नील

Spoiler_Alert

स्पॉयलर_अलर्ट

[‘टेनेट’ पाहिलेला नसल्यास लेख वाचू नये, रसभंग होण्याची शक्यता आहे. चित्रपट पाहिल्यावरच लेख वाचावा.]

टेनेट‘मधील माझं सध्याचं सगळ्यांत आवडतं पात्र नील आहे. एक तर रॉबर्ट पॅटिन्सनने जॉन डेव्हिड वॉशिंग्टनपेक्षा जास्त चांगलं काम केलंय. आणि दुसरं कारण असं की, त्याचं पात्र हे भविष्यातून भूतकाळात आलेलं असल्यामुळे सुरुवातीपासूनच सर्वानुभवी व परिपक्व आहे. त्या मानाने नायकाचे पात्र आत्ता कुठे शिकू लागलेय. या अनुभवाच्याच आधारे नीलने त्याच्या आयुष्याचे तत्त्वज्ञान उभारलेय, “What’s happened, happened”. या तीनच शब्दांमध्ये भौतिकशास्त्रीय आणि तात्त्विक अशा दोन्ही पातळ्यांवर अतिशय सारगर्भ चिंतन आहे.

गणित आणि भौतिकशास्त्रात एक सिद्धांत आहे, त्याला ‘केऑस थियरी‘, अर्थात ‘कोलाहल सिद्धांत’ असे म्हणतात. हा सिद्धांत सांगतो की, कोणत्याही प्रणालीच्या वर्तमान अक्रमतेच्या पाठी मुळात काही ना काही क्रम असतो व सांप्रतची अक्रमता ही आरंभीच्या सूक्ष्म बदलांवर अवलंबून असते. दुसऱ्या भाषेत, वर्तमानावर भविष्य अवलंबून असणे, परंतु ढोबळ वर्तमानावर ढोबळ भविष्य अवलंबून नसणे, म्हणजे कोलाहल. थोडक्यात एखाद्या गतिशील प्रणालीत अथवा व्यवस्थेत सुरुवातीलाच झालेला किंचित बदलदेखील त्या प्रणाली किंवा व्यवस्थेच्या भविष्यावर फार मोठा परिणाम घडवून आणू शकतो. याचं सगळ्यांत प्रसिद्ध उदाहरण म्हणजे ‘बटरफ्लाय इफेक्ट‘ किंवा ‘पुष्पपतंग परिणाम’. असं म्हणतात की, टेक्सासमध्ये एखाद्या फुलपाखराने पंख फडफडवले तर परिणामी चीनमध्ये वादळसुद्धा होऊ शकते. अर्थात हे उदाहरण तत्त्वतः जरी सत्य असले तरीही ते शब्दशः घेण्याची आवश्यकता नाही. इथे केवळ एखाद्या लहानशा घटनेतून घटनाक्रमाची शृंखला सुरू होऊन भलं मोठ्ठं काहीतरी घडू शकतं, हा अर्थ अभिप्रेत आहे. थोडक्यात आपल्या पुढे असलेली एखादी घटना किंवा परिस्थिती ही आत्ता जशी दिसते, तशी असण्यामागे भलीमोठ्ठी कार्यकारणभावाची साखळी असू शकते. त्यामुळे जर एखादी गोष्ट आहे त्या पेक्षा वेगळी असायला हवी होती असे वाटत असेल, तर तो बदल कार्याच्या नव्हे तर कारणाच्याच पातळीवर व्हायला हवा होता. उदाहरणार्थ, पाकिस्तानची निर्मिती ही १९४७ साली झाल्यापासून सबंध जगाला आणि त्यातही विशेषतः भारताला त्रास होतोच आहे, तो त्रास व्हायलाच नव्हता पाहिजे असे वाटत असेल तर आत्ता पाकिस्तानला संपवून तो समूळ संपणारा नाही. त्याचे काही ना काही राजकीय, सामाजिक परिणाम तरी देखील उरतीलच. तो त्रास संपवायचा तर त्या भागात सहस्र वर्षांपूर्वी झालेले पहिले यशस्वी आक्रमणच मुळात अयशस्वी व्हायला हवे होते. पण ते आता काळात मागे जाऊन थोपवणे शक्य नाही. आणि त्या उप्परही कुणी ते थोपवलेच, तरीही ही गतिशील प्रणाली त्या कारणाला ओलांडून दुसऱ्या कोणत्या तरी मार्गाने पुन्हा आत्ता आहे तशीच होणार नाही, याची काही एक खात्री नाही. थोडक्यात काय, तर “What’s happened, happened”!

माणूस म्हणजे तरी वेगळं काय? कोणत्याही माणसाचे सध्याचे अस्तित्व हे भूतकाळातील घटनांचा एकत्रित परिणामच असतो. तुम्ही आत्ता जे काही अपयशी आहात, ते भूतकाळातील घटनांमुळे तसेच, तुम्ही आत्ता जे काही यशस्वी आहात, ते देखील भूतकाळातील घटनांमुळेच. तुम्हाला लाख वाटेल की, तेवढी अमुक एक घटना बदलता आली तर आयुष्य सुंदर होऊन गेलं असतं. पण कदाचित त्या घटनेनेच तुम्हाला आत्ता आहे ती परिपक्वता दिलेली असते, त्या घटनेत लागलेल्या ठेचेमुळेच तुम्ही नंतरच्या काळात चार शहाणे निर्णय घेतलेले असतात. तेव्हा ती घटनाच जर समजा बदलली, तर आयुष्य सुंदर होईल, याची काहीच खात्री नाही. उलट ते वेगळे आणि म्हणूनच कदाचित अजून वाईट होण्याचीही तितकीच शक्यता आहे. हा तात्त्विक भाग झाला. तुमच्या हातात काय आहे, तर भविष्यकाळ चांगला करणे. थोडक्यात, कोलाहलाच्या सिद्धांतानुसार जर तुमच्या आयुष्याला एक प्रणाली मानले तर त्यात आत्ता काही बदल केले तरच भविष्य बदलू शकते. भूतकाळ बदलू शकत नाही. म्हणजेच, “What’s happened, happened”!

उपनिषदांमधील दोन सिद्धांत मला फारच आवडतात. ईशावास्योपनिषद (मंत्र ९) सांगते की,
अन्धं तमः प्रविशन्ति येऽविद्यामुपासते।
ततो भूय इव ते तमो य उ विद्यायां रताः॥
अर्थात, ‘जे केवळ भौतिक विद्यांच्याच मागे धावतात ते अंधारात प्रवेश करतात. परंतु जे केवळ अध्यात्माच्याच मागे धावतात, ते त्याहून मोठ्या अंधारात प्रवेश करतात’.
पुढे ११ वा मंत्र तर सांगतो की,
विद्याञ्चाविद्याञ्च यस्तद्वेदोभयं सह।
अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययाऽमृतमश्नुते॥
अर्थात, “जो ‘तत्’ला विद्या आणि अविद्या दोन्हींच्या द्वारे जाणतो तो अविद्येने मृत्यू तरून जातो तर विद्येने अमृतत्त्व मिळवतो”.
थोडक्यात उपनिषदाने अध्यात्म आणि भौतिकता यांचा समतोल साधायला सांगितलंय. आध्यात्मिकाने विज्ञानाला तुच्छ लेखूच नये. विज्ञानाचा स्वतःचा मार्ग आहे, त्यावरून त्याला त्याच्या गतिने मार्गक्रमण करू द्यावे. तैत्तिरीय उपनिषद (भृगू. अनुवाक ५) तर स्पष्ट सांगते की, ‘विज्ञानं ब्रह्मेति व्यजानात्’ अर्थात, ‘जाणले की विज्ञानच परब्रह्म आहे’! अर्थातच, विज्ञान म्हणजे केवळ भौतिक जगातील शास्त्रे अभिप्रेत नसून त्या शास्त्रांसोबत एकूणच सर्व बाबतीत ‘विशेष ज्ञान म्हणजेच विज्ञान’ असा व्यापक अर्थ येथे अभिप्रेत आहे.

‘टेनेट’मधील नील व्यक्तिश: मला तरी या उपरोक्त भौतिक आणि तात्त्विक ज्ञानाने परिपूर्ण असा विद्या-अविद्येचा संगम वाटतो. नोलनला कदाचित हे असेच्या असेच अभिप्रेत नसेल. कदाचित त्याला यातील तात्त्विक संकल्पना ठाऊकही नसतील. पण त्याने नीलचे पात्र अतिशय स्थितप्रज्ञ लिहिले आहे, हे निश्चित. त्यामुळेच तो साधंच काहीतरी काम करावं तितक्या सहजपणे बलिदान देतो. तो निरर्थक ‘जर-तर’मध्ये एकदाही पडत नाही. What’s happened, happened हे त्याच्या जीवनाचं सार आहे. त्याला काळाची माया, भौतिक आणि तात्त्विक दोन्हीही पातळ्यांवर पुरती समजलीये. म्हणूनच तो जाताना नायकाला सहजपणे सांगतो की, “I’ll see you in the beginning, friend”! मला स्वतःला नायकापेक्षा नील हाच लेखक-दिग्दर्शकाचं कथेतील प्रतिबिंब वाटतो, ते यामुळेच!

— © विक्रम श्रीराम एडके
[अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]
#TENET #TENETची_क्षणचित्रे #Neil #Robert_Pattinson #Chaos_Theory #Butterfly_Effect #Science #Spirituality #Upanishads #Time

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *