सुपरहिरो जॉनरवरील फ्रेश दृष्टीकोन : द बॉईज

अनेक जण आपापल्या क्षेत्रांत शिखरावर पोहोचतात, सेलिब्रिटी होतात. इतके की त्यांचे चाहते असलेले आपण त्यांचे भक्त कधी बनून जातो, समजतही नाही. त्यांची प्रत्येक गोष्ट मग आपल्याला आवडू लागते. त्यांच्या चांगल्या गोष्टींचं बेफाट कौतुक केलं जातं आणि त्यांच्या चुकांचं कधीकधी आडून तर कधीकधी उघडपणे समर्थनही केलं जातं. त्यांच्यावर असलेली चाहत्यांची भक्तीच त्यांना देवाच्या दर्जाप्रत नेते आणि खरा देव पाहिलेला नसला म्हणून काय झालं, या देवाच्या भेटीची आस चाहत्यांना लागून राहाते. भेट होईपर्यंत ठिक असतं, पण त्याहून अधिक परिचय समजा वाढत गेला तर बहुतांश वेळी हाती एकच गोष्ट लागते, ती म्हणजे मोहभंग! कारण, ओळख वाढत गेली की लक्षात येतं की, ती सुद्धा आपल्यासारखीच माणसं आहेत, चुका करणारी आणि शेकडो दोषांनी भरलेली, स्वार्थी माणसे. त्यांच्यापैकी बहुतेकांचे पाय हे मातीचेच निघतात, अगदी तुमच्या-माझ्यासारखेच. विशेषतः चंदेरी दुनियेतील सेलिब्रिटींच्या बाबतीत हे अधिकच प्रकर्षाने जाणवते. तिथे त्यांची कला आणि त्यांचा इतर बाबतीतला वकूब यांच्यात फरक न करता आल्यास, मोहभंगाची जागा आघात सहजच घेऊ शकतो. वैयक्तिक पातळीवर असल्यास तो आघातही पचवता येईल एकवेळ, पण जर त्या तथाकथित सेलिब्रिटींचा स्खलनशील स्वभाव हा सबंध मानवतेलाच धोका बनला तर? कथेच्या बहुपटली कोशाच्या आत, अॅमेझॉन प्राईमच्या ‘द बॉईज’ या मालिकेचा मुख्य गाभा हा आहे!

हे असं जग आहे, जिथे सुपरहिरोज खरे आहेत. ते अमेरिकेचं रक्षण करतात. पण एकटे-दुकटे अथवा समूहाने नव्हे, तर एखाद्या टॅलेण्ट-मॅनेजमेंट कंपनीसारखी त्यांना मॅनेज करणारी एक कंपनी आहे, ‘वॉट’; तिच्या माध्यमातून. ‘वॉट’कडे शेकडो सुपरहिरोज आहेत. अमेरिकेतील जवळपास प्रत्येक शहरासाठी एक सुपरहिरो आहे त्यांच्याकडे. पण त्यातही सगळ्यांत जास्त ‘मार्केट’ आहे ते ७ सुपरहिरोजना, ज्यांना म्हटलं जातं ‘द सेव्हन’! हे सगळे सुपरहिरोज अमेरिकेचं रक्षण करतात, पण स्वतःहून नव्हे तर सेलिब्रिटीजना जशा कॉलशीट्स दिल्या जातात तशा कॉलशीट्सच्या माध्यमांतून यांना मिशन्स दिली जातात. त्यांच्यावर सिनेमे निघतात, मालिका निघतात, कॉमिक्स निघतात इतरही शेकडो प्रकारच्या मर्चंडाईझ निघतात, त्या सगळ्यांची मुख्य लाभार्थी जरी वॉट असली, तरी या सगळ्या सुपरहिरोजना कंपनीतील त्यांच्या त्यांच्या शेअर्सच्या प्रमाणात पैसेसुद्धा मिळतात. अशी ही हजारो बिलियन डॉलर्सची कॉर्पोरेट इंडस्ट्री आहे.

आता इंडस्ट्री आहे तिथे पैसा आहे आणि पैसा आहे तिथे पापसुद्धा आहेच! हे सगळे सुपरहिरोज बाह्यतः मानवतेचे अक्षरशः पुतळे आहेत, परंतु त्यांच्या आयुष्यात कुणी जसजसं डोकावतं तसतसं दिसतं की, वास्तव काहीतरी वेगळंच आहे. ज्याला कुणाला हे वास्तव समजू लागतं किंवा नुसता वास जरी लागतो, त्याचं काय होतं, हा एक वेगळाच विषय आहे. परंतु यातूनच त्या सुपरहिरोंच्या विरुद्ध संघर्ष उभा राहातो, ज्याचं नेतृत्व करतात सामान्य माणसे. एकीकडे महाशक्तीशाली सुपरहिरोज ज्यांना अफाट पैसेवाल्या कॉर्पोरेशनचा आणि अनेकानेक प्रभावशाली व्यक्तींचा पाठिंबा आहे आणि दुसरीकडे जवळपास काहीही संसाधनं नसलेली सामान्य माणसे यांच्यातील विषम, भावनिकरित्या गुंतागुंतीचा आणि जीवनाचे अनेक स्तर छेदून जाणारा संघर्ष ही ‘द बॉईज’ची कहाणी आहे.

हल्ली गल्लोगल्ली वेबप्लॅटफॉर्म्स उदयाला आल्यामुळे वेबसीरीजचा उंदरांसारखा सुळसुळाट झालाय. अद्याप कोणतीच सेन्सॉरशिप नसल्यामुळे त्यांच्यात गलिच्छ भाषा आणि लैंगिकतेचा सुकाळ असतो, मग भले कथानकाची गरज असो वा नसो. सवंगतेवर प्रसिद्धी मिळवण्याची वृत्ती अशी काही आरामदायी होऊन बसते की, कथानकाकडे दुर्लक्ष होते आणि शिवीगाळ व नग्नताच धीटपणा समजले जातात. ‘द बॉईज’चे वैशिष्ट्य हे की, ते बोल्डनेस अर्थात धिटाईला एक पाऊल पुढे नेतात. त्यांची पात्रंही शिवीगाळ करतात. त्यांच्यातही खूप सारी नग्नता आहे. किंबहूना अनेक मालिका पाहाण्याची सवय असूनही त्यातील रक्तपाताची काही दृश्ये बघवणार नाहीत बहुतेकांना. पण या सगळ्या गोष्टी दुय्यम ठरतात. कारण एक, त्यांची कथा व मांडणी अतिशय सशक्त आहेत आणि मुख्य महत्त्व त्यालाच आहे. दोन, शिवीगाळ आणि नग्नता या दोन्हीही गोष्टी या मालिकेची खरीखुरी आवश्यकता आहेत, तरच त्यांना जी पात्रं आणि घटना उभ्या करायच्या आहेत त्यांचा आवश्यक तो प्रभाव पडू शकेल. उदाहरणार्थ, मालिकेची सुरुवातच एका महाभयंकर रक्तपाताने होते. पण तो रक्तपात महाभयंकर असतो, म्हणूनच पुढे घडणारे सगळे महाभारत आवश्यक होऊन बसते. किंवा त्यातील जी जी पात्रे शिव्या देतात, त्यांचे वैयक्तिक आयुष्य दुरुस्तीच्या पल्याड बिघडलेय हेच त्यातून दिसते. त्यांच्या जागी कुणीही व्यक्ती दुसरं काही बोलूच शकली नसती.

पण मी जेव्हा धिटाईला एक पाऊल पुढे नेतात म्हणतो, तेव्हा मला फक्त नग्नता आणि शिवीगाळ अपेक्षित नाही. ही मालिका कथानकाच्या ओघात आसपासच्या अनेकानेक राजकीय, सामाजिक मुद्यांवर अतिशय धीट आणि तर्कसंगत भाष्य करते. ती कॉर्पोरेट कार्यप्रणालीच्या भावनाशून्यतेचा, डाव्या विचारसरणीच्या दांभिकतेचा, धर्मप्रसारासाठी अवलंबल्या जाणाऱ्या मार्गांचा, अतिरेकी-स्त्रीवादाच्या उथळपणाचा बुरखा टराटर फाडते. ती दहशतवाद्यांना जिहादी म्हणायला कचरत नाही आणि त्यातील स्त्रिया त्यांच्यावरील अत्याचारांना वाचा फोडतो म्हणता-म्हणता त्या घटनांचा स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करणाऱ्यांच्या विरुद्ध उभ्या राहायला घाबरत नाहीत. इतक्या उघडपणे ढोंगीपणाला फाट्यावर मारणारी दुसरी कोणती मालिका अलिकडच्या काळात क्वचितच आली असेल!

मार्व्हल आणि डिसीची युनिव्हर्सेस सुरू झाल्यापासून गेल्या दशकभरात पन्नास-एक तरी सुपरहिरोपट आणि मालिका आल्या आहेत. त्यातील काही चांगले होते तर काही अतिशय टुकार. पण कसेही असो, आता कुठेतरी त्या दरवर्षी नेमाने येणाऱ्या सुपरहिरोपट आणि मालिकांचे अजीर्ण होऊ लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘द बॉईज’चं एक अतिशय ताजा आणि वेगळाच दृष्टीकोन घेऊन येणं अत्यंत सुखावह आहे. गंमत म्हणजे यातील सुपरहिरोंची पात्रे ही डिसीच्या पात्रांवरच बेतलेली आहेत. मालिका पाहाताना ते सहजच लक्षात येते. पण मालिकेतील त्याहून मोठ्ठी गोष्ट मात्र मार्व्हलवर बेतलेली आहे, कोणती ते तुम्हीच पाहून ठरवा. कामे सगळ्यांचीच जबरदस्त झाली आहेत परंतु त्यातही कार्ल अर्बन, जॅक क्वेड, अँथनी स्टार, टोमर कॅपोन, कॅरेन फुकुहारा, एलिझाबेथ श्यू, एरिन मोरियार्टी यांचा विशेष उल्लेख करावा लागेल.

तुम्हाला वाटेल की, मी बोलता-बोलता काही स्पॉयलर्स दिलीयेत का? तर मी स्पष्टपणे सांगतो, नाही! ‘द बॉईज’चे वैशिष्ट्य हे की, तिच्या प्रत्येक भागात एक मोठ्ठा ट्विस्ट आहे आणि तिच्या पर्वाखेरच्या भागात तर एक भलामोठ्ठा ट्विस्ट आहे जो आगामी पर्वाचीच नव्हे तर सबंध मालिकेचीच दिशा बदलू शकतो. मग आता प्रश्न असा उद्भवतो की, ही मालिका सर्वश्रेष्ठ मालिकांच्या दर्जाची आहे का? तर पहिल्याच पर्वात तसं म्हणणं धाडसाचं ठरेल. त्यांनी त्यांचं दर्जात्मक सातत्य अखेरपर्यंत टिकवलं, तरच तसं म्हणता येईल. परंतु त्यांचं अवघ्या ८ च भागांचं पहिलंच पर्व मात्र कोणत्याही श्रेष्ठतम मालिकेइतकेच दर्जेदार आणि पुढे काय होईल ते वेड्यासारखं पाहायला लावणारं आहे, एवढं निश्चित. पुढच्या पर्वाची प्रतीक्षा राहील!!

*५/५

— © विक्रम श्रीराम एडके
(लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *