..सत्यधर्माय दृष्टये!!

मोहनदास गांधी अत्यंत साधेपणाने राहायचे. उदा. – रेल्वेच्या तिसऱ्या वर्गातून प्रवास करणे, शेळीचे दूध पिणे, साध्या आसनावर बसणे वगैरे.. मात्र असे म्हटले जाते की – गांधींना देशात कुठेही रेल्वेप्रवास मोफत असायचा. ज्या रेल्वेतून त्यांना प्रवास करायचा असेल, त्या रेल्वेचा तिसऱ्या वर्गाचा एक डबा आसने काढून रिकामा केला जाई, तिथे साधी आसने टाकली जात. जरी तिसऱ्या वर्गाचा डबा असला, तरीही कार्यकर्ते सबंध डबा ताब्यात घेत – त्याअर्थी डबा ‘खाजगी’ होऊन जाई! तिथेच एका कोपऱ्यात गांधींची शेळी ठेवत. तिचीही चारा-पाण्याची व्यवस्था केली जाई. यात खरं-खोटं देवच जाणे. पण असं म्हणतात की, या सगळ्या संदर्भात सरोजिनी नायडू एकदा म्हणाल्या होत्या – “बापूंना गरीब आणि साधे ठेवणे हेच एक अतिशय ‘खर्चिक’ काम आहे”!

आज रामलीला मैदानाकडे जाताना अरविंद केजरीवालही सार्वजनिक वाहतुकीच्या बसने गेले. मात्र ज्यांनी टिव्हीवर त्यावेळची मुलाखत पाहिली असेल त्यांना एक गोष्ट नक्कीच लक्षात आली असणार की, ती सबंध बस “आआप”च्या कार्यकर्त्यांनी भरून गेली होती! थोडक्यात जरी सार्वजनिक वाहतूकीचे साधन असले तरीही त्याचा वापर “आआप”च्या खाजगी मालकीच्या वाहनासारखाच झाला. शपथग्रहणानंतर तर सचिवालयाकडे गाड्यांच्या ताफ्यातूनच गेले ना? सुरक्षाव्यवस्थाही होतीच की त्यावेळी! मग हे साधेपणाचे ढोंग कश्यासाठी? ‘मला सुरक्षा नको’ म्हणण्याची दांभिकता कश्यासाठी? मनात जे आहे तेच कृतीत दिसले तरच त्याला प्रामाणिकपणा म्हणतात ना? इथे तर गेले काही दिवस अरविंद केजरीवाल नुसते साधेपणाने राहाताहेत एवढेच नव्हे तर त्या साधेपणाची छायाचित्रे कशी प्रसिद्ध होतील याचीही (स्वत: केजरीवालकडून म्हणा वा ‘आआप’च्या कार्यकर्त्यांकडून म्हणा वा माध्यमांकडून) काळजी घेतली जात आहे.

तुम्ही शाहरुख खानला अभिनय करताना पाहिलंय कधी? त्याची देहबोली नीट निरखून पाहा. तो विनाकारण एखादा अवयव तरी हलवेल वा विनाकारणच बोलण्यात कंप तरी आणेल; जेणेकरून लोकांचं लक्ष सतत वेधलं जाईल. हे असुरक्षिततेचं लक्षण आहे. ‘उद्या प्रसिद्धीचा झोत माझ्यापासून लांब सरकला तर काय?’ – ही ती असुरक्षितता! केजरीवालना का प्रत्येकवेळी वेगवेगळी घोषवाक्ये लिहिलेल्या टोप्या सातत्याने घालाव्या लागतात? गेले काही दिवस सतत खोकला का बरं येतोय? एकतर हा स्वत:कडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न आहे; किंवा जर त्यांना खरोखर इतका काळ टिकणारा खोकला झाला असेल, तर त्यांनी एकदा एखाद्या चांगल्या डॉक्टरला तरी दाखवून घ्यावे (भले डॉ. कुमार विश्वासना दाखवा, पण दाखवा!)! २१ दिवसांपेक्षा जास्त काळ खोकला टिकला तर ‘टिबी’ असू शकतो म्हणे! तेव्हा उगाच सार्वजनिक ठिकाणी खोकून..! असो! शिवाय सतत आजारी, एरंडेल प्यायल्यासारखा चेहरा ठेवणे हे मुख्यमंत्र्याला तर शोभणारे नाहीच, परंतू ते ‘आम आदमी’चेही लक्षण नव्हे! ‘आम आदमी’ असा असतो का? ‘आम आदमी’ तर तो असेल, ज्याला आज त्या बसची खूप गरज होती, पण ती ‘आम’ मुख्यमंत्र्यांनी नेल्यामुळे त्याला नाहक टॅक्सीचा भुर्दंड पडला..! आणि देहबोलीचाच संदर्भ घेऊन बोलायला गेलं तर खरं सामर्थ्य आणि खरा साधेपणा माणसाला आतून शांत करणारा असतो. कधी पाहिलंय मनोहर पर्रिकरांना लक्ष वेधून घेण्याचे प्रयत्न करताना? साधेपणाचं भांडवल करताना? माणिक सरकारांना असे कोणते प्रकार करताना? नाहीच! आणि कधी पाहाणारही नाही तुम्ही! कारण एकदा भांडवल झालं की, तो साधेपणा, साधेपणा न राहाता ‘दांभिकता’ होऊन बसते!

बाकी रामलीला मैदानातला सोहळा आणि त्यावेळचं भाषण याबद्दल मी काहीच टिप्पणी करणार नाही. रामलीला मैदान प्राचीन काळापासूनच नाटकं करण्यासाठी प्रसिद्ध आहे. मैदानात उतरलं म्हटल्यावर मैदानाचा गुण तर लागणारच, नाही का!!

– © विक्रम श्रीराम एडके.
(लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी क्लिक करा — www.vikramedke.com)

image

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *