अवतार कल्पना

अवतार कल्पना

अवतार कल्पना


पृथ्वीवर जीवनाची उत्पत्ती पाण्यात झाल्याचा सिद्धांत चार्ल्स डार्विनने मांडला [संदर्भ: Darwin, Francis ed (1887), Vol. 3, “The Life & Letters Of Charles Darwin, Including An Autobiographical Chapter”, London : John Murray, Pg. 18]. आजही काही वर्ग सोडल्यास बहुतांशी शास्त्रज्ञ हाच सिद्धांत मानतात. यातूनच पुढे डार्विनचा उत्क्रांतिवाद जन्मास आला. मीही आज उत्क्रांतिवादच समजावून सांगणार आहे, पण जरा वेगळ्या प्रकारे! मला आकळला तसा. पहा पटतोय का!
जीवनाची उत्पत्ती पाण्यात झाल्याचे ऋषींनी शोधले. जीवन निर्माण करणं परमेश्वराच्याच हातात, त्यामुळे त्यांनी या प्राथमिक जीवनास परमेश्वराचा, पालनकर्ती देवता श्रीविष्णूचा अवतार मानले. नाव दिले, “मत्स्यावतार”! पुढे आणखी उत्क्रांती झाली. आता जीव पाण्यासोबतच जमिनीवरही राहू शकत होता. याला आपण नाव दिलं, “कूर्मावतार”. आणखी थोडी प्रगती झाली. प्राथमिक स्तरावरचे रानटी प्राणी निर्माण झाले. याला आपण नाव दिलं “वराहावतार”! आता मानवही निर्माण झाला होता. वन्य मानव! पशुतुल्य रानटी मानव! हाच तो “नृसिंहावतार”! आता मानव माणसात येत होता. सुसंस्कृत होत होता. पण अजून पूर्णत: मानव न होता “वामन”च राहिला होता. हा झाला “वामनावतार”. हळूहळू मानव शस्त्रे वापरायला शिकला. सुसंस्कृत तर बनला, परंतू रानटी जीवनातील शीघ्रकोपीता अजून संपली नव्हती. हाच तो परशुधारी राम, अर्थातच “परशुराम”! आणखी थोडी प्रगती झाल्यावर मानव आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकला. त्याच्यातली मानवता वाढीस लागली होती. हाच तो मर्यादापुरुषोत्तम “श्रीरामावतार”! थोडा आणखी प्रगत झाल्यावर मानवाने सारी भौतिकता तर वश केलीच, शिवाय अध्यात्मावरही प्रभुत्व मिळवलं. त्याला म्हटलं गेलं, “श्रीकृष्णावतार”. कालौघात मानवाला भौतिक प्रगतीची क्षणभंगुरता कळून चुकली आणि अध्यात्म हेच शाश्वत सत्य असल्याचं जाणवलं. हाच तो करुणामयी “श्रीबुद्धावतार”! काहींच्या मते “आदी शंकराचार्य” हे नवमावतार आहेत. त्याही परिस्थितीत उपरोक्त विधान योग्यच ठरते! यापुढे असेल तो मानवीय उत्क्रांतिचा परमोच्च बिंदू, “कल्क्यावतार”! हा अजून व्हायचाय.
काय, “दशावतार” संकल्पनेकडे याआधी कधी अश्या दृष्टीकोनातून पाहिलंच नव्हतं ना? हिंदुंची ही पौराणिक संकल्पना (काही अतिशहाण्यांच्या भाषेत दंतकथा) इतकी निखालसपणे वैज्ञानिक असेल, असं कधी वाटलंच नव्हतं ना? पण आता जे आहे ते आहे! अवतारांची अशी संकल्पना जगात फक्त हिंदूंकडेच आहे, तेव्हा ही शतप्रतिशत हिंदू ऋषिंनीच निर्माण केलीय, यात काही दुमत असायचं कारण नाही. काही जण म्हणतात की, बुद्धाचा दशावतारांत समावेश हा नंतरचा आहे. त्यांचं म्हणणं जरी खरं मानलं तरी, अवतारकल्पना किमान २००० वर्षे तरी निश्चितपणे जुनी आहे. शंकराचार्यांना नववा अवतार मानल्यासही ती किमान १२०० वर्षे जुनी ठरते. अर्थातच, त्यावेळी उत्क्रांतिवादाचा तथाकथित जनक मानला जाणार्या डार्विनचे पार खापर-खापर-खापर-खापर पणजोबाही काय करत होते, आणि कश्या परिस्थितीत जगत होते, हे काही मी वेगळे सांगायला नको!
या अश्या संपन्न हिंदू धर्मात आपण जन्मलो याचा अभिमान बाळगा. आपल्या संस्कृतीरुपी महासागरात जरा डोळसपणाने बुड्या मारायला शिका. लक्षावधी मोती दडलेयत तिथे! आज मला एक सापडला, न जाणो उद्या तुम्हालाही सापडतील! या मोत्यांचा सर मातृभूस अर्पण करुयात. जिद्द बाळगुयात, प्रयत्न करुयात आणि भारतमातेस पुनरपि गतगौरव प्राप्त करून देऊयात!
– © विक्रम श्रीराम एडके

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *