आपल्या इतिहासाचे प्रदूषण

हिंदुत्वाचा दृष्टीकोन काही काळ बाजूला जरी ठेवला, तरीही आपल्याकडे अक्षरशः निस्तेज इतिहास शिकविला जातो, ही बाब खरोखर अक्षम्य आहे. आपण भारतीय मुळात अतिशय निकृष्ट दर्जाचे जिणे जगत होतो आणि सुरुवातीला मुघल व नंतर इंग्रजांनी आपल्याला सभ्यता, संस्कृती शिकवून आपल्यावर न भूतो न भविष्यति असे उपकार केले; अश्याच थाटात आपल्याकडे इतिहास – विशेषतः शालेय इतिहास मांडला जातो.
“मुघलांनी या देशाच्या बहुसांस्कृतिकतेत भर घातली”, हे सांगताना “मुघलांच्या आगमनापूर्वी हा देश अतिशय शांततेने नांदत होता” हे सत्य का सांगितले जात नाही? बहुसांस्कृतिकता ही काही आपली गरज नव्हे! “इथे आलेले सगळेच तुर्की राजे हे एकजात रानटी, धर्मांध आणि विकृत वासनांनी पछाडलेले होते” हे सत्य का सांगितले जात नाही?
मुघल साम्राज्याचा अधिकृत काळ आहे इ. स. १५८२-१८५७. म्हणजे सुमारे ३०० वर्षे. शालेय इतिहासाची पुस्तके उलगडून पाहा, या मुघल साम्राज्याबद्दल पानेच्या पाने भरून लिहिलेले असते. परंतू आपल्याला कल्पनाही नसते की, विजयनगरचे अतिप्रचंड, सुसंस्कृत आणि १००% स्वदेशी असलेले साम्राज्यही तितकीच, म्हणजे जवळजवळ ३०० वर्षे मोठ्या दिमाखात उभे होते (१३३६-१६४६)! का? कारण सोपे आहे. शालेय इतिहासाच्या पुस्तकात विजयनगरच्या वाट्याला पुरती ४ पानेही आलेली नसतात! परकीयांचा उदोउदो करण्यातून फुरसत तर मिळाली पाहिजे ना! या मुघल साम्राज्याचा माज उतरवणारे आणि सर्व जगात आपल्या कर्तृत्वाचा डंका वाजविणारे मराठा साम्राज्य तरी महाराष्ट्र सोडून इतरत्र कुठे सविस्तर शिकविले जाते? आणि महाराष्ट्रातही “धार्मिक भावना” या बाष्कळ मथळ्याखाली शिवछत्रपती आणि मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासावरून कात्री फिरविण्याचाच प्रयत्न होताना दिसत नाही का?
परवा मी खानदेशात व्याख्यान द्यायला गेलो होतो. बोलता बोलता मी खानदेशातील निकुंभ (हल्लीचे निकम) राजवंशाबद्दल बोललो. या निकुंभ घराण्याने ८०० वर्षांहूनही अधिक काळ (१०००-१८५८) खानदेशावर सत्ता चालविली (Gazetter of the Bombay Presidency, Vol. XII, Khandesh). आपले स्वातंत्र्य टिकवून ठेवले. एवढेच नव्हे तर ज्या अकबराला हल्ली चांगला ठरविण्याचा, महान प्रशासक वगैरे ठरविण्याचा प्रयत्न होतोय, त्या आक्रमक अकबरालाही या निकुंभांनीच हरवून हाकलून लावले होते. मला वाटले की, ही बाब सर्व श्रोत्यांना माहिती असेल. परंतू हा इतिहास कुणालाच माहिती नव्हता. तुरळक लोकांनी निकुंभांबद्दल केवळ ऐकले होते एवढेच! खरं सांगायचं तर त्या श्रोत्यांचा यत्किंचितही दोष नाही. आजच्या “सेक्युलर” वातावरणात निकुंभांसारख्या “सांप्रदायिक” राजांचा इतिहास शिकवलाच जात नाही याला कोण काय करणार? त्यांनी आपले स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याऐवजी महान अकबरासारख्या “सेक्युलर” सम्राटापुढे हार पत्करली असती तर कुठेतरी त्यांचा उल्लेख व्हायची संधी तरी होती. निकुंभांनी आपल्याच कर्माने ती घालवली असेल, तर कुणाचा काय दोष? दोष सगळा त्या निकुंभांचाच, नाही का!
ही अशी सगळी अवस्था आहे! ही तर फक्त १-२ उदाहरणे झाली. असा नि:सत्व इतिहास शिकविला जातो. त्याच्यापासून कुणाला काय प्रेरणा लाभणार? असा इतिहास शिकून मोठी झालेल्या पिढीला का म्हणून या देशासाठी लढावेसे वाटेल? का या देशाच्या इतिहासात योगदान द्यावेसे वाटेल? त्यांना स्वत:पुरताच विचार करावासा वाटला तर त्यांना दोष कसा काय देता येईल? लक्षात घ्या, देशासाठी काहीतरी करून दाखवायचे असेल तर ह्रदयात राष्ट्रभक्तीची आग असावी लागते आणि या आगीत इतिहासापासून घेतलेल्या स्फुर्तीचेच तेल ओतावे लागते – अन्यथा दुसरीकडून कुठून कार्यप्रेरणा मिळणार? प्रेरणेचा अभाव असणार्या पिढीकडून अपेक्षा तरी कशी काय करता येईल? म्हणजे आपणच गाढवे आणि खेचरे जन्माला घालायची, पण त्यांच्याकडून अपेक्षा मात्र श्यामकर्णी अश्वांच्या दर्जाची करायची अथवा आपण मातीची मडकी घडवायची परंतू त्यांनी पोलादी कणखरपणाच दाखवायला हवा असा अट्टाहास करायचा! याला काय अर्थ आहे?
१५०० वर्षे चाललेल्या आक्रमणांच्या शृंखलेत मध्यपूर्वेतील आक्रमकांनी आपली केवळ डोकी मारली, परंतू अवघ्या १५० वर्षांच्या काळात धूर्त इंग्रजांनी कावेबाजपणाने बरोब्बर आपल्या डोक्यांच्या आतले मेंदूच मारले! त्याचेच हे असे परिणाम आपण आज भोगतो आहोत. यानंतरही अजून किती काळ भोगणार आहोत, देवच जाणे!
– © विक्रम श्रीराम एडके.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *