सौंदर्यदृष्टीची सद्गुणविकृती: राम-लीला

स्वा. सावरकरांनी मानवी स्वभाव स्पष्ट करणारी एक जबरदस्त संकल्पना मांडलीय – सद्गुणविकृती! अर्थात सद्गुणांचाही जर एका मर्यादेपलिकडे अतिरेक झाला तर ते वाईटच. त्यातून विकृतताच उभी राहाते. सिनेमा क्षेत्रात या संकल्पनेचे चपखल उदाहरण आहे – संजय लीला भन्साळी! कमालीच्या सौंदर्यदृष्टीने चित्रीकरण करणारा हा माणूस केव्हा त्या सौंदर्यदृष्टीच्या अतिरेकात आणि अट्टाहासात हरवून जातो, त्याचे त्यालाही कळत नाही. एरव्ही व्यवस्थित ठिकाणी घडणारी कथा त्याला भव्यातिभव्य सेट्सवरच (तेही चित्रविचित्र रंगांच्या!) का घडायला हवी असते तेच कळत नाही. मोठमोठे सेट्स आणि पात्रांच्या साध्यासाध्या प्रसंगांतही प्रमाणबद्ध हालचाली कथेला मारून टाकतात आणि उरतो फक्त एक मोठ्ठा डोलारा! सद्गुणविकृती, दुसरं काय!

अगदी हेच “राम-लीला”च्याही बाबतीत घडलंय. मुळात “रोमिओ-ज्युलिएट” ही कथा चावून चोथा झालेली. अगदी हिंदी सिनेमातच या कथेचा गेल्या २ वर्षांत तब्बल ३ वेळा रिमेक झालेला (इशकजादे, इसक आणि राम-लीला)!! तीच जुनी ‘खानदानी दुश्मनी’ची कथा घेऊन त्याला गुजरातच्या खेड्यांत एकेकाळी अस्तित्वात असलेल्या माफिया-राजची फोडणी द्यायची, त्यात दर पाच मिनिटांनी एक गाणे टाकायचे आणि हे सारेच्या सारे प्रकरण भल्यामोठ्ठ्या सेट्सवर(च) चित्रित करायचे; की झालीच भन्साळींची ‘राम-लीला’ तयार! बरं, चित्रपट इतका मोठा आहे की, त्याचा शोकांत होत असताना प्रेक्षकांना वाईट वाटण्याऐवजी सुटकेची भावना वाटते हो!! चित्रपट चालू असताना मला स्वत:लाच कित्येकदा एकदाचं ‘राम’ आणि ‘लीला’ला मारून टाकावं आणि सगळा किस्साच संपवून टाकावा असं वाटून गेलं..!

हा झाला एक भाग. परंतू कथा घडताना कुठेतरी, काहीतरी तर्कशास्त्र हवं की नको? ‘राम’ आणि ‘लीला’ एकमेकांना पाहातात आणि दुसऱ्याच क्षणी रोमान्स करायला लागतात. तोही शारिरीक! हा काय प्रकार आहे बुवा? म्हणजे एखादं लहान बाळ पहिल्याच भेटीत अगदी आनंदाने आपल्या कडेवर आलं की, त्याची आई कशी म्हणते – ‘ओळख लागत नाही हो आमच्या शोन्याला, लगेच झेपावतो’! अगदी तस्संच!! नायक आणि नायिका आहेत म्हटल्यावर ते एकमेकांच्या प्रेमात पडलेच पाहिजेत, त्यासाठी कारण कश्याला हवं; या अश्या प्रेक्षकांना गृहित धरण्याच्या वृत्तीपायी व्यक्तिरेखा कच्च्याच राहून गेल्यायत. याचा सगळ्यात जास्त फटका बसलाय तो ‘राम’च्या व्यक्तिरेखेला. त्याची व्यक्तिरेखा सर्वाधिक विखुरलेली झालीये. त्यामुळे जिथे त्याने शांत राहाणे गरजेचे असते तिथे तो तलवार उपसून धावतो तर जिथे नायकत्व दाखवायला हवे तिथे उगाचच शांत राहातो वा रडतो-भेकतो! असाच प्रकार ‘लीला’च्याही बाबतीत झालाय, परंतू दिपिकाने आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर व्यक्तिरेखेतली ही कमतरता सहज लपवलीय. बरं रणबीरच्या लकबी पाहा, दिपिकाची एन्ट्री पाहा – कश्याची आठवण येते? ‘हम दिल दे चुके सनम’मधल्या सलमान-ऐश्वर्याची? बरोब्बर!! हेच पाहायचं होतं तर आम्ही तोच चित्रपट परत पाहू ना. पैसे खर्चून ‘हे’ का पाहावं? एक दिग्दर्शक म्हणून भन्साळीत येत असलेला हा तोच-तोचपणा वाईट आहे. नि:संशय ते सारं पडद्यावर सुंदर दिसतं. पण अर्थपूर्ण आहे का, तर अजिबातच नाही! पुन्हा सद्गुणविकृती!!

अभिनयाच्या पातळीवर सर्वाधिक कमाल केलीये ती सुप्रिया पाठकने! संतोकबेन जडेजापासून प्रेरित वाटणारी ही ‘बा’ची व्यक्तिरेखा तिने इतकी जबरदस्त उभी केलीये की, तिची स्तुती करायला माझ्याकडे शब्दच नाहीत! त्याखालोखाल आहे ती दिपिका. किंबहुना दिपिकाचा अभिनय नसता, तर चित्रपट सहन करणं अशक्यच होतं. रणबीरनेही अतिशय उत्तम काम केलंय. पण तो दिपिकासारखा व्यक्तिरेखा-लेखनातील उणीवांवर मात करू शकलेला नाहीये, हे उघड आहे. लहानश्याच भूमिकांमध्ये अभिमन्यू सिंग, रिचा चड्ढा, बरखा बिष्ट, शरद केळकर ही मंडळी प्रभाव टाकून जातात. परंतू मुळातच कथेच्या पातळीवर एवढी मोठ्ठी बोंब आहे की, कुणाचाही अभिनयाविष्कार चित्रपटाला समर्थनीय ठरवू शकलेला नाहीये. भन्साळीचे एकाच बाबतीत कौतुक करावेसे वाटतेय, ते म्हणजे ‘संगीत’! चित्रपटाचे संगीत खरोखर चांगले आहे.

चित्रपटात काही तुरळक चांगले क्षणही आहेत. उदा. – गोळ्यांच्या तालावर केलेला ‘भाई-भाई’ गरबा, अभिमन्यू सिंग आणि शरद केळकरच्या मृत्यूचा प्रसंग, ‘लीला’चे बोट कापण्याचा प्रसंग वगैरे. परंतू चित्रपटाच्या लांबीच्या मानाने अश्या प्रसंगांची संख्या अगदीच कमी आहे.

‘राम-लीला’ करणारे पिढीजात कलावंत असतात. आणि ‘जेनो काम तेनो थाये, दूजा करे सो गोता खाये’ ही म्हण आपण सर्वांनीच ऐकलीय. भन्साळींनी ‘राम-लीला’द्वारे तीच म्हण पुन्हा एकवार सिद्ध केलीये. त्यामुळेच उत्तम चित्रपट बनवण्याची क्षमता असलेल्या भन्साळींचा हा प्रयत्न सौदर्यदृष्टीच्या सद्गुणविकृतीचे एक उदाहरण तेवढे बनून राहिलाय..!

* २/५.

– © विक्रम श्रीराम एडके.
(लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी भेट द्या – www.vikramedke.com)

image

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *