RIP नव्हे, ‘सद्गती’ म्हणा!!

कुणी व्यक्ती गेली की सोशल मिडियावर श्रद्धांजलीचे सत्रच सुरू होते. त्यातही हल्ली आपल्या भावना एवढ्या काही स्वस्त झाल्या आहेत की, आपल्याला Rest In Peace एवढे ३ शब्दही टंकित करण्याची तसदी घ्यावीशी वाटत नाही, अथवा तितका वेळ नसतो. त्यामुळे मंडळी थोडक्यात RIP लिहून मोकळी होतात! याच RIP संदर्भात काही गोष्टी स्पष्ट करणे आवश्यक वाटते. पाहा पटतात का —

१) RIP अर्थात Rest In Peace चा शब्दशः अर्थ होतो – ‘(शरीर) शांततेत आराम करो’. आपण तो शब्द इतक्या काही सहजपणे वापरतो की, त्याचा अर्थ तरी आपल्याला समजतो की नाही असा प्रश्न पडावा. ही मुळात ख्रिश्चन संकल्पना आहे मित्रांनो. त्यांच्यात शरीरालाच सारे महत्व दिले जाते. ते मानतात की, न्यायाच्या दिवशी परमेश्वर सर्वांना त्यांच्या थडग्यातून उठवून त्यांच्या पाप-पुण्याचा हिशोब करेल. तो दिवस कधी येईल, माहिती नाही. परंतू तोवर त्या शरीराला त्याच्या थडग्यात आराम मिळो, यासाठी म्हणतात Rest in Peace. आता यात सामान्य तर्कबुद्धीच्याही व्यक्तीला पडणारे प्रश्न असे की,

अ) मृत्यूनंतर काही दिवसांतच शरीराचे विघटन होते. मग कोणत्या शरीराला पुन्हा उठवणार?
ब) समजा सर्वशक्तिमान परमेश्वर जर कुठूनही शरीराची तत्त्वे गोळा करून ते निर्माण करणारच असेल, तर मग शरीर पुरायची गरज काय? हिंदू ज्याप्रमाणे शरीर जाळतात (ही प्रथा ग्रीकांनी आपल्याकडून जशीच्या तशी उचलली!) त्याप्रमाणे जाळल्यावरही परमेश्वर ते निर्माण करेलच की!
क) शरीर खरोखरीच जर इतके गरजेचे असते, तर परमेश्वराने मुळात ते नष्टच का होऊ दिले असते?
ड) झाडाझुडुपांमध्येही जीव असतो आणि त्यांचा तर अंतिमसंस्कारही होत नाही. मग हा परमेश्वरी न्यायाचा नियम त्यांनाही लागू आहे का?
इ) या नियमानुसार डायनोसॉर्सचे नेमके काय झाले?

ही प्रश्नांची यादी कितीही वाढवता येईल. तूर्त इतकेच सांगून थांबतो की, ही ख्रिश्चन संकल्पना नंतर मुसलमानांनीही जशीच्या तशी उचलली आणि कित्येक अडाणी हिंदूच नव्हेत तर कट्टर हिंदुत्ववादी मित्रही अर्थ समजून न घेता हीच पद्धत पुढे चालवित आहेत!

२) हिंदू धर्म सांगतो —

‘वासांसि जीर्णानि यथा विहाय नवाणि गृह्णाति नरोऽपराणि ।
तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवाणि देही ।।’
(गीता, २/२२)
अर्थात आपण ज्याप्रमाणे वस्त्रे जुनी झाल्यावर ती टाकून नवीन वस्त्रे घालतो, त्याचप्रमाणे शरीर जुने झाल्यावर देही (देह धारण करणारा – आत्मा) ते टाकून नवीन देह परिधान करतो!

मृत्यूच्या प्रसंगी शरीरातून काहीतरी निघून जाते, हे वैज्ञानिक स्तरावर सारेच मान्य करतात. परंतू हिंदूंनी सहस्रावधी वर्षांपूर्वीच त्या संकल्पनेसाठी ‘देही’ असा शब्द योजून आपला द्रष्टेपणा दाखवून दिला आहे. आईन्स्टाईन ऊर्जा अक्षय्यतेचा नियम सांगतो. त्याआधारे ऊर्जा नष्ट होत नाही, तर तिचे केवळ एका प्रकारातून दुसऱ्यात रुपांतर तेवढे होते. त्यालाच अनुसरून हा चैतन्यरूप देही एकदा निघून गेला की, तो दुसऱ्या प्रकारात रुपांतरीत व्हावयास हवा. परंतू शरीर धारण करणे हा त्याचा गुणधर्म असल्याने तो शरीरच धारण करतो! या संकल्पनेत आणखी एक संकल्पना मिसळली जाते ती म्हणजे पाप-पुण्य! ज्याच्या त्याच्या कर्मांनी देही नंतर कोणते शरीर धारण करणार हे ठरते. यात सर्वच सजीव सृष्टी येते – ८४ लक्ष योनी!! यात झाडाझुडपांसहीत सर्वच सजीव, सजीव असण्याचे आणि नियमबद्ध असण्याचे उत्तर मिळते!

परंतू देहीचे जाणे आणि दुसरे शरीर धारण करणे यात जो काळ जातो, तो त्या देहीला त्याच्या पाप-पुण्याच्या हिशोबात भोगायचा असतो. पापाचे पारडे जड असेल, तर देही जास्त लांब जाऊ शकणार नाही. इथेच घुटमळत राहील – परंतू वाईट अवस्थेत. पुण्याचे पारडे जड असेल तरीही देही ते भोगून परत इथेच घुटमळेल! म्हणूनच हिंदू संस्कृती पाप आणि पुण्य दोन्हीही शून्यावर यावे यासाठी ‘निष्काम कर्मयोग’ सांगते! तरच देहीला घर्षणरहित गती प्राप्त होईल ना! तर थोडक्यात हा प्रवास आहे. यात आप्तजनांच्या आणि शुभचिंतकांच्या शुभेच्छांचा खूप मोठा वाटा आहे.

पण आपण काय करतो? आपण त्या आत्म्याला शुभेच्छा देण्याऐवजी ‘चिरशांति लाभो’ म्हणतो आणि नकळतच त्याच्या प्रवासाला चाप लावतो! एखादी ऊर्जा प्रवासाला निघते आणि आपण मात्र आपल्या प्रार्थनेची कळ दाबून तिला स्तब्ध राहायला सांगतो! यावर जर कुणाचा विश्वासच नसेल, तर माझे काहीच म्हणणे नाही (मग अश्या परिस्थितीत काहीही – अगदी RIP म्हणण्याची तरी औपचारिकता कश्यासाठी दाखवायची मग उगाच?). परंतू जर तुम्ही स्वत:ला हिंदू म्हणवून घेत असाल तर तुमचे हे वागणे धर्माविरुद्ध तर आहेच, सोबत अनेक वैज्ञानिक सिद्धांतांच्याही विरुद्ध आहे.

आता प्रश्न उभा राहील की, RIP नसेल म्हणायचे तर मग काय म्हणायचे? याचेही उत्तर आहे. हा केवळ दृष्टीकोनाचा फरक आहे मित्रांनो. पाश्चात्य लोक कुणाची आठवण काढल्या-काढल्या ती व्यक्ती समोर आली तर गमतीने म्हणतात – Think of the devil & devil is here याउलट आपण म्हणतो ‘शंभर वर्षं आयुष्य आहे तुम्हाला’!! आहे की नाही दृष्टीकोनाचा फरक! तद्वतच ‘चिरशांति लाभो’ ऐवजी आपल्याकडे म्हणतात “गतात्म्यास सद्गती लाभो” – May The Soul Attain Sadgati. याचेही लघुरुप करून AS असे म्हणता येईलच की! RIP पेक्षा छोटे आणि सोप्पे!!

तर अशी ही सद्गतीची संकल्पना आणि दृष्टीकोन! ज्यांचा या कश्यावरच विश्वास नाही, परमेश्वर त्यांचे भले करो. मात्र ज्यांचा हिंदू धर्मावर आणि त्यातील वैज्ञानिकतेवर विश्वास आहे, ती मंडळी तरी याउप्पर RIP चा रिप-रिप पाऊस थांबवून ‘सद्गती लाभो’ (AS) असे सार्थपणे म्हणतील, अशी अपेक्षा!!

– © विक्रम श्रीराम एडके
(लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी व आपल्या परिसरांत अनेकानेक विषयांवर लेखकाची व्याख्याने आयोजित करण्यासाठी क्लिक करा – www.vikramedke.com)

3 thoughts on “RIP नव्हे, ‘सद्गती’ म्हणा!!

  1. गेलेल्या माणसाने जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटून शांतब्रह्मात लीन होऊच नये काय?

  2. श्रद्धांजली साठी RIP ऐवजी AS शब्द शोधल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन !!!

    वास्तविक ‘गतात्म्यास सद्गती लाभो’ असेच सर्वांनी म्हणावयास हवे, परंतू आजच्या तरूणाईची शाॅर्टफाॅर्ममध्ये भावना व्यक्त करण्याची सवय अचूक हेरुन, आपण शोधलेला हा नवीन AS शब्द RIP पेक्षा निश्चितच उजवा ठरतो.

    आपल्या प्रतिभेस आणखी फुलोरा येवो, हि मनःपूर्वक शुभेच्छा !!!

    आपला सहध्यायी – प्रविण द. जाधव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *