पंचेश्वरम्

लंकादहन करून हनुमान जसा परततो तसे युद्धकांड सुरू होते. श्रीराम हनुमानाला लंकेचे वर्णन करायला सांगतात. लक्षात घ्या, हनुमान हा जरी सीतेचा शोध लावण्यासाठीच गेलेला असला, तरीही लंकादहन करताना आणि त्याहीपूर्वी लंकेत भ्रमण करताना त्याने अतिशय बारीक नजरेने सगळे टिपलेय. तेच तो आता रामाला तपशीलवार सांगतो की (युद्ध. सर्ग ३), “लंका अत्यंत संपन्न असून मत्त हत्तींनी व्याप्त आणि रथांनी समृद्ध आहे. तिला चार मोठमोठे आणि दुर्जेय असे दरवाजे आहेत. या चारही दरवाजांवर यंत्रे बसवलेली आहेत ज्यांच्यातून शत्रूसैन्यावर बाणांचा आणि दगडांचा वर्षाव केला जाऊ शकतो. तिथेच लोखंडाने बनलेल्या अनेक काटेदार शतघ्नीसुद्धा तैनात आहेत. लंकेच्या चहुबाजूंनी अभेद्य अशी तटबंदी आहे. तिच्याभोवती खंदक आहेत ज्यात मगरी आणि मोठमोठे मासे वास करतात. खंदकांवर उपरोक्त चारही दरवाजांना जोडणारे असे चार पूल आहेत. शत्रूसैन्य या पुलांवर चढलं की त्या पुलांना पाण्यात पाडण्याची यंत्रांकरवी सोय केलेली आहे. या पैकी कोणत्याच कामांमध्ये ढिलाई न होण्याकडे रावण स्वतः जातीने लक्ष पुरवतो. याउप्पर लंकेच्या भोवती या कृत्रिम तटबंदीखेरीज नद्या, पर्वत आणि जंगलदेखील आहे. लंका ही समुद्रकिनाऱ्यापासून बरीच आत दक्षिणेकडे आहे. त्यातही ती उंचावर वसलेली आहे. तिच्या पूर्वद्वारावर दहा सहस्र राक्षसांचा खडा पहारा आहे. हे सैनिक हातात शूल धारण करतात आणि युद्धप्रसंगी तलवारींनी झुंजतात. असंच दक्षिणद्वारी एक लाखाचं चतुरंग अर्थातच हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ यांनी सुसज्ज सैन्य आहे. लंकेच्या पश्चिमेकडे सैन्यसंख्या दहा लाख आहे. हे सैनिक अस्त्रशस्त्रांमध्ये निपुण आहेत व त्यांच्याकडे ढाल आणि तलवारीसुद्धा आहेत. उत्तरेच्या दरवाजापाशी असेच दहा कोटी सैनिक उभे आहेत. त्यांच्यापैकी काही रथी आहेत व काही अश्वारोहणात निपुण असून सगळेच उच्चकुळांमध्ये जन्मलेले वीर आहेत. लंकेच्या मध्यभागी साधारण एक कोटीचे सैन्य असावे. परंतु मी इकडे येण्यापूर्वी खंदकांवरील सगळे पुल तोडून टाकलेयत. खंदक फोडून टाकलेयत. सगळीकडे आगी लावल्यायत. ठिकठिकाणी तटबंदी तोडून टाकलीये आणि सुमारे एक चतुर्थांश सैन्यदेखील मारलेय. जर आपण एखाद्या उपायाने समुद्र लांघू शकलो, तर लंका नष्ट झालीच म्हणून समजा”!

हनुमानाची लंकेवर आक्रमण करण्यासाठी घाई चाललीये याचे कारण उघड आहे की, त्याला रावणाचे झालेले नुकसान दुरुस्त करायला वेळच मिळू द्यायचा नाहीये. त्याने लंकेचे अतिशय बारीकसारीक वर्णन केलेय. जणू लंकेचा शब्दबद्ध नकाशाच! त्यातही एक गोष्ट विशेष लक्ष वेधून घेते. ती म्हणजे (श्लो. २४ ते २७) लंकेच्या पूर्वेला दहा हजार, दक्षिणेला एक लाख, पश्चिमेला दहा लाख आणि उत्तरेला दहा कोटी सैन्य आहे. आता खरोखरच त्या काळी लंकेची लोकसंख्या एवढी होती का या भानगडीत न पडता आपण मुद्याची गोष्ट तेवढी लक्षात घेऊ. मुद्याची गोष्ट अशी की, लंकेच्या पूर्वेकडे सगळ्यांत कमी सैन्य आहे आणि घड्याळी पद्धतीने ते अनुक्रमे दक्षिण, पश्चिम व उत्तरेपर्यंत वाढत जाते. काय कारण असावे याचे? श्रीलंकेचे भौगोलिक स्थान पाहा. पूर्व आणि दक्षिण किनारपट्टीपासून कोणत्याही देशाची भूमी भरपूर लांब आहे. याउलट उत्तर आणि पश्चिमेपासून भारत खूपच जवळ आहे. त्यामुळेच रावणाने उत्तर आणि पश्चिमेकडे, जिथून आक्रमण होण्याची सर्वाधिक शक्यता आहे, तिकडे महाप्रचंड आणि विशेष सैन्य ठेवलेय तर पूर्व व दक्षिणेकडे तुलनेने कमी सैन्य ठेवलेय.

ही तर झाली सामरिक रचना. परंतु श्रीलंकेच्या भोवती आज अशीच एक आध्यात्मिक रचनासुद्धा आहे. कोणती? लंकेच्या किनारपट्टीवर वेगवेगळ्या ठिकाणी पाच वेगवेगळी शिवमंदिरे आहेत. यांनाच पंचेश्वरम् असे म्हणतात! पहिले आहे ते उत्तरेला जाफनास्थित नगुलेश्वरम्. वायव्येला असलेले मन्नार जिल्ह्यातील केतिश्वरम् हे दुसरे. तिसरे आहे ते ईशान्येकडील त्रिंकोमाली जिल्ह्यातील कोणेश्वरम्. चौथे पश्चिमेला पुट्टालम जिल्ह्यातील मुन्नेश्वरम्. आणि पाचवे आहे दक्षिणेकडील मातरा जिल्ह्यातील तोण्डेश्वरम्! जणू श्रीलंकेचे रक्षण करण्यासाठी तिच्याभोवती उभे असलेले भगवान शिवशंकरच! त्यांचीही रचना बहुतांशी रावणाच्या सैन्यरचनेसारखीच आहे. उत्तरेपाशी तीन शिवमंदिरे आहेत आणि पश्चिम व दक्षिणेकडे अनुक्रमे एक एकच शिवमंदिरे आहेत. जणू एखादं आध्यात्मिक सुरक्षकवचच! कदाचित उत्तर आणि पश्चिमेकडून अर्थातच भारतातून जास्त दळणवळण असल्याने भाविकांची संख्या जास्त असेल व म्हणूनही मंदिरे तिकडे अधिक संख्येने असू शकतील. सतराव्या शतकात पोर्तुगीझ मिशनऱ्यांनी ही पाचही मंदिरं ध्वस्त केली होती. अनेक ठिकाणी मंदिरांच्या जागी चर्च बांधले होते. तिथे भाविकांनी वेळोवेळी परत मंदिरे उभारली आहेत.

मी येत्या मार्चमध्ये श्रीलंकेला जातोय. या वेळच्या वेळापत्रकात सगळेच नाही तरी पंचेश्वरांपैकी दोन मंदिरांचे दर्शन घेण्याचा कार्यक्रम आहे. एक कोणेश्वरम् आणि दुसरे मुन्नेश्वरम्! यांपैकी कोणेश्वरमला दक्षिण कैलास (तमिळ: तेन कैलासम्) असे म्हणतात. याचं कारण काय असावं याचा शोध घेताना मला एक ब्लॉग आढळला. त्यात कैलास पर्वत आणि कोणेश्वरम् यांचे भौगोलिक स्थान दिले आहे. कैलासाचे स्थान ३१° ४’ उत्तर व ८१°१८’ पूर्व असे सांगितले आहे तर कोणेश्वरमचे स्थान ८°३५’ उत्तर व ८१°११’ पूर्व असे सांगितले आहे. (गुगलवर हीच स्थाने अनुक्रमे ३१°०६’ उत्तर व ८१°३१’ पूर्व आणि ८°५८’ उत्तर व ८१°२४’ पूर्व अशी आढळतात.) उपरोक्त ब्लॉगच्या लेखकाचा दावा आहे की, दोन्ही स्थाने पूर्णार्थाने जरी नाही तरी बऱ्यापैकी एकाच रेखांशावर येतात! हे वाचायला छान वाटतं, परंतु भूगोलातील कुणा तज्ञाने याची सत्यता पडताळून सांगितली तरच विश्वास ठेवलेले चांगले. दुसरे असे की, स्थानिक मान्यतेनुसार रावणाचा वध केल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी ज्या स्थानी भगवान शिवाची अर्चना केली, त्या स्थानावर मुन्नेश्वरम् मंदिर उभे आहे. मला तरी वाल्मिकी रामायणात असा कोणताच संदर्भ अद्याप आढळलेला नाही. परंतु कधीकधी स्थानिक श्रद्धा व परंपरांचे महत्त्व लेखी गोष्टींपेक्षा अधिक हे असतेच.

दोन्हीही मंदिरांचे दर्शन घेतल्यावर त्यांच्याबद्दल सविस्तर लिहितोच. मी येत्या २ मार्च ते ९ मार्च कालावधीत श्रीलंकेला जातोय. रामायणाशी संबंधित काही स्थळे, काही पर्यटनस्थळे पाहातानाच तिथे रोज एक याप्रमाणे सोबत येणाऱ्या यात्रेकरूंसाठी वाल्मिकींच्या रामायणावर पाच व्याख्याने देणार आहे मी. तुम्हीही सहभागी होऊ इच्छित असाल, तर अद्याप जागा शिल्लक आहेत. ‘माय ट्रॅव्हल वर्ल्ड’च्या श्रीमती वीणा निंबाळकर यांच्याशी +919921907772 या क्रमांकावर संपर्क साधा आणि आजच आपल्या जागा आरक्षित करा! चला अनुभवूया रावणाच्या राज्यात रामायण!!

— © विक्रम श्रीराम एडके
[लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *