कधी कधी

कधी कधी रात्र विरताना,
दिवस उगवायाचा असतो अजून,
सूर्य उमलायाचा असतो अजून!
चंद्राचं इंधन पुरतं संपलेलं नसतं आणि
लुकलुकत असतात ताऱ्यांचे लाखो पलिते,
क्षितिजचुंबी गगनाच्या लाक्षागृहात!
कुणीतरी साखरझोपेत कूस बदलतो,
कुणाची मिठी घट्ट होते
कुठे कुरकुरत असतो पंखा तर
कुठे स्वप्नांची होडी पैल होते!
अश्या एकाकी अंधारवेळी
मी टक्क जागा असतो,
कधी सुटलेले हात आठवत,
तर कधी मिटलेली दारे साठवत!
तू विचारलं होतंस, ‘विसरणार तर नाहीस ना मला’
आणि ‘मला विसर, माझं लग्न ठरलंय’,
हेदेखील तूच म्हणाली होतीस!
मला तेव्हाही उत्तर सुचलं नव्हतं,
मला तेव्हाही उत्तर सुचलं नाही!
त्या एकांत प्रहरी मात्र,
सुचत राहातात सारीच न दिलेली उत्तरे,
आणि त्यावरच्या न आलेल्या प्रतिक्रिया!
थेंब थेंब झरणारे चांदणे आटत जाते
आणि रात्रही लागलेली असते सरू,
पण दिवस उगवायाचा असतो अजून,
सूर्य उमलायाचा असतो अजून,
कधी कधी रात्र विरताना!

— © विक्रम श्रीराम एडके
(www.vikramedke.com)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *