प्रवासचित्रे : १. षण्मुगम

सोलापूरात बाजीराव सांगून निघालो, तर रेल्वेत षण्मुगम भेटला. अर्थात, भेटला असं मी आत्ता म्हणतोय. भेटला तेव्हा तर आम्ही एकमेकांना ओळखतही नव्हतो – ना नाव माहिती होते! माझ्या शेजारच्याच आसनावर तो बसला होता. लुंगी सांभाळत नाश्त्याची कसरत चालली होती त्याची. गडी साधारण चाळीशीचा. त्यातून तमिळ, हे बघताक्षणीच समजत होतं. आता तमिळ म्हटलं की, माझे अष्टसात्त्विक भाव जागृत होतात खरं तर, पण त्या राज्याला प्रचंड बुद्धीवैभव असूनही मख्ख चेहऱ्याचा आणि भिडस्तपणाचा शापच आहे की काय, न कळे. षण्मुगमच्या चेहऱ्यावरचे त्रयस्थ भाव पाहून मी स्वत:हून काहीच बोललो नाही. कानात रहमान घातला आणि ब्रह्मानंदी टाळी लागली माझी.

जरावेळाने त्याने एक तमिळ मासिक काढले आणि वाचत बसला. तो वाचत असलेल्या लेखाच्या शीर्षकातली अक्षरे लावायचा मी आपसूकच प्रयत्न करु लागलो – “पा.. सं.. गा.. २”! आता यात माझ्या तमिळ अक्षरज्ञानाचा वाटा किती आणि लेखावर असलेल्या ‘सूर्या’च्या चित्राचा वाटा किती, हा एक संशोधनाचाच विषय ठरावा! कानात इयरफोन्स असले की, माणूस अंमळ मोठ्यानेच बोलत असतो. माझे हे तमिळ-साक्षरता अभियान षण्मुगमने ऐकले आणि हसला. मीही तत्परतेने इयरफोन्स काढले.
त्याने विचारले, “नी तमिळाऽ (तुम्ही तमिळ आहात का)?
मी बावरुन म्हणालो, “इल्लऽसाऽऽर, येनक्के तेरीयो.. कोंचोकोंचो (नाही सर, मला येते थोडी थोडी)! ना मराठी ईर्कऽ (मी मराठी आहे)”!

त्याला आश्चर्य वाटले. मराठी असून या माणसाला तमिळ कशी काय येते? कोणत्याही तमिळ माणसाने विचारलेल्या या प्रश्नाचे उत्तर देणे मला सर्वाधिक रम्य वाटते. मी त्याला रहमानबद्दलची माझी आवड सांगितली. कसं त्या आवडीपायी तमिळ गाणी ऐकायला सुरुवात केली, तेही सांगितले. अर्थ कळत नसायचा, त्यामुुळे इंटरनेटवर अर्थ शोधू लागलो. त्यातून काही शब्द समजले. मग कुठून शिकता येईल ही भाषा? मी तमिळ चित्रपट पाहू लागलो. सब-टायटल्स वाचून शिकू लागलो. कामानिमित्ताने चेन्नईवारी होणार असेल, तर चुकवत नाही मी. गेली ९ वर्षे हाच क्रम आहे माझा. असे करुन करुन आता मला तमिळ ३०-४०% बोलता येते आणि ५०-६०% समजते!

हे सारे मी त्याला थोडे हिंदी, थोडे इंग्रजी, थोडे तमिळ असे सांगितले. कुणीतरी आपल्या राज्याची भाषा शिकण्यासाठी एवढी मेहनत घेतंय, हे ऐकून त्याला धक्का बसला. अभिमान वाटला. या संमिश्र भावनांनी काहीसा अंतर्मुख झाला षण्मुगम. जरा वेळ कुणीच काही बोललं नाही. रेल्वेची लयबद्धता तेवढी शांततेवर लकेरी उमटवत होती. विचार केल्यासारखा चेहरा करुन षण्मुगम बोलला,
“म्येरा पूरा बाचपान चेन्नै में गया. म्येरा मामा ता वुदर. कपडा का बिजनेस करता ता वो. मैं तो कबी इस्कूल गया नै. मेरेको क्या आयेगा? बाचपानसेई मामा का पास जानेकू ओना. वो मे को सिकाता, बिजनेस. मई बारा साल का ता, जब वो मे को पूणा ले आया. और बोला, मैं चार दिन बाद आयेगा. ये तेरा कोली. इदर रैनेका. मैं डर गया. पर वो माना नै. मेको सौ रुपै देके चला गया. वो चार दिनमें बोत मराटी सिका मैं. बूक तो लगती ना. प्यास तो लगती ना. सिका. काना बोलना सिका. पीना बोलना सिका. चार दिन बाद मामा आया तो मै पूरा मस्त देकके बोत कुश उवा. बोला, अब तू तैय्यार ओ गया. पिर मामाने कबी पूणाके उदर द्यान इ नै दिया. मैं चेन्नैसे कपडा लाता. बेचता. अबी मामातो मर गया. पर मैं अकेला पूरा माराष्ट्र गूमता. कपडा बेचता. उंगंऽ मोळीऽ.. क्या कैते उसकू..”?

“भाषा”, मी म्हणालो.

“आं! तुमारा बाषा की वजऽ से. सब समजता मे को. काली बोलते नै आता”!

मला आता षण्मुगमच्या कथेत रस वाटू लागला होता. पण आम्हां वकीलांचं एक तत्त्व असतं. समोरच्याला पूर्ण मोकळं होऊ द्यायचं. फारच भरकटू लागला तर त्याला रुळावर आणायचं, की सुरु पुन्हा गाडी! षण्मुगम पुढं सांगू लागला,
“अबी तुमने ये पडने का कोशिश किया. मैं तो कबी इस्कूल गयाई नै. पिर बी पडता. देक-देकके, सुन-सुनके. तमिळ पडता. इंग्लिश पडता. इंदि पडता. बिलकुल तुमारे जैसा. बिजनेसमें नजर बोत लगती. वो काम आता सिकनेको. तुम बोला वो सुनके मेैं को अपना बाचपान याद आया”!

मी ऐकत होतो. मध्येच तो एखादा हिंदी शब्द अडला, तर सांगायचो मी. तो पुन्हा बोलू लागला,
“मैं गरीब अन्पड. पिर बी सिका. मेको बोत गुस्सा आता जब कोई बोलता, ‘तमिळ बोत मुश्किल’ या ये-वो बाषा बोत हार्ड. ऐसे कैसे ओ सक्ता? बाषा आदमीके वास्ते बनाई, आदमी बाषा के वास्ते नई. अगर कोई ओर बोलता तो तुम बी बोल सकता”.

जगाच्या दृष्टीने अडाणी असलेला षण्मुगम भल्याभल्या सुशिक्षितांना न समजलेलं तत्त्व सांगत होता –
“आदमी दुसरे आदमीका बाषा सिकेगा तो ई तो दुनियामें बात ओगा. ये मेरा बाषा, ये तेरा बाषा करके बैटे तो किसीको कुच नई मिलेगा. अपनी बाषा का प्राऊड ओना. पर उससे सिकना नई रुकना चाईए. जितना ज्यादा सिकेंगा उतनी अपनी कुद की बाषा और प्यारी लगती. सिकना. लेकीन अपनी बाषा, अपनी माँ को कबी गाली नई देना. तुमारा रजनीकांत अमारा तलैवा. कैसे बना? अमारा दिल जीत के ना! अबीबी मराटी बोलता वो. तमिळसे प्यार करता. पर मराटी चोडके नई”!

आम्ही खूप गप्पा मारल्या नंतर. तमिळ गाण्यांच्या भेंड्या लावल्या. त्याला मराठी बोलायला लावलं. चांगलीच दोस्ती झाली आमची. कोण कुठला हा षण्मुगम, आयुष्यात पुन्हा कदाचित कधीच भेटणार नाही मला. पण अशिक्षित माणूस सुशिक्षिताला काहीतरी शिकवून गेला. धूमकेतूसारखा आला आणि मनोगाभाऱ्यातला एक कोपरा उजळून गेला. इतरवेळी त्या कोपऱ्यात सुशिक्षितपणाच्या माजाचाच अंधार साचलेला असायचा!!

— © विक्रम श्रीराम एडके
(लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *