आर्मी ऑफ द डेड

एरिया ५१! अमेरिकेतील अतिगोपनीय, अतिसुरक्षित ठिकाण. ज्या ठिकाणाबद्दल अर्बन-लिजण्ड्स प्रसवली जातात, अशा या एरिया ५१ मधून सैन्याचा एक कॉन्व्हॉय काहीतरी अत्यंत महत्त्वाचं पार्सल घेऊन चाललाय. या कॉन्व्हॉयसोबत एक अपघात घडतो आणि ते पार्सल रस्त्यावरच उघडं पडतं! त्या पार्सलमधून निघतो एक झॉम्बी. पण नेहमीचा, साधा, सज्जन, बिनडोकपणे हळूवार चालणारा झॉम्बी नाही बरं, तो असतो एक चपळ, हुशार आणि म्हणूनच अनेकपटींनी खतरनाक सुपरझॉम्बी! तो अर्थातच सगळ्या सैनिकांना चावतो, मारून टाकतो. आणि जवळच असलेल्या एका शहरात निसटून जातो. ते शहर म्हणजे जुगाऱ्यांचा स्वर्ग, लास व्हेगास! जुगाऱ्यांच्या जीवाशीच जुगार होतो आणि बघता बघता सारे शहर संक्रमित होते. अमेरिकन शासन तत्परतेने सबंध शहर क्वारण्टाईन करते. इथे पाया रोवला जातो नेटफ्लिक्सवर नुकत्याच प्रकाशित झालेल्या झॅक स्नायडरच्या ‘आर्मी ऑफ द डेड’चा!

‘एओडी’चे हे ओपनिंग सीन्स झॅक स्नायडरच्या आजवरच्या कर्तृत्वाला साजेसेच आहेत. त्या सीन्सची एक एक फ्रेम ही सर्वोत्कृष्ट सिनेमॅटिक संवेदनांचा उच्चतम नमुना आहे. पण नुसतं तेवढंच नाही. स्नायडर या अगदी थोड्या मिनिटांच्या सिक्वेन्समध्ये अनेक अंत:स्थ विधानेसुद्धा सुंदर पद्धतीने करतो. उदाहरणार्थ, झॉम्बी उर्वरित अमेरिकेत शिरू नयेत म्हणून अमेरिकन शासन लास व्हेगासच्या भोवती भिंत बांधते. अमेरिकेचे घुसखोरांपासून रक्षण करण्यासाठी नेमके हेच ट्रम्पसुद्धा करणार नव्हता का? झॅक स्नायडरचे प्रोडक्शन हाऊस ‘द स्टोन क्वारी’चा लोगो बघा. दगड फोडण्यासाठीची हत्यारं असणारा हा लोगो तुम्हाला नकळतपणे विळा-हातोड्याची आठवण करून देतो. त्या झॅक स्नायडरच्या चित्रपटात ट्रम्पच्या धोरणाचे एकप्रकारे समर्थन होणे, हा गंमतीदार विरोधाभास आहे आणि तो योगायोग खचितच नाही! सैन्याचा जो कॉन्व्हॉय सुरुवातीच्या झॉम्बीला नेत असतो, त्या कॉन्व्हॉयचं नाव असतं, ‘फोर हॉर्समेन’! न्यू टेस्टामेंटनुसार जेव्हा अपोकॅलिप्स येईल तेव्हा त्याचे चार घोडेस्वार असतील. एझेकेलनुसार ते चार घोडेस्वार असतील – युद्ध, दुष्काळ, रानटी पशू आणि रोगराई. झॉम्बीचे निसटणे हे लास व्हेगाससाठी अपोकॅलिप्सच ठरते की! आणि त्यातूनच युद्ध, दुष्काळ, रानटी पशू व रोगराई त्या ठिकाणी येते, हाच तर चित्रपटाचा पाया आहे. स्नायडरला आपल्या चित्रपटांतून असे पौराणिक संदर्भ द्यायला भलतंच आवडतं. आणि हा सबंध सिक्वेन्स त्यातील छुपी विधाने, संदर्भ या सगळ्यांसह जबरदस्त जमून आलाय. चित्रपट जर एवढाच असला असता, तर स्नायडरच्या करिअरमधील बेस्ट शॉर्ट्सपैकी एक असला असता. एक सैनिक जेव्हा त्या झॉम्बीला घेऊन जाणाऱ्या कंटेनरच्या जवळ जात असतो आणि आपल्याला गोष्टी झॉम्बीच्या पीओव्हीने दिसू लागतात ते पाहा. जणू त्या प्राण्यासाठी सबंध जगच नव्याने निर्माण होत असतं! त्यानंतर जे गाणं आहे, ज्यातून नायकाची पार्श्वभूमी समजते, तो तर दिग्दर्शन आणि मांडणीचा अत्युत्कृष्ट नमुनाच म्हणावा लागेल.

इतक्या जबरदस्त सांकेतिकतेच्या पार्श्वभूमीवर चित्रपट सुरू होतो. स्कॉट वॉर्ड (डेव्ह बॉटिस्टा) या पूर्वाश्रमीच्या मर्सेनरीकडे तनाका (हिरोयुकी सनाडा) हा कसिनोमालक येतो. आता निर्मनुष्य झालेल्या आणि झॉम्बीजनी गजबजलेल्या व्हेगासमधील त्याच्या कसिनोत २०० मिलियन डॉलर्स ठेवले आहेत. ते जर स्कॉट घेऊन येईल, तर त्याला त्या पैशांचा भलामोठ्ठा हिस्सा द्यायचा शब्द तनाका देतो. स्कॉट आणि त्याच्या सबंध कुटूंबाने एकेकाळी व्हेगासमधील झॉम्बींशी लढा दिला आहे. खूप काही गमावलंसुद्धा आहे. मिळणाऱ्या पैशांतून चांगलं आयुष्य जगता येईल, म्हणून तो तयार होतो. पण ही चोरी करायची तर ताबडतोब केली पाहिजे कारण, पुढच्या चारच दिवसांत शासन अणुबॉम्ब टाकून सबंध शहर नष्ट करणार आहे. स्कॉट तातडीने एक एक करून मारीया (ऍना डे ला रिगेरा), व्हॅण्डेरो (ओमारी हार्डविक), लुडविग डायटर (मथियास श्वाईगुफर), मरीयन पीटर्स (टिग नोटारो), राऊल कॅस्टिलो (मिकी गझमन) वगैरे सगळा क्रू जमवतो. तनाका त्यांच्या दिमतीला मार्टिन (गॅरेट डिलाहंट) हा आपला माणूस देतो. प्रवासात त्यांना स्कॉटची मुलगी केट (एला पर्नेल) व स्मगलर लिली (नोरा आर्नेझेडर) येऊन मिळतात. आता फक्त बॉम्ब पडण्याच्या आत जाऊन, चोरी करून परतणे एवढेच बाकी आहे आणि ते अजिबातच सोपे नाही. यावरून आपण अंदाज लावू शकता की, पुढे केवढी खतरनाक ऍक्शन वाढून ठेवली असेल.

पण असे काहीच होत नाही आणि चित्रपट भरभरून माती खातो! आता माती खातो म्हणजे काय? झॅक स्नायडरच्या कोणत्याही चित्रपटातील फ्रेम्स पाहा, अप्रतिम असतात. शॉट्सची त्याच्याइतकी जबरदस्त फ्रेमिंग क्वचितच कुणी करत असेल. तो स्वतः सिनेमटॉग्राफर असल्यामुळे त्याची समज पावलोपावली दिसून येते. पण त्याचवेळी हे ही लक्षात घ्या की, स्नायडर अत्यंत वाईट स्टोरीटेलर आहे. त्याच्या कोणत्याही चित्रपटाची कथा तो पडद्यावर अत्यंत वाईट रितीने मांडतो. त्याच्या कथा या कायमच पौराणिक संदर्भांनी भरलेला, वेगवेगळ्या अंत:स्थ विधानांनी ग्रासलेला गुंता असतो फक्त. तो कधी चालून जातो आणि बहुतांशी वेळा चुकतो! ‘एओडी’मध्येही तेच झाले आहे.

‘एओडी’ची सगळ्यांत मोठी त्रुटी म्हणजे हाईस्ट-फिल्म्स या जॉनरमधील बहुतांशी क्लिषेज त्यात आहेत. वॉश्ड-आऊट हिरो, वन लास्ट जॉब, मिसफिट्सचा क्रू, एक मसल, एक वॉनाबी, एक ड्रायव्हर, सगळा प्लॅन फसवणारा एक इनसाईड मॅन, त्यातून निर्माण होणारा चित्रपटांच्या भाषेत पॉईंट ऑफ नो रिटर्न, त्यातून नायकाची रायझिंग आणि मग शेवट! सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत या चित्रपटात. त्यामुळेच चित्रपट अत्यंत अनुमेय अर्थातच प्रेडिक्टेबल बनतो. चित्रपटाचे लेखन असे काही कमाल पातळीवर सुरू होते की ज्याचे नाव ते! पण जसजसा चित्रपट पुढे सरकतो, तसतसे लेखन अधिकाधिक आळशी आणि प्रेडिक्टेबलच्याही पलिकडचे प्रेडिक्टेबल होत जाते. याच दरम्यान चित्रपट हाईस्ट-फिल्म्सच्या क्लिषेजपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो आणि अजूनच गाळात रुततो. या बाबतीत मला नोलनच्या ‘टेनेट’चे (२०२०) उदाहरण द्यावेसे वाटते. त्यातसुद्धा हाईस्ट होती. साधीसुधी नव्हे तर टाईमबेंडिंग सायंटिफिक हाईस्ट होती. पण हाईस्ट-फिल्म्सच्या एकूण एक ट्रोप्सपासून तो मुक्त आणि तरीही जबरदस्त ट्विस्ट्स घेऊन येणारा होता. स्नायडरने ‘मॅन ऑफ स्टील’मध्ये (२०१३) नोलनची नक्कल करायचा प्रयत्न केला होता व तो समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी टोकाची भूमिका घ्यावी असा टोकाला गेला होता. इथे त्याने नोलनची नक्कल केलेली नाहीये, पण हा सगळाच चित्रपट अक्षरशः हवेत गोळीबार केल्यासारखा गंडलाय!

या सगळ्या गोंधळात चित्रपटाचा बचाव कशाने होऊ शकला असता, खतरनाक आणि बेक्कार ऍक्शनने! पण दुर्दैव म्हणजे ही ऍक्शनसुद्धा चित्रपटात खूपच उशिरा सुरू होते व तिच्यातही सातत्य नाही. ज्या चित्रपटाचे नावच ‘आर्मी ऑफ द डेड’ आहे, त्यात जर तुम्ही आर्मीच्या नावाखाली क्लायमॅक्समध्ये बजेट नसल्यागत पाच-पन्नास झॉम्बीज दाखवणार असाल, तर कसं चालायचं? झॉम्बीजचं तथाकथित साम्राज्यसुद्धा खूपच उथळपणे दाखवलंय. शिवाय जो झॉम्बी वाघ हा चित्रपटाचं मुख्य आकर्षण आणि म्हणूनच अवचितपणे दाखवायला हवा होता, तो सुरुवातीलाच दाखवून स्नायडरने जो काही हिरमोड केला आहे त्याला तोड नाही. एकतर चित्रपट हा स्नायडरने जणू काही झी मराठीच्या मालिकेकडून प्रेरणा घेतली असावी इतका संथ आहे. म्हणजे चित्रपट पाहात असताना खाली ती लाईन सुरू असते ना तुम्ही व्हिडिओ किती बघितलाय, किती उरलाय हे दाखवणारी? बास, त्या लाईनची जर गोगलगायीशी स्पर्धा लावली तर गोगलगाय उसेन बोल्ट वाटेल, इतका हा चित्रपट संथ आहे. इतका वेळ निरर्थक संवाद आणि बडबडीत घालवलाय की, झोप येऊ लागते आणि अचानक जागे होऊन डोळे उघडावेत तर अजूनही तोच सीन सुरू असतो!

स्नायडर हा स्नायडर म्हणून बेस्ट केव्हा असतो, जेव्हा त्याला कुणीतरी अतिशय ताकदीचा लेखक संहिता लिहून देतो! याचं उदाहरण म्हणजे, स्नायडरने दिग्दर्शित केलेला माझा आवडता चित्रपट ‘वॉचमेन’ (२००९) आणि या नियमाला अपवाद म्हणजे स्नायडरने लेखन करूनही कमाल जमलेला ‘३००’ (२००६)! एकाचा राजकीय आस डाव्या बाजूला झुकलेला तर दुसऱ्याचा उजव्या. दुर्दैव म्हणजे ‘आर्मी ऑफ द डेड’ दोन्हींच्याही दूरदूरपर्यंत जवळपासदेखील फिरकत नाही, ना सिनेमॅटिक अनुभवाच्या दृष्टीने ना राजकीय विधानांच्या दृष्टीने. मला माहिती आहे, दूरदूरपर्यंत जवळपास या शब्दयोजनेत विरोधाभास भरला आहे, पण विश्वास ठेवा हा चित्रपट त्याहून जास्त विरोधाभासांनी भरलेला व लूपहोल्सनी पिडलेला झाला आहे. चित्रपटाचं नाव जरी ‘आर्मी ऑफ द डेड’ असलं, तरी त्या डेथचं कारण खचितच बोअरडम आहे!

*२/५

— © विक्रम श्रीराम एडके
[इतर लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *