इलयराजा", "रहमान" आणि "क्या हैं मुहब्बत…

गुरुदत्तच्या “प्यासा (१९५७)” मधील “ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है…” ज्याला माहिती नसेल असा संगीत-रसिक सापडणे अशक्यच! खरोखरंच, किती सुंदर संगीताची निर्मिती व्हायची त्या काळात! आजही ती अवीट गीते अंगावर रोमांच उभा करतात. याउलट आजच्या काळातील संगीत पहा. “आत्माहीन” एवढे एकाच विशेषण त्यास शोभून दिसेल. याचे मुख्य कारण म्हणजे आजची चित्रपट-गीते ही केवळ तत्काळ आणि तेवढ्यापुरती गाजावित म्हणूनच बनवली जातात. आणि इतकेच नव्हे तर बरेचदा त्यांत मांडलेल्या भावनाही यांत्रिकच असतात. त्यामुळेच आज गाजणारं गीत महिन्याभरानंतर कुणाच्या लक्षातही नसतं.
    अर्थातच या सगळ्याला इलयराजा आणि रहमानसारखे काही सन्माननीय अपवादही आहेत (आणि जी. व्ही. प्रकाशकुमारसुद्धा – पण त्याला अजून बराच मोठा पल्ला गाठायचाय). रहमान आणि राजाबाबतीत बोलायचं झालं तर, दोघांचीही संगीतरचनेची शैली भिन्न आहे. उदाहरणार्थ, राजा सरांचा भर गीताची मूळ चाल जशीच्या तशी ठेवण्यावर अधिक असतो. मग जेवणात वरून मीठ भुरभुरावं तश्या ते त्या गीतात वाद्यसंयोजनाद्वारे भावना भुरभूरतात. त्या गीतातील भावनांची अभिव्यक्ती सुयोग्य गायक अथवा गायिकेद्वारे करवून घेणे त्यांना अधिक आवडते. अश्याप्रकारे सिद्ध केलेली त्यांची पाकक्रिया परिपूर्ण असते आणि शिवाय श्रोत्यालाही समजायला सोपी असते. याउलट रहमान सर मात्र गीताच्या मूळ चालीत शब्दांखेरीज संगीताचे वेगवेगळे थर (Layers) पेरतात – कधी वैशिष्ट्यपूर्ण वाद्यसंयोजनाद्वारे तर कधी वैशिष्ट्यपूर्ण ध्वनिमिश्रणाद्वारे. त्यांना गीतातील भावनांच्या अभिव्यक्तीसाठी विशिष्ट गायक-गायिकेची गरज असतेच असे नाही, तर त्यांच्या गीतातील भावना ही चाल, वाद्यासंयोजन, वैविध्यपूर्ण ध्वनींचा वापर अश्या खुपश्या घटकांचा एकत्रित परिणाम असतो. त्यामुळेच त्यांची गीते एकदा ऐकल्यावर काळातही नाहीत, किंबहुना कंटाळवाणीच वाटतात. पण हळूहळू, अधिकाधिक ऐकत गेल्यावर त्यातील नवनव्या गोष्टी मनात रुंजी घालू लागतात. याला मी ते गाणे “चढणे’ असे म्हणतो! ही नवनव्या गोष्टी सापडण्याची प्रक्रिया कधीकधी त्या गीताच्या प्रकाशनानंतर वर्षभरही चालू असते आणि यामुळेच ते गीत महिन्याभरात मरत नाही, उलट जुन्या दारूसारखे अधिकाधिक परिपक्व होत जाते, तजेलदार होत जाते.
    याचा अर्थ असा नव्हे की, राजा सर गुंतागुंतीच्या रचना करतंच नाहीत अथवा रहमान सर साध्यासोप्या रचना करतंच नाहीत. सर्वांना समजावे म्हणून हिंदीतीलच उदाहरणे पाहू. “बातें हवा हैं… (चीनी कम – २००७)” या गीतातील दोन्हीही मध्यमेळ (Interludes) ऐका. एकीकडे सिम्फनी आणि दुसरीकडे रॉक! आणि या दोन्हींच्या एकत्रित परिणामाद्वारे गाण्याच्या अभिव्यक्तीत होणारा बदल हा एकदा ऐकून समजणारा नाही; किंबहुना विचित्रच वाटणारा आहे. आज ५ वर्षांनंतरही मी आश्चर्यात बुडालेलो आहे की इतक्या गुंतागुंतीच्या थरांत या साध्यासोप्या चालीची मांडणी करणे कसे सुचले असेल? किंवा “पा(२००९)” मधील “उडी उडी…” या गीताची ३ विविध भावना मांडणारी ३ विविध रूपे (व्हर्जन्स) आहेत. एकाच चालीतून वेगवेगळ्या वाद्यांद्वारे ३ वेगवेगळ्या भावनांची मांडणी अतिशय रोमांचक आहे. हेही गीत (३ही रूपे) एकदा ऐकून समजणारे नाही. याउलट, रहमान सरांच्या “झूठा ही सही (२०१०)” तील गाणी ऐका. अतिशय सोप्या चाली आणि तितकंच सोपं वाद्यसंयोजन! एकदा ऐकूनच “चढतील” (अपवाद फक्त त्यातील “मूनलाईट”चा!).
    हे सारं विस्ताराने मांडण्याचं कारण म्हणजे “एक दीवाना था (२०१२)”मधील एकमेव नवीन गाणे “क्या हैं मुहब्बत…”! अतिशय साधीसोप्पी चाल, तितकंच साधं (सामान्य नव्हे!) वाद्यसंयोजन! सुरुवातीला मुद्दामच गुरुदत्तच्या गीताची आठवण सांगितली, कारण त्याच धर्तीवर हेही गीत “तरन्नुम” पद्धतीचं! विशेष म्हणजे रहमानची आधीचीच सुरेख असलेली गायकी हरेक गाण्यात अजूनच सुधारत चाललीय! खास करून “मुहब्बत खुदा हैं, खुदा हैं मुहब्बत…” हे शब्द गाताना त्याची सांगीतिक बुद्धिमत्ता आणि गायकी ऐका. कित्येक वर्षांत तरन्नुम हा गीत-प्रकार कुणी हाताळला नव्हता, कारण नुसते “शेर” विशिष्ट पद्धतीने मांडणे म्हणजे तरन्नुम नव्हे तर गीताचा एकूण परिणामही अर्थवाही व्हायला हवा असतो. “संगीताच्या देवा”ने हे सारेच आह्वान अतिशय ताकदीने पेललेय आणि तरीही गीताचा ताजेपणा व प्रामाणिकपणा अबाधित ठेवलाय! तुमच्या वेगवेगळ्या मनोवस्थेत हे गीत तुम्हाला वेगवेगळे वाटेल. कधी ते “Jazz” वाटेल तर कधी ‘गझल” तर कधी “प्रेम म्हणजे नक्की काय हो?” असा सनातन प्रश्न विचारणाऱ्या तत्ववेत्त्याचे मुक्त चिंतन! काहीही असो, हे गीत प्रत्येक वेळी तितकेच गोड वाटते, सुंदर वाटते, प्रामाणिक वाटते! जुन्या गीतांची आवड असणाऱ्या श्रोत्यांना तर हे गीत ऐकल्यावर “तो” सुवर्णकाळच परत आल्यासारखं वाटेल. विशेषत: त्यातील एकूणएक शब्द लक्षपूर्वक ऐका, तुम्हाला निश्चितच जावेद अख्तरच्या प्रतिभेला प्रणाम करावासा वाटेल.

    एकूण सांगायचं झालं तर, इलयराजाही रहमानसारखी गुंतागुंतीची रचना करू शकतो आणि रहमानही इलयराजासारखी सोपी! पण यावेळी मात्र रहमान हा राजाच्या सोपेपणापेक्षाही एक पाऊल पुढे गेलाय! हा “शिष्यादिच्छेत्पराजयम्” स्वत: इलयराजालाही निश्चितच आवडेल आणि माझी खात्री आहे की तुम्हां सर्वांना सुद्धा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *