सुसंस्कृतम्..!

“तमाखुपत्रं राजेन्द्र भजमाज्ञानदायकम् ।
तमाखुपत्रं राजेन्द्र भजमाज्ञानदायकम् ।।”

वरवर पाहाता असे वाटेल की, इथे एकाच संस्कृत ओळीची पुनरावृत्ती करण्यात आली आहे. पण हीच तर संस्कृत भाषेची मौज आहे. जरी दोन्हीही ओळी समान असल्या तरीही दोन्ही ओळींचे अर्थ वेगळे आहेत. आणि दोन्ही ओळी मिळून एक संपूर्ण श्लोक तयार होतो.
सुभाषितकार कुणा राजाच्या दरबारात गेलाय. तिथे त्याने पाहिले की, राजा भर दरबारात कामकाज चालू असतानाही तंबाखूचे व्यसन करतोय. ते पाहून लगेच सुभाषितकाराला ओळ स्फुरली –
“तमाखुपत्रं राजेन्द्र भजमाज्ञानदायकम्”.
याची फोड होते – “तमाखुपत्रं राजेन्द्र भज मा अज्ञानदायकम्”.
अर्थात – हे राजेन्द्रा, नशा आणणारे (अज्ञानदायकम्) तंबाखूचे पान (तमाखुपत्र) नको खाऊस (मा भज).
राजाने यावर विचारले, “मग काय करू”?
त्यावर सुभाषितकार पुन्हा म्हणतो,
“तमाखुपत्रं राजेन्द्र भजमाज्ञानदायकम्”.
यावेळी मात्र त्याची फोड होते – “तम् आखुपत्रं राजेन्द्र भज मा ज्ञानदायकम्”.
अर्थात – हे राजेन्द्रा, त्या (तम्) मा (म्हणजे लक्ष्मी) आणि ज्ञान देणाऱ्या (मा, ज्ञानदायकम्) आखुपत्राची (म्हणजे गणपतीची) भक्ती कर.
अर्थातच चाणाक्ष राजाला (हो, त्याकाळचे सत्ताधारी विद्वान होते बरं का. आत्ताचे “पाँचवी पास से तेज” जरी निघाले तरी आम्हाला जग जिंकल्यासारखे वाटते!) सुभाषितकाराच्या दोन्ही ओळींचा अर्थ कळला, हे सांगणे नकोच!

परंतू हीच संस्कृत भाषेची थोरवी आहे. या समुद्रात तुम्ही जितक्या बुड्या माराल तितकी अधिक रत्ने तुम्हाला गवसतील. उपरोक्त श्लोक हा संस्कृतातील “काव्यशास्त्रविनोद”चा केवळ एक प्रकारमात्र आहे! शिवाय एकाच ओळीतून दोन इतके भिन्न अर्थ निघतात आणि त्याद्वारे दोन्ही ओळींच्या समुच्चयास एक पूर्णत्व प्राप्त होते, यावरूनच संस्कृतची समृद्धता तुमच्या लक्षात येईल. माझ्या माहितीप्रमाणे इतकी समृद्ध भाषा अवघ्या जगात दुसरी कोणतीच नाही. आपण मात्र विनाकारणच इंग्रजीसारख्या उधार-उसनवारीवर पोसलेल्या भाषेच्या पाठी धावतो आहोत!

– © विक्रम श्रीराम एडके.

image

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *