मन आणि मेंदूला पौष्टिक खुराक — ईव्हल

‘प्रोसिजरल ड्रामा’ हा तसा टिव्ही मालिकांच्या इतिहासात अनादि-अनंत काळापासून चालत आलेला प्रकार. आपल्याकडेही ‘करमचंद’ (१९८५-२००७), ‘तहक़ीकात’ (१९९४-१९९५), ‘सुराग़’ (१९९९), ‘अदालत’ (२०१०-२०१६) अशा अनेक नावाजलेल्या मालिकांनी हा प्रकार गाजवलाय. पाश्चात्य, विशेषतः अमेरिकन आणि ब्रिटीश मालिकांमध्ये तर या प्रकारच्या मालिकांच्या अक्षरशः रांगाच लागल्या आहेत. त्यांच्यातही वेगळेपणा म्हणता म्हणता हळूहळू तोचतोचपणा येऊ लागला होता. खूप साऱ्या मालिकांनी या प्रकारात काहीतरी ट्विस्ट आणायचा प्रयत्न केला. पण मला सगळ्यांत जोरात ‘लागलेला’ ट्विस्ट जर कोणता असेल, तर तो होता ‘पर्सन ऑफ इंटरेस्ट’ (२०११-२०१६)! प्रोसिजरल ड्रामामध्ये साय-फाय, राजकारण, सामाजिक व्यवस्था आणि मानसशास्त्राचं इतकं अफलातून मिश्रण मी तरी कुठेच पाहिलं नाही. मी या मालिकेचा केवढा मोठा भक्त आहे, हे मी वारंवार लिहिलंय आणि इथून पुढेही लिहीत राहीन. ती संपल्यावर मी कित्येक महिने भंजाळल्यासारखा त्या दर्जाच्या किमान जवळपास तरी जाणारं काही सापडतं का याचा निरर्थक शोध घेण्यात घालवलेयत. अनेक मालिका पाहिल्या, पण ‘पीओआय’समोर सगळ्याच पातळ. आणि मग एके दिवशी अवचितपणे, खरं तर ‘पीओआय’मुळेच मला सापडली त्याच सीबीएस वाहिनीवर सध्या प्रसारित होत असलेली ‘ईव्हल’ (२०१९ -)!

‘ईव्हल’ मला ‘पीओआय’मुळेच सापडली असे मी म्हणतोय याचे कारण आहे ‘मायकेल इमर्सन’! मी या माणसाच्या कामाचा जबरा फॅन आहे. एवढेच कश्याला, मी ‘पीओआय’ची लागण करून दिल्यावर मायकेल इमर्सनच्या वेड्यागत प्रेमातच पडलेली एक मैत्रिणसुद्धा मला ठाऊक आहे. त्याची ‘लॉस्ट’खेरीज (२००४-२०१०) अन्य कामे शोधत असतानाच मला या आगामी मालिकेबद्दल समजलं. तरीही मी पहिले दहा भाग प्रसारित होईपर्यंत कळ काढली. एखादाच भाग पाहू आणि नाही आवडली तर सोडून देऊ, असा विचार करून मी पहिला भाग पाहायला घेतला. आणि काय सांगू तुम्हाला, कधी ते दहा भाग गपकन संपवले मी हे माझं मलासुद्धा समजलं नाही! मालिकेचं पहिलंच (आणि देव करो – शेवटचं नसलेलं) पर्व सध्या प्रसारित होतंय आणि आता दर आठवड्याला चातकासारखी वाट पाहाण्याखेरीज माझ्या हाती काहीच नाही!

मी ‘ईव्हल’ला ‘प्रोसिजरल ड्रामा विथ अ ट्विस्ट’ का म्हणतोय, याचे उत्तर तिच्या कथानकात आहे. क्रिस्टन बुशार्ड (कात्या हर्बर्स) ही एक फोरेन्सिक सायकॉलॉजिस्ट आहे. ती क्वीन्सच्या डिस्ट्रिक्ट अॅटर्नी ऑफिसकडून तज्ञ साक्षीदार म्हणून काम करते. एका केससंदर्भात तिची भेट डेव्हिड अकोस्टाशी (माईक कोल्टर) होते. डेव्हिड हा कॅथलिक प्रिस्ट होण्याचं शिक्षण घेतोय. दरम्यान त्याला चर्चने त्यांच्याकडे येणाऱ्या गूढ, अतींद्रिय तक्रारींचा, उदाहरणार्थ झपाटणे, चमत्कार वगैरे, छडा लावण्यासाठी नियुक्त केलेय. परिस्थिती अशी ओढवते की, क्रिस्टन डेव्हिडसोबत अशा केसेसवर सायकॉलॉजिस्ट म्हणून काम करू लागते. डेव्हिडचा आधीच एक जोडीदार आहे, टेक्निकल एक्सपर्ट बेन शाक़ीर (आसिफ़ मांडवी). डेव्हिड अतिशय सश्रद्ध आहे. क्रिस्टन अश्रद्ध वा नास्तिक नसली तरीही अजिबातच धार्मिक नाहीये. बेन तर उघड उघडच नास्तिक आहे. केसवर काम करताना तिघेही आपापले अभ्यासविषय आणि विचारधारांनुसार कोडी सोडवू पाहातात. एक एपिसोड, एक केस! आता लक्षात आलं का, मी का ‘ईव्हल’ला ‘प्रोसिजरल ड्रामा विथ अ ट्विस्ट’ म्हणतोय ते!

ही मालिका एवढ्यापुरतीच मर्यादित असती, तरीही एक वेगळी मालिका एवढ्यापुरतं तिचं महत्त्व राहिलंच असतं. पण क्रिएटर रॉबर्ट आणि मिशेल किंग दांपत्य आपल्या अचाट लेखनाच्या जोरावर तिला तिच्या परीघात राहूनही तो परीघ असा काही विस्तारायला लावतं, की बघतच राहावं! सीबीएसने जरी या मालिकेचं वर्णन ‘सुपरनॅचरल ड्रामा’ असं केलेलं असलं, तरीही ती प्रत्येक भागात, प्रत्येक भागातच कशाला अगदी प्रसंगांमागून प्रसंगांमध्ये सातत्याने ‘सायकॉलॉजिकल थ्रिलर’ ते ‘सुपरनॅचरल ड्रामा’ असे मस्त हिंदोळे खात राहाते. ही सुपरनॅचरल विषयावरची मालिका आहे असा आपला विश्वास बसू लागतो न लागतो तोच एपिसोडमध्ये असा काही ट्विस्ट येतो की ही मालिका कुणातरी सायकोपॅथीचा भयंकर अभ्यास असलेल्याच्या मेंदूतून स्फुरलेली सायकॉलॉजिकल थ्रिलर आहे, याची खात्री पटते. आणि ती पटलेली खात्री किंचितशी स्थिरावते न स्थिरावते तोच मालिका क्षणार्धात सुपरनॅचरल गोष्टींच्या शिखरावर उडी मारून स्वार होते! आणि हे सारे ‘फ्रिंज’सारखे (२००८-२०१३) सपाट नाही बरं का, तर इतक्या शैलीदारपणे की डोक्याचा भुगा होत असल्याचा मनापासून आनंद व्हावा!

क्रिस्टिन, डेव्हिड आणि बेन यांच्या वेगवेगळ्या विचारधारांची सातत्याने होणारी टक्कर हा सुद्धा मेंदूसाठी एक चमचमीत खुराक आहे. पराकोटीची आस्तिकता, पराकोटीची नास्तिकता आणि अज्ञेयवाद या तिन्ही मुद्यांना व्यवस्थित गवसणी घातल्यामुळे मालिका कोणत्याही एका बाजूला झुकत नाही. तिची वस्तुनिष्ठता उणावत नाही. तिघांच्याही आयुष्यातील वैयक्तिक संघर्षसुद्धा इतक्या सखोल आणि संयतपणे लिहिलेयत ना की, त्यांचा त्या तिघांच्याही व्यावसायिक आयुष्यांवर होणारा परिणाम अतिशय नैसर्गिक वाटतो. केवळ सध्या प्रसारित होणाऱ्याच नव्हे तर या आधी येऊन गेलेल्या मालिकांमध्येही ज्यांचे लेखन सर्वश्रेष्ठ होते, अशा मालिकांच्या यादीत ‘ईव्हल’चा कुठे ना कुठे समावेश निश्चितपणे करावा लागेल. या मालिकेतील विनोद जितके नैसर्गिक आहेत, तितक्याच बाकीच्या भावनादेखील नैसर्गिकपणेच येतात. विशेषतः भीती. सुपरनॅचरल म्हटलं की दचकवण्यासारखे जंप स्केअर्स टाकणे हा अतिशय सेफ गेम असतो. ‘ईव्हल’ मात्र जंप स्केअर्सवर अतिशय कमी अवलंबून राहाते. उलट तिचा भर हा कणाकणाने आणि क्षणाक्षणाने ताण व भीती विकसित करण्यावर जास्त आहे, ही तिची आणखी एक जमेची बाजू. ही गोष्ट त्यांनी आत्तापर्यंत प्रसारित झालेल्या प्रत्येक भागामध्ये शंभर टक्के यशस्वी केलीये! काही काही दृश्यांमध्ये तर हा ताण अगदी असह्य वाटायला लावतो.

‘ईव्हल’ची दुसरी महत्त्वाची बाजू म्हणजे ही मालिका ना स्वतःला अतिशहाणी समजते ना प्रेक्षकांना मूर्ख. आपला अंगभूत स्मार्टनेस राखतानाच प्रेक्षकांनाही सतत विचार करायला लावणाऱ्या ज्या काही दुर्मिळ मालिका असतात, त्यांच्यापैकी ‘ईव्हल’ आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांचा जो काही मुख्य स्टोरी आर्क आहे, तो अगदी पहिल्या दिवसापासून चालू होतो. ‘पीओआय’, ‘फ्रिंज’ यांनी मुख्य मुद्याकडे यायला जवळजवळ पहिला सबंध सीझन खर्ची घातलेला असताना, ‘ईव्हल’ खरोखरच सुखद धक्का देणारी आहे. त्याहून विशेष म्हणजे, ही मालिका अद्याप तरी पॉलिटिकल करेक्टनेसच्या अट्टाहासात वाहावत गेल्यासारखी वाटत नाहीये.

पण ज्या व्यक्तीमुळे मी ही मालिका पाहायला सुरुवात केली, त्या मायकेल इमर्सनचं काय? सगळ्यांचंच काम कमाल झालंय. विशेषतः प्रत्येकाचीच संवादफेक अतिशय स्तुत्य आहे. पण मालिकेतील सगळे सगळे लोक एकीकडे आणि एकटा मायकेल इमर्सन एकीकडे! ‘पीओआय’मधील क्युट, सालस, सज्जन हॅरल्ड. इकडे मात्र तोच चेहरा, तोच बांधा, तोच आवाज आणि तरीही तो डोळ्यांनी अशी काही गंमत करतो ना की, तो दिसताक्षणीच त्याची किळस वाटते. नुसते पाहाताक्षणीच कळते की हा माणूस नीचांमधलाही नीच आहे, म्हणजे त्याने काय पवित्रा घेतला असेल, कल्पना करा! ‘पीओआय’ पाहाणाऱ्यांना हा मुद्दा जास्त चांगला समजेल की, मायकेल इमर्सनचा डॉ. लीलंड टाऊन्सेंड जर ‘पीओआय’च्या एखाद्या एपिसोडमध्ये असता, तर जॉनने दर मिनिटागणिक त्याला आपला स्पेशलवाला गुद्दा मारला असता! अक्षरशः ‘ईव्हल’ या शब्दाचं साकार रूप आहे तो. त्याच्या अतिशय साध्या साध्या शब्दांतून, हालचालींतूनही दुष्टपणाचा, पापाचा घाणेरडा व उग्र दर्प पाझरत राहातो. हे पात्र किंग दांपत्याने काय सुंदर लिहिलं असेल ते असो, पण मायकेल इमर्सनने त्याला ज्या काही उंचीवर नेऊन ठेवलंय ते अकल्पनीय आहे. विकृतीची परिसीमा आहे हा लीलंड टाऊन्सेंड. सगळे मुद्दे बाजूला ठेवून फक्त आणि फक्त त्याचा अफाट अभिनय पाहात राहावंसं वाटतं, बस!!

याचा अर्थ ‘ईव्हल’मध्ये त्रुटी नाहीत का? आहेत. मालिका ‘सायकॉलॉजिकल थ्रिलर’ ते ‘सुपरनॅचरल’ या हिंदोळ्यांमध्ये काही काही मुद्यांचे स्पष्टीकरणच द्यायचे विसरून जाते. या त्रयीने काम केलेल्या केसेसमध्ये त्या सुटल्यानंतरही ज्या काही महाभयानक उलथापालथी घडतात, त्याकडे या टिमचे (अद्याप तरी) दुर्लक्ष झालेले दिसते. अर्थातच या गोष्टी मालिका जसजशी पुढे सरकेल, तसतश्या उलगडत जातीलच. पण चालू भागांमध्ये त्यांना प्रश्नच न पडणे, ही गोष्ट खटकत राहातेच. ही मालिका ‘पीओआय’च्या दर्जाची आहे का? ‘पीओआय’ हा बेंचमार्क आहे माझ्या दृष्टीने. ‘ईव्हल’चा अद्याप पहिला सीझनसुद्धा पूर्ण झालेला नाही. त्यामुळे अशी तुलना इतक्यातच करणे अनाठायी आहे. पण ‘ईव्हल’ने आत्ता सुरू आहे त्याच दर्जाचे अजून पाच सीझन्स दिले, तर ती ‘पीओआय’च्या दर्जाला शंभर टक्के स्पर्शू शकते, यात काहीच संशय नाही. तितकी तिची क्षमता नक्कीच आहे. नोलनच्या चाहत्याकडून हे वाक्य उच्चारलं जाणं, हीच ‘ईव्हल’च्या यशाची सगळ्यांत मोठ्ठी पोचपावती आहे!

४.७५/५

— © विक्रम श्रीराम एडके.
[लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *