एका प्रसंगावधानाची गोष्ट!

२००१ साली अमेरिकेत आतंकवादी हल्ला झाला तेव्हा मी नववीत होतो. काही दिवसांतच त्यादिवशी घडलेल्या घटना आणि त्यांचं विश्लेषण करणाऱ्या बातम्या येऊ लागल्या. मला आठवतं, एका बातमीत सांगितलं होतं की ट्विन टॉवर्सवर विमाने आदळली तेव्हा जॉर्ज बुश कोणत्यातरी पूर्वनियोजित कार्यक्रमांतर्गत लहान मुलांच्या एका शाळेत – वर्गात तिथल्या लहानग्यांशी गप्पा मारत होते. व्हाईट हाऊसच्या कर्मचाऱ्यांपैकी एकाने धावत येऊन त्यांच्या कानात घडलेली घटना सांगितली. श्री. बुश यांनी ते ऐकले. चेहऱ्यावरील रेषही ढळू न देता त्यांनी अत्यंत हलक्या आवाजात त्या कर्मचाऱ्याला काही सूचना दिल्या आणि परत ते त्या लहानग्यांशी बोलू लागले. त्यांनी कार्यक्रम संपवला आणि मगच ते ९/११ संदर्भात पुढील कारवाई करायला बाहेर पडले.

मी स्वत:च त्यावेळी शालेय विद्यार्थी होतो. ही बातमी वाचली त्याचवेळी मला वाटून गेलं होतं की, “कर्मचाऱ्याने सांगितलेली बातमी ऐकल्या-ऐकल्या श्री. बुश समजा गडबडून गेले असते तर? तर समोरच्या लहान मुलांच्या मनोधैर्यावर या गोष्टीचा काय परिणाम झाला असता?”

जनतेचे नेतृत्व करू इच्छिणार्‍या,  विशेषत: जनतेच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या नेत्याने खरोखरच अश्याबाबतीत प्रचंड काळजी घेणे गरजेचे असते — कारण त्याच्या एका प्रतिक्रियेवर समोरील संपूर्ण “जमावा”चे वर्तन ठरणार असते. तोच जर गडबडून गेला, तर समोरचा सगळाच्या सगळा जमाव बिथरायला वेळ लागत नाही — आणि मग घडलेल्या दुर्दैवी घटनेपेक्षाही मोठी दुर्दैवी घटना घडायलाही अजिबात वेळ लागत नाही.

भाजपाचे पंतप्रधानपदाच्या उमेदवार श्री. नरेंद्र मोदी यांचेही परवाच्या बिहार सभेदरम्यानचे वर्तन याच निकषावर तपासायला हवे. मोदींना कल्पना नसणार का, की आसपास कसे स्फोट होताहेत. जर मैदानाच्या इतक्या जवळ आतंकवादी पोहोचू शकतात, तर थेट मंचावरच एखादा बॉम्ब असण्याचीही शक्यता अजिबात नाकारता येत नव्हती. अश्या परिस्थितीतही त्यांनी अत्यंत संयमाने आपले भाषण चालू ठेवले. त्या स्फोटांत ८ लोक गेल्याची दु:खद बातमी आपण सर्वांनी ऐकलीय. परंतू विचार करा, मोदींच्या चेहऱ्यावर जरासा जरी ताण उमटला असता, अथवा त्यांनी चुकूनही स्फोटांसंदर्भात काही प्रतिक्रिया दिली असती — आणि उत्तरादाखल तो सबंध आठ-दहा लाखांचा जमाव बिथरला असता, तर काय परिणाम झाला असता? आठ लाखांच्या जमावाची चेंगराचेंगरी होतेय, या नुसत्या कल्पनेनेही अंगावर शहारा येतो. मोदींनी उलट भाषणाच्या शेवटी “घरी जाताना सर्वांनी काळजी घ्या, जपून जा” असे सांगितले. लोकांचे मनोधैर्य खचणार नाही असे शब्द वापरले. शांतता आणि सौहार्द राखण्याचा संदेश दिला. आणि मगच काही काळ उलटून गेल्यानंतर स्फोटांसंदर्भात ट्विटरवर प्रतिक्रिया दिली. हे एका परिपक्व नेत्याचेच लक्षण (सध्याच्या भारतीय राजकारणात अभावानेच आढळणारे!) नव्हे काय? उलट हे स्फोट टाळणे ही ज्यांची जबाबदारी होती ते मात्र कोणत्यातरी हिंदी चित्रपटाच्या संगीतविमोचन सोहळ्यात दंग होते म्हणे!

खरं तर गेल्या दहा वर्षांपासूनही अधिक काळ मला मोदींबद्दल आदर वाटत आलाय, पण अगदी मनापासून सांगतो, परवाच्या या घटनेनंतर त्या आदरात अक्षरश: शतपटींनी भर पडलीये. मोदी भविष्यात पंतप्रधान होतील न होतील हा भाग वेगळा, मात्र अश्या प्रसंगी देशाच्या सर्वोच्च नेत्याकडे लागणारं प्रसंगावधान मोदींच्या ठायी ठासठासून भरलंय, एवढं मात्र निश्चित! “नमो” नम:!!

– © विक्रम श्रीराम एडके.
(लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी क्लिक करा – www.vikramedke.com)

image

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *