‘ति’ची गोष्ट

दिवसभर ऍटिट्यूड सांभाळून वावरणारी ती आपल्याच तोऱ्यात असते,
दिवाणे जग हे सारे तिच्या बोटाच्या टोकावर नाचते!
वाऱ्याच्या नादावर धरलेला असतो तिने ताल —
अन् अस्मानावर ती उधळते अधरांचा रंग लाल!
भीती कश्याची? पर्वा कुणाची? मला कोण रोखेल?
हसविणे, फसविणे, उंच उडविणे — माझा रोजचाच खेळ!
“‘त्या’नेही नव्हते का मला फसविले असेच,
टाकले नव्हते का ‘त्या’ने बंधनात?
उसळला होता आगडोंब कसा त्याक्षणी मना-कणांत”!
सांगत होती — “कसे उतरले होते गालावर आसू,
अन् निर्मिले होते कसे मी त्यातूनच भेसूर हासू!
त्या माझ्या भेसूर हास्यरवात सारे मी विसरते —
त्याच खेळाचे नियम वापरून ‘त्या’च्यासारख्यांना खेळवते”!

तो शांतपणे ऐकत असतो सारे, एव्हाना उत्तररात्रीचे पडघम वाजू लागतात,
एकेका त्या ठोक्यासोबत मुखवटे तिचे गळू लागतात!
कढ दु:खाचे पचवलेला चेहरा मग उमलू लागतो,
हजार जखमांनी घेरलेला, पण त्याला निरागस भासतो!
भिवईच्या इशाऱ्यावर नाचविणारे डोळे शोधू लागतात आधार,
मुखवटा गळाल्याची जाणीव व्हायलाही, लागतात तिला पळें चार!
पण डोळे होतात शुष्क तिचे, क्षणभरात सावरते,
त्याच्या नजरेतला स्नेह पाहून अजूनच ती बावरते!
म्हणते, “तिरस्कार कर माझा” — तो ललाटीं ओठ टेकवतो!
“वस्तू का नाही समजत मला?” — तर तो बोटांत बोटे अडकवतो!!
‘मला ओरबाडण्याची का याला तहान नाही?’, ती दचकून मागे सरते,
इतक्या महिन्यांची मैत्री त्यांची, पण ओळख नव्यानेच पटते!
“विकेट पडेल हो तुझी!”, ती हसत-हसत उठते —
अन् आयुष्यात पहिल्यांदाच तिला प्रेम जाणवलेले असते!!!

– © विक्रम श्रीराम एडके.
(www.vikramedke.com)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *