा हा माणूस केव्हा त्या सौंदर्यदृष्टीच्या अतिरेकात आणि अट्टाहासात हरवून जातो, त्याचे त्यालाही कळत नाही. एरव्ही व्यवस्थित ठिकाणी घडणारी कथा त्याला भव्यातिभव्य सेट्सवरच (तेही चित्रविचित्र रंगांच्या!) का घडायला हवी असते तेच कळत नाही. मोठमोठे सेट्स आणि पात्रांच्या साध्यासाध्या प्रसंगांतही प्रमाणबद्ध हालचाली कथेला मारून टाकतात आणि उरतो फक्त एक मोठ्ठा डोलारा! सद्गुणविकृती, दुसरं काय!

    अगदी हेच “राम-लीला”च्याही बाबतीत घडलंय. मुळात “रोमिओ-ज्युलिएट” ही कथा चावून चोथा झालेली. अगदी हिंदी सिनेमातच या कथेचा गेल्या २ वर्षांत तब्बल ३ वेळा रिमेक झालेला (इशकजादे, इसक आणि राम-लीला)!! तीच जुनी ‘खानदानी दुश्मनी’ची कथा घेऊन त्याला गुजरातच्या खेड्यांत एकेकाळी अस्तित्वात असलेल्या माफिया-राजची फोडणी द्यायची, त्यात दर पाच मिनिटांनी एक गाणे टाकायचे आणि हे सारेच्या सारे प्रकरण भल्यामोठ्ठ्या सेट्सवर(च) चित्रित करायचे; की झालीच भन्साळींची ‘राम-लीला’ तयार! बरं, चित्रपट इतका मोठा आहे की, त्याचा शोकांत होत असताना प्रेक्षकांना वाईट वाटण्याऐवजी सुटकेची भावना वाटते हो!! चित्रपट चालू असताना मला स्वत:लाच कित्येकदा एकदाचं ‘राम’ आणि ‘लीला’ला मारून टाकावं आणि सगळा किस्साच संपवून टाकावा असं वाटून गेलं..!

    हा झाला एक भाग. परंतू कथा घडताना कुठेतरी, काहीतरी तर्कशास्त्र हवं की नको? ‘राम’ आणि ‘लीला’ एकमेकांना पाहातात आणि दुसऱ्याच क्षणी रोमान्स करायला लागतात. तोही शारिरीक! हा काय प्रकार आहे बुवा? म्हणजे एखादं लहान बाळ पहिल्याच भेटीत अगदी आनंदाने आपल्या कडेवर आलं की, त्याची आई कशी म्हणते – ‘ओळख लागत नाही हो आमच्या शोन्याला, लगेच झेपावतो’! अगदी तस्संच!! नायक आणि नायिका आहेत म्हटल्यावर ते एकमेकांच्या प्रेमात पडलेच पाहिजेत, त्यासाठी कारण कश्याला हवं; या अश्या प्रेक्षकांना गृहित धरण्याच्या वृत्तीपायी व्यक्तिरेखा कच्च्याच राहून गेल्यायत. याचा सगळ्यात जास्त फटका बसलाय तो ‘राम’च्या व्यक्तिरेखेला. त्याची व्यक्तिरेखा सर्वाधिक विखुरलेली झालीये. त्यामुळे जिथे त्याने शांत राहाणे गरजेचे असते तिथे तो तलवार उपसून धावतो तर जिथे नायकत्व दाखवायला हवे तिथे उगाचच शांत राहातो वा रडतो-भेकतो! असाच प्रकार ‘लीला’च्याही बाबतीत झालाय, परंतू दिपिकाने आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर व्यक्तिरेखेतली ही कमतरता सहज लपवलीय. बरं रणबीरच्या लकबी पाहा, दिपिकाची एन्ट्री पाहा – कश्याची आठवण येते? ‘हम दिल दे चुके सनम’मधल्या सलमान-ऐश्वर्याची? बरोब्बर!! हेच पाहायचं होतं तर आम्ही तोच चित्रपट परत पाहू ना. पैसे खर्चून ‘हे’ का पाहावं? एक दिग्दर्शक म्हणून भन्साळीत येत असलेला हा तोच-तोचपणा वाईट आहे. नि:संशय ते सारं पडद्यावर सुंदर दिसतं. पण अर्थपूर्ण आहे का, तर अजिबातच नाही! पुन्हा सद्गुणविकृती!!

    अभिनयाच्या पातळीवर सर्वाधिक कमाल केलीये ती सुप्रिया पाठकने! संतोकबेन जडेजापासून प्रेरित वाटणारी ही ‘बा’ची व्यक्तिरेखा तिने इतकी जबरदस्त उभी केलीये की, तिची स्तुती करायला माझ्याकडे शब्दच नाहीत! त्याखालोखाल आहे ती दिपिका. किंबहुना दिपिकाचा अभिनय नसता, तर चित्रपट सहन करणं अशक्यच होतं. रणबीरनेही अतिशय उत्तम काम केलंय. पण तो दिपिकासारखा व्यक्तिरेखा-लेखनातील उणीवांवर मात करू शकलेला नाहीये, हे उघड आहे. लहानश्याच भूमिकांमध्ये अभिमन्यू सिंग, रिचा चड्ढा, बरखा बिष्ट, शरद केळकर ही मंडळी प्रभाव टाकून जातात. परंतू मुळातच कथेच्या पातळीवर एवढी मोठ्ठी बोंब आहे की, कुणाचाही अभिनयाविष्कार चित्रपटाला समर्थनीय ठरवू शकलेला नाहीये. भन्साळीचे एकाच बाबतीत कौतुक करावेसे वाटतेय, ते म्हणजे ‘संगीत’! चित्रपटाचे संगीत खरोखर चांगले आहे.

    चित्रपटात काही तुरळक चांगले क्षणही आहेत. उदा. – गोळ्यांच्या तालावर केलेला ‘भाई-भाई’ गरबा, अभिमन्यू सिंग आणि शरद केळकरच्या मृत्यूचा प्रसंग, ‘लीला’चे बोट कापण्याचा प्रसंग वगैरे. परंतू चित्रपटाच्या लांबीच्या मानाने अश्या प्रसंगांची संख्या अगदीच कमी आहे.

    ‘राम-लीला’ करणारे पिढीजात कलावंत असतात. आणि ‘जेनो काम तेनो थाये, दूजा करे सो गोता खाये’ ही म्हण आपण सर्वांनीच ऐकलीय. भन्साळींनी ‘राम-लीला’द्वारे तीच म्हण पुन्हा एकवार सिद्ध केलीये. त्यामुळेच उत्तम चित्रपट बनवण्याची क्षमता असलेल्या भन्साळींचा हा प्रयत्न सौदर्यदृष्टीच्या सद्गुणविकृतीचे एक उदाहरण तेवढे बनून राहिलाय..!

    * २/५.

    – © विक्रम श्रीराम एडके.
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी भेट द्या – www.vikramedke.com)

    image