Category: Cinema

  • रेज़्ड बाय वुल्व्ह्ज़

    रेज़्ड बाय वुल्व्ह्ज़

    असं म्हणतात, जेव्हा प्रलयाची घडी आली तेव्हा वैवस्वत मनूने एक नौका उभारून सबंध जीवसृष्टी नव्याने वसवली. अशीच कथा थोड्याफार फरकाने अब्राहमिक पंथांत नोहाचीदेखील आहे. बायबलमधील अॅडम, ईव्ह आणि सापाची कथादेखील प्रसिद्धच आहे. या सगळ्या पौराणिक कथा. नव्या युगाचा आरंभ आपापल्या परीने सांगणाऱ्या. पण खरोखरीच जीवसृष्टीला अशी पैलतीरी नेण्याची जबाबदारी येऊन पडली तर, कुणी आधुनिक मनू ती कशी पेलेल? त्याची नौका अथवा आर्क कोणत्या स्वरुपाचे असेल? त्यातून निर्माण होणारी नवी सृष्टी तरी कशा प्रकारची असेल? धर्माच्या अभ्यासकांना पडणाऱ्या या प्रश्नांचं उत्तर वैज्ञानिक नाट्यातून शोधण्याचा प्रयत्न म्हणजे रिडली स्कॉटची एचबीओ मॅक्सवरील नवीकोरी मालिका, ‘रेज़्ड बाय वुल्व्ह्ज़’!

    बावीसावं शतक निम्मं सरलंय. पृथ्वीवर एक आगळाच संघर्ष सुरू आहे. हे महाभारत आहे आस्तिक आणि नास्तिकांच्या दरम्यानचं. आस्तिक आहेत ते मित्राईक पंथाचे अनुयायी. हे एका खरोखरीच्या प्राचीन इराणी पंथाचे नाव आहे. गंमतीची गोष्ट अशी की त्यांचे नाव ‘मित्र’ या संस्कृत शब्दाशी कमालीचे साधर्म्य साधणारे आहे. नावाप्रमाणे व संस्कृत अर्थाप्रमाणेच ते सूर्योपासक आहेत. वस्तुतः आता या पंथाचे कुणीच अनुयायी शिल्लक नाहीत. त्यामुळे अर्थातच मालिकेत या पंथाचे काल्पनिक रूप वापरण्यात आले आहे. कोणत्याही परमोच्च बिंदूशी पोचलेल्या संस्कृतीप्रमाणेच त्यांच्यातही सांस्कृतिक कट्टरता व सामरिक ढिलाई आलेली आहे. त्यांच्या विरुद्ध आहेत ते विज्ञाननादी नास्तिक. दोघांपैकी कुणीही सरळमार्गी नाही. दोघांकडेही एकापेक्षा एक भयकारी अस्त्रे आहेत. यातून एकच गोष्ट हाती लागते ती म्हणजे पृथ्वीचा विनाश!

    विनाशातूनच नवी प्रभात होते. कुणाच्या तरी दूरदृष्टीने पृथ्वीवरील मानवांची काही बीजे आपल्यापासून सहाशे अडतीस प्रकाशवर्ष दूर असलेल्या केप्लर-२२बी ग्रहावर पोहोचवली जातात. धर्माच्या अट्टाहासामुळे पृथ्वीची दुरवस्था झाल्याचे मानून त्या बीजांचा ‘प्रेषित’ (कोटी हेतुत:!) त्यांना कोणत्याही धर्माच्या विरहित वाढवायचं ठरवतो. यासाठी दोन यंत्रमानवांची निवड केलेली आहे, मदर (अमँडा कॉलिन) आणि फादर (अबुबकर सलीम). हे दोघेही त्या मुलांना नास्तिकतेची घुटी पाजूनच वाढवतात. पण नवीन ग्रहावर वस्ती करणे एवढे सोपे असते का? लोक दिसतात तसेच प्रत्यक्षात असतात का? आणि त्याहून महत्त्वाचा प्रश्न, मनुष्य धर्माशिवाय राहू शकतो का? या सगळ्या गुंतागुंतीच्या, अस्तित्वाचा मागोवा घेत हनुमानाच्या शेपटीप्रमाणे वाढतच जाणाऱ्या प्रश्नमालिकेत जेव्हा मार्कससारखे (ट्रॅव्हिस फिमल) बेभरवशी चलांक येऊन मिळतात, तेव्हा आपली ही प्रलयोत्तर नौका विज्ञानकथा, मानवी नाट्य, भयकथा, गूढकथा, रहस्यकथा वगैरे अनेक लाटांवर हेलकावे खात खात, प्रवास सर्वार्थाने संस्मरणीय करून सोडते! इथेही उद्यान आहे, साप आहे, अॅडम आहे आणि ईव्हदेखील आहे, फक्त त्यांचे संदर्भ तेवढे कल्पनातीत बदलले आहेत.

    मालिकेत काही आस्तिक पात्रे आहेत आणि काही नास्तिक पात्रे. परंतु या सगळ्याच पात्रांचा प्रवास अतिशय गहीरा, रंगीत आणि भरीव झालाय. किंबहूना पात्रे कशी लिहावीत याचा वस्तुपाठच या मालिकेला म्हणता येईल. एकूण एक पात्राच्या दृढ होत जाणाऱ्या, बदलत जाणाऱ्या श्रद्धा खरोखरीच मेंदू आणि मनावर शहारे आणतात. सश्रद्धांपैकी काहींच्या श्रद्धा डगमगतात तर अश्रद्धांपैकी ज्यांच्याकडून सर्वांत कमीहूनही कमी अपेक्षा होती, त्यांच्या मनात श्रद्धेचे अंकुर फुटतात. धार्मिक असणारे सहजच अधर्माचरण करून जातात तर काही धर्मच नाकारणारे आपल्याही नकळत एखादा धर्मच स्थापन करून पाळायला सुरुवात करतात. आस्तिकतेचा अतिरेक नास्तिकतेप्रत नेऊन, मूळ सांगाडाच मोडतो तर नास्तिकतेचाही अतिरेक नास्तिकतेबाबत आस्तिकतेचा अट्टाहास निर्माण करून मूळ सांगाडाच मोडतो. वाचायला किती जरी तात्त्विक वाटत असले तरी मालिकेत ही सगळीच स्थित्यंतरे अतिशय रोमहर्षक, मनोरंजक व तितक्याच सूचक संयतपणाने मांडली आहेत, हेच मला वाटते या मालिकेचे सर्वांत मोठे यश आहे!

    अमांडा कॉलिनने इतके उत्कृष्ट काम केले आहे की, शब्दांत मांडताच येणार नाही. आई, रक्षक, भक्षक, नव्याच जाणीवांनी बिथरून गेलेले यंत्र अशा विस्तृत पटावर तिने लीलया संचार केला आहे. अबुबकर सलीमने यंत्रमानवाच्या रूपात संयतपणाची कमाल केली आहे. किंबहूना आपल्याकडे यंत्रमानव म्हटला की विनाकारण ब्रेकडान्ससारख्या हालचाली आणि विचित्र पद्धतीत बोलणे, एवढाच अर्थ ठाऊक असणाऱ्यांनी या दोघांचे काम पाहायलाच हवे! ‘रेज़्ड बाय वूल्व्ह्ज़’ नावातील कोटी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी लहानग्या विण्टा मॅकग्राने मोगलीचे एक ताजे, प्रलयोत्तर (पोस्ट अपोकॅलिप्टिक) रूप साकारले आहे.

    समान अथवा समांतर घटना नास्तिकासोबत व आस्तिकासोबत घडूनही त्यांचा परिणाम मात्र दोन्हीही विचारसरणींच्या पात्रांच्या वागणुकीमुळे केवढा भिन्न असू शकतो, हे दाखवण्याची मालिकेची पद्धत काहीच्या काही बेफाट सुंदर आहे. मालिकेची आणखी एक जमेची बाजू म्हणजे अत्यधिक नग्नता आणि शिव्या वेबमालिकांचा स्थायीभाव होऊ लागलेला असताना, या मालिकेत नग्नता अतिशय कमी आहे व शिव्या तर जवळजवळ नाहीतच (एका भागात फक्त ‘बिच्’ शब्द वापरलेला दिसतो!). या दोन्ही गोष्टी कमीत कमी ठेवूनही निव्वळ कल्पनाशक्ती व सशक्त कथानक यांच्या जोरावर चांगली मालिका बनवता येऊ शकते, हे आपल्याकडील वेबसीरीजकारांनी ‘रेज़्ड बाय वुल्व्ह्ज़’कडून आवर्जून शिकण्यासारखे आहे!

    माझा आक्षेप आहे तो ट्रॅव्हिस फिमलबद्दल. त्याने साकारलेल्या राग्नार लोथब्रोकच्या (‘व्हायकिंग’, २०१३-२०१७) भूमिकेचा मी अतोनात पंखा आहे. ही मालिका मी पाहायला सुरुवात केली ती त्याच्याच साठी. आणि तिथेच माझा भ्रमनिरास झाला. भौगोलिक परिस्थिती वगळता त्याने साकारलेले मार्कसचे पात्र आणि राग्नार यांच्या लेखनात व परिपोषात काडीमात्र फरक नाही. ही लेखकाची त्रुटी आहे. त्याहून वाईट म्हणजे ज्या देहबोलीमुळे राग्नार प्रचंड लोकप्रिय झाला, ती देहबोली नव्या पात्रासाठी म्हणून बदलण्याचे ट्रॅव्हिसने किंचितदेखील कष्ट घेतलेले नाहीत. राग्नार पाहाताना मला वाटायचं की, काय ताकदीचा कायिक अभिनेता आहे. पण आता वाटतं की, याला एकतर एवढेच जमते किंवा त्याला काहीतरी आजार आहे की काय? कारण या दोन कारणांच्या शिवाय त्याचे राग्नारसारखेच सदोदित भिरभिरणारे डोळे, बोलताना गरजेपेक्षा जास्त हलणारे चेहऱ्याचे स्नायू यांचे स्पष्टीकरण देताच येत नाही. इथे एक लक्षात घ्या की, त्याने साकारलेले मार्कसचे पात्र या मालिकेच्या दृष्टीने चपखलच आहे, मात्र त्यात लेखनाच्या व अभिनयाच्या दृष्टीने काही एक नावीन्य नाही, एवढेच! शिवाय या मालिकेवर रिडली स्कॉटच्या आधीच्या फिल्मॉग्रफीचा खूपच जास्त प्रभाव जाणवतो, हे वेगळंच.

    मालिकेच्या पहिल्या पर्वाचा अंतिम भाग आधीच्या नऊ भागांमध्ये निर्माण केलेल्या प्रश्नांपैकी काहींची उत्तरे देतो. काही भयंकर रहस्योद्घाटनेही करतो. पण त्याचवेळी अनेकपटींनी जास्त प्रश्न निर्माणसुद्धा करून पुढच्या पर्वासाठी सुयोग्य उत्कंठा निर्माण करतो! माझी एक कसोटी आहे. त्याला मी ‘दुसऱ्या पर्वाची कसोटी’ नाव दिलंय. बऱ्याच मालिका पहिले पर्व कमाल देतात. पण पहिल्या पर्वाच्या यशामुळे म्हणा वा कथेच्या कमतरतेमुळे म्हणा वा यशामुळे नको ते लोक मालिकेत रस घ्यायला लागल्यामुळे म्हणा, त्यांचे दुसरे पर्व गंडते! याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे राजकीय हव्यासापायी चुकलेले अमेझॉनच्या ‘द बॉईज़’चे दुसरे पर्व! माझे असे गृहितक आहे की, जी मालिका दुसरे पर्वदेखील पहिल्याइतकेच चांगले देते, ती नंतरचे किमान एक पर्व तरी गंडण्याची शक्यता कमी होऊन बसते. त्या अर्थी ‘रेज़्ड बाय वुल्व्ह्ज़’ पहिल्या जबरदस्त पर्वानंतर एका अवघड वळणाशी येऊन थांबलीये. राजकीयदृष्ट्या बरोबर (पॉलिटिकली करेक्ट) ठरण्याचा अट्टाहास, कथेपेक्षा प्रोपगण्डालाच अधिक महत्त्व देणे वगैरे भोवऱ्यांपायी भल्याभल्या मालिका श्रेष्ठतेप्रत जाण्याआधीच बुडाल्या आहेत. ‘रेज़्ड बाय वुल्व्ह्ज़’ ही सुंदररित्या बांधलेली मनूची नौका किंवा नोहाज़् आर्क आता बुडते की तरते, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरेल!

    *४/५

    — © विक्रम श्रीराम एडके
    [अन्य लेख वाचण्यासाठी भेट द्या www.vikramedke.com]

  • शारदेच्या अंशा..

    शारदेच्या अंशा..

    आपल्याला नाही का, लहानपणी छायागीत, चित्रहार, रंगोली वगैरे पाहाताना किंवा बिनाका गीतमाला अथवा तत्सम कार्यक्रम ऐकताना, त्या सुमधूर आणि जनप्रिय गीतांच्या सोबत गुणगुणायची सवय लागते. मग हीच गाणी कधी भेंड्या खेळताना कामी येतात, कधीतरी कुणाला तरी मोहविण्यासाठी चपखल बसतात. मग कुणातरी मित्रमैत्रीणीकडून त्या गाण्याचं कधीतरी कौतुक केलं जातं. आणि ‘आपल्याला गाता येतं’ असा साक्षात्कार सहजच होऊन जातो! गाण्याचं शिक्षण तर झालेलं नसतं. असतो तो फक्त देवाने दिलेला कंठप्रसाद! काही जण तेवढ्यावरच खुश राहातात. जसजसं वय वाढतं आणि कालानुरुप विविध जबाबदाऱ्या खुणावू लागतात, तसतसं गाणं दुरावत जातं. ते उरतं फक्त चार नातेवाईक-मित्रांच्या फर्माईशीपुरतंच! पण काही जण मात्र असतात जे या कंठाला हिरा मानून पैलू पाडू लागतात. गायन त्यांना अक्षरश: झपाटून टाकतं. असाच एक मुलगा होता. गाण्याने झपाटलेला. इंजिनियरींग करत होता तो. पण म्हणतात ना, तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या पाठी धावायचं असेल, तर आधी इंजिनियर बना आणि मग इंजिनियरींग सोडून तुमच्या स्वप्नांची वाट चालू लागा. याच्याही आयुष्यात इंजिनियरींग तेवढ्याच पुरतं होतं! पुढे विषमज्वर झाला तेव्हा तर इंजिनियरींग सुटलं ते सुटलंच. पण गाणं नाही सुटलं. श्वास घेणं कुणी सोडू शकेल का? गाणं श्वास होता त्याचा. गायचा. कॉलेजच्या कार्यक्रमांत गायचा. ऑर्केस्ट्रामध्ये गायचा. स्पर्धांमध्ये गायचा. अशाच एका स्पर्धेत त्याचा दुसरा क्रमांक आला. पुरस्कार कुणाच्या हस्ते तर साक्षात एस. जानकींच्या! त्यांनी संयोजकांना सांगितलं की, “पहिल्या क्रमांकाचा मुलगा खूपच चांगला गायला, पण त्याने घंटाशालांची नक्कल केली. दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा मात्र त्याच्या स्वत:च्या आवाजात गायला”. त्यांनी त्याला पुढे बोलावून विचारलं, “तू चित्रपटांसाठी पार्श्वगायन करायचा प्रयत्न का नाही करत”? हा बावरला, “अहो मी कॉलेज सुटल्यावर मधल्या काळात काय करायचं म्हणून सहज आलो होतो हो स्पर्धेत. मी काही संगीत शिकलेलो नाही”. जानकी हसल्या, म्हणाल्या, “मी तरी कुठे शिकलेय”! त्याचा विश्वासच बसेना. एवढ्या मोठ्या गायिका ज्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर एकछत्री अधिराज्य गाजवतायत त्या आपल्याला म्हणतात की, मी कुठे संगीत शिकलेय आणि वर सांगतात की तू चित्रपटांसाठी प्रयत्न कर म्हणून! त्याला वाटलं की, आपला दुसरा क्रमांक आला म्हणून सांत्वन करण्यासाठी तर म्हणाल्या नसतील या असं? पण मनात स्वप्नाचं बीज पेरलं गेलं ते गेलंच!

    मग सुरू झाला अजून जोमाने सराव, स्पर्धा, बक्षिसं! चेन्नईत अशीच एक स्पर्धा होती. नामवंत परीक्षक होते. याने सुद्धा भाग घेतला होता. तिथे गेल्यावर समजलं की, स्पर्धेत चित्रपटगीत गाण्याची परवानगी नाही. आता आली का पंचाईत! याला तर दुसरं काही गाताच येत नव्हतं. काय करावं? याचा क्रमांक यायला वेळ होता. हा तसाच उठून चेन्नईच्या सुप्रसिद्ध मरीना बीचवर गेला. तिथे बराच वेळ वाळूत बसून त्याने एक गाणं लिहिलं. त्याला स्वत:च चाल लावली. आणि ते गाणं तो स्पर्धेत गायला! जसा तो जागेवर जाऊन बसला, तसा त्याच्यापाशी एक जण येऊन उभे राहीले. त्या सद्गृहस्थांनी तमिळमध्ये विचारलं, “सिनेमा ला पाऽडरीया?”, अर्थात, “चित्रपटात गाशील”? याला वाटलं हा बाबा आपली टिंगलच करतोय! याने पण तोऱ्यात उत्तर दिलं, “पाऽडमाट्टेन”. नाही गाणार!
    “का”?
    “का म्हणजे काय, नाही गायचं मला”.
    तो माणूस क्षणभर थांबला, मग समजूतीच्या स्वरात बोलू लागला, “अरे बाबा तू इतका छान गातोस, म्हणून मी विचारलं. मी म्युझिक डिरेक्टर आहे. माझं नाव कोदंडपाणी”!
    नाव ऐकताच हा ताडकन उभा राहीला. बाप रे! काय बोलून बसलो आपण. ते ही एवढ्या मोठ्या माणसाला. पण कोदंडपाणींनी ते मनावर घेतलं नाही. त्यांनी त्याला ऑडिशनसाठी यायला सांगितलं. कोदंडपाणी, दिग्दर्शक, निर्माते वगैरे अनेक जण बसले होते. काहीतरी गा, म्हणाल्यावर याने क्षणभर विचार केला आणि ज्या गानेश्वराच्या स्वर्गंगेचे चार तुषार अंगावर पडल्यामुळे आपल्याला ही गायनी कळा करावीशी वाटली, त्याच मखमली स्वरांच्या सम्राटाचं, मुहम्मद रफ़ीचं गीत त्याने गायलं. गाताना त्याने एका ठिकाणी, ज्याला हल्ली रिअॅलिटीशोछाप मराठीतसुद्धा इंप्रोव्हायझेशनच म्हटलं जातं त्यासाठी एक अतिशय गोड तेलुगू शब्द आहे, अधिकप्रसंगम् केला. ती जागा ऐकून कोदंडपाणी कमालीचे खुश झाले! पण म्हणून त्याला गाणं मिळालं का? तर अजिबात नाही!

    त्याला पहिलं गाणं मिळण्यासाठी तब्बल दोन वर्षे वाट पाहावी लागली. ते गीत होतं, तेलुगू चित्रपट “श्रीश्रीश्री मर्यादारामण्णा”मधील (१९६७) “येमिये विण्टा मोहम्”! एकल गीत नव्हतं ते. त्याच्याखेरीज पी. सुशीला, के. रघुरामय्या आणि पी. बी. श्रीनिवाससुद्धा होते त्यात. गाण्याचं मुद्रण झालं १५ डिसेंबर १९६६ ला. त्यानंतर आठवडाभरातच त्याने कन्नड चित्रपट “नक्करे अदे स्वर्गा”साठी (१९६७) द्वंद्वगीत गायले, “कनसिदो मनसिदो”! आणि त्याबरोब्बरच संगीतप्रेमींच्या मनात एका अढळ ध्रुवताऱ्याचा जन्म झाला, श्रीपती पंडिताराध्युला तथा एस. पी. बालसुब्रह्मण्यम!

    हे मी लिहितोय, ते एसपी अकाली गेले त्या संध्याकाळी. मी अकाली असा शब्द का वापरतोय? त्यांच्या वयाची पंचाहत्तरी आलेली. शरीर वृद्धत्वाच्या पाशी जखडलेलं. पण गळा? गळा तितकाच ताजातवाना, टवटवीत जितका तो त्रेपन्न वर्षांपूर्वी होता. जो स्फटिकासारखा स्वच्छ स्वर तुम्ही त्यांच्या साठच्या दशकातील “येमिये विण्टा मोहम्” गीतात ऐकाल तोच, तसाच, आणि तितकाच निखळ स्वर तुम्हाला काही महिन्यांपूर्वी संगीताधिपती इलयराजासाठी मुद्रित केलेल्या “भारतभूमी”मध्ये सुद्धा ऐकू येईल. आणि या दोन्हीही गाण्यांच्या मध्ये तेलुगू, तमिळ, कन्नड, मलयाळम, हिंदी, मराठी इ. १६ विविध भाषांमध्ये एसपींनी गायलेली तब्बल ४०,००० हून अधिक गाणी येतात! हा म्हटलं तर चमत्कार आहे आणि म्हटलं तर एस. पी. बालसुब्रह्मण्यम नावाच्या गंधर्वाची अतुट साधना आहे!

    गायकाची कारकीर्द नेमकी केवढी असते हो? हल्लीची चित्रपटगीते ऐका. कुणातरी रेकणाऱ्या गायकाचे एखादेच गाणे चालून जाते. तो गायक मग ऑटोट्यूनच्या बळावर दोन-पाच वर्षे चालतो न चालतो तोच त्याच्याच सारखं गाणाऱ्या दुसऱ्या गायकाचा प्रादुर्भाव होतो. गाणे गायकीपेक्षा युट्यूब व्ह्यूजवर चालण्याच्या सध्याच्या काळात खरे वाटणार नाही की, एसपींनी एम. एस. विश्वनाथन, इलयराजा, रहमान आणि आता अनिरुद्ध अशा संगीतकारांच्या चार वेगवेगळ्या पिढ्या तब्बल अर्धशतकभर गाजवल्या आहेत. आजही जेव्हा सुपरस्टार रजनीकांतच्या एखाद्या चित्रपटाचं इंट्रो साँग समोर येतं, तेव्हा फक्त आणि फक्त एसपींचाच आवाज त्या जागी सुचतो. पण हेच एसपी जेव्हा कमल हासनसाठीही करून दाखवतात, नागार्जुनसाठी करून दाखवतात, चिरंजीवीसाठी करून दाखवतात, तेव्हा कळतं की हे खायचं काम नव्हे! हिंदीतसुद्धा नव्वदच्या दशकातल्या सलमानच्या चित्रपटाची एसपींशिवाय कल्पना करणंच अवघड आहे. पण म्हणून हिंदीने एसपींना त्यांच्या अधिकाराचं स्थान दिलं का?

    सुपरस्टार एम. जी. रामचंद्रन एकदा एव्हिएम स्टुडियोत शुटिंग करत होते. दोन शॉट्सच्या मधल्या वेळेत त्यांचा एका कडुनिंबाच्या झाडाखाली बसण्याचा शिरस्ता. तसे ते बसलेले असताना त्यांच्या कानावर एका मुद्रणाचे स्वर पडले. त्यांनी गाणं ताबडतोब ओळखलं. त्यांच्याच एका तमिळ चित्रपटगीताचं तेलुगू अनुवादित गाणं होतं ते. त्यांना गायकाचा स्वर मात्र वेगळाच वाटला. एमजीआरनी एका मदतनिसाला चौकशीकरता पाठवलं. काही क्षणांत माहिती मिळाली की, हा कुणीतरी बालसुब्रह्मण्यम नावाचा पोरगा आहे आणि त्याने याआधीसुद्धा थोडीफार गाणी गायली आहेत. झालं! दुसऱ्याच दिवशी एसपींच्या दरीद्री खोलीबाहेर एक लांबलचक गाडी येऊन उभी राहिली. एसपी तर सोडाच त्या भागात तशी गाडी कधीच कुणीच पाहिली नव्हती. गाडीतून पद्मनाभन नावाचे गृहस्थ उतरले. त्यांनी एसपींना अदबीने विचारलं, “तुम्हाला वेळ कधी असेल सांगता का, एमजीआर भेटू इच्छितात”! एवढा मोठा सुपरस्टार भेटायचं म्हणतोय तर नाही कोण म्हणणार. एसपी म्हणाले, “कुठे यायचं तेवढं सांगा. माझ्याकडे सायकल आहे, मी येतो”. त्यावर पद्मनाभन म्हणाले, “तुम्ही तसदी घेऊ नका, मीच गाडी घेऊन तुम्हाला न्यायला येईन”. कट टू. पोरसवदा एसपी भल्यामोठ्ठ्या स्टुडियोत एमजीआर, संगीतकार, निर्माते वगैरेंच्या समोर उभे. एमजीआर म्हणाले की, “मला तुझं गाणं ऐकायचंय”. एसपींना वाटलं की, काहीतरी ऑडिशनसारखा प्रकार आहे. म्हणून ते काहीतरी गाणार तेवढ्यात संगीतकाराने त्यांना गाण्याचा कागद दिला. त्यांच्याकडून गाणं घटवून घ्यायला सुरुवात केली. तेव्हा कुठे एसपींना कळालं की, आपल्याला साक्षात एमजीआरसाठी गायचंय! चित्रपटाचं नाव होतं “अडिमयी पेन” (१९६९). एमजीआर आणि जयललिता अशी ऑलटाईम ब्लॉकबस्टर स्टारकास्ट! बिगबजेट! एमजीआरनी सांगितलं की, लवकरच या गाण्याचं चित्रण राजस्थानात होणार आहे. थोडक्यात, एसपींच्या कारकीर्दीला वळण देणारं गाणं असणार होतं ते. तीन दिवस गाण्याचा सराव चालला. आता चौथ्या दिवशी मुद्रण करायचं. ठरल्याप्रमाणे ती मोठ्ठी गाडी एसपींच्या खोलीबाहेर आली. पद्मनाभन आत जाऊन पाहातात तर काय, एसपी अंथरुणाला खिळलेले. विषमज्वर! एसपींना कळालं की हातातोंडाशी आलेला घास दैवगतीने हिरावून नेलाय. मध्ये दोन-तीन आठवडे गेले आणि परत एकदा एसपींच्या खोलीबाहेर तिच गाडी येऊन उभी राहीली. काय होतंय हे कळण्याच्या आत एसपी पुन्हा एकदा एमजीआरसमोर उभे! त्यांनी मनात देवाचे लाखवेळा आभार मानले की, ते गाणं तर हातून गेलं पण आपल्याला दुसरं एखादं गाणं तरी मिळतंय. पण झालं भलतंच! संगीतकार के. व्ही. महादेवनांनी त्या आधीच्याच गाण्याचा कागद दिला. एसपी ते गायले. थोड्यावेळाने जरा बुजतच त्यांनी एमजीआरना विचारले की, “तुमचं राजस्थानचं वेळापत्रक ठरलं होतं, मग अजूनही हे गाणं कसं काय ठेवलंत”? त्यावर एमजीआरनी जे उत्तर दिलं, ते एसपींच्या जडणघडणीचा कायमस्वरूपी अविभाज्य भाग बनून गेलं. एमजीआर म्हणाले की, “त्या दिवशी मी तुला हे गाणं देईन म्हणालो. तू नाही तर दुसऱ्या कुणाकडून सहजपणे गाऊन घेतलं असतं मी. पण मग मी विचार केला, या मुलाने घरी जाऊन कॉलेजच्या सगळ्या मित्रांना सांगितलं असेल की, मी एमजीआरसाठी गातोय. उद्या चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्यांनी पाहिलं असतं की, हे गाणं तर दुसऱ्याच कुणीतरी गायलंय. तेव्हा त्यांना काय वाटलं असतं? आपल्या मित्राने थाप मारली! किंवा आपल्या मित्राचा आवाज सुपरस्टार एमजीआरला आवडला नाही. दोन्हीही परिस्थितीत माझं काहीच नसतं गेलं, पण तुझ्या कारकीर्दीवर मात्र कायमचा वाईट परिणाम झाला असता. एकच शेड्युल वाया गेलंय ना, काही हरकत नाही. मी दुसरे प्रसंग चित्रित केले दरम्यान. पण हे गाणं तुझंच होतं, आहे आणि राहाणार”! एसपींना त्या क्षणी केवढं भरून आलं असेल, कल्पना करा. पुढे एमजीआरनी पत्रकार परिषदेत घोषितपणे सांगितलं की, या गुणी मुलाला माझ्या सगळ्या निर्मात्यांनी एक तर गाणं प्रत्येक चित्रपटात द्यावं. सुपरस्टारचा शब्द कोण मोडणार? या घटनेनंतर गायक पी. बी. श्रीनिवास एकदा एसपींना रस्त्यात भेटल्यावर म्हणाले होते, “तू एस. पी. बालसुब्रह्मण्यम नाहीस, एल. जी बालसुब्रह्मण्यम आहेस. लकी गाय बालसुब्रह्मण्यम”!

    मला सांगा ही दानत हिंदीत कितीशा तथाकथित सुपरस्टार्समध्ये आहे? मला आठवतं सात-आठ वर्षांपूर्वी एसपींचं एका स्टारच्या चित्रपटातून हिंदीत पुनरागमन होणार होतं. गाणं मुद्रित झालं. प्रकाशितही झालं. पण चित्रपटात मात्र त्या गाण्याच्या ऐवजी त्या काळी चलती असलेल्या एका असुराचंच गाणं वापरण्यात आलं! आज एसपी गेल्यावर शेकडो हिंदी ताऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली, पण या गंधर्वाने पुन्हा हिंदीत गावं म्हणून प्रयत्न त्यांच्या पैकी किती जणांनी केले?

    १९८१ सालची गोष्ट आहे. सुविख्यात दिग्दर्शक के. बालचंदर त्यांच्याच “मरो चरित्र” (१९७८) या तेलुगू चित्रपटाची हिंदीत “एक दुजे के लिए” (१९८१) नावाने पुनर्निर्मिती करत होते. तेलुगूप्रमाणेच हिंदीतदेखील कमल हासनला एसपींनीच आवाज द्यावा असा त्यांचा आग्रह होता. लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी ठाम नकार दिला. हिंदीचा गंधदेखील नसलेल्या दाक्षिणात्य गायकाचे उच्चार स्वच्छ कसे असतील, हा त्यांचा प्रश्न. त्यावर के. बालचंदरांनी बिनतोड युक्तिवाद केला की, “माझ्या कथेचा नायक हिंदी न येणारा तमिळ दाखवायचाय ना? मग गातानाच तो शुद्ध हिंदीत कसा गाईल”? या युक्तिवादाने एलपींचे समाधान झाले आणि एसपींचा हिंदीत दणक्यात प्रवेश झाला. पदार्पणातच त्यांना त्यांचे हिंदीतील पहिले राष्ट्रपती पारितोषिक मिळाले, हे सांगणे न लगे! अर्थात तत्पूर्वीच त्यांना “शंकराभरणम्”साठी (१९८०) पहिलेवहिले राष्ट्रपती पारितोषिक मिळून झाले होते. सबंध कारकीर्दीत एसपींना एकूण ६ राष्ट्रपती पारितोषिके, ७ फिल्मफेअर पारितोषिके आणि नागरी पुरस्कार व मानद डॉक्टरेटसह अगणित इतर पारितोषिके मिळाली आहेत. विशेष म्हणजे ही राष्ट्रपती पारितोषिके हिंदी, तेलुगू, तमिळ आणि कन्नड अशा वेगवेगळ्या भाषांमधील गाण्यांसाठी मिळाली आहेत. प्रत्येक भाषेत स्वरांची तितकीच उत्कट शिंपण केल्यामुळे कुणी त्यांना गानयोगी म्हणतं, कुणी गानगंधर्व, कुणी काय तर कुणी काय. एमजीआर यांनी मात्र एसपींना एक सुरेख उपाधी दिली होती जी आज सुद्धा चपखल लागू पडते, “पाडुम निला बालू”, अर्थात “गानचंद्र बालू”!

    खूप थोड्या लोकांना ठाऊक असेल की, एसपींनी गायनाव्यतिरिक्त संगीतदिग्दर्शनदेखील तितक्याच ताकदीने करायचे. त्याहून थोड्या लोकांना ठाऊक असेल की, एसपी उत्कृष्ट अभिनय करायचे. सोपं उदाहरण देऊ? “हम से है मुक़ाबला” (१९९४)! सुप्रसिद्ध “प्रेमिका ने प्यार से जो भी दे दिया” गाण्यात तर एसपी मस्तपैकी नाचतानासुद्धा दिसतात!! सबंध कारकीर्दीत अभिनेता म्हणून पन्नास-एक तरी चित्रपट आणि मालिका केल्या असतील त्यांनी. कमल हासन, रजनीकांत, मोहनलाल वगैरे अनेकानेक अभिनेत्यांसाठी पंचवीस-एक चित्रपटांतून डबिंगसुद्धा केलीये त्यांनी. रिचर्ड अटेनबरोच्या “गांधी”साठी बेन किंग्सलेला तेलुगूमध्ये एसपींनीच आवाज दिलाय. “इटिव्ही तेलुगू”वर एक रिअॅलिटी शो लागायचा, “पाडुदा तिय्यगा” नावाने. एसपी त्याचे परीक्षक होते. त्याचे एपिसोड्स मिळवून नक्की पाहा, अगदी तेलुगू समजत नसली तरीही चिकाटीने पाहा. एकेका गाण्यानंतर एसपी ज्या सुरेल आणि सुरेख पद्धतीने त्या गीताचे आणि गाण्याचे विश्लेषण करायचे ते आपल्याकडील टिआरपीच्या हव्यासापोटी सिम्पथीवर चालणाऱ्या स्क्रिप्टेड रिअॅलिटी शोजना बापजन्मी साधणारे नाही. या कार्यक्रमात एसपी अखेरीस एक नेहमीचाच आपल्या माहितीतला श्लोक किंचित बदलून म्हणायचे, “सर्वे जना: सुजनो भवन्तु, सर्वे सुजना: सुखिनो भवन्तु”, तेव्हा खरंच सांगतो शहारा यायचा.

    सामान्यतः गायकाची शैली ठरलेली असते, रेंज ठरलेली असते. बहुतांशी गायक त्याच चौकटीत गातात. पण एसपींनी गायलेला नाही असा चित्रपटगीतांत एकसुद्धा जॉनर नाही. शृंगार, हास्य, रौद्र, कारुण्य, बीभत्स, भयानक, वीर, अद्भुत, शांत यांच्यापैकी कोणताच रस असा नाही, ज्यात एसपींनी लीलया संचार नाही केलेला. पण एसपींना कधीतरी बोलताना ऐका. त्यांचे तेलुगू, तमिळ, कन्नड शब्दोच्चार हे सुस्पष्टतेचा नमुना आहेत अक्षरशः. एसपी इंग्रजी बोलायचे तेव्हा त्या बोलण्याचा लहेजा, शब्दांची निवड, भावना अक्षरशः शोषून घ्यावंसं वाटतं.

    खरं सांगू का, खूप लिहिलंय. तरीही एसपींना एक टक्कासुद्धा शब्दांत पकडता नाही आलेलं मला. खरं तर हा लेख एसपींच्या सच्छील आयुष्याचं माझ्यासारख्या सामान्य रसिकाने केलेलं सेलिब्रेशन आहे केवळ. ही आदरांजली आहे, मृत्यूलेख खचितच नाही. कारण, संस्कृतात श्लोक आहे,
    “जयन्ति ते सुकृतिनो रससिद्धा: कवीश्वरा:।
    नास्ति येषां यश:काये जरामरणजं भयम् ।।”
    हा श्लोक जणू काही एसपींसाठीच लिहिलेला असावा, इतका त्यांना चपखल लागू पडतो तो. पण एवढं लिहूनही एक गोष्ट मात्र लिहायची राहिलीच! लेखाच्या सुरुवातीला लिहिलंय की, एसपींनी कोदंडपाणींच्या समोर अधिकप्रसंगासहीत रफ़ींचं एक गीत सादर केलं होतं. ते गीत कोणतं होतं? ते होतं, “दोस्ती” (१९६४) चित्रपटातील सुमधुर गीत, “जानेवालों ज़रा”! काल एसपी गेल्यानंतर या गीताला एक नवाच आयाम लाभलाय. विशेषतः
    “इस अनोखे जगत् की मैं तक़दीर हूँ
    मैं विधाता के हाथों की तसवीर हूँ
    इस जहाँ के लिए
    धरती माँ के लिए
    शिव का वरदान हूँ, मैं तुम्हारी तरह”
    या ओळी आता मला तरी आयुष्यभर एसपींशिवाय अन्य कुणाची सय नाही देऊ शकणार! अनेक कलाकार असतात, जे सरस्वतीचे वरदान घेऊन येतात. एसपी साक्षात वाग्देवीचा अंश होते. तो अंश काल वागेश्वरीकडे परत गेला, आपला आवाज तुम्हां-आम्हां रसिकांच्या अंत:करणात जिवंत ठेवून. शारदेच्या अंशा, तुला सद्गती लाभो!!

    — © विक्रम श्रीराम एडके

    लिंक: https://bit.ly/3cz9LjN

    (एसपींना आदरांजली वाहाण्याच्या निमित्ताने ‘विवेक साप्ताहिका’च्या ई-आवृत्तीत प्रकाशित झालेला लेख.)

  • शब्दांत न मावणारी — बॉडीगार्ड

    मी अनेक चित्रपटांबद्दल लिहितो. गेल्या काही वर्षांपासून मला आवडलेल्या मालिकांबद्दल देखील नियमितपणे लिहितो. अगदी “गेम ऑफ थ्रोन्स”सारख्या (२०११-१९) ७३ भागांच्या किंवा “पर्सन ऑफ इंटरेस्ट”सारख्या (२०११-१६) १०३ भागांच्या मालिकेबद्दलही मी भरभरून लिहिलंय. त्यांच्याबद्दल लिहिताना माझी लेखणी कुंठित झाल्यासारखी, अवरुद्ध झाल्यासारखी आजवर कधी एकदा सुद्धा वाटली नाही. परंतु आज मात्र माझी लेखणी एका अवघ्या ६ भागांच्या मालिकेपुढे थबकली आहे. चोवीस तास उलटून गेले मी ही मालिका पाहून, परंतु अजूनही मी लिहिताना शंभरदा खोडतोय. ती मालिका म्हणजे, बीबीसी-वनची “बॉडीगार्ड” (२०१८-)!

    डेव्हिड बड/बुड (रिचर्ड मॅडेन) हा भूतपूर्व सैनिक युद्धावरून जरी परतलेला असला, तरीही युद्धाच्या जखमा अद्यापही अंगावर आणि मनावर बाळगून आहे. तशातच त्याची निवड कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाची सांसद आणि गृहसचिव ज्युलिया मॉण्टेग्यूचा (कीली हॉज) अंगरक्षक म्हणून होते. ही बाई मोठी धीराची आहे. अल्पावधीतच तिने राष्ट्रीय राजकारणात मोठी मजल मारलीये. आणि आता ती संसदेत जे विधेयक मांडणार आहे, त्यानंतर तर ती थेट पंतप्रधानपदाच्या शर्यतीतच आघाडी घेण्याची शक्यता आहे. यातून अर्थातच कल्पनेपल्याडचा आवाका असलेलं शह-काटशहांचं घट्ट जाळं विणलं जाऊ लागतं!

    माझा एक सर्वसाधारण नियम आहे. कोणत्याही मालिकेने पहिल्या पंधरा मिनिटांत मला प्रभावित केले नाही, तर नंतर तिने प्रभावित करण्याची शक्यता खूपच खालावते. उदाहरणार्थ, “पर्सन ऑफ इंटरेस्ट”. ती पहिल्या दहा मिनिटांतच चित्रपटीय तंत्रे, कथन आणि साहसदृश्ये अशा विविध आघाड्यांवर जी बाजी मारते की, मालिका पाहाण्याच्या उत्साहाला जेटपॅकच लागले पाहिजे. “बॉडीगार्ड”चा पहिला प्रसंग एका रेल्वेत घडतो. जवळजवळ पंधरा-वीस मिनिटं चालतो तो. खरं सांगतो, तो प्रसंग संपल्यावर मी दहा मिनिटं मालिका पॉज करून बसलो होतो, फक्त शांतपणे श्वास घेण्यासाठी! एवढी ही मालिका तुम्हाला शोषून घेते. इतका ताण मी अलिकडच्या काळात कोणत्याच मालिकेत अनुभवलेला नाही. एवढेच नव्हे, तर प्रत्येक भागातील तणावाच्या प्रत्येक प्रसंगात तितकाच तणाव निर्माण करण्यात ही मालिका पूर्णपणे यशस्वी ठरली आहे.

    डेव्हिड आपल्या कामात कमालीचा पक्का आहे. पण वैयक्तिक दृष्ट्या त्याला मॉण्टेग्यूचे राजकारण पटत नाही. किंबहूना त्याला राजकारणाची तितकी सखोल समजदेखील नाही. तो आपला साधा रांगडा सैनिक आहे. आयुष्य आणि परिस्थिती दोन्ही बाजूंनी गांजलेला आहे. त्याचं नशिब अतिशय वाईट आहे. त्याच्या कामाच्या ठिकाणी त्याला लोकांचं ऐकून घ्यावं लागतं, ते त्याचं कामच आहे. सगळीकडचे वरिष्ठ त्याला सहजी वापरून घेतात. परंतु वैयक्तिक आयुष्यातही तो अतिशय अपोलोजेटिक बनलाय. तो जितक्या वेळा बायकोला उगाचच सॉरी म्हणतो, तितकं क्वचितच कुणी म्हणत असेल. पण तरीही तो अत्यंत चाणाक्ष आहे. त्याच्या कामासाठी आवश्यक अशा एकूण एक थियरेटिकल आणि प्रॅक्टिकल कौशल्यांचा खजिना आहे त्याच्यापाशी. इतकं गुंतागुंतीचं पात्र अलिकडच्या काळात क्वचितच कोणत्या मालिकेत लिहिलं गेलं असेल. त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या सगळ्याच्या सगळ्या बाबी रिचर्ड मॅडेनने ज्या काही संयतपणाने अधोरेखित केल्या आहेत त्याला तोड नाही.

    मुळात ही मालिका मी बघायला सुरू केली होती ती “अरे, रॉब स्टार्कची मालिका” असा विचार करून. परंतु पहिल्या दहाच मिनिटांत रिचर्ड मॅडेनने माझ्या मनातील त्याची रॉब स्टार्कची छवि कायमची पुसून टाकली. त्याने जे काम केलेय, ते अक्षरशः डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. “बॉडीगार्ड”च्या भूमिकेत आपल्या वैयक्तिक भावना चेहऱ्यावर दिसू न देण्याची त्याची शैली निव्वळ अप्रतिम आहे. एकदा त्याला ड्युटीवर असताना हसायचा प्रसंग येतो, त्या वेळी तो ज्या प्रकारे पापणीची उघडझाप करावी तितक्या निमिषार्धात तोंड उघडून मिटतो की, वाह रे वाह! किंवा एकदा त्याला ड्युटीवर असताना एक वाईट बातमी समजते. तो त्यावर काहीच प्रतिक्रिया देत नाही, परंतु त्याचा एकच गाल ज्या सहजपणे थरारतो, तो निव्वळ बघण्याचा विषय आहे. तोच रिचर्ड मॅडेन डेव्हिडचे वैयक्तिक आयुष्य चितारताना मात्र कायिक अभिनयातून भावनांचा कल्लोळ असा काही चितारतो की, विचारता सोय नाही. प्रमाणापलिकडे हँडसम, ब्रिटीश आणि अभिनयाची सांगोपांग जाण असणारा हा माणूस सर्वार्थाने उज्ज्वल भविष्याचा धनी आहे. त्यामुळेच जेम्स बॉण्डची भूमिका करण्यासाठी योग्य निवड कोण असे जर कुणी मला विचारले, तर मी क्षणाचाही विलंब न करता इथून पुढे रिचर्ड मॅडेनचेच नाव घेणार आहे. शेकडो कारणं आहेत “बॉडीगार्ड” पाहाण्याची, परंतु एकाच कोणत्या तरी कारणासाठी पाहाणार असाल, तर फक्त आणि फक्त रिचर्ड मॅडेनच्या कामासाठी पाहा! अर्थातच कीली हॉजने व्यावसायिक आयुष्यात कणखर परंतु वैयक्तिक आयुष्यात कमालीची भित्री ज्युलिया मॉण्टेग्यू तितक्याच सक्षमपणे उभी केलीये. तिच्या माध्यमातून लेखक आणि दिग्दर्शकांनी राजकीय व्यक्तिमत्त्वांच्या दुहेरी आयुष्यावर केलेले भाष्य अगदीच अचूक आहे!

    काही मालिका या थ्रिलर असतात. काही पॉलिटिकल थ्रिलर असतात. काही सस्पेन्स थ्रिलर असतात. काही अॅक्शन थ्रिलर असतात. काही सायकॉलॉजिकल थ्रिलर असतात. “बॉडीगार्ड” मात्र अशा दुर्मिळ प्रजातीत येते की, ती एकाच वेळी या सगळ्याच प्रकारची आहे. ती एकाच वेळी जिहाद, उजव्या विचारसरणीचा नैसर्गिकरित्या जगभर चढता आलेख, युद्ध आणि त्याचे परिणाम, राजकारणातील दुर्गम डावपेच, कायदा आणि सुव्यवस्था, पीटीएसडी अशा वेगवेगळ्या – म्हटलं तर परस्परावलंबी आणि म्हटलं तर पूर्णतया भिन्न विषयांबद्दल अनेक स्तरांवर आणि सखोल भाष्य करते, आणि ते ही केवळ ६ च भागांत! या मालिकेत दाखवलेले राजकारण हे शब्दशः “हाऊस ऑफ कार्ड्स” (२०१३-१८) आणि “गेम ऑफ थ्रोन्स”च्या वरताण आहे. “बॉडीगार्ड” आणि त्यांच्यातील सगळ्यांत मोठा फरक म्हणजे, उपरोक्त दोन्हीही मालिका या नंतरच्या पर्वांमध्ये पारच गंडल्या, परंतु “बॉडीगार्ड”ला मात्र भल्याभल्यांना न समजू शकलेली एक गोष्ट समजलीये, नेमके कुठे थांबायचे! आपण कितीही अंदाज लावायचा प्रयत्न केला तरीही असीम संयतपणे उलगडत जाणाऱ्या या नाट्याने रहस्याच्या पेटाऱ्यावरील झाकण अखेरपर्यंत घट्ट बंद राखण्यात पूर्ण यश मिळवलेय.

    तुम्ही जर मालिका त्यांच्यातील चित्रपटीय तंत्रांसाठी पाहात असाल, तर या मालिकेसारखी दुसरी मालिका एवढ्यात तरी कोणतीच दिसत नाही. स्टीव्ह सिंगल्टन व अँड्र्यू जॉन मॅकक्लिलण्ड यांनी तणावाचे प्रसंग ज्या पद्धतीने संपादित केले आहेत, ते संपादनाचे वस्तुपाठ आहेत. जॉन ली ने ज्या पद्धतीने दृश्ये त्यांच्या चपखल कलर पॅलेटसह चितारली आहेत, ती छायाचित्रणाचा वस्तुपाठ आहेत. थॉमस व्हिन्सेंट आणि जॉन स्ट्रिक्लॅण्ड यांनी छोट्या छोट्या प्रसंगांतून, साध्याश्याच सूचक वाक्यांतून, सांकेतिक मौनांतून जे नाट्य उभे केलेय, ते दिग्दर्शनाचे वस्तुपाठ आहेत. एकच उदाहरण सांगतो. ज्युलियाची टिव्हिवर प्रश्नोत्तरी चित्रित होतेय. ती प्रश्नांची उत्तरं देतेय. परंतु कॅमेरा मात्र डेव्हिडच्या चेहऱ्यावर आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर तिची प्रश्नोत्तरी प्लेबॅकमध्ये दिसतेय. तिच्या शब्दांवर तो मौनातूनच प्रतिक्रिया देतोय, हे दृश्य इतक्या कल्पकतेने चित्रित केलेय की मन आपसूकच स्तुती करू लागते! एक उदाहरण म्हणालो, पण अजून एक सांगण्याचा मोह आवरतच नाहीये. डेव्हिड ज्युलियाच्या कार्यालयाबाहेर उभा राहून तिच्यावर लक्ष ठेवतोय. ती कार्यालयात एक मिटिंग घेतेय. दृश्य त्याच्या पीओव्हीने आणि त्रयस्थ असे इंटरकटमध्ये दिसते. परंतु ऐकू मात्र केवळ त्रयस्थ नजरेतूनच येते. त्याच्या पीओव्हीला पूर्ण शांतता आहे. का? कारण तो साऊंडप्रुफ काचेच्या बाहेर उभा आहे. इतक्या साध्या युक्तिने दिग्दर्शक तांत्रिक गंमत तर करतोच, शिवाय त्या दोघांमधील सामाजिक आणि बौद्धीक दरीदेखील उभी करतो! असे अनेक छोटे-छोटे प्रसंग आहेत, जे निव्वळ तांत्रिक क्षमतेच्या जोरावर शहारा निर्माण करतात. कसदार कथेला अशी तांत्रिक शुद्धतेची जोडच, या मालिकेला अजोड बनवते!

    व्यक्तिश: मी अमेरिकन मालिकांपेक्षा ब्रिटीश मालिकांचा चाहता आहे. एक तर ते अजूनही अभिनयाला व्यवसायापेक्षा कला अधिक समजतात. त्यांचे नाट्य हे कायमच नैसर्गिक असते. मी सदर्न, नॉर्दर्न, कॉक्नी, स्कॉटीश, आयरीश वगैरे विविध ब्रिटीश उच्चारपद्धतींचा अतोनात पंखा आहे. त्यांची शब्दसंपदा, उच्चारण्याच्या खानदानी आणि इतर पद्धती – हे खरं इंग्लिश. अमेरिकनांनी इंग्रजी भाषेचे आपल्या संस्कृतीहीन वर्तनाने अवमूल्यनच तेवढे केलेय. पण माझा हा झुकाव बाजूला ठेवूनही “बॉडीगार्ड” सगळ्यांच पातळ्यांवर सरसच ठरते. वर मी लिहिलेय की, या मालिकेबद्दल लिहिताना माझी लेखणी कुठून सुरुवात करू आणि काय काय लिहू, या विचारांनी अक्षरशः थबकलीये. आता एवढं लिहून झाल्यावरही माझी ती आणि तशीच भावना कायम आहे. एवढे लिहूनही खूप काही लिहायचे राहूनच गेले आहे, नि:संशय “बॉडीगार्ड” ही मालिका खरोखरच शब्दातीत आहे!

    *५/५

    — © विक्रम श्रीराम एडके
    [लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]

    टीप: “बॉडीगार्ड” नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

  • तृप्त करून सोडणारे पक्वान्न — एजंट साई श्रीनिवास आत्रेय

    रॉबर्ट बोल्टन म्हणतो, “A belief is not merely an idea the mind possesses; it is an idea that possesses the mind”. आपल्या प्रत्येकाला रहस्यकथा वाचण्याची, त्या पडद्यावर घडताना पाहायची आवड असते. कित्येकदा तर पडद्यावर खरा खुनी कोण हे कळण्याच्या आतच आपण ते ओळखतो आणि मग नंतर मुख्य नायक आपलीच रीत वापरून जेव्हा ती केस सोडवतो, त्यावेळी एकाच वेळी आपल्याला आनंदही होतो आणि अभिमानही वाटतो. हीच गोष्ट जर लहानपणापासून घडत असेल, तर कोणत्या ना कोणत्या चोरट्या क्षणी आपणही गुप्तहेर व्हायचं ठरवूनच टाकलेलं असतं. पुढे शिक्षण, करिअरच्या धबडग्यात ते अर्थातच शक्य होत नाहीच म्हणा, पण ती फँटसी पहिल्या प्रेमासारखीच ह्रदयाच्या एका कुपीत सचेतन राहून जाते.

    बरं गुप्तहेर होण्याची जी आवड असते, ती नुसती अवघड आणि अचाट गुन्ह्यांचा थांग लावण्यापुरतीच नसते बरं का! त्या त्या गुप्तहेराची स्टाईल, त्याची बुद्धीमत्ता, हजरजबाबीपणा सगळं सगळं आपल्याला हवंहवंसं वाटत असतं. शेरलॉकचा पाईप, बॉण्डची मार्टिनी, मंकचे वाईप्स हे सगळे आपल्याला नकळतपणे आकर्षित करत असतात. पण खऱ्या गुप्तहेरांचं आयुष्य खरंच एवढं ग्लॅमरस असतं का हो? खून काही रोज घडत नाहीत. इतरवेळी गुप्तहेराचं पोट कसं चालावं? मग कुणाच्या जीवनसाथीवर पाळत ठेव, कुठे नवऱ्या मुलाची पार्श्वभूमीच काढून दे अशी बेचव पण जगवणारी कामं करावी लागतात. किंबहूना तेच मुख्य अन्न आणि मोठ्या केसेस सप्लिमेंटरी असतात खऱ्या गुप्तहेरांच्या आयुष्यात. पण अर्थातच वरलिया रंगा भुललेल्या आपल्याला याची काडीमात्र कल्पना नसते. असाच वास्तवाशी अनभिज्ञ गुप्तहेर आहे, साई श्रीनिवास आत्रेय (नवीन पोलिशेट्टी)! तो स्वतःला एजंट म्हणवतो. विविध रहस्यपटांचे रहस्य आधीच सोडवून दाखवण्याला यश मानतो. भारतात राहूनही ओव्हरकोट वगैरेसारखा तद्दन क्लिषेड पोशाख करतो. हॉलिवूडच्या हिरोची नक्कल करत कॉफीचा मग घेऊन वावरतो. थोडक्यात बाह्यांतरी सगळा आव आणतो. पण! या “पण”मध्येच गोची आहे. — पण त्याच्याकडे काम नाही! — पण तो हुशार, चाणाक्ष, चतुर असूनही त्याला वास्तवात पोलिस तपास आणि दुनियादारीची जरादेखील समज नाही. — पण त्याला लोकांच्या हरवलेल्या दुधाच्या पिशव्या शोधाव्या लागतात. — पण त्याचा सातत्याने अपमान होत राहातो! त्याची ही अतिशय खुमासदार, नर्मविनोदी कथा म्हणजे “एजंट साई श्रीनिवास आत्रेय” या तेलुगू चित्रपटाची सुरुवात!

    मी सुरुवात म्हणालो, संपूर्ण चित्रपट नाही. कारण जसजसा चित्रपट मुख्य विषयाकडे वळतो, तसतशा गोष्टी गहिऱ्या होत जातात. आत्रेयच्या गावी नेल्लोरला रेल्वेच्या रुळांजवळ सापडलेल्या एका बेवारस प्रेताची केस एकामागोमाग एक भयंकर वळणे घेत राहाते आणि आपली कथादेखील एका मागोमाग एक धक्के देत आंध्रप्रदेश, तमिळनाडू, गुजरात, राजस्थान अशी मोठ्या पटावर फिरू लागते. रहस्यांची गुंतागुंत आणि धक्क्यांची तीव्रता वाढू लागते व अखेरीस आपल्या हाती येतो तो किंचित संथ असा परंतु संपूर्ण समाधानी करून सोडणारा एक चित्रपटानुभव! गेल्या कित्येक वर्षांत तेलुगूत इतका चांगला गुप्तहेरपट झाला नसावा. किंबहूना भारतातील सर्वश्रेष्ठ गुप्तहेरपटांच्या यादीत मानाचे स्थान मिळावे एवढी या चित्रपटाची योग्यता आहे.

    स्वरूप आर. एस. जे. चं दिग्दर्शन प्रभावी आहे. त्याने कथेतले खूप सारे ट्विस्ट्स कुठेही जडजंबालपणा येऊ न देता उत्कृष्ट हाताळले आहेत. नवीन पोलिशेट्टीचे काम मी पहिल्यांदाच पाहिले. हा तरुण अभिनेता जितक्या सहजपणे विनोद करतो, तितक्याच सहजतेने गंभीर दृश्येही साकारतो. असेच चित्रपट निवडत राहिल्यास त्याला निश्चितपणे उज्वल भविष्य आहे. असेच चित्रपट कशाला, या चित्रपटातच एवढी क्षमता आहे की, याचे स्वत:चेच एक सिनेमॅटिक युनिव्हर्स – आत्रेयव्हर्स बनू शकते. मला सर्वांत जास्त कोणती गोष्ट आवडली माहितीये? श्रृती शर्मा इतकी गोड दिसणारी, तितकंच छान काम करणारी नायिका आणि तिला भरपूर स्क्रिनटाईम असूनही कथेत कुठेच प्रेमकथेचा कोन घुसडण्याचा जरादेखील प्रयत्न केलेला नाही. पटकथेचा विषम वेग, किंबहूना काहीसा संथपणा, ही एकमेव त्रुटी सोडल्यास चित्रपट आपल्या उद्दीष्टाशी आणि कथानकाशी अखेरपर्यंत प्रामाणिक राहातो. तेलुगू प्रेक्षकांची सुजाणता अशी की, इतका वेगळा चित्रपट असूनही केवळ दिडच कोटीत बनलेल्या या चित्रपटाने तब्बल एकवीस कोटींचा व्यवसाय केलाय!

    अजून एक धक्का देऊ? चित्रपट पूर्णपणे काल्पनिक असला तरीही त्यांच्या कथेचा पाया हा खरोखर घडलेल्या घटनांवर आधारित आहे. चित्रपटाच्या शेवटी काही सेकंदांतच ते चित्रपटासाठी वापरलेल्या संदर्भांची दृश्यं दाखवतात, त्यावरून दिग्दर्शकाने इतक्या विविधांगी गोष्टी गोळा करून त्यांना एका धाग्यात बांधण्यासाठी केवढे कष्ट घेतलेयत यांची कल्पना येते. मी सुरुवातीला वापरलेले बोल्टनचे अवतरण शेवटी येते, तेव्हा त्याचा संदर्भ खूपच वेगळा, अगदी वैश्विक होऊन गेलेला असतो. आत्रेयची ही पहिलीवहिली मोठी केस त्याच्या वैयक्तिक आयुष्यालाही अगदी नैसर्गिकपणे स्पर्शून जाते, कसलीही घालघुसड, बळजबरीचा आव नाही त्यात. म्हणून तर वर म्हणालो ना की, “एजंट साई श्रीनिवास आत्रेय” हा अतिशय समाधानी करून सोडणारा चित्रपट आहे. बुद्धीला खाद्य, विचारांना चालना, नेहमीच्या घटनांचा दिसतो त्या पलिकडे अर्थ असण्याची शक्यता आणि भावनेला स्पर्श हे जर तुमचे आवडते उद्योग असतील, चित्रपट जर तुम्ही निव्वळ टाईमपासपेक्षा अडिच तास सार्थकी लावल्याच्या तृप्ततेसाठी पाहात असाल, तर मनापासून सांगतो, “एजंट साई श्रीनिवास आत्रेय” हा तुमचा चित्रपट आहे. तो गुप्तहेरपटांचे प्रहसन तर करतोच, परंतु त्याच्या पलिकडेही खूप काही देऊन समृद्ध करून जातो!

    *४/५

    — © विक्रम श्रीराम एडके
    [अन्य लेखांसाठी पाहा www.vikramedke.com]

    टीप: चित्रपट Amazon Prime Video वर उपलब्ध आहे.

  • स्ट्रगलपलिकडचा स्ट्रगलर – पारसमणी ‘पीटर डिंक्लेज’

    स्ट्रगल हा प्रकार म्हटलं तर रोमँटिक असतो, म्हटलं तर अजिबातच नसतो. असतो यासाठी की, यश मिळाल्यावर स्ट्रगल सांगायला आणि ऐकायला, दोन्हींमध्ये मजा येते. आणि नसतो यासाठी की, स्ट्रगल सुरू असताना तो करणाऱ्याला रोमँटिक वगैरे तर सोडाच परंतु अनेकदा हॉररच वाटत असतं. त्याचा स्ट्रगलही असाच, चारचौघांसारखा. आत्ता वाचताना भावनोत्तेजनेने अंगावर काटा आणणारा, पण त्यावेळी त्याच्या फ्लॅटमध्ये हिटर नसल्यामुळे खरोखरीच अंगावर शहारे आणणारा. प्रत्येक स्ट्रगलर करतो तशीच त्याने पोटाची खळगी भरण्यापुरती बरीचशी कामे केली; कुणाचा पियानो साफ करून दे, कुठे फोन ऑपरेटर म्हणून काम कर वगैरै!

    स्ट्रगल तर सगळेच करतात, पण सगळेच स्ट्रगलर्स काही यशस्वी होत नाहीत. कारण, स्वप्नं सगळेच पाहातात, पण ती पूर्ण होण्यासाठी लागणारं परिश्रमांचं इंधन आणि ते जहाज चालू लागण्यासाठी लागणारं नशिबाचं वारं, हा योग सगळ्यांच्याच आयुष्यात नसतो. याच्या बाबतीत गोष्टी अजूनच अवघड होत्या, कारण याची उंची! उंची म्हणण्यापेक्षा, उंचीचा अभाव. तो केवळ साडेचार फुटांचाच होता, किंबहूना आहे. त्यामुळे याला सगळ्या भूमिका तशाच चालून यायच्या, बुटक्यांबाबत झापडबंद विचार करणाऱ्या! हा मानी, त्यामुळे नेमकं तेच तर याला नको होतं. होता होईल तितकं नाकारलंही त्याने, पण अनेक वर्षे रोजच बटाट्याचे वेफर्स रात्रीचं जेवण म्हणून खाणाऱ्याला फारसा चॉईस देत नाही ही चंदेरी दुनिया नावाची जखिण!

    नाटक या विषयावर त्याचं प्रचंड प्रेम. त्याच्याकडे नाट्यशास्त्राची पदवीदेखील आहे. तो आणि त्याच्या एका मित्राने मिळून विल्यम्सन पुलाजवळ एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. हाच तो हिटर नसलेला फ्लॅट. त्यातल्या ओव्हनमध्ये उंदीर पोटभाडेकरूसारखे राहायचे. एकदा तक्रार केली, तर मालक सुरी उगारून अंगावर आला होता म्हणे! अशा परिस्थितीत त्यांच्या तासनतास नाटकांच्या योजना चालायच्या. पण व्यावसायिक नाटकंच नव्हे, तर हे जग नावाचं महानाट्यही एकाच गोष्टीवर चालतं, ती म्हणजे पैसा! नाटकांच्या योजनेसाठी पॅशन पुरते, फ्लॅटच्या भाड्यासाठी खरेखुरे पैसेच लागतात ना! एके दिवशी घरी परतले, तर दरवाज्याला मालकाने घातलेलं भलंमोठ्ठं कुलुप होतं.

    त्याला कामं मिळालीच नाहीत असं नाही. १९९५ पासून चित्रपट मिळत होतेच. पण स्मरणीय काही मिळायला २००३ सालचा “द स्टेशन एजंट” उजाडावा लागला. त्यानंतरही त्याचं नाव फार गाजू लागलं अशातलाही भाग नाही. गाडी चालू लागली, एवढंच. स्ट्रगल संपलं, पण यश मात्र दूर; हा काळ स्ट्रगलपेक्षाही दसपट अवघड असतो. कारण, आता सोबतीला स्ट्रगल करण्याइतका बेबंद नवखेपणा नसतो आणि यशाची चव ऐकूनही माहिती नसते. बरेचसे लोक संपतात ते याच स्ट्रगलनंतरच्या स्ट्रगलमध्ये. हा सुद्धा संपलाच असता. पण तशात त्याला एक भूमिका मिळाली. बुटक्याचीच भूमिका. पण चौकटबद्ध नव्हे, अक्षरशः लाखो पैलू असणारी! मालिकेचं नाव होतं “गेम ऑफ थ्रोन्स” आणि भूमिकेचं नाव होतं टिरियन लॅनिस्टर!!

    याने तिच्यात असा काही जीव ओतला की, “गेम ऑफ थ्रोन्स”च्या महाभारतातला श्रीकृष्ण कुणी असेल, तर तो हाच! त्याची भूमिका राखाडी कंगोऱ्यांची होती, पण त्या मालिकेचं वैशिष्ट्य असलेल्या स्वार्थीपणाच्या पल्याड जाऊ पाहाणारीसुद्धा होती. बुटकेपणामुळे आलेली सारी अवहेलना, अपमान त्याने टिरियनच्या डोळ्यांत उतरवला आणि प्रेक्षक व समीक्षकांनी एकमुखाने डोक्यावर घेतल्यामुळे हा अभिनेता सगळ्यांहून जास्त उंच ठरला! पहिल्या फ्रेमपासून ते शेवटच्या फ्रेमपर्यंत त्याने टिरियनचं केवळ आणि केवळ सोनंच केलं, नंतरच्या काळात शोरनर्सनी माती करण्यात काहीच कसर सोडलेली नसताना!!

    कालच त्याचा एक्कावन्नावा वाढदिवस झाला. मात्र मी अद्याप त्याचे नावच सांगितलेले नाही. कर्तृत्ववान माणसाला वेगळ्या ओळखीची काय गरज? मी न सांगताही तो पीटर डिंक्लेज असल्याचे आपण केव्हाच ओळखले असेल. काल त्याने वयाची पन्नाशी पार केली. पण खरं सांगू, त्याचं स्ट्रगलपलिकडचं स्ट्रगल अद्याप संपलंय असं मला वाटत नाही. कारण “जीओटी” ही आयुष्यात एकदाच घडू शकणारी गोष्ट आहे, ती सतत होत नसते. त्याच्या प्रतिभेची उंची कवेत घेऊ शकणाऱ्या भूमिका मिळणं खरोखरीच दुरापास्त आहे. वॉकिन फिनिक्सने “जोकर”ची पार्श्वभूमी जशी उत्कट साकारली, तशीच हीथ लेजरने “जोकर”ची तिरपागडी शैली अजरामर करून सोडली. माझं वैयक्तिक मत सांगू? “जोकर”ची भूमिका दिल्यास पीटर डिंक्लेज त्याचं कारुण्य आणि बीभत्सपणा, दोन्हीही एकाच वेळी साकारून दाखवू शकतो. पीटर डिंक्लेजला अशा भूमिका मिळत गेल्या, तरच त्याच्या स्ट्रगलपलिकडचा स्ट्रगल खऱ्या अर्थाने संपू शकेल. मात्र तोपर्यंत आणि त्यानंतरही हा पारसमणी येणाऱ्या प्रत्येक भूमिकेचे सोनेच करत राहिल, यात कसलीच शंका नाही!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    [अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]

  • ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिटेक्टिव्हची गोष्ट — मंक

    मनोव्यापार हे असं गूढ आहे, जे जितकं सोडवू जाल तितकं जास्त भुलवतं. आपल्यापैकी प्रत्येकाला आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या वळणावर लहान किंवा मोठ्या स्वरूपाच्या मानसशास्त्रीय विकाराला सामोरं जावंच लागतं. त्या खेरीज आपण रोजच्या आयुष्यातही कित्येक प्रकारचे गंड, भिती वगैरे घेऊनच जगत असतो. पण जर एखाद्याला ३१२ प्रकारचे भयगंड असतील तर? त्याने काय करावं? कोणता व्यवसाय करावा? आणि भयगंड तरी कसले तर जंतू, टोकदार वस्तू, उंची, कोंदट जागा, अळिंबी, सुया, मृत्यू, साप, वीज, गर्दी, विमाने, मुंग्या, लहान बाळं, पक्षी, माश्या, पांघरूण, जहाज, पूल, मांजरं, गुहा, खडू, बदल, डांबर, ढग, खोकला, विदुषक, कुरळे केस, अंधार, डिकॅफ, वाळवंट, घाण, कुत्रे, ड्रायर, खेळणी, अंड्याचा बलक, आग, विदेश, फ्रेंच सिनेमा, बेडूक, जिराफ, हिमनग, जंगल, खाकी, चुंबन, किवीचे फळ, शिडी, ढेकूण, कुष्ठरोग, २२१ किंवा २२३ आकड्यांनी संपणाऱ्या याद्या, निसर्ग, उंदरं, माकडं, मेड इन चायनाचे लेबल्स, नवीन जागा, नग्नता, फोन बुथ, औषधं, प्रश्न, बाहूल्या, सभा, गर्दी, ससे, नद्या, खारे शेंगदाणे, बिनबाह्यांचे शर्ट, टॅक्सी, स्पर्श, रेल्वे, झाडं, ट्रक, बोगदे, अंतर्वस्त्रे, वारा, झेब्रा, प्राणिसंग्रहालये इ. इ. तुम्ही कदाचित म्हणाल की, अशा माणसाने तर काही व्यवसाय करण्यापेक्षा स्वतःला आयुष्यभर एखाद्या खोलीतच कोंडून घेतले पाहिजे. जो माणूस दुधालाही घाबरतो, तो माणूस काय करणार आयुष्यात? तर श्वास रोखून धरा, हा माणूस आहे एड्रियन मंक (टोनी शॅलूब). जगातील सर्वश्रेष्ठ डिटेक्टिव्ह आणि “मंक” (२००२-२००९) या टिव्ही मालिकेचा नायक!

    जगातल्या बहुतांशी गोष्टींना घाबरणारा, तऱ्हेतऱ्हेचे ओसीडीज असणारा आणि तरीही जगातील सर्वश्रेष्ठ डिटेक्टिव्ह, ही कल्पनाच इतकी अफाट आहे की, नुसत्या तेवढ्याच भांडवलावर मी ही मालिका पाहायला सुरुवात केली होती. परंतु लवकरच माझी खात्री पटली की, ही भन्नाट कल्पना त्या कल्पनेच्या कल्पनेपलिकडे फुलवण्यात मालिकाकार कल्पनातीत यशस्वी झालेयत! “मंक” केवळ नेहमीसारखा प्रोसिजरल ड्रामाच नाहीये, तर त्याहून खूप जास्त आहे.

    एड्रियन मंक एकेकाळी पोलिस अधिकारी होता. त्याही काळात त्याला या सगळ्या प्रकारचे भयगंड होतेच, पण त्यांचं प्रमाण बरंचसं कमी होतं. मात्र एके दिवशी मंकला समजून घेणारी त्याच्या आयुष्यातील एकमेव व्यक्ती, त्याची प्राणप्रिय बायको ट्रूडी कालवश होते आणि मंकचे सारेच गंड कळस गाठतात. वर्षांमागून वर्षं तो नैराश्य आणि विस्मृतीच्या गर्तेत घालवतो. पण एखादा बृहस्पती असा किती काळ राहू शकणार? मंकचा मित्र आणि पोलिस अधिकारी कॅ. लीलंड स्टॉटलमायरच्या (टेड लिव्हाईन) सांगण्यावरून मंक कन्सल्टंट म्हणून पोलिसांना वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या तपासासाठी मदत करायला तयार होतो. अर्थात भीतभीतच. त्याला पदोपदी त्याची नर्स व मदतनीस शॅरोनाची (बिट्टी श्रॅम) मदत लागत असते. आणि अशाप्रकारे मंकचं एक नवंच आयुष्य सुरू होतं. समोर असलेल्या घटनास्थळातून तो त्याच्या अचाट निरीक्षणशक्तीच्या, अफाट आकलनशक्तीच्या आणि असीम प्रतिभेच्या बळावर असे काही धागे शोधून काढत असतो, की कोणताही गुन्हा हा त्याच्यापासून कोडे राहूच शकत नाही.

    वरचं वाक्य वाचून तुम्हाला आपसूकच वाटेल की, “मंक” शेरलॉक होम्सवरून तर प्रेरित नसेल? मालिकेने ही बाब कधीच लपवून ठेवलेली नाही. उलट शक्य तितक्या वेळा मालिका होम्सचे रेफरन्स देत असते. किंबहूना मूळ संहितेत मंकचे वर्णनच “शेरलॉक होम्स, पण सटकलेला” असे केलेय! मंकचा भाऊ अॅम्ब्रोजचे (जॉन टर्टुरो) पात्रदेखील मायक्रॉफ्टवरच बेतलेले आहे. परंतु ही साम्यस्थळे इथेच संपतात. होम्स जरासा तिरसट असला, तरीही निडर आहे. मंक मात्र जगातील जवळपास प्रत्येक गोष्टीला घाबरतो. होम्स गरज पडली तर दोन फटके खाऊ शकतो आणि चार देऊ शकतो, मंकला हे कधीच जमणारे नाही. होम्सला व्यसनं आहेत, मंकला कशाचेच व्यसन नाही. मंकच्या कथेचं मूळ शोकारंभी आहे. शोकारंभी कथा, अवसादग्रस्त नायक आणि प्रोसिजरल ड्रामा, विचार करा मालिका किती गंभीर असायला हवी. या गोष्टींत जर, मंक जगातील प्रत्येक गुन्ह्याचा माग लावू शकतो परंतु बायकोच्या खुन्याचा शोध तो अद्याप घेऊच शकलेला नाही या बाबीची भर टाकली, तर दु:खाची किनार अजूनच गडद होते. “मंक” या सगळ्याच गोष्टी अतिशय ठळकपणे आणि तितक्याच प्रामाणिकपणे मांडते. “मंक”मधील गुन्हे गंभीर आहेत, त्यांचा तपासही प्रामाणिकपणे चालतो. मंक सातत्याने ट्रूडीबद्दल भरभरून बोलत असतो, तिच्या आठवणींनी हळवा होत असतो. आता धक्का देऊ? श्वास रोखून धरा, “मंक” ही एक सिटकॉम आहे! होय, मंक ही एक विनोदी मालिका आहे! फक्त ती किंचित जुनी असल्यामुळे त्यांचा विनोद आजकालच्या पुरोगामी स्टँडअप कमेडियन्ससारखा ओढूनताणून आणलेला नाहीये, तर अतिशय नैसर्गिक आहे!

    डिटेक्टिव्ह मालिकांसाठी सगळ्यांत मोठा सापळा जर कोणता असेल, तर तो म्हणजे प्रेक्षकांनी खुनी कोण ते आधीच ओळखणे. हे एकदा-दोनदा जरी झालं तरी लोकांचा रस संपण्याची शक्यता असते. “मंक” मला आवडण्याचं एक अतिशय महत्त्वाचं कारण हे की, त्यांनी हा प्रकारच ठेवलेला नाही. त्यांचे बहुतांशी भाग खुनी कोण, ते सुरुवातीलाच दाखवून टाकतात. चातुर्याची बाब हीच की, त्यांचा ढाचा “हू-डनिट” नाहीच आहे. ते कुणीही ओळखेल, हे माहितीये त्यांना. ते प्रेक्षकांना प्रत्येकवेळी “हाऊ-डनिट” आणि “व्हाय-डनिट” याच दोन मुद्यांवर खेळवतात आणि अतिशय यशस्वीपणे खेळवतात! एकतर सिटकॉम, त्यात हा फॉर्मॅट-ट्विस्ट “मंक”ला इतर प्रोसिजरल ड्रामांपासून वेगळ्याच श्रेणीत नेऊन बसवतो! ट्विस्टचाच विषय असेल, तर प्रत्येक भागाच्या शेवटी मंक जेव्हा खून नेमका कसा झाला ते विशद करतो, ज्याला मंकव्हर्समध्ये “हिअर इज व्हॉट हॅपण्ड” म्हणतात, त्यात बहुतांशी वेळा वेगवेगळ्या कथनशैली वापरूने ते अधिकच रंजक करण्यात मालिका एवढी यशस्वी झालीये की, ज्याचे नाव ते!!

    तुलनाच करायची झाली, तर शेरलॉक होम्समध्ये शेल्डनची (द बिग बँग थियरी) बुद्धिमत्ता, शेल्डनचे गंड, शेल्डनचा गरजेपेक्षा जास्त नीटसपणा अधिक हॅरल्डची (पर्सन ऑफ इंटरेस्ट) आकलनशक्ती आणि हॅरल्डचे दु:ख मिसळले तर काहीसा मंक तयार होऊ शकतो. पण त्याच्यात शेल्डनच्या स्वभावात नकळतपणे असलेला स्वार्थ नाही आणि हॅरल्डसारखी दुनियादारीची समजदेखील नाही. मंक या सगळ्यांपेक्षा वेगळाच किंबहूना खरोखर एकमेव आहे. एकमेव आहे, म्हणूनच एकटादेखील आहे. त्याच्या भयगंडांमुळे मालिकेत त्याचा वारंवार अपमान होतो. इतका की, अक्षरशः बघवत नाही. त्याला साध्यासाध्या गोष्टीही करणे जमत नाही. पण शेल्डनचा जितक्या वेळा राग येतो, तितक्या वेळा मंकचा राग येत नाही. उलट जास्तीत जास्त वेळा निर्मळ मनाच्या मंकबद्दल सहानुभूतीच वाटत राहाते. किंबहूना शेल्डनचेच पात्र कालानुक्रमे “मंक”मधून उचलले असण्याचीच जास्त शक्यता वाटते.

    “मंक” प्रसंगोपात एड्रियनचे पूर्वायुष्यदेखील उलगडते. त्याला रूढार्थाने मित्र नाहीतच. त्याची स्थिती पाहाता, असूही शकत नाहीत. पण त्याच्या जवळचे लोक त्याच्यासाठी खरोखर जीव टाकतात. स्टॉटलमायर, ल्युटेनंट रँडी डिशर (जेसन ग्रे-स्टॅन्फर्ड), शॅरोना, शॅरोनाचा मुलगा बेंजी हे सगळेच मंकचा तिरसटपणा, तुसडेपणा सहन करतात, त्याला समजून घेतात. लेखनातील गंमत म्हणजे, मंक त्याच्या स्वभावानुसार कुणालाच, अगदी कुणा अपराध्यालादेखील चतुराईपूर्ण उलट उत्तरं देऊ शकत नाही. ते काम मंकसाठी बरेचदा स्टॉटलमायर करतो. तो मंकपेक्षा खूपच कमी हुशार परंतु अतिशय अनुभवी माणूस आहे. तो मंकचा मोठा भाऊ असल्यासारखा त्याला सांभाळून घेतो. मालिकेतील ब्रेन जर मंक असेल, तर मसल स्टॉटलमायर आहे. डिशर हा मेहनती, परंतु अद्याप अनुभवाची शिदोरी गाठिशी जमा न झालेला असा किंचित मंद अधिकारी आहे. तो कामाचा आहे, परंतु त्याचा निर्बुद्धपणा आणि चंचलपणा बरेचदा विनोदाचे कारण बनतात. या दोघांचाही पात्रपरिपोष जितका चांगला केला गेलाय, तितकेच जबरदस्त या दोघा कलाकारांचे कामही झालेय. टेड लिव्हाईन हा दिसायला सुरेश ऑबेरॉयसारखा दिसतो, असे मला उगाचच सातत्याने वाटत राहाते! मंकचं मानसशास्त्र उलगडण्यात, त्याला बोलतं करण्यात सगळ्यांत महत्त्वाची भूमिका बजावतो तो त्याचा मानसोपचारतज्ञ डॉ. चार्ल्स क्रोगर (स्टॅन्ली कामेल). त्या दोघांची केमिस्ट्री वेगळीच जमलीये. आणि टोनी शॅलूब! त्याच्याबद्दल काय बोलू या लेखासारखे अजून पन्नास लेख जरी लिहिले तरी त्याने मंकचे पात्र ज्या प्रतिभेने मांडलेय, ते एक टक्काही समजावून सांगता नाही येणार. त्याचं काम ही पाहाण्याचीच गोष्ट आहे. आनंदाचा ठेवा आहे तो खरोखर!

    एकदा का पात्रांची आणि कलाकारांची भट्टी जमून आली की, कुणा एकाचेही जाणे सबंध मालिकेलाच मारक ठरू शकते. “मंक”मध्येही जेव्हा शॅरोनाची भूमिका करणारी बिट्टी श्रॅम मालिका सोडून गेली, तेव्हा अशीच वेळ आली होती. हा मालिकेचा स्खलनबिंदू ठरू शकला असता. कारण, तिने शॅरोनाची भूमिका एवढी सुंदर वठवलीये की, तिच्या जागी दुसऱ्या कुणाला स्वीकारायची कल्पनाही सहन होत नव्हती. परंतु मंकची नवी असिस्टंट नॅटली टीगरच्या भूमिकेत ट्रेलर हॉवर्ड आली आणि माझे मतच बदलून गेले. शॅरोनाच्या पात्रातील सगळ्याच त्रुटी तिने भरून काढल्या आणि वेगळीच उंची गाठली. शॅरोना जराशी डॅम्सेल इन डिस्ट्रेस होती, नॅटली अतिशय कणखर आहे. शॅरोना मंकला एखादी गोष्ट करायला फार जबरदस्ती करत नसायची, नॅटली बरोब्बर रागावून मंकला ताब्यात ठेवते. तिची मुलगी ज्युलीसुद्धा (एमी क्लार्क) कमाल पात्र आहे. असंच त्यांचं जेफ बिलने बनवलेलं सर्वांगसुंदर थीम म्युझिकही (माझी सध्याची रिंगटोन!) त्यांनी नंतरच्या सीझन्समध्ये रँडी न्यूमनच्या “इट्स अ जंगल आऊट देअर” गाण्याने रिप्लेस केलं, तेव्हा आवडलं नव्हतं. हळूहळू ते गाणं मला आवडू लागलं. गंमत म्हणजे, मालिका सुरू असतानाही प्रेक्षकांच्या शॅरोना आणि गाण्याच्या रिप्लेसमेंटबद्दल सुरुवातीला नेमक्या याच भावना असाव्यात कारण, एका भागात (२/१२) मालिकाकारांनी या बदललेल्या गाण्याचा आडूनआडून मोठ्या खुबीने उल्लेख केलाय! परिवर्तन जरी संसाराचा नियम असला, तरी आपल्या प्रत्येकातच बदलाला घाबरणारा एक मंक दडलाय बहुतेक!

    हाच तर खरा मुद्दा आहे. मंक गटात न बसणारा आहे. सगळ्यांहून वेगळा आहे. पण कोणत्या ना कोणत्या पातळीवर आपण सगळेच तसे नसतो का? आपणही काही बाबतींत तिरसट असतो, तुसडे असतो, हट्टी असतो, दुराग्रही असतो. थोडक्यात, कोणत्या ना कोणत्या स्तरावर आपण प्रत्येकजण मंकच असतो! इतके जगावेगळे पात्र, परंतु एका पातळीवर ती आपल्याच आयुष्यातील गोष्ट वाटू लागते, मला वाटतं की “मंक” मालिकेचे हेच सगळ्यांत मोठे यश आहे. तेव्हा जगभरातील, विशेषतः भारतातील ओटिटी प्लॅटफॉर्म्सवरील प्रोपगेण्डाछाप मालिकांना कंटाळला असाल आणि काहीतरी खरोखरीचे चांगले, सशक्त व सकस पाहायचे असेल, तर “मंक”सारखी मालिकाच नाही!

    *५/५

    — © विक्रम श्रीराम एडके
    [अन्य लेख वाचण्यासाठी पाहा

    www.vikramedke.com]

  • WW3 Review – This Silliness Hurts The Most

    #Major_Spoilers_Ahead

    Jonathan Nolan, like his brother Christopher Nolan is a maverick. He did the same on small screens what his brother did on big screen, that is redefining the medium. He is known for his subtle, twisty, high-on-cinematic-techniques tales that continuously play with the dimension of Time. He upped the game with each season of his underrated gem Person of Interest and managed to pull the same feat with first two seasons of Westworld. The problems arose when the third season released. Here’s a small list.

    1) Departure from subtlety:
    If there’s one synonym for the Nolan brothers, it has to be subtlety. The way Westworld’s earlier seasons said without saying much and sometimes without saying anything at all, are still a delight for mind and soul. But this season showed a departure from that precious virtue. I’ll give you an example. A bomb explodes in the car killing Charlotte Hale’s family. The very next scene shows Hale rising from the ashes, furious and vengeful. As powerful as it is, it’s not the Nolan’s way. Because this direct approach takes away the punch of the scene where in the middle of a gunfight Hale confronts Dolores. There are so many such instances. Like at the very first scene of Caleb where he talks with Francis the first time, we easily guess that Francis is dead and perhaps by the hands of Caleb only. I liked the post-credit scene for its subtlety though, where Bernard shuts down and later wakes up only to be seen covered in dust, hinting that so many years (or months atleast) have passed.

    2) Straightforward story:
    Casual viewers watch a film or series for their stories from point A to point D via B & C. Not Nolans’ devoted audience. They watch to let their mind to be blown and soul to be crushed with twisted timelines and non-linear storytelling. They watch for the hollowness it creates in their life after it ends. They watch only to question their own existence. Westworld’s earlier two seasons did the trick, but unfortunately not this. The story this time is straight like an arrow and however loaded it was, it always feels like there was a room for betterment. This is the first for a Nolan series and that’s why this silliness is hurting the most.

    3) No element of surprise:
    Whatever be the story, a Nolan always keep hidden one or two arrows of surprise in his quiver only to pierce us at the last moment. They hid a few surprises in this season too, but they don’t hit you hard. Why? Because all these surprises were marred by the swarm of hints. For example, various characters question so many times in various scenes that why Dolores reprinted Bernard that even before Serac starts searching the Key to the sublime in Dolores, we know that the Key must be with Bernard. This lessens the cumulative punch of the series.

    4) Failing to reinvent:
    Reinvention is an underlying theme in each season of Westworld. In the first season everything was a surprise, including the park. In the second season, though it was again confined to the park with the same characters, almost all the characters’ core nature was changed and the surprise element remained intact. It provided utmost attention to character development and creating emotional backstories like Kiksuya that even after knowing they are but the Robots, we cared for them. This season has literally thrown the character development out of the show. There’re tragic backstories but they weren’t rooted in the core. So even if Hector, the love of Maeve’s life dies a sad death, it fails to move us the way it did in earlier seasons. Same happens when Dolores kills herself and Maeve with EMP, for we know that they would be back. In POI too they used two warring AI’s but they treated the theme so well that those seem to be real characters of the show, even without any vocal dialogues. Here Rehoboam and Solomon, for all the power they had, seemed too much passive and kind of lame. Lame, as if the devil Samaritan and the good Machine would eat them for breakfast. Motivations of other characters too seem to be random and won’t take the things forward as they should. The only scene gave me goosebumps was when Caleb tries to protect the Host girls from his friends and later they show Dolores among them. Predictable, but powerful. Serac’s backstory sounds directionless though with too much hangover of the narrative style of POI.

    5) Erroneous settings:
    Nolans always mean pure logic. But sadly not this time. Dolores claims that she chose Caleb for several reasons, but in reality their first meeting (technically second) where he inadvertently finds a wounded Dolores in an alley, was pure chance. She didn’t even know his name at that time and that is why she asks her virtual assistant to get information on him once he tells her his name. This is a huge error, which could have been easily avoided. There are other such small loopholes too.

    Williams character too is entirely pointless, drag and crazy; almost like this whole Season 3. This means, he is still the soul of the show, but in a very bad way. The similarities won’t end there, because at the end he is killed and replaced by a replica, sadly just like the show. Part of my mind says, this season is kind of letdown because D&D are attached with it. But part of me knows that, it’s not the case. It is a bit disappointing because of the hurried writing and sloppy direction. I’m not saying it was bad. For all its mistakes, it is still better than many of the other serieses, most certainly better than the last season of GoT. But as a Nolan fan, I’m not used to a compromised product, however slightly it may be. So it’s a great show, with an unsatisfying season, that’s it. Anyway, however unsatisfying the season is, Ramin Djawadi has simply outdone himself. His music was fab, is fab and will certainly remain fab. He is to Jonathan, what Rahman is to Mani and Hans is to Christopher, simply amazing and divine. Looking forward to the 4th Season now.

    — © Vikram Edke
    [For other articles, visit www.vikramedke.com]

    Westworld #Christopher_Nolan #Jonathan_Nolan #Nolan_Brothers

  • नोलनबंधूंच्या बाबत

    ख्रिस्तोफ़र नोलनच्या चित्रपटांचं आणि त्याच्या भावाच्या अर्थात जोनाथन नोलनच्या मालिकांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अरेषीय कथन. हे सगळ्यांना माहिती आहे. पण या तंत्राच्या दृक्परिणामाकडे क्वचितच कुणी लक्ष देतं.

    समजा एखादी कथा ‘अ’ पासून सुरू होते आणि ‘ड’ पाशी संपते. तर ती सरळ गेली काय किंवा नागमोडी गेली काय, मध्ये ‘ब’ आणि मग ‘क’ हाच क्रम येणार. त्यात किती वळणं आहेत, यावरून त्या कथेची रंजकता ठरत असते. पण जर कुणी डोकेबाज माणूस असेल, तर त्याला ‘अ’ ठाऊक झाल्यावर तो बाकीचे तिन्ही टप्पे सहज सांगू शकतो. याने कथेचं आयुष्य कमी होऊ शकतं. नोलनबंधू यासाठी काय करतात? त्यांची कथा ‘ब’ पासून सुरू होते. मग ती ‘ड’ कडे जाते. मग ‘अ’ येतो आणि मग ‘क’. आणि हे याच क्रमाने होईल याची काहीच खात्री नाही. त्याहून महत्त्वाचे म्हणजे, हे टप्पे कथेत एकेकदाच येतील, याचीही काहीच खात्री नाही. त्यामुळे त्यांचे चित्रपट व मालिका हे आपल्याला नेहमीपेक्षा जास्त लक्ष घालायला लावतात. त्यांच्या कथा नेहमीच कमाल असतातच असं नाही, पण त्यांचं कथन हे नेहमीच प्रेक्षकांना नेहमीपेक्षा जास्त गुंतवणूक करायला लावणारं आणि म्हणूनच जास्त कमाल असतं.

    या बाबतीत त्यांची तुलना फक्त आणि फक्त ए. आर. रहमानशीच होऊ शकते. रहमानच्या पूर्वी गाण्याचा क्रम ठरलेला असायचा. मुखडा आणि दोन किंवा तीन अंतरे. रहमानने सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट कोणती केली असेल, तर त्याने हा नियम मोडून फेकून दिला. त्याने मुखडा-अंतरा हा भेद पुसून टाकला आणि गाण्याचं काव्य केलं. मुक्तछंदातलं काव्य! रहमानचं गाणं कोणतं वळण घेईल हे फारच पक्का रहमानियन असल्याशिवाय सांगताच येत नाही. आणि त्या रहमानियन व्यक्तीलाही गाण्याकडे इतरांच्या गाण्यापेक्षा जास्त लक्ष द्यावं लागतं. म्हणजेच रहमान गाण्यामध्ये श्रोत्यांना नोलनबंधूंप्रमाणेच जास्त गुंतवणूक करायला भाग पाडतो. हेच कारण आहे की, या दशकात बरेचसे कॅज्युअल लिसनर्स रहमानला सोडून गेले. रहमान काही जगात सर्वश्रेष्ठ चाली करणारा संगीतकार आहे का? मी रहमानचा अतिशय मोठा चाहता असूनही सांगतो की, या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर आहे, नाही! रहमान शंभरातील नव्वद वेळा दैवी चाली करतो, पण नेहमीच नाही. रहमानपेक्षा अनेक पटींनी चांगल्या चाली करणाऱ्या पाच-दहा संगीतकारांची नावं मी सहज सांगू शकेन. रहमानचं वैशिष्ट्य आहे त्याच्या सादरीकरणात, अर्थात एक्झिक्युशनमध्ये! साधीशीच चाल, पण रहमान तिच्यावर ध्वनि आणि तंत्रज्ञानाच्या अपूर्व ज्ञानाची अशी पटलं चढवतो की गाण्याचे रूपच बदलून जाते. ध्वनिचं त्याचं ज्ञान एवढं कमाल आहे की, जणू काही त्याला ध्वनि दिसत असावा! कोणत्या ध्वनितून ऐकणाऱ्याच्या मनात कोणती भावना निर्माण करायची, याचं त्याला असलेलं ज्ञान अतुलनीय आहे.

    नेमकी अशीच पटलं नोलनबंधू त्यांच्या कथांवर चढवतात. लोकांनी त्यांच्यात गुंतावं याची काळजी घेतानाच रहमान आणि नोलनबंधू आपापल्या कलाविषयाला अजून एक पैलू देतात. कोणता? रहमानचं वर्णन जर एकाच शब्दात करायचं झालं तर मी त्याला म्हणेन, अन्प्रेडिक्टेबल! त्याच्या अल्बमवरून, गाण्याच्या शीर्षकावरून, जॉनरवरून आपण एक अपेक्षा करतो आणि रहमान प्रत्येकवेळी दुसरेच काहीतरी देतो. आणि मग गाणे पचले की आपल्याला समजू लागते, हेच त्या भावनेसाठी, त्या प्रसंगासाठी परफेक्ट होते. नोलनबंधूंचे वर्णनही याच विशेषणाने करता येईल. याचं सगळ्यांत मोठं उदाहरण म्हणजे ‘डंकर्क’ (२०१७). लोकांनी वॉरमुव्हीची अपेक्षा केली होती आणि नोलनने त्याच जॉनरमध्ये राहून, काळाशी खेळ करत एक सर्व्हायव्हल मुव्ही बनवून दाखवली. त्यांच्या या अन्प्रेडिक्टिबिलिटीमुळेच कथेचा अरेषीय प्रवास जास्त रंजक होतो आणि आपल्याला जास्त ओढून घेणारा ठरतो. इथे एक लक्षात घ्या, अरेषीय कथन हे भुसुरूंगांवरून चालण्यासारखे असते. नीट पोहोचलात तर त्याच्यासारखा आनंद नाही. पण एक जरी पाऊल चुकले, तर उडालाच! नोलनबंधू गेली दोन दशकं आपल्याला सुखरूप पोहोचवताहेत. असं ट्रॅकरेकॉर्ड कुणाचंच नाही.

    आणखी एक गोष्ट नोलनबंधूंच्या कलाकृतींचा अविभाज्य भाग असते. त्याला म्हणतात ‘इन मेडियास रेस’. म्हणजे काय तर वर म्हटल्याप्रमाणे त्यांची कथा ‘अ’ बिंदूशी सुरू न होता ‘ब’, ‘क’ किंवा ‘ड’ यांच्यापैकी कुठेही सुरू होऊ शकते. ‘इन मेडियास रेस’ म्हणजे मध्येच कुठेतरी अशा बिंदूला कथा सुरू करणे की, ज्या बिंदूच्या आधी कथेशी संबंधित बऱ्याच गोष्टी घडून गेलेल्या असतात, ज्या कलात्मक कारणांसाठी नंतरच्या टप्प्यांत हळूहळू उलगडून सांगितल्या जातात. कथनाचे हे तंत्र अनेकांनी वापरले आहे. पण नोलनबंधूंनीच त्याचा वापर अतिशय प्रभावीपणे केलेला दिसतो. ‘पर्सन ऑफ इंटरेस्ट’च्या पहिल्याच एपिसोडच्या सुरुवातीच्याच सीनमध्ये जॉन भणंगासारखा ट्रेनमधून फिरत असतो. असे वाटते की या घटनेमुळे त्याची आणि हॅरल्डची भेट झाली. पण ते चूक असते. या घटनेच्या पूर्वीच पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले असते, हॅरल्ड आणि जॉनचा आधीच संबंध आलेला असतो आणि जॉनच्या आधी हॅरल्डने बरेच एजंट्स ठेवलेले असतात. एवढेच कशाला फ़स्को, रूट, शॉ, एलायास, कार्टर वगैरे सगळ्यांच्या आयुष्यात कथेशी संबंधित बरंच काही घडून गेलेलं होतं. हे सारे आपल्याला टप्प्याटप्प्याने नंतरच्या सीझन्समध्ये कळते.

    आता हे सांगण्याच्या दोन पद्धती आहेत. एक, की पहिल्याच एपिसोडच्या प्रस्तावनेत सारे सांगून टाकायचे नाहीतर दुसरी, की नंतर योग्य जागी ‘अ’ बिंदू पेरायचा. एवढेच नाही, तर प्रत्येक पात्राच्या फ्रेम ऑफ रेफरन्सनुसार अनेक ‘अ’ बिंदू निर्माण करायचे. जोनाथन नोलनने दुसरी पद्धत निवडली आणि साहजिकच तिचा नाट्यमय परिणाम अनेक पटींनी जास्त झाला. मी ‘पीओआय’ला आजवरची सर्वाधिक भारी मालिका म्हणतो, या मागे जी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी हे देखील एक आहे. वाचायला सोपे वाटते. पण करायला केवढे अवघड आहे, हे ज्यांना काहीतरी लालित्यपूर्ण लिहायचा अनुभव आहे, त्यांना पटकन जाणवेल. अगदी पहिल्या प्रसंगापासून प्रत्येक हालचाल आणि प्रत्येक वाक्य त्या संबंधित ‘अ’ पैकी योग्य ‘अ’पाशी कॉन्व्हर्ज व्हावं असंच रचायचं आणि तरीही त्याची रंजकता कमी होऊ द्यायची नाही. दुसरा टप्पा अजूनच अवघड. ‘अ’पाशी आल्यावर सगळं काही तशाच प्रमाणात डायव्हर्ज करायचं. सुरुवातीपासूनच गुंता निर्माण करायचा पण त्यातही सहजी न दिसणारा कलात्मक पॅटर्न निर्माण करायचा. असा की शेवटी तो सुटल्यावर एखादं गणित सुटल्यासारखा निखळ आनंद मिळावा! दोघांही नोलनबंधूंच्या कलाकृतींचे स्वतंत्र आलेख काढले तर त्यात खूप सारी वर्तुळं दिसतील. बरं गुंता करणं सोपं असतं, सोडवणं सगळ्यांत कठिण. चक्रव्यूहात शिरणं सोपं असतं, बाहेर पडणं सगळ्यांत कठिण. नोलनबंधू या दोन्हीही टप्प्यांचे गुरू आहेत, याच्या खुणा ख्रिस्तोफ़रच्या चित्रपटांच्याच इतक्या ठळकपणे जोनाथनच्या ‘पर्सन ऑफ इंटरेस्ट’च्या स्ट्रक्चरमध्येही जागोजागी दिसतात!

    — © विक्रम श्रीराम एडके
    [लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]

  • Prisoner Of Subtlety — Joker

    Give a man some tragedy and you can make a hero out of him, but give him more and you might end up making a villain you never wished for. Todd Phillips’ “Joker” can be summed up in these two lines. The fact that this theme has played in a number of artistic expressions over several times gets diluted by the performances it commands. Though marketed as a psychological thriller, the tale is more of a psychological study that delves into the mind of Batman’s most celebrated antagonist ever.

    Arthur Fleck (Phoenix) is a struggling stand-up comedian. His struggle is more personal than professional. He has dreams, wishes and feelings like every other person, but he is ridden by many psychological conditions that hinder both his professional and personal lives. The whole city of Gotham is slowly sinking into the chaos and so do the conscience of its residents. People are sharply divided into wealthy and poor classes, there is no middle ground. Those who are wealthy, don’t care and for others, poverty has taken a toll on their sensibilities. Arthur’s world torns apart between these outer and inner conflicts. In fact both the situations affect each other and he slithers down the path of darkness.

    Joaquin Phoenix has given everything for the role, physically and mentally. He is in almost every other scene and still you don’t get tired of him, not even for a single moment. He is sheer magic. His eyes illuminate with anger and at the same time darken with melancholy. His body emotes even the smallest nuances of the character. He laughs when he cries and cries as he laughs. You can see his each and every mental condition through the language of his terribly skinny body. The way he walks, the way he talks, the way he moves a muscle, everything adds up something to the character and its story. In this universe, Joker isn’t insane or lunatic. He just sees, feels and experiences the world differently, in a way that can only be understood to him. Phoenix has immersed himself into this psyche of Joker so literally that you start to worry for the actor’s wellbeing. And for some strange resemblance, I saw Akshaye Khanna in his place too many times. I really wish Khanna should get such a role at least once in his lifetime to show the world what he is capable of. But that’s beside the point.

    Every tale comes with its flaws. Joker takes too much time to set the premise, almost to the half of the second act. Though Phoenix holds the reins firmly, the writing doesn’t support him in some of those parts. Joker starts in an alley and ends symbollically in another. But the road in between gets bumpy sometimes. Their core theme has been played out so many times in movies and fiction that there’s almost nothing novel remained to do in it. This makes the first half somewhat unfocused, disoriented, almost to the point that some of Arthur’s conditions start looking like mere tools to fill in the blanks. Comedy is always been a way to make political statements and given the times we live in, Joker too does this in its own tragicomic way. But when it comes to owning those statements, it shys away. The class division seems forced. Characters like Thomas Wayne (Brett Cullen) are reduced to mere caricatures and their speeches nonsensical to create a forced conflict the movie wants. The film is in too much hangover (pun intended) of Scorcese’s “Taxi Driver” (1976) and though at first it seems an artsy homage to the classic with Robert De Niro himself on board, many a times it works against the film. The twist in the tale at the end of the second act, though predictable and adds up to the hesitance of owning the narrative, is beautifully unfolded.

    In the climactic moments when Joker spreads his wings to the fullest, many things were happening around. Some lives are taken, some characters change forever, those who are responsible for the tragedy cheer up for the outcome. And I wondered, was the posing Joker sensing all this in that moment? Does he have a faintest of the inkling of the butterfly effect caused on and due to his existence, that built up this very moment? These are those subtle moments, one cannot answer for real. Joker, though a good movie, is a prisoner of those moments!

    PS: I might sound foolish to see Akshaye Khanna in Joaquin Phoenix, my wish that he should get to showcase his potential in such a role, might sound even insane. But you know, insanity is just a form of sanity not everyone understands!

    *4/5

    — © Vikram Edke
    [For more articles visit www.vikramedke.com]

  • साहवेना ‘साहो’

    सध्या एका व्यक्तीचा व्हिडिओ खूप व्हायरल आहे. ती व्यक्ती मोठ्या ऐटीत पॅराग्लायडिंग करायला जाते, पण लगेचच आपली चूक त्याच्या लक्षात येते. मग जमिनीवर उतरेपर्यंत त्या व्यक्तीचं कळवळणं, स्वतःलाच शिव्या देणं सध्या सगळीकडे चर्चेचा विषय झालाय. नेमकं असंच मला आज चित्रपटगृहात वाटलं! पहिल्या दहाच मिनिटांत माझी अवस्था ‘भाई मुझे लंबी राईड नहीं करनी, सौ-दो सौ ज्यादा ले ले पर लँड करा दे’ झाली होती. त्या व्हिडिओतील व्यक्तीचे आडनाव ‘साहू’ निघावे आणि तशीच अवस्था करविणाऱ्या चित्रपटाचे नाव ‘साहो’ निघावे, हा काय दर्जाचा दैवदुर्विलास म्हणावा, देवच जाणे!

    एक आंतरराष्ट्रीय माफिया संघटना आहे. तिचा प्रमुख पृथ्वीराजने (टिनू आनंद) तिची सूत्रे रॉयला (जॅकी श्रॉफ) सोपवली. रॉयचा प्रयत्न त्या संघटनेला कायद्याच्या चौकटीत बसवण्याचा आहे. त्यासाठी तो भारतात बिझनेस सुरू करु इच्छितो. रॉय या गोष्टीसाठी इतका उतावीळ आहे की, तो त्यासाठी केंद्रीय मंत्र्याचं (तनिकेला भरणी) अपहरणही करायला मागे-पुढे पाहात नाही. दरम्यान शहरात विशेष प्रकारच्या चोऱ्या होऊ लागतात. त्या चोऱ्यांचा तपास करण्यासाठी एका खास पोलिस अधिकाऱ्याची नेमणूक होते. आता या दोन गोष्टींचा एकमेकांशी काय संबंध आहे आणि त्यात साहो (प्रभास) कुठे येतो, याची गुंतावळ झालेली कथा म्हणजे दिग्दर्शक सुजीतचा ‘साहो’! आपल्याकडे टिव्हीवरच्या गाण्यांच्या स्पर्धा पाहून जरा कुणी बरं गायलं की, ‘क्या बात है’ म्हणायची पद्धत पडलीये. या ‘क्या बात है’चं संस्कृत रूप काय असावं असा विचार केला तर एकच शब्द आठवतो, ‘साधो’! त्याच्या जवळपास जाणारा हिंदी उद्गार कदाचित ‘जय हो’च असू शकतो. ‘साहो’ शब्द गुगल केल्यावर येणारा अर्थ असाच काहीसा आहे. हाय, चित्रपटही तसाच असता तर?

    अरेषीय कथाकथन म्हणजे भूसुरुंगाने भरलेल्या मैदानातून चालण्यासारखे असते. तुम्ही जर सुखरूप सगळ्या जंजाळातून बाहेर पडलात तर लोक टाळ्या वाजवतात, पण एक पाऊल चुकीचं पडलं तर सगळ्याचाच इस्कोट होतो. ‘साहो’चे नेमके तेच झालेय. एक प्रसंग पूर्ण होण्याआधीच दुसरा त्यात मिसळला जातो. हा सर्जनशील निर्णय म्हणून विचारपूर्वक घेतला गेला, तर अतिशय शैलीदार वाटू शकतो. पण दिग्दर्शक सुजीतने नुसतीच शैली उचलली, विचार नाही. त्यामुळे ‘साहो’तील बहुतांश प्रसंग तुटक आणि अपूर्ण वाटतात. सबंध चित्रपट म्हणून विचार केला तर तो केवळ तुटक प्रसंगांची अपूर्ण भेळ बनून राहातो मग. दिग्दर्शकाने त्यात खूप सारे पात्र आणि उपकथानकं घुसडलीयेत. पण त्यांच्यापैकी कुणालाच लेखन, संपादन आणि दिग्दर्शनाच्या पातळीवर न्याय दिला न गेल्यामुळे ते सगळेच निरर्थक वाटतात. एकीकडे वाटत राहातं की, पटकथेचा अजून एक कित्ता झाला असता तर चित्रपट जरा तरी सुसह्य वाटला असता. दुसरीकडे वाटतं की, अचानकच मोठे स्टुडिओज आणि प्रोडक्शन हाऊसेस सहभागी झाल्यामुळे एक छोटा प्रोजेक्ट म्हणून कदाचित छान वाटू शकणारा चित्रपट मोठ्यांच्या साठमारीत गंडला आणि नवख्या दिग्दर्शकाचे त्याच्या सर्जनशील बाजूवरील सगळेच नियंत्रण सुटले. दोन्हीही परिस्थितीत एका चांगल्या विषयाची माती झालीये.

    शैलीदारपणा म्हणावा तर त्या आघाडीवरसुद्धा प्रचंड संधी असूनही चित्रपट हुकलाय. हिरोच्या हिरोईझमवर चालणाऱ्या चित्रपटात हिरोच्या एंट्रीलाच धमाका होत नाही! त्या वेळी असलेली मारधाडही तुमच्यात उत्साहाच्या लाटा निर्माण करत नाही! चित्रपटाला अनेक साहस-दिग्दर्शक असूनही जवळजवळ सगळीच साहसदृश्ये अतिशय मलूल आणि वाईट झालीयेत. जी आहेत ती सुद्धा सलग नाहीत, तिथेही इतरत्र असलेला तुटकपणा आहे. एका प्रसंगात प्रभास म्हणतो, ‘मेरे लाईफ में अॅक्शन बहोत हो गया, अब रोमान्स चाहिए’! प्रत्यक्षात त्या प्रसंगापर्यंत अॅक्शनचे क्षण फारच थोडे आलेले असतात आणि जे आलेले असतात तेही गंडलेले. मग वाटतं की, पटकथा वाईट असली तरी किमान संपादन तरी अजून बरे असले असते तर बरे झाले असते, पण त्या ही पातळीवर (ए. श्रीकर प्रसाद) सगळा आनंदच आहे. दुसऱ्या एका प्रसंगात खूप गोळीबार सुरू असताना प्रभासला अमृता (श्रद्धा कपूर) विचारते, ‘यह कौन लोग है जो मुझ से भी ज़्यादा नफ़रत करते है तुम से’? त्यावर प्रभास उत्तरतो, ‘फॅन्स’! वाईट गोष्ट ही की, त्या क्षणी खरे वाटते ते!!

    प्रभास अभिनेता अजिबातच वाईट नाहीये. त्याच्या मर्यादेत चांगलाच आहे तो. पण त्याचे हिंदी बोलणे फारच सपक वाटते. बरेचदा तर तो तोंडातल्या तोंडात बोलतो ते धड समजतच नाही. तेलुगूत तो नक्कीच चांगला बोललेला असणार हे मान्य जरी केलं तरी जिथे मुळात त्याच्या पात्रालाच हातचं राखल्यासारखं लिहिलंय, तिथे संवादांना काय अर्थ असणार? एका प्रसंगात तर त्याला जेटपॅक लावलेला एक माणूस हवेतल्या हवेत पकडतो. ते दोघेही बिल्डिंगच्या काचा फोडून आत पडतात. भाऊंच्या अंगावर एक जखमसुद्धा नाही. तसाच उठतो. ते जेटपॅक अंगावर चढवतो. हिरोईन हेलिकॉप्टरमधून पडत असते. तिला वाचवायला जातो. रस्त्यात मध्येच त्याच्या जेटपॅकचं इंधन संपतं. तर ते हवेतच उतरवून हवेतल्या हवेत झेप घेऊन तो हिरोईनला पकडतो. दोघे पाण्यात (आणि पिक्चर पण!)! नाही, नेमके पाण्यातच कसे काय पडले ते, वगैरे प्रश्न मी विचारणार नाही. कारण, या प्रकारचे शेकडो अविश्वसनीय प्रसंग वेगवेगळ्या चित्रपटसृष्टीतील चित्रपटांतून अनेकवेळा सहर्ष आवडलेयत मला. पण केव्हा? जेव्हा ते शैलीदारपणे मांडलेले असतात, तेव्हा! प्रभासच्याच ‘बाहूबली’त (२०१५-१७) असे पन्नासेक प्रसंग असतील. पण ते राजमौलीने असे काही हाताळलेयत की आपण आनंदाने बुद्धीला बासनात गुंडाळून ठेवतो. इथे तसं होत नाही! हा दोष दिग्दर्शकाचा आहे. आणखी एका प्रसंगात..! जाऊ द्या, किती सांगणार मी तरी?

    दुसरे म्हणजे, प्रभास सबंध चित्रपटभर (आणि बाहेरही) सतत आळसावलेलाच वाटतो. ‘बाहूबली’ची चुस्ती तात्पुरती आणि सुस्तीच शाश्वत आहे की काय, असे वाटते त्याच्याकडे पाहून. चित्रपटावर साडेतीनशे कोटी खर्च करताना नेमके प्रभासच्या आंघोळीच्याच वेळी बजेट संपले की काय, अशीही शंका चाटून जाते! क्लायमॅक्स खूपच प्रेडिक्टेबल असला तरीही बरा हाताळलाय दिग्दर्शकाने, हे तेवढेच दु:खात सुख. त्यामुळे सुजीत वाईट दिग्दर्शक असेलच असे नाही. पण त्याला एवढे मोठे बजेट हाताळता नाही आले आणि एवढी मोठी संधी गमावली, हे निश्चित. आर. मधीचे छायांकन खूपच चांगले झालेय. विभासांचा (व्हिएफएक्स) अतिरेक मात्र काही वेळा अंगावर येतो आणि बऱ्याच ठिकाणी सुमार वाटतो.

    प्रभासच्या पात्राला लेखन आणि दिग्दर्शकीय पातळीवर न्याय न मिळण्याचे महत्त्वाचे कारण हे की, दिग्दर्शकाला शेवटी उघड करण्यासाठी एक रहस्य राखून ठेवायचेय. पण गंमत अशी की, चित्रपटाच्या पहिल्या पाचच मिनिटांत तुम्ही ते रहस्य ओळखू शकता, एवढंच नव्हे तर नेमकं कोण कोण त्या कट-कारस्थानात सहभागी आहे, हे सुद्धा ओळखू शकता. हा लेखनाचा (सुजीत) दोष आहे. त्या व्यतिरिक्तही कोणत्याच प्रसंगात फारशी मजा नाही. मुख्य पात्रांचा आनंदीआनंद जरी असला, तरीही दुय्यम पात्रांनी मात्र वाट्याला आलेली कामं मस्त केलीयेत. जॅकी श्रॉफ, महेश मांजरेकर, चंकी पांडे, मुरली शर्मा, प्रकाश बेलवाडी, वेन्नेला किशोर वगैरे मुरलेली मंडळी खरोखर भाव खाऊन जातात. मंदिरा बेदी, नील नितीन मुकेश यांनीही बरे काम केलेय. सगळ्यांत जास्त कौतुक वाटते ते अरुण विजयचे! मणिरत्नमच्या ‘चेक्का चिवंता वानम’नंतर (२०१८) या ही चित्रपटात त्याने भूमिकेला साजेसे काम केलेय.

    चित्रपटाची अजून एक लंगडी बाजू म्हणजे त्याचे संगीत. खरं तर, संगीत हे कोणत्याही दाक्षिणात्य ब्लॉकबस्टरचे बलस्थान असते. पण या चित्रपटाची बहुतांश गाणी अतिशय सामान्य, चार दिवसांचे आयुष्य असलेली आहेत. रहमान मागे एकदा म्हणाला होता की, ‘हिंदीत एकाच चित्रपटासाठी खूप सारे संगीतकार घेण्याचा दुर्दैवी पायंडा पडलाय. त्यामुळे गाणी चित्रपटाशी एकरूप वाटत नाहीत’. हिंदीचा हा रोग ‘साहो’च्या निमित्ताने तेलुगू चित्रपटसृष्टीलाही लागल्याचे दिसते. तेलुगूतील एवढे प्रतिभावंत संगीतकार सोडून त्यांना बादशाह, गुरू रंधावा, तनिष्क बागची वगैरे असुरांकडे जाण्याची का गरज पडली असावी? मला वाटते हा दोष दिग्दर्शकाचा कमी आणि टि-सीरीजसारख्या कंपनीचा जास्त आहे. ही मंडळी काहीतरी छान, चिरस्मरणीय करावे म्हणून काम करत नाहीत, तर पायाजवळ पाहातात फक्त! पण जर तसे असेल, तर दिग्दर्शकाचे चित्रपटाच्या सर्जनशील बाजूवर नियंत्रण नसल्याचेच यातून दिसून येते. फक्त एकच शंकर-अहसान-लॉयचे गाणे ‘त्यातल्या त्यात चांगले’ आहे. सबंध संगीत एकाच चांगल्या संगीतकाराने केले असते, तर चित्रपटाच्या साऊंडवर आणि व्यवसायावरही खूपच सकारात्मक परिणाम झाला असता. गिब्रन या इतरवेळी चांगले पार्श्वसंगीत करणाऱ्या संगीतकाराचेही पार्श्वसंगीत कर्कश्श झालेय.

    असा हा जवळजवळ सर्वच पातळ्यांवर फसलेला चित्रपट ‘साहो’. तेलुगू, तमिळ, कन्नड चित्रपटसृष्टीला हिंदीवाले नावाजू लागल्यामुळे वाटलं होतं की, हिंदी चित्रपट सुधारतील. पण हे तर त्यांनाच बिघडवायला निघालेत. तरीही ‘साहो’ हा साडेतीनशे कोटींचा अपवाद असावा, बनू घातलेला नियम नव्हे, अशी मनापासून अपेक्षा आहे. कारण, ‘साहो’ खरोखरच साहवत नाही!!

    *१.५/५

    — © विक्रम श्रीराम एडके
    (अन्य लेखांसाठी पाहा www.vikramedke.com)