सर्वार्थाने फसलेला – अतरंगी रे

‘अतरंगी रे’ सुरू झाल्यापासून पहिल्या पाच-सात मिनिटांतच तुम्हाला तो पॉईण्टलेस वाटू लागतो. निष्फळतेची जागा हळूहळू घृणा घेऊ लागते. तुम्ही तो कित्येकदा पॉजसुद्धा करता, पण स्टॉप करून ॲपमधून बाहेर काही तुम्ही पडत नाही. तुम्ही तो पाहातच राहाता, अगदी शेवटपर्यंत!

बॉलिवूडच्या तुलनेत अत्यंत नव्या पार्श्वभूमीवर बेतलेला हा चित्रपट इतक्या पातळ्यांवर फसलाय आणि इतक्या निष्काळजीपणाने साकारलाय की, कुठून सुरूवात करावी आणि काय सांगू नये, तेच समजत नाही. आपल्याकडे चांगली कथा आहे म्हटल्यावर ती कशी जरी मांडली तरी चालून जाईल, या अतिआत्मविश्वासाचं फळ आहे हा चित्रपट. त्यातूनच मग कथेच्या सादरीकरणात अनेक खिंडारं आणि त्याहून जास्त प्रश्न उभे राहातात. ‘तनू वेड्स मनू’चे दोन्हीही भाग आणि ‘रांझणा’सारखे चित्रपट बनवून मानवी मनांच्या गाभाऱ्यात डोकावणारी आनंद एल. राय आणि हिमांशू शर्मा यांची दिग्दर्शक-लेखकाची जोडी जेव्हा पहिल्यांदाच खराखुरा मानसशास्त्रीय विषयावरील चित्रपट करायला घेते तेव्हाच तो उथळ आणि अतिसोपा करून मांडते, हा दैवदुर्विलास म्हणावा, की आपराधिक श्रेणीचा निष्काळजीपणा, की दोन्ही?

एका अत्यंत ताकदवान बिहारी कुटूंबाला भर बिहारमध्ये आपली नात ज्याच्यासोबत इतक्या वेळा पळून जाते, त्याचा ठावठिकाणा का शोधता येत नाही? विशूच्या (धनुष) आईवडलांची प्रतिक्रिया इतकी कोरडेपणाने का चितारलीये? मँडीचे (डिंपल हयाती) पुढे काय होते? विशूला जी नापास होण्याची भिती वाटत असते, त्याचे पुढे काय होते? या अशा लहानसहान प्रश्नांचे तर सोडाच पण चित्रपटाची कथा फोडू नये या तत्त्वापायी मी जे मोठे प्रश्न सांगतही नाही आहे, त्यांचेसुद्धा उत्तर चित्रपटात कुठेच येत नाही. कारण लेखक-दिग्दर्शकाला माहिती आहे की, आपण थांबून एक क्षण जरी विचार केला तरी कथाबीज नावाचा पत्त्यांचा बंगला त्याच क्षणी कोसळेल. त्यामुळे ते घाई करत नुसते धावतच सुटले आहेत.

ही घाई, हाच आजकालच्या चित्रपटांचा जणू स्थायीभाव होऊन बसलाय. मला आठवतच नाही की अखेरचा असा हिंदी चित्रपट मी कोणता पाहिला होता ज्यात भावनिक प्रसंग नुसते लांबच नाही तर गहिरेसुद्धा होते! सगळंच कसं द्विमितीय, दोन तासांच्या मर्यादेत कोंबलेलं. त्यामुळे मुळं धरतच नाहीत, भावनेचे बीज अंकुरतच नाही. ते आहे, हे गृहित धरून यंत्रवत चालणाऱ्या गोष्टी तेवढ्या मेलेल्या नजरेने पाहात राहायच्या. आता याच चित्रपटाचं बघा ना! रिंकूचं पात्र अत्यंत प्रतिकर्षक वाटावं असं लिहिलंय. तिच्यासोबत जपण्यासारखं काहीच नसताना किंबहूना जीव लावावा असं काहीच घडलेलं नसताना विशूने का म्हणून तिच्या प्रेमात पडावं? एकच उत्तर, की तो हिरो आणि आणि ती हिरोईन म्हणून!

सबंध चित्रपट अशा प्राचीन गृहितकांनाच सिद्धांत मानून रेटलाय. आणि जिथे ते चौकट मोडतात, तिथे ते इतके उथळ होतात की, काय सांगू! मानसशास्त्रीय आजाराचे इतके घाणेरड्या व हीन दर्जाचे सादरीकरण क्वचितच एखाद्या तथाकथित पुरोगामी चित्रपटात पाहायला मिळाले असेल. त्यासोबतच बिहारची ओळख केवळ ऑनरकिलिंगपुरतीच भासवणे, दक्षिण भारताला ‘निचला हिस्सा’ म्हणणे वगैरे भेदभावमूलक हिणकस प्रकार आहेतच. हे करताना एकही, अगदी एकही ट्विस्ट धक्का देत नाही. सारे काही पहिल्या काही मिनिटांतच आपल्याला जे समजते ते शेवटपर्यंत सरळसोट रस्त्यासारखे समजतच राहाते. त्या आघाडीवर लेखक-दिग्दर्शकांनी काडीमात्रही प्रयत्न केल्याचे दिसत नाही. काडीमात्रवरून आठवलं, सारा अली खानला काडीचाही अभिनय जमत नाही. तिच्या तोंडी सगळे संवाद आणि चेहऱ्यावर सगळे भाव सपाटच वाटतात. अक्षयकुमारला एक उत्कर्षबिंदू सोडल्यास काहीही काम नाही. एकेकाळी चित्रपटांमध्ये हिरोच्या मित्रांनाही किंमत असायची. आठवा राय यांच्याच ‘रांझणा’तील मुहंमद झिषान अय्युब, ‘तनू वेड्स मनू’मधील दीपक डोब्रियाल वगैरे. इथे मात्र कथानकातील अवघड गुंते कसल्याही त्रासाविना सोपे करण्यापुरतेच त्यांना वापरून घेतलेले दिसते. चित्रपट गंडलाय हे एकदा मनाने स्वीकारलं की उत्तरार्धात तो काहीसा सुसह्य होतो, पण तोपर्यंत वेळ निघून केलेली असते.

इतके असूनही किंवा काहीच नसूनही आपण चित्रपट शेवटपर्यंत पाहातच राहातो, याची कारणे दोन. एक म्हणजे धनुषचा नवनवीन मानांकने रचणारा वेधक अभिनय. तो जे डोळ्यांचे खेळ करतो, हसता हसता रडतो, टायमिंग साधून विनोद करतो, बॉलिवूडच्या एकूण एक हिरोंना लाजवेल अशी संवादफेक करतो, वीजेसारखा सहज नाचतो, ते सारंच अशक्य कोटीचं आहे! आणि दुसरं कारण म्हणजे रहमानचं दैवी संगीत. गाणी तर हिट आहेतच. पण रहमानने पार्श्वसंगीतातून जे अमृत ओतलंय ते तर निव्वळ अप्रतिम! विशेषतः विविध गाण्यांच्या चाली रहमान प्रसंगोपात जिब्रिश गातो ते सगळेच भाग श्रेष्ठतेने ओतप्रोत झाले आहेत. चित्रपटाच्या शेवटी जेव्हा दिग्दर्शकाच्याही नावाच्या आधी लिहून येतं की, A film by A.R. Rahman, तेव्हा रहमान नुसता त्याच्या श्रेष्ठतेमुळे हा मान हक्काने मिळवतच नसतो, तर चित्रपटात खरोखरच त्याने लेखक-दिग्दर्शकांच्याही पुढे जाऊन आत्मा ओतलाय याची ती पोचपावती असते.

पण धनुष काय किंवा रहमान काय, चित्रपट नावाच्या यंत्राचे आटे आहेत. यंत्र जर स्वतःच चुकीच्या दिशेला घरंगळत असेल तर आटे त्याला थांबवू शकत नाहीत. पंचपक्वान्नाच्या जेवणात श्रीखंडपुरीच तेवढी चवदार निघून उपयोग नसतो. चांगल्या विषयाची वाट लावणारा ‘अतरंगी रे’ हे असेच घरंगळणारे यंत्र आहे, फसलेला बेत आहे. त्याला कुणीच वाचवू शकत नाही!

*१/५

— © विक्रम श्रीराम एडके
[अन्य लेखांसाठी पाहा www.vikramedke.com]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *