‘टेनेट’ – उलट्या काळाचा सुलटा भविष्यवेध!

चलचित्र बनवणं आणि चित्रपट बनवणं, यात एक मूलभूत फरक असतो. एक उदाहरण देतो. समजा की, चलचित्र म्हणजे कविता आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत काहीतरी एक विधान करणारी. चित्रपट मात्र कवितेसारखा नसतो. चित्रपट म्हणजे सूक्त असते. त्याची प्रत्येक चौकट ही एखाद्या ऋचेसारखी असते, स्वयमेव काही कथा सांगणारी. आणि या चौकटी जेव्हा एकत्र येतात तेव्हा अनेक ऋचा मिळून जसे एक परिपूर्ण आणि काहीतरी गूढ उलगडून सांगावे तसा अर्थ सांगणारे सूक्त बनते, तसा चित्रपट सबंध पाहिला तर चौकटींनी बनलेली परंतु चौकटींपेक्षा भिन्न अशी कथा उलगडते. हा निकष लावला तर मला सांगा, जगात खरोखर किती ‘चित्रपट’ बनतात! इतकी कठोर परीक्षा घेतली तर जगातील काही भलेभले आणि तिकिटबारीवर अतोनात यशस्वी असलेले चित्रपटकारही निव्वळ चलचित्रकार सिद्ध होतील! परंतु एक असा माणूस आहे ज्याचे चित्रपट हे ‘चित्रपट’ही असतात आणि त्याचवेळी ते तिकिटबारीवर धुमाकूळदेखील घालतात, तो म्हणजे ‘एकमेवाद्वितीयो नान्यकोऽपि’ ख्रिस्तोफर नोलन! त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘टेनेट’देखील याला अपवाद नाही!!

इतर चित्रपटकारांच्या (चलचित्रकारांच्या नव्हे!) चित्रपटांचा आस्वाद घेण्यासाठी तुम्ही चित्रपटसाक्षर असणे गरजेचे असते. नोलन आणखी एक पाऊल पुढे टाकायला लावतो. इथे तुम्हाला नुसतेच चित्रपटसाक्षर असून चालत नाही, तर विज्ञानसाक्षरदेखील असावे लागते! बहुतांशी विज्ञानपटांमध्ये कथा आणि वैज्ञानिक सिद्धांत यांचे सांधे वेगवेगळे असतात. त्यामुळे ज्यांना त्यातील विज्ञान समजत नाही त्यांनादेखील कथेचा आस्वाद घेता येतो. नोलनच्या चित्रपटांमध्ये मात्र तुम्हाला जर त्यातील विज्ञान समजत नसेल, तर तुम्हाला कथासुद्धा समजत नाही, कारण इथे कथा व विज्ञान वेगवेगळे नसतात तर ‘आत्मा-परमात्मा’सारखे त्यांच्यात अद्वैत असते. त्यामुळेच कदाचित किंवा मुद्दामहून म्हणा नोलन त्याच्या कथेतील विज्ञान एका मर्यादेपलिकडे उलगडून सांगत नाही. किंबहूना सांगूच शकत नाही कारण, त्या कथाविश्वातील बहुतांशी पात्रे ही त्या संकल्पनांशी परिचितच असतात! मी नोलनची तुलना कायमच ए. आर. रहमानशी करत असतो ते यासाठीच. रहमान कधीही त्याचे संगीत उलगडून मांडत नाही. त्यामुळे त्याचे कोणतेही नवे गाणे ऐकताना काहीतरी विचित्र ऐकल्याचा भास होतो. परंतु जसजसं आपले मन आणि मेंदू प्रशिक्षित होत जातात, तसतसं ते गाणं आपसूकच उमजू लागतं. नोलनचे चित्रपट तसेच असतात, एखादी घट्ट गुंडाळी समोर ठेवल्यासारखे. ती हळूहळू एखादं उंची मद्य मुरावं तशी तब्येतीत उलगडत जाते आणि तितका संयम ठेवला तरच आतील गाभ्याचं मूळ स्वरूप समजू शकतं! रहमान समजण्यासाठी जशी तुम्हाला जागतिक स्तरावरील संगीताच्या विविध शाखांची जाण असल्यास अनुभव शतपटींनी विस्तारतो त्याचप्रमाणे नोलनचा कोणताही चित्रपट पाहाताना तुम्हाला विज्ञानाची त्यातही भैतिकशास्त्राची परिचयापेक्षाही जास्त माहिती असेल, तरच तो अनुभव विस्तारतो. ‘टेनेट’ही याला अपवाद नाही. ‘टेनेट’ पाहायला जाणार असल्यास भौतिकशास्त्रातील दोन संकल्पना तुमच्या मनात सुस्पष्ट असल्याच पाहिजेत. आधीच पाहिला असल्यास या दोन संकल्पनांमुळे तुम्हाला तो समजण्यास, पक्षी त्याचा आस्वाद घेण्यास अजूनच साह्य होईल.

१) एंट्रोपी
ही भौतिकशास्त्रातील उष्मागतिकी या उपशाखेची एक संकल्पना आहे. तिचा उपयोग संख्यायामिकीमध्येही होतो. कोणत्याही प्रणालीतून उपयोगी कार्यासाठी प्रति एकक तापमानास अनुपलब्ध असलेली औष्णिक ऊर्जा म्हणजे एंट्रोपी. ही मोजता येते. साध्या भाषेत सांगायचं झालं तर, एंट्रोपी ही अव्यवस्थेचे द्योतक आहे. फक्त ही अव्यवस्था दृष्य स्तरावर नसून रेण्वीय पातळीवर असते. कार्य म्हणजे रेणूंची व्यवस्थित हालचाल. त्यामुळे एंट्रोपी मध्ये कोणत्याही प्रणालीचे रेण्वीय पातळीवर क्रमहीन होणे अपेक्षित आहे. ‘टेनेट’मध्ये मात्र ही एंट्रोपीच उलट फिरवण्याची संकल्पना मांडली आहे आणि तिचे उपयोजन थेट काळ या संकल्पनेशी केले आहे. हिंदू तत्त्वज्ञानात उत्पत्तीसाठी एक खूपच सुंदर शब्द वापरलाय, सर्ग! परंतु विनाशासाठी याच्या बरोब्बर विरुद्ध शब्द जो वापरलाय तो मात्र आहे प्रतिसर्ग! लक्षात घ्या, इथे केवळ विनाश किंवा प्रलय एवढाच अर्थ अभिप्रेत नाहीये, तर त्याहूनही सूक्ष्म पातळीला जाऊन प्रतिसर्ग म्हणजे सर्गाची प्रक्रियाच उलट फिरवणे आहे. म्हणूनच कल्पसिद्धांतानुसार प्रलयानंतर पुन्हा सृजन होते! ‘टेनेट’मध्ये एंट्रोपी उलटी फिरवल्यामुळे केवळ काळच उलटत नाही तर पदार्थ आणि पदार्थविज्ञानाचे नियमदेखील उलट होतात.

२) फ्रेम ऑफ रेफरन्स
फ्रेम ऑफ रेफरन्स किंवा संदर्भचौकट ही एंट्रोपीच्या तुलनेत सोपी संकल्पना आहे. कल्पना करा की, तुम्ही ‘अ’ स्थानावर आहात आणि तिथून शंभर मीटर अंतरावर सरळ रेषेत तुमचा मित्र ‘ब’ स्थानावर आहे. आता तुमच्यापासून, ‘अ’ स्थानापासून एखादी गाडी ‘ब’ स्थानाकडे म्हणजेच तुमच्या मित्राकडे गेली, तर काय होईल? दोन गोष्टी होतील. एक म्हणजे तुम्हाला गाडी ‘जाताना’ दिसेल. आणि दुसरे म्हणजे तुमच्या मित्राला गाडी ‘येताना’ दिसेल. एकाच गोष्टीचे दोन वेगवेगळे परिणाम कसे काय जाणवले? कारण, तुमचे दोघांचेही दृष्टीकोन वेगवेगळे आहेत. तुमच्या संदर्भचौकटीतून म्हणजेच तुमच्या अवकाश आणि काळातून गाडी जातेय, तर मित्राच्या संदर्भचौकटीतून गाडी येतेय. ही संकल्पना खगोलशास्त्रात अजूनच रंजक होते. समजा आपल्यापासून दहा प्रकाशवर्ष दूर असलेल्या एखाद्या ताऱ्याचा स्फोट झाला. तर आपल्या संदर्भचौकटीतून आपल्याला तो स्फोट झाल्याचे आज दिसेल. परंतु प्रत्यक्षात तो स्फोट दहा वर्षांपूर्वीच होऊन गेलाय. म्हणजेच काय, तर आपल्या संदर्भचौकटीतून आपण वर्तमानात असूनही भूतकाळ पाहातो. त्याचवेळी स्फोटाच्या दृष्टीने मात्र आपण भविष्यकाळ असतो. ही संकल्पना कथेच्या पातळीवर ‘टेनेट’मध्ये अत्यंत सुघडतेने मांडली आहे!

आता कथानक! एक अनामिक सीआयए एजंट (जॉन डेव्हिड वॉशिंग्टन) आहे, ज्याच्यावर अचानकपणे तिसरं महायुद्ध रोखण्याची जबाबदारी येऊन पडते. हे महायुद्ध कोण घडवणार आहे? कसं घडणार आहे? त्याचे परिणाम काय होणार आहेत? त्याला काही एक ठाऊक नाही. त्याच्याकडे आहे केवळ एकच शब्द, एकच ‘हस्तसंकेत’, तो म्हणजे ‘टेनेट’! या द्विदिश शब्दातून त्याने काढलेला माग, म्हणजे हा थरारक विज्ञानपट, ‘टेनेट’. विज्ञानपट जरी असला, तरीही नोलन त्याला केवळ तेवढ्याच पातळीवर मांडत नाही. तो त्याची मांडणी करताना थरारक गुप्तचरपट अशी करतो. त्यापाठची त्याची प्रेरणा उघडपणे बाँडपट आहेत. त्यामुळे ‘टेनेट’ हा शैलीच्या पातळीवर नोलनच्याच ‘इन्सेप्शन’च्या (२०१०) समीप जाऊनही पूर्णतया भिन्न झालाय. ही भिन्नता नुसतीच कथेच्या पातळीवर नाहीये, तर इतरही अनेक पातळ्यांवर आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर ‘इन्सेप्शन’मध्ये भोवरा होता, इथे एक छल्ला आहे. परंतु त्यांचे संदर्भ अतिशय भिन्न आहेत, कथेच्या सुरुवातीपासूनच अस्तित्वात असूनही अंती नवेच आयाम देणारे! या खेरीजही काही साम्ये वेगळ्या संदर्भांत आहेतच, पण ती आत्ताच सांगणे रसभंग केल्यासारखे होईल. तो दोष न पत्करताही एक गोष्ट मी ठामपणे सांगतो की, ‘टेनेट’समोर ‘इन्सेप्शन’ भावनिक पातळीवर अधिक तरल असूनही बनवायला, मांडायला आणि रचायला खूपच जास्त सोपा चित्रपट आहे. दहा वर्षांतील नोलनची ही चित्रपटकार म्हणून झालेली उत्क्रांती अक्षरशः तोंडात बोट घालायला लावणारी आहे!

गंमत म्हणजे, ‘टेनेट’ हा नोलनचा आजवरचा सर्वाधिक आत्मभान असलेला चित्रपटदेखील आहे. पुन्हा एकवार रसभंगाचे पातक लागू न देता एक उदाहरण देऊ इच्छितो. खूप साऱ्या अचंबित घटना घडून गेल्यानंतर एका विश्रांतीच्या क्षणी नील (रॉबर्ट पॅटिन्सन) नायकाला म्हणतो, ‘डोकं दुखायला लागलं की नाही’! तेव्हा त्याच्या माध्यमातून खरं तर नोलनच संहितेच्या पातळीवर चौथी भिंत फोडून प्रेक्षकांशी बोलत असतो! आश्चर्य असे की, २०१४ साली लिहिण्यास व २०१९ च्या पूर्वार्धात चित्रिकरणास सुरुवात झालेल्या या चित्रपटात ‘मास्क’ आणि ‘लॉकडाऊन’ या सध्याच्या काळातील सुपरिचित संकल्पना महत्त्वाच्या ठिकाणी वापरण्यात आल्या आहेत, हा भविष्यवेध समजायचा की निव्वळ योगायोग?

‘टेनेट’ची या सगळ्या प्रतिभा, चातुर्य, बुद्धिमत्ता वगैरेंच्याही पलिकडे जाऊन भावलेली गोष्ट म्हणजे त्यात ‘मुंबई’ दाखवलीये. तुम्ही म्हणाल, त्यात काय मोठेसे, इतर सहस्रावधी चित्रपटांमध्ये किंबहूना हॉलिवूडच्याच अनेक चित्रपटांमध्ये मुंबई दाखवलीये की! पण तरीही अंतर आहे. हॉलिवूडने बहुतांशी वेळा जेव्हा मुंबई दाखवलीये तेव्हा ती त्या शहराचं आणि पर्यायाने भारताचं बकालपण अधोरेखित करण्यासाठी दाखवलीये. नोलन हा डावा नसल्यामुळे त्याला आजवर अकॅडमी पुरस्कार जरी मिळालेला नसला, तरीही तो डावा नसल्यामुळेच दु:ख, दैन्य आणि दारिद्र्यच तेवढं विकण्याची त्याच्यावर सक्ती नाही. त्यामुळे त्याच्या नजरेतून दिसणारी मुंबई भकास नाही, तर अक्षरशः जिवंत आहे व कथेचा अत्यधिक महत्त्वाचा भागदेखील आहे. ‘इंटरस्टेलर’पासून नोलनचा छायाकार असलेल्या होय्ते व्हान होय्तेमाने टिपलेली मुंबईची दृश्ये अवर्णनीयरित्या अर्थपूर्ण झाली आहेत. एवढेच नव्हे, तर त्याने एकूण चित्रपटाचीच रंगपट्टीका अशाप्रकारे साकारलीये की गोष्टी व स्थळे ऐंशीच्या दशकातील वाटतात आणि तरीही वातावरणात एक अव्यक्त विषण्णता, प्रसंगी ताणसुद्धा जाणवत राहातो. रिळांवर चित्रण करणे ‘टेनेट’च्या पथ्यावरच पडले आहे.

त्याचवेळी लुडविग गोरान्सनच्या रूपाने नोलनच्या कंपूत नव्यानेच दाखल झालेल्या संगीतकाराने अक्षरशः हान्स झिमरच्याही वरताण संगीत दिलेय. इतक्यातच बोलणे घाईचे होईल, परंतु जर चिकटून राहिला तर मणिरत्नमचा जसा राजानंतर रहमान झाला, तसा हा गोरान्सन सातत्य राखू शकल्यास नोलनचा होऊ शकतो. त्यातही नोलनने खूप साऱ्या छोट्याछोट्या गंमती करून ठेवल्या आहेत. उदाहरणार्थ, संगीत पुऱ्या जोमाने सुरू असतानाच एक पात्र मरतं. त्याच्या मृत्यूच्याच क्षणी बरोब्बर तेवढ्या एकाच क्षणासाठी निरव शांतता पसरते! किंवा सुरुवातीलाच एका ओपेरा हाऊसच्या प्रसंगी आता सिम्फनी चालू होण्याच्या दृष्टीने सगळी तयारी होत असतानाच एक अकल्पनीय घटना घडते आणि दृश्याचं परिमाणच बदलून जातं! एका दृश्याबद्दल लिहिल्याशिवाय राहावतच नाहीये. एक पात्र चालत असते. आणि कुंपणाच्या पलिकडे एक गाडी उभी असते. स्थिर, अचल. पण ते दृश्य चित्रित असे केलेय की वाटते ती गाडी चालत येतेय आणि मग थांबतेय. ‘फ्रेम ऑफ रेफरन्स’चे चपखल उदाहरण!

जॉन डेव्हिड वॉशिंग्टनला त्याच्या पात्रासाठी आवश्यक असलेला माज पुरेपूर शोभलाय. पण त्याच्यापेक्षा लहान भूमिका असूनही त्याच्यापेक्षा अनेक पटींनी चांगले काम रॉबर्ट पॅटिन्सनने केलेय. चांगली संहिता असेल तर आगामी ‘द बॅटमॅन’मध्ये हा माणूस काहीच्या काही कमाल करणार, यात शंकाच नाही. ब्रिटिश मंडळी सर्जनशील गोष्टींकडे व्यवसाय म्हणून न पाहाता आसक्ती म्हणून पाहातात, याचेच हे द्योतक आहे. याच विधानाचे दुसरे उदाहरण म्हणजे मायकेल केन. या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेत्याने वाट्याला आलेला एकच प्रसंग खणखणीत वाजवला आहे. छोट्या, परंतु अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेत डिंपल कपाडिया ठिकठाक वाटते. एलिझाबेथ डेबिकीने काम अतोनात चांगले जरी केलेले असले, तरीही तिची या चित्रपटातील भूमिका आणि ‘द नाईट मॅनेजर’मधील (२०१६) भूमिका यांच्यात लेखनाच्या पातळीवर काही एक अंतर नाही. केनेथ ब्रेनाने मात्र अत्युच्च दर्जाचे काम केले आहे. बऱ्याचशा पात्रांमधील परस्परसंबंध हे पूर्णपणे प्रस्थापित न करता सांकेतिक अर्थाने सूचित करणे ही म्हटलं तर ‘टेनेट’ची जमेची बाजू, म्हटलं तर दोषसुद्धा आहे. या मांडणीमुळे खूप साऱ्या गोष्टी गृहित धराव्या लागतात व गृहित धरलेल्या गोष्टी प्रत्येक वेळी पटतातच असे नाही.

वरच्या परिच्छेदातील ओपेरावरून आठवलं, ‘टेनेट’ समजण्यापलिकडे अनुभवायचा तर तुम्हाला आणखी एक गोष्ट ठाऊक असायलाच हवी, ती म्हणजे ‘सॅटोर चौरस‘! हा चौरस अनेक ठिकाणी आढळून येतो. सर्वांत जुना चौरस पॉम्पेईत असल्याचे व तो इसवी सनाच्या पहिल्या शतकातील असल्याचे मानतात. या चौरसात असलेली पाचही नावे वेगवेगळ्या मार्गांनी द्विदिश आहेत. ही सगळी नावे पात्रांच्या स्वरूपात आणि पॉम्पेईसारखी ठिकाणे स्थळांच्या स्वरूपात नोलनने कथेत मार्मिकरित्या गुंफली आहेत. किंबहूना ‘टेनेट’ हे नावच त्या सॅटोर चौरसातून घेतले आहे.

अजून एक गंमतीची गोष्ट सांगू? ‘डार्क नाईट त्रयी’नंतर (२००५ – २०१२) पहिल्यांदाच नोलनने एखाद्या चित्रपटाचे पुढे अनेक भाग बनविण्याचे उघड संकेत दिले आहे. ‘टेनेट’चा पट एवढा व्यापक आहे की, त्याचे एक सबंध चित्रपटविश्व, ज्याला मी ‘टेनेटव्हर्स’ म्हणेन, बनू शकतं. या चित्रपटविश्वावरून आठवलं, ‘वॉर्नर ब्रदर्स’ना खरोखरीच मानलं पाहिजे. कोणत्याही चित्रपटविश्वाचा भाग नसलेल्या, कोणत्याही पातळीवर सुपरहिरोपट नसलेल्या अशा वेगळ्याच विषयाच्या चित्रपटावर त्यांनी तब्बल २ अब्ज डॉलर्स लावले, ही खरोखर आजच्या काळात दुर्मिळ असलेली धाडसी गोष्ट आहे! अर्थात असा विश्वास दाखवायला नोलनसारखा सातत्यपूर्ण माणूसही त्यांच्याकडे होता, ही बाब वेगळी! पण दहा-बारा वर्षांपूर्वी तरी परिस्थिती जरा बरी होती. मग सुरू झालं एमसीयू. मार्टिन स्कॉर्सेसीच्या मते एमसीयूचे चित्रपट म्हणजे ‘चित्रपट’च नव्हेत! या संदर्भात या लेखाची सुरुवात पुन्हा एकदा वाचा. पण माझे मत जरासे वेगळे आहे. एमसीयूचे चित्रपट ‘चित्रपट’ असतील किंवा नसतीलही कदाचित, परंतु त्यांनी एक महत्पाप करून ठेवलेय. त्यांनी प्रेक्षकांचा एकूण बुद्ध्यांक कमी करून टाकलाय. तितकं भडक, तितकं उघड आणि तितकं उथळ (तिन्हींनाही काही सन्माननीय अपवाद आहेत!) काही असेल तरच ते पाहाण्याची आणि त्याहून सखोल काही असेल तर ते समूळ नाकारण्याची एक नवीनच वृत्ती निर्माण झालीये. विशेषतः जे मिलेनियल्स आता किशोरावस्थेत आहेत, त्यांच्या बाबतीत ही बाब प्रकर्षाने जाणवते. ते ‘टेनेट’ला स्वीकारण्याची शक्यता कमीच आहे. ‘भवभूती’च्याही ‘उत्तररामचरितम्’ला तत्कालीन मंडळींनी स्वीकारले नव्हते म्हणतात, त्यावर तो महाकवी ठामपणे म्हणाला होता की,
“ये नाम केचिदिह नः प्रथयन्त्यवज्ञां
जानन्ति ते किमपि तान्प्रति नैष यत्नः।
उत्पत्स्यतेऽस्ति मम कोऽपि समानधर्मा
कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी॥”
अशी दंतकथा आहे. मी एमसीयू अथवा कुणावरही दोषारोप करत नाही. मी केवळ एक विधान करतोय. ‘टेनेट’चे आयएमडिबी मानांकन आज कदाचित कमी असेलही, पण गेली वीस वर्षे नोलनचा प्रत्येक चित्रपट पाहाणारा एक रसिक म्हणून सांगतो, ‘टेनेट’ हा ‘तांत्रिकदृष्ट्या’ नोलनचा आजवरचा बनविण्यास सर्वांत अवघड आणि सर्वश्रेष्ठ चित्रपट आहे. तो भावनिक पातळीवर एका मर्यादेपलिकडे साद घालत नाही, तो काही पात्रांचे परस्परसंबंध गृहित धरायला लावतो या गंभीर उणीवा सोडल्या, तर तो गेल्या तीन-एक वर्षांत आलेला सर्वाधिक अर्थपूर्ण चित्रपटसुद्धा आहे!

*४.७५/५

— © विक्रम श्रीराम एडके.

[अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *