नोलनबंधूंच्या बाबत

ख्रिस्तोफ़र नोलनच्या चित्रपटांचं आणि त्याच्या भावाच्या अर्थात जोनाथन नोलनच्या मालिकांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अरेषीय कथन. हे सगळ्यांना माहिती आहे. पण या तंत्राच्या दृक्परिणामाकडे क्वचितच कुणी लक्ष देतं.

समजा एखादी कथा ‘अ’ पासून सुरू होते आणि ‘ड’ पाशी संपते. तर ती सरळ गेली काय किंवा नागमोडी गेली काय, मध्ये ‘ब’ आणि मग ‘क’ हाच क्रम येणार. त्यात किती वळणं आहेत, यावरून त्या कथेची रंजकता ठरत असते. पण जर कुणी डोकेबाज माणूस असेल, तर त्याला ‘अ’ ठाऊक झाल्यावर तो बाकीचे तिन्ही टप्पे सहज सांगू शकतो. याने कथेचं आयुष्य कमी होऊ शकतं. नोलनबंधू यासाठी काय करतात? त्यांची कथा ‘ब’ पासून सुरू होते. मग ती ‘ड’ कडे जाते. मग ‘अ’ येतो आणि मग ‘क’. आणि हे याच क्रमाने होईल याची काहीच खात्री नाही. त्याहून महत्त्वाचे म्हणजे, हे टप्पे कथेत एकेकदाच येतील, याचीही काहीच खात्री नाही. त्यामुळे त्यांचे चित्रपट व मालिका हे आपल्याला नेहमीपेक्षा जास्त लक्ष घालायला लावतात. त्यांच्या कथा नेहमीच कमाल असतातच असं नाही, पण त्यांचं कथन हे नेहमीच प्रेक्षकांना नेहमीपेक्षा जास्त गुंतवणूक करायला लावणारं आणि म्हणूनच जास्त कमाल असतं.

या बाबतीत त्यांची तुलना फक्त आणि फक्त ए. आर. रहमानशीच होऊ शकते. रहमानच्या पूर्वी गाण्याचा क्रम ठरलेला असायचा. मुखडा आणि दोन किंवा तीन अंतरे. रहमानने सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट कोणती केली असेल, तर त्याने हा नियम मोडून फेकून दिला. त्याने मुखडा-अंतरा हा भेद पुसून टाकला आणि गाण्याचं काव्य केलं. मुक्तछंदातलं काव्य! रहमानचं गाणं कोणतं वळण घेईल हे फारच पक्का रहमानियन असल्याशिवाय सांगताच येत नाही. आणि त्या रहमानियन व्यक्तीलाही गाण्याकडे इतरांच्या गाण्यापेक्षा जास्त लक्ष द्यावं लागतं. म्हणजेच रहमान गाण्यामध्ये श्रोत्यांना नोलनबंधूंप्रमाणेच जास्त गुंतवणूक करायला भाग पाडतो. हेच कारण आहे की, या दशकात बरेचसे कॅज्युअल लिसनर्स रहमानला सोडून गेले. रहमान काही जगात सर्वश्रेष्ठ चाली करणारा संगीतकार आहे का? मी रहमानचा अतिशय मोठा चाहता असूनही सांगतो की, या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर आहे, नाही! रहमान शंभरातील नव्वद वेळा दैवी चाली करतो, पण नेहमीच नाही. रहमानपेक्षा अनेक पटींनी चांगल्या चाली करणाऱ्या पाच-दहा संगीतकारांची नावं मी सहज सांगू शकेन. रहमानचं वैशिष्ट्य आहे त्याच्या सादरीकरणात, अर्थात एक्झिक्युशनमध्ये! साधीशीच चाल, पण रहमान तिच्यावर ध्वनि आणि तंत्रज्ञानाच्या अपूर्व ज्ञानाची अशी पटलं चढवतो की गाण्याचे रूपच बदलून जाते. ध्वनिचं त्याचं ज्ञान एवढं कमाल आहे की, जणू काही त्याला ध्वनि दिसत असावा! कोणत्या ध्वनितून ऐकणाऱ्याच्या मनात कोणती भावना निर्माण करायची, याचं त्याला असलेलं ज्ञान अतुलनीय आहे.

नेमकी अशीच पटलं नोलनबंधू त्यांच्या कथांवर चढवतात. लोकांनी त्यांच्यात गुंतावं याची काळजी घेतानाच रहमान आणि नोलनबंधू आपापल्या कलाविषयाला अजून एक पैलू देतात. कोणता? रहमानचं वर्णन जर एकाच शब्दात करायचं झालं तर मी त्याला म्हणेन, अन्प्रेडिक्टेबल! त्याच्या अल्बमवरून, गाण्याच्या शीर्षकावरून, जॉनरवरून आपण एक अपेक्षा करतो आणि रहमान प्रत्येकवेळी दुसरेच काहीतरी देतो. आणि मग गाणे पचले की आपल्याला समजू लागते, हेच त्या भावनेसाठी, त्या प्रसंगासाठी परफेक्ट होते. नोलनबंधूंचे वर्णनही याच विशेषणाने करता येईल. याचं सगळ्यांत मोठं उदाहरण म्हणजे ‘डंकर्क’ (२०१७). लोकांनी वॉरमुव्हीची अपेक्षा केली होती आणि नोलनने त्याच जॉनरमध्ये राहून, काळाशी खेळ करत एक सर्व्हायव्हल मुव्ही बनवून दाखवली. त्यांच्या या अन्प्रेडिक्टिबिलिटीमुळेच कथेचा अरेषीय प्रवास जास्त रंजक होतो आणि आपल्याला जास्त ओढून घेणारा ठरतो. इथे एक लक्षात घ्या, अरेषीय कथन हे भुसुरूंगांवरून चालण्यासारखे असते. नीट पोहोचलात तर त्याच्यासारखा आनंद नाही. पण एक जरी पाऊल चुकले, तर उडालाच! नोलनबंधू गेली दोन दशकं आपल्याला सुखरूप पोहोचवताहेत. असं ट्रॅकरेकॉर्ड कुणाचंच नाही.

आणखी एक गोष्ट नोलनबंधूंच्या कलाकृतींचा अविभाज्य भाग असते. त्याला म्हणतात ‘इन मेडियास रेस’. म्हणजे काय तर वर म्हटल्याप्रमाणे त्यांची कथा ‘अ’ बिंदूशी सुरू न होता ‘ब’, ‘क’ किंवा ‘ड’ यांच्यापैकी कुठेही सुरू होऊ शकते. ‘इन मेडियास रेस’ म्हणजे मध्येच कुठेतरी अशा बिंदूला कथा सुरू करणे की, ज्या बिंदूच्या आधी कथेशी संबंधित बऱ्याच गोष्टी घडून गेलेल्या असतात, ज्या कलात्मक कारणांसाठी नंतरच्या टप्प्यांत हळूहळू उलगडून सांगितल्या जातात. कथनाचे हे तंत्र अनेकांनी वापरले आहे. पण नोलनबंधूंनीच त्याचा वापर अतिशय प्रभावीपणे केलेला दिसतो. ‘पर्सन ऑफ इंटरेस्ट’च्या पहिल्याच एपिसोडच्या सुरुवातीच्याच सीनमध्ये जॉन भणंगासारखा ट्रेनमधून फिरत असतो. असे वाटते की या घटनेमुळे त्याची आणि हॅरल्डची भेट झाली. पण ते चूक असते. या घटनेच्या पूर्वीच पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले असते, हॅरल्ड आणि जॉनचा आधीच संबंध आलेला असतो आणि जॉनच्या आधी हॅरल्डने बरेच एजंट्स ठेवलेले असतात. एवढेच कशाला फ़स्को, रूट, शॉ, एलायास, कार्टर वगैरे सगळ्यांच्या आयुष्यात कथेशी संबंधित बरंच काही घडून गेलेलं होतं. हे सारे आपल्याला टप्प्याटप्प्याने नंतरच्या सीझन्समध्ये कळते.

आता हे सांगण्याच्या दोन पद्धती आहेत. एक, की पहिल्याच एपिसोडच्या प्रस्तावनेत सारे सांगून टाकायचे नाहीतर दुसरी, की नंतर योग्य जागी ‘अ’ बिंदू पेरायचा. एवढेच नाही, तर प्रत्येक पात्राच्या फ्रेम ऑफ रेफरन्सनुसार अनेक ‘अ’ बिंदू निर्माण करायचे. जोनाथन नोलनने दुसरी पद्धत निवडली आणि साहजिकच तिचा नाट्यमय परिणाम अनेक पटींनी जास्त झाला. मी ‘पीओआय’ला आजवरची सर्वाधिक भारी मालिका म्हणतो, या मागे जी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी हे देखील एक आहे. वाचायला सोपे वाटते. पण करायला केवढे अवघड आहे, हे ज्यांना काहीतरी लालित्यपूर्ण लिहायचा अनुभव आहे, त्यांना पटकन जाणवेल. अगदी पहिल्या प्रसंगापासून प्रत्येक हालचाल आणि प्रत्येक वाक्य त्या संबंधित ‘अ’ पैकी योग्य ‘अ’पाशी कॉन्व्हर्ज व्हावं असंच रचायचं आणि तरीही त्याची रंजकता कमी होऊ द्यायची नाही. दुसरा टप्पा अजूनच अवघड. ‘अ’पाशी आल्यावर सगळं काही तशाच प्रमाणात डायव्हर्ज करायचं. सुरुवातीपासूनच गुंता निर्माण करायचा पण त्यातही सहजी न दिसणारा कलात्मक पॅटर्न निर्माण करायचा. असा की शेवटी तो सुटल्यावर एखादं गणित सुटल्यासारखा निखळ आनंद मिळावा! दोघांही नोलनबंधूंच्या कलाकृतींचे स्वतंत्र आलेख काढले तर त्यात खूप सारी वर्तुळं दिसतील. बरं गुंता करणं सोपं असतं, सोडवणं सगळ्यांत कठिण. चक्रव्यूहात शिरणं सोपं असतं, बाहेर पडणं सगळ्यांत कठिण. नोलनबंधू या दोन्हीही टप्प्यांचे गुरू आहेत, याच्या खुणा ख्रिस्तोफ़रच्या चित्रपटांच्याच इतक्या ठळकपणे जोनाथनच्या ‘पर्सन ऑफ इंटरेस्ट’च्या स्ट्रक्चरमध्येही जागोजागी दिसतात!

— © विक्रम श्रीराम एडके
[लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *