Author: Vikram Edke

  • उडी, नव्हे भारतीय स्वातंत्र्याची गुढी : भाग २

    सावरकरांनी मार्सेल्स बंदरात उडी ठोकून जो ‘भूतो न भविष्यति’ पराक्रम केला आणि त्यांच्या ह्या कुटील डावाला बळी पडून मूर्ख इंग्रज पहारेकऱ्यांनीही त्यांना तसेच नौकेवर नेण्याचा गाढवपणा केला, त्याचे पडसाद अवघ्या जगभर उमटल्याचे आपण मागील लेखांकात पाहिलेच. ह्या सगळ्याचा परिणाम असा झाला की, दोन देशांतील वादांचा निकाल ज्या हेगस्थित आंतरराष्ट्रीय न्यायालयात दिला जातो, त्या न्यायालयात सावरकरांपायी इंग्लंडला आणि सावरकरांच्या डावात ओढल्या गेलेल्या फ्रान्सलाही जावे लागले. तसा करारच दोन्हीही देशांत ४ आणि ५ ऑक्टोबरदिनी झालेल्या पत्रव्यवहारान्वये झाला. न्यायालयासमोर एकच विषय होता – Ought Vinayak Damodar Sawarkar, in conformity with the rules of International Law to be or not to be surrenderred by the Government of the Britanic Majesty to the Government of the French Republic.

    यथाविधी न्यायाधीशमंडळ ठरवले गेले. अध्यक्षस्थानी होते, बेल्जियमचे भूतपूर्व पंतप्रधान M. Beernaert. ब्रिटनचे प्रतिनिधी होते Earl of Desert तर फ्रान्सचे प्रतिनिधी होते Louis Renault. याखेरीज नॉर्वेचे एक भूतपूर्व मंत्री Graham आणि हॉलंडच्या वरीष्ठ सभागृहाचे (Second Chamber) सदस्य Jonkheer A. F. De Savornin Lohman असे दोघे त्रयस्थ राष्ट्रांचे प्रतिनिधी होते. कामकाज असे चालणार होते की, दोन्हीही पक्ष ६ डिसेंबर १९१० दिनी न्यायालयाच्या कार्यालयात आपापली बाजू मांडणाऱ्या लेखाच्या प्रत्येकी १५ प्रती सादर करतील. पुराव्यासाठी व संदर्भ म्हणून काही कागदपत्रे वापरावयाची असतील, तर त्यांच्याही सत्यापित प्रती त्याचवेळी सादर करतील. प्रत्येक पक्षाला परस्पर बाजूच्या कागदपत्रांच्या २-२ प्रती देण्यात येतील व २ प्रती कार्यालयाच्या नोंदीसाठी राहातील. त्यानंतर १७ जानेवारी दिनी दोन्हीही पक्ष वरील पद्धतीनेच आपापले उत्तर व प्रमाणभूत पुरावे सादर करतील. ह्या उत्तरांनाही प्रत्युत्तरे द्यावयाची शक्यता व आवश्यकता निर्माण झाल्यास ती वरील उत्तरे सादर केल्यापासून १५ दिवसांचे आतच करावी लागतील. ह्यानंतर न्यायाधीश-मंडळ १४ फेब्रुवारी १९११ दिनी हेग येथे स्थानापन्न होईल व प्रत्येक पक्षाचा १-१ प्रतिनिधी त्यांच्यापुढे उपस्थित राहून आपले म्हणणे लेखी वा तोंडी आवश्यकतेनुसार मांडेल. यानंतर प्रत्युत्तरे व साक्षीही आवश्यकतेनुसार होतील. त्यानंतर न्यायमंडळ बसल्यापासून ३० दिवसांचे आत अथवा लेखी स्पष्टीकरण सादर झाल्यापासून ३० दिवसांचे आत निर्णय देणे न्यायमंडळावर बंधनकारक राहिल. परंतु न्यायाधीश-मंडळाच्या मागणीनुसार व दोन्हीही पक्षांच्या संमतीनुसार ही मुदत वाढवताही येऊ शकते (संदर्भ: २५ ऑक्टोबर १९१० दिनी लंडन येथे झालेला करार).

    ह्याप्रमाणे खटल्याचे कामकाज चालले व निकाल आला तो अर्थातच फ्रान्सच्या विरोधात! येथे खालील विधेये लक्षात घेणे अतिशय आवश्यक आहे –
    १) न्यायाधीश मंडळ ठरवताना जर्मनी, इटली, रशिया इ. युरोपातील ताकदवान राष्ट्रांच्या प्रतिनिधींना न नेमता बेल्जियम, हॉलंड व नॉर्वे ह्या तुलनेने दुर्बळ व दुय्यम राष्ट्रांच्या प्रतिनिधींनाच तेवढे नेमले गेले. ताकदवान राष्ट्रांपैकी एकाचाही प्रतिनिधी ह्या मंडळावर नसणे, ही गोष्ट अतिशय शंकास्पद होती. हा अर्थातच इंग्लंडचा धाकदपटशा होता.
    २) न्यायालयाचे कामकाज पहिला आणि शेवटचा दिवस वगळता पूर्णतः बंद दाराआडच चालले. हे सत्यान्वेषणात अर्थातच बाधक होते.
    ३) ज्या व्यक्तीसंदर्भात हा सगळा घाट घातला गेला, त्या सावरकरांना आपली बाजू मांडण्याची साधी संधीसुद्धा दिली गेली नाही. Jean Longuet नामक गृहस्थांनी सावरकरांची बाजू मांडली (‘कैसर-ए-हिंद’मधील एम. पी. टी. आचार्य यांचा १० जानेवारी १९४३ चा लेख).
    ४) बरे करारानुसार कामकाज किमान महिनाभर चालेल असा अंदाज होता. एवढेच कश्याला, तर कामकाजास मुदत वाढवून द्यावी लागते की काय अशीही शक्यता त्या करारातच समाविष्ट केली गेली होती. प्रत्यक्षात १४ फेब्रुवारीला सुरु झालेल्या खटल्याचा निकाल दहाव्याच दिवशी म्हणजे २४ फेब्रुवारीलाच देऊनही टाकला गेला होता. खटला म्हणजे नुसता फार्सच होता, हे यावरुन उघडच दिसते! एवढे असूनही अखेरीस न्यायालयाला लाजेकाजेस्तव का होईना पण ‘सावरकरांना पकडण्याच्या व तदनंतर ब्रिटिश पोलिसांच्या हवाली करण्याच्या कामी हलगर्जीपणा झाला’ हे मान्यच करावे लागले.
    ५) आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला अडकून (Pending) असताना ब्रिटिशांनी भारतात सावरकरांवर त्याच संदर्भात खटला चालवणे कायद्याप्रमाणे चुकीचे होते. पण दरम्यानच्या काळातच भारतात नाशिक-कट-खटल्याचा निकाल लावण्यात येऊन सावरकरांना पहिली जन्मठेपदेखील सुनावण्यात आली. बरे, हा खटला प्रकरण हेगकडे जाण्यापूर्वीच सुरु झाला म्हणावे, तर जानेवारीतच म्हणजे हेगचे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच ब्रिटिशांनी सावरकरांवरील दुसऱ्याही आरोपाची चौकशी सुरु केली, एवढेच नव्हे तर महिना संपायच्या आतच म्हणजे ३० जानेवारी दिनी त्याही खटल्याचा निकाल लावून सावरकरांना दुसरी जन्मठेपदेखील सुनावली. ब्रिटिशांच्या ह्या कुटील खेळीमुळे हेगचा निकाल येण्याआधीच सावरकरांवर ‘दोषी’ असल्याचा शिक्का बसला व अर्थातच आंतरराष्ट्रीय न्यायमंडळाचे मत सावरकरांविषयी आपसूकच कलुषित झाले. त्यामुळे सावरकरांना फ्रान्सच्या ताब्यात दिल्याने काहीही साधले जाणार नाही असेच न्यायमंडळाचे मत पडले.

    सावरकरांना अवैधरित्या अटक केल्यावर जश्या जगभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या, तश्याच या निकालामुळेही उमटल्या. काही उदाहरणे देणे अगदीच विषयाला धरुन ठरेल. खालील सर्व संदर्भ शि. ल. करंदीकरलिखित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर चरित्र’मधून –
    १) ‘लंडन टाईम्स’चा हेगस्थित प्रतिनिधी लिहितो की, हेगचा निकाल देताना न्यायमंडळाची एकवाक्यता नव्हती; एवढेच नव्हे तर फ्रान्सने मांडलेले मुद्दे पुर्णपणे दुर्लक्षित करण्यात आले.
    २) ‘पोस्ट’ ह्या जर्मन वृत्तपत्राने लिहिले की, सदर निर्णायाने सावरकर-प्रकरणाच्या खऱ्या मुद्द्यालाच बगल दिली आहे.
    ३) ‘मँचेस्टर गार्डियन’ने लिहिले की, हेगचा निर्णय वाचून लोक आश्चर्याने स्तिमित होऊन जातील.
    ४) ‘डेली न्यूज’ने तर लिहिले की, ह्या निर्णयामुळे आरोपींना असलेल्या परदेशात आश्रय मिळवण्याच्या अधिकाराचाच संकोच झाला आहे.
    ५) ब्रिटिश सांसद Wagewood ह्यांनी पं. श्यामजी कृष्ण वर्मा यांना पाठवलेल्या पत्रात लिहिले की, “सावरकर-प्रकरण मुळात त्रयस्थांकडे सोपविणे ही फ्रान्सची घोडचूक असल्याचे L’Humanite वृत्तपत्राचे म्हणणेच शेवटी खरे ठरले. माझ्या एका सांसद मित्राने मला खात्रीपूर्वक सांगितले होते की, फ्रान्सने आपली बाजू जेव्हा महत्वाची विधेये वगळून मांडली तेव्हाच फ्रान्सचे हरणे ठरुन गेले होते”.

    युरोपातली वृत्तपत्रे सावरकरांना ‘Martyr’ म्हणून गौरवित असताना आपल्याकडील अँग्लो-इंडियन वृत्तपत्रे मात्र हर्षभरित झाली होती. एकाने तर ‘The rascal at last met his fate’ अशी नीच भाषा वापरण्याइतपत मजल मारली.

    आणि सावरकर..? ज्याच्यापायी सबंध जग ढवळून निघत होते, ते सावरकर ह्यावेळी काय करीत होते?तो क्रांतियोगी शांत, अविचल, स्थितप्रज्ञ अवस्थेत डोंगराच्या तुरुंगात अंदमानला जाण्याची वाट पाहात दिवस कंठत होता. इंग्लंडला मान खाली घालायला लावून भारतीय स्वातंत्र्ययुद्ध सातासमुद्रापल्याड नेत जगभर गाजविण्याचा त्यांचा हेतू पुरेपूर सफल झाला होता. प्राप्त परिस्थितीत याहून अधिक काही करता येण्यासारखे नव्हतेच. ना सावरकर हेगच्या निकालावर अवलंबून होते. एखाद्या आरोपीला जर दोन वेगवेगळ्या अपराधांसाठी दोन वेगवेगळ्या जन्मठेपी सुनावल्या असतील, तर कायद्यानुसार त्या दोन्हीही एकत्र करुन एकच जन्मठेप भोगावयाची असा नियम असतानाही सावरकरांच्या बाबतीत मात्र स्वतःच केलेला कायदा मोडून ब्रिटिश त्यांना एकामागोमाग एक दोन जन्मठेपी – म्हणजे ५० वर्षे शिक्षा भोगायला लावत होते. ब्रिटिश सरकार सावरकरांना किती घाबरुन होते, याची याहून मोठी काय पावती हवी? हेगचा निकाल येण्याआधीच सावरकरांनी अन्यायाचा पहाड सोसला होता. त्यापुढे हेगचा निकाल म्हणजे किस झाडकी पत्ती! गंमत म्हणजे दोन जन्मठेपी सलग भोगण्याचा निर्णय घेऊन जो इंग्रज अधिकारी सावरकरांकडे आला, त्याला वाटले सावरकर आता रडतील – मग रडतील!! उलट हसत हसत सावरकर त्याला म्हणाले, “चला, एका मागोमाग एक दोन जन्म शिक्षा भोगण्याच्या निमित्ताने का होईना पण तुमच्या ख्रिस्ती सरकारने आम्हां हिंदूंचा पुनर्जन्माचा सिद्धांत तर मानला”!

    — © विक्रम श्रीराम एडके.
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी, तसेच विविध विषयांवर लेखकाची व्याख्याने ऐकण्या/आयोजिण्यासाठी भेट द्या: www.vikramedke.com)

    image

  • उडी, नव्हे भारतीय स्वातंत्र्याची गुढी!!

    ८ जुलै १९१० दिनी स्वा. सावरकरांनी त्रिखंडात गाजलेली उडी मारली. म्हणजे नेमकं काय केलं? गुडघ्यात मेंदू आणि त्या मेंदूलाही मूळव्याध झालेले बिग्रेडी सोडले, तर का त्या उडीला जगभरचे इतिहासकार एवढं महत्त्व देतात? सावरकरांनी उडी मारली ती ‘मोरिया’ नौका मार्सेल्स (फ्रान्स) येथील धक्क्यावर उभी असताना पोर्टहोलमधून! लक्षात घ्या, जहाज ते धक्क्याची भिंत हे अंतर आहे सुमारे ८.५ फूट. सावरकरांचा देह ५-५.५ फुटाचा. म्हणजे उडी मारताना सावरकरांना मोकळी जागा किती मिळतेय? अवघी २.५-३ फूट!! जरादेखील इकडेतिकडे झालं, तरी एकतर कपाळमोक्ष तरी होणार वा हातपाय तरी तुटणार! कारण पुन्हा पोर्टहोल ते समुद्रसपाटी ही उंची आहे सुमारे २७ फूट! एवढ्या उंचीवरुन सावरकर समुद्रात पडले. समुद्रात बरं का! मामाच्या गावच्या विहिरीत नव्हे!! त्यानंतर अवघ्या काही क्षणांत त्यांनी पोहत पोहत जहाजाच्या सुकाणूला वळसा घातला आणि ते बंदराच्या दुसऱ्या भिंतीशी आले! ही भिंत होती सुमारे ९ फूट. शिवाय सतत पाण्याच्या संपर्कामुळे अर्थातच निसरडी झालेली! सावरकर ही ९ फुटांची निसरडी भिंत अवघ्या काही पळांमध्ये चढले, यावरुन कल्पना करा की काय अचाट सामर्थ्याचा माणूस असेल तो. सावरकर बंदरावर पोहोचले, तेव्हा कुठे जहाजावर पहारेकऱ्याच्या लक्षात आलं की, ‘बंदी पळाला’. नाहीतर इतका वेळ सगळे शुंभासारखेच बसून होते. मग धावाधाव सुरु झाली. मग सावरकरांना पकडलं गेलं, जहाजावर परत आणलं गेलं आणि मग पुढचा प्रवास सुरु झाला. (सर्व संदर्भ श्रीमती अनुरुपा सिनार ह्यांच्या संशोधनातून). हे वर्णन वाचायलाही अधिक वेळ लागला असेल, इतक्या कमी वेळात ही जगाच्या इतिहासावर कायमचा परिणाम करणारी घटना घडून गेली. सावरकरांना एकदा एका चिनी सहबंद्याने विचारलं होतं की, ‘किती महिने पोहत होता’? त्यावर सावरकर म्हणाले, ‘महिने कसले? पाच मिनिटंही पोहलो नसेन’!

    मग आता प्रश्न असा उभा राहातो की, जी उडी मारुन पुन्हा अटक होईपर्यंत पाच-दहा मिनिटेसुद्धा धड गेली नव्हती, तिला इतिहासाने एवढं महत्त्व का द्यावं? पलायन म्हणाल, तर कुणी म्हणेल ते फसलेलं पलायन होतं. साहस म्हणाल, तर कुणी म्हणेल ते वाया गेलेलं साहस होतं. खरंच का ते फसलेलं पलायन आणि वाया गेलेलं साहस होतं? याचं उत्तर अवघ्या तीनच दिवसांत वृत्तपत्रांनी दिलं!!

    १) ‘ल लिबर्सियन’ ह्या वृत्तपत्राने ११ जुलै १९१० ला संपादकीय लिहिलं, “इंग्लंडचे कुख्यात साम्राज्य हे रक्तपात व दडपशाहीवरच आधारलेले आहे. सावरकरांना फ्रान्सच्या भूमीवर केलेली अवैध अटक हे त्याचेच प्रतीक आहे. सरकारने फ्रेंच राज्यक्रांतीची वैभवशाली मर्यादा राखायला हवी व सावरकरांचा ताबा मिळवून त्यांना संपूर्ण संरक्षण द्यावयास हवे”.
    २) ‘ल ह्युमनाईत’ने १२ जुलै १९१० दिनी ह्या घटनेचे वर्णन ‘फ्रान्सच्या राज्यक्रांतीशी प्रतारणा’ असे केले.
    ३) ‘द प्रेझेन्स’ने फ्रान्सच्या विदेशमंत्र्यांकडे मागणी केली की, ‘सावरकरांना ताबडतोब परत मिळवावे’.
    ४) ‘ल एब्लर’ने १६ जुलै १९१० ला लिहिले की, “स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांना आश्रय देण्याची फ्रान्सची परंपरा आहे. तिलाच फ्रेंच सरकारच्या भ्याडपणामुळे काळीमा फासला गेलाय. प्रत्येक फ्रेंच माणसाला शरमेने मान खाली घालण्याची वेळ आली आहे”.
    ५) ‘ल टेम्पस’ने १८ जुलैला लिहिले की, “सावरकरांच्या अलौकिक शौर्याचे कौतुक प्रत्येक फ्रेंच माणसाने करावयास हवे. सावरकरांची मुक्तता व सन्मानपूर्वक फ्रान्समध्ये आगमन हे फ्रेंच सरकारचे कर्तव्य आहे. त्यासाठी सावरकरांवरील अन्याय दूर होईपर्यंत कुणाही फ्रेंच माणसाने विश्रांती घेता कामा नये”.
    ६) ‘ल मातिम’ने २१ जुलैला लिहिले की, “फ्रेंच सरकारने सावरकरांना सोडवले नाही, तर जगात तोंड दाखवायला जागा राहाणार नाही”.

    इंग्लंडमध्येही धुमश्चक्री सुरु झाली. सावरकरांच्या खेळीमुळे ब्रिटिशच कसे ब्रिटिशांवर तुटून पडले पाहा –
    ७) द डेली मेल’चे संपादक रॉबर्ट लिंड २२ जुलैला लिहितात, “ब्रिटीश पोलिसांच्या नीच कृतीमुळे अन्य देशांमध्ये आश्रय घेण्याच्या कायद्याची थट्टाच झाली आहे. कायद्याची अक्षरशः टवाळी केली आहे आपण ब्रिटिशांनी”.
    ८) ‘द मॉर्निंग पोस्ट’ने ३० जुलैला लिहिले, “कायद्याचे सार्वभौमत्व जपण्याचा ब्रिटनने आजवर अभिमान बाळगला होता, तो आपण स्वत:च्याच हातांनी आज उद्ध्वस्त केला”.

    भारतमंत्री लॉर्ड मोर्लेंना चक्क आपले पद गमवावे लागले. इतर देशांत काय झाले –
    ९) १२ जुलैच्या ‘द बर्लिन पोस्ट’ ह्या जर्मन वृत्तपत्राच्या अंकात लिहिलेय, “इंग्लंड आजवर जगाला अक्कल शिकवत आलाय, पण स्वतः मात्र किती पाखंडी आहे पाहा. सावरकरांना पकडून प्रत्यक्ष कायद्याचाच बळी दिला त्यांनी”.
    १०) इटलीतील रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. झान्द्रीन ह्यांनी सावरकरांच्या मुक्ततेसाठी आंदोलन आरंभले. इटलीत!!
    ११) स्विस वृत्तपत्र ‘डेर् वॉण्डरर’ लिहिते, “ब्रूटसच्या खंजिराप्रमाणे विश्वासघात करुन ब्रिटिश सरकारने स्वातंत्र्यदेवतेचा खून केलाय”.
    १२) ‘ल सोसिएत’ हे बेल्जियन वृत्तपत्र लिहिते, “इंग्लंडच्या एका कृतीने सबंध युरोपला तमोयुगात लोटलेय”.
    १३) ब्रिटनमधील स्पेनचे उपाधिकारी पिअरॉ, पॅराग्वेचे राजदूत जॉम्बॉ, पोर्तुगालचे राजदूत इ. सर्व उच्चाधिकाऱ्यांनी ब्रिटिश सरकारचा निषेध केला आणि ब्रिटनची कारवाई अनैतिक आहे व सावरकरांना तात्काळ फ्रान्समध्ये आश्रय द्यावा, असे लेखी पत्र दिले.
    १४) ‘द असाही शिम्बुन’ ह्या जपानी वृत्तपत्रानुसार जपानचे सांसद मोयो यांनी संसदेत सावरकरांच्या मुक्ततेची मागणी प्रतिपादली.

    उपरोक्त सर्व संदर्भ डॉ. प. वि. वर्तकांच्या ‘सावरकर – चावट की वात्रट’मधून. आंतरराष्ट्रीय राजकारणात असा सर्वत्र दबाव निर्माण झाल्यामुळे अखेरीस २९ जुलैला फ्रेंच सरकारने सावरकरांच्या मुक्ततेची अधिकृत मागणी केली आणि अवघे प्रकरणच हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेले! विचार करा, एका गुलाम देशातला एक साधासा कैदी, पण त्याच्या एकाच डावामुळे फ्रान्स आणि इंग्लंड हे युरोपातले दोन ‘दादा’ देश चक्क न्यायालयात एकमेकांशी भांडताहेत आणि ह्या सगळ्याला कारणीभूत असलेले सावरकर मात्र गावातल्या गालात हसत मजा पाहाताहेत. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल इंग्लंडच्या बाजूने लागला खरा, पण इंग्लंडने शेकडो वर्षे झडून कमावलेला सन्मान सावरकरांनी अवघ्या पाचच मिनिटांत धुळीस मिळवला होता! ह्या निकालाचा परिणाम एवढा खोल झाला की, त्यानंतर अवघ्या ५ च दिवसांत चक्क फ्रान्सच्या पंतप्रधानाला राजीनामा द्यावा लागला! आता बोला!! सावरकरांच्या ह्या कुटील खेळीमुळे इतिहासात पहिल्यांदाच जगाला समजले की, भारत नावाचा कुणीतरी देश आहे जो आपल्या स्वातंत्र्यासाठी झगडतोय. नाहीतर तोपर्यंत सगळेच आपल्याकडे दुर्लक्ष करायचे! ह्या घटनेमुळे सावरकरांचा आंतरराष्ट्रीय राजकारणावर प्रभाव पडला, तो कायमचाच. याच प्रभावाचा पुढे सुभाषबाबूंना उपयोग झाला! अशी ही सावरकरांची त्रिखंडात गाजलेली उडी. अवघ्या जगाला प्रेरणा देणारी. कवींनी थेट हनुमंताच्या उडीसोबत तुलना केलेली. जगाच्या इतिहासात कायमची छाप सोडणारी! काय गंमत आहे पाहा, वर मी संदर्भ दिले आहेत की अवघ्या जगाने काय प्रतिक्रिया दिली. त्यावरुन दिसते की, साऱ्या जगाने सावरकरांच्या चातुर्याला कसा बरोब्बर प्रतिसाद दिला. राजकारणच ना ते! सावरकरांनी साऱ्या जगाचाच पट केला आणि चाल रचली. केवढे मोठे साहस! आपल्याला अभिमान वाटायला हवा याचा. पण आपल्याकडची काही डुकरं मात्र केवळ ‘सावरकर आपल्या जातीचे नाहीत’ एवढ्या एकाच कारणासाठी ह्या उडीची निर्भत्सना करतात. सावरकरांना ‘संडासवीर’ सारखे गलिच्छ दूषण देतात. अरे पावट्यांनो, सावरकरांनी त्या जहाजाच्या संडासातून उडी मारली म्हणून आज तुम्ही मुक्त राहून तोंडाचा कमोड करु शकता, हे विसरु नका!! अन्यथा आज तुम्ही आडून आडून देशशत्रूंचे तळवे चाटताय, ते प्रत्यक्षात चाटत बसावे लागले असते तुम्हाला!! असो. ही तर झाली गद्दारांची लायकी. पण प्रत्येक सच्च्या भारतीयास नेहमीच सावरकरांच्या ह्या उडीचा, नव्हे भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या गुढीचा अभिमान वाटत राहिल. आणि कोटी कोटी मस्तके स्वातंत्र्यवीरांपुढे नतमस्तक होत राहातील, होतच राहातील!!

    — © विक्रम श्रीराम एडके.
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा: www.vikramedke.com)

    image

  • जो तारपे गुज़री है..

    २०१४ साली सुपरस्टार रजनीकांतचा ‘कोचडयान’ (२३ मे) प्रदर्शित झाला. भारतातला पहिला एजाकर्षी (परफॉर्मन्स कॅप्चर) चित्रपट! अनेक वर्षे निर्माणाधीन असलेला १५० कोटींचा महत्त्वाकांक्षी चित्रपट!! चित्रपट धो-धो चालला. धो-धो म्हणजे जवळ जवळ १२५ कोटी. भारतात एखाद्या प्रादेशिक चित्रकथापटाने (ऍनिमेटेड सिनेमा) एवढी प्रचंड कमाई करण्याचे हे पहिले आणि एकमेव उदाहरण. उरलीसुरली रक्कम दूरचित्रवाणी अधिकारांतून मिळाली. पण म्हणजे रजनीचा चित्रपट जितका चालायला हवा, तितका काही ‘कोचडयान’ चालला नाहीच!! ते एक नवं पाऊल होतं, नवी सुरुवात होती. आणि अश्या सुरुवातीच्या पावलांना नेहमीच वाट्याला येणारं अपयश त्याच्याही वाट्याला आलं. अर्थात, रजनीचे चाहते (मीसुद्धा!!) प्रचंड नाराज होते कारण आमचा तलयवा तब्बल ४ वर्षांनंतर मुख्य भूमिकेत दिसणार होता, परंतु प्रत्यक्ष वाट्याला आली होती ती केवळ एजाकर्षी चित्रकथा!!

    रजनीने ह्या गोष्टीची मात्र ताबडतोब नोंद घेतली आणि ताबडतोब के. एस. रविकुमारच्या ‘लिंगा’वर काम सुरु केले. सुरुवातीलाच हेही घोषित करुन टाकले की जुनमध्ये चित्रणास सुरुवात झालेली असली तरी चित्रपट रजनीच्या वाढदिवशीच (१२ डिसेंबर! हो, बारा ठिकाणी मति चालवणाऱ्या साहेबांप्रमाणेच रजनीदेखील १२चाच आहे! एकाच दिवशी जन्मलेल्या व्यक्ती पण कमालीचे भिन्न स्वभाव!! एक देवमाणूस तर दुसरा.. असो!!) चाहत्यांना भेट म्हणून प्रदर्शित होणार. म्हणजे निर्माणपूर्व, निर्माण आणि निर्माणोत्तर अश्या तिन्ही गोष्टींसाठी हाती केवळ ६ च महिने!! रहमानपासून गुलज़ारपर्यंत सगळ्यांनी अक्षरशः रात्रीचा दिवस करुन काम केलं (तसा रहमान मात्र शब्दशः रात्रीचाच दिवस करतो, हा भाग वेगळा!!)! भल्यामोठ्या आजारातून उठलेला असूनही रजनीने सलग दोन दमवणाऱ्या (१ अंगावर मणामणांची जड यंत्रे वागवत एजाकर्षी, तर २रा देमार साहसपट!) चित्रपटांत काम केलं आणि ‘लिंगा’ ठरल्यादिवशी प्रदर्शित केला! २० वर्षांनंतर पहिल्यांदाच एखाद्या वर्षी रजनीचे सलग २ चित्रपट प्रदर्शित होत होते. चाहत्यांसाठी पर्वणीच जणू!! ‘लिंगा’ने पहिल्याच दिवशी २२ कोटींचा गल्ला जमवला!! हे भल्याभल्या हिंदी चित्रपटांनाही साधत नाही. प्रादेशिक चित्रपटांसाठी तर हा आजही अबाधित असलेला विक्रमच (मी नव्हे!!) आहे. ८० कोटींमध्ये बनलेल्या ‘लिंगा’ने एकूण १४९ कोटी कमावले. तरीदेखील काही वितरकांनी नुकसान झाल्याच्या तक्रारी केल्या. रजनीचा मोठेपणा पाहा, तो ह्या चित्रपटाचा निर्माता नसूनही त्याने निर्मात्यावर ओझे पडू न देता स्वतः ३३ कोटी रुपये वितरकांना दिले. कायदेशीररित्या रजनीवर कुठलीही जबाबदारी येत नसूनही!! हा आहे रजनी. पैश्यांपेक्षा जास्त माणसांना जपणारा तलयवा!!

    पण एकूणात काय, तर रजनीचे सलग २ चित्रपट म्हणावे तसे (शाब्बास!!) चालले नाहीत. ते त्यावर्षीच्या इतर अनेक चित्रपटांपेक्षा जोरात चालले, हा भाग वेगळा!! ह्याने रजनीच्या सुपरस्टारपदाला काडीमात्रही धक्का बसणार नव्हता. रजनी ३ तास पडद्यावर काहीही न करता स्वस्थ बसून जरी राहिला, तरीही आम्ही जगभर पसरलेले त्याचे चाहते आवडीने तिकीट काढून पाहू!! याची रजनीला पूर्णपणे जाणीव आहे. पण मग तरीही त्याने काय केलं माहितीये? त्याने रणजीत नावाच्या एका तरुण, आजवर केवळ २च चित्रपट बनवलेल्या दिग्दर्शकाचा चित्रपट स्वीकारला!!

    कोण बुवा हा रणजीत? जश्या नवकथा, नवकविता असतात; तसेच चित्रपटांतही प्रवाहापेक्षा वेगळे जाऊ पाहाणारे, कला आणि व्यवसाय दोन्हींचा मेळ साधू पाहाणारे नव-चित्रपट असतात!! रणजीत हा असाच ताज्या दमाचे पण कमी खर्चाचे चित्रपट बनवणारा दिग्दर्शक. त्याच्या अट्टाकथ्थी (२०१२) आणि मद्रास (२०१४) ची स्तुती करताना समीक्षक आजही थकत नाहीत. आपला सारा मानमरातब, स्टारडम बाजूला ठेवून रजनीने ह्या रणजीतचा चित्रपट स्वीकारलाय. दक्षिण चेन्नईत घडणारी अगदीच स्थानिक पातळीवरची कथा असेल. नाव ठरायचेय अजून! पण रजनी ह्या चित्रपटात एका वयस्कर डॉनची भूमिका करणार आहे म्हणे!! खरं तर सलग ४ बिगबजेट चित्रपट हिट दिलेला राष्ट्रपती-पारितोषिकविजेता शंकर रजनीची ‘यन्धिरन २’साठी वाट पाहातोय. यन्धिरन/रोबोट (२०१०) ह्या अतिशय गाजलेल्या चित्रपटाचा हा पुढचा भाग. मुख्य भूमिकेत अर्थातच रजनी. आणि खलनायकी भूमिकेत साक्षात चियान विक्रम!! अक्षरशः पर्वणी असणार आहे पर्वणी!! पण रजनीने शंकरलाही थांबवून ठेवलेय रणजीतच्या चित्रपटासाठी!! रणजीतच्या चित्रपटाच्या निमित्ताने रजनी ८ वर्षांत प्रथमच ‘रहमाने’तर संगीतकारासोबत (संतोष नारायणन) काम करणार आहे. म्हटलं तर प्रयोग, म्हटलं तर जोखीम! काय गरज आहे वयाच्या ६५ व्या वर्षी, सारे उच्चतम तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञ समोर हात जोडून उभे असतानाही, एका कमी खर्चाच्या चित्रपटाची जोखीम पत्करण्याची? पण निष्ठावंत चाहते कोट्यवधी आहेत हो, आत्ताच योग्य वेळ आहे ‘चित्रपट’ करायची! खराखुरा, टीकाकारांची तोंडे बंद करणारा, अभिनयाला वाव असलेला, वितरकांना फायदेशीर ठरणारा कमी खर्चातला चित्रपट!! शेकडों कोटी काय, नंतर ‘यन्धिरन २’मधूनही मिळवता येतीलच की!! पण हीच वेळ आहे स्वतःला नव्याने शोधण्याची. रुमी म्हणतो, ‘जग जेव्हा तुम्हाला गुडघे टेकायला भाग पाडतं ना, तेव्हाच परिपूर्ण स्थिती लाभते प्रार्थना करण्यासाठी’!! मला वाटतं, सलग २ चित्रपटांचं अपयश (!) पाहिलेला रजनी नेमकं हेच करतोय!!

    आणि विनयशीलता तर केवढी? एकदा कुठल्याश्या चित्रपटाच्या यशानंतर नेहमीप्रमाणेच साधासा वेष परिधान केलेला रजनी बेंगरुळूमधील एका मंदिरात गेला होता. पायरीशी जमिनीवर बसलेला असताना, एका बाईने त्याला भिकारी समजून १० रुपयाची नोट देऊ केली. रजनीला गंमत वाटली. त्याने मान लववून ती नोट स्वीकारली. जरावेळाने गाडीच्या दिशेने निघालेला रजनीकांत पाहिल्यावर बाईंना आपण काय पाप केले आहे ते समजून चुकले. घाईघाईने त्या रजनीकडे धावल्या आणि वारंवार क्षमायाचना करु लागल्या. रजनी हसला. म्हणाला, “आई तुम्ही माफी मागू नका. माझ्या पाया पडू नका. आपण दोघेही देवाच्या दरबारात आहोत. बहुतेक हा त्याच परमेश्वराचा संकेत असावा मला दाखवून देण्यासाठी की, बाहेर तू असशील मोठा सुपरस्टार; पण प्रत्यक्षात ही किंमत आहे तुझी”!! गायत्री श्रीकांत ह्यांनी रजनीकांतचे ससंदर्भ चरित्र लिहिले आहे. त्यात नोंदवलेला किस्सा आहे हा! काय बोलणार ह्या नम्रतेच्या महासागरापुढे?

    आयला, विषयांतर झालं की! हा तर, हा जो दिग्दर्शक रणजीत आहे ना, ह्याची कामाची एक पद्धत आहे. आपल्या प्रत्येक चित्रपटापूर्वी त्यातील सर्व कलाकारांचं एक शिबिर घेतो तो. प्रत्यक्ष चित्रणाच्यावेळी पुनरांकने (रिटेक्स) वाचतात ना त्यामुळे! मुळातच कमी रक्कम आणि साधने उपलब्ध असली की, अश्या युक्त्या कराव्या लागतात. चित्रपटाच्या भाषेत ह्याला ‘चतुर चित्रनिर्मिती’ (स्मार्ट फिल्ममेकींग) म्हणतात!! हादेखील चित्रपट सुरु करण्याआधी त्याने असेच एक काटेकोर शिबिर आयोजिले होते. अर्थातच रजनीला दृश्य ‘ओके’ देण्याची काय गरज? तो सुपरस्टार आहे, त्याने दृश्य ‘ओके’ देण्याऐवजी त्याने दिलेलेच दृश्य निर्मात्या-दिग्दर्शकांनी ‘ओके’ करावे अशी परिस्थिती. पण रणजीत अक्षरशः चाट पडला, ज्यावेळी त्याच्या शिबिरात रजनी उपस्थित राहिला. रजनी नुसता आलाच असे नाही, तर त्याने शिबिर पूर्णसुद्धा केले. सारे ऐकले. समजून घेतले. शंकादेखील विचारल्या. सीए, सीएस मंडळींना सतत वेगवेगळे ‘रिफ्रेशिंग कोर्सेस’ करावे लागतात, त्यावेळी जुन्याजाणत्या अनुभवी मंडळींची काय कंटाळवाणी अवस्था होते, जरा विचार करा; म्हणजे रजनीने काय दिव्य केलंय ते समजेल! हे अतिप्रचंड कष्ट तो रोज उपसतो म्हणूनच एकेकाळी हमाल असलेला आणि नंतर बसचा वाहक बनलेला शिवाजीराव गायकवाड आज आंतरराष्ट्रीय सुपरस्टार रजनीकांत आहे. लक्षात घ्या, कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होणं फार सोपं असतं. अवघड असतं ते मिळालेल्या यशाला कायम टिकवून ठेवणं!! ग़ालिब म्हणतो, “जो साज़से निकली है वो धुन सभीने सुनी है, पर जो तारपे गुज़री है वो किसने सुनी है”!! आपल्याला रजनीकांतवरचे विनोद माहिती असतात, त्याचं देवदुर्लभ स्टारडमही दिसतं; पण रजनी आज सलग ३५ वर्षे सर्वोच्च स्थानावर आहे, ते सर्वोच्च स्थान टिकवण्यासाठी तो गेली ३ दशके रोज घेत असलेले कष्ट मात्र कुणाला क्वचितच माहिती असतात! वाद्यातून निघालेले स्वर सर्वांनाच आवडतात, पण त्यासाठी तारेला काय भोगावं लागतं, ‘जो तारपे गुज़री है’; ते मात्र क्वचितच कुणाला समजतं. रजनीचा मेहनतीला ना ३५ वर्षांपूर्वी नकार होता, ना आज वयाची पासष्टी गाठल्यावरही नकार आहे. आणि म्हणूनच, जरी अजून नावसुद्धा ठरलेले नसले तरीही मी खात्रीने सांगू शकतो की, रणजीतचा चित्रपट यशस्वी होणार! तुफान यशस्वी होणार! रजनीकांत काल सुपरस्टार होता, आज सुपरस्टार आहे आणि उद्यासुद्धा तोच सुपरस्टार राहाणार! ही अशीच गेल्या २ वर्षांत तारपे काय काय गुज़री है, याची कहाणी!!

    — © विक्रम श्रीराम एडके.
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा: www.vikramedke.com)

    image

  • जीवन त्रिविष्टप था..!!

    Song : Ennodu Nee Irundhaal
    Music : A. R. Rahman
    Singers : Sid Sriram, Sunitha Sarathy
    Film : I/Ai

    The following is not a translation, but an independent song written by me on the tunes of “Ennodu Nee Irundhaal” & convey the same feel as the original song. You can call it as a ‘Hindi Cover Version’

    पंख तो थे खोले उसने पर
    वो अपनेही ख्वाबोंसे जल गया
    हाँ.. उडने चला था वो पर
    टूटा.. गिर गया..
    दिलका पंछी मरता रहा, इतनाही बस कहता रहा..
    जीवन त्रिविष्टप था, नर्क बना है जो तेरे बिन!

    हो, सजनी रे अब ऐसे जीना नामुमकिन है
    कौन हूँ मैं, क्या हूँ मैं, कहना भी मुश्क़िल है
    मैं द्यु तू पृथिवी यह तय है, पर ओ पिया
    राम और सिया को भी तो जगने जुदा किया था
    जीवन त्रिविष्टप था..

    बिरहा भीनी रातोंमें
    कितनी यादें सुलगती है,
    चाँद सिरहाने रखा तो
    अन्तर्मन तक जलती है
    दो दो चंदनी आँखोंका
    मुझको टोणा लग जाए,
    जीनेकी परवाह ही क्या
    मरना कुन्दन हो जाए

    साँसे दिलासे ना देती है सनम
    जबसे तुमको खोया, खोए हमसे हम
    अब तो हर पल ऐसा हाल है
    तुझ बिन लम्हें, सौ-सौ साल है
    जीवन त्रिविष्टप था, नर्क बना है जो तेरे बिन!

    — © विक्रम श्रीराम एडके.
    [www.vikramedke.com]

    image

  • पुराना ज़ख़्म

    बडे झुलसे-झुलसेसे मौसम है
    धधक रही है धूप और छाँवभी
    ये तू है या फिर तेरे ख़यालोंकी तपिश,
    तुम्हें सोचता हूँ तो जल जाता हूँ
    अपनेही तापसे मैं गल जाता हूँ

    कितने अँधियारे है काटें इक उजालेकी आस में
    कितने सैय्यार निगल गया हूँ बस एकही साँस में
    ये तू है या तेरे वजूदकी परछाई,
    इक आहटहीसे बल खाता हूँ
    डूबता सूरज हूँ ढल जाता हूँ

    कितनी बार फूँके है यादोंके रिसालें
    कितनी बार फिर उन्हें बनाया है
    ये तू है या इन खँडहरोंसे गुज़रा झौंका कोई,
    इक छुअनहीसे सील जाता हूँ
    पुराना ज़ख़्म हूँ खिल जाता हूँ

    तुम्हें सोचता हूँ तो जल जाता हूँ

    — © विक्रम श्रीराम एडके.
    (www.vikramedke.com)

    image

  • असल उत्तर

    १९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धातली घटना आहे. पाकिस्तान आधीपासूनच जिहादी मनोवृत्तीचे राष्ट्र, त्यामुळे ते युद्धखोरीसाठी सातत्याने तयारच असायचे. त्यातच अमेरिकेने त्यांना एम-४७ आणि एम-४८ पॅटन रणगाडे पुरवल्यामुळे तर त्यांची ताकद काहीच्या काहीच वाढली होती. याउलट भारताकडे मात्र दुसऱ्या महायुद्धाच्या वेळचे काही जुने एम-४ शेरमन रणगाडे, काही सेंच्युरियन रणगाडे आणि काही हलके एएमएक्स-१३ रणगाडे असे अत्यंत जुनाट आणि तुटपुंजे असे शस्त्रबळ होते. पाकिस्तानला ही गोष्ट पक्की ठाऊक होती. त्यामुळे त्यांनी एक योजना आखली. पंजाबच्या खेमकरण क्षेत्रात त्यांनी १-२ नव्हे तर चक्क २२० पॅटन रणगाडे उतरवले. त्यांच्यापुढे आपल्या मोजक्या युद्धसामग्रीचा टिकाव लागणे कदापिही शक्य नव्हते. एवढे प्रचंड बळ उतरवून खेमकरण क्षेत्र झटक्यात जिंकून घ्यायचे आणि त्याच्या बदल्यात काश्मिरची मागणी करायची, असा पाकिस्तानचा डाव होता!

    खेमकरण क्षेत्रात त्यावेळी आपली ४थी माऊंटन डिव्हिजन तैनात होती. त्यांच्याकडे थोडंफार पायदळ आणि उपरोक्त तिन्ही प्रकारचे प्रत्येकी ४५ रणगाडे होते. या डिव्हीजनचे नेतृत्व करत होते मेजर जनरल गुरबक्ष सिंह (की हरबक्ष सिंह?)!! इतक्या कमी सामर्थ्यानिशी पाकिस्तानशी भिडणं म्हणजे अक्षरशः आत्महत्या ठरली असती. त्यांनी ताबडतोब आपल्या डिव्हिजनला ते क्षेत्र रिकामे करत माघार घेण्याचा हुकूम सोडला. दिनांक होता ८ सप्टेंबर १९६५!!

    पाकिस्तानच्या गोटात ही बातमी पोहोचताच त्यांना आनंदाचे भरतेच आले!! त्यांनी अजून जोरात आगेकूच आरंभली. आणि इथेच ते गुरबक्ष सिंहांच्या सापळ्यात अडकले!! गुरबक्ष सिंहांनी आपल्या सैन्याला माघार घेण्याचा हुकूम अवश्य दिला होता, पण माघार म्हणजे पळून जाणे नव्हे. गुरबक्ष सिंहांनी आपल्या सैन्याला खेमकरण भागातल्याच ‘असल उत्तर’ गावाला तिन्ही बाजूंनी घेरलेल्या अवस्थेत पेरून ठेवले होते. खेमकरण भाग मुळातच सुपीक आणि भुसभुशीत मातीचा. त्यातून दिवस ऊसाच्या हंगामाचे. बहरलेल्या ऊसांच्या शेतांमुळे भारतीय सैन्य सहजच लपून गेले होते. गावाला तिन्ही बाजूंनी घेरल्यामुळे आपोआपच इंग्रजी U सारखा आकार तयार झाला होता. आणि त्या व्यूहात समोरून पाकिस्तानी सैन्य आत घुसतच चालले होते!!

    पण नुसती व्यूहरचना करून उपयोग नव्हता. जोपर्यंत पाकिस्तानकडे पॅटन रणगाडे होते, तोपर्यंत आपला कोणताही व्यूह भेदणे त्यांच्यासाठी डाव्या हाताचा मळ होता. दि. ९ सप्टेंबर!! पाकिस्तानी रणगाडे आपल्या व्यूहात अगदी आतवर शिरले. आणि काही कळायच्या आतच भारतीय सैन्याने त्यांच्यावर न भूतो न भविष्यति मारा करायला सुरुवात केली. आपले रणगाडे नुसते आग ओकत होते आग!! पाकिस्तान्यांनी उत्तर देण्यासाठी प्रयत्न केला, तर त्यांच्या रणगाड्यांची आतवर शिरलेली पहिली फळी जागची हललीच नाही! त्यांनी जरा अजून जोर लावून हलायचा प्रयत्न केला तर.. हाय रे दुर्दैवा.. त्यांचे रणगाडे जमिनीत रुतून बसले होते आणि जितकी जास्त हालचाल करू तितके अजूनच रुतत चालले होते. कसा काय झाला होता हा चमत्कार?

    त्याकाळी भारत आणि पाकिस्तान दोघांकडेही रात्री युद्ध करण्याची क्षमता नव्हती. गुरबक्ष सिंहांनी ८ सप्टेंबरच्या रात्रीच त्याठिकाणची भुसभुशीत जमीन लक्षात घेऊन तिथे पाण्याचे टँकरच्या टँकर रिते केले होते. ते कमी म्हणूनच की काय, जवळच्या एका कालव्याचे सगळेच्या सगळे पाणी त्याठिकाणी वळवले होते. आधीच जमीन भुसभुशीत, त्यात प्रचंड पाणी!! दलदल तयार झाली अक्षरशः तिथे!! आणि दुसऱ्या दिवशी जडशीळ पाकिस्तानी रणगाडे अलगद त्या दलदलीत सापडले! एकदा पहिली फळी अडकली म्हटल्यावर मागच्या सर्व फळ्या आपोआपच अचल झाल्या!! भारतीय सैन्यासाठी आयती मेजवानीच जणू!! जणू काही रणगाड्यांचा सराव चाललाय अश्या थाटात निपचित पडलेल्या शत्रूवर तिन्ही बाजूंनी तुफान मारा केला आपण. पाकिस्तानने २२० रणगाडे म्हणजेच त्यांच्या समग्र क्षमतेच्या १/३ रणगाडे उतरवले होते. मात्र त्या एकाच दिवसांत आपण त्यांचे तब्बल ९७ रणगाडे उडवले आणि जवळजवळ ११ रणगाडे हस्तगत केले, आपल्या केवळ १० रणगाड्यांच्या मोबदल्यात!! इतर लोक तर सोडाच, पण पाकिस्तानचा कमांडर मेजर जनरल नासिर अहमद खान स्वतःच या लढाईत गंभीररित्या जखमी झाला!! भरपूर ताकद असलेल्या परंतु कवडीचीही अक्कल नसलेल्या पाकिस्तानला बिनशर्त माघार घ्यावी लागली, हे सांगावयास नकोच!! लवकरच त्यांचे वायुदल लाहोरहून झेपावणार होते. पण त्यांची अशी काही दातखिळ बसली, की ते वायुदल कधी झेपावलेच नाही!! याच युद्धादरम्यान कंपनी क्वार्टर मास्टर हवलदार अब्दुल हमिद यांनी एकहाती ६ रणगाडे मारले आणि ७ वा उद्ध्वस्त करताना त्यांना वीरमरण आले. या पराक्रमासाठी त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र हा सर्वोच्च लष्करी सन्मान प्रदान करण्यात आला.

    ही लढाई ‘असल उत्तरची लढाई’ म्हणून ओळखली जाते. ‘असल उत्तर’ जणू नीच पाकिस्तान्यांना भारतीय जवानांनी दिलेले ‘असल उत्तर’च (खरे प्रत्युत्तर!) ठरले!! दुसरं महायुद्ध वगळता रणगाड्यांनी लढलं गेलेलं हे जगातलं सर्वांत मोठं युद्ध!! पाकिस्तानच्या पराभवाचे स्मरण म्हणून त्या जागेचे नाव ‘पॅटन नगर’ असे ठेवण्यात आले!! ते गाव आजही उभे आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ही म्हण सिद्ध करणारी भारताची विजयपताका उंचावत!!

    — © विक्रम श्रीराम एडके.
    [लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी अथवा विविध विषयांवर लेखकाने दिलेली व्याख्याने ऐकण्या/आयोजिण्यासाठी क्लिक करा: www.vikramedke.com]

    image

  • मेरे राम कहाँ..?

    आहत क्रौंचकी किलकारी,
    निषादका आखेट है जारी
    पायसदान पानेको तरसे,
    कौसल्याके प्रियकाम कहाँ?
    राम कहाँ, मेरे राम कहाँ?

    कैकेयी हर घर सन्निद्ध है
    दशरथ फिरभी वचनबद्ध है
    लक्ष्मणके प्यारे परंतु,
    ऋषियोंके आराम कहाँ?
    राम कहाँ, मेरे राम कहाँ?

    दण्डकारण्य आजभी हतबल
    दैत्य राज करते है प्रतिपल
    शीला बनके पंथ निहारे,
    अहल्याके उपशाम कहाँ?
    राम कहाँ, मेरे राम कहाँ?

    वाली-सुग्रीव भेद चला है
    सच्चा था वोही जला है
    संजीवनी लानेको निकले,
    हनुमतके श्रीराम कहाँ?
    राम कहाँ, मेरे राम कहाँ?

    रावणकाल वर्तमान भयंकर
    घुटता बिभीषण यद्यपि धुरंधर
    अशोकवनमें वैदेही व्याकुल,
    पुकारती निजधाम कहाँ?
    राम कहाँ, मेरे राम कहाँ?

    लव-कुशतो बिछडेही रह गए
    अवधवासी अनृतमें बह गए
    धरती फटनेपरभी लेकिन,
    हमको तो विश्राम कहाँ?
    राम कहाँ, मेरे राम कहाँ?

    — © विक्रम श्रीराम एडके
    [www.vikramedke.com]

    image

  • चेहरे

    ख्वाबतले कुचले चेहरे देखे है
    बिनबातके उजले चेहरे देखे है
    छोडके रिवायत देखा जो मैंने,
    अपनेही आप जले चेहरे देखे है

    चेहरे चलते है चाल,
    जीतते भी है बाज़ी,
    जीतनेवाले चेहरोंपे लेकीन, घाँव गहरे देखे है!

    चिपकाके चेहरेपर चेहरा,
    उसको ही वजूद बताते है,
    पौनीरातमें उसके सैंकडों, टुकडे बिखरे देखे है!

    चेहरे खाली कैनवास,
    चेहरे रंगोंका गोदाम है,
    आँखोंकी ब्रशसे झाडो तो, वीराँ जझीरे देखे है!

    — © विक्रम.
    (www.vikramedke.com)

    image

  • लाम नहीं मिलता

    फ़ुर्क़तकी रातका रंग देखा है कभी?
    काला काला सा होता है.. गाढा.. स्याह..
    फिर नदी बन जाती है उसकी
    और बहता रहता है उसमें, जबींपे काला टीका लगाया नब़ी,
    चाँद थामें एक हाथमें, तो दूजेमें जलता दिल!
    जलता दिल, जो चाँदसे कहीं ज़्यादा रौशनी देता है..
    और सुरजसे कहीं ज़्यादा आँच!
    नब़ी ताँकता रहता है उस उजालेमें हरइक मोड़
    की इस दर्यामें कोई तो मोड़ होगा, जो फ़ारसीका तालिब हो,
    जो पहचानता हो लामको
    लाम नहीं मिलता,
    दिल नहीं बुझता,
    चाँद नहीं ढलता,
    रात फ़ुर्क़तकी, और गाढ़ी होती चली जाती है..!

    — © Vikram Edke
    [ www.vikramedke.com ]

    image

  • ‘आय’ — अदक्कम मेलऽ

    ஜ या तमिळ भाषेतील अक्षराचा उच्चार होतो ‘आय’ अथवा ‘ऐ’. एकच अक्षर, पण त्याचे अर्थ मात्र खूप सारे होतात. ‘आय’ म्हणजे सौंदर्य, मी, राग, बाण, सूड, प्रेम, गुरू, राजा, मालक, दुर्बल, आश्चर्य आणि अजून बरंच काही! परंतु जेव्हा शंकर हे सगळेच्या सगळे अर्थ एकाच कथेत बांधतो, तेव्हा बनतो ३ तास ८ मिनिटे चालणारा चमत्कार ‘आय’!! अविश्वसनीय, अद्भुत, अकल्प्य आणि तरीही तपशीलांचा पाया पक्का असलेले चित्रपट बनवण्यासाठी शंकर प्रसिद्ध आहे. त्याचा प्रत्येक अन् प्रत्येक चित्रपट हा तमिळच नव्हे, तर संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीला नवीन दिशा देत असतो. परंतु २०० कोटींच्या भयावह किमतीत बनवलेला ‘आय’सारखा चित्रपट शंकरनेही आजवर कधीच बनवला नव्हता, हे निश्चित!! यानिमित्ताने शंकरने आयुष्यात पहिल्यांदाच प्रणयप्रधान थरारपट बनवलाय!! आणि त्याची सारी जबाबदारी समर्थपणे शिरावर उचललीये ‘चियान’ विक्रमने!! अत्यंत साधीशी, सुडाच्या अंगाने जाणारी प्रेमकथा! मात्र जेव्हा तिला शंकरचा स्पर्श होतो, तेव्हा कुणी कल्पनेतही कल्पना करू शकणार नाही, इतकी भव्यता निर्माण होते! श्वास रोखून धरायला लावणारी साहसदृश्ये, भीती वाटायला लावणारी थरारकता, सौंदर्यानेही लाजून मान लववावी असं सौंदर्य. आणि तरीही त्याच्या प्रत्येक न् प्रत्येक चौकटीवर कोरलेलं लिंगेसनचं (विक्रम) दिया (ऍमी) साठीचं प्रेम!! शरीरसौष्ठवापासून ते मॉडेलिंग व वैद्यकशास्त्रापर्यंत आणि चेन्नईच्या गल्लीबोळांपासून ते चीनमधल्या बहारदार स्थळांपर्यंत ‘आय’ लीलया संचार करतो!

    सर्वात आधी उल्लेख करायला हवा तो विक्रमचा! विक्रम नि:संशय याक्षणीचा भारतातील सर्वश्रेष्ठ अभिनेता आहे. त्याच्याइतका मेहनती अभिनेताही भारतात दुसरा कुणीच नसेल. परंतु ही सारी विशेषणं थिटी वाटावीत असा चमत्कार त्याने लिंगेसनच्या रुपाने घडवलाय! ‘आय’च्या एकेका चौकटीच्या परिपूर्णतेसाठी आपल्या ४८ वर्षे जीर्ण शरीराची अक्षरशः दधिचीप्रमाणे प्रत्येक मिनिटा मिनिटाला किंमत मोजलीये त्याने! सौंदर्याची मूर्ती म्हणजे विक्रम, शैलीदारपणाचे दुसरे नाव विक्रम, रागावण्याच्या अभिनयात जमदग्नीचा अवतार विक्रम, साहसदृश्यांत बाणासारखा तीक्ष्ण भासणारा विक्रम, सुडाची अग्नि म्हणजे विक्रम, साक्षात मदन म्हणजे विक्रम पडद्यावरचा राजा विक्रम, ३ तास ८ मिनिटांचा मालक विक्रम, धुलिकणही जड वाटावा इतका दुर्बळ होऊन दाखवणारा विक्रम, भारतीय चित्रपटसृष्टीतलं आश्चर्य विक्रम आणि भारतातल्या सर्वच अभिनेत्यांनी ज्याच्याकडून काही ना काही शिकावं, असा गुरू म्हणजे विक्रम! थोडक्यात ‘आय’चे सर्वच्या सर्व अर्थ ज्याला चपखल लागू पडतात, असा ‘आय’स्वरूप विक्रम!! त्याचा अभिनय शब्दांत बांधताच येणार नाही. ‘आय’च्या कित्येक दृश्यांत डोईच्या केसांपासून ते पायीच्या नखांपर्यंत रंगभूषेखाली झाकलेला आहे तो, परंतु तरीही त्याचे डोळे आणि देहबोली भावना तितक्याच तीव्रतेने पोहोचवतात!! काही काही दृश्यांमध्ये तर स्वत:लाच समजावून सांगावे लागते की, ‘हा विक्रमच आहे बरं का’!! गरज असेल तेव्हा तो चक्क अर्नॉल्डही भासतो आणि गरज असेल तेव्हा तो कस्पटासमानही भासतो! ‘रावण’ (२०१०) मध्ये त्याने स्वत:चेच पुनर्मुद्रण अत्यंत वाईट केले होते, ती एकमेव कमतरता त्याने ‘आय’द्वारे व्यवस्थित भरून काढलीये!! कुणाला जर ‘आय’ पाहाण्यासाठी असलेल्या शेकडों कारणांपैकी केवळ एकच कारण हवे असेल, तर मी आनंदाने रहमान आणि शंकरच्याही आधी विक्रमचे नाव घेईन! ‘आय’चे नेपथ्यकार टी. मुथ्थुराज यांच्या शब्दांत सांगायचं झालं तर, “विक्रम मानव नाहीच, विक्रम तर वरदान आहे परमेश्वराने दिलेलं”!!

    ‘आय’ पाहाताना समजतं की, का छायांकनकार पी. सी. श्रीराम यांना ‘बापमाणूस’ म्हटलं जातं! सुंदर दृश्ये तर त्यांच्या चित्रकातून (कॅमेरा) दैवी वाटतातच, परंतु साध्या साध्या चौकटींचेही त्यांच्या परिसस्पर्शाने सोने झाले आहे. ‘आय’ची थोडीशी गूढ, अरेषीय पद्धतीने चालणारी कथा इतरवेळी सामान्य प्रेक्षकाला कंटाळवाणी वाटूही शकली असती, परंतु पी. सी. श्रीरामचा चित्रक अखेरपर्यंत तुम्हाला खुर्चीशी खिळवूनच ठेवतो! आणि या दुधात साखर म्हणजे नेपथ्यकार टी. मुथ्थुराज! गेली साडेसहा वर्षे या सर्व संघासोबत कष्ट उपसणाऱ्या या माणसाने जर तीच मेहनत खऱ्याखुऱ्या स्थापत्यरचनेला वापरली असती, तर कित्येक पक्क्या वसाहती बांधून झाल्या असत्या! एक प्रमाणन मंडळाचं प्रमाणपत्र सोडलं तर ‘आय’ची अशी एकही चौकट नाही, ज्यात नेपथ्यरचनेचा वापर केलेला नाही. आणि विशेष उल्लेख व्हायला हवा तो ‘वेटा वर्कशॉप’ या आंतरराष्ट्रीय रंगभूषा कंपनीचा! हॉलिवूडलाही लवकर न झेपणाऱ्या या मंडळींकडून शंकरने एक भारतीय आणि त्यातही तमिळ चित्रपट करून घेतलाय, ही बाब माझ्यासारख्या तमिळ चित्रपटांच्या रसिकाला निश्चितच अभिमानास्पद आहे! त्या मंडळींनीही अशी काही जादू केली आहे की ‘आय’मधल्या विविध पात्रांच्या विविध प्रसंगांमधल्या रंगभूषेची आपण कल्पनेतही कल्पना करू शकणार नाही! अत्यंत सौंदर्यपूर्ण ते अत्यंत किळसवाणं या टप्प्यांत त्यांनी पाहून डोळे पांढरे व्हावेत अशी रंगभूषा केली आहे!!

    आणि रहमान! रहमानबद्दल काय बोलू!! साक्षात देवच आहे तो!! पार आत्म्याला हात घालणारी गीते तर त्याने दिलीच आहेत, परंतु आधीच परिपूर्णतेचा परिसस्पर्श लाभलेल्या चित्रचौकटींना त्याने आपल्या पार्श्वसंगीताद्वारे दिव्यतेच्या शिखरावर नेऊन ठेवलंय! तुम्ही जेव्हा ‘आय’ पाहायला जाल, तेव्हा पार्श्वसंगीताकडे विशेष लक्ष द्या हे मी आवर्जून सुचवू इच्छितो!! आणि त्याची दैवी गाणी पडद्यावर चितारावीत ती केवळ आणि केवळ शंकरनेच! नुसत्या गीतांच्या चित्रिकरणासाठी निर्माता व्हि. रविचंद्रन या गूढ माणसाने जितका पैसा ओतलाय, तितक्या किमतीत एखादा स्वतंत्र बिगबजेट चित्रपट बनू शकेल! अर्थातच शंकरचा द्रष्टेपणा तेवढा मोठा आहे आणि रहमानचं संगीत तितकं अनुभूतीसंपन्न आहे, म्हणूनच हे शक्य होऊ शकलंय हेही तितकंच खरं म्हणा! परंतु इर्शाद कामिलचे हिंदी गीतलेखन काही काही जागा सोडता, अगदीच वाईट झाले आहे. या पार्श्वभूमीवर तमिळ गीतांचे लेखन अतिशय सुंदर व अर्थपूर्ण आहे, हे मी आवर्जून सांगू इच्छितो! गीते ऐकू इच्छित असाल, तर तमिळ ऐका! त्यांची झिंग चढायला वेळ लागेल, परंतु एकदा चढली की आयुष्यभर उतरता उतरणार नाही ती!!

    सुरेश गोपी या अत्यंत गुणी मल्याळम अभिनेत्याने खरोखर डॉ. वासुदेवनच्या भूमिकेत प्राण फुंकले आहेत. संथानमची विनोदनिर्मितीतली अचूकता काही नव्याने सांगण्याची गोष्ट नव्हे! ऍमी जॅक्सन आणि उपेन पटेल यांना बरोब्बर ‘सुपरमॉडेल्स’च्या भूमिका देऊन शंकरने पुन्हा एकवार चित्रपटमाध्यमावरील त्याची पकड दाखवून दिली आहे! शुभा आणि शंकरची कथा अत्यंत अकल्पनीय असली, तरीही पटकथा शंकरच्या इतर चित्रपटांइतकी चटकदार झालेली नाही, हे कबूल केलेच पाहिजे. परंतु ‘आय’ हा मुळातच इतका जगाविरहीत प्रयत्न आहे आणि शंकरने पडद्यावर भव्यता या शब्दाला असे एक नवेच परिमाण दिले आहे; की पटकथेतल्या त्रुटी आपोआपच दुर्लक्षित होतात. शिवाय आपल्या इतर सर्वच चित्रपटांप्रमाणे शंकरने ‘आय’मधलेदेखील वैज्ञानिक तपशील अतिशय परिपूर्ण व विश्वसनीय ठेवले आहेत!!

    खरं तर, मी ही समीक्षा लिहित असेन तोपर्यंतच ‘आय’ने शंभर कोटींचा पल्ला पार केला असेल. त्याअर्थी ‘आय’ माझ्या समीक्षणाला जरादेखील बांधील नाही! परंतु भारतातल्याच एका वेगळ्या आणि श्रेष्ठतेच्या बाबतीत ज्याची तुलना केवळ हॉलिवूडशी व आशयसंपन्नतेच्या बाबतीत ज्याची तुलना केवळ आणि केवळ स्वत:शीच होऊ शकते, त्या तमिळ चित्रपटसृष्टीलाही वेगळा भासणारा हा अद्भुत प्रयत्न लोकांपर्यंत पोहोचवणे मला माझे कर्तव्य वाटते, म्हणून हा सारा लेखनप्रपंच! बाकी ‘आय’मधले एक पात्र (कोण ते मी सांगणार नाही!) सातत्याने भयानकतेची परिसीमा सांगितली तरी सार्थपणे ‘अधक्कम मेलऽ’ अर्थात ‘त्याहूनही भयंकर’ असे म्हणत असते! मी या एक-दिडहजार शब्दांच्या समीक्षणात ‘आय’च्या जबरदस्तपणाचा कणही पूर्णपणे पकडू शकलेलो नाही. तेव्हा कुणी जर मला विचारले की, “आय कसा आहे?”, तर मी त्याला या लेखानंतरही सांगेन ‘अदक्कम मेलऽ’!! तेव्हा जा आणि चित्रपटगृहाच्या भव्य पडद्यावर त्याहून शतपट भव्य भासणाऱ्या ‘आय’चा आस्वाद घेऊन या!!

    *४.८०/५

    — © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.vikramedke.com)

    image