सेक्युलरी गौडबंगाल : एक चिंतन

आपल्या बऱ्याच मित्रांना स्वत:ला ‘सेक्युलर’ म्हणवून घ्यायची खाज असते. कारण काय, तर म्हणे भारत हा एक सेक्युलर देश आहे. या ‘सेक्युलर’ शब्दाचे उपद्रवमूल्य समजल्यामुळे हा शब्द एखाद्या शिवीसारखा वापरणाऱ्यांची संख्यादेखील लक्षणीय आहे. पण या सेक्युलर-भक्तांना आणि विरोधकांनाही एक गोष्ट अजिबात ठाऊक नसते की, भारतात हे सेक्युलरी गौडबंगाल आलं कधी?

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल मित्रहो, परंतू हा ‘सेक्युलर’ शब्द भारताच्या संविधानात ४२व्या घटनादुरुस्तीअन्वये घुसडण्यात आला! मी मुद्दामच ‘घुसडण्यात आला’ असे म्हणतोय, कारण भारतात ढोबळमानाने १९७५ ते १९७७ आणीबाणी होती आणि ही उपरोक्त घटनादुरुस्ती झाली आहे १९७६ साली! तेव्हा हा ‘सेक्युलर’ शब्द घटनेत कुणी टाकला असेल, काय हेतूने टाकला असेल, आणि किती मोकळ्या वातावरणात टाकला असेल; हे वेगळे सांगायलाच नको! म्हणजे थोडक्यात, घटना अस्तित्वात आल्यापासून सुमारे पाव-शतक या ‘सेक्युलर’ देशाच्या घटनेत ‘सेक्युलर’ हा शब्दच नव्हता आणि तरीही हा देश ‘सेक्युलर’ होता!!

अजून एक गंमत सांगतो. भारतात आज अस्तित्वात असलेला कोणताही कायदा उघडून पाहा. त्यात धारा (सेक्शन) क्र. २ हा नेहमीच व्याख्या-विभाग (डेफिनिशन क्लॉज) असतो. अगदी संविधानातसुद्धा! या व्याख्याविभागात त्या-त्या कायद्यात आलेल्या सर्वच पारिभाषिक शब्दांची त्या-त्या कायद्याला अभिप्रेत असणारी व्याख्या केलेली असते. आणि त्या-त्या कायद्यात तो-तो शब्द केवळ त्याच आणि त्याच अर्थाने वापरला जातो, अन्य नाही! आपल्या देशाच्या संविधानाचा गाभा हा त्याच्या प्रस्तावनेत (प्रिऍम्बल) आहे. हा ‘सेक्युलर’ शब्ददेखील त्याच प्रस्तावनेत येतो, परंतू तुम्हाला नवल वाटेल – व्याख्याविभाग तर सोडाच, परंतू संपूर्ण संविधानात कुठेही ‘सेक्युलर’ या शब्दाची व्याख्याच केलेली नाही! आता बोला!! आता व्याख्याच नाही म्हटल्यावर ‘आपला देश धर्मनिरपेक्ष, की निधर्मी’ असे प्रश्न उभे राहाणे साहाजिकच आहे ना!

तेव्हा आपले जे कोणी मित्र स्वत:ला सेक्युलर म्हणवून घेण्यात धन्यता मानत असतील, त्यांनी एक गोष्ट पक्की समजून असावे की ते स्वत:स एक अव्याख्यित आणि प्रसंग व राजकीय सोयीनुसार सातत्याने बदलणाऱ्या अर्थाची बिरुदावली चिकटवताहेत! कारण संविधानात या शब्दाची व्याख्याच नसल्यामुळे प्रत्येकवेळी व्याख्येसाठी बाह्य साधनांवरच अवलंबून राहाणे भाग आहे. आणि अमुकच ठिकाणी केलेली व्याख्या अधिकृत असादेखील काही नियम नसल्याने प्रसंगानुसार अथवा व्याख्या करणाऱ्या न्यायसंस्थेनुसार ही व्याख्या सतत बदलत राहाणेही साहजिकच आहे! मग ती अगदी ‘निधर्मी’ पासून ते ‘धर्मनिरपेक्ष’ पर्यंत काहीही होऊ शकते. आणि त्या-त्या प्रमाणे आपल्या या सेक्युलरांध मित्रांचे वैचारिक अस्तित्वही बदलत जाते! आहे की नाही गंमत!

खरं तर आपल्या देशात अधूनमधून जे विचित्र प्रवाह वाहातात, त्याचे मूळ हे या ‘सेक्युलर’नामक अव्यक्त शब्दास अवास्तव महत्व देण्यात आहे! या शब्दाचा आपल्याकडे नेहमीच राजकीय स्वार्थाच्या अनुषंगाने अन्वयार्थ लावला जातो, हे एक उघड गुपित आहे! त्यामुळेच रझा अकादमीसारख्या संस्थेवर बंदी घातलीच जात नाही, मात्र ‘हिंदूराष्ट्र सेना’ या अद्यापि आरोप सिद्धदेखील न झालेल्या संघटनेवर बंदी घालण्याची भाषा बोलली जाते. आसारामबापूंवर टिकेचे भलेमोठे सत्र चालते परंतू त्याचप्रकारचा आणि तितकाच गंभीर गुन्हा केलेल्या पॉल दिनाकरनबद्दल कुणालाच चकार शब्दही काढावासा वाटत नाही! ‘मोस्ट वॉण्टेड’ अबू सालेम तुरुंगातच एखाद्या मल्लासारखी शरीरयष्टी कमावतो मात्र अद्यापपावेतो आरोपपत्रही दाखल न झालेले स्वामी असीमानंद आणि साध्वी प्रज्ञासिंहजी तुरुंगात नरकयातना भोगतात! मालेगावच्या तरुणांना पुराव्याअभावी निर्दोष सोडले जाते आणि नंतर देशाचे तत्कालीन गृहमंत्री असलेले एक पूर्व-सांसद पोलिसांना खुशाल ‘मुसलमानांना हात लावाल तर खबरदार’ अशी सरसकट धार्मिक भेदभाव करणारी धमकी देऊन टाकतात! काही धर्माने हिंदू असलेल्या गुंडांनी पुण्यातल्या त्या मुसलमान तरुणाला मारले, तर ते हिंदूंनी मुसलमानाला मारणे ठरते, मात्र त्याच काळात मुसलमानांनी त्या निखिल तिकोनेवर केलेला जीवघेणा हल्ला केवळ ‘माथेफिरू जमावाने’ केलेला हल्ला ठरतो. धनंजय देसाईंची पुण्यातल्या प्रकरणाबाबत चौकशी करावी हीच पहिली जबाबदारी असताना त्याचा छडा लावण्याआधीच आपल्या अतिहुशार आणि पराकोटीच्या कार्यकुशल गृहमंत्र्यांना त्यांची दाभोळकर-प्रकरणातही चौकशी करायचा मोह होतो, तो कश्याच्या आधारावर? सर्वोच्च न्यायालयाने शाहबानो प्रकरणात दिलेला निकाल तत्कालीन सरकारला का डावलावासा वाटतो? दहशतवादाचा रंग ठरवताना हटकून फक्त भगवा रंगच का आठवतो – जेव्हा की लोकांना बरोब्बर माहिती आहे सबंध जगात कोण दहशतवाद माजवतंय! आणि या सगळ्यावर कडी म्हणजे धार्मिक आणि जातीय अभिनिवेश चुचकारणारे आपल्याकडे ‘सर्वसमावेशक’ ठरतात, तर देशाच्या सर्व नागरिकांना समान पातळीवर ठेवून ‘समान नागरी कायदा’ लागू करा म्हणणारे मात्र ‘सांप्रदायिक’ ठरतात! या सगळ्या गमती-जमतींची उत्तरं ही ‘सेक्युलर’ शब्दाच्या भारतीय आवृत्तीत दडलेली आहेत!

असे हे ‘सेक्युलर’ नावाचे गौडबंगाल आहे. आणि आगामी काळात हे गौडबंगाल कितपत चालवून घ्यायचे हे आपण ठरवायचे आहे. ‘तथाकथित अल्पसंख्याकांना (जे आता अजिबातच अल्पसंख्य नाहीत) गोंजारायचे, सहस्रावधी वर्षांपासून हा देश ज्यांनी सुजलाम-सुफलाम केला त्या बहुसंख्याकांना लाथाडायचे आणि आपलेच वर्चस्व कसे कायम राहील एवढेच पाहायचे’ एवढाच सांप्रतच्या राजकीय परिस्थितीत ‘सेक्युलर’ शब्दाचा अर्थ होऊन बसलाय. आणि तो अर्थ आजचा नाही तर पार खिलाफतवाल्या बांडगुळांना कुरवाळणाऱ्या अहिंसेच्या बेगडी पुजाऱ्यापासून चालत आलाय. या प्रकाराला भुलून मतं देण्याचा मूर्खपणा आता थांबवायला हवा आपण, मग तो कोणता का राजकीय पक्ष असेना! या अश्याप्रकारचा ‘सेक्युलर’ असण्यावर मतं मिळत नाहीत, हे दिसले की कित्येक ‘जाणत्या राजां’चा आणि त्यांच्या ‘हुजऱ्यां’चा सूरही कसा बदलेल पाहाच! अश्या वेळी त्यांनाही सर्वात आधी बहुसंख्यकांचाच विचार करावा लागतो की नाही हेही पाहाच! तेव्हाच खऱ्या अर्थाने ‘सेक्युलर’ असण्याच्या भारतीय आवृत्तीचे पिढ्यानपिढ्या चालत आलेले गौडबंगाल संपेल!!

– © विक्रम श्रीराम एडके
(लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी व विविध विषयांवर लेखकाने दिलेली व्याख्याने ऐकण्या/आयोजिण्यासाठी पाहा: www.vikramedke.com)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *