सावरकरांची उडी, नव्हे — भारतीय स्वातंत्र्याची गुढी!

आज ८ जुलै. आजच्याच दिवशी स्वा. सावरकरांनी मार्सेल्स बंदरात ती त्रिखंड गाजविणारी जगप्रसिद्ध उडी ठोकली होती. आता काही टिनपाट लोक म्हणतात की, सावरकर ५ मिनिटंही पोहोले नसतील आणि ती उडी गाजलेली नव्हे तर गाजवलेली होती इ. काहीजण तर या उडी मारण्याच्या पराक्रमासाठी सावरकरांना पळपुटे म्हणण्याइतकी मजल मारतात!

वास्तविक सावरकर किती वेळ पोहोले, हे महत्वाचं नाहीच आहे. त्या पोहोण्याचे परिणाम काय झाले हे महत्वाचे! आणि सावरकर फक्त पाचच मिनिटं पोहोले हे सांगायला सावरकरांचे जातीयवादी टीकाकारच कश्याला हवेत? सावरकर तुरुंगात असताना एका चीनी बंद्याने सावरकरांना अतिशय भक्तिभावाने विचारले होते, ‘महाराज आपण किती दिवस पोहत होता’? तर सावरकर शांतपणे उत्तरले होते, ‘दिवस कसले, पाच मिनिटंही पोहलो नसेन’! हे स्वत: सावरकरांनीच लिहून ठेवलंय. त्याचवेळी त्या चीनी बंद्याचा कसा हिरमोड झाला हेही त्यांनी प्रांजळपणाने लिहिले!

आता जरा काय घडलं हे पाहूयात. सावरकरांविरुद्ध अटक वॉरंट निघालं त्यावेळी सावरकर इंग्लंडमध्ये नव्हतेच. ते फ्रान्समध्ये होते. याचाच दूसरा अर्थ असा की, सावरकर जर इंग्लंडमध्ये परतलेच नसते, तर इंग्रज सरकार त्यांना बापजन्मीही पकडू शकले नसते. फ्रान्समधून बाहेर पडण्याच्या आणि भूमिगत राहून क्रांतिकार्य करण्याच्या हजारो वाटा होत्या. पण तरीही सावरकर परतले आहेत ते केवळ ‘मी सापडत नाही म्हणून माझ्या अनुयायांना त्रास दिला जातोय. तो थांबवावा’ यासाठी! यातून हेच स्पष्ट होते की, सावरकरांना जर फ्रान्सच्या एका बंदरात उडी मारून पळूनच जायचे असते, तर मुळात ते फ्रान्सहून इंग्लंडला अटक करवून घ्यायला आलेच नसते! दुसरे असे की, सावरकरांचे इंग्लिश अनुयायी श्री. गाय आल्ड्रेड हे सावरकरांना एकदा इंग्लंडच्या तुरुंगात भेटले आणि त्यांनी विचारले की, तुम्हाला इथून पळून जाण्याची काही व्यवस्था करू का? सावरकरांनी त्यांना स्वच्छ सांगितले की, मी माझी योजना तयार केली आहे. हे स्वत: आल्ड्रेड यांनीच आपल्या आत्मचरित्रात नोंदवले आहे. याचाच अर्थ असा की, सावरकरांच्या डोक्यात दुसरेच काहीतरी शिजत असले पाहिजे. आता ते काय, हे पाहू!

दि. ८ जुलै १९१० रोजी सावरकरांनी पहारेकऱ्यास शौचाला जायची परवानगी मागितली. तो त्यांना घेऊन गेला व शौचालयाबाहेरच थांबला. सावरकरांनी आत जाताच दार लावून घेतले. त्या दाराला असलेल्या पोर्टहोलवर आपला कोट टांगला. ते त्या पहारेकऱ्याच्या लक्षात आले. पण बहुतेक लज्जेमुळे सावरकरांनी असे केले असावे, असा विचार करून तो गप्प बसला. त्या दाराच्या बरोब्बर समोर – थोडे वरच्या बाजूला – समुद्राकडे उघडणारे एक दुसरे पोर्टहोल होते. सावरकरांनी आदल्या दिवशीच आपल्या यज्ञोपविताने मापे घेऊन ठेवली होती. त्यांनी उपनेत्र (चष्मा – सावरकरांचा शब्द!) काढून बाजूला ठेवले. आणि सारे शरीर त्या उघड्या पोर्टहोलमधून खाली झोकून दिले. विचार करा — पलिकडे किती फूटांवर पाणी आहे, मुळात पाणी आहे की नाही याचीदेखील कल्पना नसताना सावरकरांनी उडी घेतलीये! यापाठी सावरकरांनी दाखवलेल्या अतुलनीय धैर्याची नुसती कल्पनाच केलेली बरी!

जहाज ते पाणी यांत २७ फुट अंतर होते. इतक्या उंचावरून समुद्राच्या पाण्याचा फटका किती जोरात बसतो, याची कल्पना पट्टीचे पोहणारे करू शकतात! जहाज ते बंदराची भिंत यात सुमारे ८ फुट अंतर होते. सावरकरांची उंची सुमारे पाच-साडेपाच फुट. म्हणजेच उडी मारताना घाई-गडबडीत थोडी जरी वेडीवाकडी हालचाल झाली असती, तरीही कपाळमोक्ष ठरलेलाच! बरं पाण्यात पडल्यावर तरी सुटका झाली का? अजिबात नाही. क्षणाचीही उसंत न घेता सावरकर जहाजाला वळसा घालून बंदराच्या भिंतीच्या दिशेने पोहायला लागले. बंदराची भिंत सुमारे ९ फुट उंचीची होती. सतत पाण्याशी संपर्क येऊन ती किती निसरडी झाली असेल, याची तुम्ही कल्पना करू शकता! शिवाय तिचा वापर माणसांच्या चढ-उतारासाठी कधीच केला जात नसल्याने तिला हात-पाय रोवायला किंचितही जागा नव्हती. सावरकर तश्याही परिस्थितीत वर चढले. एक-दोन नव्हे, तर तब्बल ९ फूट! आणि मग ते पळत सुटले. सावरकरांना घ्यायला मादाम कामा आणि श्री. व्हि. व्हि. एस.  अय्यर येणार होते, हा कुणीतरी पसरवलेला ऐतिहासिक अपसमज आहे. वास्तविक असे कुणीही येणार नव्हते. एव्हाना पहारेकऱ्यांना सावरकर निसटल्याची कल्पना आलीच होती. ते सावरकरांच्या मागे लागले. सावरकरांनी तश्याच अवस्थेत एक फ्रेंच पोलिस गाठला. मात्र सावरकरांची अवस्था पाहून आणि त्यांचे बोलणे नीटसे न समजल्यामुळे तो सावरकरांची काहीच मदत करू शकला नाही.  तोपर्यंत पोहोचलेल्या इंग्रजी पहारेकऱ्यांनी त्या फ्रेंच पोलिसास काहीतरी चिरीमिरी दिली, सावरकरांना आपल्या ताब्यात घेतले आणि पुन्हा जहाजाच्या दिशेने चालवले!

हे ते सावरकरांचे तथाकथित ५ मिनिटांचे पोहणे! उपरोक्त वर्णन वाचून सावरकरांनी किती जोखीम उचलली याची वाचकांना कल्पना आलीच असेल! हा कसला पराक्रम, ही तर फसलेली योजना – असंही काही मित्रांना वाटण्याचा संभव आहे! सावरकरांनी श्री. गाय आल्ड्रेडला सांगितलेली ‘योजना’ सुरू होते ती नेमकी इथेच!!

सावरकरांना पळूनच जायचे असते तर ते कधी इंग्लंडला परतलेच नसते. भूमिगत राहून कार्य केले असते. मग सावरकरांनी इंग्लंडला येऊन, परत इंग्रजांच्या खर्चाने फ्रान्सला जाऊन आणि मग जाहीर उडी ठोकून काय मिळवले? याचे उत्तर दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रांनी दिले! एखाद्या देशाचा गुन्हेगार जर दुसऱ्या देशाच्या भूमिवर असेल, तर त्याला पकडण्यासाठी त्या संबंधित देशांमध्ये ‘गुन्हेगार हस्तांतरणाचा करार’ असावा लागतो — असे आंतरराष्ट्रीय कायद्याचे तत्त्व आहे! तसा तो करार इंग्लंड आणि फ्रान्सदरम्यान होता. मात्र त्याची एक प्रक्रिया असते. ती न पाळताच सावरकरांना इंग्रज पहारेकऱ्यांनी ओढत नेले होते. थोडक्यात एक बेकायदेशीर गोष्ट घडली होती. दुसऱ्या दिवशीची सारी फ्रेंच वर्तमानपत्रे ही इंग्लंडच्या या बेकायदेशीर वागण्यावर टीकेची झोड उठवण्यात रंगून गेलेली होती! ज्या साम्राज्यावर कधीच सूर्य मावळते नाही त्या इंग्रजी साम्राज्याला आपल्या कूटनीतीच्या बळावर सावरकरांनी एक आंतरराष्ट्रीय पातळीवरील बेकायदेशीर गोष्ट करायला भाग पाडले होते. अवघ्या इंग्रज सरकारचा आपल्या योजनेत एखाद्या प्याद्यासारखा वापर करून घेतला होता! हळूहळू हे टीकेचे लोण जगभरात पसरले. फ्रान्सच नव्हे तर अवघा युरोप, अमेरिका खंड, पार जपान, रशिया आदी दूरचे देशही इंग्लंडवर जहरी टीका करू लागले व सावरकरांना सोडण्याची मागणी करू लागले. अवघे जग या एकाच विषयाने दुमदुमून गेले! मार्सेल्सच्या महापौरांनी इंग्रज सरकारला खरमरीत पत्र लिहून सावरकरांना सोडण्याची मागणी केली. वाद इतका वाढला की, सारे प्रकरण अखेर आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यावे लागले! कल्पना करा — आंतरराष्ट्रीय न्यायालय, जिथे दोन देश एकमेकांशी भांडतात. तिथे इंग्लंड आणि फ्रान्स हे दोन देश एकमेकांशी भांडताहेत. तेही कुणासाठी? तर एका तिसऱ्याच गुलाम देशातील विनायक दामोदर सावरकर नावाच्या माणसासाठी! एका रात्रीत ‘भारत नावाचा काहीतरी देश आहे आणि तिथले नागरिक अन्यायी इंग्लंडपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी झगडताहेत’ ही बाब जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली! कश्यामुळे? तर सावरकरांनी चाणक्यमतिने केलेल्या एका खेळीमुळे!! त्यानंतर लवकरच फ्रान्सच्या पंतप्रधानांना त्यागपत्र द्यावे लागले. भारताने, विशेषत: सावरकरांनी मिळवलेल्या या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्धीचा फायदा भारतीय स्वातंत्र्यलढ्याला पुढे अनेकदा झाला. तो एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे!

आज या उडीला शंभर वर्षांहूनही अधिक काळ लोटलाय. मात्र त्यापाठी सावरकरांनी दाखवलेल्या आंतरराष्ट्रीय राजनीतीच्या सूक्ष्म आकलनाची खुमारी यत्किंचितही कमी झालेली नाही. सावरकरांच्या राजनीतीपटुत्वापुढे नतमस्तक होताना सार्थपणे म्हणावेसे वाटते की, सावरकरांनी मारलेली उडी ही नुसती उडी नव्हती तर भारतीय स्वातंत्र्याची उभारलेली गुढी होती!!

(संदर्भ साभार: संशोधिका श्रीमती Anurupa Cinar – www.anurupacinar.com)
– © विक्रम श्रीराम एडके.
(लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी तसेच लेखकाने विविध विषयांवर दिलेली व्याख्याने ऐकण्या/आयोजिण्यासाठी भेट द्या:  www.vikramedke.com)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *