आरआरआर — भारताची कथा भारताच्या भाषेत जगाला सप्रेम!

एक आहे जो वरिष्ठ अधिकाऱ्याच्या केवळ एका आज्ञेसाठी सहस्रोंच्या प्रक्षुब्ध जमावात फक्त एक लाठी घेऊन एकटाच घुसतो. जबर जखमी होतो पण आरोपीला पकडून आणतोच आणतो. त्याचं नाव आहे अल्लुरी रामराजू! दुसरा आहे तो जो पूर्ण वाढ झालेल्या जंगली वाघाला जाऊन बिनधास्त भिडतो. वाघ त्याच्या चेहऱ्यावर डरकाळी फोडतो तर हा पठ्ठ्या त्या वाघालाच घाम फोडणारी शतपट डरकाळी फोडतो. त्याचं नाव आहे कोमारम भीम! राम अग्नि आहे तर भीम जल. जलतत्त्व प्राण आणि उदानवायूत विभागले गेले तर अग्निशी अतूट मैत्री करते आणि तीच तत्त्वे जर एकमेकांच्या विरोधात उभी ठाकली तर देवासुरांनाही लाजवेल असा संग्राम होतो! याच अतूट मैत्रीची आणि दुर्लभ शत्रुत्त्वाची कथा म्हणजे एस. एस. राजमौलीचा नवाकोरा चित्रपट, ‘आरआरआर’ अर्थात ‘रौद्रं रणं रुधिरम्’!

एखादी चौकट उभी करण्यासाठी अवकाश आणि काळाला छेद देणारी असीम कल्पनाशक्ती दिग्दर्शकाकडे असणे आवश्यक असते. पण त्याहूनही जास्त आवश्यक असते ती अजून एक गोष्ट, अमर्याद आत्मविश्वास. कल्पनाशक्ती आणि आत्मविश्वास राजमौलीकडे जितका आहे, तितका क्वचितच कुणाकडे असेल. पहिल्या दृश्याच्या पहिल्या चौकटीपासून प्रेक्षकाचे डोळे पडद्याला घट्ट जखडून टाकण्याची भीमरूप शक्ती त्याच्याकडे आहे. या एकाच मुद्यावर भारतातीलच नव्हे तर जगभरच्या बहुतांशी दिग्दर्शकांनी राजमौलीचे पाय धुवून चरणामृत प्यायले पाहिजे, तेव्हा कुठे त्याच्या तेजाचा एखादाच अंश त्यांच्यात उतरू शकेल. आपल्या बुद्धीला पटत असतं की समोर जे दिसतंय ते प्रत्यक्ष जगात कधीच घडू शकत नाही, पण आपलं मनच राजमौलीला फितूर होतं आणि बुद्धीला पोत्यात घालून एखाद्या हिंस्र मांजराला दूर सोडून यावं तसं आपण हसत हसत सोडून येतो. आणि हे एकदा घडत नाही तर प्रत्येक चौकटीत घडतं, तीन तास घडतं आणि चित्रपट पाहाणाऱ्या एक, दोन नव्हे तर कोट्यवधी रसिकांसोबत घडतं. म्हणजे त्या दिग्दर्शकभालतिलकाची ताकद केवढी असेल, कल्पना करा फक्त. त्याचे चित्रपट, त्यांच्या चौकटी, त्यांचं प्रत्येक दृश्य ‘चांदोबा’मधील एखादी कथा सादर व्हावी आणि रंगीबेरंगी चित्रे उभारून यावीत तशी आपल्यासमोर उलगडत जातात आणि आपण लहान मूल होऊन त्या विश्वात हरखून जातो. प्रेक्षकांना रडवणं खूप सोपं असतं हो, आणि या देशाच्या श्रद्धेला व येथील बहुसंख्यकांच्या सहनशील धर्माला शिव्या घालून विचारवंत म्हणून मिरवणं तर त्याहूनही सोपं असतं. पण दुनियादारीने गांजलेल्या, पिचलेल्या प्रेक्षकाचं निरागस लहान मूल करून टाकणं आणि त्याला तीन तास अवर्णनीय अनुभव देत गुंतवून टाकणं नुसतं अवघडच नाही तर अशक्यसुद्धा आहे. राजमौली हा चमत्कार लीलया करतो, एकदा नाही तर सहस्रावधी वेळा करतो!

‘आरआरआर’चं दुसरं सगळ्यांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे तो शब्दबंबाळ नाही. उलट तो शक्य तितका वेळ चित्रभाषेत बोलत राहातो. आणि जेव्हा चित्रभाषेला अजूनच शतपटींनी उठावदार करण्याची गरज असते, तेव्हा आणि तेव्हाच तो संवादांचा आश्रय घेतो. राजमौलीच्या आजवरच्या समस्त चित्रपटमालिकेत शांततेचा सर्वाधिक परिणामकारक वापर केलेला चित्रपट जर कोणता असेल, तर तो हा आहे! पात्रं तर मौनातून व्यक्त होतातच, परंतु कीरवाणीचं तांडव घालणारं अनुपम पार्श्वसंगीत पडद्यावर अनेक वेळा पूर्णपणे गप्प होतं आणि त्या त्या दृश्यांचा परिणाम न भूतो न भविष्यति वाढतो! राजमौलीने किती सूक्ष्म चिंतनातून दृश्यं रचली असतील, फक्त विचार करून पाहा. कीरवाणीचे पार्श्वसंगीत तर मी गेल्या कित्येक वर्षांत [कदाचित ‘बाहूबली – द कन्क्लुजन’नंतर (२०१७) पहिल्यांदाच!] ऐकलेले सर्वश्रेष्ठ रहमानेतर पार्श्वसंगीत आहे. हिंदी, विशेषतः मराठी चित्रपटसृष्टीने हा मुद्दा समजून घ्यायला पाहिजे की, नुसते संगीताचे तुकडे उत्तम असून चालत नाही तर ते पार्श्वसंगीत तांत्रिकदृष्ट्या निर्दोषदेखील असले पाहिजे. कीरवाणीचे संगीत आणि त्यासोबतचे ध्वनीसंयोजन शब्दशः निर्दोष आहेत. एकच गोष्ट केवळ विरस करते ती म्हणजे गाणी उत्तमच असली तरी त्यांच्यावर ‘बाहूबली’चा नको वाटण्याइतपत प्रभाव आहे. पण गाण्यांसाठीसुद्धा राजमौलीने अशा सुरेख जागा काढल्या आहेत की काय महिमा वर्णू! वर म्हणालो होतो ना की, चित्रभाषेच्या पुढचे संवाद आहेत, तसंच जिथे संवादांच्या पुढे जाण्याची गरज पडते तिथेच फक्त राजमौलीने गाणी वापरली आहेत.

के. व्ही. विजयेंद्र प्रसादांची कथा मुळातच एखाद्या रमणीसारखी देखणी आहे. पण जेव्हा त्या कथेला राजमौली पटकथेचा श्रृंगार चढवतो तेव्हा तर तिची अशी काही त्रिभुवनसुंदरी होऊन जाते की, कुणीही सहज प्रेमात पडावं! दोन महानायक, दोघांचाही अफाट चाहतावर्ग. पण असं एकदाही म्हणायला जागा नाही की याला कमी वाव दिलाय आणि त्याला जास्त. उलट दोन्हीही मुख्य पात्रे सतत एकमेकांना आणि पर्यायाने चित्रपटालाही उत्कर्षाकडे खेचतच राहातात! इतकी संतुलित पटकथा मी गेल्या अनेक वर्षांत मुख्य प्रवाहातील कोणत्याच चित्रपटात पाहिली नव्हती. दोन्हीही मुख्य पात्रांची सुसंगती (केमिस्ट्री) ही नुसती सुंदरच नाही तर आजच्या काळात दुर्लभदेखील आहे. एवढी निर्व्याज मैत्री पडद्यावर साकारायला माणूसही तसाच सच्चा असावा लागतो. राजमौलीच्या सच्चेपणाला तारक आणि रामचरण दोघांनीही अजोड साथ दिली आहे. पडद्यावर पात्रांमध्ये सुसंगती दिसण्यासाठी मुळात ती कलाकारांमध्ये असायला हवी, हे दोघेही त्या सुसंगतीचे अप्रतिम उदाहरण म्हणून समोर येतात. विशेष म्हणजे पटकथेत सर्वत्र सांकेतिकतेचा मुक्तहस्ते वापर केलाय. तो इतका सोपा आहे की, सामान्यातिसामान्य प्रेक्षकालाही चटकन कळावा पण इतका संयत आहे की तो कुठेच भडक, बटबटीतसुद्धा न वाटावा. हाच तो पटकथेतील समतोल! चित्रपटात अनेक दृश्ये, संवाद असे आहेत की त्यांचा संदर्भ इतर वेगवेगळ्या प्रसंगांत लागत जातो. पण तो संदर्भ किती जरी बारीक असला तरीही नंतरच्या त्या त्या दृश्यात तो बरोब्बर तीव्रतेने आठवतोच आठवतो. राजमौली चित्रभाषाकोविद असण्याचे याहून मोठे कोणते उदाहरण असेल!

मला अभिमान आणि काहीसा खेददेखील वाटत राहातो की, चित्रपट माध्यमाचा अभ्यास करत असल्यामुळे बरेचदा एखाद्या चित्रपटाच्या कथेत येणारी वळणं मला अचूक समजतात. परंतु इथे मी प्रामाणिकपणे मान्य करतो की, मध्यंतराच्या जरासं आधी कथेत जो एक अनपेक्षित धक्का बसतो तो मला बापजन्मीदेखील ओळखता नसता आला. इतकी सोपी युक्ती वापरून राजमौलीने तो आधी लपवलाय की त्यामुळेच तो ओळखायला अशक्य झालाय. या, या अद्वितीय सामर्थ्याला मी मान लववून प्रणाम करतो! त्यानंतर थोड्याच वेळात एका प्रसंगामध्ये भीमाच्या पाठिशी जलधारा नाचत असतात तर रामच्या पाठिशी अग्नितांडव सुरू असते, तो राजमौलीच्या दिग्दर्शनाचा परमोच्चबिंदू आहे. की ज्या भीम रामाला खांद्यावर घेतो व ते दोघे मचाणावर उडी मारतात तो राजमौलीच्या दिग्दर्शनाचा परमोच्चबिंदू आहे? खरं सांगू, अशी शेकडो दृश्ये सांगता येतील. प्रत्यक्षात सबंध चित्रपटच राजमौलीच्या दिग्दर्शनाचा परमोच्चबिंदू आहे!

एक वेंकटेस्वरुलुचा (समुद्रकणी) अपवाद वगळता चित्रपटात एकही पात्र उगाचच नाही. समुद्रकणीसारख्या ख्यातकीर्त अभिनेत्याला इतकी सोपी भूमिका का दिली असावी? कदाचित चित्रपट बहुभाषिक असल्यामुळे तमिळ प्रतिनिधित्वासाठी ते केलं असावं. पण तो एक अपवाद आहे. बाकी प्रत्येक पात्र ज्याला पडद्यावर वावरण्यासाठी विशिष्ट वेळ दिला आहे, ते प्रत्येक पात्र असं खुबीने योजलंय की त्याने कथा काही कोस तरी पुढेच नेली पाहिजे. सुरुवातीला मला वाटलं होतं की सीतेचे (आलिया भट्ट) पात्र उगाच आहे की काय, पण तिसऱ्या अंकात सुरुवातीला ती कथेला जे निराळेच वळण देऊन जाते, ते अचंबित करणारे आहे. रामायणावर चिंतन करताना मला कायम वाटायचं की वनवासी राम हा दाढी मिश्या वाढवलेलाच असणार. रामचरण हा त्या माझ्या कल्पनेतला राम साक्षात साकारतो. पण वाचिक आणि कायिक अभिनय या दोन्हीही बाबतीत त्याला तारकने अक्षरशः कच्चा खाल्लाय! अजय देवगणने लहानश्याच भूमिकेत अक्षरशः जीव ओतलाय. ॲलिसन डूडी, रे स्टिव्हनसन यांनी खलनायक चपखल साकारलेयत. ऑलिव्हिया मॉरीस कमालीची गोड दिसते.

के. के. सेंदिलकुमारचे छायांकन अप्रतिम झाले आहे. पण खरा कस संपादक ए. श्रीकर प्रसादचा लागला असणार. एवढ्या सुंदर शॉट्सपैकी काय ठेवायचं काय काढायचं आणि एवढा प्रचंड परीघ असलेल्या चित्रपटाची चटपटीत मांडणी करायची म्हणजे काही खायचे काम नाही! ‘बाहूबली’तील विभास जबरदस्त होते, तर ‘आरआरआर’मधील विभास त्याहूनही श्रेष्ठतर झाले आहेत. दुसरे म्हणजे नेपथ्य कसे उभारावे व त्याचा कसा शंभर टक्के वापर करून घ्यावा, याचा वस्तुपाठ म्हणजे ‘आरआरआर’! साडेपाचशे कोटींच्या बजेटमधील एकूणएक रुपया पुरेपूर वापरून घेतलाय आणि त्यातून झालेली निर्मिती नुसती अचाटच नाही तर चपखलदेखील झाली आहे! एका एका दृश्यावर परिच्छेदामागून परिच्छेद लिहिता येतील खरं तर, पण विस्तारभयास्तव एकच सांगतो. तिसऱ्या अंकाचा उत्कर्षबिंदू पाहा. केवढ्या सुंदर सांकेतिकतेतून राजमौलीने दाखवून दिलंय की या राष्ट्राचं उत्थान व्हावयाचं असेल तर राम आणि भीम एकत्र येण्यातूनच ते होऊ शकतं! त्याच प्रसंगापूर्वी म्हणजे तिसऱ्या अंकाच्या सुरुवातीला राजमौली रामायणाची कथा पूर्णपणे उलट फिरवतो, ती माझ्या मते या पटकथेतील सगळ्यांत सुंदर जागा आहे.

वर एका परिच्छेदात मी प्रेक्षकांसाठी निरागस शब्द वापरलाय. तो जाणूनबुजून वापरलाय बरं का! तसं बघायला गेलं तर रामराजू आणि भीम एकमेकांना कधीच भेटले नव्हते. त्यांचं खरं क्रांतिकार्यदेखील चित्रपटाच्या कथाभागानंतर जवळपास दहा वर्षांनंतर सुरू झालंय. थोडक्यात चित्रपट हा त्या दोघाही महान क्रांतिकारकांची काल्पनिक मूळकथा (ओरिजिन स्टोरी) मांडतो. हा ऐतिहासिक चित्रपट नाहीये तर इतिहासाची किनार असलेली काल्पनिका (फॅण्टसी) आहे. दुसऱ्या शब्दांत सांगतो, राजमौलीने चित्रपटात सिनेमॅटिक लिबर्टी घेतलेली नाहीये तर सबंध चित्रपटच सिनेमॅटिक लिबर्टी आहे! पण तरीही तुरळक विवाद सोडल्यास बहुतांशी प्रेक्षकांनी त्याला हसतमुखाने स्वीकारलंय. का? हिंदी ऐतिहासिक चित्रपटांमध्ये लहानसा बदल जरी केला तरी लोक चवताळतात. इथे तर खऱ्याखुऱ्या पात्रांना कल्पनेचा साज चढवलाय तरीही लोकांच्या भावना दुखावत नाहीयेत. का? या सगळ्या ‘का?’चं उत्तर एकच आहे आणि ते हे की, चित्रपट ‘वोक’ नाहीये  आणि म्हणूनच तो प्रेक्षकांनी आपला म्हणून स्वीकारलाय. बहुतांशी वेळा हिंदीत किंवा इतरही तथाकथित आशयघन चित्रपटसृष्टींमध्ये ऐतिहासिकपट बनवताना जेव्हा जेव्हा सिनेमॅटिक लिबर्टी घेतली जाते, तेव्हा तेव्हा दिग्दर्शक त्याची ‘वोक’ – पण कालबाह्य झालेली मूल्यं पात्रांवर, कथेवर लादायचा प्रयत्न करतो. त्याने पात्रांचे सोशल विदुषक होतात आणि कथेची बेचव भेळ होऊन बसते. म्हणून लोक चवताळतात. म्हणून लोक नाकारतात. राजमौली असा मूर्खपणा करत नाही. तो त्याच्या मायबाप प्रेक्षकांना मूर्खात काढत नाही. तो आपल्या कलाकृतीतून रसिकांना उद्धट शिवी घालत नाही. तो लोकांच्या निर्भेळ भावनांना कलेतून अलगद साद घालतो. त्याचा चित्रपट आस्थेच्या, श्रद्धेच्या प्रतीकांना विचित्र विचारसरणींपायी दूर लोटत नाही, उलट अभिमानाने मिरवतो. त्याची ऐतिहासिक पात्रं काल्पनिकतेचा साज लेऊन जरी आली तरी ती जी मूल्यं मांडतात ती काल्पनिक पॉलिटिकल करेक्टनेसची नाहीत. त्याची पात्रं जी मूल्यं मांडतात ती या राष्ट्राच्या मातीतील आहेत, कालजयी आहेत, चिरंतन आहेत आणि म्हणूनच सुसंगत आहेत. म्हणून लोक त्यांना प्रेमाने स्वीकारतात.

राजमौलीचा विकास नीट पाहा. ‘बाहूबली’ द्वयी (२०१५-१७) साकारायला ‘मघाधीरा’पेक्षा (२००९) लाखपटींनी अवघड होती. पण मी अत्यंत जाणीवपूर्वक विधान करतो की, ‘आरआरआर’ हा ‘बाहूबली’पेक्षा लाख पटींनी गुंतागुंतीचा व साकारायला अवघड आहे. आणि म्हणूनच सांगतो, राजमौली त्याच्या भरमसाठ बजेटमुळे यशस्वी नाही. राजमौली भारताची कथा, भारताच्याच भाषेत अत्यंत अभिमानाने सबंध जगाला डंके की चोट पे ऐकवतो, म्हणून यशस्वी आहे. ‘आरआरआर’चं सार हेच आहे. ‘आरआरआर’ या बाबतीत ‘बाहूबली’पेक्षाही सरस आहे!

*५/५

— © विक्रम श्रीराम एडके

[अन्य लेखांसाठी पाहा www.vikramedke.com]

One thought on “आरआरआर — भारताची कथा भारताच्या भाषेत जगाला सप्रेम!

Leave a Reply to संदेश Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *