Author: Vikram Edke

  • एका पेटंटची गोष्ट

    आज आपण अगदी सहजपणे मोबाईल, रेडिओ इ. साधने वापरतो. परंतु या सर्व ‘बिनतारी संदेशवहना’चा (Wireless Telecommunication) शोध कुणी लावलाय माहितीये का? हा शोध लावणारी व्यक्ती एक भारतीय आहे, नव्हे आपल्या सर्वांच्या परिचयाचीदेखील आहे! त्यांचं नाव आहे, आचार्य जगदिशचंद्र बसू (१८५८-१९३७)!! होय, ‘वनस्पतींनाही जीव असतो’ ही हिंदूधर्मातील संकल्पना वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करणारे व त्या तत्त्वावर आधारित ‘क्रेसोग्राफ’ या यंत्राची निर्मिती करणारे प्रा. जगदिशचंद्र बसू!! ते नुसते वनस्पतीशास्त्रज्ञच नव्हते, तर भौतिकशास्त्रज्ञ, जीवशास्त्रज्ञ, पुरातत्त्वविद, आणि विज्ञानकथालेखकदेखील होते! एवढेच कश्याला, आज वापरात असलेल्या ‘रेडिओ’च्या निर्मितीचेही श्रेय प्रा. बसू यांनाच दिले जाते, हे सर्वच वैज्ञानिक प्रगतीसाठी पाश्चिमात्यांकडे आस लावून पाहाणाऱ्या भारतीयांच्या गावीही नसेल! मग चंद्रावरील एका खळग्याला सन्मानपूर्वक त्यांचे नाव देण्यात आले आहे, हे माहिती असायची शक्यता तर आणखीनच धूसर!

    image
    आचार्य जगदिशचंद्र बसू

    मुळात आचार्यांचा स्वभावच निरीच्छ, त्यामुळेच त्यांनी ना कधी आपल्या संशोधनाचा व्यवसाय केला ना कधी पेटंट घेण्याच्या फंदात पडले. किंबहूना संशोधनांचे स्वामित्त्वाधिकार घेऊन त्यांचे बाजारीकरण करण्याला त्यांचा कायमच विरोध होता. ३० नोव्हेंबर १९१७ दिनी ‘बोस इन्स्टिट्यूट’ या आपल्या जगप्रसिध्द संशोधनसंस्थेचे उद्घाटन करताना त्यांनी दिलेल्या ‘Voice of Life’ या प्रसिद्ध व्याख्यानातही त्यांनी याच तत्त्वाचा पुरस्कार केलेला आढळतो! परंतु याच संस्थेच्या वेबसाईटवर (www.boseinst.ernet.in) मात्र त्यांच्या ‘Galena Detector’ या संशोधनाचे पेटंट त्यांच्या नावावर असल्याचे सांगितले आहे. हे काय गौडबंगाल आहे बुवा? वास्तविक स्वत: आचार्य बसू यांनीच लंडनच्या रॉयल इन्स्टिट्यूट या विख्यात संस्थेत व्याख्यान देताना आपले ‘Galena Detector’ हे संशोधन मांडले होते व स्पष्टपणे नमूद केले होते की, ‘सदरचे यंत्र व त्यापाठचे संशोधन सर्वांनाच व्यावसायिक व इतर सर्व वापरासाठी मोफत उपलब्ध असेल’ (संदर्भ : ‘विज्ञान प्रसार’या शासकीय उपक्रमाच्या वेबसाईटने प्रकाशित केलेले सुबोध महंतीलिखित आचार्य बसू यांचे चरित्र). एवढेच कश्याला, त्याकाळात या संशोधनाच्या व्यावसायिक उपयोजनासाठी आलेले लठ्ठ रकमेचे सारेच प्रस्ताव आचार्य बसू यांनी धुडकावून लावले होते. तरीही या संशोधनाचे पेटंट आचार्यांच्या नावे कसे काय आढळते?

    image
    स्वामी विवेकानंद

    याचे उत्तर आहेत स्वामी विवेकानंद!! बसूंचे Galena Detector हे जगातील पहिलेवहिले ‘अर्धवाहक’ (Semi-Conductor) होय. यालाच पहिल्या पिढीतला ‘प्रकाशयोगी घट’ही (Photovoltaic Cell) म्हणता येईल! असे म्हणतात की, स्वामी विवेकानंदांना आचार्यांच्या या संशोधनाचे भविष्यकालीन महत्त्व जाणवले होते. तसेच, आपल्या विरक्त वृत्तीमुळे आचार्य या संशोधनाचे पेटंट घेऊ इच्छित नाहीत, हेही स्वामीजींनी ठाऊक होते (संदर्भ : The Monk As Man – The Unknown Life Of Swami Vivekananda, पृ. १४-२५, लेखक : मणिशंकर मुखर्जी, पेंग्विन बुक्स प्रकाशन). त्यामुळेच शिकागो येथील धर्मसभेसाठी अमेरिकेला जाण्यापूर्वी त्यांनी आचार्यांची भेट घेतली व त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. त्यात यश येत नाहीसे लक्षात आल्यावर त्यांनी सदर यंत्राच्या प्रती तयार केल्या व आपल्यासोबत अमेरिकेला नेल्या. अमेरिकेतील वास्तव्याच्या काळात स्वामीजींनी नुसती व्याख्यानेच नाही दिली, तर आपली शिष्या व प्रख्यात लेखिका-समाजसेविका श्रीमती सारा बुल हिला सांगून सदरच्या यंत्राचे पेटंटदेखील आचार्य बसूंच्या नावे नोंदवले!!

    आज सदर संशोधनाचे पेटंट पाहू गेल्यास ते अमेरिकेत नोंदवले आहे, हे दिसते (पेटंट क्र. US755840). आवेदक या नात्याने आचार्यांच्या नावासोबत श्रीमती बुल यांचेही नाव दिसते. शिवाय स्वामीजींची वैज्ञानिक संशोधनाबाबतची दूरदृष्टी व त्यांचा आचार्यांशी असलेला स्नेहदेखील सुपरिचित आहे. तेव्हा सदरचे पेटंट हे स्वामीजींच्याच सांगण्यावरून नोंदवण्यात आले हे उघड आहे. किंबहूना श्रीमती बुल व आचार्य यांचा परिचय स्वामी विवेकांनंदांमुळेच झाला. श्रीमती बुल यांनी आचार्यांना प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी ४००० डॉलर्सची मदत केल्याचेही उल्लेख आढळतात (संदर्भ : Swami Vivekananda – The Living Vedanta, पृ. २४०-२४२, लेखक : बद्रिनाथ चतुर्वेदी). परंतु स्वामीजी शिकागोसाठी मार्गस्थ झाले ३१ मे १८९३ दिनी आणि आचार्यांनी रेडिओलहरींवरील आपले संशोधन सुरु केले १८९४ साली. तेव्हा सदरचे पेटंट हे श्रीमती बुल यांनी स्वामीजींच्याच सांगण्यावरून नोंदविले हे जरी खरे असले (संदर्भ : Swami Vivekananda & Scientists, पृ. १४, विद्यार्थी विज्ञान मंथन), तरी स्वामीजी स्वत: ते यंत्र घेऊन अमेरिकेला गेले होते ही कथा खोटी असावी, असे मला वाटते. कारण, सदर पेटंटचा आवेदन दिनांक (Filing Date) हा ३० सप्टेंबर १९०१ असा आढळतो, तर संमति व प्रकाशन दिनांक (Granting & Publication Date) हा २९ मार्च १९०४ असा (Application No. : US19010077028 19010930) म्हणजेच, स्वामीजींच्या महानिर्वाणानंतरचा आढळतो.

    image
    श्रीमती सारा बुल

    परंतु सदर पेटंटची नोंदणी ही स्वामीजींच्या सांगण्यावरूनच झाली, ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आहे. आज जेव्हा भारताने हळद, बासमती तांदूळ इ. अस्सल भारतीय संशोधनांचे पेटंट्स वेळीच न नोंदविल्यामुळे झालेला प्रचंड त्रास अनुभवलाय, त्या पार्श्वभूमीवर तर स्वामीजींची दूरदृष्टी अधिकच खुलून दिसते. एवढेच नव्हे, तर संशोधनकार्यास व्यापक स्वरूप येण्यासाठी संशोधनसंस्था असावी ही टाटा इन्स्टिट्यूटची आधारभूत कल्पनादेखील स्वामीजींनीच सर जमशेदजी टाटा यांना जपान ते शिकागो या प्रवासात सांगितली होती (संदर्भ : टाटांनी स्वामीजींना दि. २३ नोव्हेंबर १८९८ रोजी लिहिलेले पत्र). थोडक्यात, स्वामीजी केवळ अध्यात्मातच रममाण होणारे नव्हते, तर भौतिक जगात मानाने व ताठ मानेने जगण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, याचीदेखील जाण होती त्यांच्याठायी! एकप्रकारे अध्यात्म आणि विज्ञानाचा अपूर्व संगमच म्हणा ना! आजच्या भारताला याचीच सर्वाधिक आवश्यकता आहे. अध्यात्म व विज्ञान ही एकाच गाडीची दोन चाके आहेत. कोणतेही एक चाक जर पंगू असेल, तरीही गाडी मुक्कामी पोहोचू शकत नाही. भौतिक जगात जगण्यासाठी विज्ञान अत्यावश्यक आहेच, परंतु माणूस म्हणून उन्नत होण्यासाठी क्रियाशील अध्यात्मदेखील तितकेच आवश्यक आहे, हा संदेशच जणू स्वामीजींनी कृतीद्वारे दिला आहे!! स्वामीजींचा जन्म मकरसंक्रांतिचा! त्यानिमित्ताने तिळगुळ खाता-खाता आपण सर्वांनी स्वामीजींच्या चरित्रातून एवढा एक बोध घेतला तरी पुरे!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी तसेच स्वामी विवेकानंद या विषयावर लेखकाची व्याख्याने आयोजित करण्यासाठी संपर्क करा:  www.vikramedke.com)

  • आत्मबोध

    ‘धप्प’ असा जोरदार आवाज झाला आणि अरुळसामीने आवाजाच्या दिशेने पाहिले. काय घडले, हे लक्षात यायला क्षणभरही नाही लागला त्याला.लागलीच बोंब ठोकली त्याने! त्याचा आवाज ऐकून बघता-बघता इतर नावाडीही आसपास जमा झाले त्याच्या.
    “काय झालं रं बोंबलायला”, एकाने विचारलं!
    “त्यो.. त्यो सन्याशी.. त्यो मला दर्यापारच्या फत्तरावर न्हे म्हनत हुता.. त्यानी समिंदरात उडी मारलीन् ना..”
    कुणाला काहीच लक्षात येईना हा काय सांगतोय ते. मग पुन्हा पुन्हा खोदून विचारल्यावर तुकड्या तुकड्यांनी माहिती हाती लागू लागली ती अशी की, एक कुणीतरी सन्यासी, ‘पलिकडे श्रीपादशिलेवर पोहोचवशील का’, असं विचारत नावाडी अरुळसामीकडे आला होता. हे तर अरुळसामीचे रोजचेच काम! त्याने ताबडतोब नेण्या-आणण्याचा दर सांगितला. सन्याश्याकडे तर एक फुटकी कवडीदेखील नव्हती. तो खट्टू झाला. त्याने अरुळसामीला विनवणी करून पाहिली, पण भाडं मिळाल्याशिवाय जायला नकार दिला अरुळसामीने! सन्याश्याने वाट पाहिली की कुणी भाविक आपला खर्च करेल का. पण तसं तिथे कुणीच दिसत नव्हतं. अखेरीस सन्याश्याने जरा विचार केला, काश्या आवळला आणि ‘जय माँ कालीऽ’ अशी आरोळी ठोकत समुद्रात उडी ठोकला व पोहत पोहत पुढे जाऊ लागला. हे दृश्य पाहून अरुळसामी घाबरला. पट्टीच्या पोहोणाऱ्यासाठीदेखील अंतर काही कमी नव्हते ते. शिवाय समुद्रात अनेकविध पाशवी जलचर भरलेले! पोहत पोहत श्रीपादशिलेपर्यंत पोहोचण्याची शक्यता जवळजवळ शून्यवत् होती! आपला दोन पैश्यांचा व्यवसाय एखाद्याच्या जीवावर बेतणार या भीतीने घाबरून जाऊन अरुळसामीने बोंब ठोकली!

    “आरं पन तुला तरी काय येवढं नडलं होतं पैश्यांचं? नावेत येवढे लोक बसवून न्हेतोस, त्यांच्यात एकजण फुकट न्हेला अस्ता तर काय झिजली आस्ती तुझी व्हडी”, एकाने विचारले.
    अरुळसामी अजूनच खचला. म्हणाला,
    “माजी लई म्होटी चुकी झाली ह्ये तर खरंच, पन आता येळ दवडायला नगं! आधी त्या साधुबाबाला वाचिवलं पाह्यजे”!
    हे म्हणणं सगळ्यांना पटलं. ताबडतोब एक नाव काढण्यात आली आणि तिच्यात बसून ८-१० कोळी श्रीपादशिलेच्या दिशेने निघाले. रस्त्यात ना कुठे सन्यासी दिसला ना काही झटापट झाल्याचं लक्षण! कुणा मगरीने वा माश्याने फाडलं तरी या समुद्रात काय समजणार म्हणा! अखेरची आशा म्हणून सारे श्रीपादशिलेवर पोहोचले. आणि त्यांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही – चिंब भिजलेला तो पंचविशीचा बलदंड सन्यासी शिलेवर ध्यानस्थ बसला होता. या मंडळींची चाहूल लागताच त्याने डोळे उघडले. एवढं दिव्य करीत श्रीपादशिलेवर पोहोचणे ही केवढीतरी मोठी गोष्ट होती. सन्यासी साधासुधा तर खचितच नव्हता. या दिव्यतेने दिपलेल्या सर्वांनी वाकून नमस्कार केला सन्याश्याला.

    काही क्षण शांततेत गेले. पहिला शब्द अरुळसामीच्याच तोंडून बाहेर पडला,
    “म्हाराज मला क्षमा करा. म्या चुकलो. पैश्यापायी खुळावलो हुतो म्या. तुमचं मोठंपण वळखू शकलो न्हाई मी. जो मानूस इथवर यायला सोत्ताच्या जीवाची बी पर्वा करत न्हाई, त्याचा हितं येन्यामागं नक्कीच कायतरी हेतू आसनार. कायतरी दैवी काम आसनार. मी मूर्ख तुमच्या या कानामध्ये येत होतो. नरकात बी जागा मिळनार न्हाई मला”!
    अरुळसामी स्वत:च्याच थोबाडीत मारून घेऊ लागला. ते पाहून सन्यासी झटकन पुढे झाला. अरुळसामीचे हात धरले आणि आसपासच्या समुद्राहूनही अधिक शांत, धीरगंभीर आवाजात म्हणाला,
    ‘वेडे की खुळे नावाडीबाबा तुम्ही? का स्वत:ला प्रताडित करताहात? अहो आईची इच्छा होती लेकराने पोहत पोहत तिच्यापाशी यावं, ती तिने पूर्ण करून घेतली. तुमचा कुणाचाही काहीही दोष नाही यात. खरंच”!
    सन्याश्याचा तो दृष्टीकोन आणि आभाळभर मोठेपण सर्वांना एका क्षणात वश करून गेले! एकाने धीर करून विचारले,
    “म्हाराज हितं तुमची जेवनाची काही सोय..”?
    “सोय अशी काहीच नाही. इथे ध्यान करण्यासाठी आलोय मी. मातेने जेवू घातलं तर जेवेन, अन्यथा ध्यान संपेपर्यंत उपवेशन!”, सन्यासी सहजपणे म्हणाला!
    “त्ये काही न्हाई, माझ्यामुळं तुमास्नी तरास झालाय, तुमी हितं आसेपत्तुर रोज म्याच जेवन आनून द्येनार तुमाला. तुमी आरामात ऱ्हावा, ध्यान करा. म्या घेईन सारी काळजी. येवढं तरी प्रायश्चित्त घेऊंद्याच मला”, अरुळसामीने जाहीर करून टाकलं!
    “जशी आईची इच्छा”, सन्याश्याने हसून मान डोलावली!
    “पन म्हाराज, तुमचं नाव काय? कुठनं आलात? तमिळ तर वाटत न्हाईत तुमी?”, अरुळसामीने विचारले.
    “होय, इथला नाही मी. बंगालहून आलोय. तीर्थयात्रा करतोय मी सध्या. अवघा देश फिरलो. अंती देशाच्या शेवटच्या टोकावर ध्यान करायचं म्हणून या कन्याकुमारीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिलेवर आलो! आणि नावाचं म्हणाल, तर बरीच नावे आहेत मला. कुणी विविदिशानंद म्हणतं, तर कुणी सच्चिदानंद म्हणतं! गेले काही दिवस लोक एका वेगळ्याच नावाने हाक मारतात मला. मलाही ते नाव आवडलंय – उच्चारायला सोपं, सुटसुटीत तरीही अर्थपूर्ण – विवेकानंद! तुम्हीही हवं तर याच नावाने हाक मारा मला!”, सन्याश्याचे निरागस उत्तर!
    “स्वामी विवेकानंद”, अरुळसामीने एकवार हे नाव मनात घोळवले व सारे परत फिरले!
    त्यानंतर तीन दिवस रोज दिवसातून दोनदा अरुळसामी जेवण घेऊन यायचा व खरकटं घेऊन जायचा. या तीन दिवसांत स्वामी एक शब्दही बोलले नाहीत. सातत्याने ध्यानमग्न असायचे ते. भोजनादी विधींसाठी उठत तेवढेच!

    तिसऱ्या दिवशी चमत्कार झाला. आजवरचे सारे आयुष्य स्वामीजींच्या नजरेसमोरून सरकू लागले. प्रेमळ वडील विश्वनाथबाबू आठवले – त्यांनी शिकवलेल्या एकेक गोष्टी, बाळपणीचा रम्य, श्रीमंती काळ आठवला! दाट केसांतून मायेने हात फिरवणारी आई भुवनेश्वरी देवी आठवली! आपला झालेला नास्तिकतेकडून आस्तिकतेपर्यंतचा प्रवास नजरेसमोर उभा राहिला त्यांच्या! वडील गेल्यानंतर नशिबी आलेलं पराकोटीचं दारिद्र्य आणि त्या जीवघेण्या काळात सुखाचा झरा बनलेली श्रीरामकृष्णांची साजरी छवि डोळ्यांपुढे उभी राहिली! ठाकूर म्हणत होते, “अरे नोरेन, तुझा देव हिमालयात नाही! या.. या.. दरिद्री लोकांमध्ये आहे! होय नोरेन, हा दरिद्रीनारायणच तुझा परमेश्वर आहे! यांची सेवा कर, तीच ईश्वराची सेवा ठरेल! ना जीवाची सेवा कर ना शिवाची, ‘शिवभावे जीवसेवा’ कर नोरेन ‘शिवभावे जीवसेवा’ कर! तोच तुझा मार्ग आहे! हिमालयात जाऊन या दु:ख-दैन्यापासून पळू नकोस. लोकांमध्ये जा! त्यांचं दु:ख अनुभव! ही अनुभूतीच तुला मार्ग दाखवेल! मार्ग – दु:खहरणाचा आणि मोक्षाचाही”!
    आणि आपणही कश्यातच, अगदी आश्रमातही न गुंतता तीर्थयात्रेला निघालो होतो! सारा भारत फिरलो आपण! पराकोटीची श्रीमंती पाहिली आणि तेवढंच दारिद्र्यही अनुभवलं! सोन्यारुप्यांत खेळणारे लोक पाहिले आणि एकवेळच्या जेवणाला मोताद माणसेही पाहिली! जनतेशी काहीही देणंघेणं नसलेले संस्थानिक जमिनदार पाहिले, जुलमी इंग्रज पाहिले; तर दुसरीकडे खेतडीच्या महाराजांसारखे जाणते शासकही पाहिले! अज्ञानात खितपत पडलेला समाज पाहिला, तसेच टिळकांसारखे ज्ञानीही पाहिले! हा देश शेकडो रंगांनी नटलेला तर खराच!
    पण एक आहे, या देशातला गरीब माणूस उपाशीपोटी झोपेल एकवेळ, पण त्याच्या मनात समाधान असेल! आस्थेचं, आस्तिकतेचं आणि अध्यात्माचं समाधान! याउलट इंग्रज शासकांकडे पैश्याने विकत घेण्याजोग्या साऱ्या काही सुखसुविधा आहेत, पण शांत झोप नाही, समाधान नाही!
    हे दोन्ही जोडलं पाहिजे! एकत्र केलं पाहिजे!! पाश्चात्यांची औद्योगिकता टिकवून त्यांना भारतीय अध्यात्म शिकवलं पाहिजे आणि भारतीयांचं समाधान टिकवून येथे पाश्चात्य सुखसोयी आणल्या पाहिजेत! कुणीतरी पूल बनून हे काम केलं पाहिजे!
    स्वामीजींच्या नजरेसमोर दिव्य प्रकाश पसरला होता! आत्मबोधाचा हा क्षण! त्या प्रकाशात जराशी हालचाल झाली आणि स्वामीजींच्या अत्यधिक संवेदनशील झालेल्या ग्रहणक्षम मनावर तरंग उमटले,
    ‘कुणीतरी? कुणीतरी का? तूच का नाही? तूच का बनत नाहीस या दोन परस्परपूरक जगांना जोडणारा पूल?’
    स्वामीजींच्या नजरेसमोर काही दिवसांपूर्वी वाचलेली ‘जागतिक धर्मपरिषदे’ची बातमी झळकू लागली! आज त्यांच्या प्रवासाची सांगता झाली होती. तीर्थयात्रेचं उद्यापन झालं होतं. आत्मबोधाची अनुभूती झाली होती. आणि आयुष्याला उद्देश मिळाला होता!

    यानंतर काही महिन्यांतच शिकागोची ‘जागतिक धर्मपरिषद’ टाळ्यांचा कडकडाट आणि भावनातिरेकाने मारलेल्या आरोळ्यांनी दुमदुमून गेली! याला कारणीभूत होते पाच शब्द! होय, केवळ पाचच शब्दांत स्वामीजींनी उपस्थित सर्व धर्ममार्तंडांना सर्वश्रेष्ठ धर्म कोणता, ते सप्रमाण दाखवून दिले! तलवार न उगारता, कुणालाही न फसवता, रक्ताचा एकही थेंब न सांडता एका हिंदू सन्याश्याने अवघी अमेरिका जिंकून घेतली! बघायला गेलं तर केवळ पाचच शब्द! पण त्यांच्यामागे स्वामीजींची सारी तीर्थयात्रा, सारा अनुभव, भावना आणि सारी सारी आध्यात्मिक अनुभूती सामावलेली होती! ते पाच विश्वविजयी शब्द होते,
    “सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका”!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    (सर्वाधिकार लेखकाधीन. लेखकाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही स्वरुपात पुनप्रकाशित करू नये. केल्यास गुन्हा समजून योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. आवडल्यास केवळ शेअर बटनावर क्लिक करून शेअर करावे, ही विनंती. लेखकाच्या अन्य कथा वाचण्यासाठी व ‘स्वामी विवेकानंद’ या विषयावर लेखकाने दिलेली व्याख्याने ऐकण्या/आयोजिण्यासाठी भेट द्या: www.vikramedke.com)

    image

  • विरलेल्या काठाचे सुंदर रेशमी वस्त्र : लोकमान्य – एक युगपुरुष

    ज्यावेळी कुणी एखाद्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वावर कादंबरी लिहायला घेतो, त्यावेळी लेखकाला पृष्ठसंख्येचं जराही बंधन नसतं. त्यामुळे लेखक त्याला हवी तितकी पाने लिहू शकतो. मग त्या कादंबरीत कधी चरित्रनायकाचं संपूर्ण आयुष्य चितारलं जातं, तर कधी त्याचा काही भाग तेवढा रंगवला जातो. परंतु चित्रपटाची तशी परिस्थिती नसते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, चित्रपटाला वेळेचं बंधन असतं. एका विविक्षित वेळेतच, प्रेक्षकांना सलगपणे पाहाताना कंटाळा येणार नाही; अश्या बेताने चरित्रपट बनवायचा असतो. मग त्यात नायकाचं संपूर्ण आयुष्य दाखवायचं म्हटलं तरी दाखवता येत नाही. काही विशिष्ट घटनांवरच तेवढा भर द्यावा लागतो व दृक्माध्यमाच्या दृष्टीने अनावश्यक असलेले तपशील हे टाळावेच लागतात. माझ्या मते, चरित्रपटांचं खरं कार्य हे निवडलेलं ऐतिहासिक चरित्र मांडणं नसतं, तर त्या चरित्राची स्थापना करणं हे असतं. चांगला चरित्रपट कश्याला म्हणावं, तर जो चित्रपट या माध्यमाला आवश्यक असणारा दृक्परिणाम तर साधतोच, परंतु त्या चरित्रनायकाबद्दल फारशी माहिती न देता प्रेक्षकाला त्या संबंधित नायकाबद्दल अधिकाधिक माहिती मिळवायला प्रवृत्त करतो. यामागे लेखक-दिग्दर्शकाचं संहिता निवडण्याचं आणि त्या संहितेचं चित्रपटात रुपांतरण करण्याचं कौशल्य अतिशय मोलाचं असतं. ते जर साधलं, तरच उत्तम चरित्रपट झाला असं समजावं. तो एखाद्या कादंबरीसारखा असावा, परिणामकारक!! आणि या सर्व विवेचनाच्या पार्श्वभूमीवर बोलायला गेलं, तर खूप साऱ्या उण्या बाजू असूनही ओम राऊतांचा ‘लोकमान्य – एक युगपुरुष’ हा चित्रपट, चांगल्या चरित्रपटांच्या श्रेणीत मोडतो!

    चित्रपट सुरु होतो तो लोकमान्यांना (सुबोध भावे) ‘मंडाले’च्या कारावासाची शिक्षा सुनावली जाते त्या क्षणापासून. आणि मग आजच्या काळातील मकरंद (चिन्मय मांडलेकर) या संभ्रमित तरुणाच्या नजरेतून तो उलगडत जातो. दिग्दर्शक, छायाचित्रकार (प्रसाद भेंडे), रंगभूषाकार (विक्रम गायकवाड), नेपथ्यकार (नितीन चंद्रकांत देसाई?), कलाकार या सर्वांनी मिळून शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीचा काळ जसाच्या तसा उभा केला आहे. चित्रपटाच्या शेवटी श्रेयनामावलीसोबत खऱ्या व्यक्तीमत्त्वांची व घटना आणि जागांची संदर्भासाठी वापरलेली ऐतिहासिक छायाचित्रे आणि त्यासोबत चित्रपटातील त्या त्या व्यक्ती, घटना व जागांची छायाचित्रे सरकत जातात, आणि ती सगळी इतकी हुबेहुब जमली आहेत, की आश्चर्याने तोंडात बोट घातल्याशिवाय राहावत नाही. यासोबतच, दिग्दर्शक (ओम राऊत)-लेखक (ओम राऊत, कौस्तुभ सावरकर)-संपादक (आशिष म्हात्रे, अपूर्वा मोतीवाले) या त्रयीने निवडलेल्या घटना इतक्या काही चपखल आहेत, की त्यातून जरी लोकमान्यांचं चरित्र पूर्णपणे कळत नसलं, तरीही लोकमान्यांचं व्यक्तीमत्त्व आणि त्यांच्या कार्याचा आवाका पुरेपूर मनात ठसतो! अगदी लोकमान्यांबद्दल फारशी माहिती नसलेल्या प्रेक्षकाच्या मनात सुद्धा! अजित-समीर यांनी दिलेले चित्रपटाचे संगीत हे एक स्वतंत्र गीतमाला (अल्बम) म्हणून फारसे प्रभावी नसले, तरीदेखील चित्रपटात गीतांसाठी अगदी सोळा आणे नेमक्या जागा आहेत. एकही गीत पडद्यावर पाहाताना अनाठायी वाटत नाही, याबद्दल संगीतकारद्वयी आणि दिग्दर्शकाचे कौतुक करावे तेवढे थोडेच. पार्श्वसंगीत मात्र काही काही महत्वाच्या प्रसंगांमध्ये कर्कश्य वाटते, एवढेच!

    आणि सुबोध भावे!! लोकमान्य म्हणजे सुबोध भावे आणि सुबोध भावे म्हणजे लोकमान्य! हा चित्रपट पाहाताना एका क्षणासाठीदेखील ‘हा सुबोध भावे आहे’, असे वाटत नाही; इतका तो त्या भूमिकेत शिरलाय. नव्हे, ती भूमिका जगलाय तो शब्दश:!! अगदी सुरुवातीच्या काळात त्याचे ते आगरकरांसोबतचे (समीर विद्वांस) ठाम वादविवाद, आगरकरांनी “संमतीवयाचा कायदा” करू म्हटल्याबरोब्बर त्याचे ते त्वेषाने उसळून “म्हणजे इंग्रजांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हिंदूधर्मात सुधारणा करणार? शक्य नाही! हिंदूधर्मात काय सुधारणा करायची आणि काय नाही, हे हिंदूच ठरवतील. कायद्याने लादलेली बळजबरीची सुधारणा चालणार नाही”, म्हणणे, निव्वळ अप्रतिम! “हा माझा वर्ग आहे, डॉग्स.. अँड ब्रिटिश.. आर नॉट अलाऊड..!!” म्हणताना तर त्याचे ते इतरवेळी मृदू भासणारे डोळे आग ओकत असतात अक्षरशः,  आग! किंबहूना सर्वच पंचलाईन्स पार सीमारेषेपार वाजवल्या आहेत त्याने! सुधारकांची सभा उधळून लावल्यानंतर त्याचे ते कुटील हसणे आणि आसपासच्या गदारोळाला क:पदार्थ समजत ऐटीत निघून जाणे तर मी कधीच विसरू शकणार नाही. याबाबतीत ओम राऊतांची जितकी स्तुती करावी तेवढी थोडीच आहे. हाती सुबोध भावेसारखा हुकमाचा एक्का असताना तो कसा वापरायचा – कुठे त्याच्यातले नायकत्व बाहेर काढायचे, कुठे अभिनय खुलवून घ्यायचा हे सारे त्यांनी बरोब्बर साधले आहे. एवढंच नव्हे, तर कथेशी प्रामाणिक राहून खूप सारी हिंदुत्ववादी फटकेबाजी दे दणादण करून घेतली आहे, कुठेही प्रचारकी थाट न आणता! मग ते राजकारणात अहिंसा घुसडणाऱ्या बेगडी तत्त्वाच्या एकाच प्रसंगात चिंधड्या उडवणं असो, राष्ट्रहितासाठी कराव्या लागणाऱ्या वधाचे समर्थन करणे असो वा दृष्टांत देताना ‘अफज़लखान हिंदूंची मंदिरे फोडायला आला होता’ हे ऐतिहासिक सत्य बेधडक मांडणे असो; लोकमान्यांची हिंदुत्ववादी बाजू दाखवण्यात चित्रपट कुठेही कमी पडत नाही. किंबहुना लोकमान्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या गोष्टी – मग त्या स्वदेशी असो, असहकार असो, धर्मसुधारणा असो; सगळ्या मोजक्या प्रसंगांतून साकारतात, त्यापाठी असलेल्या लोकमान्यांच्या तत्त्वज्ञानासह!! ‘गीतारहस्य’च्या लेखनाची आणि त्याद्वारे लोकमान्यांना झालेल्या आत्मबोधाची दृश्ये तर निव्वळ अप्रतिम!!

    परंतु चित्रपटाचा लोकमान्यांच्या काळातील घटनांचा मकरंदच्या आयुष्यातील आजच्या जगातल्या घटनांशी संबंध जोडण्याचा अट्टाहास पटत नाही. किंबहूना मकरंदची अतिआदर्शवादी कथा आणि त्यातून अखेरीस त्याने निवडलेला मार्ग; हे दोन्हीही मांडणीच्या पातळीवर खूपच कच्चे वाटतात. मकरंदची होऊ घातलेली बायको समीरा (प्रिया कामत) सदानकदा अतिवास्तववादी होत त्याच्यावर चिडत असते, तीच शेवटी त्याच्या अतिआदर्शवादी मार्गावरून चालू लागते; हे चुकीचं वाटतं. तिच्या काय वा मकरंदच्या काय, आयुष्यात एवढं मोठं स्थित्यंतर येण्यामागे लोकमान्यांचा वाटा खूपच ओढून ताणून वाटतो. समीराचे पात्र संपूर्ण चित्रपटभर दुय्यम भूमिकेत वावरते, तेच अखेरीस तत्त्वज्ञाच्या भूमिकेत जाऊन मकरंदचा संभ्रम दूर करते, हे पटत नाही. असाच समांतर कथेचा मार्ग याआधी ‘रंग दे बसंती’ (२००४) मध्येही वापरला होता. परंतु त्यात आजच्या काळातील कथादेखील कमालीची सशक्त रेखाटली होती. ऐतिहासिक घटनांपासून प्रेरणा घेत, त्यातली पात्रे आजच्या जगातही काही घटना घडवून आणतात, हे दाखवताना त्या पात्रांच्या आयुष्यात अपेक्षित स्थित्यंतर होण्यासाठी पुरेसा वेळ दिलेला होता. खलनायकही त्या तोडीचे दाखवले होते. परंतु यापैकी काहीही मकरंद आणि समीराच्या कथेत होत नाही. त्यामुळेच ती कथा वरवरची वाटते. एखाद्या सुंदर, मऊ, तलम रेशमी वस्त्राचा काठच जर विरलेला असेल, तर कसे वाटेल, तशी! त्यामुळेच चिन्मय मांडलेकरने जबरदस्त आणि प्रिया कामतने चांगले काम करूनही त्यांची कथा मनाची जरादेखील पकड घेत नाही. असा दोन्हीही डगरींवर पाय ठेवण्याचा अट्टाहास करण्यापेक्षा जर दिग्दर्शक-लेखक-संपादकांनी लोकमान्यांचाच काळ अजून वाढवला असता, तर बघायला अजून मजा आली असती. शेवटी चित्रपटातून काय शिकायचं आणि काय नाही अथवा मुळात काही शिकायचं की नाही, हा सर्वस्वी प्रेक्षकांचा प्रश्न असतो. लेखक-दिग्दर्शकांनी त्यांना अभिप्रेत असलेली शिकवण प्रेक्षकांवर लादू नये. प्रेक्षकांना मोकळीक द्यावी. तरच चित्रपट पुन्हा पुन्हा पाहिला जाण्याची शक्यता निर्माण होते. याउलट दोन्ही डगरींवर पाय ठेवल्यामुळे ‘लोकमान्य’चा दर्जा आणि पुनर्गमनाची शक्यता, दोन्हींवरही जाणवण्याइतपत परिणाम झाला आहे.

    या सगळ्यात एका व्यक्तीचा विशेषत्वाने उल्लेख करावासा वाटतो. तो म्हणजे लोकमान्यांच्या पत्नीची भूमिका केलेल्या अभिनेत्रीचा. दुर्दैवाने आपल्याकडे चित्रपटांचे विकिपेडीया पेजेस बनवण्याच्या आघाडीवर अतिशय दुष्काळ आहे. त्यामुळे या गुणी अभिनेत्रीचे नाव समजू शकले नाही. परंतु तिने सुबोध भावेच्या तोडीस तोड अभिनय केला आहे. आभाळाएवढ्या नवऱ्याच्या मागोमाग जाताना होत असलेली फरपट, संसाराची धुळदाण होत असतानाची तिची विवश अगतिकता, नवऱ्याशी वेगवेगळ्या पातळ्यांवर असलेला दुरावा, सारे काही तिने मूकपणे व्यक्त केले आहे. तिचे पात्र तिने अतिशय ताकदीने उभे केले आहे. फारसे संवाद नाहीत तिच्या वाट्याला. परंतु तिचे डोळे बोलतात! आणि चित्रपटाच्या सुरुवातीला येणारी नाना पाटेकरांच्या प्रभावी आवाजातली कविता तर केवळ अवर्णनीय!

    चित्रपटात ऐतिहासिकदृष्ट्या खूप साऱ्या चुकादेखील आहेत. उदा. सावरकर रेखाटताना त्यांचे १९०३ सालचे पुण्यात शिकतानाचे छायाचित्र संदर्भासाठी घेतले आहे. प्रत्यक्षात चापेकरांच्या हौतात्म्याच्या प्रसंगी सावरकर नाशिकमध्येच शिकत होते. चित्रपटात दाखवले तसे महाविद्यालयीन युवक मुळीच नव्हते. चापेकरांचाही उल्लेख चित्रपटात ‘चापेकर’ असा बरोबर तर श्रेयनामावलीत ‘चाफेकर’ असा चुकीचा आला आहे. गांधी-लोकमान्य अशी भेट झाली होती, हे खरे आहे. मात्र ती १९१५ साली, अर्थात लोकमान्य मंडालेहून सुटून आल्यानंतर. चित्रपटात मात्र हा प्रसंग मंडालेला जाण्यापूर्वीच दाखवलाय. काढायला गेल्यास अश्या खूप साऱ्या चुका काढता येतील. परंतु महत्वाचे हे आहे की; चित्रपटाचा उद्देश, त्यापाठची अमर्याद मेहनत आणि त्याची अत्युत्कृष्ट मांडणी हे सारे सारे अतिशय प्रामाणिक आहे. हे एकदा लक्षात घेतले की, त्रुटी आपोआपच गौण ठरतात आणि उरतो तो ‘लोकमान्य – एक युगपुरुष’! गांधी-नेहरुंना वाहिलेल्या शालेय पाठ्यपुस्तकांवर पोसलेल्या आजच्या पिढीने चित्रपटगृहात जाऊन आवर्जून पाहायलाच हवे असे उत्तम चित्रशिल्प!!

    *३.५/५

    — © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी भेट द्या: www.vikramedke.com)

    image

  • व्यासांची विज्ञानकथा

    भगवान परशुरामांवर जाहीर व्याख्याने देणारा मी महाराष्ट्रातील बहुतेक एकमेव वक्ता असेन. ही व्याख्यानेदेखील मी पारंपरिक भक्तिचरित्रात्मक ढंगाने देत नाही; उलट परशुरामांच्या चरित्राचे सामाजिक क्रांतिकारक, मुत्सद्दी राजकारणी इ. आजवर फारसे कुणाला माहिती नसलेले पैलू उलगडून विस्ताराने सांगत असतो. त्या ओघात खूप साऱ्या राजवंशांचे व ऋषिवंशांचे सविस्तर वर्णन येते. विशेषतः परशुरामांच्या भार्गववंशीय पूर्वजांच्या कथा येतात. त्यादेखील मी विस्ताराने सांगतो. हेतू हा की, लोकांना समजावे – ज्याकाळात इतर तथाकथित संस्कृतींना लज्जारक्षणासाठी वल्कले गुंडाळण्याचीदेखील अक्कल नव्हती आली, त्याकाळापासून भारत देश हा नुसता प्रगतच नव्हता तर आपल्याकडील थोर पुरुषांच्या व्यवस्थित वंशावळी राखण्याइतका काटेकोरदेखील होता. बायबलमध्येही अश्या वंशावळी येतात, मात्र काही अपवाद वगळता त्यांच्यामध्ये सर्वत्र परस्परविसंगतीच आढळून येते. हिंदू पुराणांमध्ये मात्र क्वचितच वंशावळी विसंगत आढळतात. याच व्याख्यानात मी ऋषि च्यवनांचीही कथा सांगतो. यांचा विवाह शर्याति राजाची कन्या सुकन्येशी झालेला होता.

    आज मी तुम्हाला याच संबंधीची एक विज्ञानकथा सांगणार आहे. तुम्ही म्हणाल की आत्तापर्यंत तर हा माणूस पुराणात होता, आता अचानक विज्ञानात कसा काय घुसला? पण मी चुकून असे बोललेलो नाहीये. मी विज्ञानकथाच सांगणार आहे. आणि तीदेखील साधीसुधी नव्हे, तर संस्कृत विज्ञानकथा! स्वत: महर्षी व्यासांनी लिहिलेली!! भागवत पुराणाच्या ९व्या स्कंधातील ३ऱ्या अध्यायात श्लोक क्र. २७ ते ३६ पर्यंत ही विज्ञानकथा येते. ती मी थोडक्यात सांगतो. इच्छुकांना ती मुळातूनच सविस्तर वाचावी!

    उपरोक्त राजा शर्यातिला सुकन्येखेरीज आणखी तीन मुले होती – उत्तानबर्हि, आनर्त आणि भूरिषेण! यांपैकी आनर्ताच्या वंशजांना ‘रेवत’ असे म्हणतात. त्यांची राजधानी होती कुशस्थली नावाची नगरी! या आनर्ताच्या मुलांमध्ये सर्वात मोठा होता ‘ककुद्मी’! त्याची मुलगी रेवती! खूप शोधूनही ककुद्मीला रेवतीलायक वर सापडत नव्हता. तेव्हा याबाबतीत मंत्रणा (सल्ला) घेण्यासाठी ककुद्मी रेवतीला घेऊन ब्रह्मलोकी ब्रह्मदेवांकडे गेला. तिथे पोहोचल्यानंतर ब्रह्मदेवांची भेट मिळण्यासाठी या दोघांना काही ‘क्षण’ (श्लोक ३०) थांबावे लागले. ब्रह्मदेव भेटल्यानंतर ककुद्मीने त्यांना नमस्कार केला. आपला येण्यामागचा उद्देश सांगितला आणि आपल्याला मुलीसाठी स्थळ म्हणून आवडलेल्या राजपुत्रांची यादीदेखील सांगितली व विनंती केली की, यातून कोणता मुलगा माझ्या मुलीसाठी नवरा म्हणून योग्य आहे, ते सांगावे. हे ऐकून ब्रह्मदेव हसले. म्हणाले, “महाराज, तुम्ही ज्यांची ज्यांची नावे सांगताहात, ते तर सर्व केव्हाच कालवश झाले. काहीकाहींच्या तर वंशातदेखील कुणी शिल्लक नाहीये सध्या. तुम्ही इकडे काही क्षण थांबलात, परंतु तिकडे पृथ्वीवर मात्र २७ चतुर्युगे (किमान २७ × १२००० × ४ = १२९६००० वर्षे) लोटली आहेत. तेव्हा तुम्ही परत जा. तुम्ही जाईपर्यंत नारायणाचा अंशावतार बलराम नावाने झालेला असेल. त्याच्याशी तुमच्या मुलीचा विवाह करा”. याप्रमाणे ककुद्मी व रेवती परत आले. रेवती व बलरामाचा विवाह झाला आणि ककुद्मी तपश्चर्येसाठी बद्रिनाथधामला निघून गेला.

    तुम्ही म्हणाल, यात विज्ञान कुठे आहे? सांगतो. भौतिकशास्त्रात सापेक्षतेचा सिद्धांत सांगितला जातो. याच सापेक्षतेच्या सिद्धांतातून एक विरोधाभास (पॅरॅडॉक्स) निर्माण होतो, ज्याला म्हणतात ‘जुळ्यांचा विरोधाभास’ (ट्विन्स पॅरॅडॉक्स). एकाच वेळी जन्माला आलेली एकसारखीच दिसणारी जुळी भावंडे. समजा वयाच्या विसाव्या वर्षी त्यांच्यापैकी एक जवळजवळ प्रकाशाच्या वेगाने अवकाशप्रवासाला गेला व समजा वीस वर्षांनी परत आला, तर इकडे पृथ्वीवर त्याचा भाऊ चाळीस वर्षांचा झालेला असेल. परंतु अवकाशगामी भाऊ मात्र त्यावेळीही विशीचाच असेल! हे घडते कारण, भौतिकशास्त्राचा नियम सांगतो की प्रकाशाच्या वेगाने जर एखादा कण मार्गक्रमण करत असेल, तर त्याच्यासाठी काळ हा थांबल्यासारखाच असतो. त्यामुळेच त्या अवकाशगामी भावंडाचे वय वाढत नाही. इकडे पृथ्वीवर राहाणारा भाऊ मात्र म्हातारा होतो! यालाच म्हणतात जुळ्यांचा विरोधाभास. हाच सिद्धांत ख्रिस्तोफर नोलानने आपल्या ‘इंटरस्टेलर’ (२०१४) या चित्रपटातही वापरला आहे. किंबहुना सध्याची अवकाशयाने प्रकाशाच्या वेगाने प्रवास करत नसूनही त्यांच्यातून प्रवास करणाऱ्यांना हा सिद्धांत सूक्ष्मप्रमाणात लागू पडतो, ज्याला ‘कालविस्तार’ (टाईम डायलेशन) असे म्हणतात. अर्थात, या विरोधाभासाची खूप सारी उदाहरणे व पर्याय आहेत, आपण समजण्यास सोपे व्हावे म्हणून सर्वात आदर्श पर्याय तेवढा पाहातो आहोत.

    उपरोक्त ‘जुळ्यांचा विरोधाभास’ सर्वप्रथम पॉल लँगेविन या शास्त्रज्ञाने १९११ साली मांडला. भागवताचा काळ हा इ. स. पू. ३५०० वर्षांपासून ते इ. स. ६०० पर्यंत वेगवेगळे संशोधक सांगतात. मात्र कुणीही संशोधक हा काळ १९११ नंतरचा असल्याचे सांगत नाही! परंतु तरीदेखील हाच जुळ्यांचा विरोधाभास व्यासांनी ककुद्मीच्या कथेत मांडल्याचे आढळत नाही का? ककुद्मी आणि रेवती प्रवास करत ‘ब्रह्मलोक’ नावाच्या ठिकाणी गेले, तिथे काही क्षण थांबले व परत आले. मात्र तेवढ्या काळात पृथ्वीवर लाखो वर्षे उलटून गेली होती. तरीदेखील परत आल्यानंतरही रेवती व ककुद्मीचे वय मात्र तेवढेच राहिले होते. ही ‘जुळ्यांचा विरोधाभास’ स्पष्ट करणारी कथाच नव्हे काय? व्यासांनी तर या कथेत ‘त्या लोकावर (ग्रहावर?) घालवलेला वेळ’ही विचारात घेतलाय!

    एक हिंदू म्हणून माझा ठाम विश्वास आहे की, आपली पुराणे हा ललित अंगाने मांडलेला का होईना पण खरा इतिहास आहे. मात्र हल्ली काही आंग्लाळलेली मंडळी भारतीय संस्कृतीचे ऐतिहासिकत्व मुळापासून नाकारतात. तर ठिक आहे. वादात नको पडायला. सदर कथा भागवतपुराणात आहे? आहे! ती ‘जुळ्यांचा विरोधाभास’ मांडला जाण्याच्या खूप वर्षे आधी लिहिलेली आहे? आहे! त्यात आजच्या जगातले विज्ञान विचारात पाडण्याइतपत प्रमाणात आहे? आहे! तर मग व्यासांनी एक काल्पनिक का होईना परंतु विज्ञानकथा लिहिली, एवढे तरी आपल्याला मान्य करणे भागच आहे. शिवाय विज्ञानकथा लिहिण्यासाठीसुद्धा कुठेतरी त्या अचूक विचारांपर्यंत पोहोचण्याइतके प्रगत विज्ञान अस्तित्वात असावे लागते. भारतीय संस्कृती व्यासांच्या काळात तेवढी तरी वैज्ञानिकदृष्ट्या प्रगत होती, हेही मान्यच करावे लागते. कारण कल्पनेलादेखील कुठे ना कुठे वास्तवजगतातील अनुभवाचा आधार असतो; इथे तर व्यासांनी एका अतिशय तात्त्विक व गणितीय बाबीचा आपल्या कथेत खुबीने वापर केल्याचे दिसतेय! तेव्हा कुणी नाकारो वा स्वीकारो, सदर कथा खरोखर घडलेली असो वा नसो; या कथेतील वैज्ञानिकता कदापिही दुर्लक्षिण्याजोगी नाही. धर्मग्रंथ म्हणून सोडून दिलेल्या संस्कृत ग्रंथांतरी या कथेसारखीच सहस्रावधी विज्ञानरत्ने पडून आहेत. अवकाश आहे तो केवळ कुणीतरी डोळसपणे शोधण्याचा!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    [लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी, तसेच अनेकानेक विषयांवर लेखकाची व्याख्याने आयोजित करण्यासाठी संपर्क करा:  www.vikramedke.com]

    image

  • विक्रमवीर ‘विक्रम’!!

    आपल्यापैकी प्रत्येकाचे स्वप्न असते, कधीकाळी आपणही चित्रपटात ‘हिरो’ व्हावं. दररोज शेकडो लोक हे स्वप्न उराशी बाळगून मायानगरी गाठतात आणि दररोज लाखो स्वप्ने चक्काचूर होतात! साठच्या दशकात तमिळनाडूतल्या व्हिक्टर अल्बर्टने हेच स्वप्न उराशी बाळगत चेन्नईची मायानगरी गाठली होती. खरं तर मायानगरी वाटते तितकी निर्दयी नाही. इथे प्रत्येकाला काही ना काही काम मिळते. व्हिक्टरलाही मिळाले! मात्र तुम्ही किती का मोठ्या स्टारचे का बेटे असेनात, इथे टिकतात केवळ प्रतिभा आणि कष्टांचा अजोड मिलाफ असलेलेच! व्हिक्टर कष्टाळू होता, पण ना त्याच्याकडे प्रतिभा होती ना तंत्रशुद्धता. त्यामुळे लहानसहान भूमिकांवरच त्याला समाधान मानावे लागले. सखोल ज्ञानाअभावी वडलांची झालेली फरपट केनेडी विनोदराज या व्हिक्टरच्या लहानग्या मुलाने केव्हाच ओळखली होती. नव्हे, वाट्याला आलेल्या भोगांनी ती अक्षरशः मनावर कोरली गेली होती त्याच्या! १७ एप्रिल १९६६ रोजी जन्माला आलेल्या या मुलाने, यातून बरोब्बर धडा घेतला. चेन्नईच्या नाट्यवर्तुळात नाटकांची काही कमतरता नव्हती. तिकीटही फारसं नसायचं! रोज कोणत्या ना कोणत्या नाटकास जायचा. नाटकाच्या बारीक-सारीक अंगांची निरीक्षणे करायचा. कुणाच्याही नकळत वेगवेगळ्या कलाकारांच्या अभिनयाची नक्कल करायला पाहायचा. नक्कल करून झाल्यावर तोच प्रसंग आपल्याला उमगला तसा सादर करायला पाहायचा. यातून त्याला गवसत होता त्याच्यातला मेहनती नवनवोन्मेषशाली अभिनेता, तर त्याच्या शाळा-कॉलेजला गवसत होता अभिनयाचे हमखास बक्षिस मिळवून देणारा कलावंत!! वडलांनी या क्षेत्राचे चटके सोसले होते, त्यामुळे त्यांना केनेडीची काळजी वाटायची. केनेडीने मात्र अभिनयालाच सर्वस्व मानलेले. कुणीच ‘गॉडफादर’ नसताना आपला पोरगा टिकणार कसा, ही वडलांची चिंता; तर माझी मेहनतच माझी ‘गॉडफादर’ बनेल, हा केनेडीचा विश्वास!!

    वडलांना जे जमले नाही, ते आपण करून दाखवायचेच, नुसता अभिनेता वा स्टार नव्हे तर सुपरस्टार व्हायचेच ही केनेडीची जिद्द. त्या जिद्दीला मेहनतीची जोड. एकीकडे इंग्रजी साहित्याचे पदवीशिक्षण चाललेले असतानाच केनेडी न चुकता नृत्य शिकायला जायचा. हो, भारतात सुपरस्टार व्हायचे तर नृत्य हे यायलाच हवे! केनेडीने हे ओळखले होते. शास्त्रीय आणि फिल्मी दोन्ही प्रकारच्या नृत्यात त्याने पारंगतता मिळवली. दरम्यान आयआयटी-मद्रासच्या मानाच्या नाट्यमहोत्सवात केनेडीला सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आणि वाटले, आता तमिळ चित्रपटसृष्टीचे दरवाजे आपल्यासाठी उघडतील! नियती क्रूरपणे हसली असावी याक्षणी! केनेडीला ट्रकने उडवले. भीषण अपघात झाला. पायांचा चुराडा झाला होता अक्षरशः.  शिक्षणाची आणि उमेदीची तीन वर्षे केनेडीला बिछान्यावर काढावी लागली. याकाळात त्याच्या पायांवर एक-दोन नव्हे, तर तब्बल २३ शस्त्रक्रिया झाल्या! डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलं की, हा इथूनपुढे कधीच नाचू शकणार नाही. डॉक्टरांच्या विधानाने स्वप्नांच्या विमानाला अजून इंधन पुरवले असावे बहुतेक! जरा चालता यायला लागल्यावर केनेडीने पुन्हा एकवार नृत्याभ्यास सुरू केला. रोज जीवघेण्या वेदना सहन करायचा आणि तरीही परिश्रम थांबत नसायचे! या परिश्रमांचे फळ असे की, ज्या आयआयटी-मद्रासच्या स्पर्धेनंतर केनेडीचा अपघात झाला होता, बरोब्बर तीन वर्षांनंतर केनेडीने तीच स्पर्धा तितक्याच ताकदीने गाजवली!! या स्पर्धेमुळेच ख्यातनाम दिग्दर्शक सी. व्ही. श्रीधर यांनी केनेडीला आपल्या चित्रपटात मुख्य भूमिका देऊ केली, नाव होते ‘एन कादल कन्मणी’ (१९९०)! पण ‘केनेडी’ असे कुठे नाव असते का सुपरस्टारचे? रुपेरी पडद्यावर राज्य करायचे तर त्याला शोभेल असे नाव नको? केनेडीने विचार केला – वडील व्हिक्टर यांच्या नावातून ‘वि’ घेतला, स्वत:च्या केनेडी नावातून ‘क’ घेतला, आई राजेश्वरीच्या नावातून ‘र’ घेऊन स्वत:च्या नावातून घेतलेल्या ‘क’ला जोडला – झाला ‘क्र’; आणि स्वत:ची सूर्यराशी ‘मेष’मधून घेतला ‘म’!! यातून साकारले भावी सुपरस्टारचे नाव — ‘विक्रम’!!

    ‘एन कादल कन्मणी’ने बरे यश मिळवले. म्हणून काही कुणी एका रात्रीत स्टार होत नाही. जे जितक्या वेगाने येते, ते तितक्याच वेगाने ओसरत असते. विक्रमला पहिला ‘हिट’ मिळायला थोडीथोडकी नाही, तर तब्बल ९ वर्षे वाट पाहावी लागली! याकाळात त्याने लहानसहान भूमिका केल्या. पोट भरण्याकरता इतर ‘बिझी’ नायकांसाठी ‘डबिंग’ केली. जी भुमिका मिळेल ती जीव तोडून केली. मणिरत्नमने त्याला ‘बॉम्बे’ (१९९३) देऊ केला होता, पण इतर एका भूमिकेसाठी वाढवलेली दाढी काढावी लागेल; म्हणून या पठ्ठ्याने साक्षात मणिरत्नमला ‘नाही’ म्हणायची हिंमत दाखवली! वास्तविक ती साधीशी भूमिका सोडून राष्ट्रपती पारितोषिकविजेत्या मणिकडे गेला असता तर विक्रमला कुणीही दोष दिला नसता. परंतु ती विक्रमवर विश्वास दाखवलेल्या त्या दुसऱ्या दिग्दर्शकाशी बेईमानी झाली असती. साक्षात कलेशीच बेईमानी झाली असती. आणि बेईमानीचे यश विक्रमला नको होते. एक वेळ तर अशी होती की – विक्रम रोज दिवसभर काम करायचा, संध्याकाळी नृत्याभ्यास करायचा आणि रात्री उशीरापर्यंत जागून इतरांसाठी ‘डबिंग’ करायचा! त्या पडत्या काळातही त्याने कधीच कुणाकडे तोंड वेंगाडले नाही. त्याही काळात मेहनत हीच त्याची ‘गॉडफादर’ होती!!

    सात वर्षे पराकोटीचे अपयश झेलल्यावर, एके दिवशी आपला पहिलाच चित्रपट करू पाहाणारा ‘बाला’ (जो आता अनेकानेक राष्ट्रपती पारितोषिकांसह तमिळच नव्हे तर जागतिक स्तरावर भारतीय चित्रपटसृष्टीतले बडे प्रस्थ आहे!) नावाचा एक नवखा दिग्दर्शक विक्रमकडे आला. चित्रपटाचे नाव होते ‘सेतू’ आणि विक्रमची भूमिका होती ‘कॉलेजातला राऊडी जो एका मुलीच्या प्रेमात पडतो आणि मारहाणीत डोक्याला मार बसून वेडा होतो’. अतिशय आह्वानात्मक भुमिका! विक्रमने हे आह्वान स्वीकारायचे ठरवले. काही दिवसांचेच चित्रिकरण असणार होते. ‘चियान (म्हणजे राऊडी!) सेतू’च्या या कॉलेजकुमार अवतारासाठी विक्रमने अक्षरशः २१ किलो वजन कमी केले. मध्यंतरानंतर भूमिकेत होणाऱ्या बदलासाठी नखे वाढवली. आणि दुर्दैवाने पुन्हा एकवार डाव टाकला! या शोकांत चित्रपटास उचलायला कुणीही वितरक तयार होईना. रंगभूषेच्या सातत्यासाठी विक्रमला दुसरे कोणतेच काम स्वीकारता येईना. अथक मेहनत वाया जाते की काय अशी स्थिती! तब्बल दोन वर्षं बेकारीत काढली विक्रमने. अखेरीस नियतीला दया आली आणि डिसेंबर १९९९ मध्ये चेन्नईच्या एका उपनगरातल्या अगदी लहानश्या चित्रपटगृहात ‘सेतू’ प्रदर्शित झाला. रोज फक्त एकच खेळ. तोही दुपारचा! पण हळूहळू ‘माऊथ पब्लिसिटी’ होत गेली आणि ‘सेतू’ लोकांना आवडला! चित्रपटगृहांनी तो मागून घेतला. खेळ वाढले! एकाच खेळापुरता एकाच चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला ‘सेतू’ तमिळनाडूतल्या अनेक चित्रपटगृहांत १०० आठवडे चालला! आणि बुद्ध हसला! विक्रमला पहिलेवहिले व्यावसायिक यश मिळाले. आणि विक्रमला मिळाले ‘चियान’ हे बिरूद! याच ‘सेतू’चा पुढे सलमान खानने ‘तेरे नाम’ नावाने रिमेक केला, हे चाणाक्ष वाचकांस सांगणे न लगे!!

    पण विक्रमच्या कथेतून काय शिकायचं, तर हे की यशाला लघुमार्ग नसतो. मान मोडेस्तोवर काम आणि आत्मा श्रमेपर्यंत जीव ओतावा लागतो, तेव्हा कुठे यशाचं दार जरासं किलकिलं होतं! ते उघडेल आणि कायमच उघडे राहील, याची इवलीशीही खात्री नसते. खरे वीर आपल्या प्रचंड कष्टांच्या जोरावर त्या दाराला बंद होण्यापासून अडवून धरत असतात! ‘सेतू’च्या यशानंतर विक्रमवर भूमिकांचा अक्षरशः पाऊस पडू लागला. पण ज्याने अपयश चवीचवीने पचवलेलं असतं ना, तो यशाच्या गोडीवर सहजासहजी विश्वास ठेवत नसतो. ‘सेतू’नंतर चक्क ६५ दिवस विक्रमने एकही चित्रपट स्वीकारला नाही. स्वत:ला वेळ दिला आत्मपरिक्षणासाठी – आपण योग्य मार्गावर तर आहोत ना? आणि अत्यंत विचारपूर्वक ‘धिल’ (२००१) ही पोलिसकथा स्वीकारली. पुन्हा तितकीच मेहनत. काहीही न खातापिता फक्त फळे आणि रसावर दिवस काढले – अप्रतिम देहयष्टी कमावली. ही जी मी गोष्ट सांगतोय ती ९९-२००० च्या सुमाराची. तेव्हा हिंदीतही कुणा तथाकथित ‘परफेक्शनिस्ट’चा परफेक्शनिस्ट म्हणून उदय नव्हता झाला, त्याकाळात एक प्रादेशिक कलाकार भूमिकेत अजोड परिपूर्णता आणत होता! याकाळात विक्रमने पूर्वीच स्वीकारलेले खूप सारे चित्रपट झळकले. त्यांपैकी खूप सारे त्याच्या नावावर चालले, काही अगदीच नाईलाजास्तव स्वीकारलेले होते, ते आपटले. विक्रमने कुठेच लक्ष दिले नाही. मेहनत चालू ठेवली. आणि ‘धिल’ने पुन्हा एकवार इतिहास रचला! विक्रमने सिद्ध केले की, तो नुसता समीक्षकप्रिय अभिनेता नाहीये, तर मसालापटही तो तितक्याच ताकदीने करू शकतो. त्याच वर्षी विक्रमचा आणखी एक चित्रपट आला, दिग्दर्शक विनयनचा ‘काशी’. लोकगीते गाणाऱ्या अंध खेडूताची भूमिका होती विक्रमची. लोक अंधाची भूमिका कशी करतात हो? निरीक्षण करतात, हाताने चाचपडण्याचा अभिनय करतात. विक्रमने या भूमिकेची तयारी कशी केली माहितीये? रोज सकाळी घराच्या गच्चीवर जायचा आणि सूर्याकडे पाहात त्राटक करायचा. डोळ्यांसमोर अंधारी यायची. चक्कर यायची. काहीही दिसेनासं व्हायचं. हे सर्व कश्यासाठी, तर केवळ आंधळ्या माणसाची खरोखर काय संवेदना असेल ते समजून घेण्यासाठी! चित्रपटात पूर्णवेळ बुब्बूळे वर करून वावरला तो! या भूमिकेतील अभिनयाने अवघ्या तमिळनाडूला ढसढसा रडवलं. समीक्षकांच्या अक्षरशः उड्या पडल्या विक्रमवर. याच भूमिकेने विक्रमला पहिलेवहिले ‘फिल्मफेअर’ मिळवून दिले आणि त्याची दृष्टी कायमची अधूदेखील केली! यानंतर विक्रमला जो चष्मा लागला, तो कायमचाच! हा आहे भूमिकेत परिपूर्णता येण्यासाठी स्वत:च्या शरीररसंपत्तीची किंमत मोजणारा विक्रम!!

    २००३ च्या ‘सामी’ची हिंदीत संजय दत्तने ‘पोलिसगिरी’ नावाने अत्यंत फालतू नक्कल केली होती. मूळ रजनीपासून कमलपर्यंत सर्वांना स्टार बनवणाऱ्या के. बालचंदरची निर्मिती आणि विक्रमचा अजोड अभिनय! विक्रमसमोर आह्वान होते, ‘सामी’मधला पोलिस अधिकारी जराही ‘धिल’सारखा न वाटू देण्याचे! भूमिका वेगळी, त्यापाठची मेहनत वेगळी आणि लाभलेले यशही वेगळेच!

    रंगभूषेवर तर सारेच मेहनत करतात, विक्रम भूमिकेत अक्षरशः शिरतो. खऱ्या अर्थाने जगतो ती भूमिका. त्याची हीच मेहनत त्याला कमल हासनपेक्षाही वेगळ्या वर्गात नेऊन ठेवते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे शंकरचा ‘आन्नियन’ (२००४)!! हा चित्रपट आपल्यापैकी प्रत्येकाने ‘अपरिचित’ नावाने हिंदीत ‘डब’ झालेला पाहिलाय. त्यामुळे माझा मुद्दा तुम्हाला बरोब्बर लक्षात येईल. कमल हासनसारख्या एकाच चित्रपटात खूप साऱ्या वेगवेगळ्या भूमिका करण्याचे आह्वान पेलणे वेगळे आणि ‘अपरिचित’मध्ये विक्रमने एकाच वाक्यात एकापाठोपाठ एक तीन वेगवेगळ्या व्यक्तींच्या भावना ओतणे वेगळे!! अश्या भूमिका विक्रमला वेगळे असे त्याचे स्वतःचे यशोमंदिर मिळवून देतात. मग तो मणिरत्नमच्या ‘रावणन’ (२०१०) मधील भयकारी खलनायक असो वा ‘तांडवम’ (२०१२) मधला अंध ‘रॉ एजंट’ असो वा ‘डेव्हिड’ (२०१३) मधला कोळी! ‘दैवा तिरुमगळ’ (२०११) साठी तर तो चक्क महिनाभर मनोरुग्णांमध्ये राहिला होता, निरीक्षणे केली होती; एखाद्या विद्यार्थ्याप्रमाणे नोंदी घेतल्या होत्या! प्रत्येक भूमिका वेगळी अभिनयक्षमतेची नवनवे मानांकन रचणारी!!

    २००३ मध्ये आलेल्या बाला-विक्रमच्या ‘पिधामागन’ने ‘सेतू’चीच पुनरावृत्ती केली. कबर खोदण्याचे काम करणाऱ्या स्वमग्न (ऑटिस्टिक) व्यक्तीची भूमिका. एकही वाक्य नाही. संवाद नाही. जे काय व्यक्त व्हायचे ते फक्त चेहऱ्यावरील हावभावांमधून! फार काय सांगू, या भूमिकेने विक्रमला राष्ट्रपती पारितोषिक मिळवून दिलेय!!

    सध्या विक्रम शंकरचा ‘आय’ नावाचा चित्रपट करतोय. प्रादेशिक चित्रपट असूनही त्याचे बजेट शंभर कोटींहून अधिक आहे. यात विक्रमला तीन भूमिका साकारायच्या आहेत. एक अगदी बारीक माणसाची, एक अतिशय सशक्त माणसाची आणि एक जनावराची! तिन्ही भूमिकांत परिपूर्णता येण्यासाठी विक्रमने आपले वजन गरजेप्रमाणे ११० किलोंपर्यंत वाढवले तर अगदी ४० किलो इतके कमीही केले. टक्कल करावे लागणार होते. भुमिकेची गुप्तता राखण्यासाठी त्याकाळात सहा महिने सूर्यदर्शन केले नाही त्याने! वजन राखण्यासाठी सलग दोन वर्ष विशेषकरून बनवलेल्या एका खोक्यात झोपला आणि फक्त ट्यूबमधून द्रव आहार घेतला. जनावराच्या भूमिकेसाठी प्रोस्थेटिक रंगभूषेने केसतोडा तर जवळजवळ रोज व्हायचा त्याला. अगदी एक मिनिटाचे का दृश्य असेना, ती रंगभूषा चढवायला चार तास लागायचे आणि उतरवायला दोन तास! विक्रमने तेही केले!! या चित्रपटाच्या संगीत अनावरणप्रसंगी स्वतः अर्नॉल्ड श्वार्झेनेगर विक्रमच्या मेहनतीपुढे झुकलाय. चित्रपटाच्या टिझरने केव्हाच एक कोटी व्ह्यूज मिळवलेयत तर कालपरवाच प्रदर्शित झालेल्या त्याच्या ट्रेलरने केव्हाच ३५ लाख व्ह्यूजचा टप्पा गाठलाय! तुम्ही जर त्याचे ते सर्वांगसुंदर ट्रेलर पाहिले, तर स्वत:ला एक चिमटा काढा व बजावून सांगा की या माणसाचे वय ४८ आहे, २५-३० नाही! हा चित्रपट आजवरचे हिंदी व तमिळ चित्रपटांचे कमाईचे सारे ‘विक्रम’ मोडेल यात शंकाच नाही! आणि यात सिंहाचा वाटा ‘विक्रम’चाच असणार आहे. रजनीकांत एकदा म्हणाला होता, “मला जर कुणाचे शिष्यत्व पत्करावेसे वाटत असेल, तर ते केवळ आणि केवळ विक्रमचेच”!! मला वाटतं, साक्षात रजनीकांतने हे वाक्य ज्याक्षणी उच्चारलं, त्याच क्षणी व्हिक्टर अल्बर्टचे स्वप्न पूर्ण करत त्याचा पोरगा सुपरस्टार झाला!! सुपरस्टार ‘चियान’ विक्रम!!

    — © विक्रम श्रीराम एडके.
    [लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.vikramedke.com]

    image

  • माझ्या मना..

    सकाळचा हिंसाचार सायंकाळच्या तांडवापुढे क्षुल्लक वाटू लागतो
    उद्दाम अनौरस अंधार तेवढा रात्रंदिन जागतो
    अरे अंधारातच तर जगायचंय आपल्याला,
    कारण उजेडासाठी गरजेची असते आग!
    तेव्हा माझ्या मना स्वस्थ राहा, येऊ देऊ नकोस राग!!

    आग लागण्यासाठी जाळावा लागतो जीव
    आणि षंढा, तुला तर नुसत्या विचारानेच भरते हीव
    त्यापेक्षा सोपे मेणबत्ती जाळणे, निरुपद्रवी जिची आग!
    माझ्या मना स्वस्थ राहा, येऊ देऊ नकोस राग!!

    ते येतात मुडदे पाडतात, आणि आम्ही पाडतो मुद्दे
    ‘दहशतवादाला धर्म नसतोच मुळी’, मग कितीही बसू देत गुद्दे
    गुद्दे खा, मस्त राहा, फारफार तर बन सेक्युलरी नाग!
    माझ्या मना स्वस्थ राहा, येऊ देऊ नकोस राग!!

    अरे मृत्यू कुणाला चुकलाय, मग त्यांनी मारले तर बिघडते कुठे?
    शील-अब्रू फालतू कल्पना, म्हणे काचेचे भांडे खळकन फुटे
    अरे वेड्या, अहिंसेतच तर खरा राम आहे,
    बाकी विसर रामबाणाचा धाक!
    आणि माझ्या मना स्वस्थ राहा, येऊ देऊ नकोस राग!!

    राग, जो आला होता भीमाला दुर्योधनाचा
    राग, जो आला होता पुरुला शिकंदराचा
    अरे तोच की रे राग, जो आला होता शिवप्रभूंना अफझुल्ल्याचा
    तो राग, तोच राग, तो तुला येत नाही कारण तुझं करून टाकलंय मेंढरू,
    सत्य आणि अहिंसेच्या पोकळ कल्पनांनी!!
    त्यामुळेच तर तुला पडत नाही प्रश्न की,
    ‘जर अहिंसा नि सत्यच सर्वस्व असेल,
    तर काय वेडाचार केला होता चक्र धरताना माधवांनी’?
    अरे, दुराचाऱ्यांना समूळ उखडून फेकण्याची अक्कल आली,
    तरच आली खरी जाग!
    माझ्या मना, उठ चल आज येऊच दे थोडासा राग!!

    अरे, तुला जर राग आला तर वणवा पेटेल
    भ्रमाचे जंगल जळेल अन् न्यायाचा सूर्य भेटेल
    हरलास तर गाठशील स्वर्ग, खरे आहे बाबा;
    पण भविष्यासाठी आहे जिंकणेच तुला भाग!
    तेव्हा माझ्या मना, उठ चल यावेळी येऊच दे तुला राग!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    [कवीच्या अन्य कविता वाचण्यासाठी क्लिक करा: www.vikramedke.com]

    image

  • डोवालसाहेबांच्या भाषणातले कटू तात्पर्य

    हिंदुस्थानचे राष्ट्रीयसुरक्षा-सुमंत (‘सल्लागार’ या अरबी-उद्भव शब्दासाठी मी योजलेला संस्कृतनिष्ठ मराठी शब्द. एकतर शिवकालीन इतिहासामुळे ‘सुमंत’ सर्वांना माहिती आहे आणि शिवाय तो उपयोजण्यास सोपाही आहे! मूळ रामायणकालीन संस्कृत शब्द आहे ‘सुमंत्र’ अर्थात ‘चांगले सुचविणारा’!) श्री. अजित डोवाल यांनी तब्बल ७ वर्षे पाकिस्तानात हेरगिरी करत काढली आहेत. काही दिवसांपूर्वी ‘विदर्भ मॅनेजमेंट असोसिएशन’च्या कार्यक्रमात सहभागी झाले असताना श्री. डोवाल यांनी स्वतःच एक अनुभव सांगितला होता. मला तो मोठा अर्थपूर्ण वाटल्यामुळे येथे सांगतोय.

    डोवालसाहेब पाकिस्तानात असताना मुसलमानवेष करून राहायचे. लाहौरला (प्रभू श्रीरामांचे सुपुत्र ‘लव’ यांच्या नावावरून असलेले मूळ हिंदू नाव ‘लवपूर’) एक मोठी ‘मज़ार’ आहे. तिथे ते एकदा गेले. धार्मिक विधी करीत असताना त्यांना जवळच बसलेल्या एका म्हाताऱ्या हाजीने हाक मारून जवळ बोलावले. डोवालसाहेब त्यांच्याकडे गेले. दुआ-सलामच्याही आधी हाजीसाहेब ताडकन म्हणाले, “तू हिंदू आहेस”!
    डोवालसाहेब गडबडले, पण त्यांनी चेहऱ्यावर तसे भासवले नाही. चेहरा निर्विकार ठेवून ते म्हणाले, “तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी मुसलमानच आहे”!
    त्या हाजीने डोवालसाहेबांना आपल्या मागे येण्याची खूण केली. त्याप्रमाणे हे त्याच्या पाठोपाठ गेले. काही कक्ष ओलांडल्यावर एका लहानश्या कक्षात दोघेही पोहोचले. हाजीसाहेबांनी दार आतून लावून घेतले आणि पुन्हा डोवालसाहेबांकडे वळून म्हणाले, “तू हिंदू आहेस”!
    डोवालसाहेब विचारले, “असं कश्यावरून म्हणता”?
    त्यावर हाजीसाहेबांनी हसून सांगितले, “कारण, तुझे कान टोचलेले आहेत”!
    आता असा बिनतोड पुरावाच दिला म्हटल्यावर डोवालसाहेब वरमले. कहीतरी बोलून वेळ मारून नेण्यासाठी ते म्हणाले, “होय, मी पूर्वी हिंदू होतो. आता मात्र धर्मांतरण करून मुसलमान झालोय. अनेक वर्षे झाली त्याला”.
    हाजीसाहेब तरीसुद्धा हसून म्हणाले, “तू खोटं बोलतोयस. तू अजूनही हिंदूच आहेस”!
    आता मात्र डोवालसाहेबांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. ते काही बोलणार तेवढ्यात हाजीसाहेबच पुढे म्हणाले, “आणि माहितीये, मी तुला कसे काय ओळखले? कारण, मीसुद्धा हिंदूच आहे”!!
    डोवालसाहेब धक्क्याने पडायचेच बाकी राहिले होते! हाजीसाहेब (?) पुढं सांगू लागले, “या हरामखोरांनी माझं सारं कुटूंब मारून टाकलं. बलात्कार केले, लुटालूट केली. मी एकटाच वाचलो. आणि आता या मज़ारच्या आश्रयाने राहातोय. इथले लोक मला हाजी समजतात. मीही बाहेर त्यांच्यासारखाच नमाज़ पढतो. पण आत या माझ्या खोलीत मात्र मी रोज गुपचुप यांची पूजा करतो -“, असं म्हणून त्यांनी एक शंकराची आणि दुर्गेची मूर्ती डोवालसाहेबांना दाखवली. “..तुझ्यासारखा कुणी दिसला की मला माझं कुटूंबच परत मिळाल्यासारखं वाटतं बघ! आणि म्हणूनच माझी सगळीकडे बारीक नजर असते, की कर्णछेदन केलेला कुणी सापडतो का”!

    मित्रहो, ‘अमन की आशा’ आणि पाकिस्तानशी चर्चा या गोष्टी बोलायला खूप सोप्या आहेत. किंबहूना त्या बोलायला फारशी अक्कलसुद्धा लागत नाही. केवळ मनात अहिंसा आणि प्रेमाच्या बेगडी कल्पना असल्या की काम भागतं! परंतु खरं सांगायला गेलं, तर पाकिस्तान हा केवळ एक आतंकवादी देशच नाहीये तर ‘दार-उल-इस्लाम’च्या अभद्र कल्पनेने पछाडलेला एक अभद्र देश आहे. तो जोपर्यंत आपली जिहादी मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत त्यांच्याशी मैत्री शक्यच नाही कारण, भारतासारख्या काफीर देशाला ते सातत्याने शत्रूच समजणार! कालच पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकला २६ वर्षं तुरुंगवासाची शिक्षा फर्मावली – अपराध काय, तर एका दूरचित्रवाणी कार्यक्रमात तिने एका तथाकथित धार्मिक गीतावर नृत्य केले होते! या दर्जाचे माथेफिरू आहेत ते. आणि आधुनिक शिक्षण वगैरे मिळाल्यावर तर त्यांची धर्मांधता उलट अजूनच वाढते! या सगळ्याचे मूळ त्यांच्या ‘शिकवणूकी’त आहे. ती शिकवणूक जोपर्यंत आहे, तोपर्यंत शांतता नांदणे शक्यच नाही! आणि दुर्दैवाने ती शिकवणूक भारतातही जोरदार प्रचारली जातेय. आपले पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी याबाबतीत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अतिशय योग्य भूमिका घेताहेत, पण तेवढेच पुरेसे नाहीये. आपणही यात हातभार लावला पाहिजे. आपल्या डोक्यात घुसलेलं हे ‘फेक्युलॅरिझम’ नावाचं भूत समूळ उखडून फेकलं पाहिजे. लक्षात घ्या, कट्टरतेला प्रेमाने जिंकणं हा कल्पनाविलासापुरताच असलेला बेगडी आदर्शवाद झाला. प्रत्यक्ष युद्धभूमीवर मात्र कट्टरतेला त्याहून आक्रमक अशी प्रतिकट्टरताच हरवते, हा इतिहास आहे. तेव्हा हीच वेळ आहे कट्टरांच्या विरोधात प्रतियोगिता म्हणून का होईना, पण धर्माभिमानी होण्याची! नाहीतर तो दिवस दूर नाही की आपल्याला आपल्याच भूमीवर त्या हाजीसाहेबांसारखेच अज्ञातवासात जगावे लागेल. ‘लवपूर’ही एकेकाळी आपलीच भूमी नव्हती का! डोवालसाहेबांच्या भाषणातलं कटू तात्पर्य हे असं आहे!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी तसेच लेखकाने विविध विषयांवर दिलेली व्याख्याने ऐकण्यासाठी/आपल्या परिसरात आयोजिण्यासाठी क्लिक करा:  www.vikramedke.com)

    image

  • मंथन

    उठता ज्वार एवं गिरते रत्न
    मैं ज्येष्ठ या तू कनिष्ठ – हठधर्मी प्रयत्न
    कभी मदिरा का नि:सारण तो कभी मदिराक्षी का उत्थान
    जो अधिक से अधिक समेटें, बस वोही महान
    विचार ये अभेद्य है, हारा सो दैत्य है
    मेरूसे लिपटा वासुकी किन्तु, क्षरता सुनित्य है
    कौई पचाएगा हालाहल और कौई अमृत पाएगा
    नींवमें स्थापित कूर्म, पिसता है पिसता जाएगा
    लक्ष्मी वरेगी उसीको जिसके गलेमें तुलसीहार है
    देव निश्चिंत है की उनका पक्षधर अमृत-कहार है
    न्याय क्या अन्याय क्या, सब दृष्टी का भेद है
    कहा ले जा रहा है ये मंथन सबको,
    सोचा तो खेद है! सोचा तो खेद है!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    [ www.vikramedke.com ]

    image

  • समयके मुडे पन्नोंपर..!

    भोर मल रही थी आँखे उस वक़्त
    और रात बस सोनेही वाली थी
    परसोंकी तरह उसकी खिडकी
    कल और आज भी खाली थी

    वो खिडक़ी चार आँखोंके
    जहा रोज़ पेंच लडा करते थे
    उडते अरबी घोडें जहापर
    पैनी नज़रोंसे अडा करते थे

    वो पानी डालती थी तुलसी को तो
    प्यास मुसाफिरको लग जाती थी
    ताज़ा नहाये बाल झटकाती वो
    सैंकडों बारिशें छूट जाती थी

    वो झुका लेती थी फिर पल्कें जब
    वो आँखोंसे सलाम अद़ा करता
    साथ चलनेका तो ना सही कभी
    हाँ, पर निभानेका वादा  करता

    फिर जाने लगता था जब वो, वो
    नज़रोंके ताबीज़ बुना करती थी
    उससे गुज़रते झौंकोंसे बराबर
    वो ख़ुदा-हाफिज़ सुना करती थी

    पूछताछ की तो पता चला वो
    कलही पड़ोस गाँवमें ब्याही हैं
    हाथोंमें सजायी होगी जो मेहंदी
    इक वोही जानता था की स्याही हैं

    फिर कभी ना दीदार हुआ उसका
    ना कोई खबरभी उडके आयी थी
    विसालकी तो नहीं थी चाहत पर
    किसीने एक लौ ज़रूर बुझायी थी

    बीतते चले गये थे कई महीने
    ज़िंदगीभी आगे बढ गयी थी
    समयके मुड़े पन्नोंपर लेकीन
    एक झुर्रीसी ही पड गयी थी

    कल फिर वहासे गुज़रना हुआ उसका
    कल फिर उसने वहा नज़र डाली थी
    भोर मल रही थी आँखें उस वक़्त
    और रात, रात बस सोनेही वाली थी

    — © विक्रम श्रीराम एडके.
    (www.vikramedke.com)

    image

  • नरकचतुर्दशीच्या निमित्ताने

    व्याख्यानांच्या निमित्ताने प्रवास करताना मनुष्यस्वभावाचे अनेक नमुने पाहावयास मिळतात. वाईट कुणीच नसतं. केवळ व्यक्ती तितक्या प्रकृती एवढंच! असाच एके ठिकाणी गेलो असता, एक बाई भेटल्या. प्रचंड स्त्रीवादी! पितृसत्ताक पद्धती झुगारून समानता मागता मागता हल्लीच्या बहुतांश स्त्रीवादी बायका जश्या नकळत ‘स्त्रीवर्चस्वाचा’ टोकाचा आग्रह धरतात ना, अगदी तश्या! बोलताना त्यांच्या तोंडी एका दमात तस्लिमा नसरीनपासून ते शोभा देपर्यंत एकाहून एक नावे येत होती. स्त्रीवर किती अत्याचार होतात आणि तिने त्यापासून कशी सुटका करून घेतली पाहिजे, हाच एक धोशा. बाईंचा नवरा अजून या जगात तग धरून आहे का आणि असल्यास अश्या प्रतिकूल परिस्थितीत जगण्याची जिद्द त्या महानुभावाने कशी कमावली, हे विचारण्याचा मला वारंवार मोह होत होता. पण तो मी टाळला. म्हटलं, बाई रागाने अंगावर धावून आल्या तर मी एवढास्सा जीव कधी कसा चेंदामेंदा होऊन जाईन समजणारही नाही! वर मीच स्त्रीयांवर अत्याचार वगैरे करणारा ठरेन ते वेगळंच! काहीही न बोलणारा श्रोता मिळाल्यामुळे बाईंना बहुतेक अजूनच चेव आला असावा. त्या त्वेषाने माझ्या दिशेने बोट करत म्हणाल्या, “तुम्ही इतिहासकारही स्त्रियांचा केवढा अपमान करता. तुम्ही म्हणता ‘हिस्टरी’ म्हणजे ‘हिज् स्टोरी’! का असं? इतिहास काय फक्त तुम्हां पुरुषांचाच असतो का? बायकांचा नसतो? ‘हिज् स्टोरी’च का? ‘हर स्टोरी’ का नाही? सांगा ना. सांगा. आता सांगा..!!”

    खरं तर इतिहासाचा ‘गमभन’ही धड माहिती नसणाऱ्या मला बाईंनी थेट ‘इतिहासकार’च ठरवून टाकल्यामुळे मी मनापासून सुखावलो होतो. पण म्हणून काय हा असा आपल्याला समस्त पुरुषजातीचे प्रतिनिधित्व (तेही न मागताच!) देत केलेला हा असा हल्ला सहन करायचा? मी हात उंचावत त्यांना थांबवलं. म्हणालो, “मी भारतीय संस्कृतीला मानणारा माणूस आहे. आपली संस्कृती ना स्त्रीवादी आहे ना तुम्हाला वाटते तशी पुरषसत्ताक. ती सत्यवादी आहे! आता राहिला प्रश्न ‘हिज् स्टोरी’ की ‘हर स्टोरी’चा, तर ते केवळ इंग्रजाळलेल्यांचे चोचले आहेत. आपल्याकडे ‘इतिहासा’ला ‘इतिहास’ असंच म्हणतात. इति + ह + आस = इतिहास. शब्दशः  अर्थ होतो, ‘पूर्वी असे घडले’!! यात कसला आलाय स्त्री आणि पुरुषाचा संबंध”?

    या बोलण्याने बाई जराश्या वरमल्या. मूक श्रोत्याकडून अश्या ‘वेगळ्याच’ प्रत्युत्तराची त्यांना अपेक्षा नसावी. मी पुढे म्हणालो,
    “तुम्ही ‘न स्त्रीस्वातंत्र्यमर्हति’ सांगणाऱ्या मनू ऋषींना स्त्रियांचा शत्रू ठरवता. पण कधी समजून घेण्याचा प्रयत्न केलाय का की, मनू नेमकं काय म्हणाले आहेत? अध्याय ९ वा, श्लोक ३ –
    ‘पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने।
    रक्षंति स्थविरे पुत्रा: न स्त्रीस्वातंत्र्यमर्हति।।’
    अर्थात स्त्रीचे कुमारवयात पिता रक्षण करतो, तरुणपणी पति आणि उतारवयात मुलगा. स्त्रीला स्वातंत्र्य नसते! इथे ‘स्वातंत्र्य’ हा शब्द आधीच्या तीन ओळीत आलेल्या ‘रक्षण’ या शब्दाच्या संदर्भात वापरलाय. आणि सर्वत्र वर्तमानकालीन रुपे वापरली आहेत, त्याअर्थी मनू काही ‘स्त्रीला स्वातंत्र्य देऊ नयेत’ असं आज्ञार्थी बोलत नाहीयेत, तर उलट त्याकाळचं समाजजीवन समजावून सांगताहेत की, ‘आपल्या समाजात वयाच्या प्रत्येक टप्प्यावर स्त्रीच्या रक्षणाची इतकी काही काळजी घेतली जाते की, तिला स्वसंरक्षणासाठी करण्याची वेळ यावी इथपर्यंत गोष्टी पोहोचूच दिल्या जात नाहीत! थोडक्यात स्त्रीच्या सुखासाठी पुरुषांना कामाला लावलंय. यात काडीचा तरी स्त्रीद्वेष आहे का”?

    ही ‘बातमी’ बाईंना नवीच असावी! परंतु त्यांच्या स्त्रीवादी (की स्त्रीनियंत्रणवादी!) विचारांना असा पराभव झेपणारा नसावा. त्या काही न बोलता उठून गेल्या. हे सारं आजच आठवण्याचं कारण असं की, आज आहे नरकचतुर्दशी! आजच्याच दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध करून त्याने जबरदस्तीने बंदीवान करून ठेवलेल्या स्त्रीयांची सुटका केली होती. परंतु बराच काळ नरकासुराच्या ताब्यात राहिलेल्या त्या स्त्रियांच्या चारित्र्यावर मूर्ख समाजाने संशय घेणे साहजिकच होते. अहो, जिथे समाजाने साक्षात सीतामाईंच्या चारित्र्यावर संशय घेतला होता, तिथे या सामान्य स्त्रियांची काय कथा? किंबहूना शतपैलू मतिच्या श्रीकृष्णांसमोर या ऐतिहासिक घटनेचे उदाहरण असणारच! प्रभू श्रीरामचंद्रांचे त्यासंदर्भातले वर्तन अतिशय सरळमार्गी होते. श्रीकृष्ण अतिशय कुटील नीतीज्ञ! विवाहित सीतेवर संशय घेणे वेगळे आणि या कुमारिकांवर संशय घेणे वेगळे! श्रीकृष्ण एका शब्दाचेही स्पष्टीकरण देण्याच्या फंदात पडले नाहीत. त्यांनी सरळ त्या सगळ्या १६१०० युवतींशी एकाच मंडपात विवाहच करून टाकला. आणि एवढ्या एकाच कृतीने स्वत: राजा असलेले श्रीकृष्ण त्या स्त्रियांच्या चारित्र्याबाबत काय विचार करतात, याचा संदेश लोकांपर्यंत न बोलताच पोहोचवला! आता काय बिशाद होती कुणाची त्या तरुणींच्या चारित्र्यावर संशय घेण्याची! शिवाय या एकाच कृतीने त्या स्त्रियांचे पुनर्वसन तर झालेच, शिवाय त्यांना समाजात आवश्यक तो दर्जाही मिळाला! एकाच फटक्यात सोळा सहस्र आयुष्ये बरबाद होण्यापासून वाचली! श्रीमद्भागवतपुराणाच्या १० व्या स्कंधाच्या ५९ व्या अध्यायात या सर्व युवतींना श्रीकृष्णांनी स्वतंत्र महाल, दास-दासी इ. पुरवल्याचेही उल्लेख आहेत. त्याअर्थी स्त्रीमुक्तीवाल्यांनी आजचा दिवस ‘खराखुरा स्त्रीमुक्तीदिन’ म्हणून साजरा करायला हरकत नाही!!

    माझा स्त्रीमुक्तीवादाला काडीचाही विरोध नाही. कुणी काय विचार करावा हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. इस्लाम वा ख्रिश्चॅनिटीचा इतिहास स्त्रियांवरील अनन्वित अत्याचारांनी गच्च भरलेला आहे. त्याच्या खुणा जर पाहायच्या असतील तर आजही ISIS आणि तालिबानमध्ये काय चालतं ते तुम्ही पाहू शकता. किंबहूना त्यांच्या धर्मग्रंथांमध्येच अश्याप्रकारच्या अनेकानेक अन्यायांना नुसती परवानगीच दिलेली नाहीये, तर त्याचे धर्माच्या नावाखाली समर्थनही केले आहे. परंतु जर कुणी त्याच तागडीत हिंदू धर्मालाही तोलणार असतील, तर मात्र माझा आक्षेप आहे. धर्माचे तथाकथित ठेकेदार काय म्हणतात याच्याशी मला काहीही देणेघेणे नाही, परंतु हिंदूंचा कोणताही धर्मग्रंथ स्त्रियांवर अत्याचार सुचवत नाही, एवढे मी एक अभ्यासक या नात्याने निश्चितपणे सांगू शकतो! आणि अतिरेकी-स्त्रीवाद्यांना आवडणार नाही, परंतु भारतीय संस्कृती कोणत्याही बाबतीत स्त्रियांची बाजू घेत नाही, एवढेही मी तितक्याच निश्चयाने सांगू शकतो. आणि न रागावता विचार करणार असाल, तर भारतीय संस्कृती कोणत्याही बाबतीत पुरुषांची बाजू घेत नाही हेही मी तितक्याच ठामपणे सांगू इच्छितो! भारतीय संस्कृती बाजू घेते ती केवळ सत्याची. त्याअर्थी हिंदू संस्कृती कायम नैसर्गिक न्यायाच्या बाजूने असते. स्त्रीवादी मान्य करणार नाहीत कदाचित, परंतु स्त्री आणि पुरुषाची रचना भिन्न असते. स्त्रीमध्ये निसर्गतःच नाजूकपणा, सौम्यता असते. हिंदू संस्कृती हे ओळखून त्या-त्या बाबींमध्ये पुरुषाला तिची काळजी घ्यायला लावते. स्त्रीला वरचा दर्जा देते. म्हणून तर ‘न स्त्रीस्वातंत्र्यमर्हति’ असा काळजीचा संदेश देणारे मनू त्याच मनूस्मृतीत ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते..’ सांगून स्त्रीला थेट देवतेचा दर्जा देतात. तद्वतच पुरुषातही निसर्गतः काही रचनात्मक वैगुण्ये असतात, तिथे हिंदू संस्कृती स्त्रियांना पुढाकार घ्यायला लावते! उदाहरणार्थ – संसाररथ हाकणे!! हे पुरुषाच्या एकट्याच्या हातचे काम नोहे!! तिथे स्त्रियांमधली विचारक्षमता, समंजसपणा, सहनशीलताच कामी येते. इतके साधे सोपे आहे हे सारे! खरं तर, आपण जेव्हा केव्हा एखाद्या गोष्टीसाठी हिंदू संस्कृतीला दोष देऊ पाहातो, तेव्हा शंभरातील नव्व्याण्णव वेळा तरी तो आपल्याच गैरसमजाचा वा अनाभ्यासाचा दोष आहे, असे खुशाल समजावे! माझे अनुभवाचे बोल आहेत हे. आपण गैरसमज करतो ते आपला हिंदू धर्म आणि संस्कृतीचा सखोल अभ्यास नसतो म्हणून. म्हणजे दोष आपल्याच दृष्टीकोनाचा असतो, पण बोल मात्र हिंदू धर्म आणि संस्कृतीला लावला जातो. आणि नेमक्या अश्याचवेळी ‘सत्यमेव जयते’सारख्या उथळ मालिका बनवणाऱ्यांचं फावतं. मी तर त्याहीपुढे जाऊन असे म्हणेन की, आज जी स्त्रियांवरील अत्याचारांत वाढ झालेली दिसतेय ते आपली हिंदू संस्कृतीशी असलेली नाळ तुटण्यामुळे आणि आपल्या दिवसेंदिवस सेक्युलर होण्याच्या फालतू अट्टाहासामुळेच. नाहीतर जर समाजात स्त्रियांच्या चारित्र्याचे रक्षण करण्यासाठी झटणाऱ्या भगवान श्रीकृष्णांचा आदर्श ठेवला गेला असता, नारीला देवतेचे स्थान देणाऱ्या मनूंचा आदर्श ठेवला गेला असता, तर समाजाचा स्त्रीकडे पाहाण्याचा दृष्टीकोनही सुधारला नसता का? चुकीच्या आधुनिकीकरणाचे तोटे आहेत ते हे असे! असो. जे झाले ते झाले. इथून पुढे तरी आपण स्त्रीमुक्ती, त्यासंदर्भात भारतीय संस्कृती यांचा पुनर्विचार करायला शिकूयात. आपल्या मुलांना खरोखरचे हिंदू संस्कार देऊयात. त्यांना उद्याचे युगपुरुष श्रीकृष्ण वा स्मृतीकार मनू होण्याची प्रेरणा देऊयात. आजच्या नरकचतुर्दशीच्या निमित्ताने याच प्रेमादरपूर्वक शुभेच्छा!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी तसेच व्याख्याने डाऊनलोड करण्यासाठी अथवा आपल्या परिसरात/शाळा-महाविद्यालयांत लेखकाची व्याख्याने आयोजित करण्यासाठी क्लिक करा: www.vikramedke.com)

    image