सजीवीकरणातून साकारलेल्या वैश्विक कथा : लव्ह डेथ + रोबॉट्स

भारतीय (विशेषतः उत्तरेकडील) चित्रपटसृष्टी आणि अभारतीय चित्रपटसृष्टी यांच्यात एक मूलभूत अंतर आहे. भारतीय चित्रपटसृष्टी या सजीवीकरणाला (ऍनिमेशन) लहान मुलांनी पाहायची गोष्ट मानतात तर अभारतीय चित्रपटसृष्टी मात्र जे जे काही प्रत्यक्ष चित्रणातून साध्य होऊ शकत नाही अथवा ज्याची साथ लाभल्यास प्रत्यक्ष चित्रण अनेक पटींनी अधिक खुलते अशी गोष्ट म्हणजे सजीवीकरण, असे मानतात. पहिल्या वाक्यात मुद्दामहूनच दोन गोष्टी लिहिल्या आहेत. एक म्हणजे अभारतीय चित्रपटसृष्टी. कारण, केवळ पाश्चात्यच नाही तर अनेकानेक पौर्वात्य चित्रपटसृष्टीदेखील सजीवीकरणात अग्रेसर आहेत त्या केवळ सजीवीकरण म्हणजे लहान मुलांच्या गोष्टी असा डबक्यातला विचार न करण्यामुळेच. याचे अतिशय प्रसिद्ध उदाहरण म्हणजे आपणां सर्वांनाच ठाऊक असलेला युगो साकोंचा ‘रामायण – द लिजण्ड ऑफ प्रिन्स राम’ हा १९९२ सालचा चित्रपट. वरवर लहान मुलांसाठी वाटणारा हा चित्रपट मोठ्यांच्याही मनाला तितकाच हात घालतो. आज सुमारे दोन दशके उलटल्यावरही या चित्रपटाच्या तोडीचे काहीच आपल्याकडे बनले नाही, हा दैवदुर्विलास नसून आपले या माध्यमाकडे झालेले दुर्लक्ष आहे, असे माझे ठाम मत आहे. या बाबतीत आपल्याकडील दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी उत्तरेकडील चित्रपटसृष्टींपेक्षा लाखों पटींनी पुढे आहेत, हा दुसरा मुद्दा. सजीवीकरण जरी नाही तरी केवळ विभासांच्या (व्हिज्युअल इफेक्ट्स) जीवावर उभे राहिलेले अनेकानेक चित्रपट तमिळ, तेलुगू, मलयाळम चित्रपटसृष्टींत दिसतात. तसे ते हिंदीतही दिसतातच. पण तुलना केल्यास हिंदीवाले तांत्रिकदृष्ट्या अजूनही खूपच मागे आहेत.

हे नमनालाच घडाभर तेल मी का ओततोय? काही वर्षांपूर्वी एक चित्रपटदिग्दर्शक माझ्याकडे आला होता. त्याला ओटिटी प्लॅटफॉर्म्सवर पिच करण्यासाठी कल्पना हव्या होत्या. मी त्याला सुचवले की, “चित्रपटसृष्टींमध्ये विज्ञानकथा हा प्रकार फारसा का हाताळला जात नाही माहितीये? कारण त्यांना कथा कळत नाही आणि विज्ञान तर त्याहून कळत नाही. त्यांची सगळी अक्कल विज्ञानाच्या नावाखाली उथळ पाण्याच्या बालिश खळखळाटात. मी तुला दहा परिपक्व विज्ञानकथा देतो. त्या कथा आपण सजीवीकरण अधिक प्रत्यक्ष चित्रण अशा मिश्रणातून मांडू. ही कल्पना जर चालून गेली तर हवी तितकी पर्वे करू शकतो आपण”. त्याने त्यावर नेहमीचेच उत्तर दिले, “लहान मुलांसाठीचे कार्टून्स ओटिटीवर कोण पाहील”? मी म्हणालो, “अरे बाबा, सगळ्या कथा प्रौढांसाठीच असतील”. पण त्याला काही ते पटलं नाही. अर्थातच तो प्रकल्प बारगळला. आणि काही दिवसांपूर्वी माझ्या दृष्टीस डेव्हिड फिंचर, टिम मिलर व जोशुआ डोनेन कार्यकारी निर्माता असलेली नेटफ्लिक्स मालिका “लव्ह डेथ + रोबॉट्स” पडली. अधाश्यासारखा पहिला सीझन खात असताना त्या तथाकथित दिग्दर्शक मिनिटाला मिनिटागणिक कचकचीत शिव्या घालताना जी काही मजा आली, त्याला तोड नाही.

लघुपटसंग्रह अथवा अँथॉलजीचा सगळ्यांत मोठा लाभ हा असतो की, प्रेक्षकांना ठराविक विषयावर खूप मोठ्या आवाक्यातील अभिव्यक्ती हाताळलेल्या पाहायला मिळतात. “लव्ह डेथ + रोबॉट्स” या शीर्षकातच मालिकेतील कथांचे विषय सहजपणे दिसतात. संग्रहातील प्रत्येक कथा या शीर्षकातील एक किंवा अनेक विषयांचा मागोवा घेतात. पण हा मागोवा त्या घेतात, विविध विज्ञानकथालेखकांच्या लेखणीच्या जोरावर. मालिकेतील बहुतांशी कथा या कोणत्या ना कोणत्या लघुविज्ञानिकेचे दृक्माध्यमासाठी केलेले अनुकूलन (अडॅप्टेशन) आहेत.

प्रलयोत्तर (पोस्ट-अपोकॅलिप्टिक) इंग्लंडमध्ये अवैध मारामारीत सहभाग घेणारी नायिका (सॉनी’ज् एज) ही धक्कातंत्राचे उत्तम उदाहरण आहे. प्रलयोत्तर जगात तीन यंत्रमानव फिरायला आलेयत (थ्री रोबॉट्स) ही कथा प्रलयोत्तर जगाचाच विषय हाताळते, पण त्यांचा दृष्टीकोन पूर्णतः वेगळा आहे. त्या कथेतून केवळ स्टेटस सिम्बॉल म्हणून विविध ऐतिहासिक स्थळे फिरणाऱ्या पण प्रत्यक्षात इतिहासाची फारशी जाण व आवड दोन्हीही नसणाऱ्या पर्यटकांवर उत्कृष्ट रूपक साधले आहे. त्या पुढील ‘द विटनेस’ ही कथन आणि तंत्र अशा दोन्हीही पातळ्यांवर या संग्रहातील माझ्या सर्वाधिक आवडत्या कथांपैकी एक. का, ते तुम्हीच बघून ठरवा. ‘सूट्स’ कथेतून आक्रमक आणि आक्रमित यांच्या वरवर दिसणाऱ्या भूमिकांवर कमालीचे तिरकस भाष्य केले आहे. ही कथा पाहिल्यावर तुम्हाला जाणवेल की, सध्यादेखील जगभरात व्हिक्टिमकार्ड खेळणाऱ्यांकडून हेच सुरू नाहीये का! ‘सकर ऑफ सोल्स’ अभिजात थराराचा अनुभव देते, तर ‘बियॉण्ड द अक़ीला रिफ्ट’ मायावादाकडे एका वेगळ्याच दृष्टीने पाहाते. ‘गुड हंटिंग’ ब्रिटिशांच्या वसाहतवादासोबतच औद्योगिक क्रांतिचा विषय चीनी पुराणशास्त्राच्या पार्श्वभूमीवर हाताळते, तर ‘द डम्प’ भयकथा आणि तत्त्वज्ञानाच्या सीमेवर गूढ नृत्य करते. विज्ञानकथेची एक उपशैली आहे, ‘मिलिट्री-सायफाय’. त्या शैलीत मोडणारी ‘शेप शिफ्टर्स’ ही कथा कल्पनाविलासाच्या आडून वर्णद्वेष आणि अमेरिकेतील दासप्रथा मांडू पाहाते, तर ‘द हेल्पिंग हँड’ अवकाशातील थराराचा रोमहर्षक पट उलगडते. मिलिट्री-सायफाय प्रकारचीच ‘लकी १३’ निष्ठा आणि श्रद्धेची एक आगळीच कहाणी सांगते. ‘आईस एज’ कथा सिद्ध करते की मनाची कवाडे जर उघडी असतील तर कल्पना करायला, ती कागदावर मांडायला आणि कागदावर मांडलेली कल्पना पडद्यावर चित्रित करायला कसलंच बंधन नसतं. युद्धाच्या काळात कम्युनिस्ट रशियाच्या सैन्याने केलेला एक प्रयोग केवढा अंगाशी येतो याचं काल्पनिक, तरीही भयकारी पण तितकंच ह्रदयस्पर्शी चित्रण ‘द सिक्रेट वॉर’मध्ये आढळते.

नुकतेच या मालिकेचे दुसरे पर्व प्रकाशित झाले. पहिल्या पर्वात असलेल्या १८ भागांच्या तुलनेत दुसरे ८ च भागांचे पर्व निम्म्याहून छोटे आहे. पण त्यातही ‘ऑटोमेटेड कस्टमर सर्व्हिस’ तंत्रज्ञानावर आणि बिगटेक कंपन्यांवर प्रमाणाबाहेर विसंबणाऱ्या समाजाचं भयाण वास्तव चित्रित करते. ही कथा काल्पनिक आहे, पण ती कल्पना सत्यात उतरायचा दिवस कदाचित कल्पनेहूनही जवळ असेल. पुराणकाळापासून माणसाने कायमच अमरत्त्वाचा ध्यास घेतलाय. पण ज्या अमरत्त्वाला उत्तर मानावं ते नीतिमत्तेचे केवढे मोठे प्रश्न उपस्थित करू शकते, याचा मागोवा ‘पॉप स्क्वाड’ घेते. कदाचित म्हणूनच पुराणांतरी अमरत्त्व मागणारे बहुतांशी राक्षस असावेत. अमरत्त्वाचीच दुसरी गहन बाजू सांगण्याचा प्रयत्न ‘स्नो इन द डेझर्ट’ मार्मिकपणे करते. ‘द टॉल ग्रास’ ही अतिशय नेटकेपणाने विणलेली पक्की भयकथा आहे. आणि भयकथेच्याच अंगाने जाणारी लहानशी ‘ऑल थ्रू द हाऊस’देखील तितकीच कमाल आहे. ‘लाईफ हच’ ही जीवनसंघर्षकथा (सर्व्हायवल स्टोरी) काळजाचे ठोके चुकवते. पण या दोन्हीही पर्वांमध्ये मिळून माझी सर्वाधिक आवडती कथा आहे ती, ‘द ड्राऊन्ड जायण्ट’. अतिशय काव्यात्म भाषेत उलगडणारी ही विज्ञानकथा घटनात्मक कमी आणि अंतर्मुख करायला लावणारीच जास्त आहे.

पण म्हणून दोन्हीही पर्वांमध्ये वाईट कथाच नाहीत असं नाही. ‘व्हेन द योगर्ट टुक ओव्हर’ ही कथा रूपक म्हणून अतिशय उत्तम आहे, पण लघुपट म्हणून तितकीशी भिडत नाही. त्या उलट ‘फिश नाईट’ अतिशय उत्तमरित्या मांडली आहे, पण अखेरीस एकूणात मुद्दा नसल्यासारखी वाटते. ‘ब्लाईंड स्पॉट’ कथा वाईट नाही, पण त्यात काही ‘वाह’ म्हणावं असं घडतही नाही. तिला मी चांगली, पण श्रेष्ठ नाही अशा वर्गात टाकेन. या उलट ‘अल्टरनेट हिस्ट्रीज’मध्ये क्षमता अचाट होती, पण त्याचा १% ही वापर त्यांनी केला नाही. त्यांचं सगळं लक्ष सतत काहीतरी विनोदी घडवण्यातच जास्त होतं. ‘झिमा ब्लू’ ही कथा एखाद्या अमूर्त चित्रशैलीसारखी आहे. तुम्ही तासनतास तिची स्तुती करू शकता, पण त्या स्तुतीसुमनांतील एकही मुद्दा सिद्ध करू शकत नाही. ती अतिशय प्रेडिक्टेबल तर आहेच, पण त्यांनी रहस्योद्घाटन खूप आधीच केल्यामुळे तिचा पडायचा तेवढाही प्रभाव पडत नाही. दुसऱ्या पर्वात मुळातच कमी कथा आहेत. त्यामुळे ‘आईस’ ही वाईट जरी नाही तरी त्यातल्या त्यात दुर्बळ असलेली कथा अधिकच वाईट प्रकारे उठून दिसते एवढंच. अर्थात, हे माझे मत झाले. तुमच्या दृष्टीने दोन्हीही पर्वांतील चांगल्या व वाईट कथा या पेक्षा वेगळ्या असू शकतात. मुद्दा फक्त एवढाच आहे की, संग्रह म्हटला म्हणजे दर्जात्मक एकजिनसीपणाचा बळी हा जातोच.

मालिकेचे मला सर्वाधिक भावलेले वैशिष्ट्य म्हणजे, वेगवेगळ्या कथांचे सजीवीकरण वेगवेगळ्या स्टुडियोजनी केले आहे. त्यामुळे क्वचित विषय सारखेच असले तरी प्रत्येक कथेचं व्यक्तिमत्त्व दुसरीहून स्वतंत्र दिसून येतं! काही कथांचं सजीवीकरण चित्रासारखं विस्मयचकित करणारं झालंय तर काहींचं पात्रे अगदी जिवंत वाटावीत इतकं खरंखुरं झालंय. सजीवीकरण म्हणजे पोरखेळ न मानता अभिव्यक्तीचं माध्यम मानलं तर ते कथाकथनात काय साध्य करून देऊ शकतं हे अनुभवायचं असेल, तर ही मालिका पाहिली’च’ पाहिजे. विशेषतः त्यातील काही कथा या सजीवीकरण अधिक चित्रपटीय कथनतंत्रे यांची इतकी अफाट सांगड घालतात की, त्यांचा एकत्रित परिणाम हा कमालीचा रोमहर्षक घडतो. तुम्ही जर सजीवीकरण म्हणजे चारदोन माहितीतील स्टुडियोज इतकाच मर्यादित विचार करत असाल, तर ही मालिका तुमची या विषयाकडे बघण्याची दृष्टीची बदलून सोडू शकते. सजीवीकरण हा मोठ्ठा परीघ पकडून या मालिकेने एखादे कलात्मक प्रदर्शन भरवावे तशा कथेगणिक विविध शैली समर्थपणे हाताळल्या आहेत. एका विशिष्ट मुद्यावर इथे टिप्पणी करणे मला अतिशय गरजेचे वाटते. आपल्याकडे जेव्हा सजीवीकरण करतात, तेव्हा त्या व्यक्तींची त्वचा अगदीच नितळ दाखवतात, त्यांच्या कपड्यांवरील सुरकुत्याही अगदीच आळशीपणाने रेखाटतात. उलट माझ्या दृष्टीने चांगले व खरेखुरे वाटणारे सजीवीकरण तेच ज्यात पात्रांची त्वचा ही तुमच्या-माझ्या त्वचेसारखीच सुरकुत्या, डाग, वांग, खड्डे यांचे चपखल मिश्रण असलेली, त्रुटीपूर्ण दिसते. ज्यात कपड्यांवर सुरकुत्या या यादृच्छिक नव्हे तर, हालचालींना अनुरूप अशाच पडतात. या दोन्हीही संग्रहांमध्ये जेव्हा जेव्हा सजीवीकरणाची शैली वास्तववादाकडे झुकलीये, तेव्हा तेव्हा त्यांनी या बारीकसारीक बाबीदेखील साध्य करून दाखवल्या आहेत!

मी वर एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे भारताबाहेर बहुतांशी ठिकाणी सजीवीकरणाला लहान मुलांपुरतंच मर्यादित मानत नाहीत. त्यामुळे दोन्हीही पर्वांतील कथा या प्रौढांसाठीच आहेत. त्यांच्यात कामुकता, रक्तपात, बीभत्सपणा, नीचपणा यांची रेलचेल आहे, इतकी की काही काही वेळा मालिका केवळ नेटफ्लिक्सची आहे म्हणून या गोष्टी घुसडल्या किंवा तशाच कथा निवडल्या की काय असे वाटून जाते. थोडक्यात, काहीतरी टोकाचं दाखवणं म्हणजेच वेगळा विचार करणं हा प्रकार इतरत्रही कमीअधिक प्रमाणात का होईना आहेच. किंबहूना तो इतरत्र आहे, त्याचीच नक्कल इकडचे अनेक तथाकथित ‘स्वतंत्र’ विचार करणारे करतात, हे उघड गुपित आहे. पण अर्थात, प्रौढांसाठी म्हटलं की ‘तेवढंच’ येत नाही. मालिकेतील बहुतांशी कथा या विचारप्रवर्तक आहेत, अंतर्मुख करून सोडणाऱ्या आहेत, लेकी बोले सुने लागे असे रूपक करणाऱ्या आहेत. ईशोपनिषदात अध्यात्म आणि विज्ञान यांच्यापैकी कशालाच कमी लेखलेले नाही, उलट दोन्हींनाही उचित महत्त्व दिलेलं आहे. विज्ञान म्हणजे तरी काय, तर भौतिक जगात सिद्ध करता येण्याजोगे तत्त्वज्ञानच असे मी मानतो. “लव्ह डेथ + रोबॉट्स”मधील बहुतांशी कथांच्या मुळाशी असेच विज्ञानाचे तत्त्वज्ञान आहे. त्यामुळेच त्या कथा आणि पर्यायाने दोन्हीही संग्रहच त्या त्या देशकालपरिस्थितीपुरते मर्यादित न राहाता वैश्विक होऊन जातात. आणि ज्याचे डोळे बाहेरूनच नव्हे तर आतूनही उघडे असतात, त्याला वैश्विकता ही भावतेच भावते!

*४.७५/५

— © विक्रम श्रीराम एडके
[लेखकाचे अन्य लेखन वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *