अय्यप्पनुम कोशियुम – उपवास सुटल्याची तृप्ती

उदगमंडलमच्या मार्गावर आट्टप्पाडीच्या जंगलासमीप एक कार थांबवली जाते. ट्रॅफिक पोलिस, अबकारी खाते आणि पोलिस दल यांचं नेहमीचंच जॉईंट ऑपरेशन असतं ते. तो सबंध भाग दारुमुक्त म्हणून घोषित केलाय. नेमकं याच कारमध्ये दारुच्या एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल बारा बाटल्या सापडतात. कारचा दरवाजा उघडताना आत दारू पिऊन लास झालेला माजी सैनिक कोशी कुरियन (पृथ्वीराज सुकुमारन) खाली पडतो. आधीच गरम डोक्याचा त्यात दारू प्यायलेला कोशी त्या तिन्ही सुरक्षादलाच्या लोकांसोबत भांडू लागतो. पोलिसांच्या गाडीचा हेडलाईट फोडतो तो. कोशीच्या अंगात रग आहे. सगळ्यांना मिळून एकत्रितपणेसुद्धा आवरत नाही तो. ते पाहून पीआय अय्यप्पन नायर (बिजू मेनन) गाडीतून खाली उतरतो आणि कोशीच्या खाडकन मुस्काडात लावतो. एकदा नाही तर अनेकदा. कोशीच्या मुसक्या आवळून त्याला पोलिस ठाण्यात आणलं जातं. तिथे पोलिस त्याच्या मोबाईलमधले कॉण्टॅक्ट्स पाहात असताना त्यांना केरळच्या अनेक बड्या प्रस्थांची नावं दिसतात. पोलिसांची साहजिकपणे फाटते.

पण आता तर एफआयआर नोंदवून झालाय. आणि तसं बघायला गेलं तर या प्रकरणात खरोखरच चूक कोशीची आहे. एसआय अय्यप्पन वरीष्ठांना फोन करून विचारतो. सीआय सतीश (अनिल नेदुमंगड) त्याला सांगतात की, ‘थोडं धीराने घे. त्याला प्रेमाने वागव. त्याला त्याच्या गुन्ह्यांची गंभीरता समजावून सांग’. खरं तर पोलिस ठाण्यात आल्यावर आणि तऱ्हेतऱ्हेचे सेक्शन्स लावल्यावरही कोशीचा माज एका कणभरही कमी झालेला नाहीये. त्याचा उद्धटपणा अजूनही तितकाच आहे. त्यामुळे अय्यप्पनची त्याला चांगलं वागवण्याची अजिबातच इच्छा नाहीये. पण काय करणार, वरीष्ठांची आज्ञा! तो त्याच्या अंतरात्म्याच्या आवाजाला अनिच्छेने मुरड घालतो आणि कोशीला माणूसकीने वागवतो. बास! इथेच चूक होते त्याची. धूर्त कोशी पोलिसांच्या चांगुलपणाचा फायदा घेतो आणि त्यांच्यावरच गेम करतो. इथून सुरू होतो, ‘अय्यप्पनूम कोशियूम’ नावाचा वाघ आणि लांडग्याचा एकमेकांची शिकार करण्याचा हिंस्र आणि रानटी खेळ!

‘अय्यप्पनुम कोशियुम’चं बीज असं आहे ना की त्यातून अतिशय मसालेदार व्यावसायिक ॲक्शनपट बनू शकला असता. तसा तो बनत नाही, यातच त्याचं खरं यश सामावलेलं आहे. या सिनेमाचं वर्णन सर्वत्र ॲक्शन थ्रिलर असं केलंय. मी सांगतो, चुकीचं आहे ते. सिनेमात सगळे मिळून पाच-सहा फाईटसीन्स असतील. ॲक्शन हा सिनेमाचा भाग आहे, पण तो त्याचा खरा जॉन्रा नाहीच. सिनेमात सूडाचं नाट्य आहे पण तो रिव्हेंज थ्रिलरसुद्धा पूर्णपणे नाही. सिनेमा खरं तर आहे सायकॉलॉजिकल थ्रिलर. कोशी फक्त नावालाच सैनिक होता. त्याच्यात सैनिकाची शिस्त नावालासुद्धा नाही. त्याचे राजकारणात खूप वरपर्यंत संबंध आहेत. पैशांचं पाठबळ आणि अत्यंत टॉक्झिक बापाचा (रणजित) माज त्याच्यापाशी आहे. आणि त्यांच्याच जीवावर त्याची सगळी रग आहे. अय्यप्पनकडे यातली एकही गोष्ट नाही. त्याच्याकडे आहे ती फक्त खऱ्याची बाजू आणि सत्तावीस वर्षे सर्व्हिस करताना कमावलेलं गुडविल. आणि तरीही इथे ना कोशी पूर्ण खलनायक आहे ना अय्यप्पन पूर्ण नायक.

एकमेकांवर एकापाठोपाठ एक कुरघोड्या करताना कोशी आणि अय्यप्पन दोघेही एकमेकांच्या मानसिकतेत वेळोवेळी डोकावून बघत असतात. त्यातून त्यांच्या शत्रुत्वातही विचित्र अशी मैत्री फुलत जाते. दोघेही अत्यंत मानी. त्यामुळे ते महाभारतीय युद्धासारखे आदर्श नियमांनी लढतात. कोशीचा बाप ज्यावेळी रडीचा डाव खेळायचं ठरवतो, तेव्हा आपल्या बापासमोर कधी तोंड वर करून बोलायची हिंमत नसलेला कोशी पहिल्यांदाच बापाशी भांडतो ते सुद्धा आपल्या शत्रूच्या बाजूने. आणि कोशी ज्यावेळी अय्यप्पनशी शत्रुत्व करण्यात मर्यादा ओलांडून पुढे जातो त्यावेळी कोशीचा वकील (बेंझी मॅथ्यूज) त्याला अय्यप्पनने मुळात तुला आयपीसीखाली अटक करून कसे उपकार केले आहेत ते समजावून सांगतो. आणि तरीही दोघांचंही शत्रूत्व जरादेखील पातळ होत नाही. कोशी अय्यप्पनचं अस्तित्व, त्याचं सर्वस्व हिसकावून घेतच राहातो आणि अय्यप्पन कोशीच्या अस्तित्वाचे बारीक बारीक बारीक बारीक तुकडे, इतके बारीक तुकडे की कोशी स्वतःच स्वतःला ओळखू शकणार नाही, करतच राहातो.

सिनेमात आरडाओरडा नाही. उलट भावनांचा महापूर अतिशय संयत शब्दांत रोखून धरण्याच्या अचाट ताकदीचं प्रदर्शन आहे. संवाद टाळ्या घेणारे नाहीत तर आत्म्यावर शहारा उमटवू शकणारे भयंकर आहेत. सुरुवातीच्या प्रसंगांमध्ये कोशी एकदा अय्यप्पनच्या घराबाहेर जाऊन फुशारक्या मारतो, अय्यप्पनला अनौरस म्हणून हिणवतो. इतका वेळ ऐकून घेणारी अय्यप्पनची बायको (गौरी नंदा) तान्ह्या पोराला शांतपणे पाळण्यात घालते आणि पदर खोचून कोशीकडे येते आणि फक्त दोनच वाक्यं सुनावते. बास! कोशीची चड्डीच पिवळी व्हायची बाकी राहाते. त्याचवेळी अय्यप्पन त्याच्या बुलेटवरून येतो. कोशीची अवस्था बघून तो त्याला म्हणतो की, ‘तिने दोनच वाक्यांत तुझी फाडून ठेवली, विचार कर मी जर सुरू झालो तर तुझं काय होईल’! अय्यप्पनचं म्हणणं अक्षरशः सत्य असतं कारण त्यानंतर सीआय सतीश कोशीला जे सांगतो ते ऐकून तर त्याची पाचावर धारण बसते.

सिनेमात खूप साऱ्या कायद्यांची खूप सारी कलमे योग्य ठिकाणी पेरली आहेत. कोणत्याही खटकेबाज संवादांपेक्षा त्यांचा प्रभाव अनेकपटींनी जास्त पडतो. हे नि:संशय एकेकाळी वकील असलेल्या दिग्दर्शक कै. सचिचेच यश आहे. कोशी आणि त्याचा ड्रायव्हर कुमारन (रमेश कोट्टायम) यांचं नातं तर इतकं सुरेख चितारलंय की काय सांगू! सिनेमा जवळजवळ तीन तासांचा आहे. पण इतकी योग्य गति राखलेला सिनेमा गेल्या अनेक वर्षांत क्वचितच आला असेल. लेखन, संपादन, दिग्दर्शन, छायाचित्रण, पार्श्वसंगीत कुठे कुठेच खोट काढायला जागा नाही. फक्त एकच त्रुटी मला आढळली ती म्हणजे क्लायमॅक्सचा ट्विस्ट प्रेक्षकांना खूप आधीच सांगून टाकायला नको होता. त्याने चित्रपटाचा प्रभाव यत्किंचितही उणावत नाही, पण तो वेगळ्या प्रकारले हाताळला असता तर तोच प्रभाव अजून वाढू शकला असता. बाकी इतकी सुरेख पात्रयोजना मी तरी ‘विक्रम-वेधा’नंतर (२०१७) पहिल्यांदाच पाहिली आहे.

गेल्या दोन-चार वर्षांत असं होत होतं की, कोणताच चित्रपट मला संपूर्ण आवडत नव्हता. चांगला चांगला म्हणवणारा चित्रपटही पूर्ण समाधान देत नसायचा मला. निष्कलंक असं काही सापडतच नव्हतं. ‘अय्यप्पनुम कोशियुम’चं यश सांगू? या चित्रपटाने माझा अनेक वर्षांचा उपवास सुटला. सिनेमा पाहिल्यावर एकाचवेळी भारलेलं आणि अंतर्यामी रितं वाटायला लावणारी भावना या चित्रपटाने मला दिली. या चित्रपटाने माझा चित्रपट या माध्यमावरील विश्वास पुन्हा एकदा दृढ केला. या एकाच मुद्यावर तुलना करायची झाली तर हा चित्रपट ’96’च्या (२०१८) दर्जाचा आहे. ‘अय्यप्पनुम कोशियुम’चे, खरंच सांगतो, माझ्यावर खूप खूप उपकार आहेत!

*५/५

— © विक्रम श्रीराम एडके
[इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा www.vikramedke.com]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *