अस्वस्थ मनाचे चिंतन

आज सकाळी सकाळी जाग आली तीच मुळी जिया खानने आत्महत्या केल्याच्या बातमीने. ती काही माझी आवडती अभिनेत्री अथवा आवडती सौंदर्यवती नव्हती. आमच्यात समान म्हणावी अशी एकच गोष्ट म्हणजे, वय! अवघ्या पंचविशीच्या कुणाही तरुण जीवाचे जाणे जितके चटका लावणारे असते, तितकाच तिच्या जाण्याचा त्रास झाला मला.
प्रत्येकासाठी आपापली दु:खे मोठी असतात हे खरे, पण कोणते दु:ख आणि कोणता त्रास इतका मोठा असतो की, परमेश्वराने दिलेली सगळ्यात मोठी भेटवस्तू – हे आयुष्यच संपवावेसे वाटावे? मी हिंदू संस्कृतीला, अध्यात्माला मानणारा माणूस आहे, त्यामुळे आजच्या भौतिक जगात तुम्हाला माझे म्हणणे खुळे वाटेल, पण आपल्यापैकी प्रत्येकाला परमेश्वराने काही ना काही उद्देश देऊन या पृथ्वीवर पाठवलेले असते असे मी मानतो. आपल्या आयुष्याचे उद्दिष्ट कोणते हे शोधणे आणि सर्व शक्तिनिशी ते पुरे करणे, हे अतिशय रोमांचक आह्वान आहे! त्यासाठी आवश्यक ती सारीच शस्त्रास्त्रे परमेश्वराने आपल्याला बरोब्बर पुरवलेली असतात. ती न जाणता, न वापरताच खेळ असा अर्ध्यावर विस्कटणे, हा कुठला न्याय? हा रडीचाच डाव नव्हे काय? काही ना काही पेनल्टी तर द्यावीच लागणार ना मग त्यासाठी! ईशावास्योपनिषदातला तिसरा मंत्र सांगतो की, जे कुणी आत्महत्या करतात त्यांना मानवी जीवनाचे मूल्य कळण्यासाठी “असूर्य”नामक लोकात पाठवून दिले जाते. खरे-खोटे माहिती नाही, पण कर्म करणे परंतू फलांपासून मात्र पळणे हे बेजबाबदारपणाचे, पळपुटेपणाचे लक्षण आहे एवढे निश्चित!
आणि संकटे कुणाला नसतात हो? स्वामी विवेकानंदांना आयुष्यभर ७३ प्रकारच्या व्याधी साथ करत होत्या! त्यातच त्यांचा अंतही झाला. पण त्याही परिस्थितीत त्यांनी विश्वविजय केला, सगळ्या जगाला हिंदू तत्त्वज्ञान समजावून दिलं! इतका त्रास सहन करण्यापेक्षा आत्महत्या सोपी, असा खुळचट विचार नाही केला त्यांनी. वीर सावरकरांनी अंदमानात सतत ११ वर्षे जे अमानुष अत्याचार भोगले, ते नुसते वाचले तरीही डोळ्यांतून पाणी येते. अनेकदा आत्महत्येचे विचार मनात आल्याचे सावरकरांनीच प्रांजळपणे लिहून ठेवलेय. पण म्हणून त्यांनी मातृभूमीला वाहिलेले हे जीवन संपवले नाही. उलट त्यांनी मृत्यूलाच ठणकावून सांगितले की, “अरे मृत्यो.. अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, मारिल रिपू जगती असा कवण जन्मला? अग्नि जाळिसी न मला खड्ग छेदितो, भिऊनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो!” आणि खरोखरच सावरकरांच्या या ललकारीने घाबरलेला काळ पुढे आयुष्यभर त्यांना स्पर्श करण्याचे साहस करू शकला नाही. शेवटी तो आला तोही सावरकरांच्याच इच्छेने, त्यांच्याच आमंत्रणाने! दुर्दैवाने या दोन्हीही महामानवांबद्दल जिया खानला किंचितशीही माहिती असण्याची सुतराम शक्यता नव्हती. खरं सांगू गेलं तर, स्वप्नरुपी बीजांत मुळातच ऊर्मी नसेल तर ते अडचणींच्या उन्हापुढे करपणारच ना! पण म्हणून बीज आणि आसपासची मातीच नष्ट करणे हे काही त्याला उत्तर होऊ शकत नाही. त्याऐवजी जियाने त्याला मेहनत, सकारात्मकता आणि विश्वासाचे खत-पाणी घातले असते तर बरे झाले असते, असे वाटते. असो. जाणारा जीव तर गेला. आता काही जरी वाटले, तरी त्याला काय अर्थ आहे? तिची कर्मे तिला आज ना उद्या भोगावी तर लागणारच. पण तिचे हे भोग लवकरच संपो, तिला सत्याची जाणीव होवो आणि तिला लवकरात लवकर सद्गती मिळो अशी मन:पूर्वक प्रार्थना मात्र मी करतो. जियाच्या जाण्याने भौतिकतेलाच सर्वस्व मानणार्या तरुणाईने काहीतरी धडा घ्यावा, हीदेखील अपेक्षा आहेच. बघूयात, ही अपेक्षा पूर्ण होते की नाही. शेवटी काळाइतके अनिश्चित, बलवान आणि उत्तरदायी दुसरे काय आहे!
– © विक्रम श्रीराम एडके.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *