Category: Cinema

  • सुपरहिरो जॉनरवरील फ्रेश दृष्टीकोन : द बॉईज

    अनेक जण आपापल्या क्षेत्रांत शिखरावर पोहोचतात, सेलिब्रिटी होतात. इतके की त्यांचे चाहते असलेले आपण त्यांचे भक्त कधी बनून जातो, समजतही नाही. त्यांची प्रत्येक गोष्ट मग आपल्याला आवडू लागते. त्यांच्या चांगल्या गोष्टींचं बेफाट कौतुक केलं जातं आणि त्यांच्या चुकांचं कधीकधी आडून तर कधीकधी उघडपणे समर्थनही केलं जातं. त्यांच्यावर असलेली चाहत्यांची भक्तीच त्यांना देवाच्या दर्जाप्रत नेते आणि खरा देव पाहिलेला नसला म्हणून काय झालं, या देवाच्या भेटीची आस चाहत्यांना लागून राहाते. भेट होईपर्यंत ठिक असतं, पण त्याहून अधिक परिचय समजा वाढत गेला तर बहुतांश वेळी हाती एकच गोष्ट लागते, ती म्हणजे मोहभंग! कारण, ओळख वाढत गेली की लक्षात येतं की, ती सुद्धा आपल्यासारखीच माणसं आहेत, चुका करणारी आणि शेकडो दोषांनी भरलेली, स्वार्थी माणसे. त्यांच्यापैकी बहुतेकांचे पाय हे मातीचेच निघतात, अगदी तुमच्या-माझ्यासारखेच. विशेषतः चंदेरी दुनियेतील सेलिब्रिटींच्या बाबतीत हे अधिकच प्रकर्षाने जाणवते. तिथे त्यांची कला आणि त्यांचा इतर बाबतीतला वकूब यांच्यात फरक न करता आल्यास, मोहभंगाची जागा आघात सहजच घेऊ शकतो. वैयक्तिक पातळीवर असल्यास तो आघातही पचवता येईल एकवेळ, पण जर त्या तथाकथित सेलिब्रिटींचा स्खलनशील स्वभाव हा सबंध मानवतेलाच धोका बनला तर? कथेच्या बहुपटली कोशाच्या आत, अॅमेझॉन प्राईमच्या ‘द बॉईज’ या मालिकेचा मुख्य गाभा हा आहे!

    हे असं जग आहे, जिथे सुपरहिरोज खरे आहेत. ते अमेरिकेचं रक्षण करतात. पण एकटे-दुकटे अथवा समूहाने नव्हे, तर एखाद्या टॅलेण्ट-मॅनेजमेंट कंपनीसारखी त्यांना मॅनेज करणारी एक कंपनी आहे, ‘वॉट’; तिच्या माध्यमातून. ‘वॉट’कडे शेकडो सुपरहिरोज आहेत. अमेरिकेतील जवळपास प्रत्येक शहरासाठी एक सुपरहिरो आहे त्यांच्याकडे. पण त्यातही सगळ्यांत जास्त ‘मार्केट’ आहे ते ७ सुपरहिरोजना, ज्यांना म्हटलं जातं ‘द सेव्हन’! हे सगळे सुपरहिरोज अमेरिकेचं रक्षण करतात, पण स्वतःहून नव्हे तर सेलिब्रिटीजना जशा कॉलशीट्स दिल्या जातात तशा कॉलशीट्सच्या माध्यमांतून यांना मिशन्स दिली जातात. त्यांच्यावर सिनेमे निघतात, मालिका निघतात, कॉमिक्स निघतात इतरही शेकडो प्रकारच्या मर्चंडाईझ निघतात, त्या सगळ्यांची मुख्य लाभार्थी जरी वॉट असली, तरी या सगळ्या सुपरहिरोजना कंपनीतील त्यांच्या त्यांच्या शेअर्सच्या प्रमाणात पैसेसुद्धा मिळतात. अशी ही हजारो बिलियन डॉलर्सची कॉर्पोरेट इंडस्ट्री आहे.

    आता इंडस्ट्री आहे तिथे पैसा आहे आणि पैसा आहे तिथे पापसुद्धा आहेच! हे सगळे सुपरहिरोज बाह्यतः मानवतेचे अक्षरशः पुतळे आहेत, परंतु त्यांच्या आयुष्यात कुणी जसजसं डोकावतं तसतसं दिसतं की, वास्तव काहीतरी वेगळंच आहे. ज्याला कुणाला हे वास्तव समजू लागतं किंवा नुसता वास जरी लागतो, त्याचं काय होतं, हा एक वेगळाच विषय आहे. परंतु यातूनच त्या सुपरहिरोंच्या विरुद्ध संघर्ष उभा राहातो, ज्याचं नेतृत्व करतात सामान्य माणसे. एकीकडे महाशक्तीशाली सुपरहिरोज ज्यांना अफाट पैसेवाल्या कॉर्पोरेशनचा आणि अनेकानेक प्रभावशाली व्यक्तींचा पाठिंबा आहे आणि दुसरीकडे जवळपास काहीही संसाधनं नसलेली सामान्य माणसे यांच्यातील विषम, भावनिकरित्या गुंतागुंतीचा आणि जीवनाचे अनेक स्तर छेदून जाणारा संघर्ष ही ‘द बॉईज’ची कहाणी आहे.

    हल्ली गल्लोगल्ली वेबप्लॅटफॉर्म्स उदयाला आल्यामुळे वेबसीरीजचा उंदरांसारखा सुळसुळाट झालाय. अद्याप कोणतीच सेन्सॉरशिप नसल्यामुळे त्यांच्यात गलिच्छ भाषा आणि लैंगिकतेचा सुकाळ असतो, मग भले कथानकाची गरज असो वा नसो. सवंगतेवर प्रसिद्धी मिळवण्याची वृत्ती अशी काही आरामदायी होऊन बसते की, कथानकाकडे दुर्लक्ष होते आणि शिवीगाळ व नग्नताच धीटपणा समजले जातात. ‘द बॉईज’चे वैशिष्ट्य हे की, ते बोल्डनेस अर्थात धिटाईला एक पाऊल पुढे नेतात. त्यांची पात्रंही शिवीगाळ करतात. त्यांच्यातही खूप सारी नग्नता आहे. किंबहूना अनेक मालिका पाहाण्याची सवय असूनही त्यातील रक्तपाताची काही दृश्ये बघवणार नाहीत बहुतेकांना. पण या सगळ्या गोष्टी दुय्यम ठरतात. कारण एक, त्यांची कथा व मांडणी अतिशय सशक्त आहेत आणि मुख्य महत्त्व त्यालाच आहे. दोन, शिवीगाळ आणि नग्नता या दोन्हीही गोष्टी या मालिकेची खरीखुरी आवश्यकता आहेत, तरच त्यांना जी पात्रं आणि घटना उभ्या करायच्या आहेत त्यांचा आवश्यक तो प्रभाव पडू शकेल. उदाहरणार्थ, मालिकेची सुरुवातच एका महाभयंकर रक्तपाताने होते. पण तो रक्तपात महाभयंकर असतो, म्हणूनच पुढे घडणारे सगळे महाभारत आवश्यक होऊन बसते. किंवा त्यातील जी जी पात्रे शिव्या देतात, त्यांचे वैयक्तिक आयुष्य दुरुस्तीच्या पल्याड बिघडलेय हेच त्यातून दिसते. त्यांच्या जागी कुणीही व्यक्ती दुसरं काही बोलूच शकली नसती.

    पण मी जेव्हा धिटाईला एक पाऊल पुढे नेतात म्हणतो, तेव्हा मला फक्त नग्नता आणि शिवीगाळ अपेक्षित नाही. ही मालिका कथानकाच्या ओघात आसपासच्या अनेकानेक राजकीय, सामाजिक मुद्यांवर अतिशय धीट आणि तर्कसंगत भाष्य करते. ती कॉर्पोरेट कार्यप्रणालीच्या भावनाशून्यतेचा, डाव्या विचारसरणीच्या दांभिकतेचा, धर्मप्रसारासाठी अवलंबल्या जाणाऱ्या मार्गांचा, अतिरेकी-स्त्रीवादाच्या उथळपणाचा बुरखा टराटर फाडते. ती दहशतवाद्यांना जिहादी म्हणायला कचरत नाही आणि त्यातील स्त्रिया त्यांच्यावरील अत्याचारांना वाचा फोडतो म्हणता-म्हणता त्या घटनांचा स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करणाऱ्यांच्या विरुद्ध उभ्या राहायला घाबरत नाहीत. इतक्या उघडपणे ढोंगीपणाला फाट्यावर मारणारी दुसरी कोणती मालिका अलिकडच्या काळात क्वचितच आली असेल!

    मार्व्हल आणि डिसीची युनिव्हर्सेस सुरू झाल्यापासून गेल्या दशकभरात पन्नास-एक तरी सुपरहिरोपट आणि मालिका आल्या आहेत. त्यातील काही चांगले होते तर काही अतिशय टुकार. पण कसेही असो, आता कुठेतरी त्या दरवर्षी नेमाने येणाऱ्या सुपरहिरोपट आणि मालिकांचे अजीर्ण होऊ लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘द बॉईज’चं एक अतिशय ताजा आणि वेगळाच दृष्टीकोन घेऊन येणं अत्यंत सुखावह आहे. गंमत म्हणजे यातील सुपरहिरोंची पात्रे ही डिसीच्या पात्रांवरच बेतलेली आहेत. मालिका पाहाताना ते सहजच लक्षात येते. पण मालिकेतील त्याहून मोठ्ठी गोष्ट मात्र मार्व्हलवर बेतलेली आहे, कोणती ते तुम्हीच पाहून ठरवा. कामे सगळ्यांचीच जबरदस्त झाली आहेत परंतु त्यातही कार्ल अर्बन, जॅक क्वेड, अँथनी स्टार, टोमर कॅपोन, कॅरेन फुकुहारा, एलिझाबेथ श्यू, एरिन मोरियार्टी यांचा विशेष उल्लेख करावा लागेल.

    तुम्हाला वाटेल की, मी बोलता-बोलता काही स्पॉयलर्स दिलीयेत का? तर मी स्पष्टपणे सांगतो, नाही! ‘द बॉईज’चे वैशिष्ट्य हे की, तिच्या प्रत्येक भागात एक मोठ्ठा ट्विस्ट आहे आणि तिच्या पर्वाखेरच्या भागात तर एक भलामोठ्ठा ट्विस्ट आहे जो आगामी पर्वाचीच नव्हे तर सबंध मालिकेचीच दिशा बदलू शकतो. मग आता प्रश्न असा उद्भवतो की, ही मालिका सर्वश्रेष्ठ मालिकांच्या दर्जाची आहे का? तर पहिल्याच पर्वात तसं म्हणणं धाडसाचं ठरेल. त्यांनी त्यांचं दर्जात्मक सातत्य अखेरपर्यंत टिकवलं, तरच तसं म्हणता येईल. परंतु त्यांचं अवघ्या ८ च भागांचं पहिलंच पर्व मात्र कोणत्याही श्रेष्ठतम मालिकेइतकेच दर्जेदार आणि पुढे काय होईल ते वेड्यासारखं पाहायला लावणारं आहे, एवढं निश्चित. पुढच्या पर्वाची प्रतीक्षा राहील!!

    *५/५

    — © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

  • पर्सन ऑफ इंटरेस्ट

    तुम्हाला असं कधी वाटतं का की, आपल्या सभोवताली जे जग आपण पाहातो त्याच्या दृश्य पातळीच्या आतसुद्धा खूप काहीतरी आहे? किंवा, आसपासचं जग जरी सारखंच वाटत असलं तरीही त्यात काहीतरी बदल झालाय आणि तो बदल मनाला जाणवतोय पण तरीही त्यावर बोट ठेवता येत नाहीये? हे आणि असे आपल्या अस्तित्वावर आणि स्थानावरच प्रश्न उपस्थित करणारे प्रश्न पडले की जन्माला येतात कारस्थानांचे सिद्धांत अर्थातच कॉन्स्पिरसी थियरीज. त्यातले बहुतांशी निरर्थक असतात, पण काही खरेसुद्धा असतात. एक विशिष्ट कारस्थानाचा सिद्धांत घेऊन त्या भोवती कथा गुंफणे काही नवीन नाही. परंतु याच घासून गुळगुळीत झालेल्या समीकरणाला जेव्हा ‘नोलन’ नावाचा चलांक येऊन मिळतो तेव्हा सारे बीजगणितच बदलून जाते, काहीतरी अव्याख्येय, दैवी होऊन जाते. मी येथे बोलतोय ते ‘मेमेंटो’ (२०००) च्या कथेमागील आणि ‘द डार्क नाईट ट्रिलॉजी’ (२००५-१२), ‘द प्रेस्टीज’ (२००६) आणि ‘इंटरस्टेलर’ (२०१४) यांच्या पटकथांमागील अद्वितीय मेंदू जोनाथन नोलनबद्दल! आणि ते समीकरण म्हणजे जोनाथन नोलनच्या बुद्धीची सुरेख उपज ‘पर्सन ऑफ इंटरेस्ट’ (२०११-१६) ही सर्वांगसुंदर मालिका!!

    जोनाथनने त्याचा भाऊ व निर्विवादपणे या शतकातील सर्वोत्तम दिग्दर्शकांपैकी एक असलेल्या ख्रिस्तोफर नोलनसोबत केलेले काम तर विलक्षण आहेच. परंतु मी त्याचा खऱ्या अर्थाने फॅन झालो ते ‘वेस्टवर्ल्ड’ (२०१६ -) पाहिल्यानंतर. अरेषीय मांडणी, चित्रभाषेतूनही चित्रांच्या पलिकडचा संदेश पोहोचवणारी रचना, प्रश्न पडायला आणि उत्तरं शोधायला भाग पाडणारं कथानक, इंटेलिजंट तरीही अत्यंत भावस्पर्शी कथा, उच्चतम दर्जाचा अभिनय, एक जरी चौकट चुकली तरी पुढे काहीच समजणार नाही इतकी बांधीव पटकथा, सुरुवातीला विचित्र वाटणारं परंतु लक्ष दिलं तर गणित सुटल्यासारखा निखळ आनंद देणारं संपादन, अत्युच्च छायांकन, अर्थवाही संगीत, काळाशी केलेला खेळ व त्यातून तयार होणारा जगावेगळा प्रभाव आणि सगळं काही संपल्यावर आता आपल्यापुढे पसरलेल्या या विस्तीर्ण आयुष्याचं करायचं काय असं वाटायला लावणारी पोकळी निर्माण करण्याची क्षमता; असे खास ‘नोलन’च्या शैलीचे एकूण एक गुण त्यात होते. त्याच वेळेपासून ‘पीओआय’ ठाऊक होती मला. पण मी ती पाहायचे टाळायचो. का? याचं कारण होतं त्याचं कथाबीज!

    एक बेफाट पैसा असलेला आणि साक्षात बृहस्पतीच म्हणावा अशा बुद्धीचा अब्जाधीश हॅरोल्ड फिंच (मायकेल इमर्सन) एक मशिन बनवतो. ही मशिन कोणत्याही आतंकवादी हल्ल्याची पूर्वसूचना देऊ शकत असते. इतकेच नव्हे तर आतंकवाद्यांना लक्षावधी माणसांमधून वेगळे ओळखूही शकत असते. तो ही मशिन सरकारला देतो. हे करण्यासाठी अर्थातच त्या मशिनला सबंध देशावर नजर ठेवावी लागणार! या टेहळणीतून तिला फक्त आतंकवादी हल्लेच समजतात असं नाही, तर तिला इतर गुन्ह्यांचाही आधीच पत्ता लागतो, खास करून जीवघेणे गुन्हे! पण सरकारला या गुन्ह्यांना आधीच रोखण्यात रस नाही. त्यासाठी पोलिस आहेत. त्यांना रस आहे तो फक्त ९/११ नंतर पणास लागलेल्या अमेरिकेच्या सुरक्षिततेची काळजी करण्यात! फिंच ही मशिन सरकारला तर देतो, पण तिचा वाममार्गी वापर होऊ नये, असेही त्याला वाटत असते. शिवाय सगळ्याच नागरिकांवर सरकारने का होईना नजर ठेवणे, त्यांच्या क्षणोक्षणाची माहिती ठेवणे, हे बेकायदेशीरच! त्यासाठी फिंच एक व्यवस्था करतो. मशिन तिच्याकडे असलेली कोणतीच माहिती कधीच उघड करणार नाही, तर फक्त सर्वोच्च प्राधान्याच्या गुन्ह्यातील व्यक्तीचा सोशल सिक्युरिटी नंबर तेवढा देईल. तो गुन्हेगार आहे की गुन्ह्याचा बळी हे सुद्धा समजणार नाही, ते यंत्रणेने शोधायचं. मशिन जसे आतंकी हल्ल्याचे नंबर्स देते, ज्यांना रिलेव्हंट नंबर्स म्हटलं जातं, तसंच इतर गुन्ह्यांचेही नंबर्स देते, ज्यांना इर्रेलेव्हंट नंबर्स म्हटलं जातं. मशिन रोज रात्री सगळा डेटा, राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित काही भाग वगळता, पुसून टाकते, जेणेकरून तो कधीच कुणाच्याही हाती पडू नये. सरकारला इर्रेलेव्हंट नंबर्सशी काहीच देणेघेणे नाही, म्हणजे ते गुन्हे नाहीत का? आहेत की! अतिशय हिंसक गुन्हे आहेत ते. पण मग त्या लोकांचं काय करायचं? या साठी फिंच कुणाच्याही नकळत मशिनमध्ये बॅकडोअर प्रोग्रॅम करतो. सगळे इर्रेलेव्हंट नंबर्स त्याला मिळत राहातात. ते गुन्हे रोखण्यासाठी तो एक्स-सीआयए ऑपरेटिव्ह जॉन रीझला (जिम कॅव्हिएझेल) कामावर ठेवतो. आणि दोघं मिळून एकेका गुन्ह्याला रोखू लागतात.

    हे कथाबीज जेव्हा मला समजलं तेव्हा माझ्या मनात पहिला विचार आला तो हा की, अरे ही तर बॅटमॅनची स्टोरी! म्हणजे बॅटमॅन हा टेक्नॉलॉजिकल जिनियस बिलियनेयर आहे आणि तो त्याचा वापर करून वास्तवाच्या भूमीवरही खलनायकांना रोखतो. इथे त्यांनी काय केलंय, तर बॅटमॅनला दोन लोकांमध्ये विभागलंय. फिंच हा तंत्रज्ञानाचा जादूगार आहे तर रीझ हा मानवी शारीरिक ताकदीचा आविष्कार आहे. दोघं मिळून तेच करताहेत जे बॅटमॅन करतो! असं गिमिक बघण्याची माझी जरा सुद्धा इच्छा नसल्यामुळे मी ही मालिका बघणं अनेक वर्षे टाळलं. आणि जेव्हा मी ती पाहिली, तेव्हा मला एक गोष्ट पक्की समजली की मी एक नंबरचा मूर्ख होतो!

    पीओआयचं बीज बॅटमॅनसारखं नक्कीच आहे, पण तिची मांडणी ही बॅटमॅनपेक्षा अनेक कोस दूर आहे. किंबहूना पहिल्या काही भागांमध्ये काहीतरी विलक्षण धक्कातंत्र असलेला क्राईम-फायटिंग शो वाटणारी ही मालिका पहिला सीझन अर्धा व्हायच्या आतच इतक्या गहन प्रश्नांकडे व कथानकांकडे वळते की मेंदू चक्रावून जातो. आणि हे गूढाकाशात खोल खोल शिरणे जे सुरू होते ते थेट शेवटच्या सीझनच्या शेवटच्या भागाच्या शेवटच्या प्रसंगानंतरही सुरूच राहाते. आणि सांगतो! प्रत्येक भागात, होय प्रत्येक भागामध्ये किमान चार-सहा तरी मेंदूचा भुगा करणारे ट्विस्ट्स आहेत. किंबहूना जिथे कोणत्याही रहस्यमय मालिकेच्या भागाचे ट्विस्ट्स संपून रहस्य उलगडते त्याच्या पलिकडे त्या त्या भागाची आणि बहुतांशी वेळा सबंध मालिकेचीच मिती बदलून टाकणारा ट्विस्ट पीओआयमध्ये आहे! या बाबतीत तिची तुलना नोलानच्याच ‘मेमेंटो’शी होऊ शकते. ग़जिनीमुळे संजय रामस्वामीला एसटीएमएल झाला, त्याची कल्पना मेली; संजयने त्याचा बदला घेतला की सिनेमा संपतो. पण ‘मेमेंटो’ तिथे संपत नाही, तो त्याच्याही पुढे जाणारा एक ट्विस्ट देतो. तसेच ट्विस्ट्स पीओआयमध्ये पदोपदी आहेत! त्यामुळेच क्राईम-फायटिंग मालिका म्हणून सुरू झालेली पीओआय कधी टिव्हीवर प्रसारित झालेल्या सर्वश्रेष्ठ सायन्स-फिक्शन मालिकांपैकी एक होऊन बसते, याचा लक्ष न देणाऱ्याला पत्ताही लागत नाही!

    बरं हे सगळं अरेषीय (नॉन-लिनियर) मांडणीत बरं का! त्यामुळे काळाशी खेळ करण्याचा नोलान बंधूंचा छंद या मालिकेतही पुरेपूर दिसून येतो. गंमत म्हणजे, सिनेमात हे करणे त्या मानाने खूपच सोपे असते. कारण सगळे मिळून जास्तीत जास्त तीन-चारच तास लक्षात ठेवायचे असतात. पण १०३ भागांच्या मालिकेत हे लक्षात ठेवणे तर जाऊच द्या, लिहिणेसुद्धा केवढे कठिण असेल कल्पना करा! विशेष म्हणजे या मालिकेत एक सुद्धा प्रसंग उगाचच नाहीये. ४३ मिनिटांचा एक एपिसोड पण प्रत्येक एपिसोड चित्त्यासारखा वेगवान. आणि अतिशय प्रचंड वेगाने घटना घडत असूनही असे कधीच, अगदी एकदा सुद्धा जाणवत नाही की काहीतरी घाई झालीये. कारण, प्रत्येक प्रसंगाला त्या प्रसंगाची जितकी गरज आहे तितकाच वेळ देऊन मांडलेला! त्यामुळे ४३ मिनिटांचाच एक भाग पाहिला तरीही एखादा दोन-अडिच तासाचा चित्रपट पाहिल्याची भावना होते, इतका तो सशक्त आणि भरीव असतो! आणि असे एक-दोन नव्हे तर तब्बल १०३ एपिसोड्स आहेत पीओआयमध्ये! आणि सगळ्यांत विलोभनीय गोष्ट म्हणजे, कुठे थांबायचं हे त्यांना पक्कं ठाऊक आहे! या मालिकेत प्रत्येक पात्राला महत्त्व आहे. कोणतंच पात्र पोकळ नाही, तर प्रत्येकाला उद्दिष्टं आहेत, सकस बॅकस्टोरीज आहेत आणि त्यांच्या प्रत्येक क्रियेचा मालिकेच्या एकूणच कथानकावर काही ना काही परिणाम होतोय. फक्त तो कधी आणि कसा, हे प्रचंड अनपेक्षित आहे! मुख्य दोन पात्रेच नव्हे तर ताराजी हेन्सन (कार्टर), केव्हिन चॅपमन (फ़स्को), अॅमी अॅकर (रूट), साराह शाही (शॉ), एन्रिको कोलँतोनी (एलायास), जॉन ग्रीअर (जॉन नोलान) या आणि मालिकेतील एकूण एक पात्रांनी अनुपमेय सुंदर काम केलेय. एलायास आणि फ़स्को यांची पात्रे तर स्क्रिनरायटिंग करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने अभ्यासायलाच हवीत अशी झालीयेत!

    ही मालिका नुसती ट्विस्ट्सपुरतीच आहे का? तशी ती असती, तरीही ती आजवरच्या सर्वश्रेष्ठ मालिकांच्या यादीत कुठे ना कुठे नक्कीच असली असती. पण पीओआय तेवढ्यापुरतीच मर्यादित नाही. वर म्हटल्याप्रमाणे पहिला सीझन निम्मा व्हायच्या आतच ते त्यांच्या विषयांत इतके खोल खोल शिरू लागतात की विचार करता करतानाही आपला दम तुटू लागतो. वाटतं की हा, हे यांचं अंतिम स्थान आहे. आणि असं वाटे वाटेपर्यंतच मालिका त्याच्याही पलिकडच्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर चाचपू लागते. नोलनचे सिनेमे किती जरी तांत्रिकदृष्ट्या स्वर्गाहून सुंदर असले, तरीही ते का चालतात माहितीये का? कारण, त्यांत मांडलेले प्रश्न हे वैश्विक असतात! न्यूयॉर्कमधील एखाद्या माणसाला त्या चित्रपटातून जी संवेदना जाणवेल तीच अहमदनगरमधील एखाद्या माणसाला जाणवू देण्याची त्यांच्यात क्षमता असते, म्हणून त्याचे सिनेमे जगभरात चालतात. ते तांत्रिकदृष्ट्या जितके कौशल्यपूर्ण असतात, त्याहून जास्त त्यांच्या कथा भावनिकदृष्ट्या शक्तिशाली, हेलावून सोडणाऱ्या असतात. नेमकं हेच ही मालिका टिव्हीच्या क्षेत्रात करते. त्यामुळे ती प्रश्न विचारत जितकी खोल खोल जाऊ लागते तितकीच आपल्याला जास्त जास्त उत्कंठा तर वाटू लागतेच पण त्या सोबतच भितीसुद्धा वाटू लागते. कारण, त्यांनी विचारलेले, विचारत असलेले आणि विचारू पाहाणारे एकूण एक प्रश्न आपल्या जगाशी नव्हे नव्हे आपल्या अस्तित्वाशी निगडीत आहेत! जगाच्या वर वर दिसणाऱ्या छानशा आवरणाखाली काय चालू आहे याची त्यांनी त्यांच्या काल्पनिक विश्वात दिलेली उत्तरे ही आपल्याला खऱ्या विश्वात भिती वाटायला लावण्याइतकी सच्ची आणि शक्यतेच्या कोटीतील आहेत! त्यांची हाताळणी ही नोलनच्या नेहमीच्या अरेषीय शैलीसोबतच स्टिव्हन किंगच्या एखाद्या गूढकथेपासून (टेरा इनकॉग्निटा) ते ‘रन लोला रन’सारख्या (१९९८) एकाच घटनेच्या अनेक पैलूंवर प्रकाश पाडण्यापर्यंत (इफ-देन-एल्स) सातत्याने प्रयोगशील होत राहाते. आता या ट्विस्टच्या पलिकडचा ट्विस्ट सांगतो. हे सगळं चालू असतानाही मालिका त्यांची विनोदबुद्धी एका क्षणासाठीदेखील सोडत नाही! आणि सांगतो, ‘पीओआय’ ही त्या अपवादात्मक मालिकांपैकी आहे जिच्या अनेक एपिसोड्सनी आणि अनेक पात्रांनी (ते एका भागाव्यतिरिक्त परत कधीच येण्याची शक्यताही नसताना) माझ्या डोळ्यांतून वारंवार पाणी काढलंय. संवेदनशील असाल, तर पीओआयचा प्रत्येक एपिसोड भावनिकदृष्ट्या हलवून सोडणारा आहे!

    चांगल्या कथेचं महत्त्व केव्हा, तर त्यातील खलनायक सगळ्यांत चांगला असेल तेव्हा! पीओआयमध्ये एकच कुणी चांगला खलनायक नाही, तर चांगल्या खलनायकांची मालिकाच आहे. या बाबतीत तिची तुलना ‘गेम ऑफ थ्रोन्स’शी (२०११-१९) होऊ शकते. पण जीओटी नंतर नंतर पात्रपरिपोषाच्या बाबतीत पारच गंडलं. पीओआयचे खलनायक मात्र ओळीने एकाहून एक भयंकर आहेत. एक खलनायक बेफाट वाटत असतानाच कुणीतरी त्याच्याहूनही तुफान असा येतो की आधीचा अगदीच चिंधीचोर वाटू लागतो! मानवी मनाच्या इतक्या कंगोऱ्यांचा असा शोध क्वचितच कुणा टिव्ही मालिकेने घेतला असेल. पीओआयमधील प्रत्येक पात्राला अनेक स्तर (लेयर्स) आहेत आणि सुष्ट वा दुष्ट म्हणावं असं त्यांच्यात कुणीच नाही. किंबहूना कुणीतरी चांगलं-चांगलं वाटत असतानाच ते गपकन काहीतरी भयानक करून जातात आणि कुणीतरी अगदीच खलबुद्धीचा पुतळा वाटत असतानाच काहीतरी अनपेक्षित चांगलं करून जातात. या मालिकेचे सगळ्यांत मोठे वैशिष्ट्य जर कोणते असेल, तर ते हे की तिच्यात नग्नता नगण्य आहे आणि रक्तपात जरी असला तरीही रक्त वा बीभत्सपणा अगदीच क्वचित आहे.

    आजच्या नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम आणि टोरेण्टच्या युगात आपल्यासमोर हजारो मालिका उपलब्ध आहेत. त्यातील शेकडो दर्जेदारसुद्धा आहेत. पण आपल्या प्रत्येकाची अशी कोणती ना कोणती एकच मालिका असते जी सगळ्यांपेक्षा खास असते, सगळ्यांहून श्रेष्ठ असते. मी जीओटीचा केवढा मोठा चाहता आहे, हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. परंतु माझ्यासाठी ती खास मालिका, ती सर्वश्रेष्ठ मालिका मात्र ‘पर्सन ऑफ इंटरेस्ट’ आहे. या मालिकेने माझा सिनेमा, मालिका यांच्या तांत्रिक अंगांबद्दलचा, त्यांचे लेखन, दिग्दर्शन, छायांकन, संपादन, नेपथ्य, संगीत, बजेटच्या मर्यादेतही केले जाणारे दर्जेदार काम अशा अनेक बाबतींमधला दृष्टीकोनच बदलून सोडला. तुम्हालाही ती माझ्या इतकीच आवडेल अशी खात्री नाही देत मी. कारण, प्रत्येकाच्या संवेदना वेगळ्या असतात. पण मी खात्रीने सांगतो, तुम्हालाही ती प्रचंड आवडेल, भरून व भारून टाकेल आणि त्या सोबतच निर्वात वाटावं एवढं रितंदेखील करून सोडेल!!

    *५/५

    — © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा: www.vikramedke.com)

    टीप: ‘पर्सन ऑफ इंटरेस्ट’चे सगळे सीझन्स अॅमेझॉन प्राईमवर उपलब्ध आहेत.

  • किंचित भरकटलेला तरीही कमालीचा जबरदस्त: सुपर डिलक्स

    वेंबूचं (समँता) लग्न मुगिलनशी (फ़हाद फ़ासिल) झालंय. पण ती अजूनही तिच्या जुन्या प्रियकरांपैकी एकाला विसरलेली नाहीये. एके दिवशी ती नवरा घरी नसताना प्रियकराला बोलावून घेते आणि एक अनपेक्षित गडबड होते. त्याच वेळी नवरासुद्धा घरी येतो आणि गोष्टी अजूनच वेगळं वळण घेतात. माणिकम (विजय सेतुपती) हा जवळ जवळ साडेसात वर्षांनंतर घरी येणार म्हणून त्याची बायको (गायत्री शंकर) आणि सगळंच कुटूंब खुश आहे. आता इतक्या वर्षांनंतर घरी येणाऱ्या माणसात थोडा फरक तर पडणारच ना? पण माणिकम मात्र अंतर्बाह्य बदललेला असतो. अगदी शब्दशः! किशोरावस्थेतील तीन-चार पोरं आहेत. एकाच्या घरी कुणी नाही म्हटल्यावर ते भाड्याने सिडी आणून थोडीशी मजा करायचं ठरवतात. त्यातल्या एकाला भूतकाळाबद्दल वेगळंच काही तरी समजतं आणि रागाच्या भरात त्याच्या हातून घडू नये ते घडतं. त्याच्या वडलांची (मिस्किन) तर अजूनच वेगळी तऱ्हा. त्यांनी स्वतःचाच एक पंथ स्थापन केलाय. अडनिड्या वयात भयंकर अडचणीत सापडलेला मुलगा आणि भौतिक जगात निष्क्रिय नवरा यांच्या कात्रीत आईचं (रम्या कृष्णन) अक्षरशः भजं झालंय!

    त्यागराजन कुमारराजाच्या ‘सुपर डिलक्स’मधील या तीन कथा. तसं पाहायला गेलं तर त्यांचा एकमेकांशी काही एक संबंध नाही. त्या एकमेकींमध्ये गुंततात असं नाही आणि समांतर जातात म्हणावं तर तसंही नाही. त्या काही काही विवक्षित वेळी एकमेकींना छेदून जातात आणि एकमेकींवर परिणाम करतात, हे मात्र निश्चित. भौतिकशास्त्राचा तो सिद्धांत नाही का, फुलपाखरू परिणाम; ज्यात सगळ्या गोष्टी एकमेकींवर अवलंबून असतात आणि एखाद्या आखीव व अरेषीय संस्थेच्या प्राथमिक स्थितीतील साधासाच बदल सबंध संस्थेवरच खूप मोठा परिणाम घडवून आणतो? त्या बटरफ्लाय इफेक्टचं चपखल उदाहरण म्हणजे ‘सुपर डिलक्स’. आणि हा वैज्ञानिक संदर्भ घेऊन मी उगाचच स्वतःला हुशार दाखवत या सिनेमाला विज्ञानपट ठरवू इच्छितोय, असं नाही बरं का. उत्तरार्धात चित्रपटामध्ये खरोखरच साय-फायच्या काही घटकांचा समावेश होतो!

    मागच्या परिच्छेदात एवढं जडजंबाल लिहिल्यावर साहजिकच कुणालाही वाटेल की मग हा त्या रटाळ, कलात्मकछाप चित्रपटांच्या वर्गातला आहे का? तर मी स्पष्टपणे सांगतो की, गेल्या अनेक दिवसांत मी थिएटरमध्ये चित्रपट पाहाताना क्वचितच एवढा हसलोय. ‘सुपर डिलक्स’ शेवटपर्यंत कमालीचा विनोदी आहे. अगदी चांगल्या अर्थाने आहे. त्यांच्या तिन्ही कथा अतिशय वेगळ्या धाटणीच्या आहेत, अत्यंत संवेदनशील आहेत आणि त्या समाजातल्या वेगवेगळ्या मुद्यांना व्यवस्थित स्पर्श करतात. इतके असूनही त्यांनी विनोदी शैली कायम राखलीये. एवढी की, काही प्रसंगांत त्या त्या प्रसंगाचं गांभीर्य कमी होऊ न देताही दिग्दर्शक आपल्याला हसावं की रडावं हा प्रश्न पडायला भाग पाडतो.

    इतका गुंतागुंतीचा चित्रपट लिहिणं हे एका व्यक्तीला क्वचितच जमण्यासारखं आहे. ‘सुपर डिलक्स’ लिहिलाय चार जणांनी. मिस्किन, नालन कुमारसामी, नीलन के. शेखर आणि त्यागराजन कुमारराजा. चौघेही दिग्दर्शक असल्यामुळे त्यांनी चित्रभाषा संहितेत अचूक उतरवलीये. आणि संहितेतील चित्रभाषा पी. एस. विनोद आणि निरव शाह या दोघा जबरदस्त छायाकारांनी अतिशय ताकदीने पडद्यावर अनुवादलीये! मध्यांतराचा प्रसंग तर एवढा कमाल जमलाय की बासच!! पण चार जणांचं डोकं लागल्यावर ते चार दिशांना जायलाही वेळ लागत नाही. मध्यांतरानंतर चित्रपट काही काळासाठी पूर्णपणे भरकटतो. इतका वेळ वास्तववादी अधिक विनोदी असणाऱ्या चित्रपटात काही अतर्क्य घटक समाविष्ट होतात. कथानकाचा वेग मंदावतो. शेवटी सगळे तुकडे जागेवर बसण्यासाठी बरीच ओढाताण होते. इतका वेळ संयतपणे होत असलेली मांडणी एकाएकी तात्त्विक प्रवचने देणारी व भाषणबाज होत जाते आणि एक चांगला नव्हे तर खूपच जास्त चांगला चित्रपट मास्टरपीस होता होता राहून जातो. त्याचं स्वज्ञानी असणंही तात्कालिकच राहातं मग!

    पण या ही परिस्थितीत चित्रपटातल्या पात्रं हे वाहून जाणारं तारू समर्थपणे मार्गी लावतात. विजय सेतूपती हा माणूस अक्षरशः सोनं आहे सोनं! आणि तो सध्या ज्या कोणत्या चित्रपटाला हात लावतो त्याचंही सोनंच करून सोडतोय. प्रचंड ताकदीचा आणि तरीही स्वतःच्या मर्यादा पूर्णपणे ठाऊक असलेला, असे दोन्हीही दुर्मिळ गुण अंगी असणाऱ्या दुर्मिळ अभिनेत्यांपैकी एक आहे तो. आपल्या ताकद आणि मर्यादेच्या चौकटीत असा काही तुफान खेळतो तो की, काय सांगू! या चित्रपटात त्याने वापरलेला बोलण्याचा पोत आवर्जून ऐका. पण इथे विजय सेतूपतीच्या मदतीला निदान रंगभूषा आणि वेशभूषा तरी आहेत. दोन्हींपैकी कशाचीच साथ नसतानाही खरी मजा आणलीये ती फ़हाद फ़ासिलने. मलयाळम चित्रपटांच्या चाहत्यांना हा केवढा अफाट अभिनेता आहे हे पक्कं ठाऊक असेल. इथे तो त्या अफाट असण्याच्याही खूपच पुढे निघून जातो! विजय सेतूपतीने श्रेष्ठतम काम केलंय आणि फ़हादने त्याच्यापेक्षाही चांगलं काम केलंय, एवढंच सांगतो! या दोघांच्या खालोखाल भूमिकेत जान आणलीये ती रम्या कृष्णनने. तिची भूमिका काही फार मोठी नाही. पण जी आहे ती तिने एवढी जबरदस्त निभावलीये की विचारता सोय नाही. समँता तर अभिनेत्री कमाल आहेच. फक्त फ़हादसमोर किंचित फिकी वाटते, एवढंच. पण दोन व्यक्तींचा मात्र विशेष उल्लेख करावासा वाटतो. एक म्हणजे विजय सेतूपतीच्या मुलाचे काम करणारा लहानगा. दुर्दैवाने मला त्याचे नाव ठाऊक नाही. आणि दुसरी व्यक्ती म्हणजे एस. आय. बर्लिनची भूमिका करणारा भगवती पेरुमाळ. बोलणं, हावभाव वगैरे तर आहेच, पण एखाद्या फ्रेममध्ये नुसत्या अस्तित्वानेसुद्धा किळस आणतो हा माणूस! या सगळ्यांनी चित्रपट तोलून तर धरलाच आहे, परंतु त्याचबरोबर त्याचं मनोरंजन-मूल्यसुद्धा अत्युच्च दर्जाचं राखलंय. पात्रांची नावंही सूचक वाटावीत अशी शंका घ्यायला जागा आहे. असा हा काहीसा भरकटलेला पण तरीही वेगळ्या वाटेवरचा अतिशय मजेदार चित्रपट त्याची वेगळी कथा, चलाख मांडणी आणि दैवी अभिनय या गोष्टींसाठी पाहायलाच हवा असा आहे!!

    *३.७५/५

    — © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

  • शक्तीशाली पात्रावरचा दुबळा चित्रपट : कॅप्टन मार्व्हल

    “A hero can be anyone, even a man doing something as simple and reassuring as putting a coat on a young boy’s shoulders to let him know that the world hadn’t ended”. नोलनच्या ‘द डार्क नाईट राईज़ेस’मधील (२०१२) श्रेष्ठतम संवादांपैकी एक असा हा संवाद. नायक किंवा नायिका कुणाला म्हणावं याची साधी-सोपी तरीही गहन अशी परिभाषा सांगणारा. या संवादाचं किंचितसं सामान्यीकरण केलं तर काय हाती येतं? नायक किवा नायिका कुणाला म्हणावं, तर ज्या व्यक्तीच्या ह्रदयात मानवता भरलेली आहे आणि गरज पडेल तेव्हा जी व्यक्ती त्या मानवतेला अभिव्यक्त करायला कचरत नाही, अशी व्यक्ती! मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा नुकताच प्रदर्शित झालेला २१वा चित्रपट ‘कॅप्टन मार्व्हल’ नेमक्या याच आघाडीवर तोकडा पडतो.

    चित्रपटाची सुरुवात होते ती क्रींच्या ‘हाल’ नावाच्या ग्रहावर. उदात्त योद्ध्यांचा हा ग्रह. त्यांच्यापैकी एक असते व्हिर्स (ब्री लार्सन). या ग्रहाची सत्ता सुप्रिम इंटेलिजन्स नामक शक्ती चालवते. ही शक्ती प्रत्येकाला ‘भाव तसा देव’ न्यायाने वेगवेगळी भासत असते. व्हिर्सला सातत्याने एकसारखीच स्वप्नं पडत असतात. त्यात दिसणाऱ्या व्यक्ती, घटना यांपैकी कशा कशाचीच तिला काही एक माहिती नसते. एवढंच नाही तर तिला सुप्रिम इंटेलिजन्सदेखील त्या स्वप्नातीलच एका व्यक्तीच्या स्वरूपात दिसते. लवकरच व्हिर्स ही त्यांच्या ग्रहाचं ज्या स्क्रल सभ्यतेशी सातत्याने युद्ध सुरू असतं, त्या युद्धातील एका अभियानावर जाते. गोष्टी चुकतात आणि व्हिर्स येऊन पडते ‘प्लॅनेट सी-५३’ अर्थात, पृथ्वीवर! पृथ्वीवर एकापाठोपाठ एक घटना घडू लागतात आणि व्हिर्ससमोर तिचा भूतकाळ साऱ्या दडलेल्या रहस्यांसह उभा राहातो. यातूनच व्हिर्स तथा कॅरोल डेन्व्हर्स बनते, शक्तीशाली कॅप्टन मार्व्हल!

    हे सारे वाचायला किती रंजक वाटते ना? पाहाताना नाही वाटत! का? कारणं बरीच आहेत. एक तर ही आगळीवेगळी कथा लिहिताना अतिशय घासूनघासून गुळगुळीत झालेल्या चौकटबद्ध रितीने लिहिलेली आहे. इतकी की आपण कोणतीही घटना घडण्याच्या ५-१० मिनिटं आधीच सांगू शकतो, नेमके काय घडणार आहे ते! क्लिषेज़ ठासठासून भरलेले आहेत चित्रपटात. त्यात दुसरी भर म्हणजे अॅना बोडेन आणि रायन फ्लेक या द्वयीचे दिग्दर्शन इतके काही नीरस आहे ना की, सगळी मजाच निघून जाते. ब्री लार्सन चित्रपटाची नायिका आहे. साधीसुधी नायिका नाही, तर मार्व्हलच्या पहिल्यावहिल्या ‘फिमेल सुपरहिरो लेड’ चित्रपटाची नायिका! तिचे पात्र कॅप्टन मार्व्हलदेखील साधे नाही, तर मार्व्हल युनिव्हर्समधील सर्वाधिक शक्तीमान पात्रांपैकी एक! इतके असून तिने काय केले? ती बनली चित्रपट कंटाळवाणा वाटण्याचं तिसरं महत्त्वाचं कारण! “..आणि डॉ. काशिनाथ घाणेकर”मधील सुमित राघवनच्या तोंडी असलेला “चेहरा असाच” संवादाचं जिवंत रूप म्हणजे ही ब्री लार्सन! चेहऱ्याची घडी बिघडली तर परत लाँड्रीवाल्याकडे पाठवायला लागेल या भितीमुळेच की काय, तिने बहुतांश वेळेस चेहऱ्यावर सुरकुतीसुद्धा पडू दिलेली नाही. कित्येक पंचलाईन्ससुद्धा तिच्या तोंडी सपाट वाटतात. ती पडद्यावर सुंदर दिसते, पण मार्व्हलचीच नताशा रोमनॉफ जशी इन्स्पायरिंग वाटते, तशी चुकूनसुद्धा वाटत नाही. उलट दिखाऊ वाटते! या बाबतीत तिच्या इतकाच दोष लेखक-दिग्दर्शकांचासुद्धा आहे. सबंध चित्रपटच बऱ्याच तथाकथित उदात्त मुद्यांवर दिखाऊ भूमिका घेतो आणि पात्रांनाही घ्यायला लावतो. चित्रपटांना काहीतरी राजकीय वगैरे धोरण असेल, तर हरकत नाही; पण तुमचे धोरण त्या कथेशी एकरूप करता नाही आले तर ते दिखाऊ आणि उथळच वाटते. भूमिका नीट लिहिल्या-मांडल्या न गेल्यामुळे म्हणा वा नीट न वठवल्यामुळे म्हणा, कॅरोल डेन्व्हर्स अर्थात कॅप्टन मार्व्हल ही चुकूनही डायना प्रिन्स अर्थात वंडर वुमनच्या तोडीची वाटत नाही.

    जवळजवळ १२४ मिनिटं चालणाऱ्या चित्रपटात मोजकेच प्रसंग निर्भेळ आनंद देतात. एक म्हणजे मार्व्हलचा लोगो येतो तो. तिथे त्यांनी काय मजा केलीये, ते चित्रपट पाहाताना आवर्जून पाहा. दुसरा म्हणजे स्टॅन-लीचा मरणोत्तर कॅमिओ. सबंध चित्रपट ज्या दोनच माणसांमुळे सहन होतो ते म्हणजे अत्यंत गुणवान अभिनेता सॅम्युअल जॅक्सन आणि दुसरा बेन मेंडेल्सन. यांपैकी सॅम्युअल एल. जॅक्सन तर एकमेवाद्वितीय आहेच, परंतु मेंडेल्सनला उत्तरार्धात जरासा वाव मिळताच त्यानेही त्याचे सोने केलेय. पण चित्रपटाची सगळ्यांत भारी गोष्ट जर कोणती असेल, तर ती आहे एक मांजर! या मांजराच्या एकही संवाद नसलेल्या पात्राने तिच्या वाट्याला आलेले जवळजवळ सगळेच प्रसंग शब्दशः खाऊन टाकलेयत. असा स्क्रिन-प्रेझेन्स मुख्य नायिकेलाही तिच्या अंतिम रूपांतर प्रसंगाचा अपवाद वगळता साधलेला नाही!

    सगळ्यांत सुरुवातीला जो नोलनचा संवाद दिलाय ना, तो दिसायला साधा असला तरीही हिरोईझमप्रधान चित्रपटांसाठी अक्षरशः वस्तुपाठ म्हणावा असा आहे. ‘कॅप्टन मार्व्हल’मध्ये लेखक-दिग्दर्शक त्यांच्या नायिकेला वेगवेगळ्या दिखाऊ धोरणांच्या बाजूने उभे करताकरता नेमके तिला मानवतेच्या बाजूने उभे करायलाच विसरले. म्हणजे ती बोलते मानवता वगैरे, पण नुसती बोलतेच. ते काही चित्रपटात तिच्या कॅरेक्टरचं मोटिव्हेशन ठरत नाही. यामुळेच चित्रपट सगळ्यांत जास्त अडखळतो. तिच्या भूतकाळातील प्रसंगही इतके जेमतेम दाखवलेयत आणि जे दाखवलेयत ते ही असे उथळपणे हाताळलेयत की, तिच्या पात्राबद्दल प्रेक्षकांना सहानुभूती तर सोडाच, साधी अनुभूतीदेखील वाटत नाही. या गोष्टीसाठी नोलनने ‘बॅटमॅन बिगिन्स’मध्ये (२००५) केवढा वेळ दिला होता, आठवा! आणि नोलनच कशाला, कोणताही चांगला सुपरहिरो-ओरिजिन चित्रपट घ्या, कथा, कादंबरी, कॉमिक्स किंवा मालिका घ्या. त्या प्रत्येकात त्या त्या नायक-नायिकेचं पूर्वायुष्य, त्या व्यक्तीच्या हिरो बनण्यामागच्या प्रेरणा, त्या व्यक्तीचा संघर्ष यांना पुरेसा वेळ दिला तरच नंतर त्या हिरोबद्दल आपल्याला ममत्त्व वाटते. पूर्वायुष्य जितकं ताकदवान तितकीच त्या नायकाबद्दलची सहानुभूती अधिक! इथे हा चित्रपट कॅप्टन मार्व्हल कशी अस्तित्वात आली ते सांगतो, पण कॅरोलच्या आयुष्यात, तिच्या संघर्षात, तिच्या सुख-दु:खात, तिच्या भावविश्वात पुरेसं डोकावतच नाही. त्यामुळे आपण चित्रपटगृहातून बाहेर पडताना कॅप्टन मार्व्हलच्या ताकदीची स्तुती करतो, पण जी आपुलकी आपल्याला मार्व्हलच्या इतर कोणत्याही अगदी दुय्यम पात्रांबद्दलसुद्धा वाटते, ती कॅप्टन मार्व्हलबद्दल वाटत नाही, हे चित्रपटाचं अपयश आहे. नि:संशय हा चित्रपट भरपूर पैसा कमावेल, पण तो चांगला चित्रपट म्हणून नव्हे तर मार्व्हलच्या आधीच्या सुमारे दिड डझन चित्रपटांची पुण्याई म्हणून! ती बाजूला काढली तर कॅप्टन मार्व्हल हा निव्वळ एका शक्तीशाली पात्रावर बेतलेला दुबळा चित्रपट बनून राहातो. मिड क्रेडिट सीनसुद्धा या चित्रपटापेक्षा ‘अँटमॅन अँड द वास्प’चा (२०१८) जास्त टिझिंग होता. थोडक्यात “एंडगेम”च्या उंबरठ्यावर प्रदर्शित होऊनही ‘कॅप्टन मार्व्हल’ कोणत्याच बाबतीत विशेष काहीही देत नाही!

    *२/५

    — © विक्रम श्रीराम एडके

    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

  • मृद्गंधी झुळूक : गीता-गोविंदम

    विजय गोविंद (विजय देवेरकोंडा) तरुण प्राध्यापक आहे. कॉलेजमध्ये, खासकरून मुलींमध्ये पॉप्युलर आहे. पण त्याला मात्र हवी आहे एखादी सुसंस्कृत आणि पारंपारिक ललना! तशी ती त्याला दिसतेसुद्धा, गीताच्या (रश्मिका मांदण्णा) रुपात. किती घासून घासून गुळगुळीत झालेली पार्श्वभूमी आहे नाही? क्लिषे अगदी! परंतु याच क्लिषेच्या पायावर उभा राहिलेला “गीता गोविंदम” नावाचा २ तास २८ मिनिटे लांबीचा चित्रपट तुम्हाला अक्षरशः एका क्षणासाठीही बोअर करत नाही!

    बॉलिवूडचा आणि त्यांचं अनुकरण करणाऱ्या मराठी इंडस्ट्रीचाही काही प्रमाणात ‘आधुनिकता म्हणजे कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळणं’ असा समज आहे. तमिळ इंडस्ट्री ही त्यांच्या वेगळ्या मांडणीसाठी ओळखली जाते तर मलयाळम इंडस्ट्री त्यांच्या वेगळ्या विषयांसाठी. परंतु तेलुगू इंडस्ट्री अशी आहे जी प्रेमकथा, कौटुंबिक मनोरंजन अश्या हल्ली दुर्मिळ होत चाललेल्या विषयांना पडद्यावर अतिशय सुरेखपणे मांडते. सिद्धार्थ आणि जेनेलियाचा “बोम्मारिल्लू” अथवा अल्लू अर्जुनचा “आर्या” पाहिलेले किंबहूना विजय देवेरकोंडाचाच “पेल्ली चुपूलू” पाहिलेले माझ्या मताशी सहजच सहमत होतील. अगदी त्याच रांगेत “गीता गोविंदम”सुद्धा येतो.

    सबंध चित्रपटभर नितळ विनोदाची पखरण आहे. परंपरेचा सन्मान आहे आणि कुटूंबाला प्राधान्य आहे. आणि तरीदेखील जागोजागी खटकेबाज ट्विट्ससुद्धा आहेत! बॉलिवूडवाल्यांची अडचण ही आहे की, ते ना धड भारतीय मुळं घट्ट धरून ठेवू शकताहेत ना त्यांच्या पाश्चात्यांकडे पसरवलेल्या फांद्यांवर फुलं उमलताहेत. याउलट दक्षिणेची मुळं भारतीय संस्कृतीत घट्ट आहेत. “गीता गोविंदम” पाहाताना ते पदोपदी जाणवतं. आणि तरीही आधुनिक हाताळणीमुळे तो आजच्या पिढीचाच चित्रपट वाटतो. याचे श्रेय लेखक आणि दिग्दर्शक परशुरामला दिलेच पाहिजे.

    गोपी सुंदर या संगीतकाराला तुम्ही ऐकलेय का? नसेल, तर तुम्ही एका खूप मोठ्या ठेव्याला मुकताहात. हिंदीतील तीच ती टेम्प्लेटछाप पंजाबी घुसडलेली किंवा बद्धकोष्ठ झाल्यासारख्या आवाजाच्या गायकांनी गायलेली किंवा जुन्या गाण्यांवर पाशवी अत्याचार केलेली गाणी ऐकून कंटाळला असाल, तर या सुरेल संगीतकाराच्या “चार्ली”, “बंगलोर डेज”, “उस्ताद हॉटेल” वगैरे एकाहून एक सुंदर चित्रपटांची गाणी ऐकाच. तशीच “गीता गोविंदम”ची गाणीसुद्धा ऐका. चित्रपट माध्यमाच्या चौकटीत राहूनही केवढं जिवंत संगीत तयार करता येतं याचा वस्तुपाठ आहेत ही गाणी. चित्रपटाच्या यशात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

    तसाच सिंहाचा वाटा आहे विजय देवेरकोंडाचा. फारशी मोठी पार्श्वभूमी नसलेल्या या पोराने गेल्या तीन वर्षांत “पेल्ली चुपूलू”, “अर्जुन रेड्डी” आणि हा असे तीन ब्लॉकबस्टर दिलेयत. त्याचा अभिनय अक्षरशः घायाळ करणारा आहे! आवडत्या मुलीला अप्रोच करताना झालेली एकच चूक कायमची भोगणाऱ्या परंतु मुळात सरळ स्वभावाच्या विजयची भूमिका त्याने कमालीची सुंदर साकारलीये. ‘कर्नाटका क्रश’ म्हटली जाणारी रश्मिकाही गीता म्हणून अप्रतिम भासते. “बाहूबली – द कन्क्लुजन”मधील कुमारवर्माच्या भूमिकेने आपल्याकडे प्रसिद्ध झालेला सुब्बाराजू त्याच्या भूमिकेत चपखल शोभतो. आणि तुमच्याकडे जर कौशल्य असेल तर भूमिकेची लांबी वगैरे गोष्टी अंधश्रद्धा असतात, हे वेन्नेला किशोर त्याच्या छोट्याशाच भूमिकेतून सहज सिद्ध करतो. पाहुण्या भूमिकेत का होईना, पण नित्या मेनन आणि अनु इमॅन्युएलला पाहून अतिशय छान वाटते. अवघ्या ५ कोटीत बनलेल्या या चित्रपटाने केव्हाच १०० कोटींचा आकडा ओलांडलाय. खरोखरीच “गीता गोविंदम” आजकालच्या विसविशीत कलाकृतींच्या काळात पुन्हापुन्हा अनुभवाव्याश्या मृद्गंधी झुळुकेसारखाच आहे!!

    — © विक्रम श्रीराम एडके

    *४/५

  • अपेक्षाभंग करणारा : मणिकर्णिका

    १८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील झाशीच्या राणीचे स्थान केवळ मराठीजनांसाठीच नव्हे, तर सबंध भारतीयांसाठीदेखील कायमच गौरवाचे राहिले आहे. राणीवर आजपर्यंत खूप सारे साहित्य लिहिले गेले, मालिका बनल्या, चित्रपटही बनले. परंतु जेव्हा के. व्ही. विजयेंद्र प्रसाद, प्रसून जोशी, राधाकृष्ण जगर्लामुडी आणि कंगना राणावतसारखे दिग्गज या विषयासाठी एकत्र आले तेव्हा बनणारी कलाकृती निश्चितच वेगळ्या दर्जाची असणार होती. पण बुद्धीमंतांचा एक दोषच असतो की, बरेचदा ते एकत्र आल्यावर त्यांच्या बुद्धीच्या बेरजा होण्याऐवजी एकमेकांना छेद देऊन भागाकार तेवढा होऊन बसतो. माझ्या दृष्टीने ‘मणिकर्णिका’मध्येही तेच झाले.

    सुरुवातीपासूनच कंगना आणि क्रिशमध्ये दिग्दर्शनावरून वाद होते, हे सर्वश्रृत आहे. कोण चित्रपटाची माती करत होतं आणि कुणी कोणते प्रसंग दिग्दर्शित केले याबद्दल दोघांचेही वेगवेगळे दावे आहेत. परंतु आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या दाव्यांना फारसा काही अर्थ नाही, कारण जवळपास सगळीच दृश्ये सारख्याच प्रमाणात दिशाहीन वाटतात. चित्रपट एका चांगल्या बिंदूवर सुरू होतो आणि त्यानंतर सतत कसली तरी घाई असल्यासारखा पडूच लागतो. अधूनमधून काही काळ तो वर उचललाही जातो, पण दुर्दैवाने तसे प्रसंग कमीच येतात. बरं त्यांना मुद्यावर येण्याची घाई आहे म्हणावं, तर ते ही होत नाही. मुद्याच्या आजूबाजूला घुटमळणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी घडत राहातात, पण मुद्दा काही फारसा येत नाही. आणि जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा तो इतक्या निष्काळजीपणे हाताळलाय की, त्याचे गांभीर्य नुसतेच जाणवते पण त्याची अनुभूती काही येत नाही. चित्रपट ऐतिहासिक सत्यतेचा दावा करत नाही, हे समजून घेण्यासारखे आहे. परंतु चित्रपटाच्या सुरुवातीलाच इतिहासाच्या अभ्यासकांचा सल्ला घेतल्याचे व इतरही काही कथा-लोककथांचा आधार घेतल्याचे सांगणाऱ्या चित्रपटाला राणीचे आडनाव नेवाळकर होते एवढी साधी गोष्टही समजू नये? चित्रपटात अनेकदा नवलकर असा उल्लेख आहे! हे एकीकडे तर दुसरीकडे झलकारीबाई आणि क्वचित राणी यांचे आयटम साँग टाकता? मग भन्साळी आणि तुमच्यात फरक काय राहिला? पात्रांचा स्वभाव, त्यांचं आयुष्य आणि त्यांच्या मौजेच्या कल्पना दाखवण्याचा एवढा एकच मार्ग बॉलिवूडला का दिसत असावा? सिनेमॅटिक लिबर्टीला माझा जराही आक्षेप नाही, आक्षेप आहे तो निष्काऴजी सिनेमॅटिक लिबर्टीच्या जंत्रीला!

    चित्रपटाची कथा-पटकथा के. व्ही. विजयेंद्र प्रसाद यांची. साक्षात ‘बाहूबली’चे लेखक आणि राजमौलीचे वडील. त्यांनी लिहिलेले प्रसंग, त्यांची काल्पनिकता व ऐतिहासिकता यांच्या पलिकडेही उत्तमच आहेत. परंतु ते सगळेच दिशाहीन आणि जागा चुकल्यासारखे वाटतात. त्यांच्या जागा जर बदलल्या असत्या, तर ते बऱ्याच अंशी सुसह्य तरी झाले असते. आता हे पाप लेखकाचे, की दिग्दर्शकांचे, की संपादकांचे ते न कळे. राजमौली का थोर आहे ते इथे कळतं. त्याने एका काल्पनिक गोष्टीच्याही बारीकसारीक अंगांवर पाच वर्षे मेहनत घेतली. ‘मणिकर्णिका’कारांना मात्र कसली घाई होती, हेच समजत नाही. तुमचे नुसते सेट, कपडे वगैरे भारी असून चालत नाही, तुमचा दृष्टीकोन हा त्या सगळ्या भौतिक गोष्टींपेक्षा शंभरपटींनी भारी असला तरच असे शिवधनुष्य पेलले जाते. राणीच्या व्यक्तीमत्त्वाला उंची खूप दाखवलीये, पण तिला आणि इतरही पात्रांना खोलीसुद्धा तेवढीच दाखवली असती, तर बरं झालं असतं. एकूण एक पात्रं ही सपाट, एकमार्गी आहेत. त्यातही इंग्रज तर खूपच स्टिरीयोटिपिकल दाखवले आहेत. इतकी सरधोपट पात्रे निदान इतक्या मोठ्या स्तरावर बनलेल्या चित्रपटाकडून तरी अपेक्षित नव्हती. अतिशय सामान्य वाटणारे अंकित आणि संचित बलहारांचे पार्श्वसंगीत हे या पसाऱ्यात भरच तेवढी घालते. पार्श्वसंगीतात एके ठिकाणी वापरलेल्या महिषासुरमर्दिनी स्तोत्राचे उच्चारही चुकीचे आहेत. छायांकन उत्तम पण व्हिएफएक्स काही काही ठिकाणी फारच सुमार आहेत. मला अजूनही न कळालेली गोष्ट म्हणजे कंगना राणावत काही प्रसंग वगळता युद्धात शिरस्त्राण का घालत नाही? मी काही राणीच्या चरित्राचा तज्ञ नाही, परंतु युद्धावर जाताना राणी नेहमीच शिरस्त्राण घालत असणार असे तर्कबुद्धी सांगते. कंगना मात्र प्रत्येक वेळी ते घालतेच असं नाही. का? केवळ पडद्यावर छान दिसावं म्हणून? इंग्रजांशी बाचाबाची झाल्यावर राणी अचानक घोडा दौडवत कुठे जाते, हे समजत नाही. ती उद्विग्न झाली म्हणावे तर त्याच प्रसंगात संग्रामसिंहशी भेट होते व अजूनच खटका उडतो. तो पूर्ण सिक्वेन्सच गोंधळात टाकणारा आहे. किमान मला तरी तो समजला नाही.

    प्रसून जोशींनी लिहिलेले संवाद काही क्लिषे वगळता फारच जबरदस्त आहेत. ते भूतकाळाच्या माध्यमातून वर्तमानकाळावर अतिशय नेमके भाष्य करतात. पण त्या संवादांनाही अडसर आहे तो कंगना राणावतचा. ती अत्यंत उत्तम अभिनेत्री आहे. पण तिची वाणी शुद्ध नाही. त्यामुळे तिने उच्चारल्यावर भलीभली वाक्येही सपाट वाटतात. अतुल कुलकर्णींच्या भूमिकेवरून काही ना काही कारणाने कात्री फिरवली गेली की काय असे वाटते, पण त्यांनी काम छान केलेय. जिशू सेनगुप्तांचेही काम उत्तमच, पण चित्रपट गंगाधररावांच्या मनोविश्वात डोकावण्याचे फारसे कष्टच घेत नाही. मुहंमद झीषान अय्युब, अंकिता लोखंडे, मिष्टी, डॅनी, वैभव तत्त्ववादी, सुरेश ओबेरॉय, कुलभूषण खरबंदा सगळेच आपापल्या भूमिकांत ठिकठाक. चित्रपटाची सगळ्यांत चांगली गोष्ट जर कोणती असेल तर ती म्हणजे गाणी! शंकर-अहसान-लॉयच्या संगीतदिग्दर्शनात प्रसून जोशींची शुद्ध हिंदीचा प्रभाव असलेली गीते फारच गोड, सुरेख आणि अर्थवाही झाली आहेत. पण चित्रपटात त्यांच्याही जागा काही वेळा चुकल्यायत.

    राणी लक्ष्मीबाई हे खरोखर आपल्या इतिहासातील एक तेजस्वी पृष्ठ आहे. त्याचा रुपेरी पडद्यावर सन्मान करतानाच सिनेमा म्हणून त्याची मांडणीदेखील चांगली असणे अपेक्षित होते. दुर्दैवाने चित्रपट अनेक आघाड्यांवर निराशाच तेवढी करतो. सर्जनशील बाजूंवर नियंत्रण असणाऱ्या कुणीतरी हुशार व्यक्तीने या विषयाला स्पर्श करेपर्यंत थांबणे, एवढेच प्रेक्षक म्हणून आपल्या हाती आहे!

    *२.५/५

    — © विक्रम श्रीराम एडके

    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

  • नव्या भारताचा नवा चित्रपट : उरी – द सर्जिकल स्ट्राईक

    १८ सप्टेंबर २०१६ यादिवशी पाकिस्तानच्या चार आतंकवाद्यांनी काश्मिरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथील आपल्या सैन्यतळावर हल्ला केला. आपण त्या चारही आतंकवाद्यांना नरकात धाडले परंतु हे होईपर्यंत आपले सुमारे एकोणावीस जवान हुतात्मा झाले होते तर सुमारे ऐंशी ते शंभर जखमी. युद्धाची दाहकता ही अशी असते आणि ती कधीच एकतर्फी शांतता राखून कमी होत नाही. आपण जर याचे काही उत्तर दिले नसते, तर उलट त्या अतिरेक्यांच्या मालकांची हिंमत अजूनच वाढली असती. आणि म्हणूनच भारत सरकारने आणि आपल्या भारतीय सैन्याने निर्णय घेतला सर्जिकल स्ट्राईक करण्याचा! शरीरावर शल्यकर्म करताना जसे फक्त त्या रोगग्रस्त भागापुरतेच केले जाते, तसाच हा हल्लादेखील सर्जिकल अर्थातच लक्ष्यांपुरता मर्यादित असतो. यात इतरांना लक्ष्य केलेले नसते. थोडक्यात कोलॅटरल डॅमेज शून्य ठेवण्याचा यात प्रयत्न असतो. नेमके हेच आपल्या सैन्याने पाकव्याप्त काश्मिरात घुसून यशस्वीरित्या पार पाडले! ‘उरी – द सर्जिकल स्ट्राईक’ हा त्याच घटनांचे काल्पनिक रुपांतरण करतो.

    ‘उरी’ हा अतिशय रंगीत सिनेमा आहे. चित्रपटभर तुम्हाला वेगवेगळे रंग वापरलेले दिसतात. आजवर आपल्याकडे बनलेल्या युद्धपटांच्या तुलनेत हा अतिशय स्वागतार्ह बदल आहे. चित्रपटात खूप सारे खटकेबाज संवाद आहेत, पण चित्रपट त्यांच्यातही अडकून पडत नाही. उलट स्ट्राईक्सची थंड डोक्याने आखलेली योजना आणि तिची तितक्याच शिताफीने केलेली अंमलबजावणी यांच्यावर त्याचा जास्त भर आहे. याही चित्रपटात ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’सारख्याच खरोखरच्या राजकीय व प्रशासनिक व्यक्ती आहेत. त्यांची नावे चित्रपटात बदललेली असली, तरी त्या व्यक्ती प्रत्यक्षात कोण आहेत याबद्दल प्रेक्षकांना जराही संभ्रम निर्माण होत नाही. उलट ‘उरी’सोबतच प्रदर्शित झालेल्या ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’प्रमाणे यातील पात्रे या त्या त्या व्यक्तींच्या निव्वळ नकला वा अर्कचित्रे न वाटता जिवंत माणसे वाटतात, हे चित्रपटाचे मोठेच यश आहे. चित्रपट हा काही पातळ्यांवर प्रचंड भावनिक आहे. विशेषतः पूर्वार्धात. आणि तसा तो आहे म्हणूनच नंतर जे दाखवले गेलेय, त्याला एक तात्त्विक आधार प्राप्त होतो. तसं बघायला गेलं, तर चित्रपट पाहाण्यापूर्वीच आपल्याला त्याची सबंध कथा माहिती आहे. सुरुवात काय, शेवट काय; सारंच. इतकी सगळ्यांना माहिती असलेली गोष्ट असूनही चित्रपट आपल्याला पूर्णवेळ खूर्चीच्या कडेवर बसवून श्वास वारंवार रोखायला लावतो, यासाठी लेखक आणि दिग्दर्शक आदित्य धर आणि संपादक शिवकुमार पणिकर यांचे कौतुक करावे तितके थोडे! मोठी हुशारीने गुंफलेली पटकथा आणि जागोजागी वापरलेला नैसर्गिक विनोद, या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत तर शाश्वत सचदेव यांचे जबरदस्त पार्श्वसंगीत घटनांची खोली व चित्रपटाची उंची कैकपटींनी वाढवणारे आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर प्रेक्षकांवर विश्वास टाकून त्यांना कमीत कमी स्पून फीडिंग करणारा ‘उरी’ एक अतिशय स्मार्ट चित्रपट आहे. त्याची फ्रेमिंग आणि टेकिंग दिग्दर्शकीयदृष्ट्या अतिशय विचारपूर्वक केलेली आहे. पण!

    पण म्हणून काही तो त्रुटी आणि दोषांपासून मुक्त आहे, असं अजिबात नाही. प्रचंड हुशारीने रचलेला चित्रपट शेवटाकडे जाताना किंचित फिल्मीपणाकडे झुकू लागतो. ‘शूट टू किल’ची जागा क्वचित ठिकाणी अनावश्यक मारामारी घेते. दोन मिनिटांत पोहोचतील अशी बातमी असलेले पोलिस सोयीस्करपणे उशिरा येतात. एवढ्या मोठ्या मिशनचा महत्त्वाचा भाग एक इंटर्न होऊन बसतो. परतीच्या प्रवासात मोक्याच्या क्षणी एका पात्राची फिल्मी पद्धतीची एंट्री होते. देशासाठी केल्या जात असलेल्या अभियानालाही वैयक्तिक सूडाची फोडणी दिली जाते. गुप्ततेबद्दल प्रसिद्ध असलेले एक पात्र रिक्षाच्या प्रवासात राष्ट्रीय सुरक्षेसंबंधीच्या गोष्टी उघडपणे बोलते. हे आणि असे बरेच काही! सिनेमॅटिक लिबर्टी घेण्यात काहीच चूक नाही. परंतु एक प्रेक्षक म्हणून दिग्दर्शकाने अधिक वास्तववादी मार्ग चोखाळलेला पाहाणे मनापासून आवडले असते. कथा-पटकथा किती जरी आकर्षक असली, तरी त्यात संशोधनाचा अभाव जाणवतो.

    अभिनय ही चित्रपटाची भक्कम बाजू आहे! विकी कौशल हा जर असेच काम करत राहिला, तर तो खचितच उद्याचा सुपरस्टार असणार आहे! परेश रावल यांच्याकडून तर वाईट कामाची अपेक्षाही नाही. मोठ्या पडद्यावर मोहित रैना या गुणी अभिनेत्याला पाहाणे अतिशय सुखद आहे. कीर्ती कुल्हारीने तिची भूमिका प्रामाणिकपणे केलीये तशीच मानसी पारेख व इतरांनीही. या सगळ्यांत यामी गौतम मात्र काहीशी खटकते. तिने वाईट काम केलेय असे नाही, परंतु इंटेलिजन्स ऑफिसरच्या भूमिकेत व संवादांतही ती जराशी नाजूकच वाटते. याखेरीज स्वरूप संपतना खूप दिवसांनी पाहाणे आनंददायी आहे. योगेश सोमण, राकेश बेदी, रुख्सार वगैरेंनाही छोट्याछोट्या परंतु महत्त्वाच्या भूमिका आहेत व त्या त्यांनी ताकदीने निभावल्या आहेत.

    अर्थातच हल्ली प्रत्येक व्यक्ती, गोष्ट, कलाकृती यांना कोणत्यातरी एका गटात टाकायची फॅशन आलीये. त्या अर्थी बोलायला गेलं तर ‘उरी’ उजव्या गटातील सिनेमा आहे. तसा तो असेलही, पण त्यापेक्षाही जास्त तो बदलत्या काळाचा द्योतक आहे. चित्रपटाच्याच एका संवादाचा आधार घेऊन बोलायचं झालं, तर ‘उरी’ हा नव्या भारताचा चित्रपट आहे. तो काहीसा अडखळतो पण उठतो, उभा राहातो आणि त्याचं इच्छितस्थळ गाठतो, अगदी भारतासारखाच!!

    *४/५

    — © विक्रम श्रीराम एडके

    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

  • बऱ्याच गोष्टींनी मारलेला पण अभिनयाने तारलेला : द अॅक्सिडेंटल प्राईममिनिस्टर

    ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ सुरू होतो तो काँग्रेसप्रणित संपुआने २००४ च्या लोकसभा निवडणुका जिंकण्यापासून. त्यानंतर उभ्या राहिलेल्या पेचप्रसंगांतून मनमोहनसिंह (अनुपम खेर) यांना पंतप्रधानपदी निवडले जाते आणि चित्रपटात आरंभ होतो दोन सत्तास्थानांमधील अघोषित संघर्ष. याला मी लिहिण्याच्या सोयीसाठी संघर्ष म्हणतोय कारण, चित्रपटात एक सत्तास्थान खूपच सौम्य चितारलेय तर दुसरे जवळजवळ अप्रत्यक्ष. नेमके हेच सगळ्यांत मोठे कारण आहे की, यावर्षीच्या सगळ्यांत स्फोटक चित्रपटांपैकी एक मानला जाणारा ‘टिएपीएम’ फारसा रंगत नाही.

    मनमोहनसिंह हे मुळातच मितभाषी नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. चित्रपटातही त्यांची प्रतिमा तिच ठेवण्यात आलीये. असा परोक्ष नायक कसा काय चालेल? म्हणून मग त्यांचा आवाज बनतात संजय बारू (अक्षय खन्ना), सांकेतिक अर्थानेच नव्हे तर त्यांचे माध्यम सल्लागार या नात्याने प्रत्यक्षातही. सबंध चित्रपट आपण संजय बारूंच्या संदर्भबिंदूने पाहातो. अभिनयात एक वाक्प्रचार असतो, ज्याला म्हणतात ‘ब्रेकिंग द फोर्थ वॉल’. म्हणजे काय, तर अभिनेता रंगमंचाच्या तीन भिंतींच्या चौकटीत काम करतो आणि समोर अदृश्य अशा चौथ्या भिंतीच्या पल्याड प्रेक्षक असतात. जेव्हा काम करता करता अभिनेता थेट ही चौथी भिंत फोडून प्रेक्षकांशीच बोलू लागतो, तेव्हा त्याला म्हणतात ‘ब्रेकिंग द फोर्थ वॉल’. या तंत्राचा वापर अनेक चित्रपटांमध्ये केल्याचे तुम्ही पाहिले असेल. ‘हाऊस ऑफ कार्ड्स’मध्ये फ्रँक अंडरवूड (केव्हिन स्पॅसी) याच माध्यमातून सातत्याने आपल्याशी संवाद साधत असतो. तेच तंत्र इथेही वापरलेय. अक्षय खन्ना, संजय बारूंच्या रूपाने आपल्याशी सतत बोलत असतो, पात्रांच्या ओळखी करून देत असतो, राजकीय घडामोडी उलगडून सांगत असतो. थोडक्यात सगळ्याच गोष्टी, व्यक्ती, घटनांबद्दल त्याचं मत देत असतो. अर्थात, हे मत संजय बारूंचं किती आणि दिग्दर्शकाचं स्वतःचं किती, हा भाग वेगळा! राजकीय विषय असल्यामुळेच मी वर मुद्दामहून ‘एचओसी’चा उल्लेख केलाय. त्यात फ्रँक अंडरवूड आपल्याशी संवाद साधण्याचे प्रसंग खूप कमी येतात हे एक, दुसरे म्हणजे ते एकतर अचानक तरी येतात किंवा प्रचंड उपहासात्मक तरी येतात. त्यातील वाक्येसुद्धा विशेष असतात. इथे मात्र ते प्रसंग खूप वेळा येतात आणि ते प्रत्येकवेळी इंटरेस्टिंग असतीलच असे नाही. काही काही वेळा तर दिसत असते की सिनेमाची लांबी फार वाढू नये म्हणून संजय बारूंच्या तोंडून घटना सांगितली जातेय. याचा तोटा हा झालाय की, सिनेमा हा बरेचदा टिव्हीवरचा डॉक्युड्रामा वाटू लागतो आणि आपण ‘पंतप्रधान’ अथवा तत्सम कार्यक्रमाचा एखादा एपिसोड पाहातोय की काय, असे वाटू लागते.

    राजकीय विषयांवर चित्रपट करताना दोन मार्ग असतात. एक म्हणजे जे दाखवायचे आहे ते पूर्ण आत्मविश्वासाने, सगळ्या गुंत्याला तसेच ठेवून दाखवावे व प्रेक्षक हुशार आहेत यावर विश्वास ठेवावा; अथवा सारे काही उलगडून, सोपे करून चमच्याने भरवत राहावे. खरं तर राजकीयच कशाला, प्रत्येक सिनेमासाठी हेच दोन मार्ग असतात, त्यातला कोणता, कधी आणि कुठे वापरायचा यालाच चांगल्या लेखक, दिग्दर्शकांचं तारतम्य म्हणतात. या चित्रपटात दोन्हीही मार्ग वापरलेयत पण त्यांचे गणित काहीसे चुकल्यामुळे चित्रपटाचा एकजिनसीपणा कमी झालाय. काही गोष्टी फारच थेटपणे दाखवल्यायत तर काही खूपच संयतपणे. त्यामुळे दोन्ही प्रकारचे प्रेक्षक खुश न होता पटकथेच्या पातळीवर गोंधळ तेवढा उरतो. गंमत म्हणजे, तरीही चित्रपट प्रचंड एंजॉयेबल राहातो. दिग्दर्शकाने विषय हलक्या-फुलक्या, काहीश्या विनोदी पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलाय. काही ठिकाणी ही गोष्ट कमालीची भारी जमलीये तर काही ठिकाणी कमालीची चुकलीये.

    सिनेमा ज्या स्फोटक बिंदूवर सुरू होतो, तिथून पुढे एकामागोमाग एक धमाके होत जातील असं वाटतं. परंतु लवकरच तो असा काही ढीला पडतो की आपण केवळ त्या काळाबद्दलचा एखादा माहितीपट पाहातोय की काय, अशी शंका येऊ लागते. परत काही ठिकाणी स्फोटकता निर्माण होते आणि परत काही ठिकाणी ती ढेपाळते. पटकथेतला हा विस्कळीतपणा पार्श्वसंगीतातही जाणवतो. चित्रपटाचे वैशिष्ट्य असे की, त्यात अतिशय धीटपणाने खरी नावे वापरलीयेत, अगदी खलनायक म्हणून चितारलेल्या व्यक्तींचीसुद्धा. परंतु नावांच्या पलिकडे जाऊन सगळ्यांच गोष्टी उघड बोलणे कदाचित भारतीय परिप्रेक्ष्यात चालणार नाही किंवा इतर अडचणी (ज्या तरीही आल्याच!) येतील की काय असा विचार करून चाचरत चित्रपट बनवल्यासारखे मध्येच वाटून जाते. जर हे असेच झाले असेल, तर पटकथेच्या विस्कळीतपणाचे आणि चित्रपट पुरेसा नाट्यमय नसल्याचे खरे मूळ तिथे असू शकते. चित्रपट बनवायचाच आहे तर मग दिग्दर्शकाने बिनधास्त त्याचे म्हणणे तरी मांडायचे होते. ते बरोबर की चूक हा विषय वेगळा. उलट बोटचेप्या धोरणामुळे चित्रपट धीट राजकीयपट न राहाता फक्त बोटे दाखवून निर्देश करणारा प्रोपेगेण्डा होऊन राहातो. अर्थात, तेच जर दिग्दर्शकाला अपेक्षित असेल, तर मात्र गोष्ट वेगळी. मनमोहनसिंहांचा सबंध कार्यकाळ दाखवण्यापेक्षा सिनेमा जर एखाद्या विशिष्ट घटनेभोवतीच उभारला असता, तर चित्रपट कदाचित नेमका व चांगला होऊ शकला असता असे वाटते. तसे होण्यासाठी खूप घटनासुद्धा आहेत चित्रपटात. परंतु दहा वर्षांचा काळ दाखवण्याच्या नादात चित्रपट त्या प्रत्येक घटनेला फक्त खो देऊन पुढे सरकतो.

    अनुपम खेर यांनी केलेल्या मनमोहनसिंहांच्या भूमिकेबद्दल बरेच लिहिले बोलले गेले. त्यांनी काम उत्तमच केले आहे. परंतु त्यांना वेशभूषा आणि रंगभूषेचा प्रचंड आधार आहे. याउलट दोन्हीतले काहीच बाजूने नसतानाही, किंबहूना ती व्यक्ती किमान दिसते कशी हे देखील बहुतांशी जणांना माहिती नसतानाही, अक्षय खन्नाने उभे केलेले संजय बारू हे काहीच्या काही अप्रतिम वाटतात. इतर मुख्य पात्रांप्रमाणेच हेही पात्र काहीसे अंडर-रिटनच. तरीदेखील अक्षय खन्नाने वेगवेगळ्या मार्गाने त्यात अक्षरशः जीव ओतलाय. चित्रपट जरी मनमोहनसिंह आणि म्हणूनच अनुपम खेरबाबतीत असल्याचे प्रथमदर्शनी वाटले, तरीही त्याचा खरा नायक संजय बारू हे पात्रच आहे. अक्षय खन्नाने अक्षरशः खाऊन टाकलाय हा चित्रपट. मला या अभिनेत्याचे प्रचंड कौतुक वाटते. तुम्ही अक्षय खन्नाच्या कोणत्याही चित्रपटाला वाईट म्हणू शकता, परंतु कोणत्याही चित्रपटात अक्षय खन्नाला वाईट म्हणू शकत नाहीत. इतका हा कमाल अभिनेता इंडस्ट्रीला काही कारणामुळे सहन झाला नाही की तोच थोडासा अकडू होता कोण जाणे, परंतु दुर्दैवाने त्याचा उमेदीचा काळ सरल्यावरच आपल्याला त्याची किंमत कळू लागलीये. फक्त दोनच तास चालणारा असूनही ‘टिएपीएम’ खूप ठिकाणी रटाळ होतो परंतु अक्षय खन्नाने त्या प्रत्येक ठिकाणी आपल्या समर्थ खांद्यावर चित्रपटाला अलगदपणे उचलून पुढे नेलेय. त्या मानाने अनुपम खेरना परोक्ष नायक रंगवायचा असल्यामुळे तितकासा वावच नाहीये. पण जो आहे, त्यात त्यांनीही मजा आणलीये. या दोघांच्या खालोखाल मी अभिनेता म्हणून अजून एका व्यक्तीचे नाव घेईन, तो म्हणजे विपिन शर्मा. बाकी काही अपवाद वगळता बहुतांश पात्रांना त्या त्या व्यक्तीची सहीसही नक्कल वाटण्यापलिकडे काहीही काम व अर्थ नाही!

    या चित्रपटात प्रोपेगेण्डा आहे का? आहेच! पण प्रोपेगेण्डा आहे, एवढ्या एकाच कारणासाठी काही माध्यमं त्याला टाकाऊ म्हणतायत ते बरोबर वाटत नाही. प्रोपेगेण्डाच्या पलिकडेही हा चित्रपट त्याच्या काही गुणांमुळे चांगला आहे आणि काही दोषांमुळे वाईट आहे. एक उदाहरण सांगतो. नुकतेच ‘गल्ली बॉय’ चित्रपटाचे ट्रेलर रिलिज झाले. सामान्य प्रेक्षकांना चटकन कळणारही नाही इतका बेमालूम प्रोपेगेण्डा ठासून भरलाय त्यात. म्हणून काही त्याला टाकाऊ थोडीच म्हणतील? किमान मेनस्ट्रीम मिडिया तरी नाही म्हणणार, किंबहूना त्यात काही प्रोपेगेण्डा असल्याचा उल्लेखही कुणी तथाकथित विचारवंत नाही करणार. प्रोपेगेण्डाचं असंच असतं ना, तो आपल्या लोकांनी केला तर चांगला आणि विरोधातल्या लोकांनी केला तर वाईट असतो. तसंच याही चित्रपटाचं आहे. काँग्रेसविरोधी विचारधारा ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’चे सगळे दोष झाकून त्याचा उदोउदो करतील तर भाजपविरोधी विचारधारा त्याचे सगळे गुण झाकून त्याला कचरा म्हणतील. प्रत्येकाची काही ना काही राजकीय विवशता आहे त्यात, एवढेच. लोकशाहीची हीच तर खूबी आहे! याउप्पर आपापल्या विचारधारांच्या पलिकडे जाऊन प्रेक्षक म्हणून जर ‘टिएपीएम’ पाहावासा वाटला, तर अवश्य पाहावा आणि समजा त्यावर बहिष्कार घालावासा वाटला तर बहिष्कार घालावा, आपल्याला दोन्हींचेही स्वातंत्र्य आहे. हे स्वातंत्र्य, ही सुद्धा लोकशाहीचीच तर खूबी आहे!

    *३/५

    — © विक्रम श्रीराम एडके.

    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

  • गावाकडचे जॅझ – महेशिण्टे प्रतिकारम

    तुमच्याकडे नोकरी, व्यवसाय, शिक्षण वगैरेपैकी काहीतरी एक असतं. चार लोकांत तुमचं काहीतरी अस्तित्व असतं. तुमची लव्हलाईफ फार भारी नसते, पण जे आहे ते आपलं म्हणून तुम्ही त्याचा मनापासून स्वीकार केलेला असतो. थोडक्यात सारं काही छान चाललेलं असतं. संथ वाहाणाऱ्या कृष्णामाईसारखं. पण एक दिवस असा येतो की तुमची प्रतिष्ठा, अब्रू, तुमचं प्रेम सारं सारं काही एका क्षणात हिरावून घेतलं जातं. होत्याचं नव्हतं होतं. बरं झालेली गोष्टदेखील इतकी सहजपणे झालेली असते की, आपल्यावर फार मोठा अन्याय झालाय असं बोंबलायला जागाच नसते. गेलेली अब्रू परत मिळवण्यासाठी आपण जीवतोड प्रयत्न करतो. कारण, तेवढंच आपल्या हातात असतं. पण हरवलेलं प्रेम कुठून परत मिळणार? तुम्ही गेलाय कधी या परिस्थितीतून? मी तरी गेलोय. मोठाच उद्ध्वस्त काळ असतो तो. वर्षानुवर्षे ज्या व्यक्तीपलिकडे कधी विचारच केलेला नसतो आणि जिच्यावर आपल्या स्वतःपेक्षाही जास्त विश्वास दाखवलेला असतो, त्या व्यक्तीने एका क्षुल्लक, क्षुद्र स्वार्थापायी आपल्याला लाथाडून निघून जावं? का? इतके फालतू असतो आपण खरंच? लाख प्रश्नांचं काहूर माजतं आणि डोकं फुटेस्तोवर विचार केला, पार रात्रीच्या रात्री जागून काढल्या तरी उत्तर मात्र एकही मिळत नाही. कारण, उत्तर असतं काळ. तो जसं क्षणात होत्याचं नव्हतं करतो, तसंच हळूहळू आपल्याकडे होतं त्यापेक्षाही सुंदर आयुष्य आपल्याला देतो. माणूस म्हणून पार बदलूनच टाकतो तो आपल्याला. आपल्यातली निरागसता दगडाने ठेचून टाकतो आणि आपल्या भूतकाळातील स्वरूपाच्या काही हलक्या निशाण्या तेवढ्या मागे ठेवतो. यालाच परिपक्व होणे म्हणतात. मग खरं प्रेम काय असतं ते उलगडतं, एखादा पूर्वी कधीच नसलेला छंद गवसतो, करिअरची एखादी वेगळीच वाट सापडते. मग मागे वळून पाहाताना आपल्यालाच कळतं की, परमेश्वर ज्यावेळी आपल्याकडून काहीतरी हिसकावून घेत होता आणि आपण विरोध करून स्वतःलाच त्रास करून घेत होतो, त्यावेळी खरं तर तो आपल्याकडचं बिनकामाचं खेळणं काढून घेत होता, त्याहून मोठं आणि अधिक सुंदर काहीतरी देण्यासाठी!!

    नाही, मी माझ्या आयुष्याचे चिंतन मांडत नाहीये तुमच्यासमोर. म्हणजे हे तुमच्या-माझ्या आयुष्याचे चिंतन तर आहेच, पण त्यापेक्षा जास्त ही आहे दिलीश पोदनच्या “महेशिण्टे प्रतिकारम”ची (२०१६) मूळ कल्पना. अगदी तुमच्या आमच्या आयुष्यातली संकल्पना वाटते ना ही? वाटणारच, कारण मुळातच ती केरळमधील आलप्पुळा जिल्ह्यातील तुरावूरमध्ये घडलेली सत्यकथा आहे. “महेशिण्टे प्रतिकारम” म्हणजे “महेशचा प्रतिकार” अर्थात महेशने केलेला प्रतिकार अथवा महेशने घेतलेला सूड. महेश (फ़हाद फ़ासिल) हा इडुक्की जिल्ह्यातील एका रमणीय खेड्यात राहाणारा एक साधासरळ छायाचित्रकार. तो म्हाताऱ्या वडलांचा सांभाळ करतो आणि गावातील सण-समारंभांची छायाचित्रे काढून गुजराण करतो. त्याचे आणि सौम्याचे (अनुश्री) लहानपणापासूनच एकमेकांवर प्रेम आहे. महेशला गावात मान आहे. छान, मस्त आयुष्य चालले आहे त्याचे. एकेदिवशी तो सहज गावात घडणारे एक भांडण सोडवायला जातो आणि ते लोक याच्यावरच राग काढतात. बेदम मारतात ते त्याला. याच दरम्यान त्याचे प्रेमही त्याच्यापासून दूर जाते. मार खाल्लेला, अपमानित, जखमी महेश तिरीमिरीत प्रतिज्ञा करतो की, जोपर्यंत मी मला मारणाऱ्याचा सूड उगवणार नाही, तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही. पुढे काय होतं, याची दिल खुश करून टाकणारी गोष्ट म्हणजे हा चित्रपट!!

    “महेशिण्टे प्रतिकारम”ची सगळ्यांत जमेची बाजू ही की, ही कथा एका लहानश्या खेडेगावात घडते. त्यामुळे गावकऱ्यांचा इरसालपणा दाखवायला यात पुरेपूर जागा आहे आणि ती तितक्याच ताकदीने वापरून घेतल्यामुळे सबंध चित्रपटभर एक नर्मविनोदाची पखरण झालीये. याबाबतीत दिग्दर्शक दिलीश पोदनपेक्षाही लेखक श्याम पुष्करन ज्यांना या चित्रपटाच्या लेखनासाठी राष्ट्रपती पारितोषिक मिळालेय, त्यांची भूमिका जास्त महत्त्वाची आहे. कुठेही संयतपणा न सोडता, चित्रपट-माध्यमाच्या समग्र कलात्मकतेशी प्रामाणिक राहूनदेखील एक खुसखुशीत मनोरंजक कलाकृती बनवता येऊ शकते, याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे “महेशिण्टे प्रतिकारम”. किंबहूना समस्त मलयाळम इंडस्ट्रीकडूनच ही गोष्ट शिकण्यासारखी आहे. चित्रपटात बेबीचेट्टा (अॅलेन्शिए लोपेझ), क्रिस्पिन (सौबिन शाहिर), व्हिन्सेंट भावना (के. एल. अँटनी कोची) अश्या दुय्यम भूमिकादेखील इतक्या चपखल विणल्या आहेत की, त्यामुळे सबंध चित्रटपटालाच एक कलात्मक रेखीवता प्राप्त होते.

    एका माणसाबद्दल न बोलणे अपराधच नव्हे तर अक्षरशः पाप ठरेल. तो माणूस म्हणजे महेशची भूमिका केलेला फ़हाद फ़ासिल. त्याने एवढे सुंदर, एवढे चांगले, एवढे जबरदस्त, एवढे संयत, एवढे सुरेख, एवढे कमाल, एवढे भारी काम केलेय की विचारता सोय नाही. पूर्वी हा माणूस मला अभिनेता म्हणून नुसताच आवडायचा. पण या चित्रपटापासून मात्र मी अक्षरशः फॅन झालोय त्याचा. काही काही प्रसंगी त्याने केलेला अभिनय असा काही बिनतोड आहे की, ते फक्त तोच करू शकतो. लग्नाच्या दिवशी तो दुरूनच सौम्याकडे ज्या नजरेने पाहातो; ती नजर, त्यातली हतबलता आणि तरीही तिच्यातील मनापासून चिंतलेली शुभेच्छा अक्षरशः काळीज कापत जाते. किंवा जिम्सनचा गळा आवळताना जो कर्तव्याचा भाव त्याच्या चेहऱ्यावर असतो, त्याची तुलनाच होऊ शकत नाही. आपल्याकडे जरा बरं काम केलं की, अभिनेत्यांना गगन ठेंगणे होते. पण ते सारेच बच्चे वाटावे असे एक एक अभिनयसम्राट दक्षिणेत आहेत. त्यांचं काम पाहिलं की, आपल्याकडच्या अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या तथाकथित अभिनेत्यांवर हसू आल्याशिवाय राहावत नाही. नायकाला साजेशी पिळदार शरीरयष्टी नसताना, तिशीतच केसांची पीछेहाट झालेली असतानाही या दिसायला सामान्य फ़हाद फ़ासिलने जे काम केलेय, ते आपल्याकडच्या भल्याभल्यांना जमणारे नाही. दुर्दैवी आहे, परंतु सत्य आहे हे. आणि हे सत्य मान्य केलं तरच त्यावर उपाय काढता येणार आहेत.

    बिजिबालचे संगीत अतिशय सुरेख झालेय. विशेषतः “इडुक्की” आणि “मौनंगळ” ही गाणी. आपल्याकडे इतकी सुरेख गाणी का होत नाही, याची राहून राहून खंत वाटते. चित्रपटात मला जाणवलेली एकमेव त्रुटी म्हणजे तो मूळ विषयाकडे यायला फारच वेळ लावतो. दोन तासांच्या चित्रपटापैकी पहिला जवळ जवळ एक तास हा पात्रपरिपोष आणि वातावरणनिर्मितीसाठी घालवलाय. म्हटलं तर ही चांगली गोष्ट आहे आणि म्हटलं तर वाईट. कारण, सबंध चित्रपटच सुशेगात आहे. त्याचा धीमेपणानेच आस्वाद घ्यायचाय. जॅझ संगीतासारखा. किंवा अधिक मुद्देसूद बोलायचं झालं, तर “महेशिण्टे प्रतिकारम” हा चित्रपटच निसर्गरम्य केरळमधील गावाकडचे जॅझ आहे. रेंगाळणारे, संपल्यावरही चव ठेवून जाणारे आणि पुन्हापुन्हा आठवणी काढायला लावणारे. अगदी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे परमेश्वर आपल्याकडून एक गोष्ट हिसकावून घेतो ते दुसरी त्याहून चांगली गोष्ट देण्यासाठीच. “महेशिण्टे प्रतिकारम”मध्ये ही बाब अतिशय कलात्मक ढंगाने आणि तरीही रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांमधून सहजगत्या चितारलीये. कशी, ते चित्रपटात पाहूनच समजून घ्यावे. चुकूनही चुकवू नये असा गोड अनुभव आहे हा!

    *४/५

    — © विक्रम श्रीराम एडके

    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

  • नाव राखणारा अद्वितीय थरारपट : राक्षसन (रात्ससन)

    अरुणकुमार (विष्णु विशाल) हा एक होतकरू चित्रपटकार आहे. अतिशय चिकाटीने, खूप सारं संशोधन करून त्याने एक संहितासुद्धा लिहिली आहे. अनेक निर्मात्यांना तो ती ऐकवतो. हाती काय लागतं? कोणत्याही स्ट्रगलरच्या हाती जे सुरुवातीची अनेक वर्षं लागतं तेच, बिनपैश्यांचा तरीही अमूल्य असा अनुभव! कुणीच त्याच्या कथेवर पैसा लावायला तयार होत नाही. हा दुसरे काहीच काम करत नाही, काहीच कमवत नाही त्यामुळे त्याची बहिण (विनोदिनी) आणि भावोजींची (रामदास) सतत भुणभुण चाललेली. अरुणचे वडील पोलिसांत होते. भावोजीही पोलिसच. त्यामुळे साहजिकच अरुणनेही पोलिस व्हावे हा सगळ्यांचा लकडा. शेवटी स्ट्रगल करून करून थकलेला अरुण त्याच्या मनाविरुद्ध पोलिस भरतीच्या परीक्षा देतो आणि उत्तीर्ण होऊन पोलिस खात्यात रुजूसुद्धा होतो. हा सगळा घटनाक्रम घडत असतानाच शहरात एक विचित्र खूनसत्र सुरू होतं. अरुण त्यात साहजिकपणे ओढला जातो. पुढे काय होतं याची थरारक हा शब्दही अपुरा वाटेल अशी भयचकित करणारी अविश्वसनीय कथा, नव्हे नव्हे थरारपट कसा असावा याचा अप्रतिम नमुना म्हणजे ‘राक्षसन’!

    वरवर पाहायला गेलं तर ‘राक्षसन’चा परिसर अतिशय प्रेडिक्टेबल आहे. त्या अनुषंगाने काही घटनासुद्धा सहज ओळखता येतात. पण हे प्रमाण किती आहे, तर अगदी दहा-पाच टक्केही नसेल. मुळात हा पोलिसपट वाटावा अशी त्याची बाह्य आखणी आहे. परंतु हा थेटपणे पोलिसपट नाही. पोलिसपटांमध्ये हिरोसाठी त्याचा गणवेश, त्यापाठोपाठ येणारी कर्तव्याची भावना आणि आपसूकच येणारे नायकत्व सर्वोपरी असते. इथे अरुणमध्ये मुळातच तितके हिरोईझम नाही. तो तर अनिच्छेने पोलिस झालेला एक रिलक्टंट-हिरो आहे. आणि विश्वास ठेवा, रिलक्टंट-हिरो हे या चित्रपटासाठी नुसते कथाकथनाचे एक तंत्र नाही, तर या कमालीच्या घट्ट विणलेल्या कथेचा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि केवळ अरुणच नव्हे, तर यातील बहुतांश पात्रे, त्यांचा स्वभाव, त्यांचे व्यवसाय या गोष्टी कथेसाठी अत्यावश्यक ठराव्यात इतक्या चपखलपणे गुंफलेल्या आहेत. कथा-पटकथा कशी लिहावी याचा वस्तुपाठ म्हणावा असाच आहे हा चित्रपट. कित्येकदा गोष्टी आपल्या नजरेसमोर लपवलेल्या असतात, परंतु दिग्दर्शक दाखवेपर्यंत त्यांचा संदर्भच लागत नाही; या चांगल्या रहस्यपटाच्या निकषावर हा सिनेमा खरा उतरतो. कित्येक प्रसंगांमध्ये अतिशय संयत फोरशॅडोईंग केलीये, जी योग्य वेळीच उलगडते. आणि तशी ती उलगडताना अनुभवण्याचा स्वतंत्र असा आनंद आहे. स्पून-फिडींग अगदी कमीत कमी आणि तरीही मनोरंजनाची हमी, हा हिंदी-मराठीमध्ये क्वचितच कुणाला साधणारा समतोल या चित्रपटाला बरोब्बर साधलाय.

    पण म्हणून हा चित्रपट फक्त बुद्धीचा खेळ आहे का? मी हा चित्रपट घरी पाहिला. प्रदर्शित झाला तेव्हा कसा कोण जाणे, पण राहून गेला होता माझ्याकडून. पण जवळजवळ अडिच तासांचा हा चित्रपट पाहाताना पहिल्या वीस-एक मिनिटांतच मी बायकोला म्हणालो की, ‘बंद करुया का?’ इतका प्रचंड अस्वस्थ झालो होतो मी. राग, भिती, काळजी, हतबलता, करुणा, घृणा, किळस या आणि अशा कित्येक भावना शतपटींनी अधिक तीव्रपणे भासायला लावण्याची अजब ताकद आहे या चित्रपटात. घरी, छोट्या पडद्यावर पाहाताना माझं असं झालं तर प्रत्यक्ष चित्रपटगृहात पाहाणाऱ्यांची काय अवस्था झाली असेल, याची कल्पनाच केलेली बरी. चित्रपट त्याची ही आत्यंतिक भावोत्कटता अगदी शेवटपर्यंत सोडत नाही. अमला पॉल वगैरे सगळ्यांनीच चांगली कामे केली आहेत. परंतु विनोद सागर या अभिनेत्याने मात्र अक्षरशः कमालच केली आहे. गिब्रनचे संगीत हे नेहमीप्रमाणेच जेवढ्यास तेवढे आणि कथेला पूरक आहे.

    अतिशय धीटपणे लिहिलेला आणि तरीही शैलीदारपणे मांडलेला हा चित्रपट थरारपट किंवा रहस्यपट म्हणवण्याच्या दृष्टीने मात्र किंचित मोठा आहे. मी हे जे बोलतोय, ते आजकालच्या संयमशून्य आणि एकाग्रताविरहीत पिढीच्या संदर्भात. प्रत्यक्षात तीन-साडेतीन तासांचे चित्रपटही चवीने पाहाणारी माणसं आपण. परंतु असे चित्रपट अगदी नेमके तेवढेच मांडणारे असावेत, असं म्हणतात. कदाचित लेखक-दिग्दर्शक रामकुमारही याच विचाराला बळी पडला असावा. कारण प्रचंड स्मार्ट, तपशीलवार तरीही रहस्याच्या चाव्या राखून असलेला हा चित्रपट जसजसा शेवटाकडे येतो तसतसा किंचित घाई करू लागतो. त्याचं तर्कशास्त्र क्वचित गडबडू लागतं. परिणामतः उत्कर्षबिंदूत जेवढी मजा यायला हवी तेवढी ती येतच नाही. अर्थात, त्यातही जे काही घडतं ते हल्लीच्या भल्याभल्या चित्रपटांच्या कल्पनेच्याही पलिकडचं आहे. परंतु तरीही अजून पाच-दहा मिनिटे इकडे-तिकडे झाली असती, तर पोट पूर्ण भरलं असतं एवढंच!

    पण तरीही खात्रीने सांगतो की, हा छोट्या बजेटचा आणि फारशी प्रसिद्ध स्टारकास्ट नसलेला तमिळ चित्रपट यावर्षीच्या सर्वश्रेष्ठ चित्रपटांपैकी आहे. किंबहूना आपल्याकडच्या सर्वोत्तम थरारपटांच्या यादीत याला पुढची अनेक वर्षे कुठे ना कुठे स्थान द्यावेच लागेल असा आहे. असा चित्रपट आपल्याकडे का बनत नाही, याची मनापासून खंत वाटते हा चित्रपट पाहाताना. राक्षस हा शब्द जरी आपण वाईट अर्थाने वापरत असलो, तरी त्याचा खरा अर्थ होतो राखणारा! आणि खरोखरच हा चित्रपट प्रयोगशील तरीही मनोरंजक अशा तमिळ चित्रपटसृष्टीचे नाव बरोब्बर राखणारा आहे. या जॉनरचेच नव्हे, तर एकूणच चित्रपट माध्यमाचे चाहते असाल, तर चुकूनही चुकवू नका हा ‘राक्षसन’!

    *४/५

    — © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)