‘आय’ — अदक्कम मेलऽ

ஜ या तमिळ भाषेतील अक्षराचा उच्चार होतो ‘आय’ अथवा ‘ऐ’. एकच अक्षर, पण त्याचे अर्थ मात्र खूप सारे होतात. ‘आय’ म्हणजे सौंदर्य, मी, राग, बाण, सूड, प्रेम, गुरू, राजा, मालक, दुर्बल, आश्चर्य आणि अजून बरंच काही! परंतु जेव्हा शंकर हे सगळेच्या सगळे अर्थ एकाच कथेत बांधतो, तेव्हा बनतो ३ तास ८ मिनिटे चालणारा चमत्कार ‘आय’!! अविश्वसनीय, अद्भुत, अकल्प्य आणि तरीही तपशीलांचा पाया पक्का असलेले चित्रपट बनवण्यासाठी शंकर प्रसिद्ध आहे. त्याचा प्रत्येक अन् प्रत्येक चित्रपट हा तमिळच नव्हे, तर संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीला नवीन दिशा देत असतो. परंतु २०० कोटींच्या भयावह किमतीत बनवलेला ‘आय’सारखा चित्रपट शंकरनेही आजवर कधीच बनवला नव्हता, हे निश्चित!! यानिमित्ताने शंकरने आयुष्यात पहिल्यांदाच प्रणयप्रधान थरारपट बनवलाय!! आणि त्याची सारी जबाबदारी समर्थपणे शिरावर उचललीये ‘चियान’ विक्रमने!! अत्यंत साधीशी, सुडाच्या अंगाने जाणारी प्रेमकथा! मात्र जेव्हा तिला शंकरचा स्पर्श होतो, तेव्हा कुणी कल्पनेतही कल्पना करू शकणार नाही, इतकी भव्यता निर्माण होते! श्वास रोखून धरायला लावणारी साहसदृश्ये, भीती वाटायला लावणारी थरारकता, सौंदर्यानेही लाजून मान लववावी असं सौंदर्य. आणि तरीही त्याच्या प्रत्येक न् प्रत्येक चौकटीवर कोरलेलं लिंगेसनचं (विक्रम) दिया (ऍमी) साठीचं प्रेम!! शरीरसौष्ठवापासून ते मॉडेलिंग व वैद्यकशास्त्रापर्यंत आणि चेन्नईच्या गल्लीबोळांपासून ते चीनमधल्या बहारदार स्थळांपर्यंत ‘आय’ लीलया संचार करतो!

सर्वात आधी उल्लेख करायला हवा तो विक्रमचा! विक्रम नि:संशय याक्षणीचा भारतातील सर्वश्रेष्ठ अभिनेता आहे. त्याच्याइतका मेहनती अभिनेताही भारतात दुसरा कुणीच नसेल. परंतु ही सारी विशेषणं थिटी वाटावीत असा चमत्कार त्याने लिंगेसनच्या रुपाने घडवलाय! ‘आय’च्या एकेका चौकटीच्या परिपूर्णतेसाठी आपल्या ४८ वर्षे जीर्ण शरीराची अक्षरशः दधिचीप्रमाणे प्रत्येक मिनिटा मिनिटाला किंमत मोजलीये त्याने! सौंदर्याची मूर्ती म्हणजे विक्रम, शैलीदारपणाचे दुसरे नाव विक्रम, रागावण्याच्या अभिनयात जमदग्नीचा अवतार विक्रम, साहसदृश्यांत बाणासारखा तीक्ष्ण भासणारा विक्रम, सुडाची अग्नि म्हणजे विक्रम, साक्षात मदन म्हणजे विक्रम पडद्यावरचा राजा विक्रम, ३ तास ८ मिनिटांचा मालक विक्रम, धुलिकणही जड वाटावा इतका दुर्बळ होऊन दाखवणारा विक्रम, भारतीय चित्रपटसृष्टीतलं आश्चर्य विक्रम आणि भारतातल्या सर्वच अभिनेत्यांनी ज्याच्याकडून काही ना काही शिकावं, असा गुरू म्हणजे विक्रम! थोडक्यात ‘आय’चे सर्वच्या सर्व अर्थ ज्याला चपखल लागू पडतात, असा ‘आय’स्वरूप विक्रम!! त्याचा अभिनय शब्दांत बांधताच येणार नाही. ‘आय’च्या कित्येक दृश्यांत डोईच्या केसांपासून ते पायीच्या नखांपर्यंत रंगभूषेखाली झाकलेला आहे तो, परंतु तरीही त्याचे डोळे आणि देहबोली भावना तितक्याच तीव्रतेने पोहोचवतात!! काही काही दृश्यांमध्ये तर स्वत:लाच समजावून सांगावे लागते की, ‘हा विक्रमच आहे बरं का’!! गरज असेल तेव्हा तो चक्क अर्नॉल्डही भासतो आणि गरज असेल तेव्हा तो कस्पटासमानही भासतो! ‘रावण’ (२०१०) मध्ये त्याने स्वत:चेच पुनर्मुद्रण अत्यंत वाईट केले होते, ती एकमेव कमतरता त्याने ‘आय’द्वारे व्यवस्थित भरून काढलीये!! कुणाला जर ‘आय’ पाहाण्यासाठी असलेल्या शेकडों कारणांपैकी केवळ एकच कारण हवे असेल, तर मी आनंदाने रहमान आणि शंकरच्याही आधी विक्रमचे नाव घेईन! ‘आय’चे नेपथ्यकार टी. मुथ्थुराज यांच्या शब्दांत सांगायचं झालं तर, “विक्रम मानव नाहीच, विक्रम तर वरदान आहे परमेश्वराने दिलेलं”!!

‘आय’ पाहाताना समजतं की, का छायांकनकार पी. सी. श्रीराम यांना ‘बापमाणूस’ म्हटलं जातं! सुंदर दृश्ये तर त्यांच्या चित्रकातून (कॅमेरा) दैवी वाटतातच, परंतु साध्या साध्या चौकटींचेही त्यांच्या परिसस्पर्शाने सोने झाले आहे. ‘आय’ची थोडीशी गूढ, अरेषीय पद्धतीने चालणारी कथा इतरवेळी सामान्य प्रेक्षकाला कंटाळवाणी वाटूही शकली असती, परंतु पी. सी. श्रीरामचा चित्रक अखेरपर्यंत तुम्हाला खुर्चीशी खिळवूनच ठेवतो! आणि या दुधात साखर म्हणजे नेपथ्यकार टी. मुथ्थुराज! गेली साडेसहा वर्षे या सर्व संघासोबत कष्ट उपसणाऱ्या या माणसाने जर तीच मेहनत खऱ्याखुऱ्या स्थापत्यरचनेला वापरली असती, तर कित्येक पक्क्या वसाहती बांधून झाल्या असत्या! एक प्रमाणन मंडळाचं प्रमाणपत्र सोडलं तर ‘आय’ची अशी एकही चौकट नाही, ज्यात नेपथ्यरचनेचा वापर केलेला नाही. आणि विशेष उल्लेख व्हायला हवा तो ‘वेटा वर्कशॉप’ या आंतरराष्ट्रीय रंगभूषा कंपनीचा! हॉलिवूडलाही लवकर न झेपणाऱ्या या मंडळींकडून शंकरने एक भारतीय आणि त्यातही तमिळ चित्रपट करून घेतलाय, ही बाब माझ्यासारख्या तमिळ चित्रपटांच्या रसिकाला निश्चितच अभिमानास्पद आहे! त्या मंडळींनीही अशी काही जादू केली आहे की ‘आय’मधल्या विविध पात्रांच्या विविध प्रसंगांमधल्या रंगभूषेची आपण कल्पनेतही कल्पना करू शकणार नाही! अत्यंत सौंदर्यपूर्ण ते अत्यंत किळसवाणं या टप्प्यांत त्यांनी पाहून डोळे पांढरे व्हावेत अशी रंगभूषा केली आहे!!

आणि रहमान! रहमानबद्दल काय बोलू!! साक्षात देवच आहे तो!! पार आत्म्याला हात घालणारी गीते तर त्याने दिलीच आहेत, परंतु आधीच परिपूर्णतेचा परिसस्पर्श लाभलेल्या चित्रचौकटींना त्याने आपल्या पार्श्वसंगीताद्वारे दिव्यतेच्या शिखरावर नेऊन ठेवलंय! तुम्ही जेव्हा ‘आय’ पाहायला जाल, तेव्हा पार्श्वसंगीताकडे विशेष लक्ष द्या हे मी आवर्जून सुचवू इच्छितो!! आणि त्याची दैवी गाणी पडद्यावर चितारावीत ती केवळ आणि केवळ शंकरनेच! नुसत्या गीतांच्या चित्रिकरणासाठी निर्माता व्हि. रविचंद्रन या गूढ माणसाने जितका पैसा ओतलाय, तितक्या किमतीत एखादा स्वतंत्र बिगबजेट चित्रपट बनू शकेल! अर्थातच शंकरचा द्रष्टेपणा तेवढा मोठा आहे आणि रहमानचं संगीत तितकं अनुभूतीसंपन्न आहे, म्हणूनच हे शक्य होऊ शकलंय हेही तितकंच खरं म्हणा! परंतु इर्शाद कामिलचे हिंदी गीतलेखन काही काही जागा सोडता, अगदीच वाईट झाले आहे. या पार्श्वभूमीवर तमिळ गीतांचे लेखन अतिशय सुंदर व अर्थपूर्ण आहे, हे मी आवर्जून सांगू इच्छितो! गीते ऐकू इच्छित असाल, तर तमिळ ऐका! त्यांची झिंग चढायला वेळ लागेल, परंतु एकदा चढली की आयुष्यभर उतरता उतरणार नाही ती!!

सुरेश गोपी या अत्यंत गुणी मल्याळम अभिनेत्याने खरोखर डॉ. वासुदेवनच्या भूमिकेत प्राण फुंकले आहेत. संथानमची विनोदनिर्मितीतली अचूकता काही नव्याने सांगण्याची गोष्ट नव्हे! ऍमी जॅक्सन आणि उपेन पटेल यांना बरोब्बर ‘सुपरमॉडेल्स’च्या भूमिका देऊन शंकरने पुन्हा एकवार चित्रपटमाध्यमावरील त्याची पकड दाखवून दिली आहे! शुभा आणि शंकरची कथा अत्यंत अकल्पनीय असली, तरीही पटकथा शंकरच्या इतर चित्रपटांइतकी चटकदार झालेली नाही, हे कबूल केलेच पाहिजे. परंतु ‘आय’ हा मुळातच इतका जगाविरहीत प्रयत्न आहे आणि शंकरने पडद्यावर भव्यता या शब्दाला असे एक नवेच परिमाण दिले आहे; की पटकथेतल्या त्रुटी आपोआपच दुर्लक्षित होतात. शिवाय आपल्या इतर सर्वच चित्रपटांप्रमाणे शंकरने ‘आय’मधलेदेखील वैज्ञानिक तपशील अतिशय परिपूर्ण व विश्वसनीय ठेवले आहेत!!

खरं तर, मी ही समीक्षा लिहित असेन तोपर्यंतच ‘आय’ने शंभर कोटींचा पल्ला पार केला असेल. त्याअर्थी ‘आय’ माझ्या समीक्षणाला जरादेखील बांधील नाही! परंतु भारतातल्याच एका वेगळ्या आणि श्रेष्ठतेच्या बाबतीत ज्याची तुलना केवळ हॉलिवूडशी व आशयसंपन्नतेच्या बाबतीत ज्याची तुलना केवळ आणि केवळ स्वत:शीच होऊ शकते, त्या तमिळ चित्रपटसृष्टीलाही वेगळा भासणारा हा अद्भुत प्रयत्न लोकांपर्यंत पोहोचवणे मला माझे कर्तव्य वाटते, म्हणून हा सारा लेखनप्रपंच! बाकी ‘आय’मधले एक पात्र (कोण ते मी सांगणार नाही!) सातत्याने भयानकतेची परिसीमा सांगितली तरी सार्थपणे ‘अधक्कम मेलऽ’ अर्थात ‘त्याहूनही भयंकर’ असे म्हणत असते! मी या एक-दिडहजार शब्दांच्या समीक्षणात ‘आय’च्या जबरदस्तपणाचा कणही पूर्णपणे पकडू शकलेलो नाही. तेव्हा कुणी जर मला विचारले की, “आय कसा आहे?”, तर मी त्याला या लेखानंतरही सांगेन ‘अदक्कम मेलऽ’!! तेव्हा जा आणि चित्रपटगृहाच्या भव्य पडद्यावर त्याहून शतपट भव्य भासणाऱ्या ‘आय’चा आस्वाद घेऊन या!!

*४.८०/५

— © विक्रम श्रीराम एडके
(लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.vikramedke.com)

image

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *