पुष्पा – आहे मनोहर तरी..!

रायलसीमा भागात अतिदुर्मिळ अशा रक्तचंदनाचे वृक्ष उगवतात. लाल सोने म्हटले जाते त्या झाडांना. अत्यंत मौल्यवान अशा या वृक्षाच्या लाकडांची अर्थातच तस्करी झाली नसती, तरच नवल. अशाच एका ठेक्यावर काम करणारा हमाल आहे पुष्पराज (अल्लु अर्जुन). तिरकं डोकं चालवणारा निडर पुष्पराज या चंदनाच्या तस्करीतून यशाच्या आणि सामर्थ्याच्या शिड्या कशा चढतो, याची कहाणी म्हणजे ‘पुष्पा – द राईज, पार्ट १’.

हा चित्रपट निर्माण कसा झाला असेल? एके दिवशी दिग्दर्शक सुकुमार आणि अल्लु अर्जुन या दोघांपैकी एक कुणीतरी दुसऱ्याकडे गेला असेल व म्हणाला असेल, ‘अरे तो केजीएफ काय तुफान चालला यार! यश दाढी वाढवून कसला कूल दिसलाय! आपण पण असा एक पिक्चर केला पाहिजे’! बास, या तीन वाक्यांवर ‘पुष्पा’ उभा राहिलाय असं पाहाताक्षणीच जाणवतं. साखळी कशी असते पाहा. ‘पुष्पा’ पाहून प्रशांत नीलच्या ‘केजीएफ’ची (२०१८) आठवण येते. ‘केजीएफ’ पाहून अनुराग काश्यपच्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’ची (२०१२) आठवण येते. ‘गँग्स ऑफ वासेपूर’ पाहाताना रामूच्या ‘रक्तचरित्र’ची (२०१०) आठवण येते! ‘सर्वदेवकृतं नमस्कारं केशवं प्रतिगच्छति’च्या चालीवर म्हणावेसे वाटते की, जसे जगातील सगळे ऑर्गनाईझ्ड क्राईमवर आधारलेले चित्रपट कुठे ना कुठे ‘गॉडफादर’वरून (१९७२) प्रेरित झालेले असतात, तद्वतच भारतातील सगळे माफियावाले सिनेमे कुठे ना कुठे रामूच्या एखाद्या चित्रपटावरून प्रेरित झालेले असतातच असतात. रामू आजकाल कसा का वागत असेना, चित्रपट बनवण्याच्या तंत्रात आणि हिंमतीत तो खराखुरा ट्रेंडसेटर आहे! आणि ‘रक्तचरित्र २’ (२०१०) रिकॅपमध्ये किती जरी वेळ वाया घालवत असला तरीही ही जोडगोळी चित्रपट म्हणून काहीच्या काही वरच्या दर्जाची आहे! त्या काळात सूर्या शिवकुमार अभिनयावर खरोखर मेहनत घ्यायचा. असो. विशेष म्हणजे उपरोल्लिखित साखळीतील सगळेच्या सगळे चित्रपट किमान दोन भागांत बनलेले आहेत किंवा बनताहेत आणि एक ‘केजीएफ’चा अपवाद वगळता सगळेच्या सगळे बॉक्स ऑफिसवर अंडरपरफॉर्मर्स आहेत. ‘पुष्पा’ किती जरी दणक्यात कमावत असला तरीही २००-२५० कोटींच्या बजेटवर बनलेल्या चित्रपटाला ओटिटीने हात दिल्याशिवाय रिकव्हरी होणं अवघडच आहे.

वर मी ज्या साखळीचा उल्लेख केला त्याचे अजून एक कारण आहे. हे सगळेच्या सगळे चित्रपट एका टेम्प्लेटवर चालतात. ते टेम्प्लेट म्हणजे, पहिल्या भागात अभावातून आलेला नायक कसा मोठा डॉन होतो याची कथा आणि दुसऱ्या भागात त्या नायकाचा स्वकर्मानेच कसा ऱ्हास होतो याची कथा. याची सुरुवातही रामूनेच करून दिली आहे. रामूने आखून दिलेल्या मार्गातच दोन-पाच पावले इकडं-तिकडं करून हे सिनेमे बनतात. अपवाद फक्त एकाच चित्रपटाचा. तो टेम्प्लेट फॉलो करूनही टेम्प्लेटपेक्षा खूपच वेगळ्या धाटणीचा होता. त्याचे लेखन, दिग्दर्शन, मांडणी, संपादन, अभिनय सारं काही अक्षरशः मास्टरक्लास म्हणावं असंच होतं. तो सुद्धा बॉक्स ऑफिसवर या जॉन्राच्या बहुतांशी चित्रपटाप्रमाणेच अंडरपरफॉर्मर होता. तो चित्रपट म्हणजे वेट्रिमारनचा, ‘वडाच्चेन्नई’ (२०१८)! त्याची सर कशालाच येऊ शकत नाही.

‘पुष्पा’देखील ठरीव टेम्प्लेटच फॉलो करत असल्यामुळे बऱ्यापैकी प्रेडिक्टेबल आहे. पण त्या प्रेडिक्टेबिलिटीतही आपण तो पाहात राहातो याचं कारण म्हणजे, पोलिश सिनेमॅटोग्राफर मिरोस्लाव कुबा ब्रोझेकचं अत्यंत देखणं छायांकन. एकही चौकट अशी नाही जिच्या मागे काही ना काही विचार अथवा नियोजन नाही. चित्रपट प्रत्यक्षात अत्यंत शब्दबंबाळ आहे. पण तो गोंगाट बाजूला सारला तर असा देखणा चित्रपट या जॉन्रामध्ये (अर्थातच ‘वडाच्चेन्नईचा’ अपवाद वगळता) क्वचितच बनला असेल. या अत्युत्कृष्ट छायांकनाला तितक्याच जबरदस्त अभिनयाची साथ लाभलीये. रश्मिका, जगदिश प्रताप भंडारी, अजय घोष, धनंजय, राव रमेश, अजय, अनसूया वगैरे भरवश्याचे खेळाडू तर आहेतच. पण सुनील या केवळ कॉमेडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्याला मुख्य खलनायकाची भूमिका देणे हा दिग्दर्शक सुकुमारचा खरोखरच मास्टरस्ट्रोक म्हटला पाहिजे! फ़हाद फ़ासिल किती जरी नटराज असला तरीही पहिल्या भागात त्याला काहीच काम नाही.

गडबड केव्हा होते? जेव्हा आपण पटकथेचा एकजिनसी विचार करू लागतो, तेव्हा तिच्यातले दोष हे गुणांपेक्षा अधिक ठळकपणे जाणवू लागतात! ‘विक्रम वेधा’मधील (२०१७) वेधा हा कायमच मॅन विथ द प्लॅन होता. त्याच्या एकूण एक कृतींच्या मागे अतिशय सूक्ष्म विचार आणि चपखल नियोजन असायचं. पुष्पराज मात्र सबंध चित्रपटभर टोकाचा इम्पल्सिव्ह वागत राहातो. हे एक सुकुमारच्या चित्रपटांचं वैशिष्ट्य. ‘आर्या’ (२००४) घ्या, ‘आर्या २’ (२००९) घ्या किंवा माझा अत्यंत आवडता ‘१ नेनोक्कडिने’ (२०१४) घ्या, त्याचे नायक असेच सायकॅट्रिस्टची गरज असल्यासारखे वागत राहातात. हेच भविष्यात त्याच्या पतनाचं कारण दाखवायचं असेल तर गोष्ट वेगळी, पण आत्ताच्या स्किम ऑफ थिंग्समध्ये ते हळूहळू विचित्र वाटू लागतं. इतकं की, नायकाबद्दलची सहानुभूती एक त्याचा अत्यंत वेदनामय भूतकाळ वगळता कमी होऊ लागते.

पुष्पा चंदनाच्या तस्करीवर हमाल म्हणून काम करू लागल्याच्या पहिल्याच दिवशी जी शक्कल लढवतो, ती सुद्धा पटत नाही. मुळात त्याच्या वर मुकादम असतील, अजून माणसे असतील ते एका हमालाला स्वतंत्र निर्णय घेऊ देतील हेच शक्य वाटत नाही. ट्रक जिथं गायब झाला त्याच्या आसपास शोध घेण्याच्या ऐवजी पोलिस पुष्पालाच विचारत बसतात, हे सुद्धा पटत नाही. पुष्पाचा भूतकाळ किती जरी त्रासाचा असला तरीही एका मर्यादेपर्यंत त्याच्या सावत्र भावांचं वागणं दुनियादारीच्या दृष्टीने चूक वाटत नाही. पुष्पाला आवडणाऱ्या श्रीवल्लीची तर अजूनच वेगळी तऱ्हा. जी पोरगी हजार रुपयांत स्माईल द्यायला तयार होते आणि पाच हजारांत चुंबन, तिने चेहरा किती जरी भोळा केला तरी ते पात्र सरळ वाटत नाही. एका प्रसंगात ती पुष्पाला म्हणते, मला तुझ्यासोबत झोपायचंय, त्याच्यानंतर काही दिवसांतच ती एकदमच लाजरेपणाचा आव आणून त्याला हात सुद्धा लावू देत नाही. मग पहिल्या प्रसंगात ती जे बोलली ते केवळ आपद्धर्म म्हणून होतं की काय, असं वाटू लागणारच की! खासदाराच्या दर्जाच्या माणसाला चंदनाचा खरा दर माहिती नाही आणि एक साधा सिंडिकेट मेंबर त्याला वर्षानुवर्षे फसवत राहातो, ही तर भाबडेपणाची हद्द आहे. फ़हाद फ़ासिलचा तर शेवटचा सबंध सिक्वेन्स केवळ अतिरंजित नाट्यनिर्मिती करण्यासाठीच ताणलाय की काय वाटते. त्या ऐवजी त्याला केवळ इंट्रोड्युस करून चित्रपट संपवला असता तर सस्पेन्स तर राहिलाच असता शिवाय चित्रपटाची जी अमर्याद लांबी आहे, ती सुद्धा काहीशी आटोक्यात आली असती. हा सस्पेन्स राखण्याचा प्रकार राजमौलीने ‘बाहूबली’मध्ये (२०१५) केवढ्या खुबीने वापरला होता, आठवा! पुढच्या भागाचे नाव जर ‘पुष्पा – द रुल’ असणार आहे तर या भागाचे नाव नुसतेच ‘पुष्पा – द राईज’ एवढेच असणे सुसंगत वाटले असते, त्यात ‘पार्ट १’ आणि ‘पार्ट २’ ही शेपटं अतिरिक्त वाटतात. सांगण्यासारखे अजून बरेच मुद्दे आहेच. पण खरं सांगू, ‘पुष्पा’ हा जर तेलुगूतील इतर मसाला चित्रपटांसारखा हलकाफुलका असला असता तर मी एवढं खोलात गेलो सुद्धा नसतो. चित्रपट स्वतःच स्वतःला अतिगंभीरपणे घेतो व वास्तववादाकडे झुकतो म्हटल्यावर मात्र त्याच अंगाने विचार करणे प्राप्त आहे!

इतक्या सगळ्या त्रुटी असूनदेखील चित्रपट आपण पाहातच राहातो, याचं एकमेव कारण म्हणजे अल्लु अर्जुन. इतका जबरदस्त मेकअप आणि कॉस्च्युम डिझाईन हिंदीत पाहायला सुद्धा मिळत नाही. तो ज्या प्रकारे बसतो, वावरतो, कुणाला सांगून खरं वाटणार नाही की तो बन्नी आहे! ‘दुव्वाडा जगन्नाथम्’मध्ये (२०१७) त्याने जितक्या सहजपणे विजयवाड्याचा ब्राह्मणी ॲक्सेंट वापरला होता तितक्याच सहजपणे तो इथे चित्तुर ॲक्सेंटमध्ये बोलतो. त्याच्या नृत्याबद्दल तर काही बोलायची गरजच नाही. पटकथेची फारशी साथ नसूनही त्याने सबंध चित्रपट आपल्या खांद्यांवर नुसता पेललेलाच नाही, तर पार सुद्धा केलाय! देविश्री प्रसादचे संगीत चित्रपटात बरोब्बर मिसळून जाते. मी कायम म्हणतो, डिएसपी हा तिकडचा प्रीतम आहे. सिनेमा रिलिज होण्याआधी पंधरा दिवस आणि रिलिज झाल्यानंतर पंधरा दिवस गाजणारी गाणी तो प्रीतमइतक्याच चलाखीने देतो. त्या पलिकडे ना निर्माते-दिग्दर्शकांची अपेक्षा असते ना त्याची स्वतःची इच्छा. तेच त्याने इथेही यथासांग करून दाखवलेय. अल्लु अर्जुनच्या खालोखाल पुष्पा सुसह्य होण्यात त्याचा वाटा आहे. माझ्या मते हेच तात्पर्य आहे. अत्यंत डिटेल्ड पद्धतीने १७८ मिनिटं चालूनही पुष्पा सुसह्यच राहातो, स्मरणीय होत नाही. तो धडाक्यात कमावतो आहे तर कदाचित ब्रेक-ईव्हनपर्यंत जाईलही, पण क्लासिक्सच्या यादीत जाण्याची पात्रता असूनही तो त्या उपाधीच्या खूपच अलिकडे राहातो, हे दुर्दैव आहे!

*२.७५/५

— © विक्रम श्रीराम एडके.
[अन्य लेखांसाठी पाहा www.vikramedke.com]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *