Author: Vikram Edke

  • तुकडा तुकडा चंद्र..

    तुकडा तुकडा चंद्र..

    रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी एकटाच जागताना
    तुला मागतो मी मला त्यागताना
    मोडतो डाव चांदण्यांचा अन् भान होते मंद्र
    रात्रीच्या कुपीत भरतो मी तेव्हा, तुकडा तुकडा चंद्र!

    डोकावले असतेस तू जर आसवांच्या विहारी
    भेटलो असतो मी पापण्यांच्या किनारी
    विसरतेस तू ही जेव्हा हासण्याचे तंत्र
    रात्रीच्या कुपीत भरतो मी तेव्हा, तुकडा तुकडा चंद्र!

    वाट ही अंधारयुगाची एकट्यानेच चालण्याची
    कोमेजलेली विरहफुले तव वेणीत माळण्याची
    विश्रब्ध नेणीवेत भानू आळवतो प्रात:मंत्र
    रात्रीच्या कुपीत भरतो मी तेव्हा, तुकडा तुकडा चंद्र!

    – © विक्रम श्रीराम एडके.
    (www.vikramedke.com)

    image

  • ‘ति’ची गोष्ट

    ‘ति’ची गोष्ट

    दिवसभर ऍटिट्यूड सांभाळून वावरणारी ती आपल्याच तोऱ्यात असते,
    दिवाणे जग हे सारे तिच्या बोटाच्या टोकावर नाचते!
    वाऱ्याच्या नादावर धरलेला असतो तिने ताल —
    अन् अस्मानावर ती उधळते अधरांचा रंग लाल!
    भीती कश्याची? पर्वा कुणाची? मला कोण रोखेल?
    हसविणे, फसविणे, उंच उडविणे — माझा रोजचाच खेळ!
    “‘त्या’नेही नव्हते का मला फसविले असेच,
    टाकले नव्हते का ‘त्या’ने बंधनात?
    उसळला होता आगडोंब कसा त्याक्षणी मना-कणांत”!
    सांगत होती — “कसे उतरले होते गालावर आसू,
    अन् निर्मिले होते कसे मी त्यातूनच भेसूर हासू!
    त्या माझ्या भेसूर हास्यरवात सारे मी विसरते —
    त्याच खेळाचे नियम वापरून ‘त्या’च्यासारख्यांना खेळवते”!

    तो शांतपणे ऐकत असतो सारे, एव्हाना उत्तररात्रीचे पडघम वाजू लागतात,
    एकेका त्या ठोक्यासोबत मुखवटे तिचे गळू लागतात!
    कढ दु:खाचे पचवलेला चेहरा मग उमलू लागतो,
    हजार जखमांनी घेरलेला, पण त्याला निरागस भासतो!
    भिवईच्या इशाऱ्यावर नाचविणारे डोळे शोधू लागतात आधार,
    मुखवटा गळाल्याची जाणीव व्हायलाही, लागतात तिला पळें चार!
    पण डोळे होतात शुष्क तिचे, क्षणभरात सावरते,
    त्याच्या नजरेतला स्नेह पाहून अजूनच ती बावरते!
    म्हणते, “तिरस्कार कर माझा” — तो ललाटीं ओठ टेकवतो!
    “वस्तू का नाही समजत मला?” — तर तो बोटांत बोटे अडकवतो!!
    ‘मला ओरबाडण्याची का याला तहान नाही?’, ती दचकून मागे सरते,
    इतक्या महिन्यांची मैत्री त्यांची, पण ओळख नव्यानेच पटते!
    “विकेट पडेल हो तुझी!”, ती हसत-हसत उठते —
    अन् आयुष्यात पहिल्यांदाच तिला प्रेम जाणवलेले असते!!!

    – © विक्रम श्रीराम एडके.
    (www.vikramedke.com)

  • सेक्युलरी गौडबंगाल : एक चिंतन

    सेक्युलरी गौडबंगाल : एक चिंतन

    आपल्या बऱ्याच मित्रांना स्वत:ला ‘सेक्युलर’ म्हणवून घ्यायची खाज असते. कारण काय, तर म्हणे भारत हा एक सेक्युलर देश आहे. या ‘सेक्युलर’ शब्दाचे उपद्रवमूल्य समजल्यामुळे हा शब्द एखाद्या शिवीसारखा वापरणाऱ्यांची संख्यादेखील लक्षणीय आहे. पण या सेक्युलर-भक्तांना आणि विरोधकांनाही एक गोष्ट अजिबात ठाऊक नसते की, भारतात हे सेक्युलरी गौडबंगाल आलं कधी?

    तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल मित्रहो, परंतू हा ‘सेक्युलर’ शब्द भारताच्या संविधानात ४२व्या घटनादुरुस्तीअन्वये घुसडण्यात आला! मी मुद्दामच ‘घुसडण्यात आला’ असे म्हणतोय, कारण भारतात ढोबळमानाने १९७५ ते १९७७ आणीबाणी होती आणि ही उपरोक्त घटनादुरुस्ती झाली आहे १९७६ साली! तेव्हा हा ‘सेक्युलर’ शब्द घटनेत कुणी टाकला असेल, काय हेतूने टाकला असेल, आणि किती मोकळ्या वातावरणात टाकला असेल; हे वेगळे सांगायलाच नको! म्हणजे थोडक्यात, घटना अस्तित्वात आल्यापासून सुमारे पाव-शतक या ‘सेक्युलर’ देशाच्या घटनेत ‘सेक्युलर’ हा शब्दच नव्हता आणि तरीही हा देश ‘सेक्युलर’ होता!!

    अजून एक गंमत सांगतो. भारतात आज अस्तित्वात असलेला कोणताही कायदा उघडून पाहा. त्यात धारा (सेक्शन) क्र. २ हा नेहमीच व्याख्या-विभाग (डेफिनिशन क्लॉज) असतो. अगदी संविधानातसुद्धा! या व्याख्याविभागात त्या-त्या कायद्यात आलेल्या सर्वच पारिभाषिक शब्दांची त्या-त्या कायद्याला अभिप्रेत असणारी व्याख्या केलेली असते. आणि त्या-त्या कायद्यात तो-तो शब्द केवळ त्याच आणि त्याच अर्थाने वापरला जातो, अन्य नाही! आपल्या देशाच्या संविधानाचा गाभा हा त्याच्या प्रस्तावनेत (प्रिऍम्बल) आहे. हा ‘सेक्युलर’ शब्ददेखील त्याच प्रस्तावनेत येतो, परंतू तुम्हाला नवल वाटेल – व्याख्याविभाग तर सोडाच, परंतू संपूर्ण संविधानात कुठेही ‘सेक्युलर’ या शब्दाची व्याख्याच केलेली नाही! आता बोला!! आता व्याख्याच नाही म्हटल्यावर ‘आपला देश धर्मनिरपेक्ष, की निधर्मी’ असे प्रश्न उभे राहाणे साहाजिकच आहे ना!

    तेव्हा आपले जे कोणी मित्र स्वत:ला सेक्युलर म्हणवून घेण्यात धन्यता मानत असतील, त्यांनी एक गोष्ट पक्की समजून असावे की ते स्वत:स एक अव्याख्यित आणि प्रसंग व राजकीय सोयीनुसार सातत्याने बदलणाऱ्या अर्थाची बिरुदावली चिकटवताहेत! कारण संविधानात या शब्दाची व्याख्याच नसल्यामुळे प्रत्येकवेळी व्याख्येसाठी बाह्य साधनांवरच अवलंबून राहाणे भाग आहे. आणि अमुकच ठिकाणी केलेली व्याख्या अधिकृत असादेखील काही नियम नसल्याने प्रसंगानुसार अथवा व्याख्या करणाऱ्या न्यायसंस्थेनुसार ही व्याख्या सतत बदलत राहाणेही साहजिकच आहे! मग ती अगदी ‘निधर्मी’ पासून ते ‘धर्मनिरपेक्ष’ पर्यंत काहीही होऊ शकते. आणि त्या-त्या प्रमाणे आपल्या या सेक्युलरांध मित्रांचे वैचारिक अस्तित्वही बदलत जाते! आहे की नाही गंमत!

    खरं तर आपल्या देशात अधूनमधून जे विचित्र प्रवाह वाहातात, त्याचे मूळ हे या ‘सेक्युलर’नामक अव्यक्त शब्दास अवास्तव महत्व देण्यात आहे! या शब्दाचा आपल्याकडे नेहमीच राजकीय स्वार्थाच्या अनुषंगाने अन्वयार्थ लावला जातो, हे एक उघड गुपित आहे! त्यामुळेच रझा अकादमीसारख्या संस्थेवर बंदी घातलीच जात नाही, मात्र ‘हिंदूराष्ट्र सेना’ या अद्यापि आरोप सिद्धदेखील न झालेल्या संघटनेवर बंदी घालण्याची भाषा बोलली जाते. आसारामबापूंवर टिकेचे भलेमोठे सत्र चालते परंतू त्याचप्रकारचा आणि तितकाच गंभीर गुन्हा केलेल्या पॉल दिनाकरनबद्दल कुणालाच चकार शब्दही काढावासा वाटत नाही! ‘मोस्ट वॉण्टेड’ अबू सालेम तुरुंगातच एखाद्या मल्लासारखी शरीरयष्टी कमावतो मात्र अद्यापपावेतो आरोपपत्रही दाखल न झालेले स्वामी असीमानंद आणि साध्वी प्रज्ञासिंहजी तुरुंगात नरकयातना भोगतात! मालेगावच्या तरुणांना पुराव्याअभावी निर्दोष सोडले जाते आणि नंतर देशाचे तत्कालीन गृहमंत्री असलेले एक पूर्व-सांसद पोलिसांना खुशाल ‘मुसलमानांना हात लावाल तर खबरदार’ अशी सरसकट धार्मिक भेदभाव करणारी धमकी देऊन टाकतात! काही धर्माने हिंदू असलेल्या गुंडांनी पुण्यातल्या त्या मुसलमान तरुणाला मारले, तर ते हिंदूंनी मुसलमानाला मारणे ठरते, मात्र त्याच काळात मुसलमानांनी त्या निखिल तिकोनेवर केलेला जीवघेणा हल्ला केवळ ‘माथेफिरू जमावाने’ केलेला हल्ला ठरतो. धनंजय देसाईंची पुण्यातल्या प्रकरणाबाबत चौकशी करावी हीच पहिली जबाबदारी असताना त्याचा छडा लावण्याआधीच आपल्या अतिहुशार आणि पराकोटीच्या कार्यकुशल गृहमंत्र्यांना त्यांची दाभोळकर-प्रकरणातही चौकशी करायचा मोह होतो, तो कश्याच्या आधारावर? सर्वोच्च न्यायालयाने शाहबानो प्रकरणात दिलेला निकाल तत्कालीन सरकारला का डावलावासा वाटतो? दहशतवादाचा रंग ठरवताना हटकून फक्त भगवा रंगच का आठवतो – जेव्हा की लोकांना बरोब्बर माहिती आहे सबंध जगात कोण दहशतवाद माजवतंय! आणि या सगळ्यावर कडी म्हणजे धार्मिक आणि जातीय अभिनिवेश चुचकारणारे आपल्याकडे ‘सर्वसमावेशक’ ठरतात, तर देशाच्या सर्व नागरिकांना समान पातळीवर ठेवून ‘समान नागरी कायदा’ लागू करा म्हणणारे मात्र ‘सांप्रदायिक’ ठरतात! या सगळ्या गमती-जमतींची उत्तरं ही ‘सेक्युलर’ शब्दाच्या भारतीय आवृत्तीत दडलेली आहेत!

    असे हे ‘सेक्युलर’ नावाचे गौडबंगाल आहे. आणि आगामी काळात हे गौडबंगाल कितपत चालवून घ्यायचे हे आपण ठरवायचे आहे. ‘तथाकथित अल्पसंख्याकांना (जे आता अजिबातच अल्पसंख्य नाहीत) गोंजारायचे, सहस्रावधी वर्षांपासून हा देश ज्यांनी सुजलाम-सुफलाम केला त्या बहुसंख्याकांना लाथाडायचे आणि आपलेच वर्चस्व कसे कायम राहील एवढेच पाहायचे’ एवढाच सांप्रतच्या राजकीय परिस्थितीत ‘सेक्युलर’ शब्दाचा अर्थ होऊन बसलाय. आणि तो अर्थ आजचा नाही तर पार खिलाफतवाल्या बांडगुळांना कुरवाळणाऱ्या अहिंसेच्या बेगडी पुजाऱ्यापासून चालत आलाय. या प्रकाराला भुलून मतं देण्याचा मूर्खपणा आता थांबवायला हवा आपण, मग तो कोणता का राजकीय पक्ष असेना! या अश्याप्रकारचा ‘सेक्युलर’ असण्यावर मतं मिळत नाहीत, हे दिसले की कित्येक ‘जाणत्या राजां’चा आणि त्यांच्या ‘हुजऱ्यां’चा सूरही कसा बदलेल पाहाच! अश्या वेळी त्यांनाही सर्वात आधी बहुसंख्यकांचाच विचार करावा लागतो की नाही हेही पाहाच! तेव्हाच खऱ्या अर्थाने ‘सेक्युलर’ असण्याच्या भारतीय आवृत्तीचे पिढ्यानपिढ्या चालत आलेले गौडबंगाल संपेल!!

    – © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी व विविध विषयांवर लेखकाने दिलेली व्याख्याने ऐकण्या/आयोजिण्यासाठी पाहा: www.vikramedke.com)

  • सावरकरांची उडी, नव्हे — भारतीय स्वातंत्र्याची गुढी!

    सावरकरांची उडी, नव्हे — भारतीय स्वातंत्र्याची गुढी!

    आज ८ जुलै. आजच्याच दिवशी स्वा. सावरकरांनी मार्सेल्स बंदरात ती त्रिखंड गाजविणारी जगप्रसिद्ध उडी ठोकली होती. आता काही टिनपाट लोक म्हणतात की, सावरकर ५ मिनिटंही पोहोले नसतील आणि ती उडी गाजलेली नव्हे तर गाजवलेली होती इ. काहीजण तर या उडी मारण्याच्या पराक्रमासाठी सावरकरांना पळपुटे म्हणण्याइतकी मजल मारतात!

    वास्तविक सावरकर किती वेळ पोहोले, हे महत्वाचं नाहीच आहे. त्या पोहोण्याचे परिणाम काय झाले हे महत्वाचे! आणि सावरकर फक्त पाचच मिनिटं पोहोले हे सांगायला सावरकरांचे जातीयवादी टीकाकारच कश्याला हवेत? सावरकर तुरुंगात असताना एका चीनी बंद्याने सावरकरांना अतिशय भक्तिभावाने विचारले होते, ‘महाराज आपण किती दिवस पोहत होता’? तर सावरकर शांतपणे उत्तरले होते, ‘दिवस कसले, पाच मिनिटंही पोहलो नसेन’! हे स्वत: सावरकरांनीच लिहून ठेवलंय. त्याचवेळी त्या चीनी बंद्याचा कसा हिरमोड झाला हेही त्यांनी प्रांजळपणाने लिहिले!

    आता जरा काय घडलं हे पाहूयात. सावरकरांविरुद्ध अटक वॉरंट निघालं त्यावेळी सावरकर इंग्लंडमध्ये नव्हतेच. ते फ्रान्समध्ये होते. याचाच दूसरा अर्थ असा की, सावरकर जर इंग्लंडमध्ये परतलेच नसते, तर इंग्रज सरकार त्यांना बापजन्मीही पकडू शकले नसते. फ्रान्समधून बाहेर पडण्याच्या आणि भूमिगत राहून क्रांतिकार्य करण्याच्या हजारो वाटा होत्या. पण तरीही सावरकर परतले आहेत ते केवळ ‘मी सापडत नाही म्हणून माझ्या अनुयायांना त्रास दिला जातोय. तो थांबवावा’ यासाठी! यातून हेच स्पष्ट होते की, सावरकरांना जर फ्रान्सच्या एका बंदरात उडी मारून पळूनच जायचे असते, तर मुळात ते फ्रान्सहून इंग्लंडला अटक करवून घ्यायला आलेच नसते! दुसरे असे की, सावरकरांचे इंग्लिश अनुयायी श्री. गाय आल्ड्रेड हे सावरकरांना एकदा इंग्लंडच्या तुरुंगात भेटले आणि त्यांनी विचारले की, तुम्हाला इथून पळून जाण्याची काही व्यवस्था करू का? सावरकरांनी त्यांना स्वच्छ सांगितले की, मी माझी योजना तयार केली आहे. हे स्वत: आल्ड्रेड यांनीच आपल्या आत्मचरित्रात नोंदवले आहे. याचाच अर्थ असा की, सावरकरांच्या डोक्यात दुसरेच काहीतरी शिजत असले पाहिजे. आता ते काय, हे पाहू!

    दि. ८ जुलै १९१० रोजी सावरकरांनी पहारेकऱ्यास शौचाला जायची परवानगी मागितली. तो त्यांना घेऊन गेला व शौचालयाबाहेरच थांबला. सावरकरांनी आत जाताच दार लावून घेतले. त्या दाराला असलेल्या पोर्टहोलवर आपला कोट टांगला. ते त्या पहारेकऱ्याच्या लक्षात आले. पण बहुतेक लज्जेमुळे सावरकरांनी असे केले असावे, असा विचार करून तो गप्प बसला. त्या दाराच्या बरोब्बर समोर – थोडे वरच्या बाजूला – समुद्राकडे उघडणारे एक दुसरे पोर्टहोल होते. सावरकरांनी आदल्या दिवशीच आपल्या यज्ञोपविताने मापे घेऊन ठेवली होती. त्यांनी उपनेत्र (चष्मा – सावरकरांचा शब्द!) काढून बाजूला ठेवले. आणि सारे शरीर त्या उघड्या पोर्टहोलमधून खाली झोकून दिले. विचार करा — पलिकडे किती फूटांवर पाणी आहे, मुळात पाणी आहे की नाही याचीदेखील कल्पना नसताना सावरकरांनी उडी घेतलीये! यापाठी सावरकरांनी दाखवलेल्या अतुलनीय धैर्याची नुसती कल्पनाच केलेली बरी!

    जहाज ते पाणी यांत २७ फुट अंतर होते. इतक्या उंचावरून समुद्राच्या पाण्याचा फटका किती जोरात बसतो, याची कल्पना पट्टीचे पोहणारे करू शकतात! जहाज ते बंदराची भिंत यात सुमारे ८ फुट अंतर होते. सावरकरांची उंची सुमारे पाच-साडेपाच फुट. म्हणजेच उडी मारताना घाई-गडबडीत थोडी जरी वेडीवाकडी हालचाल झाली असती, तरीही कपाळमोक्ष ठरलेलाच! बरं पाण्यात पडल्यावर तरी सुटका झाली का? अजिबात नाही. क्षणाचीही उसंत न घेता सावरकर जहाजाला वळसा घालून बंदराच्या भिंतीच्या दिशेने पोहायला लागले. बंदराची भिंत सुमारे ९ फुट उंचीची होती. सतत पाण्याशी संपर्क येऊन ती किती निसरडी झाली असेल, याची तुम्ही कल्पना करू शकता! शिवाय तिचा वापर माणसांच्या चढ-उतारासाठी कधीच केला जात नसल्याने तिला हात-पाय रोवायला किंचितही जागा नव्हती. सावरकर तश्याही परिस्थितीत वर चढले. एक-दोन नव्हे, तर तब्बल ९ फूट! आणि मग ते पळत सुटले. सावरकरांना घ्यायला मादाम कामा आणि श्री. व्हि. व्हि. एस.  अय्यर येणार होते, हा कुणीतरी पसरवलेला ऐतिहासिक अपसमज आहे. वास्तविक असे कुणीही येणार नव्हते. एव्हाना पहारेकऱ्यांना सावरकर निसटल्याची कल्पना आलीच होती. ते सावरकरांच्या मागे लागले. सावरकरांनी तश्याच अवस्थेत एक फ्रेंच पोलिस गाठला. मात्र सावरकरांची अवस्था पाहून आणि त्यांचे बोलणे नीटसे न समजल्यामुळे तो सावरकरांची काहीच मदत करू शकला नाही.  तोपर्यंत पोहोचलेल्या इंग्रजी पहारेकऱ्यांनी त्या फ्रेंच पोलिसास काहीतरी चिरीमिरी दिली, सावरकरांना आपल्या ताब्यात घेतले आणि पुन्हा जहाजाच्या दिशेने चालवले!

    हे ते सावरकरांचे तथाकथित ५ मिनिटांचे पोहणे! उपरोक्त वर्णन वाचून सावरकरांनी किती जोखीम उचलली याची वाचकांना कल्पना आलीच असेल! हा कसला पराक्रम, ही तर फसलेली योजना – असंही काही मित्रांना वाटण्याचा संभव आहे! सावरकरांनी श्री. गाय आल्ड्रेडला सांगितलेली ‘योजना’ सुरू होते ती नेमकी इथेच!!

    सावरकरांना पळूनच जायचे असते तर ते कधी इंग्लंडला परतलेच नसते. भूमिगत राहून कार्य केले असते. मग सावरकरांनी इंग्लंडला येऊन, परत इंग्रजांच्या खर्चाने फ्रान्सला जाऊन आणि मग जाहीर उडी ठोकून काय मिळवले? याचे उत्तर दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रांनी दिले! एखाद्या देशाचा गुन्हेगार जर दुसऱ्या देशाच्या भूमिवर असेल, तर त्याला पकडण्यासाठी त्या संबंधित देशांमध्ये ‘गुन्हेगार हस्तांतरणाचा करार’ असावा लागतो — असे आंतरराष्ट्रीय कायद्याचे तत्त्व आहे! तसा तो करार इंग्लंड आणि फ्रान्सदरम्यान होता. मात्र त्याची एक प्रक्रिया असते. ती न पाळताच सावरकरांना इंग्रज पहारेकऱ्यांनी ओढत नेले होते. थोडक्यात एक बेकायदेशीर गोष्ट घडली होती. दुसऱ्या दिवशीची सारी फ्रेंच वर्तमानपत्रे ही इंग्लंडच्या या बेकायदेशीर वागण्यावर टीकेची झोड उठवण्यात रंगून गेलेली होती! ज्या साम्राज्यावर कधीच सूर्य मावळते नाही त्या इंग्रजी साम्राज्याला आपल्या कूटनीतीच्या बळावर सावरकरांनी एक आंतरराष्ट्रीय पातळीवरील बेकायदेशीर गोष्ट करायला भाग पाडले होते. अवघ्या इंग्रज सरकारचा आपल्या योजनेत एखाद्या प्याद्यासारखा वापर करून घेतला होता! हळूहळू हे टीकेचे लोण जगभरात पसरले. फ्रान्सच नव्हे तर अवघा युरोप, अमेरिका खंड, पार जपान, रशिया आदी दूरचे देशही इंग्लंडवर जहरी टीका करू लागले व सावरकरांना सोडण्याची मागणी करू लागले. अवघे जग या एकाच विषयाने दुमदुमून गेले! मार्सेल्सच्या महापौरांनी इंग्रज सरकारला खरमरीत पत्र लिहून सावरकरांना सोडण्याची मागणी केली. वाद इतका वाढला की, सारे प्रकरण अखेर आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यावे लागले! कल्पना करा — आंतरराष्ट्रीय न्यायालय, जिथे दोन देश एकमेकांशी भांडतात. तिथे इंग्लंड आणि फ्रान्स हे दोन देश एकमेकांशी भांडताहेत. तेही कुणासाठी? तर एका तिसऱ्याच गुलाम देशातील विनायक दामोदर सावरकर नावाच्या माणसासाठी! एका रात्रीत ‘भारत नावाचा काहीतरी देश आहे आणि तिथले नागरिक अन्यायी इंग्लंडपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी झगडताहेत’ ही बाब जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली! कश्यामुळे? तर सावरकरांनी चाणक्यमतिने केलेल्या एका खेळीमुळे!! त्यानंतर लवकरच फ्रान्सच्या पंतप्रधानांना त्यागपत्र द्यावे लागले. भारताने, विशेषत: सावरकरांनी मिळवलेल्या या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्धीचा फायदा भारतीय स्वातंत्र्यलढ्याला पुढे अनेकदा झाला. तो एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे!

    आज या उडीला शंभर वर्षांहूनही अधिक काळ लोटलाय. मात्र त्यापाठी सावरकरांनी दाखवलेल्या आंतरराष्ट्रीय राजनीतीच्या सूक्ष्म आकलनाची खुमारी यत्किंचितही कमी झालेली नाही. सावरकरांच्या राजनीतीपटुत्वापुढे नतमस्तक होताना सार्थपणे म्हणावेसे वाटते की, सावरकरांनी मारलेली उडी ही नुसती उडी नव्हती तर भारतीय स्वातंत्र्याची उभारलेली गुढी होती!!

    (संदर्भ साभार: संशोधिका श्रीमती Anurupa Cinar – www.anurupacinar.com)
    – © विक्रम श्रीराम एडके.
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी तसेच लेखकाने विविध विषयांवर दिलेली व्याख्याने ऐकण्या/आयोजिण्यासाठी भेट द्या:  www.vikramedke.com)

  • मेरे पैगंबर!!

    मेरे पैगंबर!!

    रोना-धोना,
    सपने बोना,
    पत्ते काट फिर बाजी खोना!
    फिर उठना,
    फिर टूटना,
    गिरना-पडना,
    खुदही से लडना!
    ढेर हो जाए तो –
    अपनी लाश,
    अपनी लाश – आपै ढोना!
    फिर नयी जात,
    फिर नया वार,
    कदमबोसी करती नजरें
    फिर वही इंतजार!
    बस यहीं चल रहा हैं मुसलसल..
    यहीं जिंदगी हैं इन दिनों..
    रोना आता हैं तो अपनीही पीठ सहलाकर कह लेते हैं –
    “ये जो आँसू हैं ना,
    वो आँसू नहीं है..
    आसमाँसे आयतें उतरी हैं तुम्हारे नाम की… मेरे पैगंबर”!!

    – © विक्रम.
    (www.vikramedke.com)

  • स्वयंसूचना

    स्वयंसूचना

    स्वयंसे कोई भाग सके ना
    कर्मकी गठरी त्याग सके ना
    चिरनिद्रामें जाग सके ना
    सुन!
    मृत्यू तुम्हारे समीप खडी हैं
    देख आँखोंसे आँखे भिडी हैं
    नवीन लडाई मनमें छिडी हैं
    सुन!

    तू वीर हैं, जियाला हैं
    तुझसे ही सारा उजियाला हैं
    तेरा ये काल निवाला हैं
    ओ वीर रे..!
    रख धीर रे..!
    सुन!

    मन मर्मोंके भेद भुलाकर
    जीवनको आकाश पिलाकर
    स्नायूसे स्नायूको मिलाकर
    सुन!
    काल कदापि स्तब्ध नहीं हैं
    उस बिंदूपर शब्द नहीं हैं
    कोई विनाप्रारब्ध नहीं हैं
    सुन!

    गीताका ये अभिज्ञान हैं
    लडता हैं वोही महान हैं
    जीवन इसीका प्रमाण हैं
    ओ वीर रे..!
    रख धीर रे..!
    सुन!

    कुछभी यहाँ चिरकाल रहे ना
    मरे हुएसे रक्त बहे ना
    भास्करभी रात्रिको सहे ना
    सुन!
    स्वयंसे कोई भाग सके ना
    कर्मकी गठरी त्याग सके ना
    चिरनिद्रामें जाग सके ना
    सुन!

    – © विक्रम
    (www.vikramedke.com)

  • शाहरुख नाचलाच पाहिजे!

    शाहरुख नाचलाच पाहिजे!

    देशाच्या पंतप्रधानाइतकं व्यस्त कुणी असू शकतं का हो? नाही ना! काल कै. मुंडेंच्या निधनाची बातमी समजल्यानंतर ताबडतोब पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदींनी सारे कार्यक्रम रद्द केले व राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला. मात्र बहुतेक हिंदी सिनेमातला बोबडा नाच्या शाहरुख खान हा स्वत:ला पंतप्रधानांपेक्षाही मोठा समजत असावा. कारण या राष्ट्रीय दु:खाच्या प्रसंगी कार्यक्रम रद्द करणे तर दूरच, हा घरबुडव्या बंगालात ठुमके लावत होता – ममता बॅनर्जीसोबत! त्याला देशाच्या दु:खापेक्षा स्वत:च्या संघाच्या विजयाचा जास्त आनंद महत्वाचा वाटत होता. इतके दिवस शाहरुखनामक माकडसदृश प्राणी माझ्या भारत देशात राहातो, याची लाज वाटायची. काल मला त्याची लाज नाही, घृणा वाटली – घृणा! एखाद्या सडलेल्या मांसाच्या तुकड्याची जशी घृणा वाटते, तशी घृणा!

    खानाने ‘मोदी पंतप्रधान झाल्यास देश सोडून जाईन’ असे विधान केले नव्हते. मान्य! शंभर टक्के मान्य. ती कुणीतरी पसरवलेली अफवाच होती. परंतू त्यावेळी तावातावाने खानाची बाजू घेऊन भांडायला आलेल्या एकाने तरी हा विचार केला का की — अशी अफवा शाहरुखबद्दलच का पसरते? सलमानसारख्या इतर कुणा खानाबद्दल का नाही? कारण एकच – धूर तिथूनच उठतो, जिथे आग असते! परंतू ‘सत्या’ची बाजू घेतल्याचा आव आणणाऱ्यांपैकी किती लोकांनी त्या अफवेची कारणमीमांसा पाहाण्याचा प्रयत्न केला होता? स्वत:लाच विचारा हा प्रश्न! आणि ज्याचं चारित्र्य आधीच डागाळलेलं असतं, त्याच्याच चारित्र्यावर अफवांचे नवनवे शिंतोडे उडतात ना? खानाने याआधीदेखील कुणाही देशभक्ताच्या डोक्यात संतापाची तिडीक उठावी अश्या गोष्टी केलेल्याच आहेत ना — मग ते पाकिस्तानी खेळाडूंची केलेली वकिली असो, चित्रपटांतून जाणीवपूर्वक केलेला भारत देश व भारतीय संस्कृतीचा अपमान असो, वानखेडे स्टेडियमवर एखाद्या सामान्य टपोरीसारखे केलेले वर्तन असो — एक ना अनेक गोष्टी सांगता येतील.

    त्यामुळेच खरं तर एका दृष्टीने बघावयास गेलो तर, काल जो नीचपणा खानाने केला त्यात आश्चर्य वाटायचे काहीच कारण नाही. त्याची लायकीच तेवढी आहे. तो असंच वागणार.  आणि तो असं कुणाच्या जीवावर वागतो माहितीये? तुमच्या जीवावर. त्या फडतूस नाच्याला सुपरस्टार समजणाऱ्या प्रत्येकाच्या जीवावर! त्याच्या एका दर्शनासाठी पडद्याकडे चातकासारखे डोळे लावून बसणाऱ्या प्रत्येकाच्या जीवावर! ‘आयपीएल’ नावाची गटारगंगा पाहाणाऱ्या, प्रत्येक चेंडूगणिक स्टेटस-अपडेट करणाऱ्या, कोलकात्याच्या (ज्यात सर्वाधिक पाकिस्तानी खेळाडू आहेत म्हणे!) संघासाठी जल्लोष करणाऱ्या, त्याचा संघ जिंकल्यावर घरी पुत्ररत्न झाल्यागत आनंद साजरा करणाऱ्या प्रत्येकाच्या जीवावर! त्यामुळे त्याचं जर कालचं कृत्य देशद्रोहाचं असेल, तर त्या देशद्रोहाला तो कमी आणि तुम्ही जास्त जबाबदार आहात. कारण कुत्र्याचं शेपूट वाकडं असतं म्हणून जर माणसेही वाकडी लागायला लागली, तर दोष माणसांचा असतो, कुत्र्याचा नव्हे! किंबहुना कुत्र्यालाच का कुत्रा म्हणावं — एवढे होऊनही मंडळी ना आयपीएल पाहाणे थांबवणार आहेत, ना खानाचे चित्रपट, ना त्याच्या पोकळ स्टारडमचे गोडवे गाणे थांबवणार आहेत. त्यामुळे शेपूट याही मंडळींचे वाकडेच आहे की! करा. अवश्य करा. फक्त इथून पुढे १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीलादेखील तोंडातून ‘देशभक्ती’ नावाचा शब्द उच्चारणे बंद करा — शोभत नाही तुमच्या तोंडी!

    चला, आयपीएलचा हा हंगाम तर संपला. यंदाच्या दिवाळीत खानाचा नवा चित्रपट प्रदर्शित होतोय. गर्दी तर केलीच पाहिजे ना ‘भक्तांनी’! त्यानंतर येतोच आहे ‘आयपीएल’चा नवा हंगाम! त्यावेळी काय स्टेटस-अपडेट केले पाहिजेत, कसे केकेआरचे उत्साहवर्धन केले पाहिजे याची तयारी तर करायलाच हवी! त्यासाठी गरज पडली तर कामधंदा सोडून तासनतास टिव्हीसमोर तर बसायलाच हवे! आणि हो, काळ्या पैश्यावर पोसलेला आयपीएलचा नंगानाच चवीने पाहातानाच ‘स्विस बँकेतला काळा पैसा भारतात आणणे कसे गरजेचे आहे’ यावर गरमागरम चर्चा केल्याच पाहिजेत! मधल्या काळात नाच्याच्या जाहिराती, एखाद-दुसरा फालतू रिऍलिटी-शो पाहायलाच हवा! त्याची बाजू तर घेतलीच पाहिजे. त्याच्या कुटुंबाचे उदाहरण देऊन सर्वधर्मसमभावाचे पोकळ गोडवे तर गायलेच पाहिजेत (त्याच्या मुलांची नुसती नावेच सर्वसमावेशक आहेत – धर्मही आहे का, कुणी पाहिलंय?)! खानाचा चित्रपट चाललाच पाहिजे! त्याच्या दांभिकतेला विनम्रता म्हटलंच पाहिजे! त्याच्या फिट आल्यागत हावभावांना अभिनय, म्हटलंच पाहिजे! आणि च्यायला तिकडे कुणा लोकनेत्याचे निर्वाण होवो वा आख्खा देश खड्ड्यात जावो, आमचा शाहरुख आनंदाने नाचलाच पाहिजे!! शाहरुख आनंदाने नाचलाच पाहिजे!!!

    – © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी व लेखकाची व्याख्याने ऐकण्या/आयोजिण्यासाठी भेट द्या: www.vikramedke.com)

  • आधुनिक महाभारताचे उपाख्यान

    आधुनिक महाभारताचे उपाख्यान

    महाभारतातली घटना आहे. कर्णाने आपली कवचकुंडले गमावून इंद्राकडून अमोघ अशी ‘वासवी शक्ती’ मिळवली होती. हेतू एकच – अर्जुनाचा वध! परंतू श्रीकृष्ण अतिशय धूर्त राजकारणी होता. त्याने युद्ध ऐन भरात असतानाच भीमपुत्र घटोत्कचाला मैदानात उतरवले. घटोत्कच हा तर मायावी राक्षस. त्यातून साक्षात भीमाचा मुलगा! त्यामुळे त्याच्या अतुल्य पराक्रमाची केवळ कल्पनाच केलेली बरी. असा हा घटोत्कच इतक्या वेगाने कौरवांचा विनाश करत सुटला की, जणू एकाच दिवसात संपूर्ण कौरवसेना संपवून टाकेल! ही परिस्थिती पाहून दुर्योधन घाबरला. त्याने घटोत्कचाला रोखण्यासाठी आपली वासवी शक्ती वापरण्याची कर्णाला विनंती केली. कर्ण पेचात पडला! शक्ती तर खास अर्जुनासाठी राखून ठेवलेली. ती कशी वापरायची? आणि दुसरीकडे ज्याने आपल्याला माणसात आणलं, मान-मरातब दिला तो आपला जीवश्चकंठश्च मित्र संकटात सापडलेला. दुर्योधन कर्णाला म्हणाला की, ‘अरे बाबा, आपण सारे आत्ताच वाचू शकलो नाही तर अर्जुनाला काय मारणार? त्यापेक्षा तू आत्ता तुझी शक्ती वापरून घटोत्कचाला मार, आपल्या सगळ्यांचा जीव वाचव. अर्जुनाला कसं मारायचं ते आपण जीव वाचल्यावर बघू’! कर्णाला हे म्हणणं पटलंच असं नाही, परंतू मित्रासाठी त्याने ते मानलं! आपल्या दिव्य कवचकुंडलांची किंमत देऊन मिळवलेली ती अमोघ वासवी शक्ती त्याने अर्जुनासाठी न वापरता घटोत्कचासाठी वापरली आणि त्याचा वध केला! समस्त कौरवसेनेत एकच जल्लोष सुरू झाला. विजयाचा जल्लोष! प्राण वाचल्याचा जल्लोष!! सारेच आनंदी होते. फक्त एकटा कर्ण सोडून. कारण या तात्कालिक विजयातच उद्याच्या अंतिम पराभवाची बीजे दडली असल्याची जाणीव होती त्याला!

    ही तर झाली ऐतिहासिक कथा (महाभारत इतिहासग्रंथ आहे, पुराण नव्हे!). आता तुम्ही म्हणाल की, ही कथा तर आम्हाला माहिती आहे किंवा या कथेचा आज काय संबंध? तर संबंध आहे. कसा, ते सांगतो!

    ही कथा आठवण्याचे कारण असे की, आजही याच कथेची पुनरावृत्ती घडताना दिसतेय. संपूर्ण पुनरावृत्ती जरी अजून झालेली नसली, तर घटनाक्रम त्याच मार्गाने चाललाय. म्हणूनच ही कथा आज महत्वाची वाटतेय. आजच्या या कथेत ‘कर्ण’ आहेत, मनसेचे अध्यक्ष मा. श्री. ‘राज ठाकरे’ – जरासे दुर्लक्षित, जरासे सापत्न, अकारणच स्वत:ला अन्यायग्रस्त समजणारे – बरोब्बर कर्णासारखे! त्यांची ‘कवचकुंडले’ होती ‘ठाकरे नावाची पुण्याई आणि त्यांचा करिश्मा’. ‘इंद्र’ म्हणजे स्वत: ‘मा. शिवसेनाप्रमुख स्व. श्री. बाळासाहेब ठाकरे’. ‘भीम’ आहे ‘मनसेबद्दल सुरुवातीचा काही काळ वाटत असलेल्या अपेक्षा’ आणि ‘भीमपुत्र घटोत्कच’ आहे ‘त्या अपेक्षांचा भंग झाल्यामुळे मनसेबद्दल निर्माण झालेले अविश्वासाचे वातावरण’. इथे एक लक्षात घेतले पाहिजे की, या घटोत्कचाचा लोकसभा निवडणुकीशी संबंध आहेच, परंतू तो पूर्णार्थाने नाही. हा घटोत्कच आधीपासूनच अस्तित्वात आला होता. लोकसभेने त्याला केवळ आणखी शक्तीशाली करायचे काम केलेय एवढेच! या कोटीक्रमाने पाहायला गेले, तर संपूर्ण देशभर प्रादेशिक पक्षांची दुकानदारी बंद करणारे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आपोआपच श्रीकृष्ण ठरतात! तर असा हा घटोत्कच कर्णाच्या पक्षाला संपवण्यात काहीच कसूर करणार नाही, हे तर उघडच आहे. म्हणून वापरलीये ती एकमेवाद्वितीय असलेली वासवी शक्ती – ‘निवडणुका लढवण्याचा निर्णय’. वासवी शक्ती अमोघ तर खरीच. परंतू तिच्यात एक दोषही आहे. या शक्तीच्या वापरामुळे सध्या तितक्याश्या परिपूर्ण स्थानावर नसलेले शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. ‘उद्धव ठाकरे’ आपोआपच (बाय-डिफॉल्ट!) ‘अर्जुन’ ठरतायत! यात त्यांचे कर्तृत्व फारसे नसून राज ठाकरेंची वैयक्तिक हल्ले करण्याची खेळीच यास कारणीभूत आहे! त्यामुळे या शक्तीप्रयोगाचा कर्णाला फायदा होईल की नाही यापेक्षाही त्याचा परिणाम असा झालाय की, आपोआपच अर्जुन कोण ते समजलेय, आणि डाव न खेळताही आपोआपच उद्धव ठाकरेंच्या पारड्यात एक गुण जमा झालाय!

    आता कथा इथवर आलीच आहे, तर ती पुढे काय अंगाने जाणार हे सांगायला काही कुणा ज्योतिष्याची आवश्यकता नाही. अर्थात या कथेत दुर्योधन कोण हे ठरविण्याचे काम मी सूज्ञ वाचकांवर सोपवतो. ते तुम्ही आपापल्या वकूबाप्रमाणे करालच याची खात्री आहे! मला रस वाटतोय तो दुसऱ्याच प्रश्नात. घटोत्कचावर अमोघ वासवी शक्ती वापरून आपण तात्पुरता आपल्या कौरव ‘पक्षाचा जीव जरी वाचविलेला असला’ आणि ‘आपल्या पक्षात तात्कालिक उत्साह’ जरी निर्माण केलेला असला, तरीही यात अंतिम पराभवाचीच बीजे लपलेली आहेत, याची महाभारतातल्या कर्णाला कुठेतरी जाणीव होती. आपल्या आधुनिक कर्णालाही ती जाणीव असेल का? देवच जाणे! तूर्तास तरी पात्रयोजना परिपूर्ण झालीये, एवढं नक्की!

    – © विक्रम श्रीराम एडके.
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी आणि व्याख्याने ऐकण्या/आयोजिण्यासाठी क्लिक करा: www.vikramedke.com)

  • निरोप

    निरोप

    तसं पाहिलं तर नेहमीसारखाच दिवस. परंतू सकाळची वेळ. त्यामुळे जरा चौकस राहावं लागे. हो, याच वेळी नवे बंदी तुरुंगात येतात, जुन्यांची दुसरीकडे पाठवणी होते, कधी-कधी बंद्यांना भेटायला नातेवाईक येतात. त्यामुळं लोकांचा राबता राहातो. आता ही अशी तुरुंगासारखी नाजूक जागा. त्यातून डोंगरीसारखा महत्वाच्या ठिकाणचा तुरुंग. त्यामुळे डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवणं ओघानं आलंच! आणि सकाळच्या पहाऱ्यावर असलेले दोघेही हवालदार — भैरू-मानकू या कामात चांगलेच तरबेज होते! दिवसभर विडीकाडी शिलगावतील, तंबाखू चोळतील. पण सकाळच्या वेळी – अंहं!!

    तुरुंगाच्या भल्यामोठ्या दरवाजावर थाप पडली. तशी भैरूने खिट्टी काढून दाराची चौकट उघडली. बाहेरून एक चेहरा डोकावला. ब्राह्मणी पागोटं ल्यायलेला आणि व्यवस्थित कातरलेल्या मिश्या असणारा गोरापान चेहरा. पलीकडे कुणीतरी खानदानी स्त्री चापून-चोपून पदर घेऊन मोठ्या अदबीने उभी होती.

    “कोन पायजे?”, भैरूनं विचारलं
    “भेट ठरलीये साहेब”, पलीकडचा माणूस अनिश्चित स्वरात उद्गारला.
    “कागुद आनलाय का?”, भैरूचा प्रश्न.
    उत्तरादाखल  पागोटेवाल्याने काहीही न बोलता कागदाचं भेंडोळं झरोक्यातून आत सरकावलं. पलीकडल्या बाईची उगाचच चलबिचल झाल्यासारखी जाणवली.
    भैरूनं कागद व्यवस्थित तपासले.
    “हां थांबा वाईच. उगडतो दरूजा”, असं म्हणत भैरूने कडी काढली. जरासं ओढताच ते दरवाजाचं अजस्त्र धूड करकरत उघडलं!

    पागोटेवाला आत आला. वळून मागं उभ्या त्या स्त्रीकडे पाहिले. ती अजूनही घुटमळतच होती. बावरली असावी बहुतेक तुरुंगातलं वातावरण पाहून.
    तिला धीर द्यावा म्हणून तो हलकेच म्हणाला, “चल की यमे. ये आत”.
    त्याच्या आवाजाने जणू भानावर आली ती. हळूच आपले उजवे पाऊल उंबरठ्याच्या आत टाकले तिने. त्या नरकात आज पहिल्यांदाच लक्ष्मीची पाऊले पडत होती!

    दोघे आत जाताना बघून एवढा वेळ दूर उभा असलेला मानकू भैरूपाशी आला.
    “कोन रे ह्ये दोगं? कुना दरोडेखोराचे तर नातेवाईक वाटत न्हाईत. कुनाला भेटायला आल्ये म्हनायचं मंग”?
    “आरं त्यो न्हाई का बालिष्टर आनून ठ्येवलाय. ५० वर्सं काळंपान्यावर धाडनारेत त्याला. त्याचे नातेवाईक हायती ह्ये.  त्यो ग्येला त्यो त्येचा म्हेवना न् ती ग्येली ती त्या बालिष्टराची बालिष्टरीन”.
    “ऑं? म्हंजी ह्ये त्या सावरकरला भेटायला आल्येत”?
    “तर! आरं आता हुब्या जल्मात भ्येट व्हनार हाय का पुना? ५० वर्सांत कोन जितं का मरतं”?
    “व्हय त्ये बी खरंच हाय म्हना”, मानकू उद्गारला, “पन काय रे.. ५० वर्सं? ही अशी कोन्ची जगाच्या इरहीत शिक्षा म्हनायची”?
    “म्हंजी? आरं तुला म्हाईती न्हाय का मर्दा? आरं लई मोटा क्रांतिकारी हाय त्यो. गोरा साह्येब निस्ता चळचळ कापतो त्येच्या नावानी. त्यो असा घावतोय होय यान्ला? कसातरी घावला तर द्यायची काईबाई शिक्षा. फाशीच धीली आस्ती. पन आख्ख्या जगात लई दबदबा हाय म्हने त्येचा. मंग धीली जन्मठेप. म्हंजे मारायचं बी न्हाई न् जगू बी द्याचं न्हाई. असले बाराबोडाचे हाईत ह्ये गोरे”!
    भैरूकडून एवढं ज्ञानामृत मिळाल्यावर मानकूचा त्याच्याबद्दलचा आदर वाढला नसता तरच नवल. त्याला आत कुठेतरी सावरकरांची कीवही वाटत असावी. म्हणून त्याने विचारले,
    “उमर काय आसंल रं त्या बालिष्टराची”?
    “आसंल २०-२५”.
    “आयोऽ.. लयी कवळं प्वॉर रे… ५० वर्साची शिक्षा आयकून रडलंच असनार”!
    “चल.. खूळा झालास ल्येका तू. आरं सावरकर हाय त्यो. त्यो रडतोय व्हय? आरं त्यो भल्याभल्याला रडवील”.
    “म्हंजी रं”?
    “आरं म्या तितंच हुतो ना. त्यो सायब ५० वर्साच्या शिक्षेची बातमी घेऊन आला. म्हनला येकापाठोपाठ येक अश्या दोन जल्मठेपी भोगाव्या लागनारेत सावरकर तुला. आन दात इचकून हासलं त्ये लाल वानर. तर ह्यो सावरकर मोठमोठ्यानी हसायलाच लागला. मला आधी वाटलं, चांगल्याचुंगल्या प्वॉराला याड लागलं शिक्षा आयकून.
    त्या सायबाला बी तसंच वाटलं. म्हून त्येनी इचारलं, का हसतोस म्हून. तर ह्यो काय म्हनलाय म्हाईतीये”?
    “काय म्हनला”?
    “ह्यो म्हन्ला, चला बरं झालं, त्याच निमित्तानी का होईना पन आमच्या हिंदूंचा पुनर्जल्माचा सिध्धांत मानला तर खरा तुमच्या ख्रिस्ती सरकारनी”!
    “आयोऽ बाऽबाऽऽ”!!
    “तर! त्या गोऱ्या सायबानी पन अश्याच बोंबा मारल्या आस्तील. विन्ग्रजीत”!
    “आरं कोन मानूस म्हनायचा का कोन ह्यो”?
    “आरं त्यो मानूस न्हाईच. द्येवच म्हन्ला पायजे त्येला. येवढं दु:ख कोसळून बी जो शांत ऱ्हातो, त्यो तुज्यामाज्यासारखा सामान्य मानूस कसाकाय आसंल”?
    “खरंय तुजं भैरू. आरं आपन या गोऱ्या सरकारची नोकरी करतो म्हंजी येकप्रकारानी हरामाचंच खातो ना. आन् त्यो सावरकर.. येवढी मोटी बालिष्टरकी सोडून आपल्यासारख्या हराम्यांसाठी लढतो. त्यो मानूस कसा आसंल? द्येवच आसला पाहिजे त्यो.. त्यो द्येवच आसला पाहिजे..”!
    बोलता-बोलता मानकूचे डोळे भरून आले. सावरकरांची पत्नी आणि मेहुणे ज्या दिशेने गेले होते, त्या दिशेला पाहात त्याने हळूच नमस्कार केला. त्यापाठोपाठ भैरूनेसुद्धा!

    यमुनाबाई सावरकर. त्यांना सारेच माई म्हणत असत. त्या भावापाठोपाठ चालतच होत्या. पावलागणिक एक-एक घटना आठवत होती त्यांना. ‘ह्यां’च्यासोबतचा विवाह, सुरुवातीचे सुखाचे दिवस, लवकरच लक्षात आलेले नवऱ्याचे आभाळभर मोठेपण – त्यांचा आवाका, त्यांचे विलायतेस जाणे – त्यावेळी आपण दिलेला निरोप, तिकडून येणाऱ्या आणि काळीज चिरून टाकणाऱ्या त्या महाभयंकर बातम्या, इंग्रजांनी घरादारावर आणलेली जप्ती, धाकट्या भावोजींना पोलिसांनी कित्येकदा केलेली मारहाण, आपल्याला आणि वहिनींना कसं भर पावसात घरादाराला पारखं व्हावं लागलं – तो दिवस, स्वत:च्याच माहेरी गायींच्या गोठ्यात काढावे लागलेले दिवस – कारण इंग्रजांचं फर्मान की या बायकांना जो कोणी आसरा देईल त्याच्या घरादारावरनं गाढवाचा नांगर फिरवू, आणि आपला प्रभाकर.. तो तर या सगळ्या अपेष्टांमुळेच दगावला…

    प्रभाकरची आठवण येताच माईंचा बांध फुटला. तोंडावर पदराचा बोळा घट्ट दाबला त्यांनी. भावाच्या नजरेतून काही ते सुटले नाही. काहीतरी बोलून धीर द्यायचा म्हणून तो बोलला,

    “पोहोचलोच हो आपण आता”!

    माईंनी मान डोलावली. तोवर ते दोघेही एका दालनात येऊन पोहोचले. त्यांच्या हातातली कागदपत्रे एका पहारेकऱ्याने घेतली आणि तो आत निघून गेला. माईंनी पहिल्यांदाच नजर वर करून पाहिले. दालन जरी मोठ्ठे असले तरी मधोमध मजबूत गजांची भिंत घालून दोन भाग केले होते त्याचे. यांच्या भागात बसायला खुर्च्या होत्या. आणि पलिकडे काहीच नव्हते. पाठीमागे एक झरोका होता फक्त. तोही उंचावर.

    माईंचे निरीक्षण चालू असतानाच साखळ्या खुळखुळण्याचा आवाज आला. आणि मागोमाग हिंदुस्थानचा स्वातंत्र्यसूर्य अवतरला! अतिताणामुळे झिजलेला देह परंतू नजरेतला करारीपणा अक्षरशः नरसिंहाचा होता! जणू शरीरातले सारे तेज दोन तेजस्वी डोळ्यांत उतरले होते! छातीवर झुलत होता “डि” (डेंजरस) कोरलेला बिल्ला क्रमांक ३२७७८. आणि अंगावर सर्वत्र साखळदंड – जणू कुणा वाघालाच बंदिस्त करून ठेवलंय!

    नवऱ्याला पाहून माई अभावितपणे पुढे झाल्या. त्यांचे हात गजांभोवती केव्हा आवळले गेले ते त्यांचे त्यांनाही समजले नाही. भाऊ हळूच दोन पावले मागं जाऊन थांबला आणि माईंनी एवढावेळ लपाछपी खेळणाऱ्या अश्रूंना मनमोकळी वाट करून दिली!

    हे असे होणार याची सावरकरांना कुठेतरी कल्पना असावी. कारण ते अतिशय आश्वासक, मृदू हसले. म्हणाले,
    “काय, ओळखलंस का? अगं माझे नुसतेच कपडे बदलले आहेत. मी तोच आहे. तुझ्याशी देवा-ब्राह्मणांच्या साक्षीने विवाह केलेला! हां आता चारचौघांसारख्या संसाराचं म्हणशील तर तो नाही करू शकलो मी”.
    सावरकर अंमळ थांबले. शब्द जुळवून बोलले,
    “आणि संसार संसार तरी असा काय असतो गं? चार काटक्या गोळा करून घरटी बांधणे आणि मुला-बाळांची वीण वाढवणे यालाच संसार म्हणणार असशील, तर तो चिमण्या-कावळेही करतात. तो नाही केला आपण. पण यमुना, आपण काही चिमण्या-कावळे नाहीत. माणसं आहोत. तेव्हा दु:ख करू नकोस. संसाराचा भव्यतर अर्थ घ्यायला शिक!”

    माईंना आपल्या नवऱ्याचा एक नवाच पैलू आज उलगडत होता. रडणं थांबवून त्या अनिमिष नेत्रांनी ऐकू लागल्या —
    “अगं, स्वत:चा क्षुद्र स्वार्थ विसरून केवळ परसेवेसाठी नि परोपकारासाठी देह झिजविणे, ही उच्चतम जीवनकला आहे. खरा श्रेष्ठ तोच की, जो अंगीकृत ध्येयापासून कधी ढळत नाही; अंतर्बाह्य मोहाला कधी बळी पडत नाही, अवजड भाराखाली दबत नाही, आपत्तीच्या वादळांनी कधी अस्वस्थ होत नाही आणि उग्र परिस्थितीच्या वक्र दृष्टीला घाबरत नाही! तू तशी आहेस यमुना. आपण तसे आहोत. आणि म्हणूनच बहुधा रामाने या रामकार्यासाठी आपली निवड केलीये!
    अगं आपली चार चूल-बोळकी आपण आज फोडतो आहोत, घर-दार जाळतो आहोत. पण आज आपला संसार जळण्यामुळे निघणारा धूर हा उद्या या अखंड भारतवर्षातल्या कोट्यवधी घरांतून निघणारा सोन्याचा धूर ठरणार आहे यमुना, विश्वास ठेव”!

    माईंचा आपल्या नवऱ्यावर विश्वास होताच! आज त्या विश्वासाचे रुपांतर निर्धारात झाले होते! तितक्यात पहारेकऱ्याने भेटीची वेळ संपल्याचे सांगितले. तिघांनीही एकमेकांचा नजरेनेच निरोप घेतला. आत्ता फिरवलेली मान आता अजून ५० वर्षं फिरवता येणार नाही, हे माईंना ठाऊक होते. त्यांचा चेहरा कसल्याश्या अदम्य तेजाने फुलारून आला होता. त्यांच्या भावाने त्यांच्यातले हे स्थित्यंतर दिपलेल्या डोळ्यांनी पाहिले होते. सावरकर वळून चालले होते. त्यांनी त्या अवजड साखळदंडाचा लीलया ताल धरला होता. आणि ते म्हणत होते,
    “जातस्य हि ध्रुवोऽमृत्यूर्ध्रुवोऽजन्म मृतस्य च।
    तस्मादपरिहारार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि ।।
    नैनं छिन्दति शस्त्राणि नैनं दहति पावक: ।
    नचैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत: ।।”

    – © विक्रम श्रीराम एडके.
    (कोणत्याही माध्यमातून पुनर्प्रकाशन करण्यापूर्वी लेखकाची पूर्वपरवानगी घेणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक. लेखकाच्या अन्य सावरकर-कथा वाचण्यासाठी तसेच लेखकाची व्याख्याने ऐकण्या/आयोजिण्यासाठी भेट द्या: www.vikramedke.com)

  • स्वत:च्याच सापळ्यात अडकलेला : आजोबा

    एखाद्या कादंबरीवर चित्रपट बनवणे ही अतिशय अवघड गोष्ट असते. अवघड अश्या अर्थाने की, ती एकप्रकारची तारेवरची कसरतच असते! काय ठेवायचं, काय कापायचं यासोबतच मूळ लेखकाची दृष्टी आणि आपला दिग्दर्शक या नात्याने असलेला दृष्टीकोन या सगळ्याचा समन्वय साधणे अतिशय जोखमीचे काम असते. या तराजूत तोलल्यास ‘शाळा’ हा अजिबात वेगळा प्रयोग नव्हता. एका चांगल्या पुस्तकाचे पडद्यावर केलेले माध्यमांतर, एवढेच ‘शाळा’बद्दल सांगता येईल. पण मग तरीही ‘शाळा’ का वेगळा वाटतो? काही जण त्याला मराठी चित्रपटसृष्टीतील आणखी एक मैलाचा दगड का समजतात? याचे उत्तर आहे त्याच्या सादरीकरणात. कथा जरी जशीच्या तशी ठेवलेली असली, तरीही त्यातील पात्रे अचूक निभावणारे कलाकार शोधणे, त्यांच्याकडून चोख काम करवून घेणे — जोश्या असणार तर हाच, सुऱ्या हाच, शिरोडकर हिच्यापेक्षा वेगळी नसणारच; हे प्रेक्षकांना वाटायला भाग पाडणे आणि याहूनही अवघड म्हणजे तो आणीबाणीचा काळ उभा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे, या अश्या गोष्टींमध्ये दिग्दर्शक सुजय डहाकेचे खरे कौशल्य होते आणि त्यात तो शतप्रतिशत खरा उतरला होता. अन्यथा ‘शाळा’चाही ‘बीपी’, ‘दुनियादारी’, ‘टाईमपास’ इ. सारखा विस्कोट व्हायला वेळ नसता लागला!

    या पार्श्वभूमीवर सुजय डहाकेंच्या नव्या ‘आजोबा’ चित्रपटाबद्दल अपेक्षा वाटल्या नसत्या तरच नवल! त्यातून तो चित्रपट एका बिबट्याच्या प्रवासाभोवती फिरणारा, अनेकानेक चित्रपट-महोत्सवांनी गौरवलेला! शिवाय एकेकाळी हिंदी चित्रपट गाजवणाऱ्या उर्मिलाचे मराठीत पदार्पण घडविणारा चित्रपट, मराठीत पहिल्यांदाच ऍनिमेशन एवढ्या मोठ्या प्रमाणावर वापरलेला चित्रपट. उत्सुकता ताणायला आणि उत्कंठा वाढवायला एक नव्हे तर शेकडों कारणं होती. चित्रपट सुरू झाला व ‘शाळा’च्याच दर्जाची उत्कृष्ट ऍनिमेटेड श्रेयनामावली सरकू लागली आणि मी निश्चिंत झालो. परंतू ही निश्चिंतता काही मिनिटांतच संपली आणि भ्रमाचा भोपळा भसकन् फुटला!

    एका बिबट्याचा वनखात्याने सोडल्यापासून ते आपल्या निवासस्थानी परतेपर्यंतचा प्रवास, ही कल्पनाच किती थरारक आहे! स्वत: दिग्दर्शकानेच अनेकदा याबद्दल सांगितले आहे. परंतू प्रत्यक्षात मात्र या बिबट्याचा जो काही प्रवास दिसतो तो एकतर संगणकीकृत सिग्नल्समध्ये अथवा कार्टूनच्या (ऍनिमेशन नव्हे) माध्यमातून. शिवाय जिथे खरोखरीच ऍनिमेशन वापरलेय, त्यांपैकी कित्येक ठिकाणी त्याचा दर्जा अतिशय सुमार असा आहे. जे अजिबात पाहावत नाही. इथं तुम्ही ‘मराठी चित्रपट आहे, बजेट कमी आहे, मराठीला आपण उत्तेजन दिले पाहिजे’ वगैरे बचाव नाही करू शकत. कारण इतरवेळी आपणच म्हणतो ना की, सिनेमाला भाषा नसते! एकदा बाजारात उतरवलं की, तुमचं उत्पादन दर्जेदारच हवं. तिथे ‘आपलं आहे, घ्या सांभाळून’ असं नाही ना म्हणता येत! एकवेळ ही भावनिकता इतर कुठे दाखवता येईलही, परंतू जो प्रेक्षक काही-शे रुपये खर्चून चित्रपटगृहात येतो, त्याने का ही तडजोड स्वीकारावी?

    बरं एकवेळ तेही चालवून घेऊ. पण मुळात सिनेमाला कथा तरी हवी की नको! कथा हवी, तिला पुढे सरकण्यासाठी एखादा अवघड ता होईना मार्ग असावा. इथे मात्र दिग्दर्शक कधी डॉक्यु-ड्रामा दाखवू इच्छितो, तर कधी पर्यावरण आणि मानवाच्या संघर्षावर भाष्य करू पाहातो, तर कधी या सगळ्याची सामाजिक बाजू दाखवू पाहातो, तर कधी काही वैज्ञानिक बाजू दाखवू पाहातो. आणि अश्या या सगळ्या गोंधळात कथा नावाचा लहानसा जीव कुठे हरवून जातो, तेच कळत नाही. जे काही दाखवलंय, ते इतकं विखुरलंय की, कश्याचाच कश्याला मेळ लागत नाही. कोणत्याही, अगदी कोणत्याही पात्राचा व्यवस्थित पात्र-परिपोषच केलेला नाही. पूर्वा राव (उर्मिला मातोंडकर) ही दाक्षिणात्य आहे, हे कुणीतरी पात्र सांगतं तेवढंच – अन्यथा तिने संपूर्ण चित्रपटभर एकच दाक्षिणात्य शब्द उच्चारलाय. तोही उत्तरार्धात! इतरवेळी ती वाया गेलेली प्रौढा, दारुडी, चेन-स्मोकर, हिस्टेरिक, बायपोलर डिसॉर्डर आणि मल्टिपल पर्सनॅलिटी डिसॉर्डरची रुग्ण इथपासून ते एक अतिशय उथळ आणि डिप्रेस्ड, खेड्यापाड्यांत अंगप्रदर्शन करत फिरणारी एक भंपक बाई इथपर्यंत काहीही वाटू शकते. कथेप्रमाणे काही गोष्टी नाईलाजास्तव कराव्या लागल्यामुळे ती अधून-मधून संशोधिका वाटते एवढंच! बाकी तिची संवादफेक तर अक्षरशः ‘दिव्य’ आहे. बिबट्या जर तिच्यासमोर आला असता ना, तर मूळची मराठी असूनही चायनिज वाटावी अशी मराठी बोलते, एवढ्या एकाच गोष्टीसाठी ते उमदं जनावर नरभक्षक (की नारीभक्षक) झालं असतं! याहून विचित्र गोष्ट म्हणजे बिबट्याचं नाव ‘आजोबा’ असंच का ठेवलं, याची कारणमीमांसा करण्याची दिग्दर्शकाला थोडीशीही गरज भासलेली नाहीये, बोला!! जे काय समजायचं ते आपणच दिग्दर्शकाच्या मुलाखतींवरून समजून घ्यायचं (आणि वरून पैसे खर्चून चित्रपट पाहायलाही जायचं)! कथेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं असलेलं यशपाल शर्माचं उपकथानक तर इतकं काही ढीलेपणाने हाताळलंय की, ते लक्षातही राहात नाही. गोष्टी अगदीच उरकून घेतल्याहेत हो! बरं तर बरं, तिथे यशपाल शर्मांसारखा नाणावलेला अभिनेता होता, म्हणून त्याने ते व्यवस्थित निभावलं तरी! पूर्वाच्या इंटर्नची प्रेमकहाणी मात्र अगदीच कथेला विसंगत अशी. अजिबातच आवश्यकता नसलेली. अश्या गोष्टी चित्रपटात का घुसडल्या तेच समजत नाही. तीस दिवसांत एकशेवीस किलोमीटरचा प्रवास, तोही मानवी वस्त्यांमधून करणारा बिबट्या विरुद्ध मनुष्यप्राणी असा एक संघर्ष फुलायला हवा होता. बिबट्या संपूर्ण प्रवासात कुणाही माणसावर हल्ला करत नाही, मनुष्य मात्र सतत या ना त्या प्रकारे त्याला ओरबाडू पाहातोय – कधी शिकारीसाठी तर कधी संशोधनासाठी. या गोष्टी अधोरेखित व्हायला हव्या होत्या, ज्या नेमक्या होत नाहीत. आणि तरीही दिग्दर्शकाचा आव मात्र हा संघर्ष व्यवस्थित चितारल्याचा! आणि यामुळेच, बिबट्या गेल्यावर पात्रांना काही का वाटले असेना, परंतू प्रेक्षकांना मात्र जरादेखील वाईट वाटत नाही. आणखी एका तांत्रिक बाबीकडे लक्ष वेधायचं झालं तर सब-टायटल्सचा दर्जा अतिशय सुमार आहे व त्यात खूप साऱ्या चुकाही आहेत. दिलीप प्रभावळकरांसारख्या सर्वच दृष्टींनी थोर कलाकाराला केवळ तीन-चारच प्रसंगांपुरतं वापरून दिग्दर्शकाने काय मिळवलं, हे देवच जाणे. त्यातून कपडेपट कुणी सांभाळलाय आणि दिग्दर्शक त्यातून काय दाखवू पाहात होता कुणास ठाऊक, परंतू दिवस असो वा रात्र प्रभावळकरांना ‘जंगल के लिए तैय्यार’ अश्याच कपड्यांत दाखवलंय. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारात भर रात्री फेल्ट-हॅट घालून फिरतो हा माणूस? का? कश्यासाठी??

    याचा अर्थ ‘आजोबा’मध्ये एकसुद्धा चांगली गोष्ट नाही का? असं अजिबात नाही. ज्ञानोबाच्या भूमिकेचा परिपोषही इतरांसारखाच सुमार असूनदेखील ह्रषिकेश जोशी या गुणी अभिनेत्याने ती भूमिका अतिशय ताकदीने साकारलीये. ज्ञानोबा (सब-टायटल्समध्ये पूर्णवेळ ‘द्यानोबा’ असे लिहून येते) त्याने अक्षरशः  जिवंत केलाय! काय ती त्याची सुरेख शब्दफेक आणि काय तो बिनतोड मुद्राभिनय!! अहाहा!!! जियो,  जियो ह्रषिकेश जोशी, जियो!!! ‘आजोबा’चे छायाचित्रण अतिशय सुरेख आणि दर्जेदार जमून आलेय – अगदी ‘फॅण्ड्री’च्या खालोखाल. त्यासाठी दिएगो रोमेरो यांना दाद द्यायलाच हवी! परंतू ह्रषिकेश जोशींच्या खालोखाल चित्रपटाची सर्वाधिक जमेची बाजू आहे, ती म्हणजे त्याचं पार्श्वसंगीत! साकेत कानेटकर या ताज्या दमाच्या संगीतकाराने अतिशय सुरेख, अर्थवाही आणि तरीही अत्यंत शैलीदार असे पार्श्वसंगीत निर्माण केले आहे. प्रणाम त्यांच्या प्रतिभेला!!

    मराठीतला एक वेगळा प्रयोग म्हणून या चित्रपटाकडे नक्कीच पाहाता येईल! परंतू काही जमेच्या बाजू असल्या तरीही ‘आजोबा’ एक सिनेमा म्हणून प्रभाव पाडण्यात कमी पडतो, असेच म्हणावे लागेल. ‘एका बिबट्याचा एकाकी प्रवास’ ही कल्पनाच दिग्दर्शकाला इतकी थरारक वाटलेली दिसतेय, की त्याभोवती कथेची गुंफण करण्याचे भानच त्यांना राहिलेले नाही. त्यामुळे तयार झालाय एक विसविशीत आणि कमालीचा ढीला चित्रपट! आपल्याच जाळ्यात अडकून जेरबंद झालेला ‘आजोबा’!!

    *२.५/५

    – © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.vikramedke.com)

    image