किंचित फुगलेला, पण आवडलेला – सुपरमॅन : रेड सन

‘एमसीयू’ आणि ‘डिसीइयू’ मध्ये दोन मूलभूत फरक होते. मार्टिन स्कॉर्सेसीच्या दृष्टीने मार्व्हलचे चित्रपट हे चित्रपटच नसले, तरीही त्यांनी बॉक्स ऑफिसवर गेल्या दशकभरात अब्जावधी डॉलर्सचा धुमाकूळ घालत चाहत्यांची जवळजवळ एक आख्खी पिढी आपल्या बाजूला वळवली. त्याच आसपास सुरू झालेल्या ‘डिसीइयू’ला मात्र ना समीक्षकांची फारशी दाद मिळवता आलीये ना रसिकप्रियता. अर्थात ‘वंडर वुमन’च्या (२०१६) प्रचंड यशानंतर आणि ‘अक्वामॅन’ (२०१९), ‘शझॅम’ (२०१९) यांच्या निमित्ताने रोख बदलण्यात यशस्वी झाल्यावर हा फरकही हळूहळू पुसट होत चाललाय. परंतु एक फरक मात्र अद्यापही कायम आहे, तो म्हणजे डिसीच्या मालिका आणि विशेषतः त्यांचे अनिमेटेड चित्रपट हे मार्व्हलच्या मालिका व अनिमेटेड चित्रपटांपेक्षा अनेक पटींनी सखोल आणि श्रेष्ठ असतात. (अपवाद फक्त ‘स्पायडरमॅन : इण्टू द स्पायडरव्हर्स’चा (२०१८); तो अशक्य भारी होता!) किंबहूना ‘स्नायडर कट’ (२०२१) मालिकारूपाने प्रकाशित झाल्यावर तर हे अंतर अजूनच गडद होण्याची शक्यता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर या वर्षी थेट व्हिडिओच्या रूपाने प्रकाशित झालेला ‘सुपरमॅन : रेड सन’ त्या कसोटीवर खरा उतरतो का?

१९४६ च्या सुमारास सोव्हिएत रशियामध्ये एक किशोरवयीन मुलगा टवाळखोरांपासून दूर पळत असतो. स्वेत्लाना नावाची किशोरी त्या धटिंगणांना पळवून लावते. ती त्या मुलाला उपदेशाचे डोस पाजत असतानाच तो मुलगा सांगतो की, मी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळत नव्हतो तर त्यांचा जीव माझ्या हातून जाऊ नये, म्हणून पळत होतो. त्या मुलाच्या अचाट, अमानवीय शक्तीचे प्रदर्शन स्वेत्लानाला अवाक करून सोडते. ती त्याला सल्ला देते की, तुझ्या या महानतम ताकदीचा रशियाला, इथल्या नागरिकांना अतिशय उपयोग होऊ शकेल. मुलाला ते पटतं. पुढे हाच मुलगा विळा-हातोड्याचे चिन्ह मिरवणारा सुपरमॅन बनून स्तालिनच्या नेतृत्वाखालील कम्युनिस्ट रशियात उत्तरोत्तर लोकप्रिय होत जातो. त्याला लोकांचं भलं आणि केवळ भलंच करायचं असतं. पण म्हणतात ना की, कोणतीही ताकद माणसाला भ्रष्ट करू शकते आणि अमर्याद ताकद तर अमर्याद भ्रष्ट करू शकते! सुपरमॅन लोकांचं भलं करतो की, पावलापावलावर राजकारणाने वेढलेल्या या मानवी जगात हा सर्वशक्तीमान महामानव एक खेळणं तेवढं बनून राहातो, या तात्त्विक प्रश्नाचा कृतीशील पातळीवर घेतलेला वेध म्हणजे हा चित्रपट, ‘सुपरमॅन : रेड सन’!

क्रिप्टॉन ग्रहावरून तान्ह्या काल-एलला घेऊन निघालेले यान जर भांडवलशाही अमेरिकेत न उतरता साम्यवादी रशियात उतरले असते तर? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे मार्क मिलरने लिहिलेले ३ अंकी कॉमिक्स, ‘सुपरमॅन : रेड सन’. त्याच कॉमिक्सचे हे अडॅप्टेशन त्याच वाटेवरून सर्वथा जातेच असे नाही, अध्ये-मध्ये ते वेगळीच वळणेसुद्धा घेते. या वळणांवर नेहमीचीच अनेक पात्रे उदा. लेक्स ल्युथर, लोईस लेन, वंडर वुमन, बॅटमॅन, जेम्स ओल्सेन, ब्रेनियॅक, सुपिरियर मॅन वगैरे तर भेटतातच, परंतु खरोखरीच्या इतिहासातील आयसेनहॉवर, केनेडी, स्तालिन इ. पात्रेदेखील भेटतात. अर्थातच मित्यंतर असल्यामुळे सगळ्याच पात्रांचे स्वभाव आणि भूमिका अकल्पनीयरित्या वेगळे आहेत. यातून निर्माण होणारी कथा समांतर विश्वात वेगळ्याच वाटेने जाते, हे सांगणे न लगे!

आपल्याकडे अनिमेटेड चित्रपटांना कार्टून समजण्याची प्रथा आहे. तांत्रिकदृष्ट्या ते काहीसे बरोबरच जरी असले, तरीही यात आपल्याकडे एक वर्षानुवर्षे अपसमज पसरलाय, तो म्हणजे हे असे चित्रपट लहान मुलांसाठी’च’ असतात! पाश्चात्य देशांमध्ये आणि जपानसारख्या अनेकानेक पौर्वात्य देशांमध्येही असा संकुचित विचार करीत नाहीत. तिकडे अनिमेटेड चित्रपट हे अभिव्यक्तीचे एक माध्यम म्हणून वापरले जाते. त्यांचे विषय, त्यांची हाताळणी ही हिंदीतल्या (मुद्दामहूनच प्रादेशिक चित्रपटसृष्टींना यात ओढत नाही) कित्येक चित्रपटांपेक्षा सर्वार्थाने श्रेष्ठ असते. इतकेच नव्हे तर ‘कॅच देम यंग’ या घोषणेचा पुरेपूर वापर करत असे अनिमेटेड चित्रपट कित्येकदा प्रोपगण्डाच्या युद्धात बेमालूमपणे वापरलेसुद्धा जातात. उदाहरणंच द्यायची झाली तर, ‘झूटोपिया’ (२०१६) हा चित्रपट वरवर प्राण्यांच्या जगातील सुरस कथा सांगताना अंतर्यामी मात्र वर्गसंघर्षाचा कम्युनिस्ट विचार मांडतो. किंवा ‘हाऊ टु ट्रेन युवर ड्रॅगन : द हिडन वर्ल्ड’ (२०१९) कथेच्या ओघात अगदी सहजपणे युरोपने काही वर्षांपूर्वी निर्वासितांना दिलेल्या आसऱ्याची, एकत्र नांदण्याची आणि बहुसांस्कृतिकतेची भलामण करतो (प्रत्यक्षात युरोपचे काय होते आहे, हा भाग वेगळा!). किंवा ‘अँग्री बर्ड्स’ (२०१६) हा त्याच नावाच्या अँड्रॉइड खेळावर आधारित चित्रपट कथेच्या आवरणाखाली हळूच, निर्वासित एखाद्या संस्कृतीची कशी वाट लावू शकतात, याचा उघड संदेश देतो. अशी अनेक उदाहरणे देता येतील. सदरचा ‘रेड सन’देखील साम्यवाद आणि भांडवलवाद यांच्यातील निरंतर संघर्ष पर्यायी-इतिहासाच्या (अल्टरनेट हिस्ट्री) रूपाने अतिशय सटीक पद्धतीने दाखवतो. दोन्हीही व्यवस्थांची शक्तीस्थळे दाखवत असतानाच तो त्यांची मर्मस्थळेदेखील धीटपणे मांडायला विसरत नाही!

थोडक्यात कथा तात्त्विक पातळीवर चपखल उतरलीये. परंतु कथेची पटकथा होताना अनेक चित्रपटभर पुरू शकेल इतक्या गोष्टी एकाच चित्रपटात कोंबून बसवल्याचे स्पष्टपणे जाणवते. त्यामुळे अनेक पात्रांचे पात्रपरिपोष व्यवस्थित झालेच नाहीत. विशेषतः बॅटमॅनच्या पात्रावर तर एक सबंध चित्रपट बनू शकला असता. अर्थातच, सूचकपणे दाखवल्यामुळे काही गोष्टींचे मूल्य वाढले आहे, हे देखील दिसून येते. विशेषतः सुपरमॅनच्या पात्राचे सदोदित जिंकत असूनही आतून पोकळ होत ढासळत राहाणे, इतके सुरेख जमलेय की वाह! युटोपिया किती जरी आदर्शवत असला तरीही ते भौतिक पातळीवर अंती स्वप्नच आहे, वास्तव नव्हे; व त्या स्वप्नाला वास्तवात उतरवण्यासाठी भौतिक पातळीवर अतिशय प्रामाणिक प्रयत्न करणारेसुद्धा अखेरीस डिस्टोपियाच निर्माण करतात, ही बाब चित्रपट अतिशय संयतपणे अधोरेखित करायला चुकत नाही.

फ्रेडरिक वाईडमनचे संगीत चित्रपटाच्या रूपाला साजेसेच राजस झाले आहे. ध्वनी कलाकारांमध्ये लोईस लेनच्या रूपात एमी अेकरला ऐकून तिने ‘पर्सन ऑफ इंटरेस्ट’मध्ये (२०११-२०१६) साकारलेल्या ‘रूट’च्या मुग्ध आठवणी आल्याशिवाय राहात नाहीत. इतकी गुंतागुंतीची आणि दशकानुदशकांचा काळ चितारणारी कथा समर्थपणे हाताळताना सॅम लिऊची दिग्दर्शक म्हणून पकड निश्चितपणे जाणवते. जे. एम. डिमॅट्टिसची पटकथा मुख्य कथनापेक्षा लहानसहान, सूचक परंतु तरीही अंत:स्थ मोठी विधाने करणाऱ्या प्रसंगांमध्ये अधिकच खुलते. अवघ्या ८४ मिनिटांच्या अवकाशात कोंबून बसवल्यामुळे किंचित फुगलेला, परंतु एकूणात जमून आलेला हा चित्रपट ‘डिसी’च्या कुणाही प्रशंसकाला आवडेल असाच जमला आहे. नवीन लोकांना संदर्भ ठाऊक नसतील, तर समजायला अवघड जाईल, हे निश्चित!

*३.७५/५

— © विक्रम श्रीराम एडके
[अन्य लेखांसाठी पाहा www.vikramedke.com]
टीप: चित्रपट अमेझॉन प्राईम व्हिडिओवर अधिकृतरित्या उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *